Skip to content

काही निरोपाचे क्षण

घेतला गेलेला निरोप हा काही क्षणापुरता असतो की पूर्ण विराम असतो? झालेला अंत ही वेगळी सुरुवात असते की न सुटणारा पॉज असतो?
खरेतर हे प्रश्नच निरर्थक ठरतात कारण प्रत्येक गोष्टीचा शेवट असतोच. मिलनाचे दुसरे टोक विरहाचे असते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला सुद्धा अस्ताला सामोरे जावे लागते.  एकदा हे लक्षात आले की “समारोप” करणे किती आवश्यक आहे ते समजते. मग ते निरोपाचे भाषण असो किंवा लिहिलेले मृत्युपत्र. एकदा मनाची तयारी झाली की त्या जगलेल्या क्षणांचे , भोगलेल्या सुखाचे आणि दुःखाचे  अर्ध्य देऊन मोकळे होणे जमून जाते. नाहीतर न बोललेले शब्द घुसमटून टाकतात. माणसाचा त्रिशंकू होतो मग.
समजून उमजून गुडबाय करणे हे जगण्याएवढेच महत्वाचे आहे.
२०२५ ला निरोप देताना सिनेमासृष्टीत गाजलेल्या काही निरोपाच्या क्षणांना उजाळा देते आहे.

१) सदमा (सोनू -नेहलता)
(कमल हसन , श्रीदेवी )

१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सदमा या चित्रपटाला तेव्हा तरी व्यावसायिक यशाने हुलकावणी  दिली. चित्रपटाचा तो उद्देश सुद्धा नसावा. चित्रपटाने दिलेला भावनिक उत्कट प्रेमाचा वारसा मात्र प्रत्येक सिनेरसिकांनी मनात जपला. 
ही कथा आहे नेहलता या मुलीची. एका अपघातात डोक्याला मार बसल्याने तिची स्मृती जाते.  इलाजासाठी तिला नर्सिंग होम मध्ये ठेवले जाते पण तिथून ती पळ काढते आणि दुर्दैवाने व्येश्यालयात दाखल होते. इथे तिची भेट सोनू नावाच्या एका सज्जन, अविवाहित तरुणाशी होते. सोनू तिची सुटका करण्यात यशस्वी होतो. ती कोण , कुणाची हे काहीच ठाऊक नसल्याने, तो तिला आश्रय देतो.. तरुण असेल तरी तिचे बौद्धिक वय जेमतेम सहा वर्षाचे असते. या भाबड्या, हळव्या मुलीचा सांभाळ करताना कधीतरी ते दोन जीव प्रेमाच्या धाग्यात बांधले जातात.
सोनू हा टिपिकल नायक नाही. त्याचे पात्र वास्तववादी आहे. प्रेम, जबाबदारी आणि हतबलता यात अडकलेला एक सामान्य पण प्रेमळ माणूस कमल हसनने जिवंत केला आहे.
न बोलता त्याचे डोळे, भावनांना चेहेरा देतात. त्याला वाटणाऱ्या निराशेच्या, असहाय्यतेच्या ओझ्याखाली प्रेक्षक सुद्धा दबले जातात आणि सिनेमाच्या शेवटी जेव्हा तो आतून तुटतो, तेव्हा ते तुटणे, प्रेक्षकांना सुद्धा मोडून टाकते.

रेल्वे स्टेशनवर चित्रित झालेल्या या चित्रपटाच्या क्लायमॅक्सने सदमाला अमर केलं. स्मरणशक्ती परत आलेल्या नेहलताला आता सोनू आठवत नाही. तिच्यासाठी सोनू बरोबर घालवलेला काळ अस्तित्वात नसतोच, सोनूसाठी मात्र नेहलता, जगण्याचे साधन असते. 
ट्रेन मध्ये बसलेली नेहलता त्याच्याकडे जेव्हा अनोळखी नजरेने पहाटे तेव्हा सोनूचा धीर सुटतो, बांध फुटतो. नेहलता नाही तर त्याचे आयुष्यच त्याच्यापासून दूर होत असते. जीवाच्या आकांताने तो चालणाऱ्या गाडीबरोबर धावायला लागतो. तिला हाक मारतो, जे  क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्या क्षणांना आपल्या हालचालीतून , हावभावातून उजाळा देण्याचा प्रयत्न करतो मात्र नेहलताच्या कानापर्यंत त्याची हाक पोचू शकत नाही.
नेहलताच्या चेहेऱ्यावर कोणतीही ओळखीची खूण नसते. भावना नसतात, असतो तो स्पष्ट नकार.
काही निरोप , एखाद्या खपली न धरणाऱ्या जखमेसारखे असतात. सदमाचा निरोप अशी भरली न जाणारी जखम आहे.
काही सिनेमा करमणुकीसाठी असतात , काही उपदेश करतात , काही काळाला बदलवतात , तर सदमा शब्दांत न मांडता येणाऱ्या  वेदनेचा साक्षात्कार घडवतो.

सगळ्याच प्रेमकथा सफल संपूर्ण होत नाहीत. काही एकही शब्द न बोलता संपून जातात. सगळेच अभिनय मनाला सुख देत नाही काही काळजावर वार करतात . सगळेच सिनेमा थिएटर मध्ये पाहिले जात नाहीत काही पिढ्यान पिढ्या संक्रमित होतात. तसे नसते तर देवदास जवळजवळ तीन पिढ्यांसाठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला नसता.

२) देवदास –(देवदास-पारो)
( दिलीप कुमार, सुचित्रा सेन)

शरतचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले, अनेक निर्मात्यांनी या चित्राकृतीला पडद्यावर आणले तरीही स्वतः शरतचंद यांना आपली ही कलाकृती अजिबात आवडली नव्हती. ती प्रदर्शित व्हावी अशीही त्यांची इच्छा नव्हती. असे असूनही भारतीय प्रेक्षकांनी या कलाकृतीला डोक्यावर घेतले. या कादंबरीवर आधारित जवळजवळ सोळा सिनेमा आहेत. या सर्वांत बिमल रॉय यांचा देवदास उजवा आहे.

बंगालच्या एका खेड्यातील जमीनदाराचा मुलगा हा या शोकांतिकेचा नायक. पारो ही त्याची जवळची मैत्रीण. बालपणातली ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलते. देवदास हा पारोसारखा तल्लख नाही. तो अत्यंत आत्मकेंद्री, दुबळा आणि अहंकारी आहे.
श्रीमंतांच्या घरातील मुलं लाडाने बिघडतात. देवदास सुद्धा तसाच. तो सुधारावा म्हणून त्याचे वडील त्याला कोलकाताला पाठवतात. आत्मनाशाच्या प्रवासातली त्याची ही पहिली पायरी ठरते. कोलकातातून परत आल्यावर पारो त्याला आपल्या प्रेमाची आठवण करून देते. प्रेमाची पूर्तता लग्नात होणार याची तिला खात्री असते पण देवदासचे वडील नकार देतात. वडिलांना विरोध करायचे धाडस नसल्याने देवदास परत कोलकाताला जातो आणि वडिलांची संमती नसल्याने आपण लग्न करू इच्छित नाही हे पत्र पाठवतो. त्याचा त्याला लगेच पश्चाताप होतो पण आता जे अघटित घडणार असते ते थांबवणे त्याला शक्य होत नाही. देवदास हा असा माणूस आहे की स्वतःला काय हवे हेच त्याला माहित नाही. निर्णय घेण्याची क्षमता नसणे हे त्याला विनाशाकडे ढकलते.
त्याच्या स्वार्थीपणामुळे पारो त्याला नाकारून, आईवडिलांनी ठरवलेल्या श्रीमंत बीजवर जमीनदाराशी लग्न करते आणि नैराश्येच्या गर्तेत सापडलेला देवदास दारूच्या व्यसनात अडकतो.
देवदास ही प्रेमकथा नाही. सुटकेचा  मार्ग शोधण्याची  क्षमता नसलेल्या एका व्यक्तीच्या वेदनेच्या प्रेमाची कथा आहे.
स्वतःच्या अस्वस्थतेला शरण जाणे ही त्याची प्रकृती आहे आणि प्राक्तन सुद्धा. इतर कुणाच्याही हातात हे पात्र गेले असते तर लोकांनी झिडकारले असते पण देवदासला अमरत्व मिळून देण्यात दिलीप कुमारच्या अभिनयाबरोबर, बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाचा महत्वाचा वाटा आहे. 

दारूने शरीर पोखरले गेल्यावर देवदासला आपल्या मृत्यूची चाहूल लागत आणि पारोला शेवटचे भेटण्याची इच्छा प्रबळ होते.   ट्रेन मध्ये बसून गावाकडे जात असताना एका स्टेशनचे नाव पाहून त्याला आठवते, पार्वतीचे , पारोचं घर याच्या जवळ आहे.
रात्रीची वेळ. कडाक्याची थंडी. सारा परिसर धुक्याने व्यापलेला. स्टेशनवर चिटपाखरू नाही . बाहेर एक टांगा थांबलेला असतो.
“ माणिकपूर चलोगे ?”
एवढ्या रात्री यायला काही टांगेवाला तयार होत नाही पण पैशाचे आमिष दाखवून देवदास त्याला तयार करतो.
“मेरे पास  इतना  वक्त नही है”
सकाळ उजाडणार नाहीच ह्याची कल्पना मुसाफिरला असते. काळोख्या रात्रीतून सुरु झालेला हा प्रवास अंधारातच संपणार असतो.
पश्चतापाने होरपळत असलेले मन भूतकाळात डोकावते. त्याचे कुटुंब , पार्वती, चंद्रमुखी या सगळ्यांचे चेहेरे नजरेसमोर तरळतात. भेटण्याची उत्कट इच्छा असलेले मन व्याकुळ होऊन विचारते,
“अरे भाई , ये रास्ता कभी खतम होगा या नही “
तो परत परत विचारतो पण हे असे दोन रस्ते असतात ज्यांचे मिलन कधीही शक्य नसते. हा निरोप अधुरा राहतो.

३) आनंद –( आनंद – डॉ भास्कर बॅनर्जी )
(राजेश खन्ना -अमिताभ बच्चन )

मरणाच्या दारात असलेल्या माणसाची गोष्ट हा आनंद सिनेमाचा पाया असला तरी हा सिनेमा मेलोड्रामा नाही.
सर्वसामान्य लोकांची गोष्ट आहे ही, जे प्रामाणिकपणाने आपला चरितार्थ चालवतात, नैतिकतेच्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतात, प्रेमाचा शोध घेतात, कुणावर तरी जीवापाड प्रेम करतात, आयुष्य कठीण झाले तर रडतात, कोसळतात  पण परत धैर्याने उठून, आयुष्याचा सामना करतात.
अशाच सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आनंद वाटणाऱ्या आनंद नावाच्या माणसाची ही गोष्ट.

“ बाबू मोशाय , जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही” आनंद च्या आयुष्याचे हे सार आहे.

अनेकदा बरेच काही गमावल्यानंतर लक्षात येते की आपण आयुष्याला फार गृहीत धरले आहे. जगण्याच्या धडपडीत गुरफटलो असताना, आपले आयुष्य सुखकर करणारे ओळखीचे आणि अनोळखी सुद्धा असलेले सुहृद, आयुष्याला श्रीमंत करणारे अनुभव, जीवनाचा अर्थ समजून देणारे काही क्षण ह्यांचा आपण थोडा तरी विचार करतो का ? कौतुकाने त्यांच्याकडे पाहायला वेळ देतो का? भूतकाळाच्या आठवणीत गुंग होताना आणि भविष्याची चिंता करताना, हातात असलेला वर्तमान, समरसून जगतो का?
आनंद हा सिनेमा ह्याची जाणीव करून देतो.

मृत्युशय्येवर असणाऱ्या माणसाची गोष्ट अनेकांनी रंगवली असेल पण आनंद या सिनेमात नायकाचा मृत्यू झालेला असताना सुद्धा सिनेमा पाहिल्या नंतर लक्षात येतं, मृत्यू काही सगळ्याचा शेवट करत नाही . माणूस जातो पण त्याच्या आठवणी राहतात. त्या आठवणी जर सुखदायक असतील तर त्याच्या मृत्यूचे दुःख कसे काय वाटू शकते!
आनंद हा सिनेमा डॉ भास्कर यांच्या आठवणींचा कोलाज आहे. वरवर शांत पण आतून अत्यंत अस्वस्थ असलेले हे व्यक्तिमत्व. वैद्यकीय पेशाला वाहून घेतलेल्या डॉ भास्करना सुद्धा नैराश्य येते. त्यांच्याकडे येणारे रुग्ण गरीब आहेत. अनेकांकडे तर औषधे घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. रुग्णांना मदत करण्याची आत्यंतिक इच्छा असूनही, अनेकदा ते हतबल होतात. परिस्थितीवर मात न करता आल्याने तिरकस सुद्धा. अशावेळी आनंद एका वादळासारखा त्यांच्या आयुष्यात येतो, आणि निघून जाताना, त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देऊन जातो.

आनंद या सिनेमाची ताकत अभिनयाबरोबर त्याच्या संकलनात सुद्धा आहे, त्यामुळे आनंदचा मृत्यू असणारा शेवटचा सीन सुद्धा करुण न होता, अद्भुत रसात परावर्तित होतो. 

आयुष्याच्या काहीच घटका बाकी आहेत हे समजल्याने, आनंद, डॉ प्रकाशला टेप रेकॉर्डर सुरु करायला सांगतो. मृत्यूचा पायरव जाणवत असणाऱ्या त्या खोलीत, आता भास्करचा आवाज गुंजतो.
मृत्यूला संबोधताना  डॉ भास्कर म्हटतात,

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है , मिलेगी मुझको
डुबती नज्मो में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी  रात ना दिन
जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आए
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

जेव्हा ती संपते , तोपर्यंत आनंद गेलेला असतो. दबलेल्या हुंदक्यांबरोबर असते फक्त रिकाम्या टेपची खरखर.
जेव्हा डॉ भास्कर आत येतात, तोपर्यंत सगळे संपलेले असते. मृत्यूच्या या दर्शनाने, भास्कर हादरतो. मित्र गेल्याचे दुःख आणि त्याला वाचवता न आल्याने स्वतःवर आलेला राग दोन्ही उफाळून येते. अतीव दुःखाने आनंदच्या मृत शरीरावर झोकून देऊन तो म्हणतो,
आतापर्यंत बकबक करून तू मला सतावलेस आणि आता गप्प कसा राहू शकतोस, बोल , काहीतरी बोल “ 
त्याच क्षणी हाक येते , “ बाबू मोशाय”
एक क्षण गोंधळलेल्या सर्वांच्याच मग लक्षात येते , टेप रेकॉर्डर सुरु झालेला आहे. 
मृत्यूच्या सावटावरही  मात करून, आनंदचा आवाज घुमतो.
“जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है, जहाँपना, इसे न तुम बदल सकते हो , ना मै.  हम सब इस रंगमंच की कठपुतलिया हैं ”
मग खोली त्याच्या हास्याने भरून जाते.

ज्याचे आयुष्य आता फक्त काही महिन्यांपुरतं आहे हे उमजलेला माणूस लोकांना जगायला, हसायला , प्रेम करायला शिकवून आयुष्याचा निरोप घेत असतो. आपले नाव सार्थ करणारा आनंद, मृत्यूच्या दर्शनाने सुद्धा विचलित न होता, दुसऱ्यांच्या आयुष्याला दिशा देतो , स्वतःच्या आयुष्याला अर्थ देतो.
पडद्यावर पाहिलेला हा गुडबाय मृत्यूशी सुद्धा हसत हातमिळवणी करायला शिकवतो.

४)आँधी ( जे के –आरती देवी )
(संजीव कुमार -सुचित्रा सेन)

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आँधी या राजकीय प्राश्वभूमी असलेल्या चित्रपटातील नायिकेच्या पात्रावर इंदिरा गांधीच्या व्यक्तिमत्वाची दाट सावली आहे. आँधीला राजकीय पार्श्वभूमी आहे. समाजकारण  आणि राजकारणाला वाहून घेतलेल्या धूर्त, हुशार,  पुरुषांच्या जगात जिंकण्यासाठी पाय रोवून असलेल्या  “स्त्री” नेत्याची ही कहाणी आहे.  ही  पतिपत्नीच्या अपूर्ण सहजीवनाची व्यथाही  आहे.
सिनेमाची सुरुवात होते वर्तमानकाळात. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ज्या शहरातून आरती देवी उभी राहिली आहे त्या शहरात प्रचारासाठी ती काही दिवस आली आहे. ज्या हॉटेलमध्ये ती उतरली आहे त्या हॉटेलचा मॅनेजर आहे जे के. जो कधीकाळी तिचा पती होता. आता विभक्त होऊनही बरीच वर्षे लोटली आहेत. रूममध्ये असलेली चंदनाची उदबत्ती, पाणी पिण्यासाठी ठेवलेली सुरई, आवडीची खीर अशा अनेक गोष्टीतून भूतकाळाच्या निद्रिस्त आठवणींना जाग येते . गुलजार हळुवारपणे त्या दोघांनी  एकत्र घालवलेल्या  स्वप्नाळू जगात प्रेक्षकांना घेऊन  जातात.

इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे
जेके आणि आरती ने गायलेले हे पहिले प्रेमगीत. पहिला वाहिला भारलेला काळ.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक रस्ते आपल्याला खुणावत असतात. काही संथ , सुखद क्षणाच्या मोहात पडून रेंगाळणारे रस्ते , काही घाई गर्दीचे , अपेक्षा आकांक्षाचे रस्ते,. जिथून एक उज्वल, यशस्वी भविष्यकाळ तुम्हाला खुणावत असतो. प्रत्येक रस्त्याची  गती वेगळी असते , त्याचे गंतव्य वेगळे असते. रस्ता निवडणे तुमच्या हातात असते पण एकदा तो निवडला की त्याच्या गतीने जावे लागते. जे के ला संथ रस्त्याची  आस  आहे. आला क्षण आपल्या माणसांबरोबर आनंदाने घालवणे ही त्याची सुखाची व्याख्या आहे. आरतीला राजरस्त्याची सवय आहे. तिला यशाच्या शिखरावर त्वरित पोचायचे आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या होणे हे  स्वाभाविक आहे.
सुखी सहजीवन एकत्र जगत असतानाच, सांसारिक जीवनाचे रुटीन आरतीला अस्वस्थ करू लागते. पैसा आणि बुद्धिमता याची देणगी असलेली आरती सफलतेच्या एक एक पायऱ्या चढून जाते . पती आणि मुलगी याचे स्थान आता मर्यादित राहते . त्याची जागा सभा , भाषणे , राजकीय डावपेच घेतात .
तिचे कामात गुंतणे जे के ला सहन होत नाही. पत्नीने मुलीकडे लक्ष द्यावे , जेवण बनवावे आणि एक गृहिणी म्हणून आयुष्य घालवावे हे आरतीच्या प्रवृत्तीला मानवत नाही. करिअर सोडायची नसेल तर आपण वेगळे होऊया हा एकमात्र पर्याय तो तिच्यासमोर ठेवतो. वडिलांचे वर्चस्व नको म्हणून लग्न करून बसलेली आरती , नवऱ्याच्या वर्चस्वाखाली राहायचे नाकारते. आपल्या स्वप्न पूर्तीसाठी ती संसाराचा आणि पर्यायाने मातृत्वाचाही त्याग करते. एक स्त्री म्हणून याची खंत आहे पण तिच्या स्वप्नांची झेप त्याहुन मोठी आहे. 

“ तुमने तो बहोत लंबा रास्ता तय किया ..मै तो बहोत पीछे रह गया” नऊ वर्षांनी भेटल्यावर , जेके ने तिच्या कर्तुत्वाला दिलेली ही सलामी , स्वतःचे सामान्यपणे स्विकारल्याची ही कबुलीही ही.
असामान्य कुवत नी महत्वाकांक्षा असणाऱ्या माणसाला सामान्य पार्टनर मिळणे हे दोघांसाठी दुर्दैव. स्त्री सामान्य असेल तर समाज मान्यतेनुसार , संस्कारामुळे आपले खुजेपण मान्य करून जगते. अनेकवेळा त्यातच भूषण मानते , पुरुष मात्र सामान्य असेल तर समाज सुद्धा त्याला तसे जगायला देत नाही . त्याची फरफट पर्यायाने  संसाराची धूळधाण अटळ असते.
प्रेम आणि महत्वाकांक्षा यात काय निवडावे हे ठरवण्याची वेळ आताही निघून गेलेली असते. 

ही हुरहूर , पस्तावा व्यक्त करताना गुलजार काय सुंदर लिहून जातात.

तेरे बिना ज़िन्दगी से कोई, शिकवा तो नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन , ज़िन्दगी तो नहीं

कोणत्याही नात्याचा अंत अटळ असतो.  कधी मृत्यूने संपते;  कधी संपून सुद्धा ताणले जाते तर कधी तोडावे लागते. हा निर्णय अवघड. जिथे नाते टिकवायला दोघांचे तादात्म पावणे आवश्यक आहे तिथे जर “ मी “ ने डोके काढले तर! माझी महत्वाकांक्षा , माझ्या नात्याहून मोठी झाली तर ! हा “तर”  सोडवायला कठीण. उत्तर सापडले तरी त्याची किंमत मोजावी लागते. आरतीने ही मोजली आहेच. संसार , मुलगी, प्रेम मनावेगळे करून यशाच्या पायऱ्या चढलेली ती, जेव्हा परत भूतकाळाला सामोरी जाते तेव्हा लक्षात येते की जे काही मिळवले आहे ते खरंच प्रेमापेक्षाही महत्वाचे आहे ?
हरवलेल्या नात्यांकडे पाहायचा एक वेगळाच समजूतदार नजरिया आहे हा. ह्यात पस्तावा आहे पण त्याचा आक्रोश नाही. निर्णय विचारानेच घेतला होता. त्याचा परिणाम ही समजूतदारपणानेच भोगायची आहे.
चित्रपटाच्या शेवटी आरती जिंकते. यशाचे अजून एक दालन खुले होते. तिथे जाणारी वाट मात्र एकटी आहे याची दोघांनाही जाणीव झाली आहे पण आता त्यात आक्रोश नाही , संताप नाही ..एक अटळ निरोप आहे आणि तो योग्य आहे याची दोघांनाही खात्री आहे..
प्रेमाची जाणीव होऊनही विभक्त होणे आवश्यक आहे. जे के ला माहिती आहे की तिचे जिंकणे म्हणजे लोकांच्या साठी आपले आयुष्य देणे. त्याचाच अर्थ परत एकदा तिने बाहेर पाऊल ठेवणे.
स्विकार फार महत्वाचा असतो. जाणिवेतून केलेला स्विकार हा योग्यही असतो. आपले मार्ग वेगळे आहेत , मनाची जडण घडण वेगळी आहे , आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत हे एकदा समजले की अहंकाराने त्याकडे दुर्लक्ष करू नये. जात्या माणसाला जाऊ द्यावे .
जे के म्हणतो , तुम्हारी हार मेरी जीत नाही हो सकती. मै तुम्हे हारा देखना नही चाहता “
निरोप घेणे म्हणजेच “ let go” करणे . कितीही प्रेम असेल तरीही एकत्र राहणे शक्य नाही हे दोघांनाही उमजलेले आहे.
नऊ वर्ष आधी घेतलेला निरोप ह्यात दोघांचाही अहंकार आहे. आता मात्र एकमेकांच्या निर्णयाचा आदर ठेवून केलेला स्वीकार आहे.
रेडिओवर बातमी येते , आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याला अडतीस हजार मतांनी हरवून आरती देवीने विजय मिळवला आहे.
जे के ही बातमी ऐकतो. त्याच्या चेहेऱ्यावर हलकासा विषाद आहे आणि ती जिंकल्याचा आनंद सुद्धा. आरतीच्या चेहऱ्यावर मात्र उदासी पसरली आहे. आता जाणे म्हणजे आपल्या हाताने संसाराचे दार बंद करणे ह्याची जाणीव तिला झाली आहे. दिल्लीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तिची वाट बघत आहे.
या सर्वांपासून दूर पण मनाने जवळ असलेला जे के तिला धीर देताना सांगतो, “ तुम्हारा जाना जरुरी है , मै समझता हूँ. जो काम शुरु किया है वो पुरा करो “
सर्व कडवटपणा दूर ठेवून तो सांगतो, मुलीला थोडे दिवस तुझ्याकडे पाठवेन . होस्टेलवर तूच सोडून ये “  सिनेमा संपताना दिसते ते दूर जाणारे हेलिकॉप्टर आणि त्याला निरोप देताना जे के चा हात.
मनात साठलेली सर्व जळमटे साफ करून घेतलेला हा सुजाण निरोप आहे .

५) अनुपमा ( शर्मिला टागोर -तरुण बोस)
( उमा – मि. शर्मा )

ही कथा आहे एका तरुण मुलीची , जी मनोव्यापारांच्या गुंतागुंतीतून स्वतःला मुक्त करते, स्वतःच्या मनाला पटेल तो निर्णय घेते.
ही एका तरुण मुलाची कथा आहे जो एका मुलीवर मनोमन प्रेम करत असूनही, तिच्यासाठी निर्णय घेत नाही. आपला निर्णय तिच्यावर थोपवला जावा असे त्याला वाटत नाही . जो पर्यंत ती तयार होत नाही , तो पर्यंत वाट पाहायची त्याची तयारी आहे.

अनुपमा ही अशा वडिलांची गोष्ट आहे ज्यांना आपल्या मुलीचा चेहेरा पाहणे सहन होत नाही. एक वडील म्हणून हे चूक आहे हे त्यांना माहिती आहे तरीही  कोणताही अपराध  न केलेल्या स्वतःच्याच रक्ताला माफ करणे त्यांना जमत नाही.

सिनेमाची सुरवात एका प्रेमकथेने होते. उत्तर वयात लग्न केलेल्या मोहन शर्मांचे आपल्या तरुण, सुंदर पत्नीवर अतिशय प्रेम आहे. दुर्दैवाने बाळंतपणात तिचा मृत्यू होतो आणि जन्माला आलेला हा निरागस जीव वडिलांना नकोस होतो. दायी कडे वाढणारी उमा, वडिलांच्या प्रेमाला पारखी होते. दारूच्या नशेत वडील मुलीवर माया करतात, तिच्यावर भेटींचा मारा करतात , नशा  उतरली की हे प्रेम आटून  जाते. प्रेम आणि द्वेष या चक्रात अडकलेली उमा आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे हेच विसरून जाते. पुस्तके आणि निसर्ग यात रमणारी उमा, माणसांत अबोल होते. या सिनेमात उमा या पात्राला अतिशय कमी संवाद आहेत but her silence is more eloquent than dialogue.
अशावेळी तिच्या आयुष्यात अशोक येतो. शिक्षक असणारा अशोक हा लेखक आणि कवी सुद्धा आहे. त्याचे मन अबोल उमाकडे ओढले जाते आणि आयुष्यात पहिल्यांदाच तिला आहे तसे स्विकारणारा सहचर  मिळाल्यावर, स्वतःच्याच सावलीला सुद्धा घाबरणारी ही मुलगी आपल्या कोषातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते.
वडिलांच्या रागाला न घाबरता, अशोककडे  जाण्याचा निर्णय घेते आणि घराबाहेर पाऊल टाकते.
या नंतर आलेला सीन हा हिंदी सिनेमातील एक उत्कृष्ट निरोपाचा सीन आहे.

अशोक , तिची वाट बघून शेवटी आपल्या गावाला परत जाण्याचा निर्णय घेतो. मनात निराशा जरी असली तरी त्याचे प्रेम अथांग आहे. ती न येण्याचे कारण तो जाणून आहे. पंख कापलेल्या पक्ष्यावर कसला राग धरणार ! तो स्वतःच्या मनाची समजूत घालत असतानाच ती येते. सगळे मागे टाकून, परत न जाण्यासाठी येते.
स्टेशनवर उपस्थित असणारे त्यांचे सुहृद त्यांचा निरोप घेत असतात आणि स्टेशनवर खांबा आड राहून, एक बाप आपल्या

मुलीचा मनोमन निरोप घेत असतो.  त्याची मुलगी आता परत येणार नसते. डोळ्यातून अश्रू वाहत असताना मनात दाटून आलेला असतो पश्चाताप, खंत आणि आपण चुकल्याची जाणीव. नात्यामुळे जो त्यांच्यात बंध असतो त्याने उमाच्या वाट्याला फक्त दुःखच आलेले असते. हा बंध आता तुटून जातो आणि त्या बरोबर तो सुद्धा .
काही गोष्टींना बांधीव कथाच नसते. काही नाती सुद्धा बंधन असूनही बांधीव नसतात. त्यांच्यात असते ती न संपणारी वेदना आणि मनस्ताप. त्यांचा वेध घेण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणे जास्त श्रेयस्कर असते.
असा निरोप सुटका ठरतो.

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 






                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           



10 thoughts on “काही निरोपाचे क्षण”

  1. प्रिया,

    वर्षाला निरोप देताना चित्रपटातल्या आगळ्या वेगळ्या निरोपाच्या क्षणांचे किती सुंदर वर्णन केले आहेस.

    ब्लॉग वर वाचण्यापूर्वी मनात विचार आला होता,
    काय धागा पकडून लिहिलं असेल?

    हृदयस्पर्शी,हृदयद्रावक निरोप तू शोधलेस.
    प्रत्येक निरोप वेगळा..

    नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐
    कमाल आहेस तू..❤️❤️❤️

  2. कालपासून चार वेळा वाचला तरीही ह्या लेखाला वाचून संपवून निरोप देववत नाही, इतके सुरेख लिहिलंय.
    फार संवेदनाशील निरोप ♥️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *