Skip to content

पन्नाशीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा-श्री ४२०

स्वातंत्र्य मिळून काही वर्षे लोटली होती.
सुरुवातीच्या सिनेमावर नाटकाची  छाया होती.  कथानक एकतर पौराणिक असायचे किंवा  ऐतिहासिक. त्याला अनुसरून भाषाही अलंकारिक असायची. यातील रोमान्स सुद्धा अत्यंत भावनिक, मेलोड्रॅमॅटिक होता. तिकीटबारीवर शोकांतिकेचा प्रभाव होता.
एकदा स्वातंत्र्य मिळाले की देशात सुर्वणयुग येणार या कल्पनेला फाळणीने सुरुंग लावला. सुरुवातीची भावविभोर, स्वप्नाळू अवस्था संपून वास्तवाची जाणीव व्हायला सुरुवात झाली. पन्नासच्या दशकातील सिनेमा त्यानुसार  बदलू लागला.
देशाच्या बांधणीचा हा काळ अत्यंत खडतर होता. स्वातंत्र्य तर मिळाले, आता अन्न, वस्त्र निवारा  या प्राथमिक गरजा पुऱ्या करण्यासाठी, जगण्यासाठीच  नागरिकांचा संघर्ष सुरु झाला. चित्रपट सुद्धा आता वर्तमानकाळात आला.
याच काळात शहरांना महत्व आले . शिक्षणाला महत्व आले. भविष्य घडवण्यासाठी, कामाच्या शोधात माणसे गाव सोडून शहराकडे येऊ लागली. एकत्र कुटुंब व्यवस्था संपण्याची ही सुरुवात होती. शहरात आलेला नायक सुशिक्षित होता. आपल्या पलीकडे जग आहे याची त्याला जाणीव होती. समाजात रुजलेल्या अनिष्ठ रूढी परंपरा, विषमता, जातीभेद, वर्गभेद या विरुद्ध लढा देण्याची त्याची मानसिकता होती.
या काळातील नामवंत दिग्दर्शक राजकपूर, गुरुदत्त, बिमल रॉय, अमिया चक्रवर्ती  यांचा नायक सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारा होता. हा काळ समाजवादाने भारलेला. त्यामुळे गरिबीला श्रेष्ठत्व प्राप्त झालेला. चित्रपटाचे कथानक, श्रीमंत होण्यापेक्षा समाजासाठी झटणारा नायक आणि त्यामुळेच त्याच्यावर भाळलेली, त्याच्या कामात त्याला साथ देणारी नायिका ह्यांच्याभोवती फिरणारे.
राजकपूरने त्याला प्रेमाची जोड दिली.
राज कपूरचा बरसात आला, पावसाळी रात्रीत त्याच्या व्हायोलीन वर बेहोष होणारी नर्गिस आली and pure passion was unleashed for the first time on the screen ,
बरसात, आवारा , श्री ४२० , चोरीचोरी ..कोणत्याही सिनेमातील  प्रेमगीते, प्रेमदृश्ये याची साक्ष देतील .
प्या जोडीचा सर्वात लोकप्रिय सिनेमा “ आवारा “ असला तरी हा सिनेमा वडील आणि मुलातील नात्याचा सिनेमा होता. श्री ४२० मात्र या दोघांच्या नात्याचा सिनेमा होता. 
यातील गाजलेले “ प्यार हुआ इकरार हुआ है “ हे गीत तर व्हॅलेंटाईन दिवसाची signature tune ठेवायला हरकत नाही .

श्री ४२०
———–

निरागसता आणि अनुभव, मूल्ये आणि महत्वाकांक्षा, प्रेम आणि मोह –एकमेकांच्या समोर जेव्हा उभे राहतात तेव्हा रुजणारी संघर्षाची बीजे हा श्री ४२० चा मुख्य विषय आहे.
काही महत्वाच्या मूलभूत प्रश्नांना हा सिनेमा हात घालतो.
श्रीमंत होण्याची इच्छा असणे हा गुन्हा आहे? सिस्टिम थोडीशी वाकवून जर आयुष्य सुखावह होत असेल तर त्यात काय वावगे आहे ? यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी प्रामाणिकपणा आणि नैतिकता पणाला लावणे हे पाप आहे ?

श्री ४२० म्हणजे खोटारडा माणूस. सुरुवातीला तरी कथेचा नायक चित्रपटाच्या शीर्षकासारखा नाही. एका बोचक्यात मावणारे मोजके सामान, बी ए च्या पदवीचे प्रमाणपत्र  आणि प्रामाणिकपणासाठी मिळालेले सुवर्णपदक घेऊन रणबीर राज कुमार स्वप्नाच्या शोधात मुंबईला येतो.

मात्र या नगरीत काम तर सोडाच, राहायला जागा सुद्धा मिळत नाही. सुवर्णपदक गहाण ठेवून तो काही रुपये उचलतो आणि पत्ते खेळणाऱ्या जुगार्यांकडून लुटला जातो. कंगाल होतो.
भटकत असतानाच एका गरीब वस्तीतील, केळी विकणाऱ्या बाईशी त्याची ओळख होते. भाबड्या राजचा चांगुलपणा तिला जाणवतो आणि राजला वस्तीत सामावून घेतले जाते. 

कामाच्या  शोधात भटकत असताना राज ची ओळख विद्या या मुलीशी होते. स्वतःचा आणि अपंग वडिलांचा चरितार्थ चालवण्यासाठी ती एका झोपड्पट्टीत मुलांची शाळा चालवत असते.

विद्या  गरीब असली तरी स्वाभिमानी आणि नीतिवान आहे. पहिल्या भेटीतच राज तिच्याकडे आकर्षिला जातो. तिचे मन जिंकण्यासाठी एका लॉंड्री मध्ये नोकरी धरतो. सुरुवातीला राजला थापाड्या आणि लोफर समजलेली विद्या, त्याच्या मूलभूत चांगुलपणामुळे त्याच्या प्रेमात पडते आणि एक अजरामर प्रेमगीत जन्माला येते.

आपण कमावतो हे दाखवण्यासाठी राज, विद्याला चहाचे आमंत्रण देतो. पावसाचे दिवस, काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत पण एकमेकांत हरवलेल्या जीवांना त्याचे भान नाही. रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी आहे. चहा उकळायला सुरुवात होते आणि त्याचवेळी पाऊस हजेरी लावतो. राज छत्री उघडून विद्याला देतो पण त्याचे भिजणे पाहून विद्या तीच छत्री त्याच्या डोक्यावर धरते. आता जर भिजायचे नसेल तर एकमेकांच्या जवळ येण्यावाचून पर्याय नाही.
मग मदतीला येतो तो हा खट्याळ पाऊस. तोच हे गोठलेले शब्द वितळवून ओठावर आणतो.       

प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल, रस्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंज़िल
प्रेमाचा रस्ता तसा वळणावळणाचा. “राजा राणी राजी तो क्या करेगा काजी “ असे म्हणतात खरे पण हा समाज, आर्थिक परिस्थिती, रीती रिवाज रुपी काजीला धूप न घालता, प्रेमाच्या वाटेवर चालणे हे दमछाक करणारे असते. शंका-कुशंका पावलांना बांधून ठेवतात. हृदय धडधडते. हवी असलेली मंजिल मिळण्याच्या आत हा रस्ता संपणार नाही नं ही धास्ती, प्रेमाच्या धुंदीत सुद्धा पोटात गोळा आणते.  

कहो की अपनी प्रीत का मीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी
मनातली साशंकता आता बोलून दाखवण्याचा मोकळेपणा दोघात आला आहे. तो माझाच असणार आहे का या प्रश्नाचे उत्तर सुद्धा एकमेकांना गवसले आहे. आकाशात हसणाऱ्या चंद्राला सुद्धा दोघांच्या गुपितात सामील करून, कधीही विलग न होण्याचे वचन एकमेकांना देताना दोघे सांगतात,

प्यार जो टूटा, साथ जो छूटा, चाँद न चमकेगा कभी
प्यार हुआ इकरार हुआ…
विद्याच्या चेहेऱ्यावर लज्जा, संकोच आणि प्रेमपूर्तीचे समाधान या भावना एकापाठोपाठ तरळून जातात तर राजचा चेहेरा आनंदाने फुलून येतो. पावसात चिंब भिजलेला आसमंत या प्रेमी जिवांच्यावर आशीर्वादाची बरसात करत असतो.

रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ,
प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ
प्रेम हे चिरंजीवी असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळ्यातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीते ही अमर होतात.

मैं न रहूँगी, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ
या ओळीबरोबर दिसतात हातात हात घेऊन चालणारी तीन मुले.
प्रेमाची परिणीती नवीन जीवाला जन्म देण्यात होते. या प्रेम आणि वात्सल्याचा लोभस अविष्कार विद्या आणि राजच्या नजरेत दिसतो.

लॉंड्रीत नोकरी करत असतानाच राजची ओळख माया नावाच्या एका देखण्या तरुणीशी होते. केवळ गंमत म्हणून राजने पत्ते खेळण्याचे कसब कमावले असते पण त्याचा उपयोग अमाप पैसे मिळवण्यात होईल हे जाणून माया त्याला आपल्या मायाजालात अडकवते. शहरातील श्रीमंत लोकांशी ओळख करून देते. आपल्या कौशल्याचा उपयोग केला तर आपल्याकडेही वैभव चालून येईल हे राजच्या लक्षात येते आणि एका मोहाच्या क्षणी त्याची वैभवाकडे वाटचाल सुरु होते.

“इतरांना फसवून तर ही काळी संपत्ती जमवली आहे या लोकांनी ! मग यांना फसवले तर हरकत काय “ आपल्या नैतिक घसरणीचे स्पष्टीकरण राज स्वतःलाच देऊ लागतो. चारित्र्य गमावलेल्या राजवर संपत्ती तर प्रसन्न होते पण त्याची विद्या त्याच्यापासून दूर जाते.
अर्थात सिनेमाचा शेवट सकारात्मक आहे.
आधीच्या सज्जन नायकांपेक्षा श्री ४२० चा नायक फार वेगळा होता. मूलतः सज्जन असला तरी गरिबीपेक्षा दुसरे जगच त्याला माहित नसते पण जेव्हा त्या दुसऱ्या,  वैभवाने लखलखलेल्या जगाची,  त्याला ओळख होते तेव्हा मात्र मोह त्याच्या मनावर ताबा मिळवतो. एक साधा माणूस ज्याला आपल्या सचोटीचा अभिमान आहे,  त्याची  पावले  खोटेपणाच्या बरबटलेल्या रस्त्याचा मार्ग पकडतात. 
नायक सुद्धा सामान्य माणूस असतो हे या सिनेमाने दाखवले. हे रूपांतर आणि त्यातही जागी होणारी त्याची विवेकबुद्धी, वैभव आणि मूल्ये यात होणारी त्याची कुतरतोड राजने एवढ्या परिणामकरीत्या दाखवली की त्याच्या खलनायक प्रतिमेला सुद्धा प्रेक्षकांनी दाद दिली .

ह्यातली नायिका सुद्धा स्वाभिमानी आहे. तिचे प्रेम कितीही खरे असले तरी स्वतःची मूल्ये सोडण्याची तिची तयारी नाही.
स्वतःच्या जागेवर ठाम राहून ती नायकाला आपल्या टर्म्स वर परत आणते आणि त्याचा स्वीकार करते.
प्रेम सच्चे असेल तर ते बदल घडवून आणते हे या सिनेमाने दाखवलं.

प्रेम हा हिंदी सिनेमाचा पाय असला तरी राज कपूरच्या सिनेमांनी प्रेमाचे sensuous रूप प्रथम पडद्यावर आणले. आवारा मधील प्रणय हा उन्मुक्त होता. एक अशिक्षित गुन्हेगारी जगात वावरलेला तरुण हा नायक असल्याने त्यात रांगडेपणा होता.
श्री ४२० चा नायक हा भोळा असला तरी शिक्षित आहे, भाबडा असला तरी सभ्य आहे.
यातली प्रेमाची उत्कटता, आतुरता जरी अभिनयात आहे तरी ती उच्छृंखल नाही.
The passion is just hinted at, not parodied .
कदाचित म्हणून असेल “ प्यार हुआ इकरार हुआ “ या गीताने नंतरच्या पिढ्यांना सुद्धा मोहिनी घातली आहे.

7 thoughts on “पन्नाशीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा-श्री ४२०”

  1. श्री 420 म्हणजे प्रेमाचे भावगीत किमान 65 वेळा हा चित्रपट पाहिलाय अजूनही जेव्हा काहीतरी जुनं पहावसं वाटतं तेव्हा पहात असतो 🙏🙏🙏 आवारा 420 गंगा जमुना राम और शाम शक्ती जागते रहो प्यासा कागज के फूल गाईड जंगली जिस देश मे गंगा बहती है ओल्ड इज गोल्ड ❤️❤️

  2. प्रिया,

    All time favorite श्री ४२०.

    नेहमीसारखं च सुंदर लिहिलं आहेस.
    🩷🩷

  3. उदय शेवडे

    हा गुलाबी सप्ताह तुमच्या प्रतिभेलाही बहार आणतो म्हणायला हरकत नाही. दरवर्षी वेगळी संकल्पना, वेगळा विषय. हा विषय ही छान निवडला ही मालिका चांगलीच होणार.

    चित्रपटाचा अप्रतिम मागोवा घेतला आहात. सुंदरच आहे चित्रपट.

    माझी या चित्रपटाची आठवण वेगळी आहे. शाळेत नववीत असेन. एका Off Period ला आमचे वर्ग शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी एक कथा आम्हाला वर्गात सांगितली, रानडे सर त्याचं नाव, ते उत्तम कथाकथन करायचे. नायकाचे वागणे, कृती हे पाहून, त्याचं सार सांगितलं जे कायम आयुष्यात लक्षात राहील ते म्हणजे…. ” दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए” !… अर्थांत त्यांनी प्रेम, गाणी वगळून म्हणजे त्याला कमी महत्त्व देऊन ही कथा सांगितली, सांगून झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही कथा श्री ४२० या चित्रपटाची होती.

    वर्गात अशी चित्रपटाची कथा सांगण हे नावीन्य होतं.

    1. Thank you Uday.
      श्री ४२० आताही लागू पडेल कारण मोह ही नैसर्गिक भावना आहे . त्यामुळे सरांना हाच चित्रपट निवडावसा वाटलं ते मला कौतुक वाटते. मोह होणे स्वाभाविक पण त्याचा परिणाम काय होऊ शकते हे लहान कोवळ्या वयात ठसवणे योग्यच .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *