Skip to content

आयुष्याचा अर्थ सांगणारा -अर्थ 

  • by

अरुणा ढेरे यांच्या एका लेखात एक लोकगीत वाचले होते. 

तुळशी गं बाई, तुला नाही नाक डोळे
अशा सावळ्या रुपाला कसे गोविंद भुलले?

तुळशी गं बाई, काय हे तुझं जीणं
पांडुरंगासंगे, वर्सावर्साला लगीन

रुक्मिणी आणि तुळशीचा संवाद आहे हा. रुक्मिणी देवाची राणी. श्रीमंत माहेर, संपन्न सासर. लग्नामुळे मिळालेली प्रतिष्ठा आणि सौभाग्य चिन्हे. तुळशीला मात्र दर वर्षी लग्न करून आपले अस्तित्व टिकवावे लागते. तरीही तिचा अपमान करताना रुक्मिणी आपल्या देवा ब्राह्मणा समक्ष लागलेल्या लग्नाचा वापर एखाद्या टोकदार शस्त्रासारखा करते.
ती पट्टराणी आहे पण ते समाजातील स्थान. तुकड्या तुकड्यात नवरा वाटून घेण्याचं दुःख तिच्याही वाट्याला आले आहे. त्यात संसारात राहायचे असेल तर हा अपमान बोलता येत नाही. 

लोकगीतांच्या माध्यमातून स्त्री मन उलगडत जाते. पुराणातील कथांच्या रूपकाने त्यातली रखरखता थोडी लपली जाते.
एकूणच स्त्रीचा उपयोग होतो हे चित्र डोळे उघडवणारे आणि पाणवणारे. 
हिंदी सिनेमात दोन्ही स्त्रियांचा उपयोग करून घेणारी अशी अनेक पुरुष पात्रे आहेत.  त्यांच्या एकही भूल वर कधी विनोदाने, कधी आत्यंतिक भक्तीने, कधी त्यागाने पांघरुणंही घातले गेले. बायकांच्या बाबतीत समाज आणि फिल्मइंडस्ट्री मात्र उदार नव्हती.
नानावटी खटला, जो १९५९ मध्ये गाजलेला खटला होता ज्यावर तीन सिनेमा आले.

नेव्हल ऑफिसर के एम नानावटी, यांची पत्नी यांचे त्याच्याच मित्राशी अनैतिक संबंध असतात. त्यातून नानावटींच्या हातून  प्रेम अहुजाचा, त्यांच्या पत्नीच्या  प्रेमिकाचा खून होतो. ही केस गाजली. जनसमुदाय आणि ज्युरी यांची सहानुभूती नानावटींच्या बाजूने होती . पत्नी बदफैली असणे हाच मोठा गुन्हा, त्यात ते नेव्हल ऑफिसर, प्रामाणिक . एका देशभक्ताची पत्नी असे वागणे हे ही पचण्यासारखे नव्हते. अनेक वेळा लांब राहिल्याने पुरुष चुकतो, बायको गरोदर असल्यामुळे त्याची कुचंबणा होते अशी कारणे सहज चालतात पण तीच शरीराची कोंडी , भूक  स्त्रीला लागत नाही (!)
केस चा निकाल विरोधात लागूनही  नानावटी याना काही काळानंतर मुक्त केले. आपल्या पत्नीबरोबर ते कॅनडाला गेले. त्यांनी पत्नीला माफ केले पण सिनेमा निर्मात्यांनी नाही.
यावर आधारित असलेल्या “ये रास्ते है प्यार के” या सिनेमात पत्नी आत्महत्या करते तर “अचानक” या सिनेमात पती पत्नीची हत्या करतो. व्यभिचार केल्याने पश्चाताप होऊन कुणी पुरूषाने जीव दिल्याचे , तप केल्याचे एकही उदाहरण मला मिळाले नाही…

व्यभिचार हा स्त्री  करते आणि पुरुषाचा पाय फक्त घसरतो , हे जे विचित्र लॉजिक वर्षानुवर्षे हिंदी सिनेमात आणि समाजात रुजले होते त्याला धक्का लावण्याचे काम आखिर क्यों , अर्थ , इजाजत या सिनेमांनी केले. 
हिंदी सिनेमात  काही सशक्त स्त्री भूमिका आहेत.
चाळीसच्या दशकातील, वृद्ध माणसाशी जबरदस्तीने लग्न होऊनही ते लग्न मानायला नकार देणारी “दुनिया न माने” ची निर्मला, लग्न झालेल्या स्त्रीला सुद्धा मित्र  असण्यास काहीही गैर नाही हे मानणारी अंदाज मधील नीना, स्वतःच्या मूल्यांसाठी मुलाचाही वध करणारी मदर इंडिया मधील राधा, , करिअरला प्राधान्य देणारी आँधी मधील आरती … ते नवऱ्याची प्रतारणा, असहनीय झाल्यावर घर सोडून स्वतःला नव्याने घडवणारी “अर्थ” मधील पूजा इंदर मल्होत्रा .

ऐंशीच्या दशकात सिनेमाचा स्तर खालावलेला होता. भरपूर हिंसाचार, मेलोड्रामा आणि प्रेक्षकांना चालवणारी दृश्ये यांच्या जीवावर गल्ला कमावत असताना , सई परांजपे, कुंदन शहा , शाम बेनेगल, शेखर कपूर यांनी काही वेगळ्या अर्थपूर्ण विषयांवर आधारित सिनेमा दिले. याच दशकाच्या सुरुवातील स्वतःच्या जीवनावर आधारित असलेला “अर्थ “ही महेश भट यांची चित्रपट सृष्टीला दिलेली मोठे देणगी आहे.
व्यभिचार या विषयाकडे स्त्रीच्या नजरेतून पाहणारा हा पहिलाच सिनेमा होता.

पूजा (शबाना आझमी )आणि इंदर (कुलभूषण खरबंदा) यांच्या लग्नाला काही वर्षे झालेली आहेत. इंदर चा सारा वेळ कामात जात असताना, पूजा स्वत:च्या हक्काच्या घराच्या शोधात आहे. हे त्यांच्या वादाचे सुद्धा कारण आहे . इंदरला त्याच्या कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने फ्लॅट सोडायची नोटीस दिलेली आहे. आपल्या धरसोड्या स्वभावामुळे इंदर स्थिर होऊ शकत नाही. पूजा अनाथ आहे. स्वतःचे घर नाही, ओळख पटवायची कधी संधीच मिळाली नाही त्यामुळे मनाने दुबळी आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णतः नवऱ्यावर अवलंबून आहे. आई वडील, त्यांनी दिलेले नाव,  सुरक्षितता आणि स्थिरता देते. पूजाच्या आयुष्यात ह्याचा अभाव आहे. आपले घर असावे हे तीव्रतेने वाटणे हे स्वाभाविक. स्वतःच्या मैत्रिणीकडे, अपर्णाकडे,  पूजा आपले मन मोकळे करते पण स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेमात आणि हक्काच्या घरात सुरक्षित असलेल्या तिच्या मैत्रिणीला पूजाची घराची ओढ समजू शकत नाही.
अशात इंदरच्या फोनने ती चकित होते. घर सोडण्याची नोटीस येऊनही इंदर तिच्यासाठी इंटिरियर डिझाईन चे पुस्तक आणतो. त्याने घर विकत घेतलेले असते.
“आणि यासाठी लागणारे पैसे ? त्याचे काय ?” पूजा विचारते.
इंदरला एक पार्टनर मिळाला असतो. इंदरचे  बौद्धिक भांडवल आणि याचे आर्थिक.
इंदरा तिला घर सजवायला नोटांची गड्डी देतो.

आयुष्यात पहिल्यांदाच पूजा आनंदात असते. अर्थात इंदरला कामासाठी बाहेर जाणे भाग असते. तीन सिनेमाचे शूटिंग चालू असते. एकात नावाजलेली नायिका, कविता संन्याल  (स्मिता पाटील) बरोबर काम करण्याची संधी इंदरला मिळाली असते. घर सजवण्यात रमलेल्या पूजाचे आता एकच स्वप्न असते, इंदरच्या मुलाची आई होणे. स्वप्नात दंग  झालेल्या पूजाला हे माहित नाही की आपला नवरा आणि कविता संन्याल यांचे अफेअर चालू आहे आणि हा फ्लॅट त्याची किंमत आहे.

स्त्री च्या जीवनाला नक्की अर्थ कुणामुळे आणि कशामुळे असतो ? समाजाची धारणा आणि कदाचित स्त्री ची सुद्धा अशीच धारणा आहे की तिच्या आयुष्याला अर्थ केवळ तिच्या आयुष्यातील पुरुषच देऊ शकतो .
स्वतःचे घर झाल्याने पूजा समाधानी आहे. आता तिला आई व्हायचे आहे. तिची झेप तेवढीच.
पण कविता तर एक  यशस्वी तारका आहे. प्रतिष्ठा आणि पैसे असूनही तिचीही एकच इच्छा आहे. इंदरच्या मुलाची आई बनणे. त्याच्याशी लग्न करणे. त्याचे नाव तिच्या नावापुढे लागणे.

दोन्ही दरडीवर पाय ठेवून असलेला पुरुष काही नवीन नाही.  या सिनेमाचे वेगळेपण यात आहे की दोन्ही स्त्रिया जरी एका पुरुषाची साथ मागत आहेत तरीही त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. कविता संन्यालला दुसरी स्त्री म्हणून राहण्यात स्वारस्य नाही. आपला भावी नवरा म्हणून ती इंदिरा ची ओळख आपल्या आईला करून देते.
“आता पूजाला जर घर मिळाले आहे तर तिला काय अधिकार आहे तुझ्या आयुष्यात राहायचा?  तिला कल्पना दे नाहीतर मीच ते करते “ अशी स्पष्ट धमकी कविता इंदरला देते. ती दुसरी स्त्री म्हणून आयुष्यात आली आहे पण त्याच स्थानावर राहायची तिची तयारी नाही.
काहीच पर्याय नसल्याने इंदर हे सत्य पूजाला सांगतो.
पूजाची पहिली प्रतिक्रिया अगदी ओळखीची. बसलेला अनपेक्षित धक्का आणि आलेले सुन्नपणं.

If one is not strong enough, a woman prefers to live in denial. Pooja does the same. तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचा नवरा जेव्हा भेटायला येतो तेव्हा अपर्णा पूजाला घर सोडून तिच्याकडे येण्यास सुचवते पण तिचा नवरा म्हणतो, अफेअर्स काही काळासाठी असतात , लग्न आयुष्यभराचे असते,
दोन्ही स्त्रिया आहेत आणि त्यांना फसवणारा पुरुष आहे. कविता संन्यालने सगळे सांगून सौदा केला आहे, आणि तो विवाहित असूनही इंदरने मान्य केला आहे. पण समाजाच्या नजरेत कविताच दोषी आहे. इंदरसाठी पत्नीचा दरवाजा उघड राहील हे समाजाने गृहीत धरले आहे.
इंदर जरी कविताबरोबर राहत असला तरी जागे होताना त्याच्या ओठावर पूजाचे नाव आहे. जेव्हा हे कविताला उमजते तेव्हा या नात्यातील इंदरचा दुटप्पीपणा तिला जाणवायला सुरुवात होते. इंदरला ती आता एकाच पर्याय निवडायला सांगते.

“आपण नक्की कुठे चुकलो ?” एकटी पडलेली पूजा स्वतःला दोष देते. इंदरची विनवणी करते. “ माझ्यातल्या उणिवा मी काढून टाकायचा प्रयत्न कारेन , मला एक संधी दे, आपण परत नव्याने सुरुवात करू “
इंदर मात्र पूजाला झिडकारतो आणि कविता बरोबर निघून जातो.
अनाथ असलेल्या पूजाच्या मनात परत येणाऱ्या एकटेपणाची भीती आहे. आताच तर कुठे तिला ओळख मिळाली आहे ती गमवायची तिची तयारी नाही. तिला परत फिरायला घर नाही आणि अनेक मध्यमवर्गीय घर सांभाळणाऱ्या स्त्रियांप्रमाणे ती आर्थिक दृष्ट्या सुद्धा अनाथच आहे. स्वतःचे घर नाही, पैसे नाहीत अशा बायकांचे आयुष्य नवऱ्याभोवती फिरते. खचलेली ती कविताला फोन करते. तिची विनवणी करते. रडते , भेकते , इंदरला सोड अशी भीक मागते.

हा सीन अत्यंत प्रभावी सीन आहे.
एका बाजूला पूजाची  वेदना , जी ती न दाखवण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी स्वतःचा स्वाभिमान मुठीत धरून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला कविता संन्यालचे थिजणे. जखमी पत्नीला ऐकताना मनाला वाटणारी खंत. तिची अगतिकता कवितालाही जाणवते. तिची घालमेल, आपण एका स्त्री चा संसार उजाडतो आहे त्याचे अपराधीपण आणि तरीही इंदर हातातून निसटलं म्हणून झालेली कोंडी यात तिचाही नाईलाज आहे.
अनेकवेळा गोष्टी स्पष्ट दिसत असतात. ते सत्य पाहायची तयारी नसते म्हणून कोणावर तरी असत्याचा ठपका लावून मोकळे होतो आपण. पूजा तेच करते. हातातली वाळू सरकते आहे हे जाणल्यानंतर तिचा धीर सुटतो. एका पार्टीत कविताला इंदर बरोबर पाहून तोलही सुटतो. सर्वांच्या समोर ती पूजाला “रंडी” म्हणते.

What a paradox!
केवळ मंगळसूत्राचा अधिकार पुरुषाला दर्जा देतो?
कविता इंदरला पोसते …इंदर नाही. मग इथे रंडी कोण ? का रंडीला फक्त स्त्री लिंग असते!

जेव्हा तिला समजते की ज्या बाईला तिने हे अपशब्द उच्चारले त्याच बाईच्या पैशाने घेतलेल्या फ्लॅटमध्ये ती राहते आहे तेव्हा मात्र तिचा आत्मसन्मान जागा होतो. लग्न हा मानला तर संस्कार नाहीतर करार …
तरीही लग्नातली कमिटमेंट दोघांची असावी लागते नाहीतर त्या मंगळसूत्राला काहीही वजन नाही. Both are answerable  to each other  नाहीतर पत्नीचा दर्जा केवळ पतीच्या पैशावर जगणे हाच राहिला असेल तर तिच्यात आणि दुसऱ्या स्त्री मध्ये सुद्धा काय फरक राहतो ! कविताच्या पैशाने घेतलेल्या प्लॅटच्या चाव्या, इंदरचे चेकबुक ती परत करते. लग्नाच्या आधी तिच्याजवळ असलेले काही मोजके पैसे घेऊन ती घर सोडते आणि महिला हॉस्टेलमध्ये राहून आपल्या आयुष्याला परत एकदा नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करते.

ती घर सोडते पण इंदरशिवाय जगणे मात्र तिला मंजूर नाही. यातली स्त्री ही सर्वसामान्य स्त्री आहे. तिला नवऱ्याशिवाय जगणे माहीतच नाही. तरीही घराबाहेर पडल्यानंतर आपल्या आदर्शांशी ती तडजोड करत नाही. नवऱ्याशी एकनिष्ठ राहून ती स्वतःच्या पायावर उभी राहते.
यात तिची साथ देतो तो राज. एक उभरता गायक. एका पार्टीत त्यांची ओळख झालेली आहे. तिचे दुःख , तिचे एकटेपण समजूनही तो गैरफायदा घेत नाही.

कुणालाही मित्र म्हणून हवाहवासा वाटेल असा राज आहे. त्याचे तिच्यावर प्रेम आहे, जे त्यांनी तिला सांगितले सुद्धा आहे. पण आपल्या भावना तो थोपवत नाही. तिचा कोणताही निर्णय मान्य करण्याएवढा तो कणखर आहे. तिला कुणीतरी व्हायचे आहे, तिला या जगात स्वतःची ओळख घडवायची आहे याचे तिला भान आहे आणि  तिच्यासाठी थांबायची त्याची तयारी आहे.
राजच्या मैत्रीच्या साहाय्याने स्वतःचे आयुष्य परत नव्याने उभे करताना , पूजाच्या आयुष्यात एक निर्णायक वळण येते. एके दिवशी राजकडे जात असताना तिला इंदरा भेटतो. त्या दिवशी तिचा वाढदिवस असतो. आपल्या वाढदिवसाला तो खास भेटायला आला म्हणून पूजा सुखावते पण मिळालेली भेट मात्र या नात्याचा अंत करणारी असते.

इंदर घटस्फोटाच्या पेपरवर सही घेण्यासाठी आलेला असतो.
अनेकवेळा जे नाते कड्याच्या टोकावर आलेले असते तेव्हा दोर कापून टाकणे हेच शहाणपण असते. दोन दिशांच्या टोकावर रेंगाळत राहिले तर वेळ निघून जातो आणि उरते ती फक्त न भरून येणारी पोकळी.
अनेकवेळा असे निर्णय घेतले जात नाहीत कारण उद्याची भ्रांत , अनिश्चितता माणसाला घाबरवते पण एकदा तो निर्णय झाला की माणूस पाय उचलतो. भले ती वाट कठीण असेल पण असते .
पूजा आपल्या आयुष्याचे सुकाणू हातात घेते तर दुसरीकडे कविता भविष्याबाबत असुरक्षित होत जाऊन आपले संतुलन गमावते.

या सिनेमातील तीनही पात्रे अत्यंत उत्तम पद्धतीने रेखाटलेली आहेत.
पूजाचे पात्र तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलत जाते . There are many shades to her persona. Initially the character goes through grief, then anger , then self pity, desperation , resignation …. And ultimately emerging stronger.

सिनेमात अजून एक महत्वाचे पात्र आहे, ते म्हणजे पूजाकड़े काम करणारी कामवाली बाई. कमावणारी ती एकटीच. तिचा नवरा दारू पितो आणि त्याचे पैसेही तिच्याकडूनच घेतो. तिला मारहाण करतो. त्याचे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत तरीही नवऱ्याला सोडण्याची तिची तयारी नाही. समाजाच्या बांधीव घडणीत ही शक्यता सुद्धा तिने विचारात घेतली नाही.
दुसऱ्या स्त्रीच्या नशिबात सुद्धा त्याचे मारणेच लिहिलेले आहे हे ती जाणून असल्याने , तिच्या बद्दल सुद्धा तिला सहानुभूती आहे.
तिचे आयुष्य खडतर आहे पण तिला आपल्या मुलीचे आयुष्य मात्र घडवायचे आहे. त्यासाठी मात्र तडजोड करायची तिची तयारी नाही. पगार ती बँकेत ठेवायला सांगते कारण ते पैसे तिला मुलीच्या शिक्षणासाठी वापरायचे आहेत. अडाणी असूनही तिच्या priorities स्पष्ट आहेत. जेव्हा फी साठी ठेवलेले पैसे नवरा काढून घेतो तेव्हा मात्र ती नवऱ्याचा खून करते.

पूजा तिच्या मुलीला दत्तक घेते.तिला घर आणि आधार देते. स्वतःच्या अस्तित्वासाठी, नवऱ्याची मनधरणी करणाऱ्या स्त्री पासून एका अनाथ मुलीला आधार देऊन तिच्याबरोबर भविष्याची स्वप्ने जगणे हा प्रवास सुद्धा स्तिमित करणारा.

यातील कविताचा रोल ही दुबळा नाही. इंदर जर आपल्यासाठी आपल्या सात वर्षाच्या बायकोला काहीही कारण नसताना सोडू शकतो तर तो तिसरीसाठी तिलाही सोडेल याची जाणीव तिला आहे. सिनेमात अनेक वेळा जी अपराधीपणे वावरणारी किंवा स्वार्थी असणारी दुसरी बाई असे चित्र असते तसे इथे नाही. पूजाला ती फ्लॅट देऊन त्याच्या आयुष्यातून जा असे सांगते आणि इंदर ला निर्वाणीचा इशारा देऊन पूजाला घटस्फोट देण्याची मागणी करते.
सर्वात महत्वाचे म्हणजे दोन स्त्रियांच्या नाशाला कारणीभूत असणाऱ्या या पुरुषाला दोन्ही स्त्रिया चांगल्या ओळखून आहेत त्यामुळे कविताही इंदरला तिच्या आयुष्यातून हाकलवते आणि सिनेमाच्या शेवटी तिच्याकडे परत आलेल्या त्याला, पूजा सुद्धा आपल्या दारातून परत पाठवते.
“ तू जे केलेस तेच जर मी केले असते तर तुझी काय प्रतिक्रिया असती ! “ हा प्रश्न लग्नाचे अधिकार आणि जबाबदारी दाखवून देतो.

स्त्रीच्या आयुष्यात पुरुषाचे स्थान काय असावे आणि ते कुणी ठरवावे याबाबत सुद्धा हा सिनेमा एक वेगळे भाष्य करतो.  राज पूजाला  सावरतो, मानसिक दृष्टया तिला आधार देतो, तिच्याबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करून तिच्या सोबत चालण्याची तयारी दर्शवतो. इथे ती नकार देते. मित्र म्हणून त्याचे स्थान तिला मान्य आहेच. त्याच्याबद्दल आदर ही आहे पण तिला त्याच्याबरोबर केवळ मित्रत्वाचेच नाते ठेवायचे आहे. पुरुष आणि स्त्री मध्ये , केवळ ते एकमेकांना आवडतात म्हणून नर मादी हेच नाते असावे का ? त्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून ते सोबत राहू शकत नाहीत का ? मुळात जवळचा मित्र आहे म्हणून तिला त्याच्याबद्दल शारीरिक आकर्षण  सुद्धा वाटायला हवे का ? गरज नाही त्याची. ते ठरवायचं अधिकार स्त्रीला आहे, तेवढी सक्षम ती आहे.

सिनेमाचा शेवट हा ओपन आहे. अनेक शक्यता आहेत. ती एकटी राहील, कदाचित राज कडे परत येईल किंवा तिला कुणी दुसराही आवडेल. तो तिचा अधिकार आहे आणि हे राजला सुद्धा मान्य आहे . तेवढा प्रगल्भ पुरुष आहे तो.
सिनेमाच्या इतिहासात नायकाच्या फार मोजक्या अशा भूमिका आहेत ज्या सामान्यातले असामान्यत्व दाखवणाऱ्या आहेत.  राजचा त्यात बराच वरचा नंबर असेल हे नक्की . 
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *