तुम्हाला माहित आहे, चित्रपटांच्या जॉनर मध्ये भयपट आवडणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे.
स्वतःलाच घाबरवून घ्यायला लोकांना का बरे आवडत असेल ?
मनोवैज्ञानिक सांगतात,
भीतीची भावना एवढी रोमांचकारी असते, की ती सुरक्षित वातावरणात बघताना , सुरक्षितपणे अनुभवता येते. जे घडते आहे त्याचे स्पष्टीकरण मिळत नसेल तर एकाच वेळी ते न मिळाल्याची खंत, काय असेल त्याची उत्सुकता, काय वाढून ठेवले असेल याचे भययुक्त आकर्षण या सर्वच भावनांचा उत्कर्षबिंदू गाठता येतो आणि जेव्हा तो सिनेमा संपतो तेव्हा सुटलेला निःश्वास सुद्धा आपण सुरक्षित आहोत याची ग्वाही देतो.
अशाच काही चित्रपटातील भयाच्या क्षणांवरील ही पोस्ट.
१) चित्रपट -भ्रमयुगम
सतराव्या शतकात केरळमधील मलबार येथे एका लोकसंगीत गाणाऱ्या गायकाच्या, थेवनच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट.
राजाच्या अत्याचाराला कंटाळून थेवन आणि त्याचा सहकारी, कोरन पळ काढतात. धो धो पावसात एका जंगलात थांबलेले असताना एक यक्षिणी, कोरनला मोहात पाडून त्याला ठार मारते. जीवाच्या भीतीने वाट फुटेल तिथे धावणाऱ्या थेवनला एक जुना मोडकळीस आलेला वाडा दिसतो. तिथे पडलेल्या शहाळ्याला पाहून भुकेने व्याकुळ झालेला थेवन, आपली तहान भागवायला जाणार, तेवढ्यात त्या जीर्ण वाड्याचे दार उघडते.
“ एकदा का तू या माना (केरळमधील नंबुद्री ब्राह्मणाचे घर) मध्ये पाऊल टाकलेस, की तुला कुठेच जायची गरज नाही. इथेच तुला नद्या, सपाट मैदाने, डोंगर यांचा प्रत्यय येईल.“
त्या प्रशस्त पण मोडकळीस आलेल्या घराचा नोकर, दारात उभ्या राहिलेल्या थेवनला सांगतो. थेवनला वाटते, की घर केवढे मोठे आहे याची कल्पना देतो आहे हा. लवकरच त्याला समजून येते की पुढे येणाऱ्या संकटाची ही नांदी आहे.
“या घरात आत जायचा मार्ग आहे पण बाहेर यायचा नाही.” हा या बोलण्याचा खरा अर्थ आहे.
राहुल सदासिवनच्या “भ्रमयुगम” या सिनेमात, कोडुमोन पोट्टीचे प्रशस्त घर हे एक महत्वाचे पात्र आहे. माना म्हणजे हवेली वजा घर. ह्या घराचा आकार भव्य आहे. त्याचे वैभव मात्र लयाला गेले आहे. निसर्गाचा कोप आणि यात राहणाऱ्या लोकांचे दुर्लक्ष यामुळे घराची वाताहत झाली आहे. बाहेर अस्ताव्यस्त वाढलेल्या झुडूप आणि वेलींनी घराला जणू काही विळखा घातला आहे. छप्पर काही ठिकाणी तुटलेले आहे. भिंती ढासळायला आलेल्या आहेत.
घरात सगळीकडे धूळ आणि पसारा.
घर आश्रय देते पण इथे मात्र न बोलता ऐकू येणारा त्याचा आवाज आहे “ कुणाही माणसाला इथे प्रवेश नाही”
थेवन साठी महत्वाचे असते ते जिवंत राहणे. थेवन कितीतरी दिवस उपाशी असतो. एका जीवघेण्या संकटातून कसाबसा पळ काढून तो आता या घराच्या आश्रयाला आलेला असतो. अशावेळी मन काही येणाऱ्या संकटाची चाहूल घेत नाही.
वाड्याचा नोकर त्याची या वाड्याच्या मालकाशी भेट घडवतो.
या घराचा मालक, कोडुमोन पोट्टी त्याचे स्वागत करतो.
थेवन हा पानन जातीचा आहे हे समजल्यावर तो त्याला गाणे म्हणायला सांगतो. या जातीचे लोक राजाच्या दरबारात गाऊन आपली उपजीविका करतात. थेवन सुद्धा गायक असतो. त्याच्या गाण्यावर प्रसन्न होऊन कोडुमोन पोट्टी त्याला घरात प्रवेश देतो. जेवण देतो. त्याची राहायची व्यवस्था करतो.
काहीच दिवसात थेवन च्या लक्षात येते की हे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. ह्या घराने अतिशय वाईट दिवस पाहिलेले आहेत. असंख्य यातना भोगून या घराची माणसे इथेच मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यांना आवारातच गाडून टाकलेले आहे.
या भरलेल्या खड्यात, त्याला त्याचे स्वतःचे भविष्य दिसते.
“मला इथून बाहेर पडायचे आहे. माझी आई वाट पहाते आहे” थेवन विनवण्या करतो.
“ जा की. तुला कोणी अडवले आहे! मात्र या तुफानात कसा जाणार याचा विचार कर” कोडुमोन पोट्टी सांगतो.
त्याचा चेहेरा विचारमग्न असतो. मग हळूहळू त्याच्या किडलेल्या दातातले हसू बाहेर येऊ लागते. डोळे बारीक होतात आणि शरीर ताठ. नजर रोखलेली , त्याला बोलायची गरज भासत नाही.
बाहेर लखलखीत ऊन असल्याने थेवनला प्रश्न पडतो, पाऊस! कुठे आहे पाऊस?तोच आता पर्यंत निरभ्र असलेले आकाश काळे होऊ लागते. मोठाले ढग मानाभोवती जमा होतात आणि काही क्षणात बोलावल्यासारखा पाऊस हजर होतो. सहस्त्र धारांनी त्या घरालाच कवेत घेतो.
मोडलेल्या छतातून पावसाचे टपोरे थेम्ब थेवन च्या अंगावर पडतात.
तो कोडुमोन पोट्टी कडे पाहतो. आतापर्यंत न उमजलेले त्याचे रूप थेवनच्या समोर साकारू लागते. कोडुमोन पोट्टी हसत असतो. ते हसणे आसुरी असते. थकलेल्या त्याच्या शरीरातली खरी ताकद थेवनला समजते. ती असते सत्तेची ताकद.
या घरावर, या जंगलावर, त्या वरील आकाशावर सुद्धा त्याची सत्ता असते. इथे राहणारे त्याचे गुलाम असतात.
आणि मृत्यूची घटिकाच त्यांच्या सुटकेचा क्षण असतो.
थेवनला आपले भविष्य कळून येते. बाहेर पाऊस रडत असतो.
चित्रपट फक्त काळया पांढऱ्या रंगात आहे. रंगात मन गुंगून जाते, भटकते. इथे तीन पात्रे आणि दोन रंग. चांगले आणि वाईट याला स्थान नाही इथे. शोषण करणारा आणि शोषक हे दोनच वर्ग या जगात आहेत. त्यांचा हेतू चांगला असेल किंवा वाईट, शेवट, कमजोर लोकांवर सत्ता राबवणे हाच आहे . चित्रपटाचा काळ सतराव्या शतकातील असला तरी या मुद्द्यावर हा वर्तमान काळाशी जोडला जातो.
२) चित्रपट -गहराई
लहान मुलीच्या अंगात भूत येणे ही कल्पना Exorcist या सिनेमात वापरली गेली. अरुण विकास राजे यांचा गहराई हा सिनेमा ह्या कल्पनेवर बेतला होता.
सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे असे सुरुवातीलाच सांगितले आहे. या सिनेमाची नायिका उमाक्का ही तेरा चौदा वर्षाची शाळेत जाणारी अत्यंत हुशार मुलगी आहे. तिचे वडील चेन्नाबसप्पा, एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. ते अत्यंत सुधारक तर आई देवभावी. तिला एक मोठा भाऊ आहे, नंदू, जो अत्यंत हुशार आहे.
आता चित्रपट काही काळ मागे जातो.
चेन्नाबसप्पा यांच्या वाडवडिलार्जित जमीन असते. गावाच्या विकास योजनेत ही जमीन एक कारखानदार विकत घेतो. आता तिथे साबणाची फॅक्टरी होणार असते. ह्या जमिनीचा सांभाळ करणाऱ्या एका मजुराच्या, बसावाच्या, नजरेतून मात्र ही फक्त जमीन नसते तर त्याची आई असते. इथे लावलेल्या प्रत्येक झाडात, पिकवलेल्या शेतांत त्याचा जीव असतो. चेन्नाबसप्पाला मात्र या भावनांशी काही देणे घेणे नसते. तो या मजुराला बंगलोरमध्ये नोकरी देऊ इच्छितो. पैसेही देतो. शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांना नुकसानभरपाई देऊन वाटेला लावतो पण बसावाला हे काही मान्य होत नाही.
“ आपल्या आईला विकायचे !!” हा प्रश्न त्याची पाठ सोडत नाही आणि मग सुरु होतो एक वेगळाच खेळ.
अघोरी खेळ.
चित्रपट आता परत वर्तमानकाळात येतो.
या हसत्या खेळत्या कुटुंबाला नजर लागते. भर दुपारी सायकल वरून शाळेतुन घरी येताना उमाक्का मानसिक दृष्ट्या हरवते ती हरवतेच. तिचे अभ्यासातील लक्ष उडते. मार्क्स कमी होत जातात. ती स्वतःशी बोलू लागते. कोणत्यातरी विचारात हरवते. ती दमलेली दिसते. डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात. सतत डोके दुखते. कुणीतरी गळा दाबत आहे असे भास सुरु होतात. शाळेत सुद्धा ती खूप भांडते , अचानक आक्रमक होते.
वडील डॉक्टरकडे जातात पण काहीही उपयोग होत नाही.
अचानक एक प्रसंग असा घडतो की यामागे काहीतरी अत्यंत भयंकर आहे याची जाणीव घरातील लोकांना होते. शाळेतून घरी येताना अचानक उमा सायकलवरून ढकलली जाते. दिसत तर कुणीही नाही पण कुणीतरी मागावर आहे याची जाणीव झालेली उमाक्का रडत घरी येते.
काय झाले हे तिला खोदून खोदून विचारत असतानाच आतापर्यंत रडवेली झालेली उमाक्का बघता बघता बदलते. तिच्या तोंडून शिव्या बाहेर येतात. अत्यंत अश्लील शिव्या. गचाळ भाषा. जे शब्द सभ्य घरात कानावर सुद्धा पडत नाही ते उमाक्का बोलू लागते. मांडी वरती करून बसणे, करा करा खाजवणे , तंबाखू चोळत अत्यंत अश्लील बोलणे हे पाहूनच घरातली माणसे हादरतात आणि मानसोपचारतज्ञाची मदत घायची ठरवतात.
उमा तिथे जायला नकार देते.
तिचे मन रमवण्यासाठी नंदू, उमाला बाहेर फिरायला घेऊन जातो. बाहेरून फिरून आनंदात घरी आलेली उमा अचानक बिथरते. नंदूला मिठी मारते. अर्वाच्च भाषेत त्याला स्वतःच्या पलंगावर बोलावते. आई वडिलांसमोर हे घडते आणि अचानक झालेल्या या बदलाने सगळेच थिजून जातात.
गहराई हा सामान्य भयपटांसारखा चित्रपट नाही.
भ्रमयुगम सारखाच हा चित्रपट सुद्धा सत्ता आणि त्यात होरपळणारे सामान्य यावर भाष्य करतो.
एका छोट्याश्या मुलीच्या संदर्भात हे जे दुर्दैवी प्रसंग घडतात , याहून भयप्रद अजून दुसरे काहीही नसते. ही छोटीशी मुलगीच का? तिलाच ही सोसावे का लागते तर त्याचेही कारण शोषणात आहे. स्त्री आणि जमीन, दोघेही जन्म देतात आणि पालन पोषण करतात पण त्यांना वर्चस्वाखाली ठेवण्यापासून पुरुष सत्ता मागे हटत नाही. वडिलांच्या भयानक कृत्यांची शिक्षा सुद्धा मुलीला भोगायला लागणे ही पुढची पायरी आहे.
३ ) चित्रपट-मधुमती
बिमल रॉय यांचा मधुमती याला संगीतमय भयपट म्हणावा लागेल. सलील चौधरी यांचे संगीत चित्रपटाला साजेसे haunting आहे की ज्यांची मोहिनी आजही लोकांच्या मनावर आहे. संगीत आणि अभिनय ही महत्वाची अंगे एवढी उत्कृष्ट होती की भयपट म्हणून ही निर्मिती केवढी उत्तम आहे याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले असावे.
भयपट निर्मिती ही बिमलदा यांची खासियत नसूनही हा चित्रपट सर्वच अंगाने अत्युकृष्ट भयपट म्हणता येईल.
मधुमती ही दोन आत्म्यांची कथा आहे, ज्यांनी आपल्या प्रेम पूर्तीसाठी या जगात परत परत जन्म घेऊन आपल्या प्रेमाची सत्व परीक्षा दिलेली आहे. खरे प्रेम कधीही नष्ट होत नाही या पायावर या सिनेमाचा डोलारा उभा आहे.
सिनेमाची सुरुवातच एका वादळी रात्रीने होते. आपल्या पत्नीला आणायला जात असतानाच देवेंद्र आणि त्याचा मित्र वादळात अडकतात. तशात दरड कोसळून त्यांचा मार्ग बंद होतो. नाईलाजाने एका हवेलीच्या आश्रयाला ते जातात. बंद दारावर थापा मारल्या तरी दार उघडत नाही पण देवेंद्र शेजारची दोरी उघडतो आणि एक वृद्ध रखवालदार त्यांचा आत घेण्यासाठी पुढे येतो. आपल्याला ती दोरी कशी मिळाली हे मात्र काही केल्या देवेंद्रला आठवत नाही.
आत गेल्यावर हा वाडा देवेंद्रला ओळखीचा वाटू लागतो. येथील पेंटिंग्स , तसबीर ह्या साऱ्याच गोष्टी त्याच्या स्मृतीत दडलेल्या असाव्यात. नाहीतर त्या कशा काय परिचयाच्या वाटतात ! बाहेरचा वादळाचा ओघ आता वाढतो आणि देवेंद्रच्या मनातील कोलाहल सुद्धा थांबायचे नाव घेत नाही. हे सगळे आपल्याबरोबर आधीही घडलेले आहे असे त्याचे मन त्याला सांगू लागते. त्या रात्रीत सिनेमा एक जन्म मागे जातो.
मधुमती ही आनंद आणि मधुमतीच्या प्रेमाची गोष्ट आहे. नैनितालमधील एका जमीनदाराच्या इस्टेटीचा कारभार बघण्यासाठी आनंद येथे येतो आणि येथील वनकन्येच्या , देखण्या मधुमतीच्या प्रेमात पडतो. आजा रे परदेसी हे गाणे म्हणणाऱ्या मधुमतीचा प्रेमाचा प्रवास आनंदकडे थांबतो खरा पण या निसर्गकन्येवर जमीनदार उग्रनारायणाची नजर पडते.
काही कामानिमित्त्त तो आनंदला शहरात पाठवतो आणि आनंद जखमी झाला आहे असे सांगून मधुमतीला महालात येण्यास भाग पाडतो. सापळ्यात सापडलेली मधुमती वासनांध उग्रनारायणापासून दूर पळते पण बाहेर जायचा एकच मार्ग खुला असतो , तो म्हणजे उंचावरील गच्ची.
यावेळी सुद्धा पाऊस कोसळत असतो. कुठून तरी दूरवर कुत्र्याचे रडणे ऐकू येते. जवळ जवळ येणारी उग्रनारायणाची पावले आणि घाबरलेली मधू.
मधुचे काय होते ? प्रेक्षकांना समजत नाही. आनंदला सुद्धा नाही , तो वेड्यासारखा मधुचा शोध घेत असताना , त्याची भेट एका तरुणीशी, माधवीशी होते जिचे मधुमतीच्या चेहेर्याशी साम्य असते.
माधवीच्या मदतीने आनंद उग्रनारायण कडून गुन्हा कबुल करायचे ठरवतो.
माधवी . मधुमती सारखा पोशाख करून उग्रनारायणाच्या समोर येते. तो घाबरतो. आपण केलेल्या पापाचा साक्षीदार साक्षात मृत्यू बनून डोळ्यासमोर उभा असतो. जिला मारले तीच समोर ! तिने आरोप करताच, त्याचा तोल सुटतो. स्वतःच्या पापाची कबुली देत , तो परत एकदा मधुमतीला उर्फ माधवीला ठार करायला धावत जातो आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडतो.
सिनेमा इथे थांबला असे वाटते का !
खरा भयभीत आणि स्तिमित करणारा क्षण तर आता आहे.
थकला भागलेला आनंद माधुरीचे आभार मानतो, पण त्याला शंका असते की त्या वादळी रात्री जे काही घडले ते माधुरीला कसे समजले!
स्थिर नजरेने त्याच्याकडे बघत असलेल्या माधुरीच्या चेहेऱ्यावर आता एक गूढ स्मित असते
त्याच वेळी हवेलीचे दार उघडते आणि माधुरी आत येते. तिला पोचण्यास उशीर झालेला असतो म्हणून ती आनंदची क्षमा मागते.
माधुरी तर इथे आहे पण मग महालात आलेली माधवी कोण !
मधुमतीचा आत्मा आनंदला आणि प्रेक्षकांना धक्का देऊन अंधारात विलीन होतो ..
रूढार्थाने हा भयपटात मोडणारा चित्रपट नाही पण बिमल रॉयने जे धक्का तंत्र वापरले आहे ते फार कमी जणांना जमले आहे.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

प्रिया,
तू लिहिलेला तुझा अनुभव वाचला होता.
भयकथा मला वाचायला आवडत नाहीत.
पण काही सिनेमे पाहिले आहेत.
तू अर्थातच झकास लिहिले आहेस.
गहराई मध्ये पद्मिनी कोल्हापुरे होती का?
Yes Vidula., Padmini Kolhapure had acted in Gahrai.
भारीच…
काही इंग्लिश किंवा अशाच दुसऱ्या काही फिल्म्स बाबत पण लिहा…
Thank you Nagesh ji..
असे अनेक सायको थ्रिल्लर्स आहेत जे क्लासिक मध्ये गणले जातात . हिचकॉक म्हणा किंवा आता आलेला हेरीडिटरी लिहायचे आहे
किती सुंदर लिहितेस प्रिया तू.. मधुमती सोडून कुठलाच भयपट मी पाहिला नाहीये. असे सिनेमे पाहायची भीती वाटते मला. भयकथा वाचायला आवडतात. पण तू अशाच काही आणखी फिल्म्स बद्दल लिही.
thank you .
नक्की लिहिते सविता . असे अनेक सायको थ्रिल्लर्स आहेत जे क्लासिक मध्ये गणले जातात
खूपच छान.. मधुमती चं धक्कातंत्र पुढे om shanti om मध्ये वापरलं आहे.
yes . it is Gayatri,.
This is excellent write up. The whole idea is mind boggling. Such write ups should be frequently appear not only in thriller and suspense subjects but in all types of literature.
Thank you so much Bharat Bhagwatji.