Skip to content

रिबेका 

“Our marriage is a success, isn’t it? A great success? We’re happy, aren’t we? Terribly happy?”
सिनेमा अर्ध्यावर आलेला असताना नायिका नायकाला हा प्रश्न विचारते . तो वळतो. त्याची पावले तिच्यापासून लांब सरकत जातात. तो खरेच तिच्यावर प्रेम करतो का हे लग्न फक्त सोय असते का यातही काही अंतस्थ हेतू असतो ? ह्याचा अंदाज त्याच्या चेहेऱ्यावरून लावता येत नाही.
आता तिचे काकुळतीला येणे, विनवणे पण तिचा  चेहेरा , तिची निराशा , तिची हतबलता स्पष्ट सांगतो.
“ तू आनंदी नाही आहेस मग ही बतावणी तरी कुणासाठी ? “
पण जाणारी पाऊले अजून पुढे सरकतात.
आता मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले आहे. निराशेच्या कड्यावर असताना सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत ती पुटपुटते.
“ मी जाईन तुझ्या आयुष्यातून पण निदान माझ्या प्रश्नाचे उत्तर तरी दे .” …. 
काही सेकंदाचाच  हा सीन आणि त्या काही सेकंदातच आपल्याला पाहायला मिळते  the most human, heartbreakingly vulnerable person ever to appear in a Hitchcock films .

हिचकॉक चा रिबेका हा सिनेमा दाफने दु मॉरीये ( Daphne du Maurie ) हिने लिहिलेल्या रिबेका या कादंबरीवर आधारित आहे. इतर गॉथिक साहित्याप्रमाणेच हे पुस्तक सुद्धा  गूढता , दहशत, हिंसा  आणि अद्भुत यांचे मिश्रण आहे. पूर्ण कथा घडते एका काल्पनिक प्रदेशातल्या, “ मंडर्ले “ येथील  हवेलीत . ही वास्तू नायकाला वारसाहक्काने मिळालेली आहे.
ही वास्तू त्याची ओळख आहे. त्याच्या सर्व व्यक्तिमत्वाला जी झळाळी दिलेली आहे, त्याच्यात या वास्तूचा सुद्धा हातभार लागला आहे. म्हणून या हवेलीत त्याचा प्राण गुंतलेला आहे. 

” Last night I dreamt I went to Manderley again ” या प्रसिद्ध स्वगताने सिनेमाची सुरुवात होते . नायिका स्वानुभव सांगते आहे. एक कटू, अमानवी अनूभव.
सिनेमाच्या सुरुवातीला दिसतात ते धुक्यात लपेटलेल्या हवेलीचे अवशेष.
वर्तमानातून कॅमेरा काही वर्ष पाठी जातो. आता पडद्यावर दिसते ते एक आलिशान रिसॉर्ट “मोंन्टे कार्लो”
एका तुटक्या कड्याच्या टोकावर, उभा असलेला आणि आपल्याच विचारात हरवलेला नायक, मॅक्झिम डी विंटर, (सर लॉरेन्स ऑलिव्हर). खाली समुद्राला उधाण आलेले आहे.  त्याचा पाय घसरेल की काय अशी भीती आपल्याला वाटते न वाटते तोच, कड्याच्या खालून एका सुंदर, निरागस युवतीचा आवाज येतो . “ प्लिज ..थांबा, पुढे जाऊ नका “
नायिका आणि नायकाची ही पहिली ओळख असते.
नायिका (जोन फॉन्टेन) ही एक मध्यम वर्गीय अनाथ मुलगी आहे.  ह्या सिनेमात तिला नाव नाही. तिला स्वतःची ओळख नाही. ती एका श्रीमंत, आढ्यतेखोर बाईकडे नोकरी करते. स्वत;बद्दल सूक्ष्मसा न्यूनगंड आहे तिला.  एकाकी मुलगी.  चित्रकलेची आवड आहे तिला पण कोणाला आकर्षून घेईल असे तिचे व्यक्तिमत्व नाही. मनाने प्रेमळ, थोडीशी भोळी . परिस्थितीने दबलेली. योगायोगानेच तिची ओळख बेचाळीस वर्षाच्या, विधुर असलेल्या, मॅक्झिम डी विंटरशी होते. दोघे प्रेमात पडतात. जे घडते ते अचानकच.
मॅक्झिम हा श्रीमंत आहे, उच्च कुळातील आहे आणि त्याला जगाचा भलाबुरा अनुभव ही आहे. थोडासा अबोल, गर्विष्ठ आणि तिरसट असे हे व्यक्तिमत्व. स्वतःला काय हवे याची त्याला जाणीव आहे.
त्याला नायिका पत्नी म्हणून हवी आहे पण त्याच्या मागणी घालण्यात सुद्धा विनंती नाही, आज्ञा आहे.
नायिकेच्या मालकीणीला अचानक न्यू यॉर्क ला जावे लागते. शेवटचा निरोप घ्यायला  जेव्हा नायिका, मॅक्झिमला भेटते, तेव्हा तिच्यापुढे दोन पर्याय ठेवले जातात ..एक तर न्यूयॉर्क किंवा त्याच्याबरोबर मंडर्ले. 
“ मला तुम्ही सेक्रेटरीची नोकरी देऊ करणार का”  या भोळसट प्रश्नावर त्याचे उत्तर आहे  “No, I’m asking you to marry me, you little fool”
अर्थात तिचा  होकार  त्याने गृहीत धरला आहे. 

मॅक्झिमची दुसरी पत्नी बनून, ती त्याच्या मंडर्ली येथील हवेलीत प्रवेश करते.
सिनेमाला आता वेग येतो.

हवेलीत प्रवेश करतानाच तिच्या लक्षात येते आपण इथे नकोसे आहोत. “रिबेका”, जी हवेलीची पहिली मालकीण असते,मॅक्झिमची पहिली पत्नी, तिचा एका  वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झालेला असतो. रिबेका अप्रतिम देखणी, हुशार आणि या कुटुंबाच्या तोलामोलाच्या घराण्यातून आलेली.  सुंदरता, बुद्धिमता आणि खानदान मॅक्झिमच्या तोडीस तोड. सर्व हवेलीवर, खोल्यांवर, फर्निचर वर असलेला तिचा ठसा आपण इथे उपरे आहोत याची नायिकेला सतत जाणीव करून देतो .
नोकरांच्या देहबोलीतून, नातेवाईकांच्या कुजबुजीतून आपल्या खुजेपणाची सतत होणारी जाणीव, तिला अजूनच निराशेच्या अंधारात ढकलते. रिबेकाच्या सर्व वस्तूंवर ‘RW’ ही आद्याक्षरे कोरली आहेत. तिची खोली अजूनही तिच्याच आठवणींसकट तिच्याच नावावर जपून ठेवली आहे.
ह्या घराची हाऊस कीपर आहे मिसेस डानवर्स. रिबेकावर तिचे मुलीसारखे प्रेम आहे. तिची जागा कुणी घ्यावी हे तिला सहनही होत नाही. ती स्पष्ट सांगते, 

” You thought you could be Mrs. de Winter, live in her house, walk in her steps, take the things that were hers! But she’s too strong for you. You can’t fight her – no one ever got the better of her. Never, never”
स्पष्ट शब्दात तुझी इथे राहायची लायकी नाही हे तिला जाणवून देते.
वर्ग भेद , वर्णभेद तेव्हाही होताच. नायिका ही मध्यम वर्गीय. उच्च कुलीन रीतिरिवाज तिला माहित नाहीत.
नोकरांना तिची कीव  येते आणि मिसेस डानवर्सला तिचा राग. 

मॅक्झिमच्या मनावर एक अनामिक दडपण आहे . कसलीतरी अपराधाची जाणीव. कदाचित आपल्या पहिल्या पत्नीच्या दुःखातून  तो बाहेर आला नसावा. त्याचे कामात डुंबून जाणे, पत्नीकडे दुर्लक्ष यामुळे तिचे एकाकीपण वाढत जाते.
लग्न वाचवण्यासाठी मिसेस डी  विंटर  हवेलीची सूत्रे हातात घेते. रिबेका आणि मॅक्झिम दर वर्षी पार्टी देत असतात, ती प्रथा रिबेकाच्या मृत्यूनंतर बंद पडलेली असते. मिसेस डी  विंटर ती सुरु करायची ठरवते. पार्टीची तारीख ठरते, आमंत्रणे जातात. दिवाणखाना शहरातल्या नामांकित लोकांच्या आगमनाने फुलून जातो.  या पार्टीला मिसेस डी  विंटरने घातलेला ड्रेस बघून मॅक्झिम संतापतो. रिबेकाच्या अंगावर मरताना सुद्धा अशाच प्रकाराचा पोशाख असतो.

यातून संबध अजूनच बिघडतात. आपल्याला हा पोशाख सुचवण्यात मिसेस डानवर्सचा वेगळा हेतू होता हे रिबेकाला समजते , तेव्हा मिसेस डानवर्स तिला मारायचा प्रयत्न करते.
याच वेळी अपघातानेच एका बोटीचा शोध लागतो,  त्यात रिबेकाचे प्रेत असते.
मग आधी जिचा मृत्यू झालेला असतो, ज्या प्रेताची ओळख रिबेका म्हणून तिच्या नवऱ्यानेच पटवलेली असते, ती स्त्री कोण असते?
एक वेगळेच धक्कादायक सत्य आता प्रेक्षकांच्या समोर येते .

रिबेका आणि मॅक्झिम यांचे लग्न म्हणजे समाजासाठी केलेला एक देखावा असतो. दोघांचे एकमेकांवर प्रेम नसते. रिबेकाचा एक प्रियकर असतो. ज्याच्याशी ती लग्नानंतर सुद्धा संबंध ठेवते. तिला त्याच्यापासून दिवस जातात.
ती मॅक्झिमला डिवचते.
“मला होणारे मूल जर मुलगा असेल, तर तू ज्यावर प्रचंड प्रेम करतोस, जी इस्टेस्ट तुझी ओळख आहे, त्याचा वारसदार हे मूल ठरेल. ते तुझे रक्त नसेल पण तुझ्या घराण्याचे  नाव मात्र लावेल . तुला काहीही करता येणार नाही”
आतापर्यंत रिबेकाचे सर्व चाळे, घराण्याच्या प्रतिष्ठेपायी सहन करणाऱ्या मॅक्झिमचा तोल जातो आणि संतापाच्या भरात त्याच्या हातून तिचा खून होतो. बेअब्रुच्या आणि पकडले जाण्याच्या भीतीने मॅक्झिम, रिबेकाचे मृत शरीर बोटीत ठेवून पळ काढतो. काही दिवसांनी समुद्र काठाला एका तरुणीचे मृत शरीर वाहून येते. ती रिबेका आहे असे सांगून मॅक्झिम तिचा अंत संस्कार पार पाडतो..
रिबेकाच्या प्रियकराकडे रिबेकाचे पत्र असते. त्याच्या माध्यमातून तो मॅक्झिमला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. आता मात्र रिबेका मॅक्झिमच्या बरोबरीने उभी राहते. पोलिसात तक्रार केल्यावर चौकशीला सुरुवात होते आणि लक्षात येते रिबेका गरोदर नसून कँसरग्रस्त होती.
त्यात तिचा अंत झाला हे समजल्याने ब्लॅकमेलच्या धमकीला अर्थ राहत नाही. तिच्या मृत्यूचे सत्य समजल्यावर, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी मिसेस डानवर्स, मंडर्ले पेटवून देते आणि त्यातच अडकून तिचा मृत्यू होतो. 
ह्या शेवटावर हा सिनेमा संपतो.
सिनेमा बघताना मनाला पडलेले काही प्रश्न :

भारतीय दंड संहितेचे (IPC) कलम ४९७, जे व्यभिचाराला गुन्हा मानत होते, ते सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये असंवैधानिक ठरवून रद्द केले आहे. यानुसार, आता व्यभिचार करणे हा गुन्हा नाही, कारण हे कलम पुरुष-स्त्री समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात होते आणि पत्नीला पतीच्या मालमत्तेचा भाग मानत होते.
या घटनेनंतर व्यभिचाराचे समर्थन जरी झाले नाही तरीही तो का होतो, वैवाहिक जीवनात सुखी असताना सुद्धा एखाद्याला उंबरठ्याबाहेर पपाऊल का टाकावे लागते याची चर्चा झाली.
या सिनेमात रिबेका व्यभिचारास प्रवृत्त का होते याचे उत्तर नाही. कदाचित तिची शारीरिक भूकच जास्त असेल, कदाचित नवरा तिचे समाधान करू शकत नसेल , कदाचित त्याच्या हेकट पणाचा सूड  असेल … काहीही कारण असू शकते. 
तिच्यासाठी तो गुन्हा नसेलही, पण पत्नीचे हे वर्तन उघड्या डोळ्याने बघणे, पचवणे हे त्याने का सहन करावे असाही प्रश्न येतो. तुमचे सुख , दुसऱ्यांच्या आत्मसन्मानाला बाधा ठरू नये. 
स्त्री पुरुष हे जीव शास्त्रीय दृष्ट्या दोन स्वतंत्र व्यक्ती विशेष आहेत .तथापि त्या दोहोंमध्ये निसर्गत:च विलक्षण आकर्षण असते . सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा विलक्षण प्रयोग विवाहाच्या रूपाने केला जातो . लग्न संस्था काही गरजांची पूर्तता करण्याकरता निर्माण झाली आहे. पण अनेकवेळा लग्न हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला जातो . घराण्याची नाचक्की सहन करण्याची ताकद  नसल्याने माणसे मानसिक कोंडमारा सहन करत जगतात.
रिबेका हा सिनेमा विवाहाची ही  काळी  बाजू सुद्धा दाखवतो.

जगात प्रेमाला खरंच स्थान आहे का ? रिबेका पाहताना  हा प्रश्न सतत मनाला कुरतडतो.
यातली पात्रे , ही कायम एक अंतस्थ हेतू बाळगून वावरतात . ह्याचा नायकच खलनायक . परिस्थितीने म्हणा किंवा आलेल्या कटू अनुभवाने, पोळला गेलेला आणि त्या आगीत दुसर्याला जाळणारा. याची नायिका , रिबेका , जी सिनेमात अदृश्य होऊन वावरते , ती सुद्धा शरीरांच्या जाणिवांना शरण गेलेली स्त्री. तिच्यापुढे , तिच्या गरजांपुढे , तिला कुणाचीही पर्वा नाही.
पूर्ण सिनेमात निरपेक्ष प्रेम करणारी एकच स्त्री आहे ती मिसेस  द विंटर नंबर दोन .

कदाचित एवढी चांगली व्यक्ती असू शकते का , ह्याची खात्री लेखिकेला नसावी “म्हणून तिला नाव नाही.” तिची स्वतःची अशी खास ओळख नाही,  रिबेका  या सिनेमात नावही नसलेल्या जोन फॉन्टेन ला पाहणे हा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव आहे.
जगात सर्वात रहस्यपूर्ण गोष्ट आहे ती मानवी मन. तिचा थांगपत्ता लागणे कठीण. रिबेका मध्ये  ही नात्यांची गुंतागुंत , अपमानास्पद हिंसक गुंतवणूक पाहायला मिळते.  त्यात सर्वच जण भरडून गेलेले . सत्तेसाठी जीवघेणा संघर्ष . प्रत्येक माणसाची दुसर्यावर असलेली पकड आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्याला संपवण्याची त्याची धडपड अस्वस्थ करते.
खरे प्रेम, मात्र जे शक्य नाही ते सुद्धा घडवून आणते. आपल्या नवऱ्याचे रिबेकावर प्रेम नाही , कधीच नव्हते हे सत्य मिसेस डी विंटर नंबर दोन ला, जेव्हा समजते , तेव्हा मात्र ती आपल्या नवऱ्यामागे उभी राहते. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यास, तयार होते. नवऱ्याला या आरोपातून सोडवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते. 
पुस्तकापेक्षा सिनेमाचा शेवट वेगळा आहे. गुन्हेगाराला न्यायालयात सोडविणे निर्मात्यांना योग्य वाटले नसावे. रिबेका गरोदर नसतेच, कॅन्सरने आजारी असते . त्यातच तिचा मृत्यू होतो . असे वळण इथे दिले आहे.
बॉलीवूड मध्ये कोहरा हा सिनेमा या चित्रपटावर आधारित आहे. मिसेस डी विंटर नंबर दोन ची भूमिका वहिदा रहमान हिने केलेली आहे तर डानवर्स ची भूमिका ललिता पवार हिने अप्रतिम निभावली आहे. 
विश्वजीतने सर लॉरेन्स ऑलिव्हरचा रोल केला आहे हा अपराध एवढ्यासाठी क्षम्य की ” ये नयन डरे डरे ” हे अप्रतिम गीत कोहरात आहे.


Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

4 thoughts on “रिबेका ”

  1. सुंदर लिहिलंय 💕
    लग्न मनोमिलनात परिवर्तित होऊन संसार सुखाचा व्हावा ही अपेक्षाच खरंतर विवाहसंस्था टिकवून ठेवण्यात महत्वाची बाब आहे.
    या सिनेमाने नेमके यावरच बोट ठेवले आहे. छुपा हेतू, हवे ते मिळविण्याचा हव्यास आणि प्रसंगी कृतघ्न मनोवृत्ती लग्न या सुंदर नातेसंबंधांची होळी करते.
    रिबेका म्हणजे प्रचंड आत्मकेंद्रित याऊलट मिसेस दी विंटर नंबर 2 समर्पण, एकनिष्ठता,जोडून ठेवणाऱ्या स्वभावाची !
    खूप खूप सुंदर लिहिलय.
    कोहरा बघितलाय आता हा बघणार

    1. Thank you Kamini,
      रिबेका मध्ये नायिकेला बघणे हा अनुभव आहे. शिवाय दिग्दर्शन
      त्या हवेलीची दृश्ये, पसरलेले धुके , त्यातून होणार आभास
      खरे का खोटे यात आपण सुद्धा अडकतो.

  2. Yahi wo jagah hai हे आशाचे सुंदर गाणे पण याच सिनेमात आहे

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *