पावसाळ्याची चाहूल लागली की आजी खूप अस्वस्थ व्हायची. तिच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला होता ते माहित नाही पण ढगांचा गडगडाट आणि विजांचा थयथयाट सुरु झाला की ती अतिशय घाबरायची. दारे खिडक्या घट्ट बंद करून देवाला निरंजन लावून बसायची. खरेतर अतिशय धीट आणि आयुष्यात एवढ्या वाईट प्रसंगांना सुद्धा धीराने तोंड देणारी माझी आम्मा, आकाशात चमकून जाणाऱ्या वीजेला घाबरतेच कशी हे कोडे होते मला. तिचे सगळे ऐकणारी मी पावसाच्या बाबतीत मात्र अजिबात ऐकायची नाही.
माझे आणि पावसाचे मात्र गेल्या किती जन्मापासूनच जिव्हाळ्याचे नाते असावे. विजांची पुसटशी रेष जरी चमकून गेली की माझे पाय गच्चीकडे वळतात. पहिला पाऊस आज गेली कित्येक तपे अंगावर रोमांच उमटवतो. मुंबईचा पाऊस, चिखल , उशिरा येणारी ट्रेन, ट्रॅफिकने झालेला खोळंबा, न सुकणारे कपडे, घरात रेंगाळणारा कुबट वास, विजेच्या तडाख्यात सापडल्याने झालेला मृत्यू अशा नकोशा बातम्या …या कशाचाही माझ्यावर परिणाम होत नाही. क्वचित बातमी वाचून दडपण आलेच तरी ज्या क्षणाला वीज कडाडते, माझी पावले मलाही न जुमानता बाहेर पडतात.
आकर्षणाला तर्कशास्त्रात उत्तर नाही. ४६ गुणसूत्रांबरोबरच ही ओढसुद्धा जन्माबरोबर मिळत असावी. नाहीतर पृथ्वी तलावावरील असंख्य माणसात एकच माणूस मनात जागा करून बसतं त्याला काय स्पष्टीकरण असणार!
एका क्षणाला लक्षात येते की आपल्याला कुणीतरी खूप खूप आवडून गेलेय. त्या व्यक्तीला आपण ओळखतो , किती ओळखतो हे गौण असते. प्रेम आणि आकर्षण यातही फरक आहे. प्रेम ही क्रिया आहे. ती केलेली निवड आहे. प्रेम ठरवूनच केले जाते आकर्षण ही भावना , ती सहज होते आणि म्हणुनच अल्पायुषी असते.
आकर्षण का होते याला काहीही उत्तर नाही. केवळ सुंदरताच आकर्षून घेते असेही नाही, ऐश्र्वर्या न आवडणारे असंख्य आहेत. अनेक वेळा असे होते की काही माणसे आपल्या आयुष्याला काहीतरी देतात. त्यांचे असणेच उत्तेजित करते. They enhance the quality of our life. एखाद्याचा आवाज सुद्धा आकर्षून घेतो , किंवा स्वतःत असलेला आत्मविश्वास , एखाद्याचे हसणे किंवा साधे असणे सुद्धा मोहात पाडते आणि मग सर्व गुण जुळून आले की त्याचे प्रेमात रूपांतर होते.
आता पावसाचा विषय आल्यावर गाडी प्रेमाकडे का वळली तर पाऊस आणि प्रेम यांचे सुद्धा गेल्या अनेक जन्माचे नाते आहे. वातावरण अंधारून आले तर एकाकीपणाची भावना अस्वस्थ करून जाते आणि म्हणून असेल कुणाच्यातरी आगमनाची प्रचंड ओढ लागते. पहिले प्रेम अनेकवेळा पावसात होते याचेही उत्तर हेच असावे. तरुणीचे ओलेते अंग हे निमित्त्त. धरतीला कुशीत घेऊन ओलाचिंब करणारा पाऊस साद घालायला भाग पाडतो .
पावसाच्या गाण्यांवर मी आधी काही पोस्ट लिहिल्या आहेत पण ही पोस्ट आहे ती न भिजता गायल्या गेलेल्या गाण्यांची.
शरिराला नाही तर मनाला चिंब चिंब करून टाकणारा पाऊस ह्या गाण्यांत आहे.
पुरुषांना नक्की काय आवडते हे सांगणे कठीण आहे तरीही काही गोष्टीचा मोह आवरणे कठीण होत असावे. Curvy and lovely always wins . शिवाय मोकळे हास्य, स्वतःला शोभणारे कपडे, आवाज, Right makeup, गंध, संवाद साधण्याची कसोटी पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे संभाषणात ऐकण्याची क्षमता. अर्थात स्वतःचे वय हा सुद्धा महत्वाचा घटक आहेच.
जेव्हा अनुभव नसतो आणि when you have raging hormones at work , then one can even fall in love with a girl over an expression.
पावसाळी रात्र वाहनांचाच नाही तर हृदयाचा सुद्धा अपघात घडवते.
१)ज़िन्दगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
( सिनेमा-बरसात की रात, संगीतकार-रोशन, गीतकार-साहिर लुधियानवी, आवाज-मोहम्मद रफी, कलाकार-भारत भूषण )
काव्य क्षेत्रात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करणारा अमन, अवचित आलेल्या पावसात एका घराच्या वळचणीचा आश्रय घेतो. बाहेरील आसमंत गारगार झालेला असतो. वादळ साद घालत असते. ढगांचा गडगडाट , विजेचा अकस्मात चमकून जाणारा लोळ , चिंब भिजलेला निसर्ग काहीतरी सांगत असतानाच, ती येते.
पहिला पाऊस शरीरावरची आणि मनावरची देखील धूळ झटकून टाकतो आणि कवीच्या प्रतिभेला जाग येते.
हाय वो रेशमी जुल्फ़ों से बरसता पानी
फूल से गालों पे रुकने को तरसता पानी
दिल में तूफ़ान उठाते हुए जज़्बात की रात
ज़िन्दगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
पावसाचे आणि प्रेमाचे काहीतरी नाते आहेच. वेधशाळा कितीही प्रगत झाल्या तरी पावसाचे भाकीत करू शकत नाहीत; तसेच मनावर ताबा असण्याचा दावा ही कुणी करू नये. तापलेल्या शरीरावर पडलेले पावसाचे थेंब शरीराला तृप्त करतात आणि अस्वस्थ , अशांत मनाला आश्वस्थ करणे प्रेमाला जमते.
अमन आणि शबनम ची प्रेमकथा पावसाच्या आशीर्वादाने फुलू लागते. आकाशात कडकडणारी वीज जो काही कल्लोळ उडवून देत असेल ते असो पण असे अचानक चमकून जाणे तिला भयभीत करून जाते. आधारासाठी तिचे जवळ येणे, नजरेला नजर मिळणे, तिचे भांबावून जाणे आणि त्याचे मात्र आयुष्यभरासाठी हृदय गमावून बसणे.
डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात
“एक अन्जान हसीना से मुलाक़ात की रात”
बाहेर कोसळत असलेला पाऊस आणि जवळ ओलेते आरस्पानी सौदर्य. मधूबालेला पडद्याच्या मागे पाहूनही मनात कळं उठते आणि हाताच्या अंतरावर असे काहीं माधुर्य असेल तर काय मनाची स्थिती होत असावी ?
साहीरने कोणाच्या आठवणीत लिहिले असेल हे गीत!
गीत कुठे? एक एक फ्रेम जिवंत करणारे, शब्द -चित्र आहे हे. खूप लोकांना भारत भुषणचा हेवा वाटत असेल, रागही येत असेल पण माझे मात्र हात जोडले जातात …
खजुराहो शिल्पे तर खूप प्रसिद्ध आहेत. माहित आहे का ती मंदिराच्या बाहेर का आहेत ?
ती पाहूनही ज्यांचे मन चळत नाही तेच मंदिरात जाण्यास योग्य अशी कल्पना आहे त्या मागे आणि इथे तर हे चालते ,बोलते सजीव शिल्प. ते पाहूनही जर माणसाच्या चेहेऱ्यावर सात्विक निवृत्ती असेल तर !दिव्यत्वाची जेथ प्रचीती आणि कुठली असणार!
रफीजींचा आवाज सुद्धा मदनाला जागृत करू शकत नाही . असो .
२) रिमझिम गिरे सावन
( सिनेमा-मंझिल, संगीतकार- आर डी बर्मन, गीतकार -, आवाज-किशोर कुमार, कलाकार-अमिताभ बच्चन)
मंजिल या सिनेमात नायक आणि नायिकेची भेट, पावसाच्या नाही पण पावसाच्या गाण्याच्या संगतीने होते.
गाडीचा टायर पंक्चर झाल्याने नायिका, टॅक्सीच्या शोधात निघते. भर दुपारची वेळ. कार्यक्रमाला उशीर होणार म्हणून तिची तगमग आणि त्यात पाठीमागून पावलांचे आवाज. त्यातली घाई तिला जाणवतेय. रस्ता निर्मनुष्य. आता मात्र ती घाबरते. आपला पाठलाग होतो आहे का? हा चोर असेल का? मनात शंकांचे वारूळ. त्याला मात्र तिच्या मनातल्या भीतीची जाणीव सुद्धा नाही. हळूहळू त्याच्या पावलांना वेग येतो आणि तिलाही मागे टाकून तो पुढे निघून जातो.
आपल्या वेड्या मनाला ती हसते खरी, पण त्या मनात, त्यानेही हलक्या पावलाने प्रवेश केला असतो.
नशिबात असेल तर योगायोग सुद्धा जुळून येतात. ज्या ठिकाणी तिला पोचायचे असते, तिथेच तो सुद्धा आमंत्रित असतो.
सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या ” रिमझिम गिरे सावन ” या गाण्यात कुठेच पाऊस नाही. तिच्या मनात मात्र बरसतो आणि पावसाचे गीत सादर करणारा, तोसुद्धा अलगद रुतून बसतो.
जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे
अरमाँ हमारे पलके न मूंदे,
पावसाच्या थेंबाचे नर्तन धरतीला भिजवत असतानाच, एका अगम्य भावनेने तिला स्पर्श केला आहे.मनाच्या या अस्वस्थतेत झोप कुठे येणार! मग त्याच्या स्वप्नांना तरी प्रवेश कुठे मिळणार!
कैसे देखे सपने नयन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…
हे गीत गातो आहे नायक पण या गीताची अनुभूती मात्र तिची. शब्द आणि सूर त्याचेच पण त्याचा अर्थ मात्र तिच्यासाठी जिवंत झाला आहे.
महफ़िल में कैसे कह दें किसी से
बंध रहा है किस अजनबी से
हाय करें अब क्या जतन, सुलग-सुलग जाए मन
प्रेमात पडण्याची क्रिया गूढच असते. ते का होते, एका विशिष्ट व्यक्तीविषयीच ओढ का वाटते, याला तसे शास्त्र नाहीच. ते घडायचे तेव्हा घडते. अगदी एका नजरभेटीत सुद्धा हृदय गमावण्याच्या घटना घडतात. अजिबात शक्यता नसताना, मन भलतीकडेच असताना, समोरचा ओळखीचा नसताना सुद्धा, मन चोरून नेतो आणि त्या अनुभवाची वाच्यता सुद्धा कुणाकडे करता येत नाही. स्वतःलाच जिथे समजत नाही, तिथे दुसऱ्यांकडे मन तरी मोकळे कसे करणार!
पहिला पाऊस आणि पहिले प्रेम लाजरेच. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणारे. एकमेकांच्या मनाचा कानोसा घेणारे . हलक्या पायाने येणारा हा पहिला पाऊस, होकार मिळाल्यावर मात्र उधळतो. वाजत गाजत बरसतो.
“रिमझिम गीरे सावन” हे गीत जेव्हा दुसऱ्यांदा वाजते, तेव्हा त्याच्या जोडीला धुंवाधार पाऊस असतो. मला हे गीत लता बाईंच्या आवाजात पाहायला आवडते तर किशोरच्या आवाजात ऐकायला. पहिल्या गीताला किशोरचा आवाज आहे. शांत, गंभीर, तिला विचार करायला, सावरायला वेळ देणारा आश्वासक आवाज.
३)तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया
( सिनेमा-हंसते जख्म, संगीतकार-मदन मोहन, गीतकार-कैफी आझमी, आवाज-मोहम्मद रफी, कलाकार-नवीन निश्चल, प्रिया राजवंश)
रफी आणि मदन मोहनचे हे सर्वात सुंदर गीत आणि कितीही प्रयत्न केला तरी प्रिया राजवंशचा दगडी चेहेरा मला नजरेआड करता येत नाही . हे गीत ऐकावे ते without video .
“Now that I have found you, it seems I have found the world “
” मिल गया ” हा या गाण्यातला महत्वाचा शब्द
It expresses the” passionate conviction” of the hero that he has met his soulmate . श्रीमंत घरातील हा मुलगा पण आयुष्याला दिशा नाही. एक भरकटलेले जीवन आणि भरलेल्या जगात जाणवणारे एकटेपण. कुठेतरी स्थिरावे असा किनारा नाही आणि ती येते.
तुम जो मिल गए हो
तो ये लगता है कि जहां मिल गया
हा नायक प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे आणि ती आहे वेश्या. त्याच्या मनात खळबळ आहे. समाजाच्या ज्या परंपरा आहेत, ज्या ठोस समजुती आहे त्याच्या विरुद्ध जी विद्रोहाची भावना आहे, ती त्याला या मुलीकडे खेचून घेते. तिच्या व्यवसायाशी त्याला काही देणेघेणे नाही कारण जगाकडून तो सुद्धा नाकारला गेला आहे.
तुम भी थे खोए-खोए, मैं भी बुझा-बुझा था
अजनबी ज़माना, अपना कोई न था
दिल को जो मिल गया है तेरा सहारा
इक नई ज़िंदगी का निशां मिल गया
आयुष्याच्या चक्रव्युहात फसलेले दोन अनोळखी जीव . अपघाताने एकत्र येतात आणि आयुष्य उजळून निघते.
मदन मोहन च्या संगीताला एक haunting quality आहे . हे गाणे सुद्धा अपवाद नाही . यातली symphony , वाद्यांचा मेळ सुद्धा वेगळाच . कडव्या नंतर बदललेल्या chords आणि rhythm हा प्रयोग सुद्धा नवीनच . सुरुवातीला वेगळे बसलेले ते दोघे दुसऱ्या कडव्याच्या सुरुवातीला एकत्र येतात आणि तेव्हा ताल आणि स्वर बदलतात . It symbolizes the togetherness when the socio-stigmatic barriers crumble .
जेव्हा पुरुष स्वतःचे हृदय उघडे करतो, मन मोकळे करतो तेव्हा त्याला कोणताही अडथळा नको असतो. कोणताही आडपडदा न ठेवता वागणे हे अतिशय अवघड असते. नाजूक क्षण असतात ते जेव्हा त्याला स्वतःलाच असुरक्षित वाटते. कोणीही मन दुखावेल अशी भीतीही. When he is opening up about something, he wants his woman to offer him feedback if he asks or seems receptive, but for the most part he just wants to express himself.
लता मंगेशकर या गीताच्या फक्त शेवटी गाते.
तुम जो मिल गये हो
तिच्या आवाजातील ही ओळ म्हणजे त्याच्या सादेला दिलेला प्रतिसाद. इथे नवीन निश्चल असल्यामुळे असेही म्हणता येईल की नायिका कंटाळून म्हणते, समजले रे बाबा … आता पुरे …
प्रतिसादातील आतुरता आणि आर्तता याचे श्रेय पूर्णतः लता बाईंनाच जाते हे निश्चित .
पाऊस आला की साधना आठवते.
४)ओ सजना
(सिनेमा-परख, संगीतकार-सलील चौधरी, गीतकार-शैलेंद्र, आवाज-लता मंगेशकर, कलाकार-साधना)
परख या सिनेमातले “ ओ सजना बरखा बहार आई “ हे पहिल्या प्रेमाचे आणि पहिल्या पावसाचे गाणे आहे. तप्त धरतीला आश्वस्त करणाऱ्या या पावसाला न्याहाळताना, तिच्या हृदयात सुद्धा एक मुग्ध अगम्य भावना जागी होते. केवळ गाणेच नाही तर यातील पावसाचे दृश्य सुद्धा अप्रतिम आहे.
जलधारांनी वाकलेली झाडे, झुकलेली पाने, पावसाच्या वेगाने थरथरणाऱ्या जास्वदांच्या पाकळ्या, अंगणात साचलेल्या पाण्याचे थारोळे आणि छतावरून गळणाऱ्या पागोळ्या ओंजळीत साठवत आपल्या प्रियकराला साद घालणारी साधना.पाऊस पडला की चित्रपटात तरी नायक नायिकेला बेडकांसारख्या उड्या मारल्याशिवाय चैन पडत नाही. साधना मात्र घराच्या उंबरठ्या बाहेर येरझारा करते. बाहेरचा पाऊस तिच्या मनात नर्तन करत आहे. ह्यातील पावसाएवढा रोमँटिक पाऊस मी दुसऱ्या कुठल्याच गाण्यात पाहिला नाही.
साधनावर चित्रित अजून एक पावसाचं गीत आहे पण त्यात पाऊस मात्र दिसत नाही.
बिमल रॉय यांच्या प्रेमपत्र या सिनेमातील हे गीत. रॉय यांच्या इतर सिनेमासारखा हा फार प्रसिद्ध नाही पण याचे संगीत अप्रतिम आहे.
एका प्रेमपत्रातून झालेला गैरसमज हा सिनेमाचा विषय.
साधना डॉक्टर आहे यात. तिच्या एका चुकीमुळे नायकाची संधी जाते. त्या अपराधी भावनेतून ती स्वतःची ओळख लपवून नायकाला मदत करते. त्यात स्वतः डॉक्टर असल्याने त्याचा इलाज सुद्धा करण्याची जबाबदारी घेते आणि त्या सगळ्या प्रकरणात स्वतः गुंतत जाते.
प्रेम आणि करुणा या दोन्हीतील सूक्ष्म फरक एवढा सुंदर दाखवला आहे तिने.
५) सावन की रातों में ऐसा भी होता है
( सिनेमा -प्रेमपत्र, संगीतकार सलील चौधरी, गीतकार-, आवाज-तलत महमूद आणि लता मंगेशकर, कलाकार- साधना आणि शशी कपूर)
तेरी नजर से इसे देख ,दिल से मेरे तुम ये महसूस कर लो
तूफ़ान ये मेरे दिल से उठा है ,चाहो तो तुम अपने दामन में भर लो
तूफ़ानों में खोया …
गाण्यात पावसाचा उल्लेख नाही आणि चित्रीकरणात पावसाचा थेम्ब सुद्धा नाही पण हे पावसाचे गाणे आहे. समोरच्या झाडांच्या सळसळीतून, आकाशात दाटून आलेल्या काळ्या ढगांमधून, उडणाऱ्या साधनाच्या बटातून आणि सतत सावरावा लागणाऱ्या शशी कपूरच्या स्कार्फ नधून लक्षात येते की वादळ सुरु होणार आहे.
एस डी बर्मन आणि लता मंगेशकर जवळ जवळ सहा वर्षे काही गैरसमजामुळे एकमेकांशी बोलत नव्हते .त्या काळात दादांची मुख्य गायिका होती आशा भोसले . लता बाई आणि एस डी मध्ये एक महत्वाचे साम्य आहे . त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा परिणाम त्यांनी आपल्या संगीतावर होऊ दिला नाही. लताबाईंच्या जाण्याने एस डी बर्मन संपले नाहीत . आशाला हाताशी धरून त्यांनी त्यांची सांगीतिक घोडदौड चालूच ठेवली . बरेच जण याला निष्ठुरता म्हणतील .. Professional ruthlessness . मी त्याला संगीताशी बांधिलकी मानते.
या लोकांची ओळख त्यांची प्रकरणे किंवा कोणाशीही असलेली जवळीक नाही . यांची ओळख आहे त्यांची कला. कलाकाराला जर आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी आपल्या कलेशी बेईमानी करता कामा नये . बाकी कशाबद्दल ही मतभेद होऊ शकतील पण लता बाईच्या, एस डी च्या सुरांशी नाही .
हे मोठेपण त्या दोघांनी सुद्धा ओळखले होते . वाद असूनही जेव्हा आर डी बर्मननी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा एस डी त्यांना पाठवले ते लता बाईंकडेच . गान सरस्वतीचा आशीर्वाद आरडीने सार्थ करून दाखवला तो पहिल्याच गाण्यात . ते गीत होते छोटे नबाब या सिनेमातले
६) ” घर आजा घिर आई , बदरा सावरिया”
(सिनेमा, छोटे नबाब, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार-शैलेंद्र , आवाज -लता मंगेशकर)
वेस्टर्न धून चा बादशहा ही ओळख होण्यापूर्वीची ही धून . रागदारी संगीतावर आधारित . आर डी च्या आगमनाची दखल चित्रपट सृष्टीने तर घेतलीच पण एस डी आणि लता मधील संगीत प्रवास परत सुरळीत चालू झाला.
मुजऱ्याचे गीत आहे हे पण मुजऱ्याचा बाजारूपणा या गीतात नाही . लताच्या आवाजातही नाही . खरेतर तेव्हा व्हॅम्प किंवा खलनायिकेचा आवाज आशा बाईचा असताना या गीतासाठी लताचा आवाज वापरणे हा मास्टर स्ट्रोक होता . यालाही कारण आहे. गाणे जरी कोठ्यावरील असले तर मनस्थिती आहे ती नायकाच्या पत्नीची .ओठ त्या कलावंतिणीचे आणि कैफियत त्याच्या पत्नीची . .
सुना सुना घर मोहें डसनेको आये रे , खिडकी पे बैठे बैठे सारी रैन जागे रे
नायकाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्याची पत्नी . तो कुठे गेला आहे याची तिला खबर नाही . तो येणार या आशेवर तगून राहिलेली ती . रात्र तर त्या वाट पाहण्यातच संपून गेली आहे . त्यात हा पाऊस . ढगांचा कडकडाट , विजेचा कल्लोळ तिचा थरकाप उडवतो आहे.
पहिल्या गीताचा नवखेपणा यात नाही . आणि राग सुद्धा परिचित नाही . नेहेमीचा यमन , पहाडी किंवा भैरवी न घेता मालगुंजी रागात या गाण्याची रचना केली आहे . ह्याही गीतात शरीराला भिजवणारा पाऊस नाही. आहे ती सुरांची बरसात.
पावसाचा विषय आला की राग मेघमल्हारचे सूर कानात गुंजत राहतात. संगीत सम्राट तानसेन यांनी राग दीपक गाऊन दीप प्रज्वलित केले. वाहवा मिळाली पण त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. मरणासन्न अवस्थेत असताना ताना रीरी या दोन बहिणींनी राग मल्हार गौण त्यांच्या शरीराचा दाह शांत केला आणि त्यानां जीवदान दिले अशी वदंता आहे.
हे गाणे ऐकायचे ते लता आणि आशा या दोन भगिनींच्या गायकीसाठी.
हे गीत ऐकताना, ताना रीरी यांचा पुनर्जन्म झाला असेलका हे मनात येते.
७)मेहा आओ रे
( सिनेमा -संगीत सम्राट तानसेन, संगीतकार- एस एन त्रिपाठी, गीतकार -शैलेंद्र, आवाज- लता मंगेशकर आणि आशा भोसले)
उन्हाची तलखी असह्य झाली आहे. त्यात राग दीपक गायल्याने अंगाची लाही लाही होत आहे. संगीत सम्राट तानसेन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहे. त्याच्या संगीतावर प्रेम करणारे असंख्य नागरिक, रसिक, सरदार उमराव अगदी प्रत्यक्ष बादशहा अकबर सुद्धा हताश झालेला आहे. ह्या रोगावर एकच औषध आहे ते म्हणजे राग मेघ मल्हार. त्याच्या सुरांनी ढग दाटून येतील, आपल्या धारांनी त्याला न्हाहू घालतील तर तो असामान्य संगीतकार वाचू शकेल. हे करणार कोण!
अशावेळी एका गावातील दोन तरुण मुली पुढे येतात. त्यांच्या कलेची आणि संगीताची सुद्धा परीक्षा असते आज.
मेहा आयो रे , घिर घिर के छायो रे
आता त्या पर्जन्यदायी मेघालाच साद घातली जाते.
ऐतिहासिक किंवा पौराणिक कथेवर आधारित असलेल्या सिनेमाला संगीत देणे सोपे नव्हते. शास्त्रोक्त संगीतावर आधारित धून निर्माण करायच्या आणि त्या लोकप्रिय करायच्या ही सामान्य गोष्ट नाही. एस एन त्रिपाठी यांनी ती सातत्याने केली आहे. दुर्दैवाने हे सिनेमा फार चालले नाही आणि त्यामुळे ते संगीत सुद्धा काळाच्या पडद्याआड गेले.
प्रसिद्ध जपानी लेखक, हारुकी मुराकामी म्हणतात, “ कसलाही विचार न करता, बरसणाऱ्या पावसाकडे टक लावून बघत बसा, पाऊस तुम्हाला भूल घालतो. जगाचे भान विसरायला लावतो”
पावसाच्या आगमनाची सूचना देणारे गर्भारशी ढग आणि ओल्या मातीचा तो मृदगंध अनेक शक्यतांना जन्म देतो.
पावसावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी तर पागोळ्यांच्या आवाजापेक्षा मधुर दुसरे काहीही नसावे. संध्याकाळी धूसर झालेल्या वातावरणात , खोलीच्या खिडकीतून संथ गतीने पडणारा पाऊस बघणे हा साचलेल्या भावनाना मोकळे करणारा कॅथार्सिस आहे.
८) रिमझीम के तराने लेके आई बरसात
(सिनेमा- काला बाजार, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-शैलेंद्र, आवाज- गीता दत्त, मोहम्मद रफी, कलाकार देव आनंदआणि वहिदा रहमान)
एकेकाळी प्रेमात असलेली पण एकमेकांपासून विलग झालेली ती दोघे, एका पावसाळी रात्री एकत्र येतात.मुंबईचा झोडपणारा पाऊस आहे हा. त्यांच्या मनस्थितीची कल्पना त्यालाही आहे. टॅक्सी मिळत नसल्याने एकाच छत्रीतून करावा लागलेला प्रवास आणि सोबतीला आहेत त्या गतकाळातील आठवणी.
सुनके मतवाले काले बादलों का शोर,
झूम झूम घूम घूम नाचे मन का मोर.
सपनों का साथी चल रहा है मेरे साथ,
रिमझिम के तराने लेके आई बरसात.
मुंबईच्या धुंवाधार पावसात भिजत असलेल्या अनेक छत्र्या. त्यातच टॅक्सी शोधात असलेली वहिदा. सतारीचे सूर झंकारतात आणि मग न्युज पेपर डोक्यावर घेऊन न भिजण्याचा निष्फळ प्रयत्न करणारा देव दिसतो आणि सतारला बासुरीची साथ मिळते. एस डी ने कमाल केली आहे.
गाण्याचे बोल आणि चाल सुद्धा आनंदी आहे. देव तसाही निराश होत नाहीच. सुखद आठवणी जागवत ती निःशब्द चालली आहेत.
गीता दत्त ने हे गाणे गाण्यासाठी नकार दिला होता. जेव्हा हे गीत पार्श्वसंगीत म्हणून वाजणार आहे हे समजल्यावर तिने आपला आवाज देऊ केला.
मला न भिजता आवडलेली ही काही पाऊसगाणी. ह्यात तुमचे गाणे कोणते आहे ?
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.

प्रिया ,
पावसाची गाणी
पण पावसात न भिजता …
ही कल्पना च विलक्षण आहे.
तू अर्थातच अप्रतिम लिहिलं आहेस.
☔☔
Thank you Vidula.
हो ग ..मला पहिल्यांदा वाटले , गाणी असतील का
पण शोधत गेले आणि सापडत गेली
सगळीच गाणी अफाट सुंदर आणि तुझं लिखाण सोनेपे सुहागा
Thank you so much Rashmi.
काय लिहू .. शब्दातीत आहे सगळं
मनामनातील गाणी आणि त्यावरील इतकं फक्कड लेखन .. निवडलेली सगळीच गाणी खूपच छान ,
यावर एक सांगितीक कार्यक्रम होऊ शकतो
याआधीही मी प्रिया आपल्याला सुचवले आहे , स्वरपंचम तर्फे एक शो करू शकतो त्या गाण्यांविषयी तुम्ही बोला रसग्रहण करा खूप छान रंगेल कार्यक्रम ..
Thank you Prashant .
हो , तुम्ही आधी सुचवले आहे .मला आता आत्मविश्वास नाही
.स्टेजवर एक दीड तास कार्यक्रम म्हणजे बराच मोठा
आहा!इतक सुंदर लिहल आहेस ना?हे वाचुन अस वाटतय कि,इतकी कशी मी अरसिक.मला पाऊस बिलकुलच आवडत नाही.संपूर्ण पावसाळा माझी चिडचिड होते.
मी तुझ्या आम्मासारखी घाबरत नाही पण,मरगळलेली असते.
Thank you Shaila.
आई ग
पावसात मरगळ का ग ? सृजनाचा ऋतू हा
हल्ली मात्र मलाही कंटाळा येतो ..मुंबईचा पाऊस आणि चालू असलेले बांधकाम
नुसता चिखल होतो आता
एकेक गाणं ,त्या गाण्याचे विवेचन, अत्यंत समर्पक शब्दात व्यक्त होणारा पाऊस…!!
कमाल कमाल लिहिलंय 👌💜
फार सुंदर लेख 👌💜
Thank you so much Kamini .