Skip to content

सत्तरच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -बॉबी 

काही शब्दांचा अर्थ समजवायला काही जण जगात येतात. प्रेमाची कोवळीक म्हणजे काय असे विचारले तर जिन्यावरून खाली उतरत, “ मै शायर तो नही “ म्हणत प्रेमाच्या चाहुलीला सलाम करणारा ऋषी डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचा गोरा पान चेहेरा, डोळ्यातले औत्सुक्य,  तारुण्याची झळाळी आणि वयाला साजेशी निरागसता. 
पार्टीला आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीत हरवलेली, एक छोटीशी, भोकरासारख्या डोळ्यांची, आजीच्या पाठी लपणारी गोड मुलगी त्याच्या नजरेस  पडते आणि एका क्षणात त्या पोराचे, तरुणात रूपांतर होते.
पौगंडावस्था  ते मखमली तारुण्य हा प्रवास ” मै शायर तो नहीं ” या गाण्यात झाला आहे. 
मखमलीच म्हणेन मी कारण तारुण्याचा सोहळा साजरा करणाऱ्या या सिनेमात डिम्पल आणि ऋषीच्या नजरेतील अबोधता  शेवटपर्यंत टिकून राहिली. 

शाहरुख खानचे या सिनेमा बाबत एक सुंदर निरीक्षण आहे, “बॉबी येण्यापूर्वी भारतीय सिनेमा हा स्त्री-पुरुषांचा सिनेमा होता, बॉबी नंतर हा  मुला मुलींचा सिनेमा झाला. “ प्रेमाचे वय लहान झाले. 
बॉबीची नक्कल करणारे नंतर अनेक सिनेमा आले; पण बॉबीची निरागसता, ताजेपणा, प्रेक्षकावर पडलेला प्रभाव याला कुणीही मागे टाकू शकले नाही. बॉबी प्रदर्शित झाला तेव्हा आम्ही खूप लहान होतो. आमच्या पिढीचे सिनेमा होते लव्ह स्टोरी, रॉकी आणि बेताब . बॉबी हा मॅटीनीला जवळजवळ दहा वर्षे  उशिरा  पाहिला.  दहा वर्षांनी उशिरा पाहूनसुद्धा खूप आवडला एवढा रिफ्रेशिंग सिनेमा होता तो . 

प्यार का नाम मैंने सुना था मगर
प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर
मैं तो उलझा रहा उलझनों की तरह.
दोस्तों में रहा दुश्मनों की तरह..
मैं दुश्मन तो नहीं
मगर ऐ हसीं
जब से देखा, मैंने, तुझ को मुझ को, दोस्ती आ गई

पहिले प्रेम केवळ हार्मोन्स चा खेळ नसतो . पहिल्यांदा आपल्या लक्षात येते की स्वतः सोडून आपण कुणावर तरी जीव जडवू शकतो नी कुणीतरी आपल्यावर तेवढेच जीवापाड प्रेम करू शकते. There is a sense of euphoria , excitement , freedom and relief  to find someone with whom i can be  compatible and comfortable on many levels .  

श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी , त्यांना होणार विरोध , बॉबीची ही थीम काही नवीन नव्हती.  चावून चोथा झालेला हा विषय असूनही , १९७३ साली प्रदर्शित झालेल्या बॉबीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.  आपल्या उत्पन्नाने आर के स्टुडिओचे कर्ज भरून काढले.  ऋषी आणि डिम्पल रातोरात स्टार झाले . 

श्रीमंत उद्योगपतीचा ,सहा वर्षाचा छोटा मुलगा राज, बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवला जातो इथे सिनेमाची सुरुवात होते.

या निर्णयाने दुःखी असते ती फक्त त्याची दाई , मिसेस ब्रॅन्गन्झा. अधिकाधिक पैसे कमावणे हा वडिलांचा छंद तर त्या पैशाचा उपयोग छानचौकीत राहण्यात घालवणे हा आईचा.   पैशाने सुख विकत घेणे शक्य आहे यावर विश्वास असल्याने मुलाला प्रेमाची गरज असू शकते याची जाणीव त्याच्या आई बाबांना नाही. 
आतापर्यंतचे आयुष्य बोर्डिंग मध्ये गेलेला राजा त्याच्या अठराव्या वाढदिवसाला घरी येतो,  सोळा वर्षाच्या बॉबीला (डिम्पल ) पाहतो आणि आकंठ प्रेमात बुडतो. ती त्याच्या दाईची नात असते. 

या बारा वर्षात तिची परिस्थिती सुधारलेली असली तरीही दोन कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत बरेच अंतर असते. इथेच बॉबी आणि राजची ओळख होते, मैत्री होते आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.
अर्थात आईवडीलांची परवानगी मिळणे शक्यच नसते. राजचे वडील बॉबीच्या वडिलांचा अपमान करतात. हे नाते तोडून टाकायला त्यांना पैसे देऊ करतात. बॉबी वर जीवापाड प्रेम असूनही हा अपमान सहन न  झाल्याने बॉबीला राज ला भेटायला बंदी घातली जाते.
इथे राजचे लग्न ठरवले जाते. मुलगी अत्यंत श्रीमंत असते पण तिची बुद्धी एका लहान मुलीएवढी असते. वडिलांसाठी  मुलगा सुद्धा व्यवसायासाठी वापरण्यात येणारे साधन असते त्यामुळे राज, बॉबीला घेऊन घरातून पळून जातो.
या वयातल्या अबोध प्रेमाला नकार माहित नसतो. जगाचा अंदाज नसतो. अनेक गैरसमज, विरह वेदना , हृदयभंग या सर्वावर मात करून प्रेम स्वतःच्या परीक्षेला पुरून उरते.
दोघांचे कुटुंब त्यांच्या मागावर असते. एकमेकांचा विरह सहन करण्यापेक्षा जीव दिलेला बरा म्हणून ते कड्यावरून उडी मारतात. आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊन दोघांचे वडील त्यांना वाचवतात आणि या आधुनिक रोमिओ ज्युलिएटचे मिलन होते. 

तोकडे  कपडे, आर्थिक , धार्मिक आणि सामाजिक अंतर  असूनही नायिका -नायक यांच्यातील बिनधास्त जवळीक , आणि अप्रतिम संगीत हेच ह्याच्या लोकप्रियतेचे कारण होते का ? 
नाही, बॉबी  ह्याच्याहून खूप वेगळा होता. 

बॉबी हे तारुण्याच्या उंबरठ्यावरील अल्लड स्वप्न नव्हते.
ही कहाणी होती एका भ्रमनिरास झालेल्या, उपेक्षित, दुःखी मुलाची, ज्याचा जगावरील विश्वासच उडाला  होता. आईवडील , पैसा अडका ,प्रतिष्ठा असलेला  हा मुलगा मनातून अतिशय एकटा होता. त्याच्या माणसांपासुन तुटलेला होता. गरज होती ती अशा हाताची जी त्याला जगात ओढून आणेल आणि ती असते बॉबी. गोड, प्रामाणिक, निरागस, मोकळी हसरी बॉबी.   तिला पाहिल्यावर त्याच्या लक्षात येते की ही मुलगी त्याच्या जगातली नाहीच. ही वेगळी आहे आणि ही जाणीव  त्याला तिच्याकडे आकर्षित करते . 
ह्याचा पहिला शॉट आठवतो? पार्टी, त्यात रममाण झालेले श्रीमंत स्त्री पुरुष, सेट्स, उपस्थित असलेल्या लोकांचे कपडे , झगमगाट, श्रीमंती प्रत्येक फ्रेम मधून दिसतेय  आणि त्यात विसंगत दिसणारी बॉबी आणि  तिची आजी. ती या जगाचा भाग नसते आणि हे वेगळेपण त्याला तिच्याकडे खेचून नेते.  जे जे त्याच्या पालकांत दिसते, ते सर्व त्याला निराशेकडे ढकलते.  त्याचा अभाव असलेली बॉबी त्याचे सर्वस्व बनते. त्याला धीर देते. त्याच्या मनाचा आरसा बनते.
बॉबी ही त्याची प्रेयसीच नाही, ती त्याची बंडखोरी आहे आणि मुक्तीही.
हे प्रेम, केवळ तारुण्यसुलभ आकर्षण नाही, हे त्याच्या नको असलेल्या जगापासून केलेले पलायन आहे. बॉबीचे  वेगळेपण यात आहे . 

हा सिनेमा आहे त्याच्या उठावाचा, त्याच्या झुंजीचा, त्याच्या मुक्तीचा .. 

माझ्या आई-वडिलांचे माझ्यावर प्रेम नाही हे उमजणे फार क्लेश कारक असते. त्याची हतबलता, त्याचे  नैराश्य  त्याच्या डोळ्यात दिसते.  And the audience bleed for him ..
त्याचे डोळे बोलतात, “आईवडिल तर मुलांवर प्रेम करतात , त्यांच्या सुखाची कामना करतात मग माझेच असे का ? “ कुणीतरी, अगदी कुणीही आपल्यावर प्रेम करावे ही त्याची आत्यंतिक इच्छा आहे; बॉबी त्या इच्छेचे फलित आहे. 

बॉबी १९७३ ला प्रदर्शित झाला. स्वातंत्र्य मिळून सव्वीस वर्षे लोटली होती. मेरे देश की धरती सोना उगले हा भाबडेपणा नष्ट व्हायला सुरुवात झाली होती . मूल्यांचे अवमूल्यन झालेले भारतीय जनता पाहत होतीच. भ्रमनिरास नी सिस्टिम बद्दलचा असंतोष, पडद्यावर सुद्धा यायला सुरुवात झाली. भेसळ केवळ बाह्य जगात नव्हती. आपल्या कुटुंब व्यवस्थेला सुद्धा हादरे बसू लागले होते. सती सावित्री आई , मुलांसाठी राबणारा बाबा ही इमेज बदलायला सुरुवात झाली .  बॉबी सिनेमाने त्याला चित्रित केले. आपली फिगर बिघडेल म्हणून मुलाला आपले दूध न पाजणारी आई बॉबीत दाखवली गेली . आई मुलाचा जो बंध असतो , तो या सिनेमात कुठेही दिसत नाही.
आतापर्यंत सिनेमातल्या रोमान्सला मर्यादांचे कुंपण होते. क्वचित , आराधना, धर्मपुत्र सारख्या सिनेमामधून ती ओलांडली गेली असेलही पण त्याबद्दल अपराधी भावना होती .
बॉबी मध्ये ही सेक्स बद्दल असलेली अपराधी पणाची भावनाही  झुगारून दिलेली आहे.

बाहर से कोई अंदर न आ सके
अंदर से कोई बाहर न जा सके
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए

केवळ रोमान्सचे स्वरूप बदलले नाही तर आई वडिलांच्या पात्रात सुद्धा ग्रे शेड्स आणल्या गेल्या . मुले बेभान होऊन बंड करतात यात पालकांचा काहीच दोष नाही? आई वडिलांपासून तुटून जाणे ह्याची जबाबदारी फक्त मुलांचीच असते ?
आपण मुलांना आपल्या आशा आकांक्षाचे माध्यम  मानतो का म्हणून एवढ्या सहजासहजी मुले दूर जातात ? 
खरेतर हा मुलांचा नाही तर पालकांच्या आत्मपरीक्षणाचा सिनेमा होता. 
बॉबी च्या यशात याचाही  प्रचंड वाटा होता. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

4 thoughts on “सत्तरच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -बॉबी ”

  1. बॉबी चित्रपट पहिल्या आठवड्यात 11 वेळा पाहिला तिकीट चेकर बघितलं की हसू लागला त्यावेळी फार धमाल चित्रपट मी आणि माझा मित्र रंजन सतरा अठरा वर्षाचे आम्हाला जे हवं होतं ते सगळं त्यात होतं आणि अगदी फ्रेश पणे होतं राज कपूर म्हणजे एकदम जीवाभावाचा राज नर्गिस जोडी नंतर जणू काही हीच जोडी ❤️ त्यावेळी ची बॉबी डिझाईन चे कापड आम्हा व्यापाऱ्यांना खूप सधन करून गेले 😂

    1. Thanks Sureshji. तरुणाईला सिनेमा आवडलाच
      आणि बॉबी ड्रेस तर एकदम हिट होता .
      मी दुसरीत असताना आईने आणलेला .

  2. एक वेगळाच विचार,नजरिया या तुझ्या लेखाने मिळाला.
    एकदम झकास.❤️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *