Skip to content

सांगा मुकुंद कुणी हा पहिला?

अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे 
झिळमिळत्या रंगाचे गारुड अजून मला पुरते न कळे.

अरुणा ढेरे यांच्या कवितेतील या पंक्ती. 

राम आणि  कृष्ण खरॊखरच अस्तित्वात होते का हा प्रश्न अनेकदा, अनेकांना पडत असेल पण आज असंख्य वर्षे कोट्यावधी भारतीयांच्या मनावर त्यांच्या चरित्रांनी, त्यांच्या संदर्भातील अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी राज्य केले आहे. या कथा जनमानसात रुजल्या आहेत. आजवर असंख्य राजे, थोर विभूतींनी या देशात जन्म घेतला आहे पण लोकांच्या मनातले या दोघांचे स्थान अढळ आहे. प्रत्यक्ष देवस्वरूप रूप, देवांनाही हेवा वाटावा असे त्यांचे कर्तृत्व असूनही, नियतीपुढे दोघांनाही प्रसंगी हार मानवी लागली हे त्यांचे असामान्यातले सामान्यपणे लोकांना भुरळ घालते. राम ओळखला जातो तो त्याच्या ताणलेल्या धनुष्यामुळे, पित्याने दिलेले  वचन पाळण्यासाठी  केलेल्या अत्युच्च त्यागाने. त्यामुळे तो दूरस्थही वाटतो. रामाबद्दल आदर वाटतो पण कृष्णाची गोष्टच वेगळी आहे. कृष्णाचे वेड लागते. 
कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला. वाढला तो गोकुळात. एका सामान्य गुराख्याच्या पोराप्रमाणे त्याचे बालपण गेले. मृत्यू आला तो सुद्धा एका पारध्याच्या बाणाने. एकाकी अवस्थेत कृष्ण मरण पावला पण प्रसंगानुसार अगाध बुद्धीचा तत्वज्ञ या भूमिकेतून त्यांचे प्रगट  झालेले असामान्यत्व वंदनीय आहे. 
कृष्णाचे व्यक्तिमत्व बहुरंगी नी बहुढंगी आहे. त्याच्यात दैवत्व आहे खरे पण तो लाडका, खट्याळ खोड्या करणारा बालक  आहे, गोपींवर उत्कट प्रेम करणारा प्रियकर आहे, अनेक स्त्रियांना दास्यत्वातून मुक्त करून त्यांना प्रतिष्ठा देणारा तारणहार आहे.  एका बाजूला तो चिरंतर शांतीचे प्रतीक आहे निवृत्ती धर्माचा प्रणेता आहे तर दुसऱ्या बाजूला रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी कंसाचा वध करणारा चक्रधारी आहे. म्हणून प्रत्येक सृजनशील मनाला कृष्णाचे आकर्षण आहे. 
भक्ती, प्रणय आणि सख्य या तिन्ही भावनांचा संगम त्याच्या व्यक्तिमत्वात आहे, त्याच्यावर लिहिलेल्या गीतांत आहे , गोष्टीत आहे. चित्रपटाचा नायक त्याच्या व्यक्तिमत्वावर बेतला आहे. 
गायलेल्या गीतांनी तो अजरामर झाला आहे. सामान्य लोकांशी त्याची नाळ जोडली गेली आहे. 
त्यातल्या काही आवडत्या गीतांचा हा आढावा. 

माझ्या आजोळी कृष्ण जयंती साजरी व्हायची. रात्री बाराचा जन्म खरा पण पूजा संध्याकाळी उशिरा सुरु व्हायची. चांदीचा पाळणा आणि  त्यात सुनेच्या माहेरून आलेला रांगता बाळकृष्ण. कृष्णाला वाहायला सहस्त्र तुलसीदल असायचे. त्याची मोजणीही मुंज झालेले बालगोपाल सोवळे नेसून करायचे. दणक्यात आरती व्हायची. येणाऱ्या गणपतीची जणू नांदीच ती.
नंतर कृष्णाला पाळण्यात घातले जायचे.
कृष्णजन्मापासून चमत्काराची मालिका सुरु होते. द्वापार युगात कंस मातला आणि देवाला कृष्णरुपात अवतार घ्यावा लागला. श्रावण वद्य अष्टमीची रात्र. काळोखाचे राज्य आणि त्यात मुसळधार पाऊस. अशा वेळी आशेच्या अमर आश्वासनात कृष्ण जन्मला. आपल्या काळजाच्या तुकड्याला नंदाच्या घरी सुखरूप पोचवायचेच अशा निर्धाराने वासुदेवाने यमुना पार केली आणि गोकुळात प्रवेश केला. यशोदा नुकतीच प्रसूत झाली होती. तिच्या कुशीतील मुलगी घेऊन, वासुदेवाने कृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवले आणि परतीची वाट धरली. यशोदा प्रसूत झाली, तिला पुत्र झाला ही वार्ता वाऱ्यासारखी गोकुळात पसरली. गोकुळवासियांनी नंदाच्या घरी धाव घेतली.

संत नामदेव म्हणतात,
घरोघरी नंद धाडी शर्करेसी
वस्त्रें सुहृदांसी, नामा म्हणे

लाडाकोडाचे बाळ, त्याच्या साठी गायला जाणारा पाळणा सुद्धा त्याच्याच रूपाचे कौतुक करणारा असेल ना!
गीतकार मधुकर जोशीं यांनी लिहिलेला, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेला, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात फार सुंदर पाळणा आहे,

हले हा नंदाघरीं पाळणा (सुमन कल्याणपूर)
—————————-
त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळ राणा

कृष्ण जन्मांनंतर गोकुळात आनंदी आनंद झाला. कुरळे केस, सावळा रंग, गोबरे गाल, भव्य कपाळावर उठून दिसणारा चंदनाचा टिळा , बालपणीच्या या कृष्णरुपाची मोहिनी जनमानसावर एवढी आहे की आजही घरा घरात त्याचे बालपण खेळत आहे.

ओठ लाल ते डोळे चिमणे
हास्यातुन त्या फुले चांदणे
स्वरूप सुंदर लोभसवाणे
मोहून घेई मना , हले हा नंदा घरी पाळणा
लहान मुलाला अजूनही कृष्णाची वाडी भरतात. देखण्या बाळाला कृष्ण हा समानार्थी शब्द आहे.
पाळणा म्हणून झाला की आरती व्हायची आणि मग पंगत बसायची. ह्याचा मेन्यू ठरलेला. पाच प्रकारचे पोहे. 
तिखट बटाटा घालून, गुळाचे, दह्याचे, दुधाचे नी काकडीच्या रसात गूळ घालून केलेले, शिवाय काळ्या वाटाण्याची आमटी, ओल्या वाटण्याची उसळ, काकडीची कोशिंबीर, मुगाचे कढण आणि भरपूर गप्पा. घराचे गोकुळ व्हायचे त्या रात्री.  नंतर भजनांना सुरुवात व्हायची. समोर बाळ कृष्णाचा फोटो. 

सुकुमार सावळा शारंगपाणी , चिमणा पितांबर पिवळा 
गळा वैजयंती माळा, घवघवीत घनसावळा 
पाहे नंदराणी 

कृष्णाचे रूप असेच मनोरम की सारे गोकुळच त्याच्या प्रेमात रंगले होते. तो खोडकर होता खरा पण त्यात एक प्रकारची निरागसता होती. कुणाला राग येऊ नये उलट कौतुकच वाटावे अशी त्याची लीला. वात्सल्याचा हा मूड योगेश्वर अभ्यंकर  यांनी अचूक पकडला आहे.

नंदाघरीं नंदन वन फुलले. (सुमन कल्याणपूर)
——————————-
बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले

कृष्ण हळूहळू रांगू लागला, आणि मग सारे अंगणच अपुरे पडू लागले. पिवळा पितांबर आणि बाळ लेणी ल्यायलेला कृष्ण घरभर नाचत राही. त्याच्या या गोंडस बालरूपाने सारे गोकुळवासी कृष्णमय होऊन गेले होते. कृष्ण दिसामासांनी मोठा होतो आणि यशोदेचा आनंदही द्विगुणित होतो. कधी त्याला खांद्यावर घेऊन गाणं म्हणत हिंडवावे, कधी पाळण्यात घालून झोका द्यावा अन् त्याने हसत हसत हात उंचावले की, पटकन छातीशी घेऊन त्याचे चुंबन घ्यावे.  दिवस रात्र  कृष्णाचाच ध्यास लागलेली यशोदा गाते,

हात चिमुकला उंच नाचवी
छुमछुम वाळा मधुर वाजवी
स्वतः हासुनी जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले

बाळकृष्णाच्या खोड्यांचा एक दुसरा प्रकार म्हणजे दहीहंडी.  तो कधी यशोदेच्या नकळत सवंगड्याना जमवून स्वतःच्याच घरातील दूध दही लोणी फस्त करी. त्यांच्या हाताला लागू नये म्हणून उंचावर ठेवलेली दह्या दुधाची भांडी एकमेकांच्या अंगावर चढून, मनोरा करून, काठ्यांनी खाली पाडून पळवी.
प्रकाश अय्यरने आपल्या पुस्तकात टीम स्पिरीट ची कल्पना दही हंडी मधून समजावली आहे . 

बरेच गोपाळ हे कनिष्ठ वर्गातले होते. अनेक वेळा अन्नाचा तुटवडा. या सर्वाना दही दुधाचा पुरवठा व्हावा हा दहिहंडीमागील हेतू,. यशाची पहिली पायरी म्हणजे आयुष्यात एक निश्चित ध्येय असणे. दही भांडे हे त्याचे प्रतीक. 
त्यात मागून मिळाले तर त्याची किंमत नसते. शिवाय फुकटचे खाण्याची सवय झाली की माणसाची कार्यक्षमता ही संपते . म्हणून भांडे उंचावर आणि ते मिळवण्यासाठी केलेली धडपड म्हणजे  त्या ध्येयापर्यंत पोचणे . इथे नुसती माणसे जमवणे  नाही तर right mix of people. . दहीहंडीत अनेक थर असतात . प्रत्येकावर एक वेगवेगळी जबाबदारी  असते. जरी ध्येय समान तरी तिथे पोचण्यासाठी प्रत्येकाची पायरी, रोल सुद्धा महत्वाचा आणि ती समजावून घेणे महत्वाचे. 
खालची पायरी सगळ्यात बळकट लोक. इमारतीचा पाया भक्कम असेल तरच इमारत उभी राहते न ?त्याच्यावरच जेव्हा इतर थर  उभे राहतात ते पेलावण्याइतपत सक्षम असावी लागते. चांगल्या पक्षात सुद्धा, स्वप्नाने भारलेले, कार्यक्षम अनुयायी असावे लागतात. 
प्रत्येक पायरी आणि प्रत्येक गोविंदा महत्वाचा. यांच्यावर चढून शेवटचा गोविंदा आपले श्रम लावून फळ मिळवू  शकतो. त्यामुळे इथे कोणी ना लहान ना मोठा.  पाणी फेकून लक्ष विचलित करणे हे तर सर्वच ठिकाणी होते. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणे किंवा अडचणीला न घाबरणे हे दहीहंडी शिकवते . हे फक्त स्वत:पुरतेच नाही तर प्रत्येक थर आपला तोल  सांभाळून वरील थराची काळजी घेतो. दहीहंडीचा तर हाच खरा संदेश .

मुंबईत दहीहंडीची मजा असायची ती गिरगावात. केवळ दहीहंडीच नाही तर चित्ररथ सुद्धा रस्त्यारस्त्यावरून जायचे. मुंबईत आणि कुठे मी हे पाहिले नाहीत. वेगवेगळे देखावे असत आणि  वाडीवाडीत कुणाचा देखावा सुंदर ह्यात चुरस असे. ते गेले की दहीहंड्या फोडायला गोविंदा जमायचे. चित्तथरारक असे ते दृश्य पण त्यात शिस्त होती. चार किंवा पाचच थर असायचे.  बक्षीस सुद्धा माफक. कुणाचा जीव जाईल एवढी जीवघेणी स्पर्धा तेव्हा नव्हती. या कृष्णांना पाहायला जमणाऱ्या गोपिका तेव्हाही होत्या. बाल्कनीतून न्ह्याहाळत असताना नजर चुकवून पाण्याने भरलेल्या फुग्यांनी लक्ष वेधून घेण्याचा खेळ हा तर कॉमन होता. दही हंडीचा हा सारा जल्लोष नी उत्साह मनमोहन देसाई यांनी “गोविंदा आला रे आला“ या गीतात आणला आहे. ६३ सालातील हे गीत आजही जन्माष्टमीच्या उत्सवात आपली जागा धरून आहे. 
ब्लफ मास्टर या सिनेमातील नायकाला आपल्या प्रेयसीला एक महागडी भेट द्यायची इच्छा आहे पण पैसे तर नाही. अशावेळी त्याचा मित्र त्याला दहीहंडी फोडायची कल्पना सुचवतो. 
बक्षिसाच्या पैशातून भेट घेता येईल की!  
तोपर्यंत दहीहंडी वरील गोविंदा गीत काही सिनेमात चित्रित झाले नव्हते. कृष्णावरील सिनेमा वेगळे. मनमोहन देसाईंना ही कल्पना अत्यंत आवडली.  ते स्वतः गिरगावात, खेतवाडीत राहायचे.

इथेच या गाण्याचे शूटिंग केले आहे. इथलीच मित्रमंडळी आणि लोक मॉब मध्ये सामील झाली. शम्मी कपूर ला पूर्ण सूट दिली होती. रफीच्या आवाजाने गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली.
त्या नंतर हा ट्रेंड सुरु झाला. 

अमिताभ बच्चन ( मच गया शोर सारी नगरी रे ), शत्रुघ्न सिंह ( शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर ) सुनील दत्त ( तीन बत्ती  वाला , गोविंदा आला ) ह्यांनी पडद्यावर दहीहंडी गाजवली. सत्तर ते ऐंशीच्या दशकात कौटुंबिक चित्रपट बनत. त्यात सणांसाठी जागा होती.
पुढे action सिनेमा आले. हॉलीवूड चा प्रभाव इथेही जाणवू लागला.  या अशा उत्साहाच्या गाण्यांची जागा आयटम सॉंग ने घेतली, नाही म्हणायला जोहार, चोप्रा अत्यंत श्रीमंत लोकांचे उत्सव पडद्यावर लाखो रुपये खर्चून दाखवतात पण त्यात ही सहजता नाही. एका ठराविक वर्गासाठी हे सिनेमा.
दहीहंडीत सर्वसमवेशकता होती.
“ हमाल दे धमाल”  या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित एक दहीहंडी गीत आहे.

गोविंदा रे गोपाळा
अगो आज , तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवूस तू पाठ
तुझा फोडीन मी माठ
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या  दादा गेला , जीव झाला वेडा.
या गाण्याचे चित्रीकरण स्टुडिओत झाले. ते एवढे वास्तववादी आहे की प्रत्यक्ष दहीहंडीत या गाण्याचे चित्रण झाले आहे की काय असे वाटते. एकतर बेर्डे स्वतः गिरगावकर.  गिरगावात प्रत्येक सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. लहानपणापासूनच या परंपरांचे संस्कार झाले असल्याने, बेर्डेना अभिनय करायची गरज नव्हतीच.

श्रीकृष्णाचा विचार राधे शिवाय करता येत नाही आणि राधेला कृष्णाशिवाय अस्तित्व नाही. राधा असेल, नसेल पण भारतीयांच्या मनात कृष्ण, राधेबरोबर आहे. मंदिरात, कथांत, कादंबर्यांत, गीतात तिला कृष्णाबरोबर मानाचे स्थान आहे. लोकांच्या मनात वसलेल्या राधा या पात्राला महाभारतात स्थान नाही, हरिवंश या कृष्णचरित्रात सुद्धा नाही.
रासक्रीडेचा अंतर्भाव इसवीसन पूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीस लिहिलेल्या भागवतात झाला आहे. तथापि राधेला रासेश्वरी म्हणून प्रसिद्धी मिळाली ती जय देवाच्या गीत गोविंद काव्यामुळे. 
अशारीरी प्रेम म्हणून कृष्ण-राधाच्या प्रेमाचे उदाहरण दिले जाते खरे पण तरीही या काव्यात शृंगारिक भावना उद्यपीत होतील अशा अनेक जागा आहेत. चैतन्य मताचे लोक या काव्याला भक्तिकाव्य म्हणत असतील पण आहे तर हे प्रणय काव्य. कामविलासातील कलेच्या अनुरोधाने हरीचे स्मरण असे खुद्द जयदेवचे म्हणणे आहे. रती भावंना ही अशुची नाही ती शृंगाराची गंगोत्री आहे ही त्याचे मत होते. 
जयदेव लिखित गीत गोविंद काव्यात या प्रेमाच्या अनेक मानवी छटा दिसतात. मत्सर, खेळकरपणा, उत्कटता आणि  कामुकता सुद्धा.

दुर्गा बाई भागवत म्हणतात,
“भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्याने रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. राधा कृष्णाच्या प्रेमामुळे, भारतीय प्रीतिकथेला कोवळेपणा आला. प्रीतीच्या परिपूर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच ही कथा जन्माला आली असावी”
मराठी भावगीतात राधा कृष्णाची असंख्य प्रेमगीते आहेत.

यमुनेच्या काठावर पाणी भरायला जाणाऱ्या गोपींची खोडी काढणे हा कृष्णाचा छंद आणि राधा तर त्याची आवडती गोपी . जिच्यावर प्रेम तिलाच सतावणार न ! पण आज त्या गुन्ह्याला माफी देण्याचा तिचा काही इरादा नाही. 
एक तर वाट अडवली, त्यामुळे आधीच घरी परतायला झालेला उशीर आणि त्यात हात धरलेला सोडवून घेताना तिची करंगळी दुखावली आहे.
मग कसे माफ करणार!

हा तक्रारीचा सूर मांडताना ग दि माडगूळकर लिहितात,

ऐन दुपारी, यमुना तीरी, खोडी कुणी काढली
ग बाई माझी करंगळी मोडली ( आशा भोसले)
———————————
दुपारची वेळ म्हणजे कामधाम आटपून, यमुना तीरावर निवांत पाणी भरायला जायची वेळ. अचानक कुठूनतरी कान्हा येतो आणि ती बेसावध असताना तिची वेणी ओढतो. तिचा हात पकडतो.
आताही खोडीच नाही का ?
तिलाही राग येतो. इरीला पडून ती त्याच्या गळ्यातली माळ तोडते आणि या झटापटीत तिची करंगळी दुखावते. काळी निळी होते.

झटपटीत त्या कुठल्या वेळी
करंगळी हो निळसर काळी
का हृषीकेशी, मम् देहाशी, निजकांती जोडली
आता इथे मात्र शृंगारावरून गीत भक्तिरसाकडे जाते. राधेची करंगळी निळी होते. कृष्णाच्या रंगाशी एकरूप होते.

राधेचे कृष्णाशी नक्की नाते काय ?
वयाने ती कृष्णाहून मोठी होती . विवाहिता होती. तिची कृष्णावरील भक्ती मात्र अनन्य साधारण होती. भक्ती, प्रेम आणि मैत्री ह्या साऱ्याचे दर्शन तिच्या कृष्णाशी जोडलेल्या नात्यात दिसून येते . या राधेला कृष्णाशिवाय दुसरे जग दिसतंच नाही. लोकांच्या चर्चेची तिला पर्वा नाही. कृष्णप्रिया होणे हेच तिचे उद्धिष्ट आणि तेच तिचे संचित.
हे भारावलेपण पी सावळाराम यांच्या गीतात दिसते.
राधा कृष्णावरी भाळली (आशा भोसले)
———————————————
कृष्ण कंसवधासाठी मथुरेला गेला आणि परतला नाही. आपल्या पूर्वायुष्यात त्याने कधीही डोकावून पाहिले नाही पण कृष्ण भक्तीने राधेला एवढे मोठे केलं की कृष्णाचे नाव घेताना आधी राधेचे नाव आलं.
राधा-कृष्ण .
राधा आली की कृष्ण येतोच. हे भाग्य त्याच्या कोणत्याही धर्मपत्नींना मिळवता आले नाही.

अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरी अधरीची वेणू वाजवी
राधा मोहन बघण्या मिलन
इंद्रपुरी अवतरली.
राधा कृष्णावरी भाळली.
१२ व्या  शतकातील ” गीत गोविंद ” या काव्याने राधेला जयदेवानी लोकमानसात रुजवले. भक्ती बरोबर eroticism ला सुद्धा अमरत्व दिले . राधा कृष्णाची लौकिक पत्नी नाहीच पण असे एक देऊळ नाही जिथे कृष्णाबरोबर राधेची मूर्ती नाही.
राधा या नावाची फोड केली तर रा म्हणजे इच्छा करणे आणि धा म्हणजे ज्ञान. राधा म्हणजे ज्ञानाची इच्छा .
हा अर्थ जर धरला तर गीत गोविंद मधल्या शृंगाराला सुद्धा एक वेगळेच वलय येते .

प्रथम समागम लज्जितया , पटु चाटु शतै: अनुकूलं 
मृदु मधुर स्मित भाषितंया , शिथिली कृत जघन दुकूलम

पहील्या भेटीत सल्लज असलेल्या मला पाहून त्याने मृदू शब्दाचे  जाळे विणून माझी भीती घालवायचा प्रयत्न केला . भीड  चेपून जेव्हा मी त्याला प्रतिसाद देऊ लागली तेव्हाच माझे रेशमी वस्त्र माझ्या कटीवरून  सरकले . 

रमय मया सह मदन मनोरथ भावितया सविकारम् (जवळीकेसाठी उत्सुक असलेल्या कृष्णाने तेव्हा मला आलिंगन दिले.)
या काव्याचा जनमानसावर एवढा परिणाम आहे की कामुकतेचे  दर्शन घडवण्यासाठी राधा कृष्ण या प्रतीकांचा वापर मुक्त हस्तांनी साहित्यात, संगीतात, काव्यात आणि नाटक सिनेमात केला गेला आहे .. 

आज पहाटे श्रीरंगाने, मजला पुरते लुटले ग
साखर झोपे मधेच अलगद प्राजक्ता सम टिपले ग (आशा भोसले)

किंवा ग दि माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि माणिक वर्मा यांनी गायलेल्या ह्या ओळी  बघा

सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजल गाली सहज ओघळे
या साऱ्याचा पुन्हा गोकुळी, होईल अर्थ निराळा
झुलवू नको हिंदोळा
इथे हिंदोळा म्हणजे मनाच्या संवेदना. लाजलेल्या राधेच्या मनाचे बावरलेपण या गीतात स्पष्ट दिसते. 

वात्सल्य, शृंगार या बरोबर कृष्णगीतांवर भक्तीरसाचाही पगडा आहे. प्रीती, भक्ती आणि मुक्ती या भावयोगाच्या तीन पायऱ्या आहेत. प्रीतीच्या परमोच्च स्थितीवरच भक्तीचे पहिले पाऊल उमटते. माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतोच जेव्हा ईश्वराचे अस्तित्व हृदयाला समजते आणि बुद्धिप्रधान मस्तक ईश्वरी साक्षात्काराची याचना करतो.

भाबडी दासी जनीं गाताची  गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी (लता मंगेशकर) 

लताच्या आवाजात भक्तीचा आठवा सूर आहे. अतिशय मधुर कृष्ण भजन आहे हे! 
आज काही ठिकाणी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी झाली तर काही ठिकाणी त्याचे हिडीस रूपही पाहायला मिळाले. 
कृष्ण चरित्रापासून आपण काय घ्यावे हे प्रत्येकाच्या आकलन शक्ती आणि प्रवृत्ती यावर अवलंबून आहे.  कृष्णाने गोकुळ  सोडले. आपली मुरली राधेला दिली आणि  परत वळून पाहिले नाही. त्याच्या आयुष्यातला हळवेपणा तिथे संपला. या पुढचा कृष्ण तो युगंधर कृष्ण. महाभारतात त्याचे दर्शन होते. 

यावर गिरीश जाखोटिया यांचे कृष्णनीती हे अप्रतिम पुस्तक आहे. 
त्याचा सारांश इथे देते. पूर्ण पुस्तक वाचनीय आहे. IIM येथेही त्यांनी या विषयावर व्याख्याने दिली आहेत 

कृष्णाचा जन्म कर्णाप्रमाणेच विपरीत अवस्थेत झाला. क्षत्रिय राजपुत्र असूनही गवळी म्हणून गोकुळात त्याचे आयुष्य गेले. कर्णाप्रमाणे त्याची खंत बाळगत तो कुढला नाही. कर्णाने आपल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जुलमी राजसत्तेची हात मिळवणी केली तर कृष्णाने सर्व सामान्य जनतेबरोबर राहून प्रत्यक्ष कंसाला आव्हान दिले.
ज़से शिवाजीने मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्याची निर्मिती केली, तसेच गोकुळातील मित्रांच्या साहाय्याने कृष्णाने अन्यायी राक्षसांचा पराभव केला.
जाती व्यवस्थेचा आणि अंधश्रद्धेचा त्यांनी विरोध केला. लोणी चोरले असेलही पण  ते वाटप करण्यासाठी. ज्यांना दुध, तूप मिळत नाही अशा गरीब मुलांसाठी. पाऊस पडण्यासाठी, तत्कालीन देवतेची (इंद्राची )पूजा केली जायची पण पाऊस देतो तो कोण तर तो गोवर्धन पर्वत, त्याची कृष्णाने पूजा केली. शेवटी निसर्गाचे संगोपन करा तोच तुम्हाला तारणार हा संदेश त्यांनी पाच हजार वर्षापूर्वी दिला.  
कृष्णाची नैतिकता लवचिक होती. दुष्ट माणसांच्या डावपेचांचा मुकाबला करण्यासाठी उभे राहताना, त्यानी नाती गोती, आपला परका असा विचारही केला नाही. अगदी यादवांची दूही झाली तेव्हाही पाप निर्मूलन असाच दृष्टीकोन त्याने बाळगला.
.दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाने विजय मिळवणे आणि त्यांचा समूळ पाडाव करणे हा सिद्धांत पुढे शिवाजीने
आचरला .प्रसंगी अधर्माची साथ देवून कृष्णाने धर्माचे राज्य आणले.
मोक्षाची क्रांतिकारक कल्पना कृष्णाने वास्तव्यात आणली. आसक्ती आणि वैराग्य यांच्या सीमा ओलांडूनही त्याचा समतोल राखणारा तो योगेश्वर होता.
गीता लिहिणारा ब्राह्मण, दुष्टांना धडा शिकवणारा क्षत्रिय, द्वारका मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आणणारा वैश्य आणि दुध विकणारा शुद्र, असा सगळ्या वर्णाचा योग्य तो उपयोग करून तो त्या युगाचा महानायक झाला.

हीच खरी कृष्ण नीती..

“सांगा मुकुंद कुणी हा पहिला ?” ही प्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा यांची लावणी . 
रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी 
टाकुनी गेला तो गिरिधारी 
कुठे गुंतून बाई हा राहिला 
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
जेव्हा कर्तव्य खुणावू लागले तेव्हा हे सर्व पाश तोडून अन्याय दूर करण्यासाठी कृष्णाने मथुरेची वाट धरली. कसलाही मोह त्याला परावृत्त करु शकला नाही. आज इंग्रजांशी लढण्यासाठी अशा कृष्णाची गरज आहे, असा  सिनेमापुरता तरी या लावणीचा अर्थ आहे .
दोनशे वर्षे होतील या लावणीला.
अजूनही हा मुकुंद सापडला आहे का ?

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

..

19 thoughts on “सांगा मुकुंद कुणी हा पहिला?”

  1. वाह!!
    एकसे बढकर एक गाण्यांची खास निवड!
    मराठीने दिलेली ही अजरामर गीते!!
    घनःश्याम सुंदरा श्रीधरा असा भुपाळीतून भेटणारा “शिरीरंग”(श्रीरंग) तुमच्या पोस्ट मधून इतक्या वेगवेगळ्या रुपांनी साकारला. फार फार सुंदर लेख!
    संगीतही किती मेलोडियस, अगदी शब्दांचा पोत ढळू न देणारे.
    खूप खूप आवडला आजचा ब्लॉग.
    यथोचित आणि समर्पक 🌿💜🌿
    श्री कृष्णार्पणमस्तु 🌿💜🌿

    1. Kamini Thank you.
      यावेळी ठरवले होतेच की मराठी गाण्यांवर लिहायचे
      खरेतर भक्ती , विरता, प्रेम वात्सल्य अशा पैलूंवर एक एक पोस्ट होईल एवढी गाणी आहेत
      ..परत कधीतरी.

  2. प्रिया,
    खूपच सुंदर..

    कृष्णाचे इतकं यथोचित वर्णन क्वचित च कोणी केले असेल.
    दही हंडी मागची कल्पना,भावना खूप सुंदर लिहिलीस.
    गाण्यांची निवड खास च..
    ❤️❤️

  3. प्रिया,
    खूप सुंदर ❤️❤️

    कृष्णाबद्दल इतकं योग्य वर्णन क्वचित च
    कोणी केलं असेल.

    दही हंडी मागचा विचार,भावना 👌👌

    गाण्यांची निवड खास.

  4. अप्रतिम लिहिले आहे .
    नेहमी प्रमाणे .
    खूपच सुंदर .

  5. महेश प्रभु

    अप्रतिम लेख.
    बालपणी रेडिओवर हीच गाणी ऐकत मोठे झालो. कृष्णभक्तीचा भावपूर्ण आढावा.

    1. खरंय
      लहानपणीची गाणी आणि एवढे वैविध्य आहे त्यात
      Thank you Mahesh ji.

  6. खूप सुंदर गाणी आणि तितकेच बहारदार रसग्रहण …❤️

  7. वाह वाह वाह.. एकदम भारावून टाकणारा लेख. एवढा विस्तृत पणे अनेक गाण्यांची, संबंधित श्लोकांचा फोड करून सांगणारा, वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा असा लेख आहे. मान लीयां भाई !!

    ह्या लेखातून तुमच्या, लेखिकेची प्रखर बुद्धिमत्ता, अभ्यास आणि अनेक प्रसंगाची समर्पक अशी जोड केली आहे ह्याचा अंदाज येतो. Again hats off to you Madam .. 💐

    1. Thank you Sandeep ji .
      थोडाफार यात बाळशास्त्री हरदास आणि दाजी पणशीकर शात्री यांच्या व्याख्यानाचा हात आहे. लहानपणी वाचलेल्या पुस्तकांचं संस्कार.
      गिरीश जाखोटिया यांचे कृष्ण नीती आवर्जून वाचा .
      तुम्हाला अतिशय आवडेल .

  8. कसलं सुरेख लिहीलयेस , गाणी तर सगळीच अप्रतिम . सी रामचंद्रांनी संगीत दिलेलं फैय्याजने गायलेलं ‘अजन्मा जन्मासी आला’ हे कृष्णजन्माचं गाणं पण खूप सुरेख आहे. युट्यूबवर असलं तर नक्की ऐक. कृष्ण हा माझ्यासाठी तरी कायमच भुरळ पाडणारा, ज्याच्याबद्दल कितीही वाचलं, कळल तरी सतत अजून जाणून घ्यायची उत्सुकता कायम राहते असं व्यक्तिमत्त्व आहे. त्याला परीपूर्ण पुरूष म्हणतात ते उगाचच नाही .

    1. Thnak you Nayana.
      मला ते नंतर कुणीतरी इथेच सांगितले
      खरंच अप्रतिम गाणे आहे .
      ग दि मांचे शब्द तर अफाट

Leave a Reply to Suchitra Ranade Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *