Skip to content

अंतरंगात दडलेल्या भावभावनांचा मागोवा घेणारा उल्लोझुक्कू (Ullozhukku)

सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. एकत्र राहणार असलात  तर नवऱ्याची पत्रिका जुळवण्याऐवजी सासूशी जुळवावी असे मला खरोखर वाटते. नवीन कुटुंबात दोन स्त्रियांचे एकमत होणे यासारखे सुख नाही. दोन्ही स्त्रिया खरेतर स्वतःचे घर सोडून दुसऱ्या घरी आलेल्या असतात. स्वतःची ओळख पुसून नवीन ओळख अंगीकारणे हे खरेतर दिव्यच, दोघांनी पार पाडलेले असते. जे घर, त्यांनी आपले मानलेले असते, तिथे राहण्याचे लायसन्स खरेतर त्यांच्या नवऱ्यावर आणि मुलांवर अवलंबून असते, असे असताना सुद्धा या दोघी एकमेकांना स्पर्धक म्हणून पाहतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. सिनेमा आणि सीरिअल मधून जे सासू सुनेचे चित्रण केले जाते त्यामुळे सुद्धा या नात्याकडे बघण्याचा नजरिया दूषित असतो.

मल्याळम सिनेमा “ ullozukku “, सासू आणि सून मधील गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित आहे पण हे नाते थोडे वेगळे आहे. ह्या नात्यात स्पर्धा नाही, एकमेकांवर कुरघोडी करायचा अट्टाहास नाही. वरवर पहिले तर या दोन्ही बायकांत एकमेकांना जाणून घ्यायचा समजूतदारपणा आहे आणि तरीही कुणालाही समजणार नाही असा ताण या दोन्ही स्त्रियांत आहे.

केरळमधील एका गावात घडणारी ही कथा. पावसाळ्यात इथे पाणी तुंबते. दैनंदिन कामे सुद्धा सुरळीत पार पडत नाहीत. सगळेच खोळंबते आणि एका प्रेताला सुद्धा दफनभूमीत जाण्याची वाट पाहावी लागते.
मृत्यू ते दफनभूमी , खरेतर आयुष्य थांबल्यावर असा काय मोठा फरक पडणार त्या गेलेल्या जीवाला!
त्याला नाही पण त्याच्याशी बांधल्या गेलेल्या दोन स्त्रिया आहेत. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी त्याच्या मुलाची आई होणार आहे, निदान जग तरी असेच समजत आहे. त्याच्या मृत्यूने या दोहोंचे जीवन सुद्धा खोळंबले आहे.
Ullozukku हा सिनेमा एका आईची,लीलाम्माची (उर्वशी) आणि एका पत्नीची, अंजूची(पार्वती थिरुवोथु) गोष्ट आहे.

अंजू आणि थॉमसकुट्टीच्या लग्नाने सिनेमाची सुरुवात होते.

अंजूला हे लग्न करायचे नाही. तिचे राजीववर प्रेम आहे. तो दुसऱ्या धर्माचा असल्याने तिच्या आईवडिलांचा विरोध आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे कारण आहे ते पैशाची कमतरता. राजीव अजून आपल्या आयुष्यात स्थिरावलेला नाही.  त्याचेच भविष्य अंधारात असताना, अंजूकडे तरी काय पर्याय आहे !
थॉमसकुट्टीला आपल्या पत्नीचे मन जिंकण्यात स्वारस्य नाही. त्याला, तिचे शरीर भोगण्यात रस आहे. तेच काम तो करत असतानाच एके दिवशी तो बिछान्याला खिळतो. डॉक्टरकडे गेल्यावर समजते की त्याला कॅन्सर आहे. लग्नाला जेमतेम काहीच महिने झालेले आहेत आणि अंजूचे एका नववधू मधून एका नर्स मध्ये परिवर्तन झालेले आहे. हॉस्पिटल, डॉक्टर, शुश्रूषा यातच दिवस जात असताना, तिची राजीवशी भेट होते.
स्वतःच्या परिस्थितीविषयी मनात साचून राहिलेला संताप, राजीवबद्दल अजूनही असलेल्या प्रेमाच्या भावना आणि शरीराची भूक , यात विचार करण्याची शक्ती संपते. एका पावसाळी संधयाकाळी तिचे राजीवशी संबंध येतात.
मनात अपराधी भावना घेऊन  घरात वावरताना, आपल्याला या घरात राहायचा हक्क नाही हे वाटत असलेल्या अंजूला, या स्थितीत घर सोडून कसे जायचे आणि कुठे जायचे या चिंतेने ग्रासले आहे.  त्याचवेळी तिला समजते की ती गरोदर आहे. हे मूल आपल्या नवऱ्याचे नसून राजीवचे आहे हे अंजू जाणून आहे पण थॉमसकुट्टीच्या आईला मात्र याची कल्पना नाही. मुलाचे शेवटचे काहीच दिवस राहिलेले असताना, येणाऱ्या नवीन जीवाच्या बातमीने ती आनंदित होते. वैराण होऊ झालेल्या आयुष्यात कुठेतरी आशेची झुळूक घेऊन येणारा हा जीव. आपल्या सूनेला कुठे ठेवू , कुठे नको अशी तिची अवस्था होते. त्याच वेळी थॉमसकुट्टीचा मृत्यू होतो.
घरात माणसांची वर्दळ चालू असते. लोक सांत्वनासाठी येत असतात. घरात जेव्हा मृत्यू होतो,, तेव्हा अंत्यसंस्कार होईपर्यंत प्रेताचेच नाही तर घरातील लोकांचे आयुष्य सुद्धा खोळंबून राहते. आयुष्यात आलेला नकोसा विराम. अशावेळी मनात भावनांचा कल्लोळ असतो आणि अनेक लपवलेली रहस्ये , गुपिते ओठावर येण्यासाठी धडपडतात. प्रत्येकालाच या विरामातून बाहेर पडायचे असते. 
बाहेर पाऊस कोसळत असतो. हॉस्पिटलमधून प्रेत आणणे सुद्धा अशक्य होते. घरात पाणी शिरायला सुरुवात होते. सुनेला त्याचा त्रास होऊ नये म्हणून लीलाम्मा माणसांना बोलावून घर दुरुस्तीच्या मागे लागते. आता येणारे मूल तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होतो.  सुनेच्या खोलीत ती मुलाचे फोटो लावते.  १९ व्या  वर्षीच लग्न करून या घरात आलेल्या लीलाम्माला नवरा आणि मुलगा याशिवाय दुसरे जग नाही. सून लहान आहे, लहान वयात विधवा होऊन ती कशी राहणार, तिच्या आयुष्याचे काय होईल,  हे प्रश्न तिला पडत नाहीत.
प्रसंगी स्वतःच्या सख्ख्या मुलीचा सुद्धा हक्क डावलून, सुनेला सर्व प्रॉपर्टी देऊन, त्या उपकाराच्या ओझ्याखाली तिला घरात ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तिची तयारी आहे.
“ येणारे मूल वडिलांचा चेहेरा बघून वाढेल “ ती अंजूला सांगते.
सुनेचे आयुष्य ? तेही या स्मृतीशी जखडणार का हा? हा विचारही तिच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे. .
अंजूला मात्र इथे राहायचे नाही. आपण लीलाम्माला फसवत आहोत ही अपराधी भावना आणि राजीव कडे परतण्याची ओढ या कात्रीत सापडलेली अंजू , खोट्याचा सामना करता करता थकलेली अंजू, राजीवला भेटायला जाते.
बाहेर पाऊस कोसळत असतो. सगळे रस्ते बंद. जाण्याचा मार्ग फक्त नदीतून. पूर तर एवढा की रस्ते कुठले आणि नदी कुठली हे ही समजत नाही.
दातेंचे गाणे आठवले मला .
सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे

“ मी आणि बाळ कसेही राहू , तू जे कमावशील त्यात आम्ही भागवू “
“ ते शक्यच नाही. एकतर मी नवीन जॉब शोधतो आहेच नाहीतर तुझ्या नावावर  प्रॉपर्टी झाली की तू ये “ राजीव सांगतो.
त्याचेही प्रेम असतेच, तो कळवळून सांगतो पण परिस्थिती! पैशाचे सोंग तर आणता येत नाही ना !
अंजू  मागे फिरते.

दफनविधीनंतर आपल्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेते. “ इथे काय कमी आहे तुला? तुला जायचे असेलच तर जा पण माझ्या नातवाला त्रास होऊ देणार नाही “ असे लीलाम्मा बजावते.
लीलाम्माने अडवू नये म्हणून ह्या मुलाच्या पितृत्वाचे सत्य अंजू  तिला सांगून टाकते. लीलाम्मा मात्र निर्णय बदलत नाही.
“ तो तर गेला , आता तू जर हे मूल घेऊन  गेलीस तर लोक त्याची थट्टा करतील “ असे म्हणून ती अंजूची विनवणी करते.
जिथे थॉमसकुट्टीच्या वडिलांना पुरले त्याच जागेत थॉमसला नेण्यात यावे असा हट्ट करते. या जागेत पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे ते अशक्य असते. जेवढा उशीर होईल तेवढे बरे, तो वेळ हिचे मत परिवर्तन करण्यासाठी वापरता येईल म्हणून दफन विधी सुद्धा पुढे ढकलावा हा विचार सुद्धा तिच्या मनात येतो. 
साम, दाम, दंड, भेद ह्यातले सगळे मार्ग तिच्यातील आई हाताळते.

Ullozhukku चा अर्थ आहे अंत:प्रवाह.
डोह पाहिला आहेत का कधी ? केवढा शांत वाटतो. निळसर, हिरवट पाणी आत काय दडवून असते ते त्याच्यात उतरल्याशिवाय समजत नाही. त्याच्यातली खळबळ, त्याच्या खोलीचा मागोवा घेतला तर समजते.
अंजू आणि लीलाम्मा यांचे आयुष्य ही तसेच आहे.
दोघांमध्ये एका पिढीचे अंतर आहे पण या खेड्यात काळ थांबला आहे.
लीलाम्मा हुशार आहे. तिच्या सुद्धा काही आकांक्षा होत्या. तिला डॉक्टर व्हायचे होते पण तसे घडत  नाही. एकोणिसाव्या वर्षी लग्न करून ती या घरात येते  आणि स्वतःचे अस्तित्व मिटवून राहते.  अंजू शिक्षित आहे, एका दुकानात सेल्स गर्ल म्हणून नोकरी सुद्धा करत होती. तिला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करून संसार करायचा होता. त्याला चांगला जॉब नाही आणि तो धर्माचा नाही म्हणून तिचे पालक हे लग्न थांबवतात आणि गावातील श्रीमंत मुलाशी तिचे लग्न करून देतात. लीलाम्मा सारखाच अंजूला सुद्धा मताचा अधिकार नाही.
Ullozhukku चे वेगळेपण ह्यात आहे की हा सिनेमा या दोन्ही स्त्रियांना गुन्हेगार म्हणून उभे करत नाही. पुरुषसत्ताक पद्धती ही सर्व धर्मात आहे, प्रांतात आहे. दोन्ही बायका आपापल्या परीने शोषित आहेत. त्यांचा आवाज ऐकला  गेला नाही किंवा दबावाखाली असताना आपल्याला आवाज आहे ही जाणीव सुद्धा त्यांना नाही.
अंजू काय किंवा लीलाम्मा , मिळालेलं आयुष्य त्यांनी मागून घेतलेले नाही , त्यांच्यावर थोपवले आहे. फरक इतकाच आहे की एकीने त्याच्याशी तडजोड केली आहे. एवढ्या वर्षात तडजोड म्हणजेच जगणे अशी तिच्या मनाची तयारी झाली आहे.
दुसरीत मात्र अजून थोडी  धागधुगी शिल्लक आहे , स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची धमक आहे. अंजूचे पाऊल घसरणे हा परिणाम आहे,  कृती नाही. कोणत्या स्थितीत तिने हे पाऊल उचलले ह्याचा विचार करायला हा सिनेमा भाग पाडतो.

प्रेक्षकांना अंजूचे मत पटत असताना सुद्धा लीलाम्माची किव येते अशावेळी चित्रपटाला एक वेगळेच वळण लागते. अपघाताने अंजूला समजते की थॉमसकुट्टीचा आजार लीलाम्म ने लपवून ठेवला होता. लग्नाने तो बरा होईल ही खुळी  आशा तिला वाटत होती. लीलाम्मा तरी परकी पण अंजूच्या हे आईला  हे सत्य माहित असून सुद्धा ती  हे  तिच्यापासून हे लपवून ठेवते.
ट्युमर असणे याची गंभीरता लक्षात येऊनही, मुलगी श्रीमंत घरात पडते आहे ना ही मानसिकता अंजुचे आयुष्य बरबाद करते.
“ मी हे तुझ्या चांगल्यासाठी केले “
मुलांचे आयुष्य स्वतःच्या हातात घेताना भारतीय पालकांचा हा नजरिया असतो. चांगल्याची  व्याख्या नक्की काय असावी आणि ते कुणासाठी चांगले होईल हा विचार ते करतात का? चित्रपट ह्या प्रश्नाला वाचा फोडतो.

फक्त मोजकेच शब्द बोलणारी, संताप कोंडून ठेवणारी अंजू  शेवटी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागते तर फक्त स्वप्नात जगणारी लीलाम्मा शेवटी वास्तवाचा स्वीकार करते.
या सिनेमात अंजूच्या चेहेऱ्यावर हास्य उमटताना दिसत नाही. अगदी सुरुवातीला आपल्या प्रियकराची थट्टा करताना ती हसते. रंगवलेल्या सुखी आयुष्याचे स्वप्न असते त्यात. ते मोकळे हास्य मात्र लग्नानंतर हरवतं. फोटोसाठी चेहेऱ्यावर उसने हास्य ती आणते खरी, पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच, तिच्या मनाचा कसलाही विचार न करता, थॉमसकुट्टी तिच्यावर जबरदस्ती करतो. प्रेम, काळजी, जिव्हाळा ह्या गोष्टी आपल्याला इथे मिळणार नाहीत हे तिला समजून येते.
थॉमसकुट्टीच्या आजारपणात दोन्ही बायका एकमेकांना आधार देतात. अंजू सर्व विसरून त्याची सेवा करते पण त्यात प्रेम नसते. मानवतेच्या नजरेतून ती तिचे कर्तव्य पार पाडते. तिचाही दोष नसतो. जे मिळालेच  नाही ते ती तरी कुठून देणार !
पेरते तसे उगवते . 
राजीव बरोबर राहण्याचा निर्णय घेताना अंजू सांगते , “ लग्न करून कुणी नवरा होत नाही. त्या नात्यात प्रेम , आदर असावे लागते. थॉमसकुट्टीला फक्त माझे शरीर हवे होते आणि नंतर सेवा “
लीलाम्मा मात्र तिच्याशी जे करते त्याने तिचा बांध फुटतो ,
“ मरणासन्न माणसाशी तू माझे लग्न लावून दिलेस ? तुला काहीच वाटले नाही ? “
“ तू जे माझ्याबरोबर आणि माझ्या मुलाबरोबर केलेस , त्या पुढे हे काहीच नाही “ लीलाम्मा आपली बाजू मांडायचा क्षीण प्रयत्न करते पण त्यात आता जोर नसतो.
ह्या सगळ्यात थॉमसकुट्टी, ज्याचा या दोन्ही स्त्रियांवर हक्क असतो तो मृत अवस्थेत घरात मुक्तीची वाट पाहत थांबलेला असतो. जिवंत असताना महत्वाचे असलेले आपले आयुष्य, रुबाब, पैसे ,प्रतिष्ठा या गोष्टी किती क्षणभंगुर असतात , मृत्यूनंतर तर यातले काहीही आपल्या उपयोगी येत नाही

सिनेमाचा एक महत्वाचा घटक आहे तो कोसळणारा पाऊस. सारी कथाच या पावसात भिजलेली आहे. या संततधारेने लोकांचे बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. केवळ शारीरिक नाही तर या कोंदट , कुबट वातावरणात मनातल्या घुसमटीला सुद्धा बाहेर पडायला वाव नाही.
ती बाहेर पडली तर पुढे काय !
सारेच भविष्य अंधारात आहे.
मुलाच्या प्रेमासाठी आपण नकळत का होईना या मुलीचे आयुष्य उध्वस्त केले हे लीलाम्माला उमजते आणि ती अंजूची क्षमा मागते. तिच्या वडिलांना सुद्धा ती विनंती करते.
“ मुलंच जर सुखी नसतील तर पैसे आणि प्रतिष्ठा याचा काय उपयोग ! तिला तिच्या आवडीच्या मुलाबरोबर संसार करू दे “
मनातले वादळ शमते आणि बाहेरचा पाऊस सुद्धा.

शेवट अनपेक्षित आहे.
या सिनेमात दोन महत्वाची पुरुष पात्रे आहेत . राजीव , ज्याचे अंजू वर प्रेम आहे. छोटे मोठे काम शोधताना सुद्धा अंजूची साथ आहे हेच त्याच्यासाठी मोठे आहे. तिने लग्न केल्यावर सुद्धा ते कमी होत नाही पण मध्ये पैसा येतो. आणि तो चारित्र्य बिघडवून टाकतो. जर प्रॉपर्टी मिळत असेल तर का नाकारायची ? त्याने आपली स्वप्ने पुरी होतील हा विचार करताना अंजू मागे पडते आणि लोभ जिंकतो.
अंजूचे आपल्यावर प्रेम नाही हे थॉमसकुट्टी जाणून आहे पण त्याच्याकडे वेळच कमी आहे. शरीराची भूक त्याला आपले सुख हिसकावून घेण्यास मजबूर करते. नॉर्मल आयुष्य जगण्याची त्याची धडपड पाहून त्याचा राग येत नाही , किव येते.

अंजूने भले लग्नबाह्य संबंध ठेवले असतील पण त्यात प्रेम आहे आणि प्रेमासाठी काहीही सहन करायची ताकद आहे. जे आपले नाही ते कसे मागायचे हा विचारी पणा आणि सुसंस्कृतता तिच्या अंगी आहे.
राजीवचे हे रूप पाहिल्यावर ती प्रेमाचा त्याग करून विश्वासाचा हात पकडते जो तिच्या सासू मध्ये तिला सापडतो.
हे मूल  आपल्या मुलाचे नाही हे समजल्यावर सुद्धा ती मुलाला प्रॉपर्टी देऊ करते. त्यात बाळाचे प्रेम असतेच , शिवाय आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याची इच्छा .
दोन स्त्रिया आपला भूतकाळ मागे टाकून , एकमेकांचा हात धरून भविष्यकाळाकडे कूच करतात .. त्यांना जोडणारा जीव प्रेम आणि विश्वासाच्या आधाराने या जगात येणार असतो.

प्रेम आणि विश्वास मिळवावा लागतो.  केवळ नात्याने ते साध्य होत नाही. अंजूचे आईवडील जे करतात, त्यात मुलगी सुखी राहावी ही इच्छा असते हे मान्य पण ते सुख हे तिच्या नजरेने पाहायचे हे त्यांना समजत नाही.
आपण समाजात जरी राहत असलो तरी आपण एक स्वतंत्र व्यक्ती असतो. स्वतंत्र आणि अनेकवेळा सदोषी सुद्धा.
प्रत्येकवेळी न्यायाचा तराजू घेऊन माणसे तोलता येत नाहीत , त्यांच्या नजरेतून त्यांना तोलावे लागते तरच माणूस , माणसाला समजून घेऊ शकतो .
हा सिनेमा अमेझॉन प्राईम वर पाहता येईल.

18 thoughts on “अंतरंगात दडलेल्या भावभावनांचा मागोवा घेणारा उल्लोझुक्कू (Ullozhukku)”

  1. प्रिया,
    वेगळीच कथा,
    वेगळाच सिनेमा.
    सुंदर लिहिलं आहेस.
    तुझ्यामुळे इतर भाषेतले चित्रपट कळतात.
    आणि तुझे परीक्षण वाचून बघते.

  2. सुंदर परीक्षण…. सिनेमा बघीतल्याचा अनुभव आला. … कलाकारांची नावं थोडी अनोळखी आहेत… 👍🏻

    1. उदय शेवडे

      अप्रतिम लिहिलं आहे.

      सिनेमा बघितला आहे. सासू सून हे नातं प्रत्यक्षापेक्षा मालिका आणि चित्रपट यांनी बिघडवून टाकले आहे…..या दोघांची पत्रिका बघायला हवी, ही मार्मिक टिपण्णी वास्तवात आली तर ?

      दोघींची भावनिक स्थिती फार छान दाखवली आहे.

      परत बघावा असा चित्रपट.

      1. Thank you Uday.
        मी तीनदा पाहिला ..अर्थात लिहिण्यासाठी
        पण खूप दिवसांनी उत्तम अभिनय पाहायला मिळाला

  3. किती सुंदर वर्णन…प्रत्यक्ष सिनेमा डोळ्यासमोर उभा केलात.. शिवाय परीक्षण पण मस्तच

  4. नात्यांची गुंतागुंत दाखवणं सोपं नाही, त्याहीपेक्षा ती लिहून मांडणं अजून अवघड. चित्रपट व सासू सुना डोळ्यसमोर दिसायला लागलेत. निव्वळ अप्रतिम 🤝👌😌

  5. सुरेख! फार वेगळ्या विषयावरचा सिनेमा पाहताना इतकं संतुलीतपणे विचार करता येणं सोपं नाही. कुणालाही व्हीलन न ठरवता प्रत्येकाची मर्यादा सशक्तपणे मांडली आहेस👌

    1. Thank you Gauri .
      दिग्दर्शकाचे कसब..पटकथा सुद्धा बांधीव ..आणि सशक्त व्यक्तिरेखा , शिवाय संवाद

  6. अतिशय सुंदर, समतोल साधत केलेले परीक्षण.
    फार सुंदर लिहिलंत. सगळ्या व्यक्तिरेखा जगताना त्यांच्या मर्यादा आणि आव्हाने यांचा मेळ कमालीचा साधतात, अगदी वाचून सिनेमा पाहिल्यासारखे झाले. 👌🏽👌🏽

  7. तुझ्या नजरतून सिनेमा बघणे हा एक अनुभव असतो मेजवानी म्हण.एकदम वेगळी कथा ! नात्याची गुंतागुंत,मानवी भावभावना,विकार साऱ्यांचे चित्रण उत्तम मंडलेस.

Leave a Reply to Kamini Amrutkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *