Skip to content

पावसाच्या कविता 

मैत्रिणींबरोबर केलेली पहिली ट्रिप होती ती. आम्ही चौघी इंदौरला होतो. नवऱ्याचा फोन आला. काय चाललेय विचारायला असणार तर बॉम्बगोळा. “ बेडरूम मध्ये धो धो  गळतेय.  वरच्या मजल्यावरील काकांना  सांगायचे तर तेही बाहेर आहेत “
धक्काच बसला. इमारत व्यवस्थित.   दर तीन वर्षांनी ऑडिट आणि डागडुजी. गळके  छप्पर किती वर्षात अनुभवले.  त्या वर्षी पावसाची धडकीच भरली.
लहानपणी हे भिजके दुःख सर्वच इमारतीत असायचे. खालच्या मजल्यावरील घरांच्या जमिनीला ओल यायची आणि गच्चीखाली घर असेल तर छत चिंब भिजायचे.  पाणी बालदीत जमा करून आणि ओतून आम्माची कंबर धरायची. आम्हाला मात्र याची मजा वाटायची. वाळत घातलेल्या कपड्यांचा उपयोग करून आम्ही घर घर खेळायचो त्यावर पाण्याचे थेम्ब पडले की छोटेसे भांडे ठेवून त्यात पाणी गोळा करायचो. जे मोठे करतात त्याची नक्कल . मग खेळातले घर सुद्धा गळके लागायचे.
त्या वर्षी  हा पावसाळा एकदाचा सरूदे म्हणताना आम्माची तारांबळ  समजली.
पाऊस आणि शृंगार यांचे नाते, साहित्य, सिनेमा आणि कवितेने घट्ट केलेले असतानाही इंदिरा संत यांनी या नको झालेल्या पावसाचे रूप आपल्या कवितेत रंगवले आहे.

१)नको नको रे पावसा

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली;
नको नाचू तडातडा,असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी : माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून;

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन;
पितळेची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन;

खेडेगावातले कौलारू घर. जोराच्या पावसापुढे त्याचा निभाव तो काय लागणार! परसात लावलेल्या सायलीची वेल पार मोडून गेली आहे. होती, नव्हती ती भांडी सुद्धा कौलातून जागा शोधत , घरात येणाऱ्या पाण्यानी भरून गेली आहेत. अंगावरचे जुनेर सुद्धा ओले चिंब झाले आहे पण या कवितेच्या नायिकेला चिंता आहे ती तिच्या सख्याची. कामानिमित्त बाहेर गेलेला तो या पावसात अडकला आहे. त्रास देणाऱ्या या धटिंगणालाच ती शेवटी साकडे घालते.
“ माझ्या राजसाला काहीही इजा न करता सुखरूप घरी आण नी मग खुशाल हवा तसा धिंगाणा घाल. तुझ्या स्वागताची तयारी मी खास पितळेची लोटी वाटी ठेवून करेन.”
त्यात सख्याच्या डोळ्याला तेजस्वी विजेची उपमा दिली आहे हे फारच खास आहे.

पाऊस नकोसा होणे हा अपवाद. खरेतर पाऊस हा निसर्गाचा सर्वात सर्जनशील अवतार. लहानपणीचे “ येरे येरे पावसा,  तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा “  हे गीत निदान गेले चार पिढ्या घराघरात म्हंटले जात असेल.
मुलांचे ” येरे येरे पावसा ” सुरु झाले की त्या तालावर पावसाच्या टपोऱ्या थेंबांचे नर्तन सुरु व्हायचे . तेव्हा पाऊससुद्धा प्रामाणिक  होता  . पैसा  नाही दिला तरी वेळेवर यायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीचे शेवटचे दिवस पावसाची वाट पाहण्यात जायचे.  जून लागला की न चुकता आकाशात काळ्या ढगांची दाटी व्हायची आणि  सगळाच बालचमू गच्चीत जायचा. पहिल्या पावसात भिजायला आजीच पाठवायची. 
तेव्हा कुठे नायसील ?  घामोळे जायचा एकमेव उपाय म्हणजे पावसात भिजणे . गच्चीवर हा आरडाओरडा असायचा. आकाशात  ढगांचा आणि पृथ्वीवर आमचा.
वयाचे बंधन नसायचे. अगदी  वर्षाच्या शेंबड्या पोरापासून सर्वच बेधुंद होऊन नाचायचे.  ऍसिड रेन हा शब्दही ऐकला नव्हता तेव्हा. दहा जून ला शाळा सुरु व्हायची आणि पाऊस सुद्धा आमच्याबरोबर शाळेत जोमाने यायचा. 

नवीन युनिफोर्म, शाळेचे दप्तर , नवीन कोरी पुस्तके, ती भिजू नयेत म्हणून प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली. आजी छत्री वापरायला द्यायची नाही. आम्ही काय नमुने होतो त्याचा अंदाज होता तिला.  रेन कोट घालून स्वारी निघायची. पाऊस आमच्या बाहेर पडण्याचीच वाट पाहत असायचा.
येणारी जोराची सर रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे थारोळे करायची . त्यात पाय उडवत जायचे. .धारा मनसोक्त अंगावर झेलायच्या आणि गात्रा -गात्रात भरून घ्यायचा सळसळंणारा वारा.
पावसाचा हात हातात धरून आम्हीच पाऊस  व्हायचो.
गडगडणारे ढग,  कडकडणाऱ्या  विजा ,सोसाट्याचा वारा, मुळापासून हलणारी  झाडे हे सारे शब्द कानावर पडायचे खरे पण या शब्दाचा अर्थ समजायला आम्ही समुद्रावर जायचो.  रस्त्यावर साचलेल्या  पाण्यात पाय आपटून एकमेकांच्या अंगावर पाऊस नक्षी उमटवायचो . भर धुंवाधार पावसात चिंब भिजून  दमलो की टपरीच्या शेडमध्ये घुसून गरम रगडा पॅटिस खायचो.  दमून घरी येईपर्यंत, बरसून थकलेल्या पावसाची तालात तालात संततधार चालूचं असायची. 
रात्रीचा पाऊस आणि त्या गडगडाटात  मधेच चमकून जाणारी विजेची पांढरीशुभ्र रेघ पाहून मात्र अम्माच्या मनात धडकी भरायची . घरातील लोक बाहेर असतील तर ती  निरांजन  लावायची .विजेची नाही पण बाहेर राहणाऱ्या लोकांची काळजी वाटून मात्र आमच्याही मनात काहूर माजायचे मनातली भीती घालवण्यासाठी  मग आम्ही  काहीबाही प्रश्न विचारत असू .
श्रीनिवास खारकर यांची सुंदर कविता आहे.

२)चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।

टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।
ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।

फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?

मराठी साहित्यात बाल कवितांना फारसे स्थान नाही. लहानपणी अड्गुळे मडगुळे, बरे का ग नंदे …कावाचे घर शेणाचे अशी काही गाणी घराघरात ऐकू यायची पण त्याला गाणी म्हणायची का हा एक प्रश्नच होता.
त्यामुळे राजा मंगळवेढेकारांचे शब्द आणि मीना  खडीकरांचे स्वर यांचा नादमधुर संगम असलेली बाल कवितांची ध्वनिमुद्रिका बाल गोपालांसाठी पर्वणीच ठरली तर त्यात नवल ते काय! सर्वात महत्वाचे म्हणजे ही गाणी लहान मुलांनीच गायली होती ..त्यामुळे ती सर्वसामान्य मुलांच्या गळ्यातही लगेच बसली..

३)सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?
भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

लॉक डाऊनमध्ये सगळा रस्ता सुनसान. तो उठवल्यावर पहिला आलेला प्रवासी तो नंदीबैल. एवढे बरे वाटलेले  त्याला पाहून. दुःखद स्वप्न संपले का हा प्रश्न विचारावासा वाटला .
दोन महिने घराबाहेर पाऊल न ठेवणाऱ्यानी सुद्धा, शुभ शकुनच समजून,  धावत जाऊन त्याला पैसे दिले.
आजच्या मुलांना नंदीबैल माहित नसणार पण आम्हाला त्याचे खूप अप्रूप होते. खरच वाटायचे त्याला भविष्य माहिती आहे. काहीही न कळता मान हलवणाऱ्या  माणसांसारखा असेल असे थोडेच माहिती त्या वयात!
मी बालमोहन शाळेत होते आणि आमच्या शाळेचे एक वैशिष्ट असे की जर जोराचा पाऊस आला की  सुट्टी मिळायचीच.
बाकीच्या शाळेतील मुलांच्या नशिबात ही चैन नसल्याने ती आमच्यावर खार खात असत.
.त्यामुळे “शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का “ही मागणी त्यांची होती…
एक बरे होते , घराघरात आई असे आणि नसतील तर आजी तरी असायचीच. आजी असेल तर न मागताच हातावर लाडू मिळायचा 🙂
गणित आवडीचे होते. .त्या पेपरला सुट्टी मिळण्यापेक्षा दर दिवशी गणिताचाच पेपर ठेव अशी मागणी होती माझी .निदान भूगोल तरी वगळ अशी तरी.
आज एवढे पेपर देतो आपण. दर दिवशी नियती परीक्षाच घेत असते की पण तो नंदीबैल दिसतच नाही कुठे.
.तसा प्रत्येकालाच भोलानाथ यावासा वाटतो. आपल्या मनातील आशा जागवणारा भोलानाथ.
हव्या त्या कॉलेजला admission मिळेल का? नोकरी मिळेल का? बढती मिळेल का? पगार वाढेल का? ? भावबंध जुळतील का ?आणि जुळलेच तर टिकतील का? मुंबई शहरात घर मिळेल का? ट्रेन चुकेल का ?
काहीच नाही तर पोस्टला लाईक्स तरी मिळतील का ? 

लहानपणी, साचलेल्या पाण्यातून मुद्दाम उड्या मारत-मारत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, छोटे-छोटे रेनकोट घातलेल्या मुलांसारखाच पाऊस निरागस असतो, आणि नंतर कधीतरी वयात येऊन खट्याळ होतो. .
दहावीचा निकाल लागला होता. कॉलेजचे पहिले वर्ष. आता पहिल्या पावसात एकत्र नाचणे बागडणे थांबले असले तरी पहिल्या पावसाची ओढ काही कमी झाली नव्हतीच.  अशाच एका संध्याकाळी, गच्चीवर जाऊन धो धो पडणारा पाऊस अंगोपांगावर मिरवत असताना समोरच्या खिडकीकडे लक्ष गेले. दोन लुकलुकणारे अनोळखी डोळे हा पावसाबरोबर रंगलेला खेळ पाहत होते.
पंधरा एकदिवस आधीच, दहावीला मेरिट मध्ये आले म्हणून बिल्डिंगमध्ये एक छोटासा सोहळा केला  होता. ही समोरची खिडकी, दुसऱ्या  बिल्डिंगची पण आमच्या  गच्चीला अगदी लागूनच होती. त्यातील काकू, अम्माला ओळखायच्या.”पेढे दे हं”  असे प्रेमाने बजावल्याने मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या  घरी गेलेले.
“ इंजिनीरिंगला जायचे आहे  न, मोठा याच वर्षी आयआयटी  ला गेलाय. दुसरा आता बारावीला आहे.पुढच्या वर्षी त्याची पुस्तके देते  तुला “
आयआयटी जरा जास्तच आहे हे तेव्हाही माहित होतेच पण  जवळ एवढा हुशार मुलगा असून माहित नाही म्हणजे काय असे काहीतरी मनात आले.
तसा इंटरेस्ट नव्हताच. बॅचमधेच जाणारे होते…त्यात आवडणारे होते आणि उगाच सगळीकडे खडे  मारायची इच्छा  नव्हती तरीही ते डोळे पाहिल्यावर  हेच का आयआय टी वाले हे जाणवून अगदीच ऑकवर्ड झाले.एकही शब्द नंतरही बोलणे  झाले नाही पण गच्चीवर जाऊन भिजणे कायमचे बंद  झाले.

अजाणत्या वयात नक्की काय बदल होतो तो समजत नाही पण शरीरातील बदलाबरोबर मनाच्या संवेदना सुद्धा जागृत होत असतात. आमच्या वेळी, निदान मुलींच्या  थोड्या सुप्तावस्थेत होत्या. मुले कदाचित थोडी बोल्ड होती तरीही आतासारखे डायरेक्ट आती क्या खंडाला विचारण्याची हिंमत नव्हतीच. असेच  चोरून पाहणे , क्वचित थोडीशी थट्टा, गालावर चापट पडणार नाही एवढी माफक ..
हा मिस्कीलपणा आणि आकर्षण अनिलांनी  आपल्या कवितेत फार सुंदर   उतरवले आहे.

४)रान राणी


पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्याफ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून …

कवी अनिल, प्रेमभावनेचा अविष्कार साधताना सभोवतालच्या निसर्गाला आपल्या कवितेत आणतात. मानवी भावभावना आणि निसर्गाचा सुसंवाद या कवितेत आला आहे.इथे पाऊस आहे तो आणि रानराणी , सृष्टी बनली आहे त्याची ती.
आपल्या प्रेमवर्षावात पावसाने  सृष्टीला पूर्ण भिजवून टाकले  आहे. आधीच ओलेती झालेली ती त्याच्या पाहण्याने  अजूनच अवघडून गेली आहे.  तिचा शृंगार तर पाहावा पण कुठेही तिला संकोच वाटू नये म्हणून आडोशाला राहून दुरूनच पाहावा याला आताची  पिढी पिपिन्ग टॉम म्हणेल बहुतेक,पण त्याचा खोडकरपणा आणि तिची संयमी , लाजरी वृत्ती याचे सुरेख दर्शन  या कवितेत आले आहे.

ना घ देशपांडे यांच्या कवितेतील प्रेमी हे पती पत्नी असतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा अत्यंत प्रेममय आणि समाधानी असल्याने असेल, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उतरले आहे.
ना घ यांच्या तारुण्याच्या काळात भारतीय संस्कृतीत पती पत्नी हे लग्नांनंतर एकत्र येत. सहवास नव्हताच आणि अनेक वेळा तर विवाहाच्या आधी तर बोलणे सुद्धा झालेले नसायचे.  एकमेकांना अपरिचित असे ते दोघे मिलनाच्या रात्री जेव्हा एकत्र येत असतील, तेव्हा त्यांची मनस्थिती काय असेल !
इथे सूर जुळणे महत्वाचे नाहीतर त्याचा ओरखडा पुढील सहजीवनावर पडतो.  “शब्द थबकले” ही एका समंजस पतीची कविता आहे.
स्त्रीच्या मनातील वादळाची कल्पना असल्याने तो म्हणतो,

५)शब्द थबकले


दार उघडून आत, आलीस भीत भीत
आत होते मुकेखुळे एकांताचे जुळे गीत

रात्रीचा अंधार तिच्या मनात सुद्धा दाटून आला आहे. संकोच , भीती आणि आतुरता ह्या तिन्ही भावनांचा मेळ असणारी ती पहिली रात्र. पुढे काय होणार याची हुरहूर मनाला लागली असताना , दबक्या पावलांनी ती शयनगृहात प्रवेश करते.

जरी प्रेममीलनाची आत होती लगबग
वाट पाहत थांबला , श्रावणाचा निळा ढग

बरसायला उत्सुक असलेल्या श्रावणातल्या त्या निळ्या ढगासारखी प्रियकराची स्थिती झाली आहे, तरीही योग्य क्षणापर्यंत थांबण्याचा त्याचा संयम खरोखर कौतुकास्पद आहे.
आषाढातल्या आतुर धुसमुसळ्या काळ्या ढंगाची उपमा कवीने दिली नाही. निळा रंग आणि श्रावण महिना सुद्धा किती योग्य उपमा आहे. त्यांच्या त्या संयमाने निर्धास्त होऊन हळूहळू तिची कळी खुलते. ती प्रतिसाद देऊ लागते.

येत जवळ जवळ कळी  उमलली तुझी
हळूहळू भीत भीत , प्रीत उजळली तुझी

शब्द थबकले तुझ्या थरथरत्या ओठात
होता हाती माझ्या तुझ्या चुडे भरलेला हात

अजूनही तिचे शब्द त्याच्या हालचालींचा मागोवा घेत उमटत आहेत. थोडी लज्जा, थोडे भय या संभ्रमात पडलेली ती कितीही आकर्षक वाटली तरी आपला धसमुसळा स्वभाव बाजूला ठेवून तो तिला आश्वस्थ करतो. चुडा भरलेला हात घेतांना तिच्या मनाला जपण्याचे आश्वासन देतो . भावी संवादपूर्ण सुखी सहजीवनाची ती सुरुवात असते.
 
सर्वसामान्यतः वसंत ऋतुला कवींनी झुकते माप दिलेले आढळते. बा भ बोरकर यांचे निसर्गभान मात्र असे सांप्रदायिक नाही. सहाही ऋतू आणि बाराही महिन्यांचा गौरव त्यांनी कवितांतून केलेला आढळतो. त्यांच्या पावसावरील कविता म्हणजे तर आळविलेली पर्जन्यसूक्ते.
पर्जन्याची उन्हाळी पावसाळी सर्वच रूपे त्यांना त्यातील गती स्थिती सकट वेधून टाकतात. याचा प्रत्यय अगदी शाळकरी जीवनात मला आला. खरेतर कविता हा विषय फार आवडीचा नाही. शाळेत तर अगदीच कंटाळा पण बोरकरांच्या “जलद भरुनी आले” या कवितेने मात्र मनावर जे गारुड घातले की ही अजूनही पाठ आहे. असे म्हणतात, मेघ मल्हार गायला की पाऊस पडत असे . सुरांची किमया कुणीच नाकारत नाही पण या कवितेच्या जलद गती शब्दांत ती जादू आहे.
आम्ही सहावीत असू. पाठयपुस्तकात ही कविता होती. शिकवताना बाई म्हणाल्या, “ प्रिया , चाल लाव न याला “
त्याच वेळी सारंग रागातील “ नभ मंडळ मेघांनी भरले , असय तेज रवीचे निमाले “ ही चीज शिकत होते. त्याच सुरावटीत या कवितेला चाल सुचली . ऐकल्यावर बाई हसत म्हणाल्या , अग ही कविता आहे, तुझे शास्त्रीय गायन नाही , ही कुणाला येणार !” पण आताही मला ती चाल आठवते आणि ह्या कवितेला हीच चाल लावून मी गुणगुणते.

६)गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

आकाशात गडद निळे ढग अवतरले आणि कवीचे सुद्धा हृदयाकाश भरून आले. धरतीचा सुरुवातीचा प्रतिक्षेचा क्षण आणि नंतरचा तृप्तीचा क्षण किती अचूक शब्दांत पकडला आहे. अत्यंत आनंदी आणि उत्स्फूर्त अशा या कवितेचा शेवट मात्र वात्सल्य आणि आशीर्वच या शब्दांनी अध्यात्माकडे सरकला आहे.
पावसाला आपण भावनांच्या आविष्कारात बांधून ठेवले आहे पण ही कविता मात्र माणसाच्या मनाचा नाही तर पावसाचा रंग दाखवणारी आहे . बोरकरांच्या ज्या काही पावसाच्या कविता आहेत त्यात त्यांनी निळ्या रंगाविषयी अत्यंत कल्पकतेने आपल्या उत्कट आणि तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. हा निळा रंग आहे श्रीकृष्णाचा. चराचरात कृष्ण कसा भरलेला आहे ते आपल्या प्रतिमांच्या रूपाने दाखवतात. हे श्रीकृष्णमय झालेले निळेपण एवढे प्रभावी आहे की त्यांना काळे ढग निळे वाटतात, पावसाचा पांढरा शुभ्र रंग सुद्धा निळाई घेऊनच धरतीवर उतरतो.

प्रेम आणि पाऊस, मजा आणि पाऊस , विरह आणि पाऊस अशा अनेक शब्दांच्या, पावसाबरोबर जोड्या जमल्या आहेत. त्यात वात्सल्याशी तुलना केलेला पाऊस ही ग दि माडगूळकरांची देणगी आहे. मुळातच सृजनशील असणारा पाऊस त्यांच्या लेखणीला नवा आयाम देतो.
वात्सल्य म्हंटले की माझ्या डोळ्यासमोर माझी आजी, आम्मा येते. आई सुद्धा प्रेमळ पण वाढले मी अम्माकडेच. माझे खाणे पिणे, आजार, लाड सगळे सगळे आठवले की करणारा हात आम्माचा असतो. आम्मा गेली सुद्धा भर पावसात.
“ ती काय आजची रात्र काढणार नाही. हॉस्पिटल मध्ये नेऊ नका” असे डॉक्टरांनी सांगितल्याने आम्ही रात्रभर अम्माच्या शेजारी बसून होतो. गेली दोन वर्षे एवढी वाईट आणि वेदनादायी होती की देवा सोडव असेच सर्वांच्या मनात होते. तरीही जिने आपल्याला जगवले, तिच्या मृत्यूची वाट पाहत बसणे हे नको नकोसे होणारे.
त्यावेळी सुद्धा असाच कोसळणारा पाऊस सोबतीला होता.
ग दि मा यांची “ माउलीच्या दुग्धापरी” ही कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती. तेव्हा ती कितपत आवडली होते ते माहित नाही पण आता ही कविता ऐकली की आपल्या डोक्यावर तिचा हात आहे असा अजूनही भास होतो. वळिवाचा पाऊस आला की ग दि मा म्हणतात,

७)माउलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार,

माउलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम, तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला, मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा, तसा झाडाझुडूपांत
पिऊनिया रानवारा,खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध, स्तब्ध झाले आपोआप
अवखळ बाळापरी, पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी, थेंब टपोरे झेलीत
धारा वर्षतां वरुन, बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा, गाय वत्साला बोलवी

क्रमश:

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


12 thoughts on “पावसाच्या कविता ”

  1. Shalmali Gokhale

    पावसाचा धिंगाणा अगदी डोळ्यासमोर आणलास. प्रिय माणसं पावसातच का जातात कळत नाहीत. पावसाळा आला की भीतीच वाटते. शिवाचं रौद्र स्वरूप सृष्टीला काबीज करतं. लेख छान प्रिया. 💐💐

    1. किती सुंदर लिहीलंय .सगळं डोळ्यासमोर आलं .पुढच्या भागाची प्रतिक्षा .तुझा प्रत्येक लेख खूप आनंद देऊन जातो गं

    2. खरंय.
      Thank you Shalmali:)

      पावसाळी हवामान असेल , अपघात होतात , माणसे आजारी पडतात. सृजनाचा ऋतू असा काळ बनून पुढे ठाकतो हे खरंय

  2. प्रिया,

    पावसाचे नर्तन डोळ्यासमोर आले.
    ☔☔
    बाल गीते ते रान गाणी
    खूप मोठा कॅनव्हास आहे.
    क्रमशः आहे म्हणजे अजून लेख येतील.
    आतुरतेने वाट पाहते.

    1. Thanks dear Vidula .
      पावसाचा मूड कसाही असो , मला पाऊस मात्र आवडतो. रडायला , हसायला , नाचायला पावसासारखा सोबती नाही.

  3. किती सुंदर लिहिलंय . बालपणात नेलं, तारुण्यात नेलं आणि भावनांमध्ये चिंब भिजता आलं . खूप छान !

  4. वाह मस्त लेख, वाचून आनंद, समाधान, चिंब भिजल्याचा आनंद !!!
    आला आषाढ श्रावण
    आल्या पावसाच्या सरी
    किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी
    अशी अवस्था झाली वाचून.
    प्रिया दी च्या लेखणीत
    शब्दसरींची करामत
    शब्द करती झिम्मड नर्तन
    झरती कैसे दिमाखात

    1. Thank you Kamini.
      पावसाचा मूड कसाही असो , मला पाऊस मात्र आवडतो. रडायला , हसायला , नाचायला पावसासारखा सोबती नाही.

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *