Skip to content

हिंदी सिनेमात गाजलेली स्त्री राजकारणी पात्रे.

भाग ३
आँधी ते हुतूतू , ते थलायवी 

यशस्वी होण्यासाठी फक्त प्रतिभा, मेहेनत, संधी पुरेशी नसते. त्यासाठी स्वतःवर प्रेम असावे लागते. प्रचंड महत्वाकांक्षी माणसे स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करतात,  तेव्हाच स्वप्ने त्यांना प्रसन्न होतात . तुमची स्वप्ने  तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा करतातच की,  निरपेक्ष असे या जगात काहीही नसते.
हे समजावून द्यायला गुलजार यांना आँधीची निर्मिती करावी लागली. गुलजार यांचा आँधी हा सिनेमा  स्त्रीच्या महत्वाकांक्षेला महत्व देतो.
यासाठी राजकारणात उतरलेली आणि यशस्वी झालेली नायिका  ही निवडच मुद्दा पटवायला अत्यंत पूरक आहे. कोणत्याही
क्षेत्रात अव्वल येण्यासाठी प्रचंड मेहेनत आणि हुशारीची गरज असतेच पण सर्वात महत्वाचे असते ते मी दुसऱ्याला मागे टाकेन याची प्रबळ इच्छा. दुसऱ्या आणि पहिल्या नंबरात फक्त हाच फरक असतो.
मी उत्तम एवढे महत्वाचे नाही , मी सर्वोत्तम याची लालसा असते. राजकारणात तर प्रत्येक क्षणाला तुमचे पाय ओढणारी लोक आजूबाजूला असतात. जो जिंकतो , त्याची मान प्रतिष्ठा , सांपत्तिक स्थिती  तर वाढतेच पण तेवढेच महत्वाचे नाही, ती टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारी वैश्य आणि अवैध शक्ती (muscle power)  वाढते आणि तीच त्याची सुरक्षितता असते. जोवर सत्ता त्याच्या हातात तोवर त्याला कुणीही हात लावू शकत नाही. राजकारणात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीत  मी सर्वोत्तम ठरण्याची आणि त्यासाठी कोणत्याही थराला  जाण्याची लालसा हवी.
आँधी सिनेमाची नायिका, यशस्वी होण्यासाठी आपल्या संसाराचा, मातृत्वाचा  त्याग करते.
आँधी ( १९७५)
आरती देवी -सुचित्रा सेन

सत्तरचे दशक सुरु झाले होते. १९७१ चे लादले गेलेले युद्ध जिंकून , वरती बांगलादेशाची निर्मिती करून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला होता. भारताचे नेतृत्व करणारी स्त्री होती. विरोधकांनी सुद्धा तिच्यावर प्रशंसेची फुले उधळली . मला इंदिरा गांधी व्हायचंय हे त्यावेळी किती मुलींनी ठरवले असेल! एक गुंगी गुडिया ते स्वतंत्र भारताची पहिली स्त्री पंतप्रधान हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्याच पक्षातले अनेक जण त्यांच्या विरोधात होते. एक पत्नी , आई की राजकारणातली यशस्वी कणखर नेता हा पर्याय त्यांनीच निवडला होता.

प्रेमविवाह असूनही पतीचे घर सोडून त्यांनी पित्याबरोबर राहणे स्विकारले होते. याची कारणे काहीही असो, स्त्री म्हणजे पतीची सावली, त्याच्या कारकिर्दीतील एक मोहरा ही प्रतिमा मात्र इंदिरा गांधींनी मोडलीच वरती आपल्या कारकिर्दीत यशस्वी होऊन स्त्री च्या अस्तित्वाच्या समाजाने ठरवलेल्या मर्यादेला सुद्धा एकप्रकारे आव्हान दिले.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आँधी या राजकीय प्राश्वभूमी असलेल्या चित्रपटातील नायिकेच्या पात्रावर इंदिरा गांधीच्या व्यक्तिमत्वाची दाट सावली आहे.
आँधीला राजकीय पार्श्वभूमी आहे. समाजकारण  आणि राजकारणाला वाहून घेतलेल्या धूर्त, हुशार,  पुरुषांच्या जगात जिंकण्यासाठी पाय रोवून असलेल्या  “स्त्री” नेत्याची ही कहाणी आहे.  ही  पतिपत्नीच्या अपूर्ण सहजीवनाची व्यथाही  आहे. अत्यंत गाजलेल्या  प्रेमगीतांमुळे चित्रपटाला  विरह सिनेमा म्हणून जरी प्रसिद्धी मिळाली  तरीही तो विरह तिच्या महत्त्वाकांक्षेमुळे आलेला आहे. प्रेम का राजकारण ह्या पर्यायात राजकारण हा “तिने निवडलेला पर्याय”  आहे.

सिनेमाची सुरुवात होते वर्तमानकाळात. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ज्या शहरातून आरती देवी उभी राहिली आहे त्या शहरात प्रचारासाठी ती काही दिवस आली आहे. ज्या हॉटेलमध्ये ती उतरली आहे त्या हॉटेलचा मॅनेजर आहे जे के, जो कधीकाळी तिचा पती होता. आता विभक्त होऊनही बरीच वर्षे लोटली आहेत. रूममध्ये असलेली चंदनाची उदबत्ती, पाणी पिण्यासाठी ठेवलेली सुरई, आवडीची खीर अशा अनेक गोष्टीतून भूतकाळाच्या निद्रिस्त आठवणींना जाग येते . गुलजार हळुवारपणे त्या दोघांनी  एकत्र घालवलेल्या  स्वप्नाळू जगात प्रेक्षकांना घेऊन  जातात.

इस मोड से जाते है,कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहें 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक रस्ते आपल्याला खुणावत असतात. काही संथ , सुखद क्षणाच्या मोहात पडून रेंगाळणारे रस्ते , काही घाई गर्दीचे , अपेक्षा आकांक्षाचे रस्ते,. जिथून एक उज्वल, यशस्वी भविष्यकाळ तुम्हाला खुणावत असतो. प्रत्येक रस्त्याची  गती वेगळी असते , त्याचे गंतव्य वेगळे असते. रस्ता निवडणे तुमच्या हातात असते पण एकदा तो निवडला की त्याच्या गतीने जावे लागते.
जे के ला संथ रस्त्याची  आस  आहे. जणू एखादी गावातली पायवाट . आला क्षण आपल्या माणसांबरोबर आनंदाने घालवणे ही त्याची सुखाची व्याख्या आहे. आरतीला राजरस्त्याची सवय आहे. तिला यशाच्या शिखरावर त्वरित पोचायचे आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या होणे हे  स्वाभाविक आहे.

सुखी सहजीवन एकत्र जगत असतानाच, सांसारिक जीवनाचे रुटीन आरतीला अस्वस्थ करू लागते. पैसा आणि बुद्धिमता याची देणगी असलेली आरती सफलतेच्या एक एक पायऱ्या चढून जाते . पती आणि मुलगी याचे स्थान आता मर्यादित राहते. त्याची जागा सभा , भाषणे , राजकीय डावपेच घेतात .
आरतीचे वडील (बोस) यशस्वी उद्योजक  आहेत. मुलीला त्यांनी बॅरिस्टर बनवले आहे. पुढे जाऊन तिने राजकारणात आपले नाव करावे ही त्यांची अपेक्षा आहे. ती महत्वाकांक्षा आरतीच्या ही रक्तात आहेच. अशा मुलीने सर्वच दृष्टीने सामान्य असलेल्या जे के च्या प्रेमातच का पडावे ? तर याचे उत्तर त्यांच्या पहिल्या भेटीत आहे.

हॉटेलमधील एका पार्टीत , कुणीतरी खोडसाळपणे आरतीच्या ग्लासात ड्रिंक मिसळतो. अशा परिस्थितीत आरती घरी न जाता  हॉटेलचा आश्रय घेते. तेथील स्नानगृहात अंघोळ करत असतानाच  तिची शुद्ध हरपते. जे के तिला बाहेर आणतो. तिला पलंगावर झोपवतो. ती कुणाची मुलगी आहे हे समजल्यावर तो तिच्या वडिलांना कळवत  नाही . ही बातमी लीक व्हायला देत नाही. प्रत्येक गोष्टीची बातमी होणाऱ्या, प्रत्येक बातमीचा फायदा करून घेणाऱ्या जगात वाढलेल्या आरतीसाठी हा प्रामाणिकपणा दुर्मिळ. त्यांची मैत्री होते. त्याचे रूपांतर प्रेमात होते. वडिलांच्या इच्छेविरुद्ध आरती लग्न करते.
आरतीच्या वडिलांना आपल्या मुलीला राजकारणात आणायचे आहे. त्यामागे काही मोठे समाजकारण किंवा मुलीचे सक्षमीकरण असा हेतू नाही ..आपल्या धंद्यात मदत करू शकेल असे कुणीतरी सत्तेत असावे  असा व्यावहारिक नजरिया आहे. पाच वर्षे ऑक्सफर्ड मध्ये घेतलेले शिक्षण ही त्यांची स्वतःच्या व्यवसायात केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. सगळ्याच गोष्टी पैसे आणि सत्ता यात तोलणाऱ्या वडिलांविरुद्ध केलेले हे आरतीचे बंड सुद्धा आहे.
सुरुवातीचे दिवस मोरपंखी असतात.  नंतर मात्र जे के चे आहे त्यात समाधानी असणे तिला खटकू लागते. तिचे कामात गुंतणे जे के ला सहन होत नाही. पत्नीने मुलीकडे लक्ष द्यावे , जेवण बनवावे आणि एक गृहिणी म्हणून आयुष्य घालवावे हे आरतीच्या प्रवृत्तीला मानवत नाही. जे के तिला आपल्या वागण्यातून दर्शवतो, त्याचा तिच्यावर पूर्ण अधिकार आहे आणि त्याची आज्ञा तिने पाळणे आवश्यक आहे. करिअर सोडायची नसेल तर आपण वेगळे होऊया हा एकमात्र पर्याय तो तिच्यासमोर ठेवतो. वडिलांचे वर्चस्व नको म्हणून लग्न करून बसलेली आरती, नवऱ्याच्या वर्चस्वाखाली राहायचे नाकारते.

जेके काही वाईट पुरुष नाही. आरतीवर  त्याचे प्रेमही आहे. पण आरतीसमोर तो सर्वच बाबतीत खूप सामान्य आहे. आपल्या सामान्यपणाची जाणीव आहे त्याला पण बदलायचे मात्र नाही. उलट आरतीनेच सामान्य होऊन आपला अहंकार जपावा ही त्याची इच्छा आहे. त्याने जपलेल्या नवरेपणाचा हा हेका आहे.
पती हुशार असेल तर न बोलता पत्नी त्याला साथ देते . त्याच्या यशात आनंद मानते पण तिचीच झेप वरची असेल तर!
अशावेळी स्त्री ने नवरा परमेश्वर मानावा का आपली जिद्द ?
कधीतरी जेके ला उद्धेशून म्हंटलेल्या “ये कविता नही होती तो तुम बहुत ordinary होते” या डायलॉग मध्ये काय नाही !

आपल्या स्वप्न पूर्तीसाठी ती संसाराचा आणि पर्यायाने मातृत्वाचाही त्याग करते. एक स्त्री म्हणून याची खंत आहे पण तिच्या स्वप्नांची झेप त्याहुन मोठी आहे. उत्तुंग आकाशात झेप घेणारा पक्षी हे तिचे निवडणूक चिन्ह, तिला शोभेसे आहे.
व्यक्ती गेल्यावर जर  आयुष्य हेतुशून्य बनले तर तिच्या  पावलांचा मागोवा घेत संपत जाते .  जसे  जेकेच जाते . आरती मात्र पुढे जाते . तिचे पूर्णत्व हे जेके मध्ये नसते आणि जेके तिच्याशिवाय अधुरा असतो.
“ तुमने तो बहोत लंबा रास्ता तय किया ..मै तो बहोत पीछे रह गया” नऊ वर्षांनी भेटल्यावर , जेके ने तिच्या कर्तुत्वाला दिलेली ही सलामी . स्वतःचे सामान्यपणे स्विकारल्याची ही कबुलीही.

हरवलेल्या नात्यांकडे पाहायचा एक वेगळाच समजूतदार नजरिया आहे हा. चित्रपटाच्या शेवटी आरती जिंकते. यशाचे अजून एक दालन खुले होते. तिथे जाणारी वाट मात्र एकटी आहे याची दोघांनाही जाणीव झाली आहे पण आता त्यात आक्रोश नाही , संताप नाही ..एक अटळ निरोप आहे आणि तो योग्य आहे याची दोघांनाही खात्री आहे..

सिनेमातील काही ठळक गोष्टी ज्या फक्त अनुभवायच्या आहेत.

१. नऊ वर्षात आरतीला नवऱ्याची किंवा मुलीची आठवण आली असे प्रसंग नाहीत. तिने निर्णय घेतल्यावर न वळता ती पुढे निघून गेली आहे. राजकारणात मुरलेली नेता आहे. त्यामुळे तिचा पेहेराव, तिचे भाषण, अगदी दगड लागल्यावर सुद्धा आलेल्या रक्ताचा, हुशारीने प्रसिद्धीसाठी केलेला उपयोग हे सारे पाहिले  तर जाणवते ह्या कारकिर्दीचा तिला पस्तावा नाही. काही सीन्स आणीबाणीत कापले गेले ज्यात ती सिगारेट आणि ड्रिंक्स घेताना दाखवली आहे .. especially एक असा प्रसंग की तिला कुणीतरी भेटायला येते. हातात सिगार. ती ताबडतोब विझवते , खिडकी उघडून धुराला बाहेर जायला जागा देते . राजकारणात स्त्री ने यशस्वी व्हायचे असेल तर तिचे चारित्र्य हा मोठा निकष आहे. पुरुषाला ही बंधने फार लागू पडत नाहीत. राजकारणात पाऊल टाकताना अडचण होऊ शकणारे  तिचे अयशस्वी लग्न सुद्धा लपवले गेले आहे आणि या सर्व नाटकाला तिचाही हातभार आहे ..

इस मोड से जाते है. 

एकदा वाट निवडली की त्यावर कसलाही पस्तावा न करता आनंदाने वाट चोखाळणे , नुसतेच चालणे नाही तर मनापासून एन्जॉय करणे आणि आपले इस्पित साधणे अशी नायिका ही फिल्म मधेच का प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा पाहायला मिळत नाही ..बायकांना व्हिक्टिम कार्ड खेळण्याची फार आवड असते …
राजकारणात येणारी स्त्री ही कशी असावी याचे हे यथार्थ चित्रण आहे.

आँधी हा सिनेमा १९७५ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हाचे राजकारण , त्यातील व्यक्ती वेगळ्या होत्या. गुंडगिरीचे  प्रमाण मर्यादित होते. दाखवण्यापुरती तरी साधन सूचिता सामाजिक जीवनात पाळली जात होती.
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हू तू तू या सिनेमात मात्र सत्त्तेचा चेहेरा अधिक भेसूर होत गेला.
“ हू तू तू”  हा सिनेमा ही मालती देवी च्या राजकीय उत्कर्षाची आणि तिच्याच मूल्यांच्या घसरणीची कथा आहे. 

हू तू तू (१९९९)
मालती देवी -सुहासिनी मुळ्ये


ह्या सिनेमाची नायिका तब्बू असली तरी ही कहाणी तिच्या आईची आहे, मालती बाई ही शिक्षिका असते. त्या भागातील राजकारणी, सावंत राव तिच्याकडे आकर्षित होतात. सुरुवातीला छोट्या मूल्यवान गोष्टी , नंतर जबाबदारीची पदे देऊन ते तिला वश करतात. सत्तेचा मोह भल्या भल्यांना टाळता येत नाही. हळूहळू या लाभांची चटक  लागलेली मालती देवी, सावंत रावांच्या मदतीने एक एक पायरी चढत जात असताना, आपल्या शिक्षकी पेशाचा त्याग करतेच, त्या बरोबर आपल्या चारित्र्याचा सौदा करते.
खरेतर मालती , तिचा नवरा आणि मुलगी हे एक सुखी कुटुंब आहे. ती एक आदर्श पत्नी , माता आणि शिक्षिका आहे. सावंतरावांनी दिलेले एक एक पद, जबाबदारीची जागा तिला तिच्या आदर्शांपासून दूर दूर घेऊन जाते.
सत्ता काहीही घडवू शकते हा कैफ डोक्यात जातो. सुरुवातीचे निरागस कुतूहल आता लालसे मध्ये बदलते.
काही तरी  मिळवण्यासाठी, काही तरी गमवावे लागतेच असे लंगडे समर्थन देऊन ती सावंत रावांची शय्या सोबत करते.
जग आपल्याला रखेल म्हणतात याची कल्पना आहे पण फायद्यासाठी ती दुर्लक्ष करते आणि नंतर याचे रूपांतर कोडगेपणात होते. एका सामान्य गृहिणी आणि आदर्श शिक्षिकेचे रूपांतर रक्तपिपासू राजकारणी व्यक्तीत होते.

इतर कोणत्याही व्यवसायात  माणसे, सोपानाच्या कोणत्याही पायरीवर थांबू शकतात. राजकारणात मात्र सतत दुसऱ्यांचे पंख कापून भराऱ्या मारल्या जातात. मालतीदेवीचे महत्व कमी करण्यासाठी सावंतराव तिला ती निवडून येऊच शकत नाही अशा जागेचे तिकीट देतात. मालती हरते आणि याचा बदला घेण्यासाठी एका उद्योगपतीच्या मदतीने त्याचा खून करते.

आँधी ची आरती ते हू तू तू ची “मालती “ ह्यातला फरक बघा. दोघी  महत्वाकांक्षी आहेत. आरतीचे हळवेपण, संवेदशीलता कुठेतरी शिल्लक आहे. तसेच नैतिकतेचा त्याग आँधी मध्ये दिसत नाही. मालतीने मात्र संस्कार, मर्यादा याच्या सर्वच सीमा पार केल्या आहेत.
गजेंद्र अहिरे यांच्या “त्या रात्री पाऊस होता “ या चित्रपटात अशाच एका स्त्री लंपट पुढार्यांचे चित्रण आहे. त्याच्या वासनेला बळी पडलेली स्त्री सोनाली कुलकर्णी यांनी रंगवली आहे.
ही स्त्री, मालती बाईंसारखी लोभी नाही. आपण खरंच समाजासाठी काहीतरी करू या इच्छेने ती राजकारणात शिरते आणि चारित्र्य हनन झाल्यावर वेडी होते.
एकदा  यात शिरल्यानंतर बाहेर पडायची वाट फार धूसर होत जाते. इथे तुम्ही लोकांच्या नजरेत असतात आणि व्यभिचारात , मग तो इच्छेने असो किंवा अनिच्छेने , बाईला बळी बनवले जाते.
दुर्दम इच्छा असूनही सामान्य बाईचा निभाव इथे लागणे कठीण . एकतर तमच्यापाठी भक्कम आधार लागतो किंवा पैशाचे आणि गुंडगिरीचे बळ.
तसे नसेल तर तुम्ही उध्वस्त होतात.
टिकून राहिलात , तर अनेकदा हा प्रवास “ मालतीच्या” रस्त्याने जातो. बळी तो कान पिळी हा अस्तित्वाचा नियम आहे.
पुरुष आणि स्त्रिया या दोघांना तो लागू होतो.

इंदिरा गांधी यांच्यानंतर राज्य स्तरावर यशस्वी झालेल्या स्त्री नेत्यांमध्ये डॉ. जयललिता यांचे नाव अग्रक्रमी आहे.
लहानपणीचे साधे सरळ आयुष्य. अभ्यासात अत्यंत हुशार आणि डॉक्टर होण्याची महत्वाकांक्षा असलेली ही मुलगी मनाविरुद्ध सिनेमात ढकलली जाते. पळून जावे किंवा विरोध करावा तर ताबा आईच्या हातात. वय अवघे सोळा. तिच्याच कमाईवर घर पोसले जात असते.  ती अवघी तेवीस वर्षाची असताना आईचे निधन होते लहान वयात जबाबदारी येते. आतापर्यंत आईच पाहत असल्याने पैशाचे व्यवहार सुद्धा कधी केलेले नसतात.
प्रख्यात नेता आणि अभिनेता एम जी आर त्यांना आपल्या पंखाखाली घेतात. सुरुवातीला  असलेले गुरुचे नाते. संबंधात बदलते. आता आईची जागा एमजीआर यांच्याकडे जाते. वारस म्हणून आपलेच नाव घोषित करणार यांची खात्री असते.
अर्थात शयन गृहातील  वचने खरी होतात असे नाही. वापरा आणि फेका हा नियम नवीन नाही. खरेतर ज्या व्यक्तीबरोबर मानसिक आणि बौद्धिक सूर जुळलेले असतात त्यांना घर संपत्ती सोडा पण कार्यक्षेत्राचा वारसा का दिला जाऊ नये!
जिच्या असण्याचा फायदा चित्रपट क्षेत्र आणि राजकारणात सुद्धा करून घेतला गेला , तिच्याच कडे पाठ फिरवणे हे  जयललितांना सुद्धा अनपेक्षित आणि म्हणूनच धक्कादायक असणार ! 
त्यात MGR यांचा मृत्यू झाला आणि समीकरण बदलले . त्यांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा मनाई केली गेली.  अपमान केला गेला.  त्या नंतर त्यांच्या छायेत असलेल्या एका मुखदुर्बल मुलीचे रूपांतर एका कणखर स्त्री मध्ये झाले . अशा स्त्री मध्ये की जिने पुरुषप्रधान संस्कृतीला सलग ३० वर्षे हादरे दिले . नंतर करुणानिधी मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर असेम्ब्लीत झालेले अश्लाघ्य वर्तन, त्यावेळी घेतलेली शपथ , की येईन तर मुख्यमंत्री म्हणूनच, हे सगळेच असामान्य जिद्दीत मोडले जाते. 

पैसे आणि अमाप संपत्ती याबाबत त्यांच्यावर आरोप झाले. ते खरे असावेत . पण भारतात पैशाशिवाय राजकारण शक्य आहे ? पुरुष नेत्यांनी जमवलेल्या पैशाचा हिशोब लावूया आपण, अगदी नागरसेवकापासून सुरुवात करूया ..अकाउंट्स बुक्स अपुरी पडतील. एवढेच सांगता येईल, बाईना लपवायची कला नव्हती. 

राजकारणात ज्या काही मोजक्या स्त्रिया यशस्वी झाल्या त्त्यांच्यासाठी हा मार्ग अतिशय कठीण होता. ज्यांच्यामागे पती किंवा वडिलांचा भक्कम आधार असतो त्यांच्यासाठी तरी हा सोपान चढणे सुरुवातीला सोपे पण जिचा आधारच नैतिक कल्पनांत बसणारा नव्हता, तिने पार्टी स्थापन करणे, त्याचे नेतृत्व करणे , यशस्वी होणे हे करिष्मा शिवाय शक्य नाही . 
पुरुषप्रधान संस्कृतीत बाई टिकल्या . नाकावर टिच्चून टिकल्या , जिथे त्यांना अपमानित करून हलवून दिले, जहरी टीका झाली तिथे बाईंच्या पायावर पुरुषांनी डोके ठेवावे हे पूर्ण वर्तुळ त्यांनी त्यांच्या हयातीत पाहिले. जयललिता उच्च सिंहासनावर आहेत आणि नेते त्यांच्या पायावर डोके ठेवत आहेत हा फोटो पाहिला असेलच. लोकशाही जिथे आहे तिथे हा फोटो नजरेला खटकतो, मलाही खटकतो तरीही या पुरुषांच्या राज्यात, त्यांनीच ठरवलेल्या नियमांना , अगदी चुकीच्या नियमांना सुद्धा पुरून उरणारी स्त्री म्हणून मला जयललिताचे कौतुक आहे.
राजकारणात अशा अनेक स्त्रिया आमिश दाखवून वापरल्या जातात. वापरून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. सत्य माहित असूनही त्यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका होते , वापरून घेणारा अलगद सुटतो…
अशा अनेक संपलेल्या गोष्टी माहित असताना, राजकारणात झालेला जयललिता चा उदय हे दुर्मिळ आहे.

थलायवी
जयललिता -कंगना राणावत

जयललिता यांचे जुने व्हिडीओ पहिले आहात का तुम्ही ?वरून अत्यंत शांत चेहेरा आणि मुद्देसूद बोलणे. आतमध्ये काय दडले आहे याची कल्पना येत नाही. या सिनेमात या बर्फाळ चेहऱ्याखाली दडलेला  भावनाशील चेहरा दाखवण्याचा प्रयत्न आहे.
अर्थात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व दाखवणे हा सिनेमाचा हेतू आहेच पण एम जी आर वर असलेले त्यांचे प्रेम हा सुद्धा सिनेमाचा महत्वाचा भाग आहे. पुरुषांनी काहीही करावे पण पडद्यामागे. लोकांसमोर त्यांची प्रतिमा ही निर्मल असावी असा दंडक असल्याने कसलेच नाव नसलेल्या या नात्याची निंदा होते, अगदी एम जी आर यांच्या जवळच्या लोकांकडून सुद्धा होते. तरीही गलिच्छ राजकारण, सत्तेसाठी केलेली कारस्थाने यातूनही हे नाते टिकते.

दुसऱ्या बाईला समाजात किंमत नसते. आदर तर नसतोच. पदोपदी अपमान, वैश्या म्हणून केलेली संभावना आणि न डगमगता , त्यातूनही समाजात आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी केलेली धडपड हा सिनेमाचा केंद्रबिंदू आहे.
As a woman, who was treated with contempt by people for loving without fear, Kangana is outstanding.
कायद्याच्या नजरेतून अडचण येऊ नये म्हणून जयललिता आणि करुणानिधी ही दोन नावे  कायम ठेवून बाकीच्या नावात थोडासा बदल केला आहे.
सिनेमा हा larger than life अशी प्रतिमा असलेल्या एका स्त्रीचा असला तरी तिच्या व्यक्तिमत्वामधल्या  करड्या छटा फार खुबीने दाखवल्या आहेत .
चित्रपटात सुरुवातीला एक सीन आहे. चित्रपटाचे शूटिंग चालू असताना MJR आणि जयललिता साठी दोन खुर्च्या ठेवलेल्या असतात. वीरप्पन एक खुर्ची काढायला सांगतो जेणेकरून तिला उभे राहावे लागेल. ज्या तर्हेने जयललिता स्वतःला खुर्ची ठेवून MJR (MGR) ना उभे राहायला भाग पाडते, त्यातच सहा टर्म आपली खुर्ची टिकवून  ठेवणाऱ्या राजकारणी व्यक्तीची बीजे रोवलेली दिसतात.
To be continued 

2 thoughts on “हिंदी सिनेमात गाजलेली स्त्री राजकारणी पात्रे.”

  1. प्रिया,

    चित्रपटांची अचूक निवड.
    आणि तुझं लिहिणं तर
    सुपर से ऊपर…
    ❤️❤️❤️
    आहाहा.

  2. कमाल! सिनेमावरील लेख लिहिणारी लेडी तेंडुलकर झालीयेस तू! 😍

Leave a Reply to Vidula Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *