Skip to content

 मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है :


अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. पंजाबमधील खेड्यातील एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा आपल्या काकांबरोबर एका लग्नाला जातो. लग्नाला आलास तर तुला सिनेमा दाखवतो हे आमिष असते. दिलीप कुमारचा शहीद पाहून तो भारावून जातो. मोठे झाल्यावर आपण सुद्धा सिनेमाच्या पडद्यावर झळकावे ही आकांक्षा उराशी बाळगून तो मोठा होतो. स्वप्ने काही लगेच सत्यतेत येत नाहीत. चरितार्थासाठी  अमेरिकन ड्रिलिंग कंपनीत तो मेकॅनिकची नोकरी धरतो. यथावकाश लग्न होते, एक मुलगाही होतो पण उराशी बाळगलेले स्वप्न त्याला स्वस्थ बसू  देत नाही.

आईचा आशीर्वाद किंवा दुर्दम्य आशावाद, त्याच सुमारास, फिल्मफेअर हे लोकप्रिय मासिक, नायक नायिकांचे नवीन चेहरे शोधण्यासाठी एक स्पर्धा जाहीर करते. हा मुलगा स्पर्धेत भाग घेतो. दुसरा येतो. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुलाचे नाव आज  कुणाच्याही लक्षात नाही पण हा दुसरा क्रमांक पटकावलेला मुलगा, सिनेसृष्टीत धर्मेंद्र या नावाने प्रसिद्ध झाला.
त्यांच्या पहिल्या सिनेमानंतर, स्क्रीन या मासिकात लिहिले होते, “ नवोदित असूनही धर्मेद्र यांनी चांगले काम केले आहे. प्रेमप्रसंग आणि भावनिक प्रसंगात मात्र सुधारणा होण्यास वाव आहे. चांगले मार्गदर्शन मिळाले तर हा कलाकार अभिनयक्षेत्रात  निश्चितच नाव कमावेल”
स्क्रीनला भविष्याचा अंदाज आला होता असे आपण नक्कीच  म्हणू शकतो.

पहिले काही सिनेमा चालले नाहीत पण अनपढ आणि बंदिनी हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर छोटा रोल असूनही  त्यांच्या अभिनयाची आणि त्याहीपेक्षा रूपाची दखल घेतली गेली. गरम धरम म्हणून नंतर प्रसिद्धी मिळाली असेल पण अनुपमा चा संवेदनशील कवी, सत्यकाम सिनेमातील आदर्शवादी आणि आँखे या सिनेमातील हेर या पात्रांनी  धर्मेंद्र यांचे स्थान पक्के केले.

”शोला और शबनम” हा त्यांचा पहिला यशस्वी सिनेमा.

ज्या मुलीवर नायकाचे प्रेम आहे, तिच्यावर त्याच्या मित्राचे प्रेम आहे मित्राने त्याला मदत केली आहे. त्याच्या प्रती असणारी कृतज्ञतेची भावना त्याला प्रेमाचा स्विकार करण्यापासून थांबवते. आदर्शवादी नायकासाठी, मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग करणे हे स्वाभाविकच आहे. कैफी आझमी यांच्या गीतात नायकाचे व्यक्तिमत्व दिसून येते.
एका गीतात, आपल्या प्रियेला समजवताना नायक म्हणतो,

आरजू जुर्म, वफ़ा जुर्म, तमन्ना है गुनाह
ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता
कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊँ
बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता

दुःखाच्या सावलीत असतानाही जे योग्य, तेच करण्याकडे नायकाचा कल आहे. विरहाच्या यातना, विश्वासघाताचे क्लेश, नशिबाचे भोग सहन करूनही, भंगलेल्या हृदयाचे हे गाणं  खूप काही सांगते. हा सिनेमा गाजला.

बंदिनी हा नूतनचा सिनेमा म्हणून ओळखला जातो तरीही यात तिच्यावर प्रेम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका, धर्मेंद्र यांनी फार सुंदर वठवली आहे.

खुनासाठी शिक्षा भोगणाऱ्या कल्याणीच्या प्रेमात हा डॉक्टर आहे. तिचा भूतकाळ विसरून तिला स्विकारण्याची त्याची तयारी आहे पण आपल्या काळ्या भूतकाळामुळे त्याचा भविष्यकाळ मालिन व्हावा हे कल्याणीला मान्य नाही. तुरुंगाच्या आणि समाजाच्या अजस्त्र भिंती ओलांडून प्रेमाला साद घालणारा डॉक्टर देवेंद्र, धर्मेंद्र यांनी अविस्मरणीय केला आहे.
याच काळात  प्रदर्शित झालेला  हकिकत हा सिनेमा भारत चीन या युद्धावर आधारित होता. भारतीय सैनिकांच्या असीम बलिदानाची आणि शौर्याची गाथा गायलेल्या या सिनेमात धर्मेंद्र यांनी जवानाची भूमिका केली आहे.
हा केवळ युद्धपट नव्हता. भले प्रत्येक पात्राचा वर्तमान  मृत्यूशी झुंज देत जगण्याची लढाई जिंकणे हा असेल तरी यातील प्रत्येक सैनिकाला ठाशीव भूतकाळ आहे. त्यांची स्वतंत्र अशी कथा आहे.

ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांना जी ओळख मिळाली त्याची सुरुवात या सिनेमापासून झाली पण १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या” फूल और पथ्थर” या  सिनेमाने शर्मेन्द्र याना यशाच्या शिखरावर नेले.

गावात पसरलेली प्लेगची साथ. पूर्ण गावच निर्मनुष्य. जमीनदाराच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने एक गुंड घुसतो. पैसे तर मिळत नाहीत पण एका आजारी स्त्री ला मात्र तो वाचवतो. तिच्या साथीने त्याच्या  आयुष्याला एक नवीन वळण मिळते.  या  सिनेमातील शर्ट काढलेल्या, उघड्या छातीचा धर्मेंद्र, त्याच्याच घरात आश्रय घेतलेल्या एका तरुण स्त्रीच्या अंगावर पांघरून घालतो,  हे  दृश्य खूप गाजले.  ह्या एका सीनमुळे पंजाबचा हा मुलगा “ही मॅन” म्हणून प्रसिद्ध झाला. मर्दानी शरीर आणि  निरागस चेहेरा या विरोधाभासावर महिला वर्गाने पसंतीची मोहर लावली.
फुल और पथ्थर मध्ये त्याने शर्ट काढला खरा आणि सलमानचा रस्ता मोकळा झाला तरीही जसा सलमान डोळ्यासमोर शर्टलेस येतो तसे धर्मेंद्र येत नाहीत कारण त्यांना याचे भांडवल करावे लागले नाही. ते कोणत्याही वेशात देखणे दिसतात. आमच्या पिढीला त्या देखणेपणाची जाणीव झाली लोफर मध्ये. 
लोफर मध्ये धर्मेंद्रवर चित्रित  झालेले रफी साहेबांचे एक अजरामर गीत आहे. 

ऐ मेरे यार, ऐ हुस्नवाले, दिल किया मैने तेरे हवाले
तेरी मर्ज़ी पे अब बात ठहरी, जीने दे चाहे तू मार डाले 
तेरे हाथों में अब मेरी जान है  
आज मौसम बडा, बेईमान है आज  मौसम 
हे खरेतर नायिकेने, नायकासाठी म्हणायला हवे असे वाटते.
रांगडेपणा आणि लाजरेपणा याचे अनोखे मिश्रण आहे त्यांच्या व्यक्तीमत्वात .
अजून एक गीत आहे ज्यात ते अफलातून दिसले आहेत. ” बहारें फिर भी आयेंगी” हा  सिनेमा खरंतर “मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है  “या गीताने लक्षात राहिला  आहे असे म्हणायला हरकत नाही. या  सिनेमात एका पत्रकाराची भूमिका धर्मेंद्रच्या वाट्याला आली. ज्या पेपरसाठी नायक काम करतो त्याची मालकीण आहे माला सिन्हा. तिच्या छोट्या  बहिणीचा रोल तनुजाने केलेला आहे.

 
पुरुषांचे म्हणून समजले जाणाऱ्या कार्यक्षेत्रात काम करायचे असल्याने, अंगी बाणलेला सावधपणा माला सिन्हाच्या अंगात आहे  आणि त्याची झळ आपल्या बहिणीला पोचू न दिल्याने तनुजा मात्र अल्लड आहे. या  दोघांचेही नायकावर प्रेम आहे.

खुली लटों की छाँव में खिला-खिला सा रूप है
घटा पे जैसे छा रही सुबह-सुबह की धूप है
जिधर नज़र मुड़ी उधर सुरूर ही सुरूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है  
त्याच्या मनात मात्र कसलाही संदेह नाही. त्याचे प्रेम आहे तिच्यावर आणि तिचाही प्रतिसाद तितकाच उत्कट.
त्याला काय वाटते तेही संदिग्ध नाही. जे मनात आलेले आहे, जे त्याच्या हृदयात आहे, ते स्पष्ट सांगण्याचे धारिष्ट सुद्धा आहे. हे नुसते प्रेम नाही तर भक्तीही. ती तर शब्दात आहे, धर्मेंद्रच्या नजरेत आहे आणि रफीच्या आवाजातही. तनुजाच्या डोळ्यातील आमंत्रण एवढे खुले आहे की, “मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है”  हा प्रश्न उरत नाही, विधान होते.

धर्मेंद्र आणि रोमान्स म्हंटले की खामोशी हा  सिनेमा आठवतो. ह्यात त्यांना मुख्य भूमिका नाही पण त्यांचे पात्र महत्वाचे आहे. त्यांची  भूमिका छोटी असूनही त्यांच्याभोवती सिनेमा फिरतो.

होंठ पे लिये हुए दिल की बात हम
जागते रहेंगे और कितनी रात हम
मुख़्तसर सी बात है, तुमसे प्यार है
तुम्हारा इन्तज़ार है.

तिच्या आठवणीत तो हरवलेला. नजर तिच्या येण्याकडे लागलेली. ती येईल अशी खात्री तर आहे पण आधीच्या अनुभवाने मन साशंक सुद्धा आहेच.  ती अस्वस्थता, ते एकाकीपण, त्याचे स्वतःलाच  समजावणे. ती येणार, निश्चित येणार. .” मुख्तसर सी बात है तुमसे प्यार है”  हे सांगून रिकामा होतो तो. या गीतात चेहेरा ही स्पष्ट दिसत नाही. तो  पाठमोरा आहे आणि तरीही त्याच्या हालचालीत, उभे राहण्याच्या पद्धतीत , त्याच्या येरझारा घालण्यात त्याचे एकाकीपण आणि अधीरता दिसून येते.
धर्मेंद्रच्या जागी  दुसरा कुणी याची कल्पनाही करता येत नाही एवढा त्याचा पाठमोरा शॉट सुद्धा मनात ठसला आहे.

धर्मेंद्र म्हणजे ऍक्शन हे समीकरण सत्तरच्या  दशकात रुळले. याला  छेद देणारे त्यांचे काही चित्रपट  आहेत ज्यात त्यांच्या अभिनयाचीही कसोटी लागली आहे. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुपमा या सिनेमात एका आदर्शवादी लेखकाची भूमिका धर्मेंद्र यांनी वठवली. 

प्राध्यापकाच्या नोकरीत काम कमी पण पगार जास्त असतो, शिवाय शिक्षकांची खरी कसोटी कोवळ्या  मुलांच्या मनावर संस्कार करण्यात लागते हे मत असल्याने नायक प्राध्यापकाची नोकरी सोडून शिक्षकाची नोकरी धरतो. सौन्दर्य आणि ऋजुता याचा संगम असलेल्या पण परिस्थितीने अबोल झालेल्या नायिकेच्या प्रेमात तो पडतो. तिच्यात होणाऱ्या सकारात्मक बदलाला सुद्धा तो कारणीभूत ठरतो. 

ये फूल चमन में कैसा खिला
माली की नज़र में प्यार नहीं
हँसते हुए क्या-क्या देख लिया
अब बहते हैं आँसू बहने दो
या दिल की सुनो… एका दडपलेल्या , परिस्थितीने खचलेल्या मुलीची कैफियत आहे हे गीत.
हेमंतकुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजाला  साजेसा असा संयत अभिनय धर्मेंद्र यांनी केला आहे.

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या’ नया जमाना” या  सिनेमातही  एका आदर्शवादी तरुणाची भूमिका धर्मेन्द्र यांनी साकारली. गरीब विरुद्ध  श्रीमंत ही या सिनेमाची थीम. गरिबांच्या हक्कासाठी लढणारा, त्यांच्या भल्यासाठी प्रसंगी स्वतःलाही श्रेय नाकारणारा नायक त्यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केला. नायकाने लिहिलेले  पुस्तक, यातील खलनायक स्वतःच्या नावावर प्रदर्शित करतो. तरीही त्याचे उत्पन्न गरिबांसाठी देणगी म्हणून  दिले असल्याने, नायक गप्प बसतो. आपले विचार पोचणे महत्वाचे, नाव नाही ही उदात्त विचारसरणी या नायकाची आहे.

तेरे ज़ुबां पे है, ज़िक्र सितारों का,
तेरे लबों पे है, नाम बहारों का
पर तेरे दामन में, काँटे हैं, गुलाब नहीं 
दुनिया ओ दुनिया, तेरा जवाब नहीं   
मुखवट्यामागचे हे जग किती फसवे आहे याची जाणीव नायकाला आहे तरीही तो हतबल आहे. ही असहाय्यता आणि वांझोटा संताप याचे दर्शन त्यांच्या देहबोलीतून घडते.

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून धर्मेंद्र सत्यकाम या  सिनेमाचे नाव घेतात. “सत्य हेच सर्वश्रेष्ठ मूल्य आहे” ही श्रद्धा असणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. सारे जग तडजोडीची भाषा करत असताना सत्याची कास धरून तू कसा टिकणार? या प्रश्नाला नायकाचे उत्तर आहे, “सत्य हे निखाऱ्यासारखे आहे. हातात धरले तर हात भाजणार नाही हे कसे शक्य आहे?

चित्रपटाचे दिग्दर्शक, हृषीकेश मुखर्जी यांचाही हा लाडका चित्रपट. दुर्दैवाने त्याला व्यावसायिक यश मिळाले नाही. त्या नंतर त्यांनी करमणूकप्रधान चित्रपटाची वाट धरली.
या काळातच  फूल और पथ्थर, देवर, अनुपमा, मेरे हमदम मेरे दोस्त, शिकार, आँखे अशा अनेक चित्रपटांनी यशाचे  उच्चांक मोडले. धर्मेंद्र यांच्या लोकप्रियतेचा उपयोग हृषीकेश मुखर्जी यांनी फार खुबीने गुड्डी या  सिनेमात केला. इथे आपल्या खऱ्या रूपात ते पडद्यावर चमकले.
गुड्डी या  सिनेमातील नायिका एका लोकप्रिय सिनेनटाच्या प्रेमात असते. या नटाची भूमिका धर्मेंद्र यांना मिळाली. एकप्रकारे त्यांच्या लोकप्रियतेला दिलेली दाद होती ती.

चुपके चुपके या चित्रपटाने विनोदी भूमिका सुद्धा आपण उत्तम वठवू शकतो हे  धर्मेंद्र यांनी  सिद्ध केले.

हिंदीचा अभिमान असणाऱ्या एका व्यक्तीचा गर्वहरण एवढी साधी कथा असणारा हा  चित्रपट म्हणजे हास्याचे न थांबणारे कारंजे.
धर्मेंद्र यांनी परिमल त्रिपाठी उर्फ प्यारे मोहन ही व्यक्तिरेखा अप्रतिम वठवली आहे. हीच भूमिका बंगाली सिनेमात  सुपरस्टार उत्तमकुमार यांनी रंगवली आहे.
एका लोकप्रिय ब्लॉगरने याची तुलना करताना लिहिले, “ कुमार उत्तम आहे यात वादच नाही पण  धर्मेन्द्रची गोष्टच वेगळी. तो एकाचवेळी अत्यंत देखणा असूनही  अतिशय विनोदी दिसतो. त्याचे कामही सहज आहे. खोटे बोलताना त्याचे डोळे चमकतात. तो खट्याळपणाही लोभस. जर ड्रायव्हर्स असे असू शकतात तर परमेश्वरानी अशा अनेक  आवृत्या निर्माण करायला हव्यात.“

१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या शराफत या  सिनेमाने हेमा मालिनी आणि धर्मेंद्र याना एकत्र आणले. तुम हसीं मैं जवाँ, नया जमाना, सीता और गीता, राजा जानी, जुगनू, दोस्त, पथ्थर और पायल, प्रतिज्ञा, चरस, दिल्लगी हे या जोडीचे यशस्वी चित्रपट. शोले हा त्याचा कळस.
पडद्यावरची ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र आली.  

त्यांनी पडद्यावर एकत्र सादर केलेली अनेक गीते आहेत. “किनारा” या सिनेमातले “एक ही ख्वाब कई बार से देखा है मैने“ हे गाणे मला अतिशय आवडते.

मेज़ पर फूल सजाते हुए देखा है कई बार
और बिस्तर से कई बार जगाया है तुझको
चलते फिरते तेरे कदमों की वोह आहट भी सुनी है
एक ही ख्वाब कई बार से देखा है मैने

त्याच्या चेहेरा  हसतोय पण  डोळे  मात्र आतुर. हे  स्वप्न लवकरच खरं करणार आहे तो ..
त्याच्या बरोबरच, त्याचे घर तिची वाट पाहतेय. 

नुसते प्रियकर प्रेयसीचे गाणे नाही; तर एका सुखी संसाराचे स्वप्न आहे. लहान, साध्या, नेहेमीच्याच गोष्टी; पण परस्परांवर प्रेम असेल तर आयुष्य सुगंधी होऊन जाते. टेबलावर फुले ठेवताना त्याला ती दिसते. तिच्या पावलांची चाहूल घराच्या काना कोपऱ्यातून ऐकू येते.  सुस्नात होऊन गुणगुणत ती बाहेर येते  आणि त्याच्या चेहेऱ्यावर होते तिच्या ओल्या केसांची शिंपण. 
पत्ते खेळताना डाव मनासारखा आला नाही म्हणून ती रुसते.
एक सहजपणा आहे त्यात. तो अभिनय नाहीच. ते  आहे जागेपणी पाहिलेले स्वप्न. 

पंजाब दा पुत्तर म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र देखणे आहेत आणि करारी. साधा सरळ स्वभाव, खेळकरपणा, खट्याळपणा आणि वागण्यात असलेली बेफिकिरी ही या मातीची देणगी. पंजाबी जीव लावतात ह्याची ग्वाही तर अनेकजण देतील. धरमजी त्याला अपवाद नाहीत. एक मोकळेपणा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात जो काही गीतांत अलगद पकडला आहे.
कहानी किस्मत की मधले “राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है”, चुपके चुपके मधले” सा रे ग मा, म सा रे ग”, किंवा प्रतिज्ञा मधले “ मै जट यमला पगला दिवाना” त्याची धमाल गाणी भरपूर आहेत पण ती आगावू नाहीत. कुठेही विसंगत वाटत नाहीत. त्यात एक सच्चेपणा आहे.
खरेतर अनेक गोष्टी  त्यांना जमत नाहीत. पडद्यावर रडणे,चिडणे आणि प्रेम करणे सुद्धा. त्यांचा नायक निरागस वाटतो. त्याच्या मर्दानी चेहेऱ्याला विसंगत वाटावे असा तो लाजतो सुद्धा तरीही हिंदी सिनेमातले सर्वात मादक गीत त्याच्या नावावर आहे .

देर से आयी आयी तो बहार 
अंगारो पे सोकर जागा प्यार
तुफानोमे फुल खिलाये,  कैसा ये मिलन
मिले मिले दो बदन
खीले खीले दो चमन
ये जिंदगी कम ही सही, कोई गम नही ….
ब्लॅक मेल या सिनेमातील हे गीत. पाठीवर शत्रूची माणसे असताना, नायक नायिका एकत्र येतात. त्यांच्या मागे लावलेली कुत्री, जंगलाला लावलेली आग, त्यांच्यावर झडप घालण्यासाठी सज्ज असलेला मृत्यू आणि तेव्हाच  झालेली प्रेमाची जाणीव.
मृत्यूच्या सावलीत, “कोई गम नहीं” असे हसत हसत म्हणणे कुणाला शोभेल! पण धर्मेंद्र यांनी ते सहज निभावून नेले आहे.

पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेत्या सारखीच प्रतिमा त्यांची प्रत्यक्ष आयुष्यातही होती. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले आहे त्यांनी,  त्यांच्यामधल्या माणुसकीचा अनुभव घेतला आहे. व्यवहाराबरोबर नाते सांभाळणे त्यांनी जपले. निर्मात्याला पैशासाठी न अडवणे, अनेकवेळा, स्वतः तोशीस सोसूनही त्यांना मदत करणे, दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ न करणे, सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवणे, ज्युनिअर लोकांना सेटवर मदत करणे, एक ना दोन . चित्रपटसृष्टीत ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातील यात काहीही अतिशयोक्ती नाही. अभिनेत्री रेखाच्या शब्दात सांगायचे झाले तर,” एक अभिनेता म्हणून मी त्यांची कदर करतेच पण माणूस म्हणूंनही ते अतिशय मोठे आहेत. या चित्रपटाच्या मायावी जगात हा एक माणूस अतिशय निखळ आहे”
पंजाबच्या एका खेड्यात जन्मलेल्या या माणसाने मुंबईच्या सिनेनगरीत अमाप यश मिळवले पण त्याचे पाय मात्र जमिनीवर राहिले. या  व्यक्तिमत्वात पंजाबच्या मातीचा रांगडेपणा आणि दिलदारपणा होता.. त्याच्या मनाचा चांगुलपणा, निर्मळपणा त्याच्या कवितेतही उतरला आहे.
एकाद्या माणसाची स्तुती करणे आणि त्याची किंमत करणे यातील फरक दाखवताना ते लिहितात,

होती है तारीफ अहमियत की
इन्सानियत की मगर कदर होती है

उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होत नाही हे मान्य तरीही धर्मेंद्र यांचे नाव घेतले की पंजाबची रांगडी माती आठवते. त्या मातीत पोसलेला, लस्सी आणि मक्याच्या रोटीवर वाढलेला मुलगा आठवतो. सिनेमाचे वेड डोळ्यात साठवून मुंबईला येणे, यशस्वी स्टार बनणे आणि तरीही त्या मातीचा रांगडेपणा आणि साधेपणा न टाकणे आठवते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कधीही पुरस्कार न मिळाल्याने, जेव्हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला तेव्हा सर्व प्रेक्षकांसमोर त्यांचे  गहिवरून येणे आठवते आणि लक्षात येते, आयुष्यभर अभिनयाच्या क्षेत्रात राहूनही; प्रत्यक्ष जीवनात अभिनय न करता माणूसपण जपणाऱ्या या माणसात नक्कीच काहीतरी आहे.  फक्त नेहेमीची मोजपट्टी न घेता पाहण्याची गरज आहे.

आज सकाळीच अत्यंत साधेपणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीडियाला तमाशा करायला त्यांच्या कुटुंबीयांनी संधी दिली नाही. ज्या माणसाचे आयुष्य अत्यंत निखळ होते, कदाचित सामाजिक मोजपट्टीत बसणारे नसेल पण प्रामाणिक होते, त्या माणसाचा शेवटचा प्रवास तेवढाच साधा आणि सहज असावा ही नियंत्याची ही इच्छा असावी.
भावपूर्ण आदरांजली . 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

25 thoughts on “ मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है :”

  1. मस्त आढावा घेतलास प्रिया. तो उत्तम रीतीनं टिकून राहिला इंडस्ट्रीत. वेगळाच होता ग तो. त्याचं अजून एक खूप आवडतं गाणं म्हणजे इक हंसी शाम को दिल मेरा खो गया किंवा लताच्या शर्मिलावरच्या चलो सजना मध्येही तो किती छान रोमॅंटिक वागलाय. छान लेख. आवडला 👌👌💐💐💐💐

    1. खूप सुरेख आढावा घेतलास प्रिया!.मी त्याची जबरदस्त फॅन होते.
      अनुपमा सत्यकाम ही त्याचे दोन्ही सिनेमे मी बऱ्याचदा पाहिले यू ट्यूबवर..
      चुपके चुपके मधील कॉमेडी सीन तर न विसरता येणारे..😁
      तो गेल्याचे दुःख असताना देखील यातील सीन हसू थांबवू शकले नाहीत.
      कित्ती वेगळं आहे हे!
      तो होताच तसा..कुठेही फिट बसणारा..नृत्य हा एकमेव अपवाद..पण तरीही यमला पगला म्हणत जमेल तसा नाचला…
      मला हे जमणार नाही असे कोणी म्हणू नये
      इतकंच..अशीच जणू त्याची भावना..
      इतका देखणा की जणू ग्रीक योद्धाच!
      त्याच्या एकनएक सिनेमात तो आवडत गेला.
      आता उरल्या फक्त आठवणी.🙏

    2. हो , Shalmali ,
      ..मला तास तो मेरा गांव मेरा देश मध्ये सुद्धा आवडला
      आणि हकीकत
      आर्मी युनिफॉर्म त्याला मस्त शोभून दिसायचा …डोळे खूप निर्मल होते त्याचे

  2. धर्मेंद्र हा तर आमच्या शालेय वयापासून आमच्यावर प्रभाव टाकून होता. यादोंकी बारात, शोले, सीता और गीता, राजा जानी, काजल, नोकर बिबीका, दिल्लगी, किनारा, चुपके चुपके वगैरे चित्किरपटांची ती तरी मोठी यादी आहे.

    आपल्या आयुष्यातल्या भल्याबुऱ्या आठवणी, या कोणाशी तरी, कसल्या तरी घटनेशी निगडीत असतात, आणि मग ती तशी घटना आठवली, की ती व्यक्ती आठवते. बस, धर्मेंद्रचे असेच आहे, गाडी बुला रहीं हैं, म्हटले की हाच चेहरा आठवतो.

    त्याची, धर्मेंद्रची गाडी आली, आणि आपल्यातून त्यांना कायमचे घेवून गेली.

    1. True Madhav Bhokarikar sir.
      खरंय
      मला तसा धर्मेंद्र म्हंटला की नया जमाना आठवतो
      ते पुस्तक प्राण ने स्वतःच्या नावावर छापून घेणे आणि त्याचा उदास चेहेरा
      असेही होऊ शकते हे समजणे त्या वयात एक धक्काच होता

  3. प्रिया,

    खूप छान लिहिलंस .

    रांगडा, पंजाब दा पुत्तर त्याच्या सगळ्या कारकिर्दीचा छान आढावा घेतलास.
    👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  4. प्रिया ताई,
    अतिशय छान शब्दबद्ध केलंय.

    एका अतिशय सुंदर व्यक्तिमत्वाच्या विविध भावनांचे सुंदर व्यक्तिचित्रण. धर्मेंद्र मस्त नायक होता. त्याला सर्वकाही जमायचे नाही पण, जे काही करायचं ते बघून आनंद नक्कीच होतो.

    तुमच्या लेखाची वाट बघत होतो. तुम्ही जे काव्यरूपी लिहिता तेच आवडते. प्रत्येक भावना समजावून देताना जे समर्पक गाणे निवडता त्याला तोड नाही.

  5. फुल और पत्थर पासून लोफर, जुगनू, यादोंकी बारात, समाधी, असे कित्येक चित्रपट केवळ धर्मेंद्रसाठी पाहणारे कित्येक. “आज मोसम बडा बेईमान है” या गाण्यातलं धर्मेंद्रचं दिसणं अजूनही डोळ्यासमोर आहे. असा हा खंदा अभिनेता यापुढे या जगात नाही हे सहन करणं कठीण आहे. हल्ली ते चित्रपटात फारसं काम करत नव्हते तरी त्यांचं असणं हे सुद्धा घरात एखादा कर्ता म्हाताऱ्याच्या हात डोक्यावर असल्यासारखंच वाटतं होतं. हल्ली रिल मध्ये त्यांना आधार घेत चालताना पाहून मनाला फार वाईट वाटायचं. काही माणसांना म्हातारं बघणच त्रासदायक असतं.

    जड अंतःकरणाने त्यांना निरोप द्यावा लागतोय. धरमप्राजी जहाँ भी हो हमेशा वैसेही रहो जैसे हमारे दिल में हो.

    1. खरंय Kamini,
      एकापाठोपाठ एक असे legends गेले की वाटते आपला भूतकाळ अदृश्य होत आहे .
      मला चुपके चुपके , सत्यकाम आणि आँखे खूप आवडले ..ही रेंज अफाट
      बाकी तो नेहेमीच देखणा दिसला ..अगदी सीता और गीता मधील सध्या भूमिकेत सुद्धा

  6. Mrs smita dewappa Kokitkar

    खूपच सुंदर लिहिल आहेस प्रिया♥️♥️धर्मेंद्र माझा खूप आवडता अभिनेता!!! किशोर कुमार रफी सर्वांचे आवाज त्याला चपखल बसायचे. गाणी ही त्याला सगळी छान मिळाली. ईश्वराने त्याला उत्तम शरीर सौष्ठव दिलेले. त्या काळातला handsome अभिनेता♥️♥️

  7. खूप सुरेख आढावा घेतलास प्रिया!.मी त्याची जबरदस्त फॅन होते.
    अनुपमा सत्यकाम ही त्याचे दोन्ही सिनेमे मी बऱ्याचदा पाहिले यू ट्यूबवर..
    चुपके चुपके मधील कॉमेडी सीन तर न विसरता येणारे..😁
    तो गेल्याचे दुःख असताना देखील यातील सीन हसू थांबवू शकले नाहीत.
    कित्ती वेगळं आहे हे!
    तो होताच तसा..कुठेही फिट बसणारा..नृत्य हा एकमेव अपवाद..पण तरीही यमला पगला म्हणत जमेल तसा नाचला…
    मला हे जमणार नाही असे कोणी म्हणू नये
    इतकंच..अशीच जणू त्याची भावना..
    इतका देखणा की जणू ग्रीक योद्धाच!
    त्याच्या एकनएक सिनेमात तो आवडत गेला.
    आता उरल्या फक्त आठवणी.🙏

    1. Thank you Anuradha .
      त्याचा स्क्रीन प्रेझेन्स अफाट होता आणि कॉमेडी
      सत्यकाम हे खरंच नवल ..तो चालला असता तर कदाचित ह्याची करिअर वेगळीकडे गेली असती .
      मला तो नाय जमाना मध्ये सुद्धा खूप आवडला ,

  8. खूप खूप सुंदर लेख ! लाडक्या धरम सरांचे कौतुक वाचताना डोळे भरून आले.

Leave a Reply to Kamini Amrutkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *