पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस येण्याआधी वातावरणात एक जडपणा येतो. कोसळायचे तर आहे पण धीर होत नसल्यासारखा पाऊस स्वतःला थांबवतो. नंतर मात्र तो लादलेला संयम असह्य झाला की धरतीला झोडपून काढतो. हा पाऊस घाबरवतो . सगळे काही संपून जाण्याची ती सुरुवात असते.
असेच काही संपवून टाकणारी ही कविता.
लौकिकार्थाने नाते संपले आहेच. ती कुणाचीतरी ठेव आहे. उंबरठ्याच्या सीमा ओलांडणे आता शक्य नाही. बरेचसे क्षण तिने पुसून टाकले आहेत नाहीतर नव्या जीवनाशी जुळवून घेणे शक्य नाही.
तिला जमते हे. नाव पुसले जाते , माहेरचे पाश तोडले जातात , यज्ञाच्या धगीत तिचे मी पण संपते , कुणाच्यातरी हातात हात गुंफला जातो …तिथे सुटलेल्या साथीची आठवण येणे योग्य नसते.
त्याला मात्र ते सहन होत नाही … एक दुखरी सल असूयेचे, संतापाचे रूप धारण करते आणि मग आसुडाप्रमाणे कवी सौमित्र यांचे शब्द कडाडतात,
माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे. डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये.
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी, बघ माझी आठवण येते का?
सुरुवातीला मला ही प्रेमाची कविता वाटायची. आता वाटते, जे मिळवायला हवे होते ते मिळाले नाही या दुःखाची कविता आहे ही. गमावल्याची, हरल्याची, कमी पडल्याची, चिरडलेल्या अहंकाराची आणि कदाचित आपण कुणीच नाही या झालेल्या जाणिवेची.
नेहेमी जूनचा दुसरा आठवडा संपला तरी मुंबईत काळा ढग सुद्धा हूल देत नाही पण यावर्षी मात्र मे च्या तिसऱ्या आठवड्यातच सकाळी उठलेआणि दिसले की , समोरचा पिंपळ शॉवर खाली उभा असल्यासारखा अंग घुसळत होता.. गुलमोहराने अंगावरील उरल्या सुरल्या फुलांची पखरण केली. आमच्या बिल्डिंग समोरचा रस्ता लालभडक फुले पांघरून ओलाचिंब झाला .
चार महिने हलणारच नाही असा निश्चय करून पावसाने आपले पाय घट्ट रोवले आहेत.
मुंबईत वळवाचा पाऊस असे प्रकरणच नाही. मे महिन्यात डोकावणारे काळे ढग म्हणजे मी पुढच्या महिन्यात येणार याची पूर्वसूचना असते. तसेही घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकराला आगंतुक असे काहीही चालत नाही तर पाऊस कसा अपवाद असणार ! येण्याची सूचना देऊन , मुंबईकरांची त्याला तोंड देण्याची पुरेशी तयारी झाली की तो वाजत गाजत येतो.
पूर्व कल्पना देऊन इथे बरसतो तो मृगाचा मनमोकळा, मनसोक्त पडणारा पाऊस.
मुंबईतील गर्दी, लोकल्स चे कोलमडणारे गणित, रस्त्यावर होणार ट्रॅफिकजाम, तुंबणारे रस्ते , वाहणारी गटारे ह्या अडचणीत सुद्धा इथला प्रत्येक माणूस पावसाची आतुरतेने वाट पाहतो. आपल्या परीने त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करतो. शहरी सभ्यतेचे नियम झिडकारून एकदा का होईना चिंब भिजतो .
आता मात्र भिजण्याची धास्तीच बसली आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत गमावलेल्या अनेकांचे चेहरे डोळ्यासमोर आले की सर्दी खोकला सोडाच साध्या शिंकेने सुद्धा पोटात गोळा येतो. त्यात पूरग्रस्त भागातील चित्रे तर मनाला प्रचंड वेदना देतात. घरे वाहून गेली, माणसे वाहून गेली. पावसा एवढा कसा तू निष्ठूर झालास!
“शेती , पिके , पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी जेवढा पाहिजे तेवढाच येरे” अशी माझ्याकडून तरी त्याला विनंती केली आहे या वर्षी.
पाऊस असा बेतानेच ये किंवा नको येवूस अशी खूप गाणी आहेत .. या वर्षी त्या गाण्यांचा अर्थ, खरा अर्थ समजत आहे .
पाऊस कधीचा पडतो , झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली , दुःखाच्या मंद स्वराने .
स्वतः ग्रेस ह्या कवितेबद्दल बोलताना सांगत की, पाऊस पडतोच आहे… जागा बदलून बदलून, प्रदेश बदलून, देश बदलून… पण तो थांबलेला नाही…तो स्वतः संपेपर्यंत ती अपूर्णता अशीच वाहत राहणार आहे.
इजाजत ची सुरुवात आठवते मग मला .
कुठलंसं गाव. त्याचे नाव माहित असायची गरज नाही एवढं निनावी असलेलं ते गाव. क्वचित गाडी जात असेल तिथून. स्टेशन वर वर्दळ नाही, कधीपासून पाऊस मात्र आपली हजेरी लावून आहे.
वाट पाहता पाहता महेंद्रची पावले स्टेशनवरच्या विश्रामगृहाकडे वळतात. पूर्ण आयुष्यच असे कुणाचीतरी वाट बघण्यात जाणार आहे तिथे एवढ्याश्या वेळेचे ते काय !
ती तिथेच आहे. तशी तर ती त्याच्या मनातही आहे.
दोन प्रेमात असलेल्या व्यक्ती लांब जातात. आधी मनाने मग शरीराने. शरीराने लांब जाणे ह्याला या समाजात नात्याची इतिश्री मानतात पण माणूस जेव्हा शरीराने लांब जातो, तेव्हा ती रिकामी जागा अस्वस्थ करते. Jigsaw कोडे माहित आहे न ? कॅनव्हासवर काढलेल्या सुंदर चित्राचे, हवे तसे करवतीने तुकडे पाडायचे आणि विखरून द्यायचे. नंतर ते गोळा करून चित्र जुळवायला घ्यायचे पण चरे असतात की. ते सांधता येत नाहीत ; .. त्यात एखादा तुकडाच हरवला की लागलेली चुटपुट वेगळीच. .. ती तर फार त्रास देते.
माणसांचे तसेच. चालती बोलती माणसे अशी निघून जातात आणि मग ती रिकामी जागा मनाला कुरतडून टाकते ..
घडलेल्या घटना आठवणी बनून डोळ्यातून वाहू लागतात .. अविरत ..
हा असा वांझ पश्चाताप आतल्या आत पोखरत जातो.
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला
संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा
पावसाचा हा सूर यशवंत देवांनी अचूक पकडला आहे.
माणसे एकटी राहतात कारण त्यांचा स्वभाव असे मला इजाजत बघताना वाटले होते. माया काय , महेंद्र काय ही माणसेच खोटी. आता वाटते , नाही तसे नाही. ही खोटी नाहीत. बरी वाईट कशीही असतील पण ती खोटी नाही. बहुतांश माणसे एकत्र राहतात कारण त्यांना आपल्या भावना लपवणे जमते. प्रत्येकाचे अजेंडे असतात ना जगण्याचे. निखळ असे कुणालाच जगता येत नाही. मग ते जगण्यासाठी जी साथ असते. तिला पकडून चालायचे. एकमेकांशी बोलत, कधी नजर चुकवत , कधी शब्द गिळत ..
ज्यांना हे जमत नाही ती एकटीच राहतात ..
आपले काय चुकले हे सुद्धा त्यांना समजत नाही कारण त्यांना स्वतःपासून पळता येत नाही.
संपत आलेल्या या पावसाची संतत धार फार त्रास देते. ही रिपरिप अंघोळ करून स्वच्छ झालेल्या रस्त्याला परत चिखलात माखून टाकते. या अशा पावसात बाहेर जायचं म्हणजे अंगावर, कपड्यावर फक्त चिखलाचे शिंतोडे उडवून घ्यायचे. हा पाऊस ना धड भिजवतो , ना धड कोरडं ठेवतो.
ग्रेस ची दुसरी कविता सुद्धा अशाच दुखऱ्या जखमेची.
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघांत मिसळली किरणे हा सूर्य सोडवीत होता..
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |
हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटीमुळे असेल ; यात आई मृत्युमुखी पडली असा आभास निर्माण होतो पण वास्तव वेगळे आहे. यातील आई स्वतःच्या शरीर जाणिवांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली आहे. मातृत्व हरले आहे पण स्त्री उरली आहे.
मृत्यूचे दुःख वेगळे असते. जे घडले आहे ते अपरिहार्य म्हणून टाळता न येणारं. त्या दुःखाचा निचरा रडून होतो कारण कुणाला दोष देता येत नाही . आलेले पोरकेपण हे नियतीने पदरात घातलेले .
इथे तसे नाही . स्वतःच्या मर्जीने मुलाला नाकारून एक आई, , मादी म्हणून उंबरठा ओलांडून गेली आहे. हा सुद्धा सामाजिक नियमाचा मृत्यूचं. आता घरी परतणे तिच्या हातात नाही ..
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता
सावध वारा म्हणजे असंवेदनशील जग. सामाजिक उपहासाचे किती अचूक वर्णन आहे हे.
त्या बालकाच्या आईचा मृत्यू नाही आहे हा, हा वात्सल्याचा अंत आहे. आई ह्या नात्याचा पराभव आहे. आता त्याच्या आठवणीत आईचे मातृत्व उरलेले नाही. तिचे स्त्रीत्व , आई या शब्दाशी जोडले गेले आहे.
हा आक्रोश आहे तो वात्सल्य खोटे ठरल्याचा. हे पोरकेपण , नसलेल्या वात्सल्याने त्याच्या माथ्यावर लिहिले आहे.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता.
हा असा रिमझिम पडणारा पाऊस म्हणजे मनातली अस्थिरता. मनातला कोलाहल.
तो जगाला दाखवता सुद्धा येत नाही. स्वतः ग्रेस ने हा अर्थ नंतर नाकारला.
निनादणे किती सुंदर शब्द आहे हा !
. ऐकलेले सूर मनाला एवढे स्पर्शून जातात की लौकिक अर्थाने ते संपले तरी मनाच्या कोपऱ्यात दडून राहतात. कानात गुंजत राहतात. किती सुंदर अचूक शब्द आहे हा . एखादी सुरावली एका क्षणात मनाला स्पर्शून जाते ..तो क्षण तर कालौघात विसर्जित होतो
पोरक्या असणाऱ्या दुःखाचे गाणे हे अशाच नकोशा पावसासारखे !
काही कविता गायला आयुष्याची संध्याकाळ उजाडावी लागते. मागचा रस्ता पुसलेला आणि पुढची वाट संपत आली …अशा वेळी कविता समजतात. जे घडले आहे ते आपण घडवले आहे आणि जरी ते आपण घडवले नसेल तरी न घडण्यासाठी आपण काहीही केले नाही , किंवा आपल्याला जमले ही नाही , हे जेव्हा उमजते तेव्हा आपोआप घटनांचे उत्तरदायित्व स्वतःवर घेण्याइतपत आपण मोठे होतो. आयुष्याचा स्वीकार करणे जमले की हा असा थकलेला पाऊस तृप्तीचा अनुभव देतो .
सलील कुलकर्णीचे हे फार हळवे गीत आहे.
ह्यात आक्रोश नाही , खंत आहे पण तक्रार नाही ..जे घडायला हवे होते ते फक्त त्याच्या मनात गुणगुणत आहे .
पाऊस असा रुणझुणता

पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना, चाहुल विरत गेलेली
पाऊस असा रुणझुणता
ओले त्याने दरवळले, अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध, निःस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझुणता
पाऊस सोहळा झाला
पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा
कधी उधाणता अन् केव्हा थेंबांच्या संथ लयीचा
पाऊस असा रुणझुणता
पाऊल भिजत जाताना चाहुल विरत गेलेली
नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला
गात्रांतुन स्वच्छंदी अन् अंतरात घुसमटलेला
पाऊस असा रुणझुणता
जगण्याच्या झटापटीत वादळे येतात. चुका होतात, वाद होतात, माणसे दुरावतात तरीही हे घेतलेले व्रत आहे ते निभावण्याकरता बरच काही विसरावे लागते, नजरेआड करावे लागते …दुसऱ्यांना आणि स्वत:लाही माफ करावे लागते.
बेरीज आणि वजाबाकीच्या या खेळात, बाकी प्लस मध्ये येण्यासाठी समजून उमजून केलेली ही तडजोड नेहेमीच वाईट नसते. हे जेव्हा उमजते तेव्हा मनात झिरपणारा, मन स्वच्छ करणारा, आठवणीचाही सोहळा करणारा हा पाऊस असाच समजूतदार असतो.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

किती तरल भावना अन् आठवणी कवितांच्या आठवणीतून मांडल्या! छान आहे लेख
पाऊस आठवणींना जाग देतो Vaishali 🙂
प्रिया,
आठवणींचा ही सोहोळा करणारा समजूतदार पाऊस…
आहा..
खूप सुंदर ❤️ ❤️ ❤️
Vidula, Thank you so much 🙂
फारच सुंदर लिहिलंय तुम्ही, ग्रेसच्या कविता समजायला अवघडच पण तुमचा लेख वाचताना अर्थ उलगडत जातो. खुपच आवडलं.👌👌
Thank you:)
फार तरल आणि गोड उकल केली आहे भावनांची. नेहेमीप्रमाणे लेख सुरेख लिहिला आहे तुम्ही
Thank you so much Rahul.
पाऊस आणि त्यावरची गाणी किती सुंदर रित्या उलगडून दाखवलं आहे तुम्ही प्रियाताई. ही गाणी यापूर्वी कितीदातरी ऐकली पण त्यांचा नेमका अर्थ तुमचा लेख वाचल्यावर कळलं.
Coming from such an accomplished writer like you . Thank you Deepa 🙂
खूप सुंदर पावसाच्या कवितांची रिमझिम शब्दात मांडलीत…..
पाऊस लेखणीला बळ देतो 🙂
खूप सुंदर पावसाच्या कवितांची रिमझिम लेखणीत बहरली…..
Thank you so much Manju ji.
काय सुरेख लिहिलंय 👌👌👌💚
अप्रतिम !!
वाचताना शब्द समोर सरीसारखे आणि आठवणी मनात झरत असतात…
Thank you so much Kamini 🙂