Skip to content

तब याद हमें भी कर लेना: मोहम्मद रफी 

प्रेमाचे अनेक रंग असतात. तुमचे आमचे असे काहीही सेम नसते. ती कविकल्पना आहे. तसेच विरहाचे. प्रेम करायचा  सुद्धा स्वतःचा एक स्वतंत्र वकूब असतो, निभावण्याची एक स्वतःची पद्धत असते तशी विरहाला झेलण्याचीही असतेच.
ते दुःख सुद्धा प्रत्येकासाठी स्वतंत्र असते. सहन करण्याची एक वेगळी क्षमता असते आणि त्याच्याशी भिडण्याची सुद्धा.
रफीने गायलेली ही सर्व गाणी विरहाची. त्याचेही मूड्स आहेत. रफीच्या आवाजात अभिनय सुद्धा असल्याने अनेक चेहेऱ्यांना ही गाणी गाताना बघणे सुद्धा सुसह्य आहे.

१) तक्रार करणे (complaining)
—————————— ——-
प्रेमाचा रस्ता खडतर असतो असे म्हणतात. वळणे येतात . गैरसमज होतात. भांडणे होतात आणि प्रेमाच्या नाजूक धाग्यात बांधले गेलेले ते दोघे विलग होतात.
प्रत्येकालाच ही शिक्षा सहन करता येत नाही. मग सुरु होते ती आरोप प्रत्यारोपांची साखळी.
तिचे लग्न कुणा दुसऱ्याबरोबर ठरले आहे. ती ते का करते आहे, अशी काय मजबुरी असू शकते की तिला ते सांगता येत नाही, निदान माहिती काढता येते, तिला भेटता येते, विचारता येते पण तसे करण्याएवढा सभ्यपणा आणि संयम या प्रियकराच्या अंगात नाही.

दिल जो न कह सका
(सिनेमा-भीगी रात, संगीतकार-रोशन, गीतकार-साहिर लुधियानवी, कलाकार-प्रदीप कुमार )

प्रेयसीच्या साखरपुड्याच्या समारंभातच सगळे उट्टे काढताना तो म्हंटतो,

सागर उठाओ दिल का किस को ग़म है
आज दिल की क़ीमत जाम से भी कम है
पियो चाहे खून-ए-दिल हो
के पीते पिलाते ही रहने की रात आई
दिल जो न कह सका…

जिच्यावर कधीतरी वेड्यासारखे प्रेम केले ती रक्त पिपासू असेल असे तिच्याच तोंडावर म्हणणे, ह्या प्रेमाला नक्की कशाची उपमा द्यायची हे मला समजत नाही. त्यापेक्षा मै तेरा खून पी जाऊंगा हा डायलॉग सुद्धा सभ्य वाटतो की नै?

२)आरोप करणे (accusing)
————————————-
नकाराचे दुःख असहनीय कारण आपला अहं दुखावला जातो. स्वतःवरचा आत्मविश्वास डळमळीत होण्याची ती सुरुवात असते. पुरुषांच्या बाबतीत हे पचवणे कठीण असते. आयुष्यात जिंकणे हे फार महत्वाचे आहे ह्याचे संस्कार लहानपणापासूनच झालेले असतात. पुरुष कणखर असतो, रडणारे पुरुष कमकुवत असतात, पुरुषांचे अस्तित्व त्यांच्या “मी “पणात सामावलेले आहे ह्या सर्व गोष्टीने स्वतःची एक भ्रामक कल्पना त्यांच्या मनात आधीपासूनच तयार व्हायला सुरुवात होते. त्यात समाजमान्य गुण त्याच्यात असतील, जसे हुशारी, पैसे, प्रतिष्ठा .. तर या कल्पनेला सत्याचे रूप येते आणि नकाराने त्या सत्याला छेद गेला तर ते सहन करू शकत नाहीत.
नकार मिळाला तर The woman mourns , the man is enraged हे अनेक ठिकाणी दिसते.
नौशाद, शकील बदायुनी, रफी आणि दिलीप कुमार ह्या चौकडीने सिनेसंगीताला जो काही गीतांचा नजराणा पेश केला आहे त्यासाठी संगीत आणि प्रेक्षक कायमचे ऋणी आहेत .
लीडर, मेला, अंदाज, बाबूल, उडन खटोला, राम और शाम, कोहिनूर …किती सिनेमा आठवतात!

दिल दिया दर्द  लिया हा सिनेमा एमिली ब्रॉन्टे च्या वदरिंग हाईट्स या पुस्तकावर आधारित आहे. प्रेमिकांमधील गैरसमज , त्यातून ,नायकाने , नायिकेवर केलेला अन्याय ,घेतला गेलेला सूड असे कथानक आहे या सिनेमाचे.

गुजरे है आज इश्क में
(सिनेमा=दिल दिया दर्द लिया, संगीतकार_नौशाद, गीतकार -शकील बदायुनी, कलाकार-दिलीप कुमार)

प्रतारणेचा आरोपच करून नायक थांबत नाही , तर जगातली सर्व दुःखे तिच्या पदरात पडावी अशी इच्छा ही करतो.
खरेतर त्याच्यावर अन्याय करणारा असतो तो नायिकेचा भाऊ , तिचे लग्नही त्यानेच ठरवलेले असते. यात तिचा दोष एवढाच की , त्याच्या विरोधात जाण्याएवढी ती कणखर नसते . तिची साथ द्यायची सोडून हिरो काय करतो तर,

हम वो नहीं जो प्यार में रोकर गुज़ार दें
परछाईं भी हो तेरी तो ठोकर से मार दें
वाक़िफ़ हैं हम भी ख़ूब हर एक इंतक़ाम से

पुरुषी अहंकार , स्वतःची चूक न मान्य करण्याचा माज …हो माजच , स्वतःच्या चुकीचे सुद्धा खापर , स्वतःच्या प्रेमिकेवर फोडण्याची वृत्ती या सर्व गोष्टीचे चित्रण आहे यात.

३)विनवणी  करणे (pleading )
———————————–
Shannon L. Alderचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. “ Somewhere between love and hate lies confusion, misunderstanding and desperate hope.”
हे वाक्य, नासिर हुसैन यांच्या  “ जब प्यार किसीसे होता है “ ह्या  सिनेमाचे कॅप्शन होऊ शकेल.
नायक आणि नायिका एका सुंदर हिल स्टेशनवर भेटतात , थोडा गैरसमज , थोडे भांडण आणि त्यातून प्रेमात पडतात.
सिनेमा तीन तासाचा असतो आणि आता तर जेमतेम मध्यंतर होते. मग खलनायक कुरापत काढतो , नायकावर खुनाचा आळ येतो. चमकदार संवाद, मधुर संगीत आणि तावून सुलाखून प्रेमाच्या परीक्षेत नायक पास होतो .
सिनेमाच्या गैरसमजाच्या टप्प्यावर हे गाणे येते .

तेरी ज़ुल्फ़ों से जुदाई तो नहीं माँगी थी
(सिनेमा-जब प्यार किसी से होता है, संगीतकार-शंकर जयकिशन, गीतकार-हसरत जयपुरी, कलाकार-देव आनंद )

ह्या सिनेमाचा नायक आहे देवानंद …Eternally positive lover.  त्यामुळे सरळ सरळ हार मारणे शक्यच नाही. जर स्वतःकडून काहीही वावगे घडलेच नाही तर आपल्या प्रेमासाठी लढल्याशिवाय तो काही हार मानणार नाही. अर्थात तो सच्चा आहे म्हणून हे धाडस करतो आहे.

मेरा हक़ था तेरी आंखों की छलकती मय पर
चीज़ अपनी थी, पराई तो नहीं माँगी थी
क़ैद माँगी थी , रिहाई तो नही माँगी थी

इथे हक्काची भाषा अशासाठी येते की, त्यांचे लग्न आधीच त्यांच्या मातोश्रींनी ठरवले आहे. शिवाय त्या दोघांच्या आणा शपथा झाल्या आहेतच . स्वतःचा अधिकार मागणे आहे हे .
हक्क दाखवूनच सगळे सुरळीत होते असे नाही. उलट संबंध अजून बिघडतात हे माहित आहे त्याला. मग गाडी विनवणीवर येते .
अपने बीमार पे, इतना भी सितम ठीक नहीं
तेरी उल्फ़त में, बुराई तो नहीं माँगी थी
क़ैद माँगी थी.

शंकर जयकिशन यांच्या पहिल्याच सिनेमात , “ बरसात “ मध्ये रफी आहे .
“ मै  जिंदगी में हरदम रोता ही रहा हूँ “ पण हे गीत पार्श्वभूमीला वाजते. राजचा आवाज म्हणून मुकेशने नाव कमावले. आवारामध्ये सुद्धा रफी असून , मुकेशची गाणी गाजली . ५९ मध्ये लव्ह मॅरेज या सिनेमात, देव आनंदचा आवाज म्हणून , SJ ने रफींना आणले आणि नंतर जब प्यार किसी से होता है , असली नकली मध्ये सुद्धा या त्रिकुटाची गाणी गाजली .
शम्मी कपूर–रफी हे समीकरण सुद्धा SJ नेच हिट केले.

४)शोक, तीव्र दुःख (Grief )
दिल के झरोको में तुझको बिठाकर ( सिनेमा-ब्रह्मचारी, संगीतकार -शंकर जयकिशन, गीतकार-हसरत जयपुरी, कलाकार-शम्मी )

या सिनेमात  शम्मी एक अनाथ आश्रम चालवतो. स्वतः अनाथपणाचे दुःख भोगल्यामुळे, या बेघर आणि पोरक्या मुलांशी त्याचा जुळलेला बंध अतूट आहे. राजश्रीवर त्याचे प्रेम आहे. तिचेही आहे पण … हा पण दोघांना विलग करतो . शम्मीला पैशाची गरज आहे , अनाथ आश्रम चालवणे , त्याच्यासाठी आपल्या प्रेमाहूनही महत्वाचे आहे. यातील खलनायक त्याला पर्याय देतो, प्रेम किंवा त्याची मुले
अर्थात या सर्वांची, नायिकेला काहीही कल्पना नाही. तिच्यासाठी तो बेवफा आहे . तिचे आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर जात असताना , हे गीत नायक गातो.
खरेतर या गाण्याचा अंतरा रिपीट होतो आणि याचे संगीत सुद्धा अंगावर येते तरीही रफीने या  गाण्याला जे स्वतःचे म्हणून काही दिले आहे ते अफाट आहे.
The song is grieving but it has a cynical touch too.

दिल के झरोखे में तुझको बिठाकर
यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर
रखूँगा मैं दिल के पास
मत हो मेरी जां उदास

If love fills you  with optimism and enlivens  you then why does it have to hurt so much?
प्रेमाचे झालेले दर्शन एवढे लोभस असते. उगाच नाही म्हणत , “ क्षण एक पुरे प्रेमाचा “
But potent love is ephemeral too . That’s what makes it so impactful.
दुसऱ्यावर प्रेम करताना, त्याच्यात हरवून जाताना, स्वतःच्या अस्तित्वाचा , स्व चा विसर पडतो. त्याच्या पुढची पायरी असते त्याने तुमचे आयुष्य व्यापून टाकणे. अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यातून जाते , तेव्हा तो रिकामेपणा भरून काढणे अशक्य होते. जेव्हा हे सगळेच खोटे होते , कल्पना होती याची जाणीव होते तेव्हा माणूस खचत जातो ,. फसवणुकीचे राग , हरल्याचे दुःख आणि काहीही न करता येत असल्याचा न्यूनगंड माणसाला संपवतो .

मेरी मोहब्बत को ठुकरा दे चाहे
मैं कोई तुझसे ना शिकवा करूँगा
आँखों में रहती है तस्वीर तेरी
सारी उमर तेरी पूजा करूँगा
There is pain and there is an anger at his own helplessness

५) परिस्थितीला शरण जाणे  (resigned)
रंग नूर और की बारात (सिनेमा-ग़ज़ल, संगीतकार-मदन मोहन, गीतकार-साहिर लुधियानवी, कलाकार–सुनील दत्त)

इथे परिस्थिती पहिल्या गीतासारखीच आहे.
नायक आणि नायिकेचे प्रेम असते, ते अयशस्वी होते आणि तिच्या लग्न समारंभात त्याला गायला बोलावले जाते. थोडा फरक आहे. पहिल्या गीतात प्रदीप कुमार, आगंतुकासारखा येऊन, समारंभाची वाट लावतो.
रफीजींच्या सुरामुळे ती सुसह्य होते इतकेच पण इथे सुनील दत्तला बोलावून , त्याला गायला लावणे म्हणजे त्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
आपल्या भावना प्रत्येकाला शब्दात मांडता येत नाहीत. अनेक वेळा परिस्थिती शब्दाच्या अर्थाचा अनर्थ घडवते. शहाण्यांनी डोळ्यावर विश्वास ठेवावा, भाषेवर नाही . माणसे भाषेचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यात माहीर असतात.

कौन कहता है के चाहत पे सभी का हक़ है
तू जिसे चाहे, तेरा प्यार उसी का हक़ है

“मुझसे कह दे, मैं तेरा हाथ किसे पेश करूँ” हे गाताना त्याचे डोळे वेगळेच बोलत आहे न !
A melodious gazal , so full of passion and pain,  is composed by Madan Mohan.
हतबलता रफींच्या शब्दांत साकळून आली आहे. There is helplessness  and there  is resignation as one is saying goodbye to one’s love .

कोणतीही गोष्ट , मग ती प्रेम असो किंवा कशाचीही अभिलाषा , नाही मिळाली तर येणाऱ्या प्रतिक्रिया ,व्यक्तीच्या  प्रवृत्तीनुसार बदलतात .

तिच्यावर, स्वत:हूनही जास्त प्रेम असेल तर “ खुश रहे तू सदा ये दुआ है मेरी “ .
स्वतःबद्दल निदान आदर असेल तर “ ‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम “,
स्वतःवरचा अहंकार प्रेमाचाही बळी घेण्याइतपत मोठा असेल तर “ मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, मुझे ग़म देने वाले तू खुशी को तरसे”
आणि कशापेक्षाही जीवनावर श्रद्धा असेल तर “ जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया , जो खो गया मैं उसको भुलाता चला गया”
आपापल्या परीने, प्रत्येक जण आलेले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोच. मूकं  राहून, कधी संतापून, कधी नको असलेल्या आठवणी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडवून, आलेल्या दिवसाला सामोरे जातो.
Survival instinct helps one to sustain.
पर्याय असतो.  माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. एक गेला की त्याची जागा दुसरी घेतो. कधी व्यक्ती तर कधी व्यवसाय, रहाटगाडगे चालू राहते.
कधीतरी आपण मनाला समजावतो की पर्याय आहे पण खरंच असतो ?
पर्याय असणे आणि पसंती असणे यात फरक आहे की .

६)उदासी (Melancholy)
याद न जाये बिते दिनोंकी (सिनेमा-दिल एक मंदिर, संगीतकार-शंकर जयकिशन, गीतकार -शैलेंद्र, कलाकार-राजेंद्र कुमार)

माणसाला कप्पे असतात म्हणून तो जगतो. नाहीतर दुःख किंवा आनंदाच्या अतिरकाने माणूस वेडा होईल. अभ्यास असतो, नोकरी असते , दिलेले आयुष्य घडवायचे असते, जगायचे असते.
येणारा दिवस आपले अर्ध्य घेऊनच मावळतो, मग येते ती रात्र …
ती असा न जुळणाऱ्या बाकीचा हिशोब मांडते . 
दिल एक मंदिर तद्दन रडारडीचा चित्रपट आहे. प्रेमाचा त्रिकोण.नवर्याला कँसर आणि वाचवणारा माजी प्रियकर . मग कुणीतरी एकाने दूर  जाणे क्रमप्राप्त. तो समजूतदारपणे तिच्या आयुष्यापासून अंतर राखतो पण पेशंटला वाचवणे त्याचा धर्म आहे .
त्या निमित्ताने होणार्या गाठीभेटी टाळताही येत नाहीत आणि सहन सुद्धा होत नाहीत.
“ दिल क्यूँ बुलाये” ही घुसमट आहे.

तस्वीर उनकी छुपा के, रख दूँ जहाँ जी चाहे
मन में बसी ये मूरत, लेकिन मिटी न मिटाए
कहने को हैं वो पराए
याद न जाए…
जीव गुदमरून टाकणारी ही घुसमट इथे डॉक्टरच्या मृत्युने  संपते.

कधी मनालाच  समजते, पूर्णविराम झालेला आहे. बदल घडत असतात. ते थांबवता येत नाहीत. आटापिटा करूनही पदरात दुःख पडते.
कोणत्याही गोष्टीसारखाच, नात्याचा अंतही  निश्चित असतो.

७)स्विकार-शरणागती -(acceptance).
आँचल में सजा लेना कलियाँ, ज़ुल्फ़ों में सितारे भर लेना
( सिनेमा-फिर वोही दिल लाया हूँ, संगीतकार-ओ पी नय्यर गीतकार- मजरूह सुलतानपुरी, कलाकार–जॉय मुखर्जी )

 दोन अनोळखी माणसे एक दिवस अपघाताने एकत्र येतात. आकर्षित होतात आणि दिवस मावळताना लक्षात येते की आपापल्या मार्गाने जाण्याची वेळ आलेली आहे. परत भेटणे काही दोघांच्या हातात नाही. निरोपाच्या या घडीला तो म्हणतो ,

रस्ता जो मिले अंजान कोई
आ जाए अगर तूफ़ान कोई,
अपने को अकेला जान के तुम,आँखों में न आंसू भर लेना
ऐसे ही कभी जब शाम ढले, तब याद हमें भी कर लेना
एक सुखद आठवण बनून राहणे याहून चांगला विरहाचा अंत आणि कोणता असेल!

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.






8 thoughts on “तब याद हमें भी कर लेना: मोहम्मद रफी ”

  1. खूपच छान लिहिलं आहे ताई! एक छानशी playlist तयार होते तुझ्या लेखांमधून 😊

  2. प्रिया,

    विरहाची गाणी,
    त्यावर मात करणारी गाणी..
    रफी कुठल्याही प्रकारचे गाणे ज्या आर्ततेने गातात,त्याला तोड नाही.
    तू जी गाणी निवडतेस ती पण १ no. असतात.
    लेख तू सरस, सुंदर लिहितेस,
    पण प्रत्येक वेळी वाटतं,तुला किती अभ्यास करावा लागत असेल.
    चित्रपट असो व गाणी
    तुझा हातखंडा आहे की च.
    पण तू त्यासाठी घेत असलेल्या कष्टाला,देत ऐकता वेळाला सलाम.
    🙏🌷❤️

    1. Thank you Vidula .
      आवडीचे काम .
      खरेतर लिहिल्यामुळे वरवर दिसत नाही ते अर्थ स्पष्ट होतात. ही गाणी आणि सूर बऱ्याच गोष्टींना अर्थ देतात.

  3. काय कमाल गाणी निवडली आहेस,खरं तर रफीची गाणी म्हणजे दोन्ही हाताने उधळला तरी न संपणारा रत्नांचा खजिना! अतिशय आवडता गायक.
    लेखही सुंदरच

    1. थँक यु . Gauri.
      माझाही अत्यंत आवडीचा लेखक .
      मी थीम घेऊन लिहिते . नाहीतर शक्यच नाही

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *