Skip to content

कलेजवाँ लागे कट्यार: बेगम अख्तर

दीवाना बनाना है तो दीवाना बना दे
वरना कही तकदीर तमाशा न बना दे ..

उदयपूर येथे राजमहालासमोर एक बाई गात होती . हातात एकतारी. थोडे वेगळेच कॉम्बिनेशन. जणू काही मीरा भजन नाही तर गझल गाते आहे पण भावना तीच; वेडीपिशी झालेल्या स्त्रीची. 
“तुझ्या प्रेमात मला वेडे करायचे आहे न तुला ? मग कर की तूच मला वेडीपिशी; पण सगळ्या जगासमोर माझी शोभा का व्हायला देतो आहेस तू ?”
शाळेमध्ये होते मी. मोरपंखी दिवस. जे जे काही सुंदर आहे त्यावर प्रेम करायचे दिवस. कशासाठी तरी वेडे व्हावे ,कशासाठी तरी सर्वस्व झोकून द्यावे असे वाटणारा तो काळ. उगाच नाही त्या ” दिवाना ” या शब्दाचेच वेड लागले आणि त्यातून सुरु झाला बेगम अख्तर यांचा शोध .

आमच्याकडे फक्त रेडीओ होता तेव्हा आणि त्यावर सतत वाजायची ती, मराठी गाणी आणि कार्यक्रम. गाण्याच्या नादात अभ्यास बुडू नये म्हणून बाबानी टेप रेकॉर्डर ही घेवू दिला नव्हता .तेव्हा माझ्या मदतीला धावून आल्या आमच्या शाळेतील शिवणाच्या बाई. आमच्याच वरती रहायच्या.

त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता आणि पंकज मलिक , सैगल , अख्तर बाई ,जगमोहन , नूर जहां यांच्या गाण्याचा साठा . मला शिवणाची अज्जिबात आवड नव्हती पण काहीतरी निमित्त काढून त्या मला बोलवायच्या आणि दर शनिवारी दुपारी मैफिल रंगायची . गालिब , फैज , शमीम अशा अनेक कवींच्या रचना बोलक्या केल्या त्या या दैवी आवाजाने .गझल गायनाच्या एका नवीन शैलीला बेगम अख्तर ने जन्म दिला . शब्दाशी एकरूप होणे ,त्यातील नवीन भाव , अर्थ स्वरांनी जाणवून देणे. कवीच्या भावनांना आपल्या गायकीतून श्रोत्यासमोर आणले ते अख्तरी बाईंनी.

७ ऑक्टोबर १९१४ मध्ये जन्म घेतलेल्या या गंधर्व कन्येला आज १११ वर्षे पूर्ण झाली पण मन मोहून टाकणारे ते संगीत मात्र चीर तरुण आहे .
व्यक्ती गाण्यासाठीच जन्माला आल्या असाव्यात. अख्तरी बाईंचे शिक्षणात लक्ष नव्हते. जन्मजात वेड घेऊन आलेल्या अख्तरीचे, सातव्या वर्षांपासून गाण्याचे शिक्षण सुरु झाले. शास्त्रोक्त संगीताबरोबरच उस्ताद मोईउद्दीनखान आणि जन्नदबाई यांच्याकडून त्यांनी गझल आणि ठुमरीचे शिक्षण घेतले. लहानपणी वडिलांनी त्यांच्या आईचा त्याग केला होता.
सख्खी जुळी बहीण वयाच्या चौथ्या वर्षीच विषबाधा  होऊन गेली.त्यांच्याही पोटात खाण्यातून हे विष गेलेले पण त्या मात्र जगल्या.लहानपणीच दुर्दैवाचे दशावतार नशिबी आल्याने असेल, हे विष पचवून जगल्या .
ते दुःख, ती वेदना त्यांच्या आवाजात उतरली.

विसाव्या शतकातील तिसाव्या दशकाचा काळ होता तो. नृत्यांगना, गायिका अगदी अभिनेत्रींना सुद्धा समाजात मान नव्हता. ब्रिटिशांच्या काळात तर  कलावंतिणींना असलेली प्रतिष्ठा आणि मान रसातळाला गेला. उच्च आणि सभ्य समाजातील बायका, स्टेज वर सोडाच, पडद्यात होत्या. ऑल इंडिया रेडिओवर सुद्धा समाजात प्रतिष्ठित असलेल्या स्त्रियांनाच संधी होती.
कितीही नावलौकिक मिळवला असला तरी या वर्तुळात अख्तरीला स्थान नव्हते.

वयाच्या पंधराव्या वर्षीच  मैफिल गाजवणाऱ्या या मुलीवर दौलतजादा करणाऱ्या धनाढ्यांचें लक्ष होतेच. वडील नसलेल्या या जगात तरुण मुलींच्या वाट्याला जे भोग  येतात ते त्यांच्याही आले. या जबरदस्तीच्या नात्यातून वयाच्या तेराव्या वर्षी मातृत्व नशिबी आले. त्या  मुलीला त्यांनी आपली बहीण म्हणून वाढवले.
यावरून दोषारोप वाट्याला आलेल्या अख्तरी बाई म्हणून जातात,

नाहक हम मजबुरों पर ये, तोहमत है मुख्तारी की
चाहते है सो आप करे, हमको अबस बदनाम किया
उल्टी हो गईं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया
देखा इस बीमारी-ए-दिल ने आख़िर काम तमाम किया

तुमच्या मनात येईल ते तुम्ही करायचे आणि आरोप मात्र माझ्यासारख्या गरीब , हतबल झालेल्या व्यक्तीवर लावायचा. मनमानी तुम्ही करायची आणि बदनामी मात्र मी झेलायची ..
खरंच नशिबाचे चक्र सुद्धा उलटे फिरणारे आहे.

पुरुषांच्या या जगात, सभ्य लोकांच्या रात्री मात्र तवायफच्या कोठ्यावर जायच्या. दिवसा शांत असलेला हा भाग रात्री प्रकाशाने उजळून जायचा. तानपुरा लावला जायचा. तबला आणि सारंगीच्या साथीने अख्तरीचे सूर रसिकांच्या हृदयाला हात घालायचे.  
स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी अख्तरीने त्यावेळच्या अवधच्या राजधानीकडे, लखनौकडे कूच केले.
येथील रसिकांनी अख्तरीच्या गायकीला आणि सौन्दर्याला डोक्यावर घेतले.
लालबाग येथील चीना बाजार या भागात अख्तरीने कोठी विकत घेतली. अख्तर मंजिल या नावाने प्रसिद्ध झालेल्या या इमारतीकडे शहरातील श्रीमंत, प्रतिष्ठित, जमीनदार रसिकांचा राबता वाढला. तिच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग तयार झाला. तिच्या सौन्दर्याने आणि गायनाने रामपूरचा नबाब, रझा अली खान घायाळ झाला आणि रामपूर इस्टेस्ट मध्ये दरबारी गायिका म्हणून अख्तरीचे स्थान पक्के झाले.
तिने गायलेली  फार सुंदर ठुमरी  इथे जन्माला आली असावी.

हमरी अटरीयां पे आयो सावरिया ,
देखा देखी बलम हुई जाये

अटरीयां म्हणजे साधारण बाल्कनीसारखी जागा. वर्हांडा म्हणूया. जिथे नायिका आई वडिलांच्या नजरेपासून लांब राहून आपल्या प्रियकराची वाट पहायची. तो काळोखाच्या काळ्या रंगात मिसळून तिच्याशी संवाद साधायचा किंवा अगदीच गबरू असेल तर दोरी किंवा पाइप कशाचा तरी आधार घेवून तिच्यापर्यंत पोचायचा.
ह्या गीताची मोहिनी एवढी होती की हे गीत इश्क देढीया मध्ये गुलझारजीनेही वापरले आहे . आजच्या काळात मात्र ही मर्यादा देखादेखी वरून जोराजोरी वर पोचली आहे.
बाई गातात,

तसव्वुर में चले आते हो
कुछ बातें भी होती हैं
शब-ए-फुरक़त भी होती हैं
मुलाकातें भी होती हैं
तू माझ्या कल्पनेत असतोस, आपण खूप गप्पा मारतो आणि मग ताटातूट करणारी रात्र येते.

त्यांच्या मैफिलीचे दिवाने अनेक. त्यात होते येथील प्रसिद्ध वकील इश्तियाक अब्बासी.
पैसे, प्रतिष्ठा एका बाजूला पण स्त्रिया गुंततात त्या आपल्या घरकुलात . स्वतःचा संसार, मूल यांची आवड बायकांच्या आत खोलवर रुजलेली असते.बाई अपवाद नव्हत्या. असेच कुणाशीतरी बोलताना अब्बासीने हे ऐकले आणि कुतूहलाने त्यांना विचारले,
“हे सारे सोडून तुम्ही एक सामान्य जीवन जगाल का ?” 
“ का नाही ? आता तर मी निश्चय केला आहे की लग्न करेन तर तुमच्याशीच” 
अब्बासीच्या प्रश्नाला होकाराचे उत्तर देतानाच, अख्तरीने त्यांच्याशी लग्न करण्याचा निश्चय पक्का केला.
ठुमरीतील ह्या ओळी  बघा.

प्रेम की भिक्षा माँगे भिखारन
लाज हमारी रखियो साजन
आओ सजन तुम हमरे द्वारे
सारा झगड़ा ख़तम हुई जाए.

अख्तरीच्या गाण्याचे वेड लागलेल्या अब्बासीना , लग्नाचा विचार मात्र मान्य होत नव्हता. त्यांचे घराणे प्रतिष्टीत.या घराण्यात एका गायिकेला स्थान मिळणे, त्या काळाचा विचार केला तर कठीण  होते.पण अख्तरी आपल्या निर्णयावर ठाम होती. .
प्रेमात पडताना माणसे विचार करत नाहीत.
कुणीतरी, हासभास नसताना दिसते, डोळ्यात भरते मग मनात जागा करते आणि नंतर स्वतःचे असे काहीही उरत नाही.
अब्बासी यांच्या साठी अख्तरी गाण्याचा, तिच्या सर्वस्वाचा त्याग करायला तयार होती.

तुम बिन लिया जोगिया भेस 
तज दिया संसार देस  
मधुर मधुर तोरे बैन 
बिरहन के हरे सो चैन 

भर भर आवत हैं नैन 
कूक उठत बार बार
कोयलिया मत करे पुकार
कलेजवाँ लागे कट्यार

इथे तर कोकिळा स्वतःचे सूरही मिटवायला तयार होती. ह्या प्रेमाचा मोह टाळणे अब्बासी यांना जमले नाही.घरच्यांचा विरोध मोडीत काढून त्यांनी बाईंशी लग्न केले. अब्बासी साहेब हे वकील होते. लंडनहून  बॅरिस्टर होऊन आले होते.
त्यांच्याशी लग्न करून त्या बेगम अख्तर झाल्या.
ह्या जीवनात बाई रमल्या.स्वतःला बाजूला सारून , त्यांनी  नवीन आयुष्याशी जुळवून घेतले. सुरांच्या या मल्लिकेला ही  उणीव भासली असणारच, त्यात त्यांचा गर्भपात झाला. मनातून झुरू लागले की कोणतेच सुख अंगाला लागत नाही.
सूर आणि गाता गळा यांचे नाते वरतूनच जुळून येते, ते असे तुटता तुटत नाही. कदाचित ते सुरच म्हणत असावेत ,

मेरे हमनफ़स, मेरे हमनवा,
मुझे दोस्त बन के दग़ा न दे
मैं हूँ दर्द-ए-इश्क़ से जाँ-ब-लब,
मुझे ज़िंदगी की दुआ न दे

गाणे की संसार या रस्सीखेचीत त्यांची तब्येत झपाट्याने खालावू लागली. डॉक्टरांनी अब्बासी यांना सांगितले, पत्नीचे जीवन हवे असेल  तर  तिला गायला परवानगी द्या. गाणे हेच तिचे जीवन आहे.
अब्बासी यांनी परवानगी दिली आणि बेगम अख्तर यांचा पुनर्जन्मच झाला.
इंग्रजी मध्ये म्हणतात न
To recognize the divine in another person , is love and to be loved this way is like coming home , finding one’s authentic self and discovering that one is not alone .
बाईंचा थांबलेला सांगीतिक प्रवास परत सुरु झाला.

कभी तक़्दीर का मातम कभी दुनिया का गिला
मंज़िल-ए-इश्क़ में हर गम पे रोना आया

नशिबाचे फासे संगीताच्या बाजूने पडले खरे पण एक वाट बंद झाली. प्रेमाचा रस्ता तसा खडकर . आपल्या मंजिल कडे जाताना काय आणि किती गमवावे लागते त्याची जाणीव झाली तरी मागे वळण्यात अर्थ नसतो. अश्रूच्या सिंचनानेच वाट उजळावी लागते.
” ऐ मोहब्ब्बत तेरे अंजाम पे रोना आया ” ही त्यांची प्रसिद्ध गझल . प्रेमाचा शेवटचा टप्पा या गाण्यात आहे .
मला आवडते ती आधीची पायरी. प्रेम ओळखायची पायरी.
या पायरीनंतर प्रेमाचा शोध घेवूच नये . तिथेच  ठिय्या मारावा तर बाईंच्या चिरतरुण स्वरांसारखेच प्रेमही अमर  होते.

बेगम अख्तर यांनी गज़लला प्रतिष्ठा दिली. त्यांच्या शास्त्रोक्त गायकीने गजल चे रूपच बदलले. गज़ल गाताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या स्वररचना आणि सरगम यांचा वापर केला. दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे, त्या वेळच्या उत्कृष्ट गज़लकारांच्या गज़ल त्यांनी आपल्या गायकीने सामान्य रसिकांपर्यंत पोचवल्या.
बाईच्या आयुष्याचा प्रवास खडतर होता. एकटेपणा, बालपणात वाट्याला आलेली असुरक्षितता, भय आणि वेदना त्यांच्या स्वरांत सुद्धा उतरली असावी. “ तुमसे मिलकर हमें रोना था किंवा वो जो हम में तुम में करार था “ हे गाणी ऐकून ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही असा रसिक नाही.
ऑक्टोबर १९७४ मध्ये मैफिलीत गातानाच स्वरांची मल्लिका बेगम अख्तर यांचे हृदय विकाराने निधन झाले. जमुना के तीर ही त्यांनी म्हंटलेली शेवटची भैरवी.
७ ऑक्टोबर हा बेगम अख्तर यांचा जन्मदिवस.  आज  त्यांचा १११वा  वाढदिवस.



19 thoughts on “कलेजवाँ लागे कट्यार: बेगम अख्तर”

  1. भारीच ।डोळ्यात पाणी आले वाचून ।कलाकाराच्या नशिबी भोग असायचेच

    1. खरे Yogini. काही माणसे शापित असतात …भोग भोगायला येतात पण सुख देऊन जातात

  2. प्रिया,

    कमाल करतेस तू.
    ❤️❤️❤️❤️❤️
    पूर्वी तू गझल घेऊन एक दीर्घ कथा लिहिली होतीस.
    त्यामुळे मी अख्तरी बाईंच्या गझला खूप ऐकल्या.
    बसवल्या पण..

  3. बेगम अख्तर गझल, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ७ ऑक्टोबर जन्मदिवस व सुंदर लेख

  4. बेगम अख्तर संगीत विश्वाला पडलेलं एक सुंदर पण अल्पजीवी स्वप्न !
    गझलेतील दर्द अनुभवावा तो बाईंच्या आवाजातूननच!
    अतिशय खडतर प्रवास आयुष्याचा पण त्यांच्या आतील कलाकाराने कायमच बाहेर पडण्याची तडफड केलीय. किती म्हणून यातना, मनस्ताप सहन केला असेल!
    जळगाव आकाशवाणी केंद्रात ग्रामोफोनच्या तबकडीतून बेगम अख्तर ऐकून कान नेहमीच तृप्त झाले आहेत. हा लेख एक पर्वणीच!
    काय सुंदर लिहिलंय दी!
    जियो ❤️❤️❤️

    1. खरे आहे Kamini. काही माणसे शापित असतात …भोग भोगायला येतात पण सुख देऊन जातात

  5. अप्रतिम लेख.
    करपलेलं बालपण, लुटल्या गेलेलं तारुण्य, शापित सौंदर्य, हरवलेलं मात मातृत्व…
    अशा चोहो बाजूंनी पोळलेल्या अख्तरीबाईचा दैवी आवाज म्हणजे त्रिलोकाला अस्वस्थ करणारा वेदनेचा हुंकार.
    छान शब्दबद्ध केलंय तुम्ही.💐

  6. अप्रतिम लेख.
    करपलेलं बालपण, लुटल्या गेलेलं तारुण्य, शापित सौंदर्य, हरवलेलं मातृत्व…
    अशा चोहो बाजूंनी पोळलेल्या अख्तरीबाईचा दैवी आवाज म्हणजे त्रिलोकाला अस्वस्थ करणारा वेदनेचा हुंकार.
    छान शब्दबद्ध केलंय तुम्ही.💐

    1. खरे आहे डॉक्टर… काही माणसे शापित असतात …भोग भोगायला येतात पण सुख देऊन जातात

  7. कलाकार मनस्वी असतात, आणि त्यांचे आयुष्य देखील असेच. आयुष्यातील भोग व दुःख हे भोगूनच संपवायचे असतात. संगीत व कलाकारांबद्दल तर नेहमीच म्हणले जाते, की ही विद्या एकतर अमीराची आहे, किंवा फकीराची. कमालीचे गायक व जाणकार असलेल्यांची हलाखीची परिस्थिती ऐकली आहे, व पाहिली आहे.

    आपला लेख सुंदरच आहे.

    1. Thank you Bhokarikar sir.
      त्यांचा शेवट हलाखीत नव्हता म्हणजे पैशाने नाही पण एकटेपणा नशिबी आला . त्यात मृत्यू झाल्यावर साधी ऍम्ब्युलन्स मिळाली नाही ..टॅक्सीच्या टपावर टाकून आणले गेले ..मृत्यूदेहाची एवढी विटंबना का असे वाटते.

Leave a Reply to Yogini Patil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *