Skip to content

झूम झूम ढलती रात: रात्रीची गीते.

लहानपणापासूनच रात्र आवडते.दिवस आपल्या वाट्याला आलेली कामे संपवून अस्ताला जातो. घरही निद्रेच्या कुशीत शिरते, मग जागा असतो तो लॅपटॉप, अस्ताव्यस्त विचारांना टिपून ठेवणारी वही आणि मी.
अस्पष्ट विचारांना या वेळेला जीभा फुटतात. कधी त्यांची भीती वाटते, तर कधी उगाच दाटून येते आणि मग रात्रीचा अंधार त्यांना सामावून घेतो. थोपटून निजवतो. 

बाहेरील जग तारकांच्या अंधुक प्रकाशात वेगळेच दिसते, अंधारात दडलेले असतानाही, आतल्या चक्षूंना स्पष्ट जाणवते. काहीसे गूढ ही भासते. 
रात्र, नेहेमीच दिवसापेक्षा तल्लख असते.
धुंदावलेली, गंधाळलेली रजनी, जागवलेली रतिया, रडवणारी रैना, घाबरवणारी रात, अंगाईगीत गाऊन निजवणारी रात्र. 
असंख्य भावनांचा गोफ गुंफत, अनेक गाण्यांना जन्म देणारी ही रात्र.
या रात्रीची ही गीते.

अंगाईगीत आणि रात्र यांचे नाते तर आई-मुलासारखेच जवळचे नाते. .
जन्माला येण्याआधी, नऊ महिन्याचा काळ बाळाने अंधारातच घालवलेला असतो. त्याला सोबत असते ती त्याच्या आईच्या आवाजाची. पोटावर हातात ठेवून पुढील भविष्याची स्वप्ने आई आणि मूल एकत्र पाहत असतात. जन्माला आल्यावर हे जग अगदीच परके वाटत नाही कारण त्याला जोडणारी नाळ, अंगाई-गीताची असते.
ह्या गीताची भाषा आणि चाल सहज, सोपी. आईच्या हाताचा स्पर्श आणि मधुर स्वर बाळाला शांत करतो. अंधाराने घाबरलेल्या त्याच्या  मनाला आश्वस्त करतो.
अलबेला या  सिनेमात सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम अंगाई आहे.
१)धीरे से आजा रे अखियन में
(सिनेमा -अलबेला, संगीतकार-सी रामचंद्र, गायिका -लता मंगेशकर)

तारों से छुप कर तारों से चोरी, तारों से चोरी
देती है रजनी चँदा को लोरी, चँदा को लोरी
हँसता है चँदा भी निन्दियन में
निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा

रात्र, चंद्राला अंगाईगीत गाऊन निजवते ही कल्पनाच किती सुंदर.
गीतात पऱ्या  आहेत, चांदोबा आहे, बाळाचे आवडीचे साथी सुद्धा आहेत. त्याच्या स्वप्नाचे सुंदर जग या गाण्यात वसतीला आले आहे. खरेतर सुरात सामर्थ्य असतेच मनाला भुरळ घालण्याचे पण अंगाईगीत या वैश्विक जगा पासून दूर स्वप्न नगरीत घेवून जाते.

बालपण संपते, तारुण्य येते आणि रात्रीचा अर्थ बदलतो. आपल्या माणसाच्या सहवासात किंवा त्याच्या आठवणीत आता रात्री जागवल्या जातात.  काल खूप दिवसांनी समुद्रावर फेरी मारली. नारळी बाग नेहेमीप्रमाणे तुडुंब भरलेली होती. मधल्या रस्त्याच्या कडेला मोठाले दिवे आहेत.  बाकड्यांवर बसलेल्या लोकांच्या चेहेऱ्यावर त्याचा प्रकाश पडला होता. चेहेरा लपवण्याची ज्यांची गरज होती ते अंधाराच्या दिशेने तोंड करून बसले होते. मांजर कशी डोळे मिटून दूध पिते तसेच मनाचे समाधान करून घेत असावे.
बाजूच्या गर्दीचे त्यांना भान नव्हते असे नाही; पर्वा नव्हती. अवघडल्यासारखे नाही होत. आता डोळ्यांनाही सवय झाली आहे पण ओरबाडून घेणाऱ्या या पिढीला निसटत्या स्पर्शाचे सुख कधीच कळणार नाही याची खंत मात्र वाटते.
२) चांदनी रात में इक बार तुझे देखा है
(सिनेमा- दिल ए नादान, संगीतकार- खय्याम, गायक-  किशोर कुमार, लता मंगेशकर)

हातात हात सुद्धा न घेता, संध्याकाळच्या सोनेरी रंगात न्हात, सरकत्या वाळूत कधी चालला आहात?  हळूहळू तळपणारा सूर्य शांत होत, पश्चिमेकडे कलतो आणि निकटतेच्या केवळ कल्पनेनेच सायंकाळ लाजून लालभडक होते.

खुलके बिखरते जो महकते गेसूं
घुले गयी जैसे हवा में खुशबू
मेरी हरी सांस महकते हुए
ख़ुद पे इतराते हुए, ख़ुद से शर्माते हुए
चांदनी रात में एक बार तुझे देखा है

आकाशाचा रंग अजून गढद होऊ लागतो. नंतर उदयाला येते ते सावल्यांचे जग.जिथे स्वप्न व सत्य एकमेकांना कवेत घेतात.
चांदण्या रात्री एका प्रेमकहाणीचा जन्म होतो. 
“दिल ए नादान” ही एक फसलेली, अतर्क्य योगायोगाने भरलेली प्रेम कहाणी होती.अर्थात सिनेमा फ्लॉप होता राजेश खन्नाच्या पडत्या काळातील हा सिनेमा .
खय्याम यांचे संगीत सुद्धा त्याला तारू शकले नाही.

दिवसाच्या रखरखीत प्रकाशात निसटलेल्या अनेक गोष्टी रात्री सहज जाणवतात. नजर क्षीण होते पण स्पर्शाच्या संवेदना तीव्र होतात. पहारा देणारे जग जेव्हा झोपी जाते, तेव्हा काहीही शक्य होते. रात्रीच्या अंधारात मनाचा आवाज ऐकणे सोपे होते.
३)ये रात ये चांदनी फिर कहाँ
(सिनेमा-जाल, संगीतकार- एस डी बर्मन, गायक -हेमंत कुमार)

जाल या सिनेमातील, हेमंत कुमार यांनी गायलेले हे गीत. नायक, नायिका आणि घोंगावून येणारे वादळ. लाटांचे तांडव फक्त बाहेर नाही तर मनात ही आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा असतो का  मनाचा तोल जाणे हा तोटा असतो?
उंबरठ्याची मर्यादा ओलांडायला  तिला भाग पाडतोय हा जीवघेणा मोह. जोरदार वारा फक्त नारळाच्या झावळ्याच विसकटत नाही तर तिच्या मनाची घडी ही विसकटतोय.
हे पाऊल चुकीचे आहे हे तिला माहित आहे पण रात्र खुळावते. 
त्याचा एक, एक शब्द, एक, एक स्वर तिच्या मनातल्या दबलेल्या इच्छांना आव्हान देतो आहे. न आवरणारे आदिम आकर्षण आणि तीचा पाय रोखणारी सद्विवेकबुद्धी यातले द्वंद्व हे. गाण्याची एकही ओळ वाट्याला न येऊनही गीताचा खरा अर्थ गीता बालीच्या चेहेऱ्याने काय सुंदर दाखवला आहे!
इस हसीन आग में तू भी जल के देख ले
जिंदगी के गीत की धून तू बदलके देख ले

त्याच्या हृदयाची धडकन, एक एक ठोका तिची आर्जवे करत असताना थांबेल ती ?
इव्ह तरी कुठे थांबली होती ?
साहिर चे शब्द, हेमंत कुमार यांचा हॉन्टिंग आवाज, आर्जवी देव आनंद  आणि गोव्याचा निसर्ग . पाय घसरायला एवढी निमित्ते पुरेशी असतात.

रात्रीने घातलेल्या चकव्याचे अजून एक गीत “ एन इव्हिनिंग इन पॅरिस” या सिनेमात आहे.
४)रात के हमसफ़र, थक के घर को चले
(सिनेमा- एन इव्हिनिंग इन पॅरिस, संगीतकार-शंकर जयकिशन , गायक -आशा भोसले, मोहम्मद रफी)

रात के हमसफ़र, थक के घर को चले
झूमती आ रही है सुबह प्यार की

अर्नेस्ट हेमिंग्वेने म्हंटले आहे, जर तुमचे तारुण्य पॅरिस या शहरात गेले असेल, तर पुढील आयुष्यात तुम्ही कुठेही जा, हे शहर तुमची सोबत करते.
जगातील सर्वात सुंदर शहर, निर्मनुष्य रस्ते, त्या एकांताचा भंग न करणारी, हलक्या पावलांनी येणारी रात्र आणि त्यात एकमेकांची ओळख नव्याने करून घेणारे दोन जीव.

क्या वादे हुए , किस ने खाई कसम 
इस नई राह पर , हम ने रखे कदम
छूप सका प्यार कब , हम छूपाये तो क्या ? 
सब समझ पा रही है , ये सुबह प्यार की

या अनोख्या वाटेवरचे हे पहिले पाऊल , आज तरी शपथा आणि वचनांना जागा नाही.  प्रेमाला जाणून घेण्यासाठी तर आलेलो आहोत मग लपवायची तरी काय गरज ? आणि शब्द ओठातून आले नाही तरीही प्रेम लपले जाऊ शकते का ?  रात्रीच्या गर्भातून जन्म घेणारी उद्याची पहाट या दोन जीवांना एकत्र आणणार आहे.
शंकर जयकिशन यांचे संगीत आणि आशाताई आणि रफीजींचा आवाज असलेले हे गीत अतिशय मधुर आहे. याचे चित्रीकरण सुद्धा देखणे.
रात्रीच्या अंधारात, ताऱ्यांच्या प्रकाशात, हातात हात घालून फिरणारे दोन प्रेमी. रात्र अशी भुरळ पाडते.

रात्रीचा अंधार प्रेमिकांना वरदानच. सर्वांची नजर चुकवून, काळोखात स्वतःला लपेटून, एकमेकांना भेटायचा त्यांचा हा लाडका प्रहर.
प्रत्येकाला मात्र  वेळ पाळता येतेच असे नाही.
वाट पाहण्यासाठी लागणारा संयम खरंच परीक्षा पाहतो.
वाट पाहणे ही जोखीम आहे. त्याची फल निष्पत्ती तुमच्या मनासारखीच असेल असे सांगता येत नाही. वाट पाहणे हा तुमचा निर्णय असतो. ती तुमच्या सहनशक्तीची परिसीमा असते . ती तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची कसोटी असते.
अनेकवेळा आयुष्य म्हणजे दोन भिन्न व्यक्तींची गाठ असते, एक वाट पाहणारी आणि एक वाट पाहायला लावणारी
५)सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे
( सिनेमा -दुलारी, संगीतकार- नौशाद, गायक -मोहम्मद रफी)

तड़प रहे हैं हम यहाँ, तुम्हारे इंतज़ार में
खिजां का रंग, आ-चला है, मौसम-ए-बहार में
हवा भी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे
सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे

नायक,नायिकेचा शत्रू आहे त्यांच्या परिस्थितीतील अंतर. तो एका श्रीमान घराण्यातील मुलगा आणि ती आहे जिप्सी . त्याच्या वडिलांच्या सर्व आकांक्षा केवळ तिच्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत.नायिकेच्या घरच्या लोकांनाही हा रिश्ता मान्य नाही पण प्रेमात पडलेल्या त्या दोघांना त्याची पर्वा नाही.पहिल्या नजरेतच तो तिच्या सौन्दर्याने घायाळ झाला आहे आणि आज तर ती त्याला भेटणार आहे.
भेटीची वेळ तर केव्हाच टळून गेली आहे.रात्रीच्या चांदण्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. जळणारे दिवे ही हळूहळू शांत व्हायला सुरुवात झाली आहे आणि तरीही तिचा पत्ता नाही.
ती दिलेले वचन मात्र  मोडणार नाही, ती येणार याची मनात खात्री आहेच,विश्वास आहे आणि त्यामुळे ती न आल्याची काळजी सुद्धा.
दुलारी या सिनेमातील हे अप्रतिम गीत रफीजींनी गायले आहे.

हॉरर सिनेमात, कथा, कॅमेरा, अभिनय या बरोबर रात्रीच्या गीतांनी सुद्धा वातावरण निर्मितीला हातभार लावला आहे. रात्रीचा काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधाराला भेदून जाणारा लता बाईंचा स्वर्गीय आवाज. भुते सुद्धा बाईंचा प्लेबॅक घेतात म्हणजे बघा. बाईंचा आवाज या दुनियेतला नाहीच.
६)झूम झूम ढलती रात
( सिनेमा-कोहरा, संगीतकार-हेमंत कुमार, गायिका -लता मंगेशकर)

जिसको कोई समझेना, बात न वो दोहरा,
मेरा तेरा जीवन क्या, छाया हुआ कोहरा
किसने सुनी कभी दिल की बात,
झूम झूम ढलती रात

कोहरा या सिनेमातील हे गीत. या सिनेमात महत्वाचा रोल आहे तो संशयाच्या धुक्याला.
प्रत्येकाच्या मनात एक अढी आहे, शंका आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक संशयास्पद भूतकाळ आहे. संशयाचा पडदा, प्रत्येक व्यक्तीचे जीवन उध्वस्त व्हायला कारणीभूत ठरत आहे.
अज्ञानाच्या धुक्यात गुरफटलेली ही रात्र,  स्वतः बरोबर  बऱ्याच जणांना घेऊन संपणार आहे.
रिबेका या इंग्रजी सिनेमावर बेतलेल्या कोहरा या  सिनेमात हे गीत ही  एका पात्राची भूमिका बजावते.

रात्रीची नशा चढते आणि नशेची तृप्ती होत नाही. अनारकली एका रात्रीचे जे दान अकबराकडे मागते त्याचे मला नवल वाटते.एका रात्रीच्या बदल्यात जन्माची अतृप्ती घेवून जगणे यासारखे दिव्य नाही.
तरीही पुढील गीतात, एका रात्रीचा सहवास आणि त्या नंतरची कासावीस सुंदर रंगवली आहे.
सम्राट  अशोकाच्या जीवनावर आधारभूत असलेल्या “अशोका” या सिनेमात अशोकाची प्रेयसी हे गीत गाते.
७)रात का नशा अभी, आँख से गया नही
(सिनेमा- अशोक, संगीतकार- अन्नू मलिक, गायिका- चित्रा )

रात का नशा अभी, आँख से गया नही
तेरा नशीला बदन, बाहों ने छोड़ा नही
आँखें तो खोली मगर, सपना वो तोड़ा नही
हाँ वोही, वो वोही
साँसों पे रखा हुआ तेरे होठो का
सपना अभी है वही

अजूनही रात्रीचे लुकलुकणारे तारे विझले नाहीत तर माझ्या डोळ्यातील स्वप्ने कशी विझतील ? तिचा, तिलाच पडलेला प्रश्न.
ते स्वप्न तर त्याच्याच ओठांनी तिच्या श्वासाला सांगितले आहे . अजूनही त्याच्या बाहूंचा विळखा तिच्या शरीराला जखडून ठेवत असताना त्याचा विसर तिला पडूच कसा शकतो ?

तेरे गले मिलने के, मौसम बड़े होते हैं
जनमों का वादा कोई, ये गम बड़े छोटे हैं
लंबी सी इक रात हो, लंबा सा इक दिन मिले
बस इतना सा जीना हो, मिलन की घड़ी जब मिले

विरहाच्या धगीत होरपळताना ती समजावण्याचा प्रयत्न करते मनाला , एका नव्या स्वप्नाला जन्म देवून . मनाला समजावते की हे वेगळे होणे फक्त काही क्षणापुरते आहे . त्याचे वैषम्य तिला नाही. तिला माहित आहे की नंतरच्या प्रत्येक जीवनावर त्याचे नाव लिहिले आहे.
या जन्मात मात्र तिची एकाच छोटीशी इच्छा आहे की एक दिवस एक रात्र जी तिच्या वाट्याला आली आहे त्याचे प्रहर फक्त जास्त असावेत. एकाच रात्रीची तर ही इच्छा आहे.

काळोखाचे साम्राज्य सुरु झाले की घरे निद्रादेवीच्या कुशीत शिरतात पण शहरातीलच एका बदनाम वस्तीला जाग येते. दिव्यांनी शामियाना  उजळतो, गालिचे अंथरले जातात,  वाद्ये लावली जातात, अत्तराचा फाया लावून, हाताला गजरा बांधून रसिक माडीची पायरी चढतात.
रात्र मुजऱ्याच्या सुरांवर जागवली जाते.
“मुझे जीने दो” मधली चमेलीजान ही भूमिका वहीदाच्या सोज्वळ प्रतिमेला एक आव्हान होते. व्यावसायिक नर्तिका, धंद्याच्या सर्व खूब्या माहित असलेली तवायफ.

८)रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है  कुछ मध्यम मध्यम
(सिनेमा- मुझे जिने दो, संगीतकार-जयदेव, गायिका-लता मंगेशकर)


तुम आओ तो आंखे खोले, सोयी हुई पायल की छम छम

एवढी गोड तक्रार आहे ही! तुझी वाट पाहून रात्र सुद्धा आळसावलेली आहे. विरहाने डोळेही शिणले आहेत. चंद्र अस्ताला चालला आहे पण जर तू येशील तर सैलावलेल्या  पावलांना सुद्धा तुझी चाहूल लागेल.
छम छम … पैजणांच्या किणकीणीचा एवढा सुंदर उपयोग केला आहे या गीतात!
मुझे जीने दो या सिनेमात डाकूंच्या आयुष्याचे वास्तववादी चित्रण होते. त्यांचे गुन्हे आणि त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष. कोरडवाहू जमिनीत जन्म घेऊन कठोर झालेली माणसे. यातला नायक जर्नेल सिंग हा खुनी आहे. त्याच्या जगण्याचा तो व्यवसायच नाही तर अविभाज्य भाग आहे. त्याचे प्रेम सुद्धा तसेच. जे हवे ते हिसकावून घेण्याची वृत्ती असलेला जर्नेल चमेलीला पाहतो, फिदा होतो आणि तिला पळवून आणतो. ती सुद्धा काही निरागस बालिका नाही. या धंद्यातल्या साऱ्या गोष्टी तिला माहित आहेत. पुरुषांना रिझवणे हे तिचे काम आहे आणि त्यांच्या नजरेतील वासनांचा उपयोग करून  त्यांचा खिसा रिकामा करायचा यातही ती मुरलेली आहे.

होश में थोड़ी बेहोशी है
बेहोशी में होश है कम कम
तुझको पाने की कोशिश में
दोनों जहाँ से खो गए हम
छम-छम, छम-छम, छम-छम, छम-छम, रात …
गाण्यात सुद्धा अशी व्यक्तिमत्वे उतरून येतात . साहिर च्या लेखणीचा तो प्रभाव आहे.

येणारी रात्र जाऊन आपण उद्याचा दिवस पाहणार आहोत ही खात्री असतेच, म्हणून तर शांत झोप येते पण कधी हॉस्पिटल मध्ये अति दक्षता विभागाच्या बाहेर राहायची वेळ आली आहे का?
आपले जवळचे कुणीतरी मृत्यूशी झुंज देत असते.डॉक्टर जरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी काय निर्णय लागेल ते अनेकवेळा त्यांच्याही हातात नसते.
“आजची रात्र जाऊदे”  असे म्हणताना, आपोआप वरच्या शक्तीला साकडे घातले जाते.
येणारी रात्र अशी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी करते.
९)रुक जा रात ठहर जा रे चंदा
(सिनेमा-दिल एक मंदिर, संगीतकार- शंकर जय किशन, गायिका – लता मंगेशकर)

कल का डरना काल की चिंता
दो तन है मन एक हमारे
जीवन सीमा के आगे भी 
आऊँगी मैं संग तुम्हारे
रुक जा रात ठहर जारे चंदा

दिल एक मंदिर हा सिनेमा एका तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. डॉ धर्मेश( राजेंद्र कुमार) आणि सीता (मीना कुमारी) यांचे प्रेम असते. एकत्र आयुष्य जगण्याची शपथ घेताना  दोघांनाही कल्पना नसते की त्याची पुढची मुलाखत अनोळखी म्हणून होईल. परदेशातले शिक्षण संपवून आल्यावर धर्मेशला समजते की त्याच्या प्रेयसीचे लग्न झाले आहे. तो स्वतःला कामात झोकून देतो.
काळाचे फासे उलटे पडतात आणि नियती परत एकदा दोघांना एकमेकांसमोर आणते. सीताच्या नवऱ्याला असाध्य आजार असतो आणि त्याचे ऑपरेशन करणार असतो डॉ धर्मेश. 
नायकाचे  ऑपरेशन आहे आणि करणारा आहे  तो तिचा आधीचा प्रियकर. 
त्याच्याच हातात तिच्या नवऱ्याचे आयुष्य आहे.
ही लढाई आहे मृत्यूशी. 
आज ऑपरेशनच्या आधीची रात्र आहे.
ही सकाळ जेवढी पुढे ढकलता येईल तेवढी पुढे जावी ही विनंती आहे तिची नियतीला.

पैशाचे आकर्षण प्रेमाला सहज हरवते. अचानक यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या लक्ष्मीला ही गोष्ट उशीरा समजते.
प्रसिद्ध सिनेतारका असलेल्या लक्ष्मीची किंमत तिच्या नातलगांना तिने आणलेल्या पैशापुरतीच असते. तिच्या कमाईवर बाकीचे मजा करत असूनही लक्ष्मी मात्र एकाकी असते. अशावेळी तिच्या आयुष्यात एक पत्रकार येतो.
तिच्या वैराण  जगण्याला अर्थ मिळतो. नियती मात्र दबा धरून बसलेली असते. सर्वस्व सोडून नेसत्या वस्त्रानिशी आपल्या प्रियकराची वाट पाहत असलेल्या लक्ष्मीला त्याचे खरे रूप समजते. तो परत येत नाही आणि जगापासून तुटलेली ती आपल्या आयुष्याचा अंत करायचा ठरवते.
कड्यावरून कोसळण्याच्या अगोदर गाण्याचे स्वर येतात ,

१०) रात भर का है मेहमां अँधेरा किसके रोके रुका है सवेरा
(सिनेमा -सोने की चिडियाँ, संगीतकार ओपी नय्यर, आवाज -मोहम्मद रफी )

नैराश्येच्या अंधारात हरवलेल्या लक्ष्मीला प्रकाशाची एक छोटीशी तिरीप दिसते. मृत्यूकडून जीवनाकडे जाणारी वाट तिला खुणावत सांगते,
यूँ ही दुनिया में आकर न जाना,सिर्फ़ आँसू बहाकर न जाना,
मुस्कुराहट पे भी हक़ है तेरा, किसके रोके रुका है सवेरा

आयुष्य संपवणे एका क्षणाचे काम आहे. मृत्यूच्या अंधाराकडे स्वतःला सोपवण्याआधी एक लक्षात घ्यायला  हवे, रात्रीचे प्रहार सुद्धा मर्यादित असतात. काळ येणाऱ्या पहाटेला थांबवू शकत नाही.

रात्रीची ही अनेक रूपे. तिच्या काळ्या रंगात सुद्धा अद्भुत सौंदर्य आहे. सूर्य मावळतो. प्रकाशाचा अस्त होतो. सगळे जग काळोखात बुडून जाते आणि थकलेल्या जीवाला विश्रांती मिळते. संगीताची गोडीही रात्रीच्या अंधारात अपूर्व वाटते. अशावेळी, स्वप्ननगरीत नेणारी
ही गाणी ऐकायची.
उरात जपलेली.
काही आपण अनुभवलेली, काही कल्पलेली. 

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.





8 thoughts on “झूम झूम ढलती रात: रात्रीची गीते.”

  1. ही गाणी नितांतसुंदर आहेत. ऐकत रहावी, अशी आहेत.

    तुम्ही पण मनापासून लिहीता. काय असेल, ते असो, मला नेहमी वाटते, की संगीताचा जाणकार, किंवा रसिक असला, की त्याच्या लिखाणात, एक लय आपोआप येते.

    1. कदाचित .. Madhav Bhokarkar sir.
      तुम्ही ते गीत ऐकता , समरस होतात …ती सुरांची समरसता लिखाणात उतरत असावी.
      Thank you.

  2. प्रिया,
    खूप सुंदर गाणी निवडली आहेस.

    एक से बढकर एक.
    ❤️❤️❤️❤️❤️

  3. निशा. ती नशीली असते तशीच उद्याचा उष:काल गर्भात वागविणारीही असते. माझा आवडता प्रहर म्हणजे रात्र. रात्रीची आवडती गाणी आणि त्यांचं रसरशीत वर्णन, लाजवाब ❤️

    1. उद्याचा उष:काल गर्भात वागविणारीही असते. वाह Alka, ..किती सुंदर लिहिलंस .
      रात्र मलाही आवडते ..
      अनेकवेळा विचार डोक्यात घेऊन झोपले तर सकाळी अनेक कल्पनांना जन्म देते

  4. Rajnarendra Badave

    अप्रतिम वर्णन केले आहे प्रत्येक गाण्याचा अतिशय समर्पक शब्दांत सुंदर अर्थ सांगितलं आहे.नक्कीच पुन्हा नव्याने या अर्थासाहित ही सर्व सुंदर गाणी ऐकावी असे वाटते…..

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *