Skip to content

अनेक नायिका, एक आवाज-लता मंगेशकर 

भाग १ -१९४९ ते १९६० 
———————–
१९४९ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. या वर्षात रिलीज झालेल्या महल या चित्रपटाने गूढ, रहस्यपट चित्रपटाला प्रतिष्ठा मिळवून दिली.  शिवाय भारतीय मनांवर आपल्या सौन्दर्याने आणि आवाजाने हुकूमत करणाऱ्या दोन असामान्य व्यक्तींचा उदय याच वर्षात आणि याच चित्रपटात झाला. खेमचंद प्रकाश या संगीत दिग्दर्शकाची “हा आवाज एके दिवशी संपूर्ण देशावर राज्य करेल ” ही भविष्यवाणी खरी करणारे गीत सुद्धा याच चित्रपटात होते. 

तडपेगा कोई अबतक, बे आस बेसहारे
लेकिन ये कह  रहा है, दिल के मेरे इशारे
आयेगा आनेवाला.
या  गीताने संगीतातील एका तेजस्वी तारिकेचा उदय झाला.
जेमतेम वीस वर्षाची होती ती पण जगाच्या लक्षात आले की हे शंभर नंबरी सोने आहे, जिच्या आवाजाच्या जवळपास सुद्धा पोचणारे कुणीही नाही. No one could match the purity of her voice . एका झपाटलेल्या युगाची सुरुवात झाली या गीताने .
एक माहित आहे का, मधुबालाच्या सुंदरतेला दैवत्व मिळवून देणारा हा आवाज कुणाचा हे काही श्रोत्यांना माहित नव्हते. तेव्हा रेकॉर्डवर त्या पात्राचे नाव असायचे. या रेकॉर्डवर सुद्धा गायिकेचे नाव होते ” कामिनी “
महल या सिनेमातील मधुबालेचे नाव.  या आवाजाचा खऱ्या मालकिणीचा शोध सुरु झाला आणि पन्नाशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच ” लता मंगेशकर ” हे नाव भारताच्या घराघरात पोचले.
लता मंगेशकर यांच्या आवाजांनी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नायिकांना केवळ सुरेल नाही तर सुंदर सुद्धा बनवले. त्या आवाजात केवळ सूर नव्हते तर त्या गीतातील भावना त्या सुरांतून प्रेक्षकांपर्यंत सहज पोचत होती,
एक प्रकारे , नायिकेच्या अभिनयात  त्या गीतांचा सुद्धा महत्वाचा वाटा होता.
कामिनी कौशल ते काजोल पर्यंत पाच पिढीच्या नायिकांना लता बाईंच्या गळ्याचा आधार मिळाला.
आजच्या पोस्ट चा विषय आहे “ अनेक नायिका, एक आवाज –लता मंगेशकर .

1) चंदा रे जा रे जा रे — कामिनी कौशल 
(सिनेमा-जिद्दी, संगीतकार -खेमचंद प्रकाश, साल १९४८) 

१९४७ साल.  लता मंगेशकर यांनी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. उमेदवारीचा आणि कसोटीचा काळ होता तो. सुबोध मुखर्जी हे शो बिजनेस मधले मोठे नाव होते तेव्हा. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी, हा आवाज कामिनी कौशलला शोभणार नाही म्हणून, त्यांनी लता मंगेशकर यांना नाकारले. खरेतर हिरा हा हिराच असतो. त्याचे सौन्दर्य जन्मजात असते. पैलू पाडणारे त्या सौन्दर्याला जगाच्या समोर आणतात आणि त्यात त्यांचेही नाव उजळून निघते.
सुबोध मुखर्जी यांच्या भाग्यात हे नसावे हे त्यांचे दुर्दैव.
कामिनी कौशल साठीच संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी चंदा रे जा रे हे नितांत सुंदर गीत लता बाईंकडून गाऊन घेतले.

किस के मन में जाये बसे हो, हमरे मन में अगन लगाये 
हमने तोरी याद में बालम, दीप जलाये दीप बुझाये
फिर भी तेरा मन ना पिघला, हमने कितने नीर बहाये
चंदा … जा रे जा रे
चंदा रे जा रे जा रे,पिया से संदेसा मोरा कहियो जा

या काळात काही ई-मेल आणि फेसबुक नव्हते. टेलीफोन सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचले नव्हते. कबुतरे बाळगणे आणि त्यांना शिकवणे काही सोपे नाही, त्या पेक्षा चंद्राला निरोप द्यायला सांगणे सोपे नाही का.
इस्त्राईलने सध्या पेजरचा सुद्धा जो नायनाट केला ते पाहिले तर खरंच चंद्राबरोबर निरोप पाठवणे सुरक्षित आहे .. पोचला तर पोचला , नाहीतर निदान लांब अंतरावर आहे.

नायिका, प्रियकराच्या आठवणीने व्याकुळ झाली आहे. त्यात हा भलत्याच कुणाच्या मनात तर शिरला नाही ना हा संशय सुद्धा आहेच. रडून रडून डोळे सुजले ते तरी बघायला ये असा हळवा निरोप तिने चंद्राबरोबर पाठवला आहे.
हे गीत छायानट रागावर आधारित आहे. कामिनी कौशलच्या आवाजात जो भरीवपणा आहे तो लताच्याही आवाजात दिसतो.
गाणे जरूर ऐका. पडद्यावर गाताना, नायिकेच्या आवाजाशी साम्य दाखवणे किती महत्वाचे आहे ते लक्षात येईल. 

१९४९ मध्ये महल प्रदर्शित झाला आणि आयेगा आनेवाला या गीताने इतिहास घडवला.
याही गीताचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश. 

2)आयेगा आयेगा आयेगा , आयेगा आयेगा आनेवाला — मधुबाला 
(सिनेमा-महल, संगीतकार- खेमचंद प्रकाश, साल १९४९) 

हा सिनेमा गूढ , त्यातील कथा, वातावरण निर्मिती सुद्धा सत्य आभासाच्या उंबरठ्यावर रेंगाळणारी. पुनर्जन्म हा कथेचा पाया  असला तरीही महलचा नायक हा शाश्वत प्रेमाच्या शोधात आहे. दैवी सौन्दर्य असलेल्या मधुबालाला दैवी आवाजाने लोकप्रियतेच्या शिखरावर चढवले . या गाण्याची सुरुवातच विलक्षण आहे. एका युगाच्या नांदीची सुरुवात आहे ही. 

खामोश है ज़माना, चुप-चुप हैं सितारे
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा है, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, इक आस के सहारे

प्रेमाच्या अनोळखी राज्यात नुकतेच पडलेले पाऊल आहे तिचे. जो कुणी येणार आहे त्याच्या अस्तित्वाची अस्फुट जाणीव तिला झाली आहे. त्याचा चेहेरा सुद्धा अस्पष्ट  आहे का ती फक्त कल्पना आहे? कल्पनेतलं रूप हळूहळू मनावर उमटायला लागले आहे. हे पूर्ण गीतच आकर्षणाने भारलेले.
तो अनोळखी असला तरी तिला मात्र खात्री आहे की तो नक्की येणार आहे.
बाह्य जगाचा तिला विसर पडलेला आणि या  जगाला तर ती अनोळखी. तिच्या छोट्याश्या जगात मात्र कोणाची तरी चाहूल स्पष्ट ऐकू येते आहे तिला. हृदयातील स्पंदने सुद्धा एकाच आशेवर तगलेली आहेत.
आयेगा, आयेगा, आयेगा ..
आयेगा, आयेगा, आनेवाला.
काळ थांबला आहे. आकाशातील तारे स्तब्ध आहेत. सारे जग शांत झोपलेले असताना सुद्धा माझ्या मनातली धडधड  कोणाच्या तरी आगमनाची सूचना देत आहे. जीवनाला कलाटणी देणारे कोणीतरी येत आहे. ही त्याच्या पायाची चाहूल एक माझ्याच मनाचा चाळा ? अहं,  तो आला आहे. जो येणार होताच, परत न जाण्यासाठी तो आला आहे.

3)बलमा बडा नादान–गीता बाली 
(सिनेमा-अलबेला, संगीतकार- सी रामचंद्र, साल १९५१)

१९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या शहनाई या सिनेमात सी रामचंद्र आणि लता मंगेशकर एकत्र आले आणि पन्नासच्या दशकात या जोडीने बॉक्स ऑफिस गाजवले.
राजकपूरचा आवारा आणि देव आनंदचा बाजी बरोबर १९५१ साल भगवान दादा यांच्या अलबेलाने गाजवले. या सिनेमाची कथा सी रामचंद्र यांना एवढी आवडली की सर्वोत्तम संगीत देईन असे वचन त्यांनी दादांना दिले आणि ते पाळले. यातील अकरा गाण्यांपैकी नऊ गाण्यांना लता मंगेशकर यांचा आवाज आहे. शोला जो भडके, शाम ढले खिडकी तले, किस्मत की हवा कभी नरम, धीरे से आजा रे ही ह्या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. ह्या गीतात “ बलमा बडा नादान “ फार हटके गाणे आहे. हळुवार आणि मिस्कील असा गीताचा मूड लताने परफेक्ट पकडला आहे.

बैंया पकड़ूँ हाथ दबाऊँ
समझत नाहि कैसे सम्झाऊँ
लाख जतन कर, हार गयी मैं
रोगी हो गयी जान रे 
बलमा बड़ा नादान रे 

प्रेम जडले की व्यक्त करावेसे वाटते. एवढा आनंद काही मनात साठवून ठेवता येत नाही. ज्यावर प्रेम बसले आहे त्याला सांगणे ही तर परीक्षाच असते. एकतर प्रेमाबरोबर साशंकता आणि भय दोन्ही वस्तीला येतात. आपल्याला होकार मिळेल का ही शंका कुरतडत असताना, समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव सुद्धा नसणे याहून दुर्दैवी ते काय असणार !
मात्र ह्यातील नायिका काही अशा अडचणीमुळे घाबरणारी नाही.  त्याच्याकडून प्रेमाची कबुली घ्यायचीच हा विडा तिने उचलला आहे.

प्रेमाला अमर करणारी चित्रपटसृष्टीत गाजलेली कहाणी आहे ती सलीम आणि अनारकलीच्या प्रेमाची कहाणी. 
एक राजपुत्र , भावी सम्राट आणि एक नर्तिका यांची प्रेमकहाणी . इतिहासात  त्याला आधार नाही पण प्रेमिकांच्या विश्वात या शोकांतिकेला सर्वोच्च स्थान मिळाले. मुघल ए आझम मध्ये मधुबालाने अनारकलीला अमर केले पण त्याच्याही आधी बिना रॉय च्या अनारकलीने प्रेक्षकांची मने जिंकली होती.  त्यात हातभार होता तो ” ये जिंदगी उसीके है ” या गीताचा.

४) ये जिंदगी उसी की है –बिना रॉय 
(सिनेमा अनारकली, संगीतकार- बिना रॉय, साल १९५३)

ये बहार ये समा , कह रहा है प्यार कर 
किसीकी आरजू में अपने दिल को बेकरार कर 
जिंदगी है बेवफा , लूट प्यार का मजा 

सलीमला राज्यापेक्षासुद्धा प्रेम मोलाचे तर अनारकलीला आपले सामाजिक स्थान खूप खाली आहे ते मान्य असूनही प्रेमापुढे कशाचीच पर्वा नाही . प्रेमात पडण्याचा हा काळ म्हणजे डोळ्यावर जाणून बुजून पट्टी बांधण्याचा काळ. हृदयाला सुद्धा जीभ असते हे मान्य करण्याचा काळ . त्यात फुलून आलेल्या वसंत ऋतूने सुद्धा झोकून देण्याची साद घातली आहे . 
कोणावर तरी सर्वस्व उधळून देण्याची ही प्रबळ इच्छाच सारासार बुद्धीचे काहीही  ऐकत नाही . त्यात जीवन क्षणभंगुर आहे याची जाणीव दोन वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या  प्रेमिकांना आहेच . मग जे काही क्षण पदरात पडलेले आहेत ते सर्वांगाने जगण्याचे आवाहन का करू नये ! 
प्रेमात पडणे हा इथल्या जगात गुन्हा असेलही पण वरच्या दरबारात मात्र आपले प्रेम यशस्वी होईल याची खात्री देताना अनारकली म्हणते , 

जो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहान में
खिलेंगे हसरतों के फूल, जा के आसमान में
ये ज़िन्दगी चली गई जो प्यार में तो क्या हुआ
ये ज़िन्दगी उसी की है…

प्रेमाचे इतके यथार्थ वर्णन करणारे आणि कोणते दुसरे गीत आहे ! 

काल मॉलमध्ये गेलो होत. एकच वस्तू आणि असंख्य ब्रँड्स; तेसुद्धा एकाच छताखाली असल्याने किंमत आणि दर्जा यांची तुलना करून वस्तू घेणे सोपे जाते. एवढ्या वर्षात बदलली नाही ती एकच गोष्ट, माझी टूथपेस्ट .
पर्याय उपलब्ध असूनही नाही घ्यावासा वाटत. ही तर साधी वस्तू पण किती तरी जण एकाद्या गोष्टीबाबत आग्रही असतात.  काही बाबतीत खरंच ” दिल है के मानता नही” असे होते खरे. 
हे तर वस्तूंचे .झाले मग हृदय चोरणारी/ चोरणारा आयुष्य व्यापून उरतो ह्यात नवल ते काय ! अनेक उदाहरणे दिसतात समाजात की एका व्यक्तीसाठी माणसे स्वतःचे जीवन उधळून देतात. क्वचित काही त्या व्यक्तीसाठी स्वतःचे आयुष्यच पॉज करतात . 

मीरेला काय कमी होते! . पतीचे प्रेम असते तिच्यावर पण तिच्या तनामनात फक्त कृष्ण असतो .प्रतिष्टीत घराण्यात जन्मलेली ती तेवढ्याच तोलामोलाच्या घराण्याची राणी होते .तरीही ” मै तो अपने नारायणकी , हो गयी आपही दासी रे ” म्हणून आनंदाने विष पिऊन आत्मनाशाच्या वाटेवर ती स्वतःला झोकून देते . एका अशरिरी पुरुषाशी एकरूप होण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देते. 
मीरेच्या प्रेमाला आसक्त म्हणायचे का विरक्त हा प्रश्न पडतो खरा. स्वतःच्या प्रेमपूर्तीसाठी तिने केवळ राजमहालाचीच वेस ओलांडली नाही तर समाजाच्या प्रत्येक रीतींची ,मर्यादांची वेस ओलांडली . कुलधर्म , स्त्रीधर्म, पत्नीधर्म यांच्या सर्वच मर्यादा तिने ओलांडल्या. लहानपणीच  कृष्णाच्या मूर्तीला तिने हृदयात बसवले. त्याच्याशी स्पर्धा करणारा मिळणे कठीण होते . इतके उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा आयुष्याला  स्पर्शून जाते तेव्हा तडजोड करणे मनस्वी स्त्रीला किंवा पुरुषाला शक्य होत नाही.  

लता बाईंनी असंख्य मीरा भजने गायली आहेत . त्यातले अतिशय सुंदर गीत आहे.

५)ऎरी मै तो प्रेम दिवानी –नलिनी जयवंत 
(सिनेमा -नौबहार, संगीतकार-रोशन, साल १९५२)

चित्रपटात हे भजन लिहिले आहे ते सत्येंद्र अथय्यांनी. मीराबाईच्या भजनातील पहिल्या दोन ओळींचा उपयोग केला आहे . 
मीरेचे प्रेम हे तिच्यासाठी सत्य होते . बाकी सर्वांसाठी तो एक आभास होता . मूर्तीवर कोणी प्रेम करू शकते का ? ते सफल कसे होणार हा प्रश्न जगाला पडला होता . त्यांच्यासाठी हे प्रेम म्हणजे न संपणारी , न भागणार तृष्णा . पण अशी तहान सर्वाना लागत नाही . ती ज्यांना लागते ते विषही पचवू शकतात.
 
दिन डुबा तारे मुरझाये , सिसक सिसक गयी रैन 
बैठी सुना पंथ निहारूँ , झर झर बरसत नैन 
दुनिया के सब सपने जागे , भाग हमारा सोये 
ओ बेदर्दी जीवन बाकी , पल पल ब्याकूल होवे

एक लक्षात आले का, ती जीवनाला बेदर्दी म्हणते, स्वतःच्या नशिबाला दोष देते पण तिच्यासाठी तिचा कान्हा सर्व काही आहे.  .प्रेम सहज होते हा गैरसमज आहे. कोणावर बसते ही प्रक्रिया सहज होत असेल पण एखादी व्यक्ती का आवडू शकते ह्याचे ठोकताळे मनात असतातच . रूप, रंग, गुण . कसलीतरी असोशी असतेच आणि त्याला मिळतंजुळतं व्यक्तिमत्व दिसले की ” ती पाहताच, कलिजा खलास झाला ” हा प्रवास होतो. जर ते व्यक्तिमत्व फसवं असेल तर मोहीनी उतरते, परत पाटी कोरी होते.[ पण ताकदीच्याच व्यक्तीने तुमचा ताबा घेतला तर!
हवास तू ” चा अंतर्घोष ” हवास तूच ” असा झाला की मीरेचा वेडेपणा भक्तीत परिवर्तित होतो. 

असेच दुसरे भजन आहे “झनक झनक पायल बाजे” या सिनेमात .

६)जो तुम तोडो पिया–संध्या 

(सिनेमा-झनक झनक पायल बाजे — संगीतकार-वसंत देसाई -साल १९५५)

. जो तुम तोड़ो पिया, मैं नाही तोडू रे।
तोरी प्रीत तोड़ी कृष्णा, कौन संग जोडू॥
हा प्रश्न नाही. .हे विधान आहे ..तिला माहीत आहे त्याच्याशिवाय तिचे जीवन व्यर्थ आहे.

तुम भये तरुवर, मैं भयी पंखिया। तुम भये सरोवर, मैं भयी मछिया॥
मूळ भजनात पंखिया ऐवजी पतिया हा शब्द आहे . एक छोटासा फरक आहे इथे . जेव्हा मीरा स्वतःला पक्षिणीची उपमा देते तेव्हा ती श्रीकृष्णाकडे आश्रयाची याचना करते . स्वतःला त्याच्या स्वाधीन करते . तिची श्रद्धा आहे की तो तिचे संरक्षण करेल पण प्रत्यक्षात मीरा निर्भय आहे, मुक्त आहे. तिची भक्तीही तिच्यासारखीच, उन्मुक्त. जेव्हा इथे पतिया हा शब्द येतो तेव्हा मीरेच्या भक्तीचे रूप प्रत्ययास येते . 
पक्षी कोणाचेही संरक्षण घेऊ शकतो पण पान तर झाडाचा अविभाज्य घटक असतो. त्याला झाडाशिवाय दुसरे अस्तित्व नसते .जसे मीरेला कृष्णाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. ती मानतच नाही. एवढी एकरूप ती तिच्या गिरिधाराबरोबर आहे. 

“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई” यात तिने दुसरा पर्याय ठेवलाच नाही आहे स्वतःला.

प्रेम प्रखर असते.  त्याची किंमत सुद्धा बरीच मोजावी लागते. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे, दुसऱ्याला मनात पहिल्या स्थानावर बसवणे ही  गोष्ट वाटते तेवढी साधी नाही . “मै तुम में समा जाऊं ” हे मनाच्या बाबतीत फार कठीण आहे . त्यामुळे प्रेमाचा इजहार करणे प्रत्येकाला जमत नाही . The intense love always hurts . It  is excruciating. One’s emotions change from one second to the next.
पहिल्यांदा तुम्ही स्वतःशी  मान्य करता की तुम्हाला दुसऱ्याची  गरज आहे पण  जरी ते स्वतःशी मान्य केले तरी ती गरज तुम्हाला तुमच्या भावनांशी प्रामाणिक राहू देत नाही .One feels vulnerable . 

हृदयाला उत्तर ठाऊक  आहे . पराभव मान्यही आहे पण मन ऐकायला तयार नाही. या नायिकेला मात्र  उत्तर सापडले आहे. तिच्या मनाने आपला पराभव कधीच मान्य केला आहे.
७) मैं पिया तेरी तू माने या न माने-निम्मी 
(सिनेमा-बसंत बहार, संगीतकार-शंकर जयकिशन, साल १९५६) 

मैं पिया तेरी, तू माने या ना माने 
दुनिया जाने, तू जाने या ना जाने
काहे को बजाये तू मीठी मीठी ताने.

आत्मविश्वास म्हणायचे याला का जबरदस्ती ? प्रेम असे ओरबाडून घेता येते ? तिच्या नजरेतून, तिच्या म्हणजे आज शेकडो वर्षे जी प्रेयसी जगाला रुचते आहे , तिच्या नजरेतून पाहायचे तर मला ही धमकी  मनातून  पटते सुद्धा . तिला स्वप्ने दाखवायची आणि नंतर गायब व्हायचे ही कन्हैय्याची परंपरा पुढची पिढी सुद्धा चालवत आहे  पण मुरलीला कवटाळून , खोट्या वचनांवर आयुष्य काढणारी राधा बदलली आहे. 
एकदा प्रेमाचे वचन तू दिले आहेस. बासुरीच्या स्वराने  ते माझ्यापर्यंत पोचले आहे. साऱ्या जगाने सुद्धा ते ऐकले आहे. आता त्यांची साक्ष तू खोटी कशी ठरवशील?
मैं पिया तेरी, तू माने या ना माने 

त्याने काय केले आहे हे सुद्धा ती सांगते. 

मुरली की लय ने, दिल मेरा छीना
तार जगाये दिल के तार जगाये 
राग बिखेरे जब तेरे दिल ने , राग उठाये मैने राग उठाये 
मिटने न दूंगी , ये प्यार के तराने
ही गाणी लिहिताना लक्षात आले की पन्नासच्या दशकात लता बाईंची असंख्य मधुर गीते आहेत, जी अजून स्मरणात आहेत पण ज्यांच्यावर चित्रित केली गेली आहेत, किंवा जे संगीतकार आहेत ते नवीन पिढीला परिचित नाहीत.  या दशकात अनेक असे संगीतकार आहेत की चित्रपटसृष्टी आणि रसिक यांनी त्यांचे योग्य ते मूल्यमापन केले नाही. चित्रगुप्त हे त्यापैकी एक.
त्यांचे एक अत्यंत गोड़ गाणे श्यामा  या गुणी कलाकारावर चित्रित झाले आहे.

८) कारे कारे बादरा जारे जारे बादरा
(सिनेमा-भाबी, संगीतकार -चित्रगुप्त, साल १९५७)


पाऊस, वारा आणि त्याच्या बरोबरीने येतात ते काळे काळे ढग. पावसाची चाहूल देणारा दूतच.
कालिदासाच्या मेघदूतासारखेच चित्रपट संगीतात सुद्धा ढगाला महत्वाचे स्थान आहे.  गडगडाट करणारा, भरभरून वर्षाव करणारा ढग.  सावली देणारा, आशा दाखवणारा ढग ते मनावर नैराश्येचे मळभ आणणारा ढग. ढग हा अनेक रूपकांत वापरला गेला आहे.

काहे  को जगाया, ओ बैरी मैं तो सोई थी.
पापी तू क्या जाने मै सपनों में खोई थी.
आँखों से मेरी ली निंदिया उड़ा.
कारे कारे बादरा जारे जारे बादरा

ह्या गीतात मात्र ढगाचे दर्शन नाही. श्यामा आपल्या राजमहालात हे गाणे म्हणत बागडते आहे. घरात कुणीही नाही ते ओघानेच आले.
श्रीमंत मुलीला तशीही ढगाची काय मातब्बरी असणार!
ढगांच्या गडगडाट झाल्याने तिची झोप मोडली, सुखद स्वप्ने तुटली, त्याचे दुःख जास्त असल्याने ती सरळ तू जा बाबा अशी सरळ आज्ञावजा विनंती करते.
श्यामा ही अत्यंत गुणी अभिनेत्री, नंतर सहनायिका /खलनायिका म्हणून प्रसिद्ध झाली.

चित्रगुप्त प्रमाणेच मदन मोहनना सुद्धा त्याच्या योग्यतेचे यश मिळाले नाही पण रसिकांच्या स्मृतीत मात्र त्यांना अमरत्व मिळाले. मदन मोहन -लता हे समीकरण म्हणजे उत्कृष्ट चालींचा खजिना आहे.
संगीत गाजूनही या जोडीचे अनेक चित्रपट अयशस्वी ठरले. कारणे वेगवेगळी, अनेकवेळा तर उत्कृष्ठ कथा , अभिनय असूनही चित्रपट गाजले नाहीत आणि मोठ्या बॅनर्स ने मदन मोहन कडे पाठ फिरवली.
चित्रपट डब्यात गेले पण संगीत मात्र अजूनही रसिकांच्या हृदयात स्थान पटकावून आहे.
काफी रागातले “ बैरन नींद ना आये “ हे गीत मदन मोहन च्या पहिल्या दहा गीतात असेल.

९) बैरन नींद ना आये–अमिता गुहा 
( सिनेमा-चाचा झिंदाबाद, संगीतकार- मदन मोहन, साल १९५९)


पलंगावर तळमळत रात्र घालवण्याचा प्रसंग आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. झोपायचे तर असते पण विचारांची शृंखला काही निद्रादेवीला येऊ देत नाही. शरीर थकलेले पण मन टक्क जागे असते. आपण स्वतःलाच बजावतो की बाबा उद्या केवढी कामे पडली आहेत आता झोप काढणे आवश्यक आहे पण छे !
उलट जेव्हा उठायला पाहिजे त्या वेळेला आपण दुलईत गुंडाळून घेऊन झोपेच्या अधीन होतो.
अर्थात हे आपल्या सामान्य माणसांचे झाले. सिनेमातल्या लोकांची झोप उडण्याची कारण प्रेमात पडून निकामी होणे हेच प्रामुख्याने असते.
एकतर नुकतेच प्रेमात धडपडणे झाले असते किंवा प्रेमातून बाहेर येऊन सत्याची ओळख झाली असते.
हा सिनेमा काही पाहिला नाही पण यातले एक कारण असणार हे नक्की

लाख जतन करूँ, आँख ना लागे
सो गयी खुशियाँ और ग़म जागे

घायल मन कित जाये
बैरन नींद ना आये

दिल तो पागल है  मध्ये शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉग आहे ” प्यार भी एक ही बार होता है ” 
तसे खऱ्या आयुष्यात होत नाही . सफल झालेले पहिले प्रेम ही लॉटरी आहे . ती सर्वानाच लागत नाही . कारण कोणतेही असो , झालेली जखम बुजवून , लपवून माणूस परत उभा राहतो . परत प्रेमात सुद्धा पडतो . तरीही हृदयाच्या  कोपऱ्यात ती प्रतिमा राहतेच . पहिल्या प्रेमाच्या वेळी माणसाची पाटी कोरी असते . अपेक्षाभंगाचा डाग नसतो . त्या बद्दल ऐकलेले असते , वाचलेले असते .. दुसऱ्या कोणाच्या तरी नजरेतून प्रेक्षक होऊन पाहिलेले सुद्धा असते ; पण जेव्हा स्वतःची पाळी येते तो अनुभव मात्र कल्पनेलाही अकल्पित असतो . 

१०)जाने कैसे सपनों में खो गई अँखियां–लीला नायडू
(सिनेमा -अनुराधा, संगीतकार -रविशंकर, साल १९६०)

.मनाच्या अर्धोन्मिलित अवस्थेत स्वप्ने रंगवण्याचा हा काळ . जागृती आणि निद्रा यांच्या सीमेवरील हा प्रदेश . 
स्वप्ने पाहण्याचीच नाही तर साकारण्याची वेळ आलेली आहे .

जग उजियारा छाया , मन उजियारा छाया 
जगमग दीप संजो गयी अखियां 
मैं तो हूं जागी मोरी सो गयी अखियां
मावळत्या सूर्याच्या साक्षीने ” तू माझी होशील का ” हा विचारलेला प्रश्न . त्या संधीप्रकाशाने तिच्या चेहेऱ्यावरची गढद झालेली लाली . प्रेमात डुबलेली अनुराधा आणि तिच्याकडे भान हरपून पाहणारा निर्मल . 
पंडित रविशंकर यांनी फार कमी चित्रपटांना संगीत दिले .  पण जे दिले त्यांचे मोल मात्र अमूल्य . 

6 thoughts on “अनेक नायिका, एक आवाज-लता मंगेशकर ”

  1. क्या बात है.!!
    बढिया!
    लतादीदी जणू आत्मा ओतत गाताना. प्रत्येक नायिकेच्या लहेजानुरूप त्या गात.
    अगदी साधा ग शब्दाचा उच्चार असू द्या गाण्यातील.. बघा संध्याच्या ओठांची हालचाल ओळखून तितकाच तर लीला नायडूंच्या बाबतीत तेच अक्षर थोडे लांबवल्यासारखे.. खूप बारीकी होती त्यांच्या नायिकेरूप गाण्यात.
    एवढेच कशाला तुम्ही जर निरीक्षण केले तर लक्षात येईल मिले सुर मेरा तुम्हारा मध्ये सुद्धा त्यांनी अफलातून म्टलंय प्रत्येक नायिकेला अनुसरून.
    हा भाग खूऽऽऽऽऽऽऽऽप खूऽऽऽऽऽऽऽऽप आवडला.
    फक्त ब्लॉग एडिट करा दी. वर उल्लेख केलेला कालखंड १९६० हवा. तो १०६० झाला आहे

    1. Thank you Kamini ,
      क्या बात
      खरंच
      .त्यांचा आवाज घेऊन नायिका गाऊ शकतात कारण तो आवाज त्यांनी साकारलेल्या पात्रात मिसळून जातो
      हो, करेक्ट करते.

  2. प्रिया,

    अप्रतिम…
    पूर्वी पण तू लता वर लिहिलं आहेस.

    लता एकमेवाद्वितीय..

    🩷🩷🩷🩷

  3. लतादिदींचा स्वर जेवढा अलौकिक, तेवढा प्रियाजी आपला लेख अप्रतिम, असाधारण, लाजवाब। Hats off to you. अस तुम्हीच लिहू शकता। खूप खूप अभिनंदन 🙏🙏

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *