
सकाळपासून पावसाचे थैमान चालू होते.
आधीच महानगर-पालिकेच्या अपूर्ण राहिलेल्या कामाची जंत्री आणि त्यात मेट्रोचे खोदकाम. २६ जुलै ची पुनरावृत्ती होईल की काय अशी सार्थ भीती वाटल्याने त्यानेही स्टाफला जायला सांगितले.. गेले दोन महिने, कामासाठी तो बाहेरच. बऱ्याचश्या मेल्स , तुंबलेली कामे , जेवढे हाताळता येईल तेवढे तरी निपटुया म्हणून तो मागे थांबला. तसेही घरी कुणी वाट पाहणारे नव्हतेच. अगदीच जरुरी पडली असती तर आसपासच्या हॉटेलमध्ये रात्र काढता असती.
काळ्या कुट्ट ढगांनी मुंबापुरीवर परत आच्छादन घालायला सुरुवात केली. पावसाचा जोर वाढला .
असेल का ती अजून ? घरी पोचवून जाऊया म्हणून फोन लावला तर “ ऑफिसमध्ये कुणीच नाही आहे सर. आत्ताच सर्वाना जायला सांगितले सायबानी” फोनवर हे अपेक्षित पण नकोसे उत्तर मिळाले त्याला.
ट्रेन चालू आहेत का? का बसने गेलीय?
तिचा फोन सायलेंट वर असावा. आता त्याच्या सतत वाजण्याबरोबर रागाचा आणि काळजीचा पारा ही चढायला लागला.
“अर्थ नाही आहे तिच्यात. लक्ष नसते तिचे. फोन सायलेंट तरी असतो , नाहीतर स्विच्ड ऑफ . नोकरी कशी करणार हे कळत नाही मला; साधे फोनचे टेक्निक जमत नाही तर”
नवऱ्याची तणतण ऐकून तिने नेहमीचे आहे असा चेहरा करून दुर्लक्ष केले तेव्हा हसू आले होते त्याला. आता मात्र तिच्या नवऱ्याचीच दया यायला लागली.
“उडत जाऊ दे बयेला. लोकांना काळजी वाटू शकते एवढे समजत नाही म्हणजे काय!“ काजळलेल्या मनाला थांबवून त्यानी बॅग भरायला घेतली.
बाहेरचा अंधार वाढायला लागला . ट्रेन मध्ये चेंगराचेंगरी झाली तर! सवय आहे कुठे! अडकली तर नसेल ना ..
न राहवून त्याने परत तिचा नंबर चेक केला…
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ
कॉलेजमध्ये असताना असाच एकदा त्याचा जीव घशात अडकला होता.
दहाची गाडी असायची तिची आणि भायखळ्याला गाडीला मोठा अपघात झाला होता. दारात उभ्या राहून प्रवास करणाऱ्या पहिल्या वर्गाच्या बायका सरळ कापल्या गेल्या होत्या. परीक्षा चालू होती त्याची. मित्राला पोचायला उशीर झाला तेव्हा कळले होते. पेपर टाकून जाणे शक्यच नव्हते. तिच्या घरी फोन करायचा का नाही ह्यातच उन्हे सरली.
संध्याकाळी न राहवून त्याने फोन केला तर नशिबाने तिनेच उचलला.
“ अरे, आज सूर्य मावळण्याच्यावेळी उगवला कसा? “ तिचे नेहेमीचे खळखळणारे हसू कानावर पडले नी गेलेला जीव, परत आला त्याचा.
“ हसायला काय झाले ? तुला हॉस्टेलला एक फोन करता येत नव्हता का ? शेजारी तरी निरोप द्यायचास. भायखळ्याला, गाडीला अपघात झाला ही बातमी कळली मला, निदान मी त्यात नव्हते म्हणून तरी सांगायचंस …पेपर मध्ये सुद्धा लक्ष नव्हते “
“ मला काय माहिती तुला समजले ते ! मी पाठच्या डब्यात होते, तीच गाडी … अरे , कसला रक्ताचा सडा नुसता ट्रॅक … “
“ गप्प. मला काहीही ऐकायचे नाही, निदान एक फोन, हे तरी सांगायला करायचास. मला समजू शकते असेही लक्षात आले नाही ?”
“ चिडतोस कशाला ? नाही लक्षात आले … “
“ आणि मी असतो तर?”
“ तू नेहेमी प्रवास करणारा असतास तर मला समजल्यावर मी धावतच आले असते. अशी संध्याकाळी उगवून तुझ्यावरच चिडले नसते! “
त्याने चिडून खटकन फोन बंद केला होता तेव्हा .
ती खरंच आली असती; अगदी गाड्या बंद असत्या तर ट्रॅकवरून धावत आली असती .
जिव्हारी लागले त्याच्या हे. .
आपली प्रायोरिटी नेमकी काय होती !
ती बरोबर म्हणाली होती.
“तुझी स्वप्ने खूप वेगळी होती , फक्त ती बघायचा तुला धीर होत नव्हता. मी तेवढाच तर दिला तुला. मग त्या स्वप्नांत माझी गरज नव्हती … नाहीतर तू न बघता गेलाच नसतास “ .
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
त्याच्या मित्राकडे शब्द टाकला खरा पण आज एवढ्या वर्षांनी तिला रुटीन मध्ये बांधून घेता येईल का या बाबतीत तो साशंक होता. नोकरी लागून सहा एक महिने झाले असतील; ती मात्र आता चांगलीच रुळली होती.
कधीतरी कॉरिडॉर मध्ये, लिफ्ट मध्ये दिसायची. बुजरेपणा गेला होता. तिला पाहून, तिच्याच फर्म मधल्या मुलांनी, हातातली सिगारेट पाठी लपवली तेव्हा हसू आले त्याला. तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या तरुणाईबरोबर तिने मात्र जुळवून घेतले होते.
“ तू गाडी घेऊन का नाही येत ?
घरी निघताना फर्म मधल्या कुणीतरी लिफ्ट देऊ केली होती आणि ते अजिबात आवडले नव्हते त्याला.
“ अरे, मी ज्युनिअर आहे सर्वात. घरी गाडी आहे म्हणून घेऊन येणे बरे नाही वाटत. उगाच कोणाच्याही जीवावर उड्या काय! “
“ काहीही असते तुझे. मी तरी कुठे असतो भारतात! माझी घेऊन जा .ड्रायव्हर रिकामाच असतो …तो सोडेल “
“ कायच्या काय ! तुझ्या ऑफिसचा खर्च माझ्यावर कशाला ! तुझ्या घरचे कुणी असते तर वेगळी गोष्ट ..
मोजक्या शब्दातला परकेपणा बोचरा असेल पण तिच्यासाठी तो सहज होता.
जे आहे ते आहे. उगाच आपले नसलेले जस्टीफाय काय करायचे …
परत एकदा न वाजणाऱ्या फोन कडे पाहून तो बाहेर पडला .
अब तक दिल-ए-खुशफ़ हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
धो धो कोसळणारा, दमलेला भागलेला पाऊस हळूहळू शांत होत होता. सायलेंट मोडवर असलेल्या थरथरणाऱ्या फोनकडे आता कुठे तिचे लक्ष गेले.
“हॅलो “
पाऊस सुद्धा घाबरेल अशा आवाजात धुंवाधार चिडचिड पलीकडून सुरु झाली. . संतापलेला, दुखावलेला आवाज , काळजीने खचलेला आवाज.
“ आहे तिथेच थांब आता .अजिबात हलू सुद्धा नकोस . दोन मिनिटात पोचतो”
संध्याकाळच्या किरणांनी हळूच आपले डोके वरती काढले..लांबून मेहदी गात होता,
माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

तिच्या आणि त्याच्या नात्यातील ही वीण खरोखरच अजब. कदाचित तिच्या सार्या मनालाच बापुडवाणेपणा येतो! तसा ती त्यालाही दोष देत नाहीच. आपली ओंजळ त्यानं कधीच रिती राहू दिली नाही. कुठली ना कुठली फुलं तीत टाकलीच, याबद्दल ती खरोखरीच कृतज्ञ असेलच. पण आजवर मनाच्या कुठल्या तरी कोपर्यात किती तरी वर्ष दडवून ठेवलेली “ती” भावना तिच्याही आणि त्याच्याही मनात उसळी मारून वर येतेच. कदाचित तो म्हणतही असेल
वावगा वागेन मी तेव्हा
तू अटींची टांगती तलवार हो
अन् पुन्हा केव्हाही मी रागावता
वादळी पाऊस धुव्वांधार हो
काय सुरेख लिहिलंय, अगदी कमाल कमाल ❤️❤️❤️❤️
फार सुंदर प्रतिक्रिया आहे ग ही …चारोळी अगदी समर्पक
Thank you Kamini.
वा खूपच छान लिहिलेय हि गझल खूप आवडते मला तुम्ही किती छान पावसाळी वातावरणातील दोन प्रेमिकांच्या तिल घालमेल लिहिलेय परफेक्ट 👍
Thank you so much Ajay ji.
कित्ती गोड..
नक्की कसं आहे त्यांचं नातं..
तू दर्द द्यायला तरी ये..
माझं मन दुखवायला तरी ये..
पण.नक्की ये.
भांडू तरी कोणाशी तू नसशील तर…
❤️❤️
Vidula, Isn’t it the loveliest form of love ? 🙂
नेहेमीप्रमाणे अप्रतिम लिहिलाय
Rashmi , Thank you 🙂