Skip to content

Happy Valentine. Best scenes .

भाग ७

१९४२ मध्ये कॅसाब्लांका प्रदर्शित झाला.
हा सिनेमा प्रदर्शित होणे हा सुद्धा योगायोग. चित्रपटाचे अंदाजपत्रक अपुरे होते. चित्रपट बनवताना कथेत अनेक बदल झाले. ज्या कथेवरून याचे स्क्रिप्ट लिहिले गेले ती कथा, त्याची नायिका , दुसऱ्या महायुद्धात उतरायच्या तयारी असणाऱ्या अमेरिकन जनतेला मानवणारी नव्हती. तिची व्यक्तिरेखा पूर्ण बदलली गेली. संवाद ऐनवेळी लिहिण्यात आले. त्यात अनेक फेरफार सुद्धा झाले. सेटवर काम करणारे नायक , नायिका आणि इतर पात्रे यांनाही कथेचा शेवट काय असेल याची कल्पना नव्हती. तरीही सिनेमा गाजला. १९४३ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट , दिग्दर्शन आणि पटकथेचा ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने पटकावला.
सिनेमाचा शेवट काय असावा हे शेवटपर्यंत निश्चित होत नव्हते. नायिका आणि नायक आपल्या कर्तव्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करतात ह्या एका शेवटाने कॅसाब्लांका या सिनेमाला अजरामर केले .

या चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे.  हिटलर आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी युरोपवर कब्जा करायला सुरुवात केली होती. युद्धाचे वारे वाहू लागले होते. यात पोळलेल्या निर्वासितांना एकच आसरा होता  “अमेरिका“. 
मोरोक्को मधील कॅसाब्लांका हे अत्यंत महत्वाचे शहर आहे. दुसऱ्या विश्वयुद्धात अनेक लोकांनी युरोप सोडून, पोर्तुगाल मधून अमेरिकेला प्रस्थान केलं. यामुळे पोर्तुगाल मधील लिस्बन बंदराला अत्यंत महत्व आले. अर्थात इथे पोचणे फार कठीण होते.
इथे लागणारा  व्हिसा, कॅसाब्लांका मधून अवैध मार्गाने दिला जात होता.
हा धोकादायक मार्ग पत्करायला तयार असणाऱ्या अनेक लोकांनी  मोरोक्कोमधील कॅसाब्लांकाला मुक्काम ठेवला होता. पोर्तुगालचा एक्झिट व्हिसा  कसाही करून मिळवणे आणि अमेरिकेला निसटणे हे उद्दिष्ट असणाऱ्यांची इथे  गर्दी झाली होती
सिनेमाची कथा घडते ती या शहरात. 

फ्रान्सच्या राष्ट्र गीताने सिनेमाला सुरुवात होते
कॅसाब्लांका मध्ये येतानाच ट्रेनमध्ये दोन जर्मन पोलिसांचा खून  झालेला आढळून येतो. खुनी याच शहरात असणार याचा फ्रेंच पोलिसांना दाट संशय आहे. खुन्यांना आश्रय मिळू शकेल अशी एकच जागा या शहरात आहे ती म्हणजे रिक’स कॅफे.
कॅसाब्लांका मधील अद्ययावत नाईटक्लब आणि जुगाराचा अड्डा.

ह्याचा मालक आणि चित्रपटाचा नायक आहे रिक. (हंफ्री बोगार्ट) . वरवर पाहायला गेले तर रिक कोणत्याही राजकीय पक्षाशी, प्रणालीशी बांधील नाही. त्याच्या कॅफेत फ्रेंच स्थानिक, जर्मन नाझी आणि निर्वासित या साऱ्यांचे येणे जाणे आहे.
रिक या साऱ्यांपासून अलिप्त, आपल्या व्यवसायाशी इमान राखून आहे.
पोलीस अधिकारी लुईस रिकची भेट घेतो. जर्मन पोलिसांचे मारेकरी जर इथे आले असतील आणि त्यांना आश्रय मिळाला असेल तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी सुद्धा देतो. व्हिक्टर लाझ्लो हा झेकोस्लोवाकियाचा स्वातंत्र्य सैनिक कॅसाब्लांका येथे आला आहे याचीही बातमी देताना, त्याला या कॅफेत आसरा मिळता कामा नये हे बजावायला तो विसरत नाही.
“ I stick my neck out for nobody “ मी कुणासाठी कसलीही जोखीम पत्करणार नाही हे रीकचे तत्व आहे.  त्यामुळे युगार्ट नावाचा व्हिसा एजन्ट, त्याच्या कॅफेत मारला जातो तेव्हाही तो कसलीही प्रतिक्रिया देत नाही. त्याची एक शय्यासोबतीण आहे पण ती त्याची प्रेयसी नाही. सर्वांशी त्याचे संबंध सलोख्याचे आहेत पण त्याच्यात आत्मीयता नाही. त्याचे वागणे तुटक आहे. अगदी बुद्धिबळाचा खेळ सुद्धा त्याला एकट्याने खेळायला आवडतो.
अतिशय कोरड्या आणि जगापासून अंतर ठेवून असलेला रिक, आपल्या कॅफेत काम करणाऱ्या सॅम बद्दल मात्र हळवा आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना कॅसाब्लांका मध्ये घडत असताना, रिकच्या स्थिर आयुष्यात उलथापालथ करणारी एक घटना घडते. व्हिक्टर लाझ्लो (पॉल इनरिड ), जो नाझीविरुद्ध कारवाई करणारा भूमिगत क्रांतिकारक आहे , रीकच्या पब मध्ये प्रवेश करतो. बरोबर आहे त्याची पत्नी इल्सा (इन्ग्रिड बर्गमन )
पब मध्ये सॅम पिआनो वाजवत असतो. त्याला पाहिल्यावर इल्साच्या चेहेऱ्याचे भाव  बदलतात. ती सॅमला “ As time goes by “ हे गीत गायची विनंती करते.

“Please sing “
सॅम नकार देतो, आपण कामात आहोत ही बतावणी करतो पण तिच्या नजरेत आर्जव असते आणि आवाजात दडवून ठेवलेला दर्द.
“प्लीज डोन्ट स्टॉप” ती परत एकदा सांगते.
तिची विनंती सॅमला नाकारता येत नाही.
एका वादळी प्रेमकहाणीचे साक्षीदार असलेले गीत सुरु होते.
And when two lovers woo
They still say, ‘I love you.’
On that you can rely 
No matter what the future brings
As time goes by.

इल्सा या गीतात हरवून जाते. काही वर्षांपूर्वी हे गीत तिचे जीवन संगीत असते.
अबोध, निरागस प्रेम, एकत्र घेतलेल्या आणा शपथा, .पारिजातकाच्या मंद सुवासाच्या साक्षीने एकमेकाना दिलेली वचने ,  नजरेत नजर घालून घालवलेली सायंकाळ, मधेच बोलणे, उगाच हसणे, दृष्टीही न हलवता एकमेकांकडे पाहणे, सारे जग जणूकाही या एकांताला वाव करून देते किंवा असे म्हणता येईल, त्यांचे स्वतःचे एक जग त्यांच्यासाठी निर्माण होते.
आता आतुरता असते ती प्रेमाच्या परिपूर्तीची.
प्रत्येक प्रेमाची पूर्तता विवाहात होतेच असे नाही ना ? कधीतरी पाहिलेले धूसर स्वप्न व्यावहारिक जगात कधीच विरून जाते.. दोघांच्यात केवळ एका  उष्ण श्वासाचे अंतर ठेवणारा असा  शिरशिरी आणणारा स्पर्श परस्परांस व्हावा इतक्या निकट येऊन गेल्यानंतर आयुष्याचे मार्ग वेगळे होतात.
तिच्यावर तिच्या पतीचा अधिकार आणि त्याचे आयुष्य त्याच्या कामाशी निगडीत.
आपापल्या जगात रमलेल्या त्या दोघांची अचानक भेट झाली तर!
केवळ इल्सा साठी हे गीत महत्वाचे नसते. ह्या गीताचा दुसरा भाग, रीक जेव्हा हे गीत ऐकतो तेव्हा असह्य होऊन तो सॅमकडे येतो.
“Sam , I told you not to play this song then why  ?” असे दरडावून विचारात असतानाच त्याची नजर इल्सा वर पडते आणि काळ गोठतो.

नयन वळविता सहज कुठे तरी , एका एकी तूच पुढे …
आज अचानक गाठ पडे …

प्रेमाची भाषा कुठेही सारखीच नाही का ?
कॅसाब्लांका  चित्रपटात जेव्हा रीक  आणि इल्सा  जेव्हा २ वर्षाच्या दुराव्यानंतर भेटतात तेव्हा रीक  च्या तोंडून उद्वेगाने शब्द निघतात ” Of all the gin joints, in all the towns, in all the world, she walks into mine”
सर्वांसमोर तो ओळख दाखवत नाही पण गिऱ्हाईकाबरोबर पेय घेणे, स्वतः पैसे घेणे ह्या खरेतर रीक साठी निषिद्ध गोष्टी पण त्याचे नियम सुद्धा तो मोडतो.
प्रेम आणि तिरस्कार (?) माणसाला गोंधळात टाकतात ते असे.

कोण असते ही  इल्सा ?
फ्लॅशबॅक सुरु होतो.

गतकाळातला रीक आनंदी आहे, हसरा आहे आणि प्रेमात आहे. पॅरिस सारख्या प्रेमिकांच्या शहरात त्याच्या बरोबर  इल्सा आहे. त्यांनी एकत्र घालवलेला काळ सुद्धा रोमांचित करणारा आहे. हातात हात घालून शहर भटकणे, सीन नदीतून विहार करणे, क्लब मध्ये एकमेकांच्या मिठीत हरवून नृत्य करणे .. हा काळ संपूच नये असे वाटणारा आहे. दोघेही प्रेमात आहेत  तरीही दोघांच्या आयुष्याला भूतकाळाची काळी किनार आहे. इल्साचा नवरा बेपत्ता आहे आणि तो मृत् असावा अशी साशंका आहे, तर रीक हा तेव्हा नाझी विरोधी चळवळीत सक्रिय असतो.   

जर्मन सैन्य पॅरिस वर आक्रमण करत असल्याची बातमी मिळते आणि रीक शहर सोडण्याचा निर्णय घेतो.
जाण्याअगोदर तो इल्साला मागणी घालतो.
उत्तर माहिती आहे. विचारणे ही फक्त औपचारिकता आहे.
दुसऱ्या दिवशी तो स्टेशनवर तिची  वाट पाहत असतो. ट्रेन स्टेशनवर येते.
ती येत नाही पण सॅम बरोबर पाठवलेली तिची चिठ्ठी सांगते, “  I cannot go with you or see you again. You must not ask why. Just believe that I love you. Go, my darling, and God bless you. Ilsa”

पाऊस धो धो कोसळत असतो.
चिठ्ठीवरील अक्षरे पुसट होत जाताना रीक शहर सोडतो. स्टेशनवर पावसात तिची वाट पाहत असलेला रीक जड पावलांनी ट्रेन मध्ये शिरतो खरा पण एका आनंदी , उत्साही तरुणाचे रूपांतर, जगापासून अलिप्त झालेल्या पुरुषात होते.
रेल्वे स्टेशन्स ही खरंच जादुई जागा आहे. नवीन जागेत प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार म्हणूया आपण. वेगवेगळे आयुष्य आणि गंतव्य असणारी माणसे इथे एकत्र येतात, एकमेकांत मिसळतात आणि मग पाठी न बघता आपल्या दिसभेने निघून जातात.
इथे आवाज असतो, गोंगाट असतो,, अनेक वर्षांनी झालेली भेट असते , परत न भेटण्याचे वचन असत. अनेक भावनांचा साक्षीदार असलेले हे स्टेशन या सर्वांकडे मूक पणे पाहत असते.

दोन वर्षांनी परत इल्साला पाहून “ उघड्या पुन्हा जहल्या, जखमा उरातल्या “ अशी रीक ची अवस्था होते. तो संताप तिच्यावर निघतो. तिच्या न येण्यामागे एक ठोस कारण आहे. तिचे लग्न झालेले आहे. आपला नवरा जिवंत नाही अशी तिची समजूत असते. रीक बरोबर जाण्याच्या आधी तिला समजते की व्हिक्टर जिवंत आहे.
नवरा का प्रियकर ?

हा निर्णय तिच्यासाठी सोपा नाही. आपल्या नवऱ्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल तिला आदर आहे आणि अभिमान सुद्धा.
तटस्थ राहून निर्णय न घेणे हे अशक्य आहे. प्रेम तुम्हाला झुकवते. स्वतःच्या व्यावहारिक पणावर विश्वास असणारा रीक, अखेर आपला कॅफे विकून, स्वातंत्र्ययुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढण्याचा निश्चय करतो . इतकच नाही तर प्राणप्रिय इल्सा ला सुद्धा आपल्यापासून दूर करतो.
या सिनेमात बोगार्ट तीन रूपात दिसतो. भूतकाळातील निरागस , जगावर प्रेम करणारा प्रियकर, नंतर प्रेमभंगाने कोरडा अलिप्त झालेला व्यवहारी  आणि चित्रपटाच्या शेवटी स्वतःचे प्रेम आणि स्वतःचे भविष्य , तत्वासाठी पणाला लावणारा आदर्शवादी.

इल्सा ची भूमिका कठीण आहे. तिचे मन तिलाही अनोळखी आहे.पतीबद्दल आदर , त्याच्या राजकीय विचारप्रणालीशी बांधिलकी , त्याच बरोबर रीक कडे ओढा. निर्णय ती रीकच्या हातात सोपवते. 

मुख्य पात्रांसाठी चित्रपटाचा शेवट दुःखद असूनही पटतो कारण व्हिक्टर लाझ्लो . सर्व पात्रांत व्हिक्टरचे पात्र मात्र आपल्या भूमिकेशी ठाम आहे. आपल्या आदर्शांबरोबर तडजोड करणे त्याच्या स्वभावात नाही. आपल्या पत्नीवर त्याचे प्रेम आहे. तिच्या आणि रिकच्या संबंधाबद्दल त्याला समजते पण तेव्हाही त्याची प्रतिक्रिया समजुतीची आहे. अतिशय खडतर परिस्थिती असताना , हाताशी असलेला आधार हवाहवासा वाटतो ह्याची त्याला जाणीव आहे. आताही त्यांचे प्रेम असेल तर त्यांच्या मार्गातून दूर होण्याची त्याची तयारी आहे,.
He is handsome , idealistic , a true patriot, an understanding husband …
an ideal man in every way . 

प्रेम महत्वाचे का कर्तव्य ? या प्रश्नाचे उत्तर रीक देण्यात यशस्वी होतो आणि पर्यायाने त्याचे पात्र एका वेगळ्याच उंचीवर पोचते.

जेव्हा इल्सासाठी  निर्णय घेणे कठीण असते तेव्हा तो अधिकार स्वतःच्या हातात घेऊन तो म्हणतो , 
“Where I’m going, you can’t follow. What I’ve got to do, you can’t be any part of, Ilsa. I’m no good at being noble, but it doesn’t take much to see that the problems of three little people don’t amount to a hill of beans in this crazy world. Someday you’ll understand  “

पुरुषाला स्त्री मिळणे इतकेच महत्वाचे नसते या जगात. अनेक  गोष्टी आजूबाजूला घडत असतात. जगाचा जिथे नकाशा बदलत असतो तेव्हा तीन  माणसांच्या छोट्याश्या जगातले प्रश्न एवढे मोठे नसतात की  त्याची उत्तरे  त्यांच्या बाजूने मिळावीत.  ” 
हे उद्गार निराशेतून आलेले नाहीत.
देश आणि त्या प्रति असलेले कर्तव्य , व्यक्तिगत सुखाला मागे टाकते ही जाणीव आहे त्या मागे. 
असे म्हणतात , प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्या कसोटीला पुरून उरते.
पण कॅसाब्लांकाचे थीम सॉन्ग आहे,
You must remember this 
A kiss is just a kiss 
A sigh is just a sigh 
The fundamental things apply 
AS TIME GOES BY ..

जेव्हा सिनेमाचा शेवट येतो तेव्हा जिंकतो तो काळ. ठुसठुसणाऱ्या  व्रणाप्रमाणे प्रेम केवळ एक आठवण म्हणून राहते. 
इतिहास घडवतो तो काळ. तिथे प्रेम ही हार मानते.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 



15 thoughts on “Happy Valentine. Best scenes .”

  1. अप्रतिम!! खुप आवडले

    मी उत्सुकतेने तुझ्या लेखाची वाट पाहत असते.

  2. कासाब्लांका हा सिनेमा हॉलिवूड च्या अत्यंत मनःस्पर्शी प्रेमकथेतील सर्वात उच्च दर्जाचा आहे. यासोबतच ZIVAGO हा अत्यंत आवडीचा, अतिशय तरल सिनेमा.
    काय कमाल लिहिला आहे लेख. पुन्हा एकदा कासाब्लांका बघावासा वाटतोय.

  3. सुंदर लिहीलंय.

    मानवी मन, भावना, त्याचा उद्रेक हे अतिशय गुंतागुंतीचे रसायन आहे. रसायनशास्त्राचे बरेचसे नियम लागत नाही इथे.

    1. Thank you Madhav Bhokarikar sir.
      खरंय आणि प्रेम हा विषयच अत्यंत गुंतागुंतीचा आहे
      ..त्यात अडकणे ज्यांना आवडते तेच निभावू शकतात

  4. प्राची कुलकर्णी

    मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही, या गोष्टीची चुटपूट लागली आहे. सुंदर लिहिलंय किती!
    गाणं ऐकलं होतं मी!

    1. Thank you Prachi .
      हा प्राईम वर आहे ..थोडे पैसे देऊन
      नाहीतर internet archive वर मिळेल

Leave a Reply to Balaji 9623457199 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *