Skip to content

विसंवादी सुरांचा जमून आलेला मेळ-ऑटम सोनाटा

समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जन्म घेताक्षणी अनेक व्यक्तींशी आपण नात्याने बांधले जातो. या व्यक्ती आपले व्यक्तिमत्व घडवतात. कधी प्रेमाने तर कधी रागाने सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींतून आपली जडणघडण होत जाते.  आपल्या यशात त्यांच्याही प्रयत्नांचा वाटा असतोच आणि अपयशात सुद्धा सावरायला, आपल्या पाठीवर त्यांचा हात असतो. व्यक्तिमत्व विकासाचे पहिले संस्कारकेंद्र आपले कुटुंब असते.

कटुंबाचा एक भाग होणं  म्हणजे आयुष्यभरासाठी तुमच्यावर प्रेम करणारी आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात ती  लोकं, तुमच्या आयुष्यात येणं. कुटुंब म्हणजे आयुष्यभराची बांधिलकी, प्रेम आणि न सांगताही स्विकारलेली जबाबदारी.
अर्थात ही सुजाण कुटुंबाची व्याख्या झाली.
मात्र गेल्या काही वर्षात लहान मुलांना सुद्धा समुपदेशनाची गरज भासायला लागली आहे. त्यांचे प्रमाण सुद्धा वाढते आहे आणि महत्वाचे म्हणजे ही मुले अत्यंत सुखवस्तू आणि वरवर पाहिले तर, सुशिक्षित आणि संस्कारित घरात वाढलेली आहेत.

काही वर्षापूर्वीचीच गोष्ट असेल. कुटुंबात प्रत्येक व्यक्तीची भूमिका ठरलेली होती. बहुधा आई घरी असायची. बालसंगोपन ही तिची जबाबदारी होती. अर्थप्राप्ती पुरुषाची.  अगदी दोघांनी नोकरी करणे आवश्यक असले तरीही पुरुषाची नोकरी , त्याच्या महत्वाकांक्षेला बळ द्यायची तर स्त्री ची अर्थप्राप्ती ही गरज भागवण्यापुरती होती. यात एका घटकावर अन्याय झाला हे नाकारता येत नाही. हे पाहत मोठ्या झालेल्या पिढीने स्वतःचे स्वातंत्र्य आणि ,कुटूंबाच्या आधी प्राधान्य दिले आणि तू तू मै मै ला सुरुवात झाली. भूमिका ज्या आधी अध्याहृत होत्या, त्या कुणी करायच्या यावर वाद होऊ लागले. ज्यांना हा बदल पचवता आला नाही त्याचा सर्वात वाईट परिणाम त्या आईवडिलांच्या पुढच्या पिढीवर झाला.
मूल  होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पालक होणे ही प्रेरणा आहे. पालकत्व ही समजुतीने अंगिकारलेली जबाबदारी आहे , ज्याचा time span बराच मोठा आहे. चुका होतात, वाद होतात पण जिथे संवाद असतो तिथे मार्ग सापडत जातो, जिथे संवाद संपून , शांतता उरते तेव्हा कुटुंब मोडण्याची सुरुवात झालेली असते.

अर्न्सट इंगमार बर्गमैन या नामवंत स्वीडिश निर्माता दिग्दर्शकाचा  “ ऑटम सोनाटा” हा सिनेमा एका आई आणि मुलीच्या संपलेल्या नात्यावर आधारित आहे. कथा घडते ती एका  रात्रीत. एकमेकांच्या संवादातून , पात्रांचा भूतकाळ उलगडत जातो.
केवळ घटना नाहीत तर आतापर्यंत दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मिळते. आई आणि मुलगी पहिल्यांदाच आपल्या खऱ्या रूपात एकमेकांच्या समोर येतात. तो चेहेरा अत्यंत भेसूर असतो. 

“ “A mother and a daughter — what a terrible combination of feelings and confusion and destruction. Everything is possible and is done in the name of love and solicitude. The mother’s injuries are handed down to the daughter. The mother’s failures are paid for by the daughter. The mother’s unhappiness will be the daughter’s unhappiness. It’s as if the umbilical cord had never been cut.”

सिनेमात, शार्लोट (इन्ग्रिड बर्गमन) चा प्रवेश होण्याआधीच प्रेक्षकांच्या लक्षात येते की शार्लोट आणि तिच्या मुलीच्या, ईव्हाच्या  (लिव उल्मान) यांच्या नात्यात घुसमट आहे, वेदना आहे आणि कधीही न केलेली तक्रार आहे.

शार्लोटच्या लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू होतो. ही बातमी समजल्यावर ईव्हा आपल्या आईला पत्र लिहून तिला काही दिवसांसाठी आपल्या घरी यायचे आमंत्रण देते. ही बातमी शार्लोट तिला देत नाही.गेल्या  सात एक वर्षात ते एकमेकांना भेटले सुद्धा नाहीत. त्यांचा साधा फोन किंवा पत्रे ही नाहीत.
ईव्हा विवाहित आहे. तिचा नवरा चर्चमध्ये काम करतो. ईव्हा लेखिका आहे. तिच्या नावावर दोन पुस्तके आहेत. तरीही आपण जे पत्रं लिहिले ते ती नवऱ्याला दाखवून विचारते, “ हे बरोबर लिहिले आहे न मी ?”
व्हिक्टर तिला परोपरीने सांगतो, की तिचे लिखाण उत्तम आहे. शब्द तिला वश आहेत.
ईव्हाच्या चेहेऱ्यावर मात्र आत्मविश्वासाचा लवलेश नाही.
पत्रात सुद्धा ती आईला विनंती करते , “Please don’t say no right away.”

शार्लोट आल्यानंतर मात्र ईव्हाची भीती निराधार ठरते. शार्लोट अत्यंत आनंदाने मुलीला जवळ घेते. तिची चौकशी करते. आपल्या पैशातून मुलीला गाडी द्यायचे ठरवते. ईव्हाला हायसे वाटते.
शार्लोट बदलली आहे हे जाणवून ती मनातून आनंदते पण हा आनंद थोडा वेळ टिकतो.
शार्लोटच्या विश्वात कुणालाच स्थान नसते. आपल्या नवऱ्याच्या चर्च मध्ये आयोजित केलेल्या संगीताच्या कार्यक्रमाबद्दल ईव्हा सांगते न सांगते तोच शार्लोट स्वतःच्या मैफिली बद्दल बोलताना रंगून जाते. 

ईव्हा कौतुकाने तिला पियानो वर एक पीस वाजवून दाखवते . आता शार्लोट फार मोठी नामवंत कलाकार असते.  थोडा वेळ स्वतःचा अभिमान बाजूला ठेवू शकतेच पण नाही .

ईव्हाला बाजूला सारून ती पियानो स्वतःच्या ताब्यात घेते. उत्कृष्ट वाजवतानाच ईव्हा किती सामान्य आहे हे सांगायला सुद्धा ती अजिबात मागे पुढे बघत नाही. आपल्या प्रियकराच्या मृत्यूबद्दल बोलत असतानाच , तिच्या यशाबद्दल तो किती अभिमान बाळगत होता हे सांगण्यात तिला जास्त रुची असते.
ईव्हा ला समजून चुकते की तिची आई अजिबात बदलली नाही . ती आई नाहीच. स्वतःच्याच रूपावर , कलेवर प्रेम असणारी आत्ममग्न स्त्री आहे. 

शार्लोटची स्थिती सुद्धा फार वेगळी नसते. सुरुवातीला तर सारे घरच तिच्या आगमनासाठी सिद्ध असल्याने ती स्वतःचे कौतूक करून घेण्यात मश्गुल असते पण जेव्हा आपली दुसरी मुलगी हेलेना सुद्धा याच घरात आहे हे समजल्यावर , तो आनंद कुठच्या कुठे उडून जातो.
हेलेना , शार्लोटची दुसरी  मुलगी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असते. पलंगाला खिळून असणाऱ्या, अडखळत बोलणाऱ्या या मुलीवर शार्लोटचे प्रेम तर नसतेच पण उलट आपल्या यशस्वी आयुष्याला लागलेला डाग म्हणून ती या मुलीकडे पाहत असते.
ही मुलगी तिला डोळ्यासमोर नको असते म्हणून तिला तिने एका आश्रमात ठेवलेले असते.  एक आई म्हणून आपण कुचकामी आहोत हे तिच्या मनाला जाणवत असते पण त्याची संवेदना नसते. अपराधी भावना असते पण चूक सुधारण्याची इच्छा नसते. त्याउलट ती मेली असती तर बरे असे म्हणून ती स्वतःचे समाधान करून घेते.
स्वतःवर प्रेम असणाऱ्या शार्लोटला तिच्या दोन्ही मुली तिच्या चुका वाटतात. एका यशस्वी आयुष्याला लागलेले गालबोट.
ते नाहीसे तर करता येत नाही म्हणून ती स्वतःलाच त्यांच्यापासून दूर ठेवते.
आई अशीही असते.
खरेतर ती आई नसतेच.  माणसांना केवळ जन्म दिला म्हणून आईपण पेलता येत नाही. आपल्या मुलाला आहे तसे स्विकारायला स्वतःला समर्पित करावे लागते. निदान प्रयत्न करावा लागतो पण स्वतःच्या प्रेमात आकंठ डुबलेल्या लोकांना हे जमतच नाही.
सात वर्षांनंतर आलेल्या  त्या रात्रीत ईव्हा आणि शार्लोट स्वतःला आरशात बघतात.
ज्या व्यक्तींचे बालपण करपलेले असते , त्या व्यक्ती अनेकवेळा वरून तरी शांत असतात, कणखर भासतात.  सहन केलेल्या असंख्य घटनांनी त्यांना एक उपजत शहाणपण आलेलं असते. काय चांगले आहे , काय सुंदर आहे, काय बरोबर आहे ह्यांची त्यांच्या मनाला जाणीव असते पण त्यांचा भूतकाळ एवढा काळा असतो,  वेदनादायी असतो की जगात काही सुंदर असू शकते, चांगले असू शकते हे मानायलाच त्यांचे मन तयार होत नाही. कोणत्याही व्यक्तींवर त्यांचा पूर्ण विश्वास बसत नाही. समाधान, प्रेम आणि करुणेच्या शोधात असलेले त्यांचे मन केवळ स्वतःच्या सहवासात सुरक्षा शोधते. या व्यक्ती अंतर्मुख होतात.

ईव्हा तशीच असते पण सात वर्षांनंतर मात्र काहीतरी हलते. आपल्यावर अन्याय झाला आहे हे सांगायला मन धडपडते आणि ती रात्र दबलेल्या रागाला मोकळे करते. 

“ तू केवळ मैफिलीसाठी बाहेर असायचीस म्हणून मी रागावले नाही आई. तू घरी असताना सुद्धा मनावर एक दडपण घेऊन वावरायचे मी. आपण मुलींच्या जवळ राहत नाही ही अपराधी भावना नको म्हणून तू खूप प्रेमाने वागायचीस आणि मग माझ्या सगळ्या गोष्टीत लक्ष घालायचीस. मी कसे वागायला हवं , कसे वाजवायला हवे , कसे दिसायला हवे , काय कपडे घालावेत, कसे बोलावं ..प्रत्येक गोष्टीत दखल घ्यायचीस .. पण मी नव्हते , तुझ्याएवढी सुंदर, हुशार, कर्तबगार .. ते तुझ्या नजरेत दिसायचे मला. मी किती कमी आहे ती खंत तुझ्या वागण्यात असायची आणि एक निराशा. हुशार आईला नकोशी असलेली लेक म्हणून स्वतःकडे बघायचे मी “

ईव्हाची भूमिका अतिशय कठीण आहे. लिव उल्मान ने कमाल केली आहे या भूमिकेत.
ईव्हाला आईच्या मोठेपणाची , तिच्या कर्तृत्वाची , सौन्दर्याची जाणीव आहे. एक मन तिची पूजा करते आणि दुसरे मन आपण तिला शोभत नाही ह्याची खंत. आपल्या आईला आपण आवडत नाही हे जाणून आहे ती , त्यामुळे कुणी आपल्यावर प्रेम करेल , आपले कौतुक करेल हे सुद्धा तिला पटत नाही.
तिच्या नवऱ्याचे तिच्यावर प्रेम आहे पण तो आत्मविश्वास तिच्याकडे नाही.
नवऱ्याने केलेले कौतुक तिला खरे वाटत नाही . 

आपली आई अकार्यक्षम आहे हे तिला कळते पण वळत नाही.  ती आपल्यावर प्रेम करू शकत नाही, आपली काळजी घेत नाही ह्याचा स्वीकार करणे एवढे वेदनादायी आहे की  स्वतः मधेच काही कमी असेल अशी ती मनाची समजूत करून घेते. लहानपणी झालेला क्षयासारखा आजार, तोळामासा झालेली प्रकृती, तुटलेला साखरपुडा आणि सर्वात दुःखद घटना म्हणजे चार वर्षाच्या मुलाचा, एरीकचा  बुडून  झालेला मृत्यू ..ईव्हा मात्र यातून सावरते. तिच्या पाठी असलेला नवरा , त्याने दिलेला धीर ह्या गोष्टी तिच्या बाजूने असतातच , त्याहीपेक्षा असतो तो तिचा मुलाबरोबर असलेला अतूट बंध.
“ मुलाच्या मृत्यूचे दुःख मला आहे पण मला आतून जाणवते की तो माझ्याबरोबर आहे. मी त्याची आठवण करायचा अवकाश, त्याचे अस्तित्व मला जाणवते. भले तो माझ्याबरोबर नसेल, तो त्याच्या जगात जिथे असेल तिथे खुश असेल पण त्याच्या आठवणी मला त्याच्या जवळ असण्याचा अहसास देतात. “
ईव्हा असूनही शार्लोटला तिची जाणीवच नसणे ह्याच्या पार्श्वभूमीवर मृत्यूनंतर सुद्धा ईव्हाला मुलाचे अस्तित्व जाणवणे ह्या दोन्ही गोष्टी किती परस्परविरोधी आहेत पहा.
शार्लोट एवढी कोरडी का याचे उत्तर देताना शार्लोट सांगते , “ आपण बालपणात जे भोगतो त्याचे पडसाद आपल्याही मनावर उमटतात. माझ्या पालकांनी मला स्पर्श केल्याचे सुद्धा मला आठवत नाही. ना कधी ओरडले , ना कधी जवळ घेतले.  प्रेम, माया, उब, जवळीक ह्या गोष्टी मी कधी अनुभवल्या नाहीत. त्यामुळे असेल माझे संगीत माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाले. ह्या सर्व भावना मी सुरांतून अनुभवल्या आणि ज्यांनी ह्याची जाणीव दिली त्या सुरांवर मी अतोनात प्रेम केले. माझे जीवन मी पियानो बरोबर बांधून ठेवले. बाकी नाती मी अनुभवली नाहीत. मला माझ्या आईचा चेहेरा सुद्धा आठवत नाही ..आणि मला तुझे लहानपण सुद्धा लक्षात नाही. माझ्या मैफिली, मला मिळालेली दाद , पारितोषिके ह्याचा पलीकडे असलेले जग माझ्या खिजगिणतीत नाही. त्या बद्दल मला वाईट सुद्धा वाटत नाही”
शार्लोट पियानोचा पीस वाजवून दाखवताना ईव्हाला सांगते, “ वाजवताना सुरांत भावना यायला हव्याच पण कलाकाराने भावनिक होऊ नये. त्यात सुरांपासून दूर जाण्याचा धोका असतो. भावना ताब्यात असायला हव्यात . जेवढ्या हव्या तितक्याच”
शार्लोटचा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन सुद्धा असाच आहे.
अनेकवेळा नात्यात समोरची व्यक्ती अशी का वागते ह्या प्रश्नाचे उत्तर शोधून सुद्धा मिळत नाही. अगदी एका बाजूने जीवतोड प्रयत्न केला तरी निराशाच होते.
त्या रात्री पहिल्यांदाच शार्लोटला समजते की ती आपल्या मुलींची अपराधी आहे. जगासमोर यशस्वी कलाकार म्हणून मिरवत असलेली ती आई म्हणून कुचकामी आहे. आपल्या मुलींच्या आयुष्याचे वाटोळे करण्यात तिचाही हातभार आहे.
आयुष्यात पहिल्यांदा याची जबाबदारी स्वतःवर घेत ती ईव्हाची क्षमा मागते.
“ जे घडले , ते अनवधानाने घडले , जे माझ्या वाट्याला आले तेच मी तुम्हाला दिले हे जरी खरे असले तरी मी तुझी अपराधी आहे. मला सुद्धा तुझी गरज आहे.. आपण मागचे विसरून, नव्याने,  आपल्या नात्याला एक संधी देऊया का?
ती विनविते.  

तो क्षण मात्र ईव्हाचा असतो.
“ माझ्याकडे बघ, तू नाकारलेल्या तुझ्या अपंग मुलीकडे. हेलेनाकडे निरखून बघ आई. स्वतःच्या वास्तव्याला स्विकारायची हिमंत नाही म्हणून तू सर्वांना दूर लोटलेस. आयुष्यात फक्त स्वतःवर प्रेम केलेस आणि स्वतःसाठी जगलीस. तू मला काय देणार ! तुझ्याकडे मला आणि लेनाला द्यायला काहीही नाही. तू फक्त वेदना दिल्यास आणि आमच्या आयुष्याचा सर्वनाश केलास. जे तू दिलेस तेच तर तुला परत मिळणार, नाही का ? “

दोन व्यक्ती , भले त्या आई-मुली सारख्या नाळेने जोडल्या गेलेल्या का असेना, एकमेकांपासून विभिन्न असलेली व्यक्तिमत्वे , कधीतरी एकमेकांना समजून घेऊ शकतील का ? कधीतरी मायेने एकमेकांना जवळ घेतील का ?
ज्या लोकांनी आपल्या बालपणात आपल्याला दुखावले असते, आपले बालपणच नासवले असते, त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बघताना आपल्या डोळ्यातील तिरस्कार आपण लपवू शकू का ?
ऑटम सोनाटा या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर देत नाही.
अनेकदा प्रेमातील गुंतागुंत समजणे फार कठीण होऊन जाते आणि त्याचेच रूपांतर कधी तिरस्कारात होते ते समजत सुद्धा नाही. अनेकदा माणसे शेवटपर्यंत जगाच्या भीतीने , नात्याच्या मर्यादांनी स्वतःशी सुद्धा कबुल करू शकत नाही आणि नात्याच्या अभिनयाची कसरत करताना जगणे मात्र राहून जाते.
चित्रपटाच्या शेवटी ईव्हा आईला पत्र लिहिते आणि तिला दुखावल्याची माफी मागते.
. “We never give up hope, do we?” ईव्हा आपल्या नवऱ्याला विचारते.
कदाचित आयुष्य जगण्यासाठी ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे अत्यंत आवश्यक असते नाही का !

चित्रपटाचे शीर्षक अत्यंत विचारपूर्वक निवडलेले आहे. ऑटम (पानगळ)म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यामधील काळ.संक्रमणाचा काळ. साहित्यात पानगळ म्हणजे एका अध्यायाचा अंत आणि त्या अनुषंगाने नवीन अध्यायाची सुरुवात. सिनेमातली ही लांब रात्र जेव्हा संपते तेव्हा अनेक वर्षाच्या अबोल तक्रारीचा अंत झालेला असतो. वादळ येऊन गेले असते आणि कदाचित त्यातूनच एका नवीन अंकुराचा उदय होणार असतो.
पाश्चात्य देशात ही हिवाळ्याची सुरुवात असते. झाडे पानांचा त्याग करतात आणि  बर्फाच्या पांघरुणाखाली गुडूप होतात.तरीही येणाऱ्या वसंताची आस त्यांनाही असते. त्या आशेवर ते तगून  राहतात.
इथे ईव्हा सुद्धा कडवटपणा टाकून शार्लोटला पत्र पाठवते.. मन मोकळे झालेले असते. कदाचित हीच नवीन सुधारलेल्या संबंधांची सुरुवात असते. 

इन्ग्रिड बर्गमनचा हा शेवटचा चित्रपट. एका दैपिप्यमान कारकिर्दीचा अंत एवढ्या अप्रतिम चित्रपटाने होणे हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला आले आहे.
चित्रपट ऍमेझॉन प्राईम वर रेंट देऊन पाहायला मिळेल.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.

14 thoughts on “विसंवादी सुरांचा जमून आलेला मेळ-ऑटम सोनाटा”

  1. प्रिया,

    अशा क्लासिक चित्रपटांबद्दल तुझ्या लेखणीतून उमटलेले *सोनाटा* चे स्वर..
    🎻🎹
    प्रादेशिक किंवा इंग्लिश चित्रपट तुझ्या मुळे माहिती होतात.बघितले जातात.
    आपण एकत्र बसून काही चित्रपट बघणार आहोत ना?

    कधी तरी जमवू या.

  2. प्रियाताई,
    सुंदर परीक्षण. तुमच्या शब्दांमधून चित्रपट उलगडत जातो. नक्की बघणार.

  3. Anuradha Yadwadkar

    प्रिया,
    नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लिहिलेस!
    तुझ्या नजरेतून सिनेमा बघितला की त्यातील बारकावे खूप छान समजतात..एरवी भाषिक अडचणींनी सिनेमा समजला तरी त्यातील बारकावे सुटून जातात..मराठी व हिंदी सिनेमा बघताना त्यातील भावबंध समजतात पण इंग्रजी सिनेमा तो ही सब टायटलसह बघताना एकतर अभिनय बघू की टायटल वाचू हा गोंधळ होतोच पण टायटल म्हणजे पूर्ण कथा नसतेच..तुझ्या परीक्षणातून संपूर्ण सिनेमा डोळ्यांसमोर उभा राहतो.

    इंग्रिड बर्गमन माझी सुद्धा आवडती अभिनेत्री.
    नक्कीच हा सिनेमा बघते.

    1. Thank you Anuradha .
      सिनेमा बघ ..मुळात अभिनय एवढा सशक्त आहे की गरज भासत नाही .
      स्वीडिश भाषा आहे
      ..पण कुठेही रसभंग होत नाही.

Leave a Reply to Vidula Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *