Skip to content

आपने जीने ना दिया -ओपी नय्यर-आशा भोसले

बटन्स,  म्हणजे माझी माऊ आजारी होती तेव्हाची गोष्ट. तिचा पाय तुटला होता. प्लास्टर होते आणि डॉक्टरांना दाखवण्यासाठी दर आठवड्याला फेऱ्या व्हायच्या हॉस्पिटलमध्ये.  तिथेच या दुसऱ्या माऊला पाहिले.
गरोदर होती. दिवस भरले होते. कळा सुरु झाल्या होत्या पण ती शांत निपचित पडून होती.
“तीन पिल्लांपैकी दोन आधीच गेली आहेत” डॉक्टर म्हणाले.
तिला कळले असेल का म्हणून अशी शांत असेल का तिला वेदनाच होत नसाव्यात. निर्मितीची प्रकिया वेदनेच्या रस्त्यावरूनच तर असते, प्राणी कसा अपवाद असणार, का तिची सहनशक्तीच या दुःख्खापेक्षा प्रबळ असेल , कितीतरी प्रश्न मनात येऊन गेले.
न राहवून मी विचारले सुद्धा, “ तुम्ही सुटका का करत नाही तिची? अफाट सहनशक्ती हा नेहेमीच प्लस पॉईंट नसतो न! अशाने न बोलताच मरेल की ती” 
“ अहो, ती माणूस आहे का? त्यांचा बांध फुटेल तेव्हा कळेलच. मग घेऊ टेबलवर “
माझ्या आम्माने बजावेल होते, ‘अजिबात आवाज येत कामा नये, चांगल्या घरातील मुली हूं की चूं करत नाहीत”
हिची कोण बाई आम्मा असेल ?
नाही झाले तसे. वेळ येताच, तिने विचित्र आवाजात ओरडायला सुरुवात केली.
वेदना शारीरिकच नव्हत्या. तिची पिल्ले सुद्धा आतच गेली होती.
सहनशीलतेची आणि असहाय्यतेची  परिसीमा जेव्हा गाठली जाते, तेव्हा स्वतःवर घातलेल्या मर्यादा तुटतात.
प्राण्याचे एक बरे असते. त्यांना फक्त स्वतःचे दुःख समजते. नाती गोती, समाज त्यांना लागू पडत नाहीत.
त्यांचे प्रेम, राग, दुःख चव्हाट्यावर असते म्हणून कदाचित त्यांचा तोल जात नाही. ओरडतात. चिकटतात, उड्या मारतात,  चाटतात. मोकळे होतात .
माणसे कुढतात, लाजतात, जीभ असून सुद्धा,  नको त्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतात, नाहीतर चक्क गिळतात.
साचत जाते सगळे मग ओकतात ..
त्या पद्धती सुद्धा वेगळ्या.
कुणाला तरी मारतात नाहीतर स्वतः मरून मोकळे होतात.
कधी शस्रांनी तर कधी शब्दांनी .

बेकसी हद से जब गुजर जाए
कोई ऐ दिल जिए के मर जाए

आशा भोसले -ओ पी नय्यर ही दोन नावे म्हणजे चित्रपट संगीताचे एक महत्वाचे घराणे आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी आशा भोसले यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे  पहिले सोलो गीत होते, रात की रानी या सिनेमातील  “है मौज में अपने बेगाने, दो चार इधर दो चार उधर”
याच सिनेमात नायिकेचा आवाज आहे लता मंगेशकर यांचा. सिनेमातील सर्व महत्वाची गाणी लता -रफी आणि गीता दत्त यांनी गायली आहेत.
या काळात सिनेमातील मुख्य  नायिकांसाठी फक्त लता मंगेशकर यांचा आवाज वापरला जात होता. गीता दत्त आणि शमशाद यांचीही चलती असलेल्या त्या काळात आशा भोसले याना संधी मिळणे कठीण होते. हे चित्र बदलले सी आय डी या सिनेमात. १९५७ मधील या सिनेमातील “ लेके पहला पहला प्यार “ या गीताने आशाला ओपीच्या कॅम्पमध्ये पाय रोवता आले. त्या नंतर १९५७ मधील नया  दौर या सिनेमात आशाचा आवाज नायिकेचा आवाज बनला. ह्यातील गाणी लोकप्रिय झाली आणि ओपी आणि आशा यांनी संगीताच्या इतिहासातील एक सुरेल अध्याय लिहायला सुरुवात केली.

ओपी आणि आशा यांच्या नात्याला अफेअर म्हणता येणार नाही. सुरांच्या मिलनाला शरीराच्या स्पर्शाची गरज नसते.
त्यामुळे शरीरे विलग झाली तरी सुरांना हानी पोचत नाही. ते राहतात आणि हा वारसा कोणत्याही लौकिक वारसापेक्षा अनमोल असतो कारण तो नष्ट होत नाही.
१९५२ ते १९७४ या बावीस वर्षाच्या कालखंडात,  ६१ सिनेमात,  ३२४ गाण्यांची या जोडीने निर्मिती केली. ओपी नय्यर यांच्या करिअर ग्राफ मध्ये रफीजीं , शमशाद बेगम आणि गीता दत्त यांचेही योगदान आहेच पण कदाचित या तिघांच्या गाण्याची बेरीज केली तर कदाचित आशा आणि ओपी यांच्या गाण्यांची बरोबरी होईल. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला टॅक्सी ड्रायव्हर हा जरी त्यांचा शेवटचा सिनेमा असला , तरी, प्राण जाये पर वचन ना जाये या सिनेमातील, ““चैन से हमको कभी “ हे यांचे शेवटचे गीत.

१) चैन से हमको कभी आप ने जीने ना दिया
( सिनेमा -प्राण जाये पर वचन ना जाये)

आशा आणि ओपी  चाहत्यांसाठी हे गीत फार महत्वाचे आहे. लोकप्रिय माणसे आपल्या वेदना बोलतातच असे नाही. त्यांच्या सुरांना मात्र त्या  लपवता येत नाही. बावीस वर्षाचा हा सांगीतिक प्रवास. त्याच्या शेवटच्या नोटस त्याच ताकदीच्या असाव्यात हे दोन्ही कलाकारांना वाटत असणारच. दोघांनी जीव ओतलाय या गीतात. हे गीत पडद्यावर चित्रित झाले नाही हे ही चांगलेच. या शब्दांना दुसऱ्या कुणाचा चेहेरा असावा हे दुःखालाही मंजूर नसावे.

प्रेम हे व्यक्तीवर जडत नाही. चुकीची समजूत आहे. गुणांवर जडते, विचारांवर जडते, रूपावर सुद्धा जडते. स्वतःत जे काही कमी असते , किंवा स्वतःला जे काही हवे असते त्यावर प्रेम जडते. स्वतःला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या, पूरक गोष्टींवर प्रेम जडते. 

निरपेक्ष प्रेम माणसाला करता येत नाही.
सहवासाने गुणांची सवय होते , मग अपूर्वाई जाते आणि बाकीचे  अवगुण खटकायला लागतात. नात्याची उतरंड तेव्हा सुरु होते.

चाँद के रथ में रात की दुल्हन जब जब आयेगी
याद हमारी आप के दिल को तड़पा जायेगी
आपने जो है दिया वोह तो किसी ने ना दिया.

कोणत्याही नात्यात हे अपरिहार्य असते. अपेक्षा येतात, हक्क येतो, जे मिळाले असते त्याची जाणीव असल्याने माणूस स्वतःलाच बांधून ठेवायला बघतो खरा, कधी गरज म्हणून , कधी कृतज्ञता म्हणूनही , तरीही जे मिळते ते अपुरे पडते. मग घुसमट सुरु होते. घराचा पिंजरा होतो.
लग्नाच्या बेडीला उगाच बेडी म्हणत नाहीत. ती अडवणूक असते , काहीजणांची पिळवणूक सुद्धा. बाहेर पडण्याचा  मार्ग खर्चिक असतो. पैसे , स्वास्थ्य , सुरक्षितता सगळ्याच बाबतीत त्रासदायक म्हणून बेडीची चावी शोधण्याच्या बाबतीत लोक मागे सरतात. ओपी आणि आशा यांच्या नात्याला समाजाचे आणि कायद्याचे लेबल नव्हते. 

“सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा”

या प्रश्नाचा फार विचार केला नाही तिने. १९५९ मध्ये सुरु झालेले हे नाते , ५ ऑगस्ट १९७४ ला संपले.
ओपींच्याच शब्दात सांगायचे तर,
एकत्र आणण्यात आणि विभागण्यात, नियतीचा हात असतोच. ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केल्याने , नात्याला सोसायला लागणारा विरह हा अटळ आहे हे मला माहिती होतेच. जे घडले,  ते फक्त, माझ्या कल्पनेपेक्षा काही वर्षे आधी घडले. आयुष्यातले चढउतार पाहिल्या नंतर एक निश्चित सांगू शकतो, आशा, माझ्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण हिस्सा होती. बावन्न पासून आम्ही जरी एकत्र काम केले तरीही ५९ नंतर  या नात्यात  एक सुंदर वळण आले.
It was on August 5, 1972 when we split and she walked away leaving a beautiful scar on my soul.
काय सुंदर अभिव्यक्ती आहे! आत्म्यावर पडलेला ओरखडा.
तो  एवढा खोल होतेकी कुणाच्याही संगतीने तो भरला गेला नाही. आशा नुसती  गेली नाही. त्याचे सूर घेऊन ती न परतण्यासाठी गेली आणि त्यांना मागे टाकून पुढे गेली.
संगीताने सुद्धा ओपी शी बेईमानी का करावी हे न सुटणारे कोडे आहे!

“चैन से हमको कभी” साठी आशाला फिल्म फेअर ऍवार्ड मिळाला, जो तिने स्वीकारला नाही. तिच्या वतीने ओपी ने जरी हा अवॉर्ड स्विकारला, तरीही परत जाताना , त्यांनी ती ट्रॉफी फेकून दिली.

ह्याची चाल अतिशय साधी आहे. पियानो नोट्स, चर्च बेल्स आणि शांततेचा उपयोग केला आहे या गीतात. गाण्याचा वेग सुद्धा संथ. कदाचित येणाऱ्या वादळाची सुरांनाही कल्पना असावी.

एवढ्या सुरेल गीतातून इतका विसंवादी सूर कसा काय उमटला ?
प्रेम काय किंवा मैत्री, ही निरपेक्षच असते. अगदी शरीराची मागणी प्रेमात गृहीत धरली, तरीही ते देणे हवेहवेसे असते. तिथे व्यवहार नसतो. जेव्हा या नावे  नसलेल्या नात्यांवर ओरखडे पडतात, ते  सुरुवातीला लक्षात आले तरीही दुर्लक्ष केले जाते कारण त्याची तोपर्यंत सवय झालेली असते. माणसाला आपले मन सोडवता येत नाही पण  गेलेला तडा भरूनही  येत नाही. माणसे भिडेने बोलत नाही पण साचून ठेवतात. नंतर प्रेम जाते , गरज तर नसतेच आणि सहन करण्याचीही क्षमता संपते, .
मग मात्र एखादी शुल्लक गोष्ट ओझ्याने वाकलेल्या उंटांच्या पाठीवरील काडीचे काम करते. 
ओपी ने आशाच्या मुलीवर हात उगारला.  ह्या गोष्टीने त्या काडीचे काम केले.

२) बेकसी हद से जब गुजर
सिनेमा -कल्पना )

बेकसी म्हणजे असहाय्यता , हतबलता . १९६० मधील हे गीत.तेव्हा  “जादू नगरी से आया है कोई जादूगार” चा कर्ता आशाच्या आयुष्यात आला होता. माणूस प्रेमात हतबल होतो.. कोणतीही  सीमा त्याला रोखू शकत नाही. अगदी स्वतःची बरबादी सुद्धा.

हम हैं खुद अपनी जान के दुश्मन
क्यों ये इल्ज़ाम उनके सर जाए

“कोई ऐ दिल जिए के मर जाए”
———————————
त्या काळात असा निर्णय घेणे अवघड असताना, समाजाची, घरच्यांची, कोणाचीही पर्वा न करता, आशा -ओपीनी आपले स्वतंत्र विश्व उभे केले होतेच. पण सुरांना सुद्धा नजर लागत असणार. पंधरा वर्षांचा सहवास मागे टाकून, परत कधीही न येण्यासाठी आशा बाहेर पडली.
तिरस्कारात सुद्धा सहनशीलतेची कसोटी लागतेच .
फरक फक्त इतकाच असतो की जेव्हा प्रेमात माणूस सीमा ओलांडून जातो तेव्हा त्याला स्वतःच्या प्राणाची पर्वा वाटत नाही . तिरस्कारात मात्र तो दुसऱ्याच्या मरणाची फिकीर करत नाही .


१९४९ मध्ये महल प्रदर्शित झाला. “आयेगा आनेवाला” हे गीत लता बाईंनी सार्थ ठरवले. ती आली, तिने पाहीले, ती जिंकली.ल ता मं गे श क र या सप्त सुरांनी चित्रपट संगीताच्या सर्व दिशा भारून गेल्या असताना केवळ एक संगीतकाराने वेगळी दिशा निवडली. 

लता शिवाय मी यशस्वी होईन ही प्रतिज्ञा करणारा होता “ ओ पी नय्यर” आणि ती पूर्ण करणे  शक्य झाले कारण तेवढ्याच प्रभावी  नावाने त्यांना साथ दिली. ते नाव होते “ आशा भोसले”

लता आणि ओपी एकत्र का आले नाहीत याची अनेक कारणे आणि शक्यता आहेत. १९५२ मध्ये आसमान प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी लता बाई गाणार होत्या. त्या स्टुडिओत उशिरा पोचल्या. ओपींचा अहंकार दुखावला गेला. त्या ठिकाणी राज कुमारीची वर्दी लागली. हे लता बाईंचे विवरण.
ओपीने हे नाकारले आहे. त्यांचे खरे असेलही पण अजून एक किस्सा आहे. 
रफी हा त्यांचा आवडीचा गायक असतानाही, शंकर जयकिशन यांच्या गीताचे रेकॉर्डिग लांबल्याने, , जेव्हा त्याला स्टुडिओत पोचायला उशीत झाला, तेव्हा ओपींनी रफीलाही बाजूला सारले.
लता बाईंच्या बाबतीत नक्की काय झाले असेल याचा आपण केवळ अंदाज करू शकतो. ओपींच्या बाबतीत सांगायचे झाले तर, अभिमान आणि अहंकार यातील फरक न कळल्याने, त्यांचे आणि त्याही पेक्षा रसिकांचे नुकसान झाले.

मी दुसरा रफी निर्माण करेन असे त्यांनी जाहीर केले खरे पण महेंद्र कपूरला  बरोबर घेऊन प्रति रफी निर्माण करणे त्यांना शक्य झाले नाही.
लता बाईंची जागा आशा बाईंनी घेतली नसेल पण त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण केली. लता व्यापून उरलेली असताना , गीता आणि शमशाद त्यांच्या ऐन भरात  असताना सुद्धा आशाने हे करून दाखवले.
आशाला ओपीनी लताच्या सावलीतून बाजूला काढले. तिला स्वतःची ओळख दिली. १९५७ पर्यंत केवळ बी आणि सी ग्रेड सिनेमातील नायिकांसाठी गाणारा आवाज, ए ग्रेड सिनेमातील नायिकेचा आवाज झाला. हा सिनेमा होता”नया दौर”
खरंतर १९५६ मधे प्रदर्शित झालेला CID या सिनेमातील “ लेके पहला पहला प्यार भरके आँखों मैं खुमार” हे गीत शमशाद आणि रफी चे असताना, गुरुदत्त च्या मागे लागून ओपी ने या सिनेमाच्या नायिकेसाठी आशा भोसलेंचा आवाज वापरला.
त्यांच्या आयुष्यातील नायिकेचे स्थान, कुठेतरी त्यांनी पक्के केले असणार. 

शमशाद बेगम यांनी सांगितले आहे, रेकॉर्डिंग रूम  मध्ये जेव्हा सिनेमाच्या नायिकेसाठी, मुख्य गायिका मी असूनही,  आशाचा आवाज वापरला  गेला तेव्हा  माझा आवाज एक्स्ट्रॉ साठी वापरला जातो आहे याची मला जाणीवही नव्हती. जेव्हा झाली तेव्हा माझे स्थान आशा ने घेतले होते.
सिनेसृष्टीत उपकाराला फार  महत्व  नाही.  गीता , शमशाद  यांनी ओपींना  सुरुवातीच्या  काळात साथ  दिली हे खरंच पण  ओपींची झेप  खूप  मोठी  होती. लताबाईंशी  टक्कर  हा केवळ प्रतिष्टेचा नाही  तर अस्तित्वाचा प्रश्न  होता.
गीता आणि शमशाद यांचे  मोठेपण  मान्य  करूनही एक गोष्ट स्पष्ट होती. लता बाईंच्या समोर आव्हान म्हणून एकच  आवाज होता , आशाचा . गीताने आपले गाणे तेव्हा फक्त गुरुदत्तच्या सिनेमापुरते मर्यादित ठेवले होते आणि शमशादचा पंजाबी खणखणीत आवाज सर्वच नायिकांसाठी योग्य नव्हता.

३)आप यूँ ही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा
( सिनेमा -एक मुसाफिर एक हसीना )

भोसलें पासून आशा बरीच दूर आली होती. तीन मुले, घरच्यांपासून दुरावलेले संबंध, घर चालवण्यासाठी संगीतात स्थिरावण्याची नितांत गरज आणि साथीला असलेली जिद्द.
आशाला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी एका बळकट हाताची गरज होती आणि तो हात ओपी ने देऊ केला.
पन्नाशीचे शेवटचे दशक होते ते. दोन विवाहित माणसांचे एकत्र येणे समाजाला पचण्यासारखे नव्हतेच.
सावधगिरीचा इशारा होता हा ,”आपण जर असे एकमेकांना भेटत राहिलो तर बघता बघता एकमेकांचे होऊन जाऊ.” 

रफी -पीछे-पीछे मेरे आप आतीं हैं क्यो  
मेरी राहों में आँखें बिछाती हैं क्यों
आप आती हैं क्यों …

आशा -क्या कहूँ आपसे ये भी एक राज़ है
एक दिन इसका इज़हार हो जाएगा

प्रेमात पडले की माणूस सुंदर दिसतो ते उगाच  नाही. आपण कुणालातरी आवडतोय हे जाणवणेच  स्वतःचा आत्मविश्वास वाढवते. “ मी तुझ्याबरोबर आहे” हे शब्द धीर देणारे. कधीही विचार केला नाही अशा गोष्टी प्रेमात पडले तर सहज घडतात कारण कुणाचातरी तुमच्यावर,  तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त विश्वास असतो. लता पेक्षा वेगळे गाऊन आपण यशस्वी होऊ शकतो याची कल्पना सुद्धा तेव्हा आशा बाईंनी केली नव्हती..
पण ह्या जादूगाराचा परीसस्पर्श झाला आणि आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट संगीतात भरारी घेतली.
एकदा प्रेमात पडले की प्रवाहा विरुद्ध पोहण्याचा  धीर येतोच.
एकमेकांबरोबर गाता गाता एकत्र राहण्याचा निर्णय आशा आणि ओपी यांनी घेतला.
४) लेके पहला पहला प्यार
(सिनेमा सी आय डी )

तुमने तो देखा होगा उसको सितारों 
आओ ज़रा मेरे संग मिल के पुकारो 
दोनों हो के बेक़रार 
ढूँढे तुझको मेरा प्यार 
जादू नगरी से आया है कोई जादूगर 

ओपींच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट उशिरा आली. आपल्या संगीताच्या कारकिर्दीसाठी आशा ने पाऊल उचलले असे वाटल्याने त्याने दुर्लक्ष केले. नंतर ओपीनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
इथे कुणी , कुणाला वापरले हा प्रश्न दुय्यम आहे.
Love helps to  grow. एकमेकांची साथ एकमेकांसाठी उपयोगी असावी यात गैर ते काय आहे!
काही एकमेकांचे potential ओळखून सहचारी होतात , काही आधी सोबतीने चालायचा निर्णय घेतात आणि एकत्र यशस्वी होतात.

५) माँग के साथ तुम्हारा, मैने माँग लिया संसार
(सिनेमा -नया दौर)

दिल कहे दिलदार मिला, हम कहें हमें प्यार मिला
प्यार मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला

माँग के साथ तुम्हारा, मैने माँग लिया संसार .. हे गीत म्हणजे सूर आणि आवाज यांची साथ. ती पुढे पंधरा वर्षे सोबत राहिली. संख्याशास्त्राने मोजायचे तर, ६० सिनेमा, ३२४ गाणी आणि त्यातली १६७ गाणी केवळ आशा बाईंच्या आवाजात आहे.

घोड्यांचा टापांची ही लय म्हणजे खास ओपी टच.
मला आठवते, गिरगावला चर्नीरोड स्टेशन बाहेर टांगे असायचे. बस किंवा ट्रेन मधून उतरलो की टांग्यात बसून आजी कडे जाणे हे अप्रूप होते. सगळ्या बाजूने उघडी सवारीत बसताना, आजूबाजूने पायी जाणारे लोक पाहीले की आपल्याकडेच लक्ष आहे असे उगाच वाटून मान ताठ व्हायची. राजकुमारी असल्याचे फीलिंग.
टापांच्या त्या लयबद्ध आवाजात  मन कुठच्या कुठे फिरून यायचे.

दिल जवां और रुत हसीं, चल यूं ही चल दे कहीं
तू चाहे ले चल कहीं, तुझपे है मुझको यकीं

“तुला स्वतःचा स्वर आहे. तो वापरायला शिक. लता मंगेशकरांसारखे गाऊन तुला काहीही मिळणार नाही “ केवळ हे म्हणून ओपी थांबले  नाहीत. बी आर चोप्रांना त्यांनी दोन पर्याय दिले, एक -ओपी-आशा  किंवा लता. चोप्रानी पहिला पर्याय घेतला and rest is history.
चोप्रांसारख्या बॅनर पुढे न झुकणे हा मोठा जुगार होता . किंवा प्रेम होते . 
“ तू चाहे ले चल कहीं,”  हा केवढा मोठा विश्वास आहे जो आशा बाईंनीसुद्धा ओपी वर ठेवला. 

माणसे प्रेमात बदलतात. एका क्षणात काय घडते ते सांगता येत नाही पण बरेच काही जे आत दडलेले असते, अनेक वेळा काही असेल याचीही कल्पना नसते, तेही  बाहेर येते. प्रेमाची झळाळी  वेगळीच. प्रेम आणि विश्वास हे रसायन अजब आहे. माणसे आपल्या कक्षेतून बाहेर पडतात.

६) आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, हाए
मैं तो आगे बढ़ गयी, पीछे ज़माना रह गया, हाए राम
( सिनेमा -सावन की घटा)

ता गीतातली फेक जेवढी सहज, तेवढ्याच सहजतेने या दोघांचे भावविश्व फुलले. १९५९ च्या सुमारास कधीतरी आशा आणि ओपीच्या नात्याने नवीन वळण घेतले. ओपी आपल्या कुटुंबापासून अलग झाले.
हे अलग होणे फिल्म इंडस्ट्री पासून लपले नव्हतेच आणि जी काही कुजबुज झाली असेल त्याची पर्वा काही ओपी आशा नी केली नाही.

माझ्या गाण्यासाठी आवश्यक असलेला भरीव आवाज लता बाईंकडे नाही. तो पातळ आवाज माझ्या नायिकेला, पर्यायाने माझ्या पंजाबी स्टाईल ला शोभणारा नाही हे ओपींनी सांगितले आहे. माझ्या गाण्याची प्रेरणा स्त्रियांकडून मिळते हे ही त्यांनी सांगितले आहे. त्यांना अपेक्षित असलेली स्त्री, मुक्त, धीट , स्वतःला व्यक्त करणारी आणि जगाची पर्वा न करता स्वतःच्या हृदयाचे खरे करणारी होती. त्यांचे संगीतही तसेच होते .

७) उड़े जब-जब जुल्फें तेरी
(सिनेमा-नया दौर)

उड़े जब-जब जुल्फें तेरी
कंवारियों का दिल मचले
कंवारियों का दिल मचले, जिन्द मेरिये

तुझ्या उडणाऱ्या बटांना पाहून माझ्या हृदयाचे ठोके थांबतात, हे आधी कुणी सांगितले असेल? मुळात पुरुषांच्या सौन्दर्याला पाहून हृदयावर हात ठेवण्याचे धाडस केले तरी असेल का एका नायिकेने !

उस गाँव पे स्वर्ग भी सदके
के जहाँ मेरा यार बसदा
के जहाँ मेरा यार बसदा, जिन्द मेरिये

तसेही पुरुषांना पाहून नायिका लाजते, थबकते, हळूच आपल्या भावना व्यक्त करते याची सवय असताना भर लोकांत आपल्या प्रियकराला “ माझा यार “ म्हणण्याचे धाडस करणारी नायिका वेगळीच वाटते.
यातली नायिका आगळीच.
“ तुझ्यामुळे माझी मैत्री मोडणार आहे याची मला जरा जरी कल्पना असती, तरी मी तुझ्यावर प्रेम केले नसते. पुरुषांच्या मैत्रीचे मोल तू जणू शकणार नाहीस” असे जेव्हा नायक, नायिकेला सांगतो, तेव्हा ती उत्तर देते.
“ मी माझे मोल जाणून आहे हे पुरेसे आहे मला”

स्वत्वाची जाणीव असणारी नायिका ओपींना हवी होती. त्यांच्या संगीताची ती प्रेरणा होती.
स्वतंत्र विचाराच्या मुली, पुरुषांना आवडतात. त्यांच्या पुरुषार्थाला आव्हान असते ते.
फक्त अशा स्वतंत्र विचारांच्या मुली सांभाळण्यासाठी बरीच किंमत द्यावी लागते, स्वतःचा अहंकार आणि  स्वातंत्र्य गमावणे अशक्यच.
८) तुमसा नही देखा मधली नायिका म्हणते ,
(सिनेमा -तुमसा नही  देखा)

रात है दीवानी मस्त है फ़िज़ाएं
चांदनी सुहानी सर्द है हवाएं
तुम भी अकेले हम भी अकेले
कहते हैं तुमसे हाँ
तुम भी जलोगे हाथ मलोगे
रुठ के हमसे हाँ

ह्या गीतात समर्पण नाही , मागणी आहे,
मला सोडून गेलास तर तुझेच नुकसान आहे हा स्वतःवरील विश्वासही आहेच.

शृंगार हा ओपींच्या गाण्याचा बेस आहे.
रंगेल, रगेल ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही प्रभाव त्यांच्या चालींवर आढळतो.
ते स्वतःच म्हणत, “ माझ्या आयुष्यातील स्त्रिया ह्या माझ्या  प्रेरणा आहेत. माझ्या व्यक्तिमत्वात जो सकारात्मक बदल घडला, त्यात त्यांचे योगदान आहेच.
प्रणय हा माझ्या आयुष्याचा पाया आहे. तो माझ्या चालीतही उतरला आहे. माझे संगीत तरुण आहे.’

९) इशारो इशारो इशारो में दिल लेने वाले
(सिनेमा-काश्मीर की कली) 

ओळख पटणे ही पहिली पायरी आणि नंतर सुरु होतो हा संपूच नये असा वाटणारा प्रवास.
रोमान्सची नक्की व्याख्या मला नाही सांगता येणार. मध्ये एका मैत्रिणीने रोमान्स कसा असावा ह्या बाबतीत मार्गदर्शन करा अशी पोस्ट टाकली होती.
“कसाही असूदे पण त्याला पर्सनल टच दे ग” असे सांगितले होते मी तिला .
फुले, केक्स, चॉकलेट्स हे सर्व रोमांचित करत असतीलही पण सगळ्यात रोमांचक आहे तो हातात हात घालून केलेला प्रवास.
जर हवा असणारा हात हातात असेल तर साधा डांबरी रस्ता सुद्धा फुलांच्या पायघड्या पांघरून येतो.

तो म्हणतो,
इशारो इशारो में दिल लेने वाले ,
बता ये हुनर तुने सिखा कहा से .

तो खूप श्रीमंत घराण्याचा वारस आणि कसल्याही वाईटाचा स्पर्श न झालेली ती निरागस निसर्गकन्या.
इथे शम्मी हा नेहेमीचा जंगली शम्मी नाही . He is quiet and he worships her, It is evident in the manner in which he treats her .
अचानक आलेल्या वळणावर मिळालेली ही प्रीती आणि तो त्याबद्दल कृतज्ञआहे .
There is a sense of awe that they have found each other .
“अशी हृदयाची चोरी करायला कोणी शिकवले तुला?”तिचा थोडासा खट्याळ , थोडासा निरागस प्रश्न .
From the same place where she has learnt to bewitch him with her eyes.
त्याचे उत्तर. 

ओपी आणि आशा  यांचे अजून एक सुंदर गीत आहे,
१० )प्यार पर बस तो नहीं है मेरा, लेकिन फिर भी

तू बता दे के तुझे प्यार करूँ या ना करूँ
(सिनेमा-सोने की चिडियाँ) 

प्रेमात पडल्यावर बुद्धीला भावनांवर विजय मिळवतो येतो का ?
कठीण प्रश्न आहे . ज्याचे काम खरेतर त्यालाच करू द्यावे . “हां बडे धोखे है ” असा इशारा मेंदू देत असताना सुद्धा नेमक्या महत्वाच्या क्षणी मन हट्टी होते .
Jackie Collins has said,”Love does not appear with any warning signs. You fall into it as if pushed from a high diving board. No time to think about what’s happening. It’s inevitable. An event you can’t control. A crazy, heart-stopping, roller-coaster ride that just has to take its course.” We are not sure how it happens ….when it starts….. and we can ‘t stop it either..
आपले प्रेम आहे याची खात्री त्याला आहे  पण तिच्या मनाची ग्वाही तो देऊ शकत नाही . त्याच्या स्वप्नांवर तर तिने कधीच ताबा मिळवला आहे . पण तिच्या स्वप्नाच्या राजकुमाराच्या चेहेरा आपल्याशीच मिळतो ह्याची खात्री मात्र तो देऊ शकत नाही .

पूछ कर अपनी निगाहोंसे बतादे मुझको
मेरी राहोंके मुकद्दर में सहर है के नहीं!
तलत चा आवाज आग्रही होत नाही . संशयी तर नाहीच नाही . त्यात कोणतीही खोट नाही . त्याच्या प्रेमात सुद्धा नाही . All is fair in war and love हे कोणी म्हंटले आहे मला ठाऊक नाही . युद्धाचे ठीक आहे .जिंकणे हाच धर्म असतो त्याचा . प्रेमात जिंकणे महत्वाचे नाहीच . जिंकून देणे महत्वाचे आहे . आपले हृदय द्यायचे आहे तिला . विश्वासाने . तिचे लुबाडायचे नाही .
तू बता दे के तुझे प्यार करू या न करू ? … सरळ साधा प्रश्न ..

यावेळेपर्यंत भोसले आणि आशाबाई यांचे नाते संपुष्टात आले होतेच.
ओपींची एन्ट्री योग्य त्या वेळेला झाली. “तू बता दे के तुझे प्यार करू या न करू ?’या  साध्या प्रश्नाचे  उत्तर  ही तितकेच सहज होते. या गीतात आशा चा फक्त आलाप आहे आणि हुंकार .
खूप सुरेल आणि सुंदर आहे गीत. 

प्रेमाचे आयुष्य हे नेहेमीच मर्यादित असते कारण सहजता टिकवता येत नाही. ती  लज्जा , तो विश्वास, ते स्वतःला सोपवणे जास्त काळ राहत नाही. कितीही तयारी करून, फोटोशॉप करून  ऍनिव्हर्सरीचे फोटो लावले तरी पहिल्या वाहिल्या फोटोंची लज्जत त्यात नसते. मला असे नाही म्हणायचे , की प्रेम खोटे असते पण कोणत्याही गोष्टीचे नावीन्य गेले की त्यातली उत्स्फूर्तता जातेच. 

११) मैं सोया अँखियाँ मीचे
(फागुन ) 
आशा – ओपी आणि रफी यांचे पिलू रागातील हे गीत सुद्धा प्रेमाच्या नव्हाळीचे. तो जमीनदाराचा मुलगी , ती साधी नर्तकी.
पण प्रेमात पडताना या गोष्टींचा कुठे विचार होतो! त्याचे  विश्व तिच्या घनदाट केसांत , हरणासारख्या डोळ्यात बंदिस्त झाले आहे . 

मैं सोया अँखियाँ मीचे, तेरी ज़ुल्फ़ों के नीचे 
दुनिया को भूल दीवानी, अब रहा ज़माना पीछे 

मी असताना आता कुठली जगाची चिंता करतेयस तू ! मै  हूँ ना . 

“अब चाहे कहीं ले जा तू आगे और मैं पीछे” ही ओळ जेव्हा मधुबाला म्हणते न, तेव्हा तिच्या डोळ्यातली स्वप्ने नुसती दिसत नाहीत तर  आशाताईंच्या आवाजात ऐकू सुद्धा येतात .
माझे खूप आवडीचे गाणे हे हे , भारत भूषण सकट . तसेही प्रेमात माणूस आंधळा होतोच.

संगीत तरुण असणे वेगळे आणि ते परिपक्व असणे वेगळे. चित्रपटाची गाणी केवळ संगीत किंवा आवाज म्हणून लक्षात राहत नाहीत. त्यांना कथेची, चित्रीकरणाची आणि अभिनयाची पार्श्वभूमी लागतेच. 
कलाकारांचा असा सुरेल प्रवास हा सर्वसामान्यांसाठी सुद्धा महत्वाचा असतो कारण तो श्रवणीय आणि अनेक वेळा प्रेक्षणीय असतो. उदा. प्यार  हुआ इकरार हुआ है , हे गीत . हे गीत फक्त लता मुकेश यांचे आहे म्हणून लक्षात राहत नाही . त्यामागे राजचे दिग्दर्शन आहे आणि राज नर्गिस यांचा अभिनय आहे.
मुघल ए आझम यातली किंवा मदर इंडिया , प्यासा मधली गाणी घ्या ती गाजली कारण सर्वच अंगाने ती उत्कृष्ट होती.
ओपींच्या सिनेमाबाबत हे सांगता येत नाही. जो निर्माता माझी किंमत द्यायला तयार होता, त्याच्यासाठी मी उत्तम संगीत दिले असे ते म्हणतात पण पैसे आणि गुणवत्ता यांचा संबंध असतोच असे नाही.
गुरुदत्त बॅनरचे बाज , आरपार, सीआय डी  त्यांनी केले पण प्यासा एस डी  बर्मन याना मिळाला.नया दौरच्या वेळेस त्यांचे साहिर यांच्याशी फाटले. बी आर चोप्रानी  साहिर यांचा हात पकडला.
तुमसा नही देखा, काश्मीर की कली, हावराब्रिज, फागुन , एक मुसाफिर एक हसीना  हे सिनेमा गाजले केवळ संगीतामुळे.
ते क्लासिक मध्ये गणले गेले नाहीत.
ती मर्यादा त्यामुळे त्यांच्या संगीतातही आहेच. केवळ  सुरमयी  अशी मात्र  काही  गीते आशा बाईंनी गायली आहेत
आशा बाईंच्या  आवाजातला मादकपणा त्यांना  इतर गायिकेत मिळाला  नाही  असे  एक कारण त्यांनी स्वतःच,  त्यांच्या  आशा  फिक्सेशन साठी दिले  आहे.
अगदी उदाहरण घ्यायचे तर आयेगा आनेवाला हे लता बाईंनी गायलेले गीत ऐका .

तडपेगा कोई अबतक, 
बे आस बेसहारे 
लेकिन ये कह  रहा है , दिल के मेरे इशारे
आयेगा आनेवाला …

प्रेमाच्या अनोळखी राज्यात नुकतेच पडलेले पाऊल आहे हे, प्रेमाची अस्तित्वाची अस्फुट जाणीव . कदाचित त्याचा चेहेरा सुद्धा अस्पष्ट . कल्पनेतलं रूप हळूहळू मनावर उमटायला लागलय.  पूर्ण गीतच आकर्षणाने भारलेले .  The song is overflowing with desire for an as yet unknown lover … and she knows her lover  will appear some day . 
बाह्य जगाचा तिला विसर पडलेला आणि  त्या जगाला ती अनोळखी .  तिच्या छोट्याश्या जगात मात्र कोणाची तरी चाहूल स्पष्ट ऐकू येते आहे तिला .  हृदयातील स्पंदने सुद्धा एक आशेवर तगलेली .  आयेगा , आयेगा , आयेगा ..  आयेगा , आयेगा आनेवाला …
ह्यात आवेग आहे तो सुद्धा सीमित.
याच्या पार्श्वभूमीवर  आशा  बाईंचे “आईये मेहरबां”   ऐका …
काय   योगायोग आहे ,
दोन्हीकडे मधुबाला अशोककुमार
मधुबालाचा रोल दोन्हीकडे संशयास्पद पण लता बाईंच्या आवाजात आर्जव आहे , आशाबाईंच्या आवाजात  आव्हान.

प्रेमाचा मार्ग समर्पणाचा  असतो , प्रेमाचा मार्ग जिकंण्याचा सुद्धा  असतो .
एक स्वतःला  सोपवते ,  दुसरी त्याला  अंकित करते ..
एकीला फुलवावे लागते , एक चेतवते.  

पावलो कोएल्हो चे एक वाक्य  आहे, 
“I am two women: one wants to have all the joy, passion and adventure that life can give me. The other wants to be a slave to routine, to family life, to the things that can be planned and achieved. I’m a housewife and a prostitute, both of us living in the same body and doing battle with each other.” 

लता बाईंनी  आवाज  दिलेली  नायिका  ही पन्नाशीच्या  दशकातील. देश नुकताच  स्वतंत्र  झालेला होता.  देशाच्या  बांधणीत कुटुंबाची  बाजू  धरून  देणारी नायिका असणे आवश्यक होते.  त्यात  स्वतंत्र  विचाराची , स्वतःच्या गरजांचा  अंदाज  असणारी , त्या स्पष्ट  बोलण्याचे  धाडस  असणारी  विरळाच पण प्रत्यक्षात नाही तरी फॅटन्सीत अशी आक्रमक स्त्री अनेकांना आवडते. .
तिला  आवाज  देण्याचे  धाडस आशा ताईंनी केले . त्याची  सु रुवात ओपीं च्या संगीत  दिग्दर्शनाखाली  झाली . भारतीय नायिका , (मी खलनायिका म्हणत  नाही  आहे )बोल्ड व्हायला  सुरुवात झाली . 
१२) आईये मेहरबां
(सिनेमा -हावडा ब्रिज)

शाहरुखने बाजीगरमध्ये अँटिहिरो केला. त्याच्या लोकप्रियतेला उधाण आले. त्याच्या  आधी अमिताभने दिवार मध्ये हा प्रकार हाताळला होताच. सिनेमातला पहिला अँटिहिरो होता अशोक कुमार. त्याच्या “ किस्मत “ या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक मोडला होता.
संस्कार आणि मूल्ये यांचा पगडा असूनही माणसाला अशा ग्रे कॅरॅक्टरचे आकर्षण का असते ?

बोल्ड मुलगी ,म्हणजे चाकोरीत न बसणाऱ्या मुलीचे आकर्षण अनेकांना असते. मोकळी असणे म्हणजे सहज मिळू शकते असा एक समज आहे. समाजाची पर्वा न करणारी, नावीन्याचे आकर्षण असणारी,  स्वतःच्या मर्जीने  निर्णय घेऊ शकणारी मुलगी रूढी आणि नियम यात बांधलेल्या पुरुषाला भुरळ पाडते . तिच्याबरोबर कोणतीही फँटसी , नुसती फँटसी राहत नाही.  बंधनातच अडकून राहण्याची इच्छा नसल्याने, बेबंद आणि बेधुंद जीवन जगण्यासाठी त्यांची तयारी असते. Men feel more alive with them .

महल सिनेमात मधुबाला खूप लहान आहे.कोवळी मुलगी.
हावरा ब्रिज मध्ये तरुण स्त्री आहे. नाईट क्लब सिंगर.
इथे येणाऱ्या लोकांनां आपल्या सुंदरतेची भुरळ घालून पैसे कमावणे हा तिचा व्यवसाय आहे.  आशाचा आवाजही तसाच.
खट्याळ, मोहक आणि आकर्षून घेणारा..

कैसे हो तुम नौजवाँ, इतने हसीं मेहमान
कैसे करूँ मैं बयाँ, दिल की नहीं है ज़ुबाँ
आइये मेहरबाँ, बैठिये जाने-जाँ
शौक़ से लीजिये जी, इश्क के इम्तहाँ

उपस्थित असलेल्या प्रत्येक पुरुषाला  वाटते  की  हे गीत  केवळ त्याच्यासाठीच गायले जात आहे . मानेला दिलेला झटका , उडवलेले  केस, रोखलेली  नजर आणि चेहेऱ्यावर फुललेले  हास्य
…स्त्रियांना अनेक  आयुधे तशी जन्मतः  मिळालेली असतात.
काही बायकांना त्याचा वापर सुद्धा करून घेता येतो . 

१३ )ये है रेशमी, ज़ुल्फ़ों का अन्धेरा ना घबराइये
( सिनेमा-मेरे सनम)

टिपिकल जाळ्यात पकडायचे गीत म्हणू शकतो आपण. इथे तर सगळेच खोटे. अगदी आकर्षण सुद्धा.
खलनायकाला त्यांचे नको त्या अवस्थेत फोटो काढायचे आहेत. त्याचा हेतू वेगळा.
ही खलनायिका असली तरी तिचे खलनायकावर प्रेम आहे.
दुष्ट माणसावर केलेले प्रेम, त्यांचा परिणाम सुद्धा नाशातच होतो. तिचा खून होतो.

प्यासी है नज़र, ये भी कहने की है बात क्या
तुम हो मेहमां, तो न ठहरेगी ये रात क्या
रात जाए रहे, आप दिल में मेरे
अरमां बन के रह जाईये
ये है रेशमी ज़ुल्फों…

मिणमिणते  दिवे, झिरझिरीत कापडाचे पडदे, अंगाची वळणे दाखवणारा पोशाख आणि आशा बाईंचा come hither silky voice 
त्याला विसंगत गोंधळलेला विश्वजीत…

१४)  जाईये आप  कहाँ जायेंगे 
(सिनेमा -मेरे सनम) 

देखिये चैन मिलेगा न कहीं दिल के सिवा
आपका कोई नहीं, कोई नहीं दिल के सिवा 
जाइये…

ह्यात सुद्धा  विनवणी नाही;  तर तू जाणारच नाही हा विश्वास आहे .
तो ही त्याच्यावर नाही तर  स्वतःवर आहे
.कुठेही जा, तूला माझी नजर, माझे प्रेम, माझा करिष्मा माझ्याकडेच घेऊन येणार .
काय बिशाद आहे कुणाचीही, कुठेही  जाण्याची ! 

ह्याला अपवाद अशी काही गीते आहेत पण नियम अपवादानेच सिद्ध होतो नाही का !
१४ ) वो हँस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे
(सिनेमा -बहारें फिर भी आएंगी ) 


दोन बहिणी , एक  पुरुष
धाकटी  मोकळी, प्रेमाचा  इजहार करून प्रेम सुद्धा मिळवते .
मोठीवर जबाबदारी . त्याने  आलेला समजूतदारपणा
आणि त्यातून नशिबाने लादलेली  हार

रोएँ तो भला कैसे खोलें तो ज़ुबाँ क्यूँ कर 
खोलें तो ज़ुबाँ क्यूँ कर
डरते हैं कि जाने क्या संसार समझ बैठे

प्रतारणा आणि एकतर्फी प्रेम. दोन्ही कडे एकटेपणाच असतो
पहिल्यात सिक्काच खोटा  असतो. त्याचा  संताप  येतो. Here one protests. 
दुसरीकडे स्वतःचा आत्मविश्वास जातो. आपण नकोसे आहोत किंवा कुणाच्या खिसगणतीत नाही हे अनेक वेळा मानसिक खच्चीकरण करते आणि अनेकवेळा ते कायम राहते.. एकतर्फी प्रेम स्वतःच्या अस्तिवाला मुळापासून संपवते. Here one resigns .

बहारें फिर भी आएंगी हा  गुरुदत्त निर्मित सिनेमा, कथानक, अभिनय या सर्व दृष्टीने चांगला  होता. ह्या सिनेमात प्यासा पासून दुरावलेले गुरुदत्त आणि ओपी परत एकत्र  आले.

ओपी नय्यर यांना तालाचा बादशहा असे म्हंटले जाते. त्यांनी संगीत दिलेली  क्लब सॉंग्स किंवा हलकी फुलकी प्रेमगीते यांच्या रिमिक्सला मागणी आहे ती त्या प्रसिद्ध ठेक्यामुळे. त्यात ऊर्जा आहे आणि लय. न नाचणाऱ्या माणसाचे पाय सुद्धा थिरकताना दिसतात आणि आज एकविसाव्या शतकात सुद्धा ती अत्यंत लोकप्रिय आहेत. या लॆखात मात्र मी थोडी वेगळी गाणी घेतली कारण ताला बरोबर ओपीना मेलडीचे तंत्र सुद्धा अवगत होते. ही गाणी फक्त कॅची नाहीत तर त्यात माधुर्य आहे, गोडवा आहे आणि त्याही पेक्षा ती भावनेनी ओतप्रोत भरलेली आहेत.
शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण न घेतलेल्या ओपींनी फागुन या सिनेमात जी गाणी दिली ती सर्व “पिलू“या रागावर आधारित आहेत हे माहित आहे का तुम्हाला !

१६ जानेवारी १९२६ मध्ये जन्मलेल्या ओंकार प्रसाद नय्यर यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे.
काही माणसे जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे भविष्य जाणून आलेली असतात. शिक्षणाला महत्व असलेल्या घरात संगीताची कास धरणारा हा मुलगा तसाच होता. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अठराव्या वर्षीच संगीत क्षेत्रात उडी घेतली. “प्रीतम आन मिलो” ह्या गीताने यश मिळवले पण ओपींना व्यावसायिक यश मिळवायला अनेक वर्ष जावी लागली.
कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेलं अपयश पाहून परत पंजाबला जाण्याचे प्लॅन्स फसले त्याला कारण होता गुरुदत्तचा आर पार हा सिनेमा. १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने खोऱ्याने पैसे ओढले; त्यात ओपी यांच्या संगीताचा मोठा वाटा होता. माणसाला अभिमान असावा पण अहंकार नाही . सारासार विवेकबुद्धी नष्ट होते . ओपींचे तेच झाले. सुमार चित्रपट केवळ संगीतावर तरुन गेले म्हणून निर्माते नोटांच्या गड्ड्या घेऊन ओपींसमोर उभे राहिले. लक्ष्मी मिळाली म्हणून ओपीनी केवळ संगीतावर लक्ष केंद्रित केलं ..चित्रपट केवळ संगीतावर चालत नसतात. काळ बदलला, सिनेमा कोसळले आणि त्या बरोबर ओपींच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. त्यात त्यांची प्रेरणा त्यांना सोडून गेली.
सत्तरच्या दशकातच संगीत क्षेत्रापासून लांब गेलेल्या ओपी नय्यर यांनी २८ जानेवारी २००७ मध्ये अधिकृतपणे या जगाचा निरोप घेतला.
कलाकारांच्या मृत्यूच्या तारखेला तसे महत्व नसते. त्यांची गाणी जो पर्यंत सजीव असतात तोपर्यंत त्यांना मृत्यू नसतो.
त्यामुळे पुढच्या अशा असंख्य वाढदिवसाच्या मालिकेतला हा शंभरावा वाढदिवस आहे .

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.





13 thoughts on “आपने जीने ना दिया -ओपी नय्यर-आशा भोसले”

  1. प्रिया,
    ❤️❤️💐💐
    नेहेमीप्रमाणे अप्रतिम लेख..
    आशा आणि ओ. पी .अशी गाणी निवडली आहेस.
    कुठलं घेऊ,कुठलं नको असं झालं असणार.

  2. किती अप्रतिम लिहिलं आहेस… ओ.पी. आणि आशा.. हे रसायनच फार आवडतं आहे. सुंदर गाणी घेतली आहेस तू या लेखात.

      1. आशा बरोबर ओ.पी.नैय्यर म्हणजे कम्माल. मनावर एक अजबच मधुर संगीताचा नशा चढवणारी न विसरणार्या गाण्यांचा खजिनाच आहे. प्रिया त्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.अशी लिहीत राहा कायम.

  3. आशा आणि ओ पी नय्यर अजीब रसायन होतं .तू ईतकं छान लिहीलयं कि वाचून मन भरत नाही .गाणी तर अफलातून निवडली आहेस . तुझी लेखन शैली ईतकी धारदार आहे कि सगळे प्रसंग डोळ्यासमोर येतात
    अप्रतिम लेख

  4. अप्रतिम लेख! आशा आणि ओपी हे कॉम्बिनेशन केवळ अतुल्य आहे

Leave a Reply to Gauri salvekar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *