Skip to content

बेला महका रे महका आधी रात को 

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची द्वंद्व गीते 

हिंदी चित्रपट संगीतासाठी सप्टेंबर महिन्याला  फार महत्व आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आशा भोसले यांचा वाढदिवस आहे तर याच्या शेवटाला लता मंगेशकर यांचा जन्म दिवस आहे. संगीत रसिकांसाठी ही दोन नावे किती महत्वाची आहेत हे सांगायची आवश्यकता नाही. ही अशी दोन रत्ने आहेत ज्यांची कर्तबगारी वादातीत आहेच, याही पेक्षा हिंदी चित्रपट संगीताचे नशीब उजळवण्याची कर्तबगारी त्यांच्या नावावर आहे.
प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात साठ पेक्षा जास्त वर्षे या दोघांनी आपले योगदान दिले. इतकेच नाही तर इंडस्ट्रीत वर्चस्व गाजवले. प्रेमगीते, भजने, विरहगीते, नृत्य गीते, क्लब सॉंग्स या सर्वच गान प्रकारात दोघींनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यावेळच्या गाजलेल्या सर्वच पुरुष गायकांबरोबर त्यांनी गायलेली गाणी गाजली.
लताचा आवाज एखाद्या अनाघ्रात तरुणीसारखा आहे. मनाला शांत करणारा स्वर तर आशाच्या आवाजात ऊर्जा आहे, चैतन्य आहे. Her voice has a dark , sensuous tone while Lata has a sweet, almost virginal voice. दोघांच्या आवाजाची रेंज अफाट आहे. एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात लीलया फिरणाऱ्या आवाजाची देणगी दोघांनाही आहे. शास्त्रोक्त संगीताचा पाया भक्कम आहे. त्यांचा सहा दशकातील प्रवास म्हणजे दैवदत्त प्रतिभा आणि त्या बरोबरच मेहेनत, चिकाटी आणि निष्ठा यांचा धडाच आहे.

या दोघांनाही एकत्र ऐकण्याची संधी मात्र रसिकांना फार कमी वेळा मिळाली. अर्थात त्यातून जे काही हाताला लागले आहे ते अत्यंत जादुई आणि असामान्य आहे.
एक गोष्ट आहे, लताला नेहेमीच नायिकेसाठी गायची संधी मिळाली तर तिच्या सखीला, किंवा दुय्यम नायिकेला आशाने आपला आवाज दिला.
सुरुवातीची काही वर्षे सोडली तर आशा भोसले यांच्या नावाला सुद्धा वलय असताना, कसलाही बाऊ न करता आशाने केवळ गाण्यातच भाग घेतला नाही तर मिळालेल्या संधीचे सोने केले. जी काही त्यांच्यात सुप्त स्पर्धा असेल नसेल , पण रसिकांना नेहेमीच उत्तम गाणे ऐकायला मिळाले आहे. 
हा लेख आहे तो त्यांनी गायलेल्या द्वंद्व गीतांचा.
१)  कोई आएगा आयेगा आयेगा, हमारे गाँव कोई आएगा
( सिनेमा -प्रोफेसर, संगीतकार -शंकर जयकिशन, गीतकार- हसरत जयपुरी)

आत्याच्या शिस्तीला कंटाळलेल्या त्या मुली आता अशा व्यक्तीच्या शोधात आहेत की कुणीतरी येईल आणि आपल्याला प्रेमपाशात जखडून या गावातून दूर घेऊन जाईल.जेव्हा असे कुणी येईल तेव्हा काय काय घडेल ! हृदय धडधडेल, झोप उडेल, शब्द हरवतील आणि त्याच्या नजरेला जेव्हा नजर भिडेल तेव्हा सारे जगच नशिले होऊन जाईल.

हाए रे जिसकी आँख ने हम पर,प्यार का जादू डाला
वो हमरी मीठी मीठी नींदे चुराएगा, हमरे गाँव कोई आएगा
हो कोई आएगा आएगा आएगा, हमरे गाँव कोई आएगा
प्यार की डोर से बाँध जाएगा
अर्थात आतापर्यंत तरी हे स्वप्नच आहे त्यामुळे तो खरंच स्वप्नातला राजकुमार असावा म्हणून त्या रामजीलाच त्या साकडे घालतात. 

दिन का सूरज रात का चंदा,राहो का उजियारा
होये होये हमरे नैन पे छाया,बिन देखा मतवारा
राम ही जाने कैसा होगा
सपना जिसका प्यारा

वसंत ऋतूच्या स्वागताचे हे गीत आहे. गावातल्या तरुण मुली  वसंताचेच स्वागत करत नाहीत तर आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचे स्वागत करत आहेत. खरे सांगायचे तर त्या गावच्या छोरी नाहीत. या गावातील श्रीमंत स्त्रीच्या आश्रयाला आलेल्या अनाथ मुली आहेत. या मुली त्या श्रीमंत स्त्रीच्या भावाच्या मुली पण अपघातात त्यांच्या पालकांचा  मृत्यू झाल्यामुळे त्यांना घेऊन येणे क्रमप्राप्त आहे. आतापर्यंतचे आयुष्य आईवडिलांच्या प्रेमात मजेत गेलेले असताना या कडक शिस्तीच्या आत्याबाईंकडे राहणे हा जाचच . तिचा डोळा चुकवून थोडीशी मजा करायला बाहेर पडलेले असताना गायलेले हे गीत. आता लता बाई आणि आशा ताईंच्या  सुरांची जादू अशी की खरेच त्या गावात एक तरुण, तोही शम्मी कपूर नोकरीच्या शोधात येत आहे. Here both Lata and Asha match voices with great energy and enthusiasm.

२) मनभावन के घर जाये गोरी
(सिनेमा-चोरी  चोरी, संगीतकार- शंकर जयकिशन, गीतकार- शैलेंद्र) 

लग्नघर म्हंटले की तयार होणारी वधू डोळ्यासमोर येते. मुलीच्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा प्रसंग आहे. एक नवीन ओळख घेऊन ती आतापर्यंत अनोळखी असणाऱ्या पण तिच्या हक्काच्या घरात जाणार असते.नवीन आयुष्याची ओढ तर असते पण आधीचे आयुष्य मागे राहणार त्याची खंत सुद्धा अस्वस्थ करते. एका बाजूला आवडीच्या व्यक्तीबरोबर संसार सुरु होण्याचा आनंद तर दुसरीकडे अपरिचित असणाऱ्या वातावरणाची चिंता अशा दुविधेत असलेल्या नववधूला धीर देण्यासाठी असतात त्या तिच्या सख्या, मैत्रिणी. तिच्या मनावरच्या दडपणाची त्यांनाही कल्पना असते त्यामुळे तिला खुलवण्याची जबाबदारी त्या स्वतःवर घेतात. हा तिच्यासाठी अत्यंत खास दिवस , त्यामुळे तिला सजवणे, नटवणे हे तर आलेच. ज्या काळात हा सिनेमा आलेला आहे , तेव्हा तर प्रोफेशनल ब्युटिशिअन नव्हत्याच . ही जबाबदारी तिच्या मैत्रिणींच्याच खांद्यावर आहे आणि त्या ती अगदी मन लावून पार पडत आहेत.
“चोरी चोरी” हा सिनेमा “ it happened one night “ चा रिमेक आहे. रोमन हॉलिडे वरून हा सिनेमा बेतला असे म्हणतात पण ते खरे नाही .
एका श्रीमंत माणसाची मुलगी आपल्या प्रियकराशी लग्न करायला पळून जाते आणि वाटेत एका रिपोर्टरच्या प्रेमात पडते. पुढे होणाऱ्या गैरसमजाने परत वडिलांकडे गेल्यावर आपल्या आधीच्या प्रियकराशी लग्न करायचे ठरवते. अर्थात मन आता भलतीकडेच गुंतलेले; त्यामुळे लग्नात सुद्धा ती आनंदाने भाग घेत नाही असे चित्रीकरणात दिसते.
तिच्या मैत्रिणीना मात्र याची कल्पना नाही. ..घर सोडून जाण्याच्या विचाराने तिचे डोळे भरून आले आहेत असे आपले त्यांना वाटल्याने हे नृत्य तिला रिझवण्यासाठी केलेले आहे.

मस्ती भरे सावन के झूले 
तुझको कसम है जो तू भूले 
अब के जब वापस आए गोरी गोद भरी ले आए गोरी, बंधी रहे .
सासरी गेल्यावर आपल्याला विसरू नको हे सांगताना , आता येशील तेव्हा गोड़ बातमी घेऊन ये हे सांगायला सुद्धा त्या विसरत नाहीत.
आताच्या जमान्यात हे हळवेपण कुठे हरवले हे शोधून सापडणार नाही. 
चोरी चोरी चे संगीत, कथा , अभिनय सगळेच जुळून आलेले होते. यातही दोन्ही गायिकांना समान जागा आहे.
सई आणि सुब्बुलक्ष्मी या तामिळनाडूच्या नर्तिका.या. अपलं चपलं ह्या गीतावर केलेलं नृत्य तुम्हांला आठवत असेलच ..
या गीतातही यांचेच नृत्य आहे.
लता आणि आशा ह्यांची जी द्वंद्व गीते आहेत ती उत्कृष्ट नृत्यगीते सुद्धा आहेत.
१९५० ते ६० मध्ये शंकर जयकिशन यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली यांची अत्यंत प्रसिद्ध डुएटस आहेत.
जबसे लागी तोसे नजरिया ( शिकार) , क्या हुआ ये मुझे क्या हुआ( जिस देश में गंगा बहती है), अजी चले आओ (आओ ) ही सगळीच गाणी द्रुत लयीत आहेत आणि नृत्ये गीते आहेत
यात एक मला अतिशय आवडते. 
३) कर गया रे , कर गया रे , कर गया मुझसे जादू
( सिनेमा-बसंत बहार, संगीतकार- शंकर जयकिशन, गीतकार -शैलेंद्र )

उदयोन्मुख गायक आणि नर्तकी यांच्या प्रेमाची ही कथा. ह्याचा अंत सुद्धा दुःखद आहे . बैजू बावरा च्या यशानंतर भारत भूषण कडे गायकाचे रोल चालून आले. त्यातलाच हाच एक मेलोड्रामा. सिनेमा तुफान चालला कारण याचे संगीत.
मन्नाडे, लता आणि रफी यांच्या वाट्याला बहुतेक सगळी गाणी आलेली असताना, आशाने लताबरोबरच्या या द्वंद्वगीतात कमाल केली आहे.
गैरसमजाने गोपाळ आणि गोपी एकमेकांपासून दूर जातात. आपल्या मनातील गोष्टी तर त्याला सांगायच्या आहेत पण तो ऐकायलाही तयार नाही अशावेळी नृत्य आणि सुरांचा आधार घेऊन गोपी ची मैत्रीण गाते,


कर गया रे कर गया रे
कर गया मुझ पे जादू सावरिया 
मैफिलीत अजून काही लोक आहेत. त्यांच्यासाठी आणि पैशासाठी गोपी गाते  असा समज करून घेऊन रागावून आलेल्या गोपालकडे बघत गोपीची मैत्रीण आशाच्या आवाजात गाते ,
“तुम जो कहो तो मैं नाम बता दूँ”
तुझ्या मनात ज्याची मूर्ती आहे त्याचे नाव सांगू का ? आशाच्या आवाजात आव्हान आहे, खट्याळपणा आहे आणि मैत्रिणीला आश्वस्त करणारा विश्वास आहे पण गोपीचे हृदय मात्र उध्वस्त झालेले आहे. अतीव दुःखात बुडलेला लताचा स्वर येतो,

पत्थर की मूरत के दर्शन करा दूँ,जिसके क़दमों पे सर गया
कर गया रे …
दोघींच्या आवाजात एवढ्या उत्कट भावना आहेत की अभिनेत्रींना अभिनय करण्याची गरज सुद्धा भासत नसेल.

४) सखी रे सून बोले पपीहा
(सिनेमा-मिस मेरी, संगीतकार -,हेमंत कुमार, गीतकार-राजेंद्र कृष्ण)


मिस मेरी हा विनोदी सिनेमा होता  आणि ट्रॅजेडी क्वीन म्हणून गाजलेल्या मीना कुमारीची सुद्धा यात हलकी फुलकी भूमिका होती. इथे शिष्या , गुरूच्या तोडीस तोड़ आहे.. खरेतर ही जुगलबंदी म्हणता येईल.

सखी री सुन बोले पपीहा उस पार,
बोलत ऐसी मीठी बोली छेड़े मन के तार
खमाज रागात बांधलेली ही चीज . 
लता गाण्याची सुरुवात करते . ही घरात चाललेली शिकवणी आहे त्यामुळे फार वाद्ये नाहीत. सुरुवातीचा आलाप झाल्यावर जेव्हा गाणे समे वर येते तेव्हा हलकेच तबल्याची थाप येते. नंतर सरगम आणि तानांची जुगलबंदी होत असताना सुद्धा वाद्ये हलकेच अस्तित्व दाखवून देतात . गाण्याची आणि सिनेतंत्राची संगीत दिग्दर्शकाला केवढी समज होती  ते यावरून दिसते .

५) ओ चाँद जहाँ वो जाये
(सिनेमा -शारदा , संगीतकार-सी रामचंद्र, गीतकार- राजेंद्र कृष्ण )
निरोप्या म्हणून साहित्यात अनेक वेळा चंद्राला जागा दिली आहे. या गीतात दोन विरहिणी आहेत आणि परदेशात जाणाऱ्या आपल्या प्रियकराला त्या चंद्राबरोबर निरोप पाठवत आहेत.
एक श्रीमंत घरातील मुलगी आणि एक अनाथ गरीब मुलगी.
त्यांच्या शब्दांत आणि त्या मागील भावनेत किती फरक आहे तो पहा .
मीनाकुमारी लताच्या आवाजात आपल्या प्रियकराला सांगते ,
वो राह अगर भूलें, तू राह दिखा देना,परदेस में राही को मंज़िल का पता देना
है पहला सफर उनका और देस है अंजाना, हर रात खबर लाना..

माझ्या प्रियकराचा हा पहिलाच परदेशातील प्रवास आहे. जर तो रस्ता चुकला तर त्याला योग्य दिशा दाखव. हा देश परका आहे , यांच्या रीती भाती वेगळ्या आहेत. तिच्या भावना ती व्यक्त करत नाही , ती फक्त आपल्या प्रियकराला सांभाळून परत आणण्याची विनंती करते.
दुसरी ( श्यामा ) , हिचे ही प्रेम आहेच पण त्याच्या काळजीपेक्षा त्याचा विरह तिला त्रास देतो आहे.
आपल्या प्रियकराला आपली मनाची स्थिती सांगून त्याला परत आण अशी ती विनंती करते.
ती आशाच्या आवाजात गाते,

ऐ चाँद कसम मेरी, कुछ और न तू कहना
कहना की मेरा तुम बिन, मुश्किल है यहाँ रहना
दर्द के मारे को अच्छा नहीं तड़पाना
हर रात खबर लाना…

दोन वेगळे निरोप, प्रेम करण्याच्या दोन वेगळ्या रीती , दोन नायिका , ज्यांना कल्पना नाही की त्यांचा प्रियकर एकच आहे. हंसध्वनीरागावर ही गीत आधारित आहे. शारदा ची थीम त्या काळाचा विचार केला तर फार वेगळी होती . नायकाचे जिच्यावर प्रेम असते , तिला काही कारणामुळे त्याच्या वडिलांशी लग्न करावं लागते. आपल्या प्रेयसीला , आपल्या आईच्या रूपात पाहून त्याला धक्का बसतो असे हे वेगळेच कथानक आहे.

६) जब जब तुम्हे भुलाया, तुम और याद आये”
( सिनेमा जहाँआरा, संगीतकार -मदन मोहन , गीतकार-राजेंद्र कृष्ण  )

हिंदी चित्रपटसृष्टीला मुघल सल्तनत बद्दल अतिशय आकर्षण आहे. शहाजहान आणि मुमताज बेगम यांना ताजमहालपेक्षा हिंदी चित्रपट सृष्टीने अमर केले असावे एवढे सिनेमा या प्रेमकथेवर बनलेले आहेत. सलीम आणि अनारकली ही सत्य नसलेली प्रेमकहाणी केवळ पडद्याने आणि संगीताने अमर केली आहे. यात इतिहासातील इतर महत्वाची पात्रे  थोडी मागे पडली असे वाटल्याने असेल, १९६४ मध्ये जहाँआरा सिनेमा प्रदर्शित झाला.
ऐतिहासिक नजरेतून पाहिले तर जहाँआरा ही अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असणारी , कर्तबगार , हुशार राजकन्या होती.
साहित्याची जाणकार, शायर, चित्रकार , अगदी ताजमहालाच्या घडणीत तिचा सहभाग होता असे मानले जाते. “मुमताजच्या मृत्यूनंतर तिचा राजकारणात सुद्धा दबदबा होता. “जहाँआरा” सिनेमा मात्र ऐतिहासिक नसून एक शायर आणि राजकन्या यांची प्रेमकहाणी म्हणून प्रदर्शित झाला.
थोराड माला सिन्हा आणि कारकिर्दीच्या शेवटाला असणारा भारत भूषण यांच्या निवडीने तर अपयशाचा मार्ग सुलभ झाला.
बॉक्स ऑफिसवर आपटल्याने एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांना फटका बसला पण यातील संगीत मात्र आजही लोकप्रिय आहे.
मिर्झा चंगेझी आणि जहाँआरा हे लहानपणापासून एकत्र वाढलेले असतात. तारुण्यात आल्यावर प्रेमात पडतात. अर्थात सल्तनतला स्पर्धा नको म्हणून राजकन्येचा विवाह करून दिला जात नाही , त्यात जहाँआरा आपल्या आईला वचन देते की ती शेवटपर्यंत आपल्या पित्याची काळजी घेईल.
हे प्रेम जरी यशस्वी झाले नाही तरीही मिर्झावर प्रेम करणारी एक कलावंतीण (मिनू मुमताज) आहे.
ज्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही हे प्रेम कधीही नष्ट होत नाही. हृदयाच्या एका कोपऱ्यात ते दडून राहते आणि जळत राहते.
जो आपल्यावर प्रेम करत नाही , त्याला हृदय देणे म्हणजे निवडुंगाला मिठी मारणे. जेवढी मिठी घट्ट तेवढीच जखम खोल.
कवी लोकांना याच प्रेमाने प्रेरणा दिली आहे.
मिनू मुमताज च्या वाट्याला या सिनेमात दोन अप्रतिम गाणी आलेली आहेत .
एक लता चे सोलो “वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है” आणि एक आशा बरोबर गायलेले

मुख्य  कलाकारासाठी लता गात असूनही या गीतात आशाने मात दिली आहे.
लताने गायलेली “ छाये रहे नजर में , ‘तेरी जुल्फके अंधेरे “ ह्या ओळींनंतर आशाने हीच ओळ काय नजाकतीने गायली आहे. 
आलाप आणि तयार सप्तकातील छोट्याश्या ताना आणि मुरक्या सुद्धा आशाच्या वाट्याला आल्या आहेत.
ती नर्तिकेसाठी गात आहे तर लता प्रेमिकेसाठी. अर्थात गाण्याचे वजन आशाने पेलले आहे.

हिंदी सिनेमाचा सांगीतिक इतिहास अतिशय वैभवशाली आहे. अनेक संगीतकार, गीतकार आणि गायक गायिकांचे त्यात प्रचंड योगदान आहे. मंगेशकर भगिनींचे नाव कधीही कुणालाही  पुसता येणार नाही एवढे संख्यात्मक आणि गुणात्मक त्यांचे  कर्तृत्व आहे.
त्या दोघांच्यात स्पर्धा आहे हे जगजाहीर आहे. त्याचे नवल का वाटावे  किंवा खटकावे हे मला कधीही  समजले नाही.
सर्वोत्तम हा ‘किताब एकासाठीच असतो आणि जेव्हा  माणसात प्रचंड गुणवत्त्ता  असते तेव्हा त्याला  त्या स्थानापर्यंत पोचायची ईर्ष्या असतेच. जिंकण्याची ईर्ष्या असणारे लोकच तिथे पोचतात.
कोणत्याही  क्षेत्रात पहा. जे पहिले येतात ते हुशार असतातच पण त्याहून जास्त स्पर्धात्मक असतात.
त्यांचे संवादात्मक असे एक अतिशय गोड़  गाणे आहे
७)ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये.
( सिनेमा-आये दिन बहार के, संगीतकार –लक्ष्मीकांत प्यारेलाल –गीतकार-आनंद बक्षी)
.
हे गीत सुद्धा मैत्रिणींचे पण इथे बरेच काही घडायचे आहे ..
हा संवाद खरेतर स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब.
“ ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये” हे गीत सुरु करते ती आशा.
यातल्या उत्कृष्ट ओळी (शब्द) तिच्या वाट्याला आल्या आहेत.
These lines reflect her outlook towards life. Her easy going, gleeful lust for life.  .तिच्या गाण्यात जगण्याची असोशी आहे, हवे ते मिळवण्याची जिद्द आहे,   Her life is an unashamed celebration of life, longing and love.
आशा —
ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये
हम लुट जाये, दिल खो जाये, बस आज कयामत हो जाये

प्रेमात, स्वतःचे काय होईल याची पर्वा करणारे, प्रेम करू शकत नाहीत. त्यासाठी जीवन उधळून द्यायची तयारी हवी आणि
हे सर्वाना जमत नाही. वाहत जाणे जसे DNA मध्ये असते तसे सावध राहणे सुद्धा उपजत असते.
लता म्हणते ,
लता , “है वक्त अभी तौबा कर लो,
है वक्त अभी तौबा कर लो,
अल्लाह मुसीबत हो जाये”

प्रेमाच्या रस्त्यावर चालतानाचे धोके दाखवताना लता सांगते, “तुम को मालूम नहीं शायद कितने बेदर्द सनम होंगे”
माणसाचा भरोसा कुणी द्यावा. प्रेमाच्या खेळात समोरचा माणूस अनेकवेळा निर्दयी असू शकतो.
आशाला हा धोका माहित आहेच. खेळात तर हार जीत असतेच पण  म्हणून काय कुणी खेळणे सोडते का!.
ती समजावते,
ये आपने सच फरमाया हैं, उल्फ़त में लाख सितम होंगे
हैं लाख सितम मंजूर हमें, बस एक इनायत हो जाये
लताने पन्नाशीतल्या दशकाच्या नायिकेला आवाज दिला. A pure and virginal heroine. तिचा आवाज सुद्धा  तसाच. पवित्र, निर्मल आणि दैवी. But shyness or modesty wasn’t a quality associated with heroines in the seventies ..
जो स्लॉट आशाने पटकावला. आयुष्य जसे आले तसे स्विकारून, त्यातला आनंद घेण्याची तिची वृत्ती तिच्या गाण्यात सुद्धा दिसते.
ह्या गीताचे शेवटचे कडवे हा फरक फार स्पष्ट दाखवते

लता –हर एक खता इस दुनिया की इस एक खता से बेहतर है
बाई जगात कोणतीही चूक कर पण प्रेमात पडू  नकोस. दुःख , वेदना , प्रतारणा , विरह या सर्वच भावना या शब्दाला लगडून येतात.
खरे आहे ते. शंभर वेळा विचार करावा आणि “स्वतःच्याच” प्रेमात पडावे ..
पण ह्या शहाणपणाला आशाचे उत्तर आहे ,
आशा –ये प्यार नहीं एक दर्द सही, ये दर्द दवां से बेहतर है
बस चैन हमें आ जाये जो बेचैन तबियत हो जाये
..माझे अत्यंत आवडीचे गीत आहे हे . 

१९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या दामन या सिनेमात लता आणि आशा यांचे पहिले द्वंद्वगीत रेकॉर्ड झाले. संगीतकार होते के दत्ता आणि गाणे होते “ ये रुंकी रुकी हवा ये , ये बुझे बुझे सितारे “
ह्या सुरेल प्रवासाचे शेवटचे स्टेशन होते उत्सव या सिनेमातील अत्यंत गाजलेले गीत
८) मन क्यों बहका रे बहका आधी रात को “

(सिनेमा -उत्सव, संगीतकार- लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार-वसंत देव)
शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक या नाटकावर आधारित उत्सव हा सिनेमा म्हणजे चारुदत्त आणि वसंतसेना यांची प्रेमकथा.
वसंतसेना ही गणिका आहे. त्या शहरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध नगरवधू. नगरवधू म्हणजे सामान्य वारांगना नाही. नगरवधू होणारी स्त्री अत्यंत कठीण स्पर्धेतून निवडली जात असे. त्यासाठी वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असणे आवश्यक असे. वसंतसेना ही कलानिपुण आणि अत्यंत सौन्दर्यशाली स्त्री होती.
तिच्या प्राप्तीची भल्या भल्या धनिकांना आकांक्षा होती. त्यासाठी कितीही पैसे मोजण्याची त्यांची तयारी होती. सर्वसामान्यांना म्हणूनच ती अप्राप्य होती . 
अशी ही स्त्री सामान्य, गरीब ब्राह्मणाच्या, चारुदत्तच्या  प्रेमात पडते. त्याला आपले सर्वस्व वाहते .
आपल्या प्रियकराला भेटायला आलेली असताना, तिची भेट अपघाताने त्याच्या पत्नीशी होते.
त्याची पत्नी नाराज होईल , आपल्याला दूषणे लावेल अशी अपेक्षा असताना अदिती मात्र वसंतसेनेचे स्वागत करते. तिच्याशी प्रेमाने वागते. आता याचे कारण वेगळेच असते.
वसंतसेनेच्या आगमनाने तिचे आयुष्य बदलले जाते. प्रेमाचा वसंत तिच्या आयुष्यात प्रवेश करतो. निरस झालेले त्यांचे संबंध परत एकदा रोमँटिक होतात. रात्री शृंगारिक होतात. त्यासाठी ती वसंतसेनेचे आभार मानते.
हे गाणे म्हणजे मनातील अनेक अतृप्त इच्छांची प्रश्नोत्तरे.
ह्या गीताच्या आधी एक प्रसंग घडलेला आहे.
दागिन्यांनी मढलेल्या वसंतसेनेला पाहून चारुदत्तचा लहान मुलगा गोंधळून जातो. “ ही सुद्धा तुझी आईच “ असे उत्तर अदितीने दिल्यावर सुद्धा त्याला ते खरे वाटत नाही. त्याची आई तर अत्यंत साध्या वस्त्रांत असते.
हे ऐकल्यावर वसंतसेना आपले दागदागिने अदितीला देते आणि तिची साधी वस्त्रे परिधान करते.
भूमिका बदलल्या जातात आणि एक अजरामर गीत जन्माला येते.

मन क्यो बहका रे बहका आधी रात को
बेला महका रे महका आधी रात को

आत दबलेल्या, वासना, अतृप्त इच्छा , मनातले आकर्षण, दबलेल्या लैंगिक भावना या  गोष्टी कुणाला सांगता येत नाहीत. स्वतःच्या आयुष्यातील अडचणी , त्रुटी, मनातील आनंद, दुःख,  वेदना ज्याला सांगू शकेल, अशा सखीची प्रत्येकाला गरज असते. स्त्रिया या गोष्टी , दुसऱ्या स्त्री कडेच मोकळेपणाने बोलू शकतात. हे काही गॉसिप नसते. सखी म्हणजे विश्वास आणि श्रद्धा याचे निधन असते.
वसंतसेना आणि अदिती यातील नाते हे सवतीचे नाही तर सखीचे आहे. दोन स्त्रिया एकाच पुरुषावर प्रेम करू शकतात का ? प्रश्न कठीण आहे .
उत्तर सोपे ,,
हक्क दाखवायचा नसेल तर त्याचा आनंद हेच तर दोघींचे सुख आहे.
या गाण्यात त्या दोघी आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाबद्दल मोकळेपणे बोलतात. रात्रीचे अनुभव सांगतात, शृंगाराच्या पद्धती एकमेकांना शिकवतात. This song is a musing about romance, seduction and sensuality. 
वसंतसेना अदितीला विचारते, अहं कदाचित तिलाही हा प्रश्न पडला आहे ,
मन क्यों बहका रे बहका ?
रात्रीच्या अंधारात माझे मन माझ्या प्रियाकडे का बरे ओढले जात आहे?

आशा तेवढ्या खट्याळपणे तिला हवे ते उत्तर देते ,
बेला महका रे महका आधी रात को
कारण मोगऱ्याच्या सुगंधाने रात्रीचे वातावरण भारले  गेले आहे.
अदिती आता मोकळी होते. लाजत लाजत ती विचारते,
झाँझर झमके सुन , झमके आधी रात को

रात्रीच्या वेळी माझ्या पैंजणाचा आवाज होतो. तुला ऐकू येतो का ? जर लोकांना ऐकू आला तर ते काय समजतील ?
अदिती , गरीब घरातील शालीन स्त्री आहे.  मोकळेपणी शृंगार करायचे तिला धाडस नाही. नवऱ्याबरोबर सुद्धा असताना तिच्या मनावर लज्जेचा पगडा आहे.
वसंतसेना सांगते, 
उसको टोको न रोको, रोको न टोको, टोको न रोको, आधी रात को
त्याची काळजी करण्याची तुला गरज नाही. तू त्याची पत्नी आहे . शारीरिक सुख हा तुझा हक्क आहे.
बोल्ड गाणे आहे हे. वाद्यांचा मेल या गीतात नाही . सारंगी , घुमट अशी मोजकीच वाद्ये आणि एकमेकांच्या सहवासात बोलके झालेले अनिवार आकर्षण.
लताचा प्रगल्भ आणि जाणता स्वर तर आशाचा काहीसा उत्सुक आणि निरागस स्वर ..
लता आणि आशा यांच्या सांगीतिक प्रवासाची सांगता, तेवढ्याच श्रवणीय मधुर गीताने झालेली आहे हा खरंच सुरेल योग आहे.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 

 





12 thoughts on “बेला महका रे महका आधी रात को ”

  1. प्रिया,

    गाण्यांची अप्रतिम निवड.

    तू छान च लिहितेस म्हणणं म्हणजे द्विरुक्ती.❤️❤️❤️❤️

  2. अप्रतिम लेख ।ओ चांद जहाँ वो जाये त्यातल्या फास्ट तांना मूळे फार आवडते

  3. तू कायम भावणारे चे लिहीतेस, हा वर्षाव अविरत देती रहा

  4. अनुराधा यादवाडकर

    अप्रतिम!
    खरंतर हा शब्द देखील अपुरा पडेल तुझ्या लिखाणासाठी..
    नेहमीच किती वेगवेगळ्या विषयांवर लिहित असतेस आणि तेही अतिशय अभ्यासु..
    लता आणि आशा दोघीही अतिशय जिव्हाळ्याचा विषय..कोणाला झुकतं माप द्यायचं हे ठरवता येत नाहीच तरीही मी किंचित का होईना आशाकडे झुकते..
    तिच्या आवाजात जास्त व्हरायटी जाणवते.
    विशेषतः क्लब साँग किंवा काही लावण्या..
    अर्थात हे माझे वैयक्तिक मत..

    ते जाऊदे..
    इथे तुझ्या लिखाणा विषयी..
    गाण्यांची निवड उत्तम..गाण्यातील भावना तू ज्या शब्दात मांडल्यास ते वाचताना कधीतरी सुटून गेलेल्या अर्थांची जाणीव झाली. मला जी गाणी आवडतात ती मी लीरीक्स शोधून वाचून काढते.
    उर्दू गीतांच्या बाबतीत तर एक एक शब्द शोधून अर्थ समजून मग गाणे समजून घ्यावे हा माझा मार्ग…
    तेच भोजपुरी किंवा अन्य भाषांच्या बाबतीत..कारण योग्य अर्थ समजला तरच भावना समजून येतात,म्हणून गीतांचे शब्द व्यवस्थित वाचून अर्थ समजून घेते.
    तरीही कधी कधी समाधान मिळत नाही.
    आत्ता तुझा लेख वाचताना विशेषतः बेला मेहेका विषयी वाचताना ते जास्त जाणवत गेले.
    कमाल लिहितेस तू प्रिया! आजच नाही नेहमीच!👌👌❣️❣️❣️❣️❣️

    1. थँक यु सो मच अनुराधा . मला एवढे छान वाटले हे वाचून.
      तू स्वतः एवढे सुंदर लिहितेस.
      मी लता भक्त पण आशाची रेंज अफाट आहे ..वेळोवेळी ती स्वतःच्यात बदल घडवले आहेत.
      तिचा प्रवास ..सांगीतिक आणि खाजगी ..
      दोन्ही मध्ये तिचा कस लागला असणार
      ..पण ती नावा प्रमाणेच आशावादी आहे

  5. फारच छान विश्लेषण पण एक गाण आणखी राहिले मेरे मेहेबुब मे क्या नही

    1. Thank you Kumud Kulkarni.
      हो ..खरेतर अप्रतिम गाणे आहे.
      पण मग आणि मोठा लेख झाला असतात . मी मैत्रिणी वर पोस्ट कारेन तेव्हा घालेन .

  6. Absolutely stunning observation of feeling , emotions along with different songs.Priya ji you are the only one who writes such an awesome article.Hats off to you. your this post provokes readers to watch those movies one more time and enjoy those incredible moments .I am impressed about this review.

Leave a Reply to Manju Manju Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *