हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें
काही वर्षांपूर्वी, वर्तमानपत्रात वाचण्यात आले होते की, आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाला खय्याम साहेबांनी नव्वद लाख रुपये दान दिले. आयुष्याच्या या टप्प्यावर, विशेषतः सामाजिक जीवनातून निवृत्त झाल्यावर समाजाशी ठेवलेली बांधिलकी पाहायला मिळत नाही. अतिशय कौतुक आणि आदर वाटत असतानाच, तेव्हा मनात पाल चुकचुकली, नव्वद वर्ष ! नव्वद वर्ष झालीही. आता तर खय्याम साहेबांना जाऊन पाच वर्षे झाली.
अगदी अजूनही, संध्याकाळ झाली की तलत रुंजी घालतो की. एकोणसत्तर वर्षांपूर्वी बांधलेले हे गीत त्याच हळवेपणाने साद घालते.
शाम ए ग़म की कसम (सिनेमा-फूटपाथ)
———————————————-
आकाशाच्या कॅनव्हासवर हवे तसे रंग भिरकटवुन सूर्य नुकताच क्षितिजाखाली जातो. ती परवलीची खूण समजून छोटीशी चांदणी हळूच डोकावते. त्या धूसर प्रकाशात नेहेमीचा परिसरही वेगळा दिसतो. उतरलेल्या सावल्या अंगावर झेपावतात. मन उगाच कातर होते. नको नकोसे विचार गुदमरून टाकतात. मनाच्या खोल कबरीत दफन केलेल्या आठवणी बाहेर येण्यासाठी धडका देऊ लागतात.
मागे टाकलेले आयुष्य, जुन्याच स्वरूपात सामोरे येऊन जाब घेते.
मागे तर जाता येत नाही आणि मागचे विसरता ही येत नाही.
दिल परेशान है, रात वीरान है
देख जा किस तरह, आज तनहा हैं हम
शाम ए ग़म की कसम
फूटपाथचे संगीतकार,मोहम्मद झयुर खय्याम हाश्मी यांचा जन्म पंजाबमधील, जालंधर येथे झाला. लहान वयापासूनच सिनेमा आणि संगीताचे आकर्षण असल्याने आणि घरातून विरोध असल्याने, ते दिल्लीला आपल्या काकांकडे आले. गाण्याची आवड असली तरी उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, त्यांनी सैन्यात नोकरी केली. कलेची आवड काही स्वस्थ बसू देत नाही. गुलाम अहमद यांनी त्यांना असिस्टंट म्हणून नोकरी दिली आणि खय्याम मुंबईत स्थिरावले. १९५२ मध्ये रिलीज झालेल्या फुटपाथ या सिनेमाच्या यशाने, सिनेसंगीताच्या दिग्दर्शनाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे झाले.
“शाम ए ग़म की कसम” गाणे सुरूच होते इलेक्ट्रिक ऑर्गनने; मग पिआनो, गिटार आणि नंतर स्ट्रिंग इन्स्टुमेंट्स.. त्याला धरून तलतचा सूर येतो.
आ भी जा आ भी जा…ची आर्त विनवणी दिलीपच्या डोळ्यात दिसते. फुटपाथ या सिनेमाला माफक यश मिळाले पण हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. त्या नंतरच्या काळात खय्याम यांनी काही मोजक्या चित्रपटांना संगीत दिले पण ते काही गाजले नाही.
१९५८ मध्ये आलेल्या “फिर सुबह होगी” या चित्रपटाने मात्र खय्याम ह्या नावाला वजन दिले. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. हा सिनेमा रशियन लेखक, फ़्योदर दस्ताएवस्की यांच्या “क्राईम अँड पनिशमेंट” या कादंबरीवर आधारित होता. राजकपूर नायक असलेल्या या चित्रपटाचे संगीत शंकर जयकिशन यांच्याकडे जाणार होते पण गीतकार साहिर लुधियानवी यांनी खय्याम यांचे नाव सुचवले. साम्यवाद ज्याला माहित आहे, ज्याला हे पुस्तक समजू शकेल तोच या चित्रपटाच्या संगीताला न्याय देईल, अशी त्यांची भूमिका असल्याने, खय्याम यांचा प्रवेश झाला.
या सिनेमातले प्रत्येक गीत गाजले. “वो सुबह कभी तो आयेगी”, “ चीन ओ अरब हमारा” यासारख्या गंभीर गीतांबरोबर मुकेश आणि आशा भोसले यांचे फार सुंदर रोमॅंटिक गीत माझे अत्यंत आवडीचे आहे.
फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला (सिनेमा -फिर सुबह होगी)
———————————————————————————
गढद निळ्या रात्रीच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी हे चित्रित झाले आहे. मंद सुटलेला वारा, रात्रीची निरव शांतता, लांबून येणारी समुद्राची गाज आणि मुकेशचा हितगुज करणारा आवाज.
फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझको
प्रेमाची कबुली सगळ्यांनाच काही स्पष्ट शब्दात देता येत नाही.पण शब्द जरी बुजलेले असले तरी नजर धीट आहे. तिचा अन्दाज त्याला माहित नाही. ती रागावली नसेल याची खात्री तिच्या लाजऱ्या नजरेने दिली असली तरीही खात्री करून घेण्यासाठी तो विचारतो,
एक यूँ ही सी नजर दिल को जो छू लेती है
कितने अरमान जगाती है तुम्हे क्या मालूम
प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, त्यात पुढची स्वप्ने आहेत. सोबतीची अपेक्षा आहे. जिच्या प्रेमभऱ्या नजरेने त्याला ती हिम्मत दिली आहे.
त्यांची आता नजर भिडते मग गडबडून दुसरीकडे वळते. त्याचा धीर वाढतो. तो परवानगी घेताना विचारतो,
हर नज़र आपकी जज्बात को उकसाती है
मैं अगर हाथ पकड़ लूं तो खफ़ा मत होना
साहिरचे धीट शब्द, मधात बुडून येतात आणि मग मात्र ती स्पष्ट कबुली देऊन टाकते,
मेरी दुनिया-ए-मोहब्बत है तुम्हारे दम से
मेरी दुनिया-ए-मोहब्बत से जुदा मत होना
फार कमी गाण्यात साशंकता,लज्जा, धिटाई आणि समर्पण एकेमकांचे हात धरून आले आहे. राज कपूर आणि माला सिन्हा साठी सुद्धा हे गीत पहा. त्यावेळचा मेलोड्रामा लक्षात आणला तर खूप वेगळे आणि खरे वाटते.
या नंतर प्रदर्शित झालेल्या शोला और शबनम, शगुन,आखरी खत च्या संगीताने नामवंत संगीत दिग्दर्शकांत खय्याम यांची गणती होऊ लागली.
१९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या, “शोला और शबनम” या सिनेमात अजून एक हळवे करणारे गीत आहे.
जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें ( शोला और शबनम )
———————————————
मोहम्मद रफीच्या पहिल्या दहा गीतांत याचा नंबर लागेल. अतिशय गुंतागुंतीची रचना ही.
तुटलेल्या मनाचे बरेच कंगोरे असतात. विरहाची वेदना, प्रतारणेचे दुःख, नियतीचा फटका..
आधीच्या विरह गीतात मिलनाची उत्कट इच्छा आहे तर हा विरह मात्र नायकाने स्वतःहून स्विकारला आहे. त्यात ठाम निर्धार सुद्धा आहे..
समजूत काढणारे आणि स्वतःच्याच मनाला सावरणार असे हे गीत, स्वतः खय्यामजींचे आवडते आहे.
जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें
राख के ढेर में शोला है न चिंगारी है
मित्राचा त्याग का मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग; मैत्री का प्रेम हा सवाल कठीण. हिंदी सिनेमाच्या आदर्शवादी नायकाचा पर्याय हा
दुसरा असणार हे स्वाभाविक आहे. इथे तो आपल्या प्रियेला समजावत आहे.
ज़िंदगी हँस के न गुज़रती तो बहुत अच्छा था
खैर हँस के न सही रो के गुज़र जायेगी
राख बरबाद मुहब्बत की बचा रखी हैं
बार-बार इसको जो छेड़ा तो बिखर जायेगी
काव्याबद्दल असलेला आदर, खय्याम यांच्या स्वरात प्रत्ययास येतो. शब्दाचे वजन सांभाळून केलेली ही स्वररचना आहे.
सारंगी, मग संतूर आणि टोका चाइम्स बरोबर बासुरी सुद्धा पूर्ण गीतात पाठशिवणीचा खेळ खेळते. सारंगी, बासुरी, गिटार आणि सॉफ्ट व्हायोलिन चा कल्लोळ आणि नायकाच्या मनातील ‘controlled” वादळ यांचा मेळ आहे या रचनेत . स्वतःचा स्वार्थ डावलून नायक समजावतो,
आरजू जुर्म, वफ़ा जुर्म, तमन्ना है गुनाह
ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता
कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊँ
बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता
१९६६ मध्ये आलेल्या आखरी खत मध्ये असलेली तीनही गीते गाजली.
“बहारों मेरा जीवन भी सवारों “ या गीतात नायिकेची निरागसता आहे. वयात आलेल्या मुलीचे मनोगत. हे गीत गाजले.
दुसरे आहे, “ और कुछ देर ठहर “ bold words, full of open lust आणि त्याला साजेसी sensuous melody.
Sex can be so sublimely erotic.
और कुछ देर ठहर और कुछ देर न जा ( सिनेमा- आखरी खत)
————————————————————————
हा सिनेमा काळाच्या पुढे होता. यातील नायक सुद्धा चारित्र्य संपन्न वगैरे नाही. फिरायला आलेला असताना एका पहाडी मुलीशी त्याचे शरीर संबंध जुळतात. केवळ शरीराने मन जिंकता येते अशी भाबडी समजूत असलेला त्या मुलीला दिवस जातात. आपल्या प्रियकराच्या शोधात ती शहरात येते पण त्याचा विश्वामित्र झालेला असतो.
जेव्हा संबंध चोरटे ठेवण्याची गरज भासते, तेव्हा त्यांनी कारणे कोणतेही सांगो, माणूस खोटारडा आणि कोणतीही जबाबदारी न स्विकारणारा असतो.
माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरुष पण एक फरक आहे, शक्य तो शारीरिक संबंध आले की स्त्री, त्याचा उपयोग करून पुरुषाला जखडून ठेवायला पहाते आणि पुरुषाचे इस्पित साध्य झाले असल्याने, कमरेच्या वर असलेल्या हृदयाकडे त्याचे लक्ष जात नाही.
याचे भान येण्या अगोदरचे हे गीत.
रात बाक़ी है अभी रात में रस बाक़ी है
पाके तुझको तुझे पाने की हवस बाक़ी है
और कुछ देर ठहर और कुछ देर न जा
हे शब्द उघड उघड उत्तेजक आहेत. चित्रीकरण पाहिले की लक्षात येते, जे घडायचे ते घडून गेलेले आहे . तरीही गात्रा गात्रात, श्रांत शरीरात अतृप्तता भरून उरली आहे. रात्र संपायला अवकाश तर आहेच आणि त्याचे मन भरायला सुद्धा ..
म्हणून केलेली ही मागणी; आर्जवाच्या रसात भिजलेली .
“और कुछ देर ठहर और कुछ देर न जा”
इंद्राणीचे समर्पण, ज्याच्यावर प्रेम केले त्यावर विश्वास ठेवण्याचा भाबडेपणा आणि राजेशच्या डोळ्यातील कुतूहल, पुरी न झालेली तृष्णा, थोडेसे अवघडलेपण सगळे काही स्पष्ट दिसते. पडद्यावर आणि गीतात सुद्धा. यातच भूपेंद्रचे एक सुरेख गाणे आहे.
रुत जवां जवां, रात मेहेरबां (आखरी खत)
————————————————
हे गीत क्लब सॉन्ग. अशा अनवट, अनोळखी आवाजांचा योग्य वापर खय्याम यांनी योग्य जागी केला आहे. नितीन मुकेशचे ‘आजा रे ओ मेरे दिलबर आजा’ , किंवा सुलक्षणा पंडित चे” माना ‘तेरी नजर में ,तेरा प्यार हम नही’ तसेच रझिया सुलतान मधले कब्बन मिर्झा चे ‘ खुदा खैर करे “ .त्यांनी कुठेही दर्जाशी तडजोड केली नाही. हे आवाज, मुख्य आवाज मिळाले नाहीत म्हणून घेतले नाहीत असे नाही. हे आवाज त्या त्या पात्राला फिट्ट बसले आहेत. 
इथे सुराबरोबर शब्द सरकतात. भूपेंद्र गिटारिस्ट आहे हे अनेक जणांना माहित असेल. त्यामुळे त्याचे गिटार धरणे सुद्धा परफ़ेक्ट आहे आणि कॉर्ड्स वाजवल्या जात आहेत. डोळ्यांना बरे वाटते ते. 🙂
हे गीत गाताना, मधल्या जागी पात्रांचे संभाषण आहे. त्याला कुठेही धक्का येऊ न देता गाणे पुढे सरकते.
प्रसंगाला धक्का न देता गाणे मनावर ठसवणे हे खय्याम साहेबांचे कौशल्य आहे.
आखरी खत या सिनेमाबद्दल बोलताना खय्याम म्हणतात,
या सिनेमात चारहजार फूटाचे संवाद होते तर आठ हजार फुटांची स्तब्धता. चेतन आनंदने संगीत कसे हे सांगताना म्हटले होते, निरव शान्तता, मग त्याच्या पोटी असंख्य भावना असल्या तरी चालेल, ही संगीताच्या माध्यमातूनच व्यक्त झाली पाहीजे .
या सिनेमातच नाही तर पुढेही खय्याम साहेबांनी या शांततेला बोलके केले.
ऐ दिल -ऐ -नादान , (सिनेमा -रझिया सुलताना)
—————————————————–
रझिया सुलतान ही प्रेमकहाणी आहे. एक राणी आणि तिचा गुलाम यांची प्रेमकहाणी. शाही सल्तनतीचे सारे नियम धुडकावून रझिया राज्ञीपद पटकावते. तिच्या मंत्रिमंडळाला, रयतेला हा निर्णय सुरुवातीला आवडलेला नसतोच पण आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर, रझिया त्यांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण करते. शासक हा जरी प्रजेला बांधील असला तरीही त्याचे स्वतःचे मन असतेच. ते कोणावर जडेल हे तो कसे ठरवू शकतो ! रझियाचे प्रेम आहे जमात उद दिन याकूतवर. हा एक हबशी गुलाम आहे. रयतेला हे मान्य असणे असंभव. राज्य किंवा प्रेम यातील एकच पर्याय निवडणे रझियाच्या हातात आहे. रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे.
ऐ दिल ऐ नादान
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है?
ह्या गीतात शब्द आणि सूर तर आहेतच पण वादळी शांतता आहे. पाच ते सात सेकंदाचे मोठे अल्प विराम या गीतात गुंफले आहेत. राज्य करण्याची तिची मनीषा आहेच. ते केवळ कर्तव्य नाही. ती महत्वाकांक्षा आहे पण ती एक स्त्रीसुद्धा आहे. प्रेमात असलेली स्त्री. राणी का प्रेयसी ह्यातील पर्याय निवडणे दुःखदायक आहे.
क्या क़यामत है, क्या मुसीबत है,
कह नहीं सकते, किसका अरमाँ है
ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है
ये ज़मीं चुप है, आसमां चुप है
रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे .
हरवलेली ती जमिनीकडून, आकाशाकडून आपल्या प्रश्नाची उत्तरे मागते पण ते सुद्धा तिच्या मनातील स्पंदने जाणून गप्प आहेत. एवढी निरव शांतता आहे की फक्त तिच्या हृदयाची धडकन त्या शांततेची साक्षीदार आहे .
मन आणि हृदय यांच्यात फरक आहे. हृदय भावनेशी बांधलेले असते. त्याला विचारांची जोड नसते. हृदयातून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. मन, भावना आणि विचारांना स्मरून निर्णय घेते. बंध तोडणे हृदयाला कठीण आहे खरे पण मन मात्र हा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेऊ शकते.
महत्वाचे असते ते एका क्षणात निर्णय घेणे. जेवढा जास्त विचार तेवढी मनाची दुविधा. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणे अस्वस्थ करते, गोंधळात पाडते. एकतर ठरवलेला रस्ता अचानक वेगळेच वळण घेतो किंवा रस्त्याच्या फुटणाऱ्या फाट्यावर मन घट्ट करून दुर्लक्ष करावे लागते . भले तो रस्ता कितीही हवाहवासा वाटुदे!
सिनेमाच्या क्षेत्रात काम करताना , परिपूर्णतेचा ध्यास ठेवणे हे कठीण आहे. व्यावहारिक यशाच्या मोजमापनात अडकायचे झाले तर अशक्य कठीण आहे. खय्याम हे सुखद अपवाद आहेत.सिनेमा कोणत्याही दर्जाचा असो, त्यांच्या संगीताचा दर्जा फार वरचा आहे. He is a romantic perfectionist . त्यांच्या पत्नीचा प्रभाव असेल.
काही अप्रतिम प्रेमगीते त्यांनी बांधली आहेत.
ठहरिये होश में आ लूँ, तो चले जाईएगा (सिनेमा -मोहब्बत इसको कहते है)
————————————————————————————
शशी कपूर तेव्हा नवीन होता आणि लोकप्रिय नायिका, त्याच्याबरोबर काम करायला फारश्या उत्सुक नसताना, सिनेतारका, नंदा ने होकार दिला होता. त्यांची जोडी नंतरही काही चित्रपटांत आली , ते चित्रपट गाजले.
हे गीत रफीचेच.
तो हसतो, फ्लर्ट करतो, त्याचा आवाजही खेळकर आहे इथे. या सुमारास लता मंगेशकर यांनी रफीजींबरोबर गाणे थांबवले होते. सुमन कल्याणपूर ह्यांनी फार छान साथ दिली आहे.

आप को दिल में बिठा लूँ, तो चले जाईएगा
त्याला उत्तर म्हणून सुमन कल्याणपूरचा हुंकार आहे तो खूप गोड़ आहे.
तार शहनाई आणि गिटार चा जो सुंदर उपयोग केला आहे त्यामुळे इथे, खय्याम थोडा ओपी नय्यर सारखा भासतो.
तुम्हाला असे वाटते का ?
या प्रेम गीतासारखेच, शंकर हुसैन मधले “आप यु फासलों से” सुद्धा फार सुंदर गीत आहे.
रात आती रही रात जाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
सुरुवातीलाच लताचे खळखळते हसणे ऐकू येते ..दबलेले, गातानाच आलेले हसू.
ते नक्की कसले आहे हे समजत नाही . प्रियकराच्या आठवणीने आलेले, कोणता तरी किस्सा आठवून का एवढ्या सुंदर रात्री साथ द्यायला तो नाहीच ह्याने खंतावलेले आहे..
कतरा कतरा पिघलता रहा आस्माँ
रूह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी… इक नदी दिलरुबा गीत गाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
लता बाईंचा आवाज एवढा स्वर्गीय आहे की हे कठीण सूर…(गाणे परत ऐका, अतिशय अवघड मेलडी आहे ही..) कुणीतरी आकाशातल्या दूरस्थ आत्म्याचे रुदन वाटते. अंतराच्या शेवटी येणारे काहीसे उपहासात्मक हसू आता मात्र अगदी स्पष्ट होत जाते.
शंकर हुसेन मधली सगळीच गाणी अप्रतिम होती. सिनेमा मात्र त्याला न्याय देऊ शकला नाही.
त्यांच्या संगीतात एक नजाकत होती आणि अर्थात संगीताची उत्तम जाण. बुद्धिमान संगीतकारांत खय्याम यांची गणना होते कारण कथा, गीत या सर्वाना अनुसरून त्यांच्या चाली होत्या. शब्दांपेक्षा, अर्थापेक्षा, त्यातले सूर त्यांनी श्रेष्ठ व्हायला दिले नाहीत. हे भल्या भल्या संगीतकारांना जमत नाही.
त्रिशूल मधली अंगाई आठवते?
“ तू मेरे साथ रहेगा मुन्ने” (सिनेमा- त्रिशूल)
———————————————-
“ तू मेरे साथ रहेगा मुन्ने” एका कुमारी मातेने गायलेली अंगाई आहे ही. नेहेमीसारखा चांदोबा, पऱ्या, तारे या गीतात नाही. साऱ्या जगानेच नाकारलेली ही स्त्री, मुलाला कणखर बनायला सांगत आहे.स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्याला तयार करते आहे.
मै तुझे रहम के साये में ना पलने दूंगी
जिंदगानी की कडी धूप में जलने दूंगी
ताकी तपतप के तू फौलाद बने
माँ की औलाद बने
हे सूर आहेत विद्रोहाचे आणि करुणेचे..
या एकाच गीतात खय्याम यांची “ सिने-संगीतकार’ म्हणून ताकद दिसून येते.
साहिर यांच्या तलखीयां या काव्यसंग्रहाला खय्याम यांनी संगीत दिले होते ते केवळ त्या नज्म आवडल्याने. “कभी कभी” या सिनेमात त्यातल्याच काहींना खय्याम यांनी संगीतबद्ध केलं.
खय्याम यांचे संगीत लोकप्रिय होतेच पण कभी कभी आणि त्रिशूल या दोन्ही सिनेमांच्या अफाट यशाने अपयशी संगीतकार , कमनशिबी संगीतकार हा त्यांच्यावर लागलेला शिक्का पुसला गेला. कभी कभी या सिनेमासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिकाने गौरवले गेले.
कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है (सिनेमा-कभी कभी)
——————————————————————-
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा भारतीय मनावर मोठा पगडा आहे याला कारण सिनेमात रंगवलेली पहिली रात्र. सजवलेले शयनगृह, ते उजळून टाकणारा दिव्याचा मंद प्रकाश, प्रशस्त पलंगावर अंथरलेली पांढरी शुभ्र चादर, त्यावर लाल भडक गुलाबांच्या पाकळ्यांची केलेली पखरण, त्यावर हातभार घुंगट घेऊन बसलेली, बावरलेली नववधू, खोलीच्या बाहेर तिच्या मैत्रिणींची मिस्कील कुजबुज आणि आत प्रवेश करणारा, शेरवानीतील देखणा नायक. या सर्व घटकांनी पहिल्या रात्रीची लज्जत अजून वाढवली आहे. 
अशी पहिली रात्र” कभी कभी” या सिनेमातही आहे. फुलांनी सजलेली सेज, रात्रीच्या पहिल्या प्रहारातला मधुर, पिवळा चंद्र, गवाक्षातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळझुळत्या स्पर्शाने थरथरणाऱ्या दिव्यांच्या ज्योती, दागिन्यांनी मढलेली, लाल भडक रंगाच्या पोशाखात खुललेली नववधू राखी आणि तिच्या सौन्दर्याने वेडावलेला शशी कपूर. तरीही एक वेगळेपण आहे या रात्रीत.
नायिकेचे मन आश्वस्त नाही, पतीच्या सहवासातही तृप्त नाही. हरवून गेलेल्या प्रेमाची हुरहूर या रात्रीत आहे.
“कभी कभी” ही एका शायरची कथा आहे. अमित( अमिताभ) आणि पूजा( राखी ) कॉलेजमध्ये शिकत असताना प्रेमात पडतात. घरच्यांना याची कल्पना नसते. आई-वडील, तिचे लग्न विजय ( शशी कपूर) बरोबर ठरवतात. आईवडिलांचा अपमान होऊ नये म्हणून पूजा, प्रेमाचा बळी देऊन बोहल्यावर चढते. तिचा पती हाही अमितच्या कवितेचा चाहता असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीला, अमितचे पुस्तक भेट देऊन, त्यातलीच एक कविता गायचा आग्रह करतो.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये
ह्या गीतातील भावना असतात अमितच्या. हे गीत त्याच्या प्रेयसीसाठी असते पण तिच्यावर आता हक्क मात्र दुसऱ्या कुणाचा असतो . गाणे जरी लता बाईंच्या आवाजात आहे तरीही “सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं” ह्या दोन ओळी मुकेशच्या आवाजात आहेत.
एका अत्यंत गुणी संगीतकाराला, तेवढ्या ताकदीचे सिनेमा का मिळाले नाहीत हा नशिबाचा भाग आहे पण त्यामुळे त्या संगीताचे, त्या गीतांचे मोल कमी होत नाही.
काल मैत्रिणीच्या घरी गेले होते . समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे त्यांची सोसायटी. बाहेरच्या कुंपणाच्या भिंतीला रेलून कितीतरी तरुण जोडपी खेटून उभी होती. कुणी पाहते आहे किंवा जवळून जात आहे हे लक्षात आले तर तर मुद्दाम त्यांच्या कडे पाहून एकमेकांच्या जवळ जात होती. आता जरा वातावरण मोकळे झाले आहे; कल्पना आहे मला पण परक्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही एकमेकांच्या अंगचटीला जाता? त्यापेक्षा मांजर कशी डोळे मिटून दूध पिते तसे करा की!
जेव्हा दोघेच असतात, तेव्हा एकमेकांच्या नजरेत नजर अडकू दे ना! जगाचा विसर पडण्याचे हेच तर क्षण असतात
प्रेम करत आहात का दाखवत आहात !
Do this generation know the difference between loving and love making.?
हातात हात सुद्धा न घेता, संध्याकाळच्या सोनेरी रंगात न्हात, सरकत्या वाळूत कधी चालला आहात?
हळूहळू सूर्य सौम्य होत पश्चिमेकडे झुकतो; मावळती लाजून लालभडक होते.
तुने चेहेरेपे झुकाया चेहेरा,
मैने हाथोंसे छुपाया चेहेरा
लाज से शर्म से, घबराते हुए.
आकाशाचा रंग अजून गढद होऊ लागतो. रात्रीच्या रंगात मिसळून जात असतानाच त्याच्या विस्तीर्ण पटलावर कुठे कुठे ताऱ्यांचा उदय व्हायला सुरुवात होते मग त्याचा ही अस्त होतो. आता उरलेल्या सावल्यांचा जगात सारे शरीरच फुलत्या कळ्यांचे रूप घेते. प्रेमाला स्पर्श हवाच पण अस्फुट, निसटता. आसक्ती हवी पण हव्यास नको.
क्षण टिपणे आणि ओरबाडून घेणे यात फरक आहे न?
चांदनी रात में इक बार तुझे देखा है.
खूद से इतरातें हुए, खूद से शरमाते हुए
चांदनी रात में इक बार तुझे देखा है..
Anything seems possible at night when the whole world has gone to sleep.
प्रेमाचा स्विकार सुद्धा. रात्रीच्या अंधारात स्वतःचा मनाचा आवाज ऐकणे सोपे जाते हे नक्की .
खुलके बिखरे जो महकते गेसू
घुले गयी जैसे हवा में खुशबू
मेरी हर सांस को महकाते हुए
सहज साधेपण तसे कठिण आहे नात्यात आणणे; पण तो खरे तर नात्याचा पाया आहे. हा सिनेमा मी पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमाच्या अनुषंगाने या गीताचे काय महत्व आहे मला माहित नाही. मला हे गीत खय्याम आणि जगजीत कौर यांच्या आयुष्याचे गीत वाटते.
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांत खय्याम यांची गणती होऊ लागल्या नंतर सुद्धा, मिळालेलं यश वापरून घेणे खय्याम यांनी केले नाही. एका वर्षाला एक सिनेमा हे धोरण ठेवल्याने असेल, त्यांनी दर्जाशी तडजोडी केल्या नाहीत. याचे श्रेय त्यांच्या पत्नीला, जगजीत कौर यांनाही द्यावे लागेल. पतीच्या या निर्णयाला त्यांनी साथ दिली. त्या स्वतः उत्तम गायिका असूनही, चित्रपटात काम मिळवण्यासाठी त्यांनी खय्याम यांच्या नावाचा उपयोग केला नाही. चित्रपट कमी असतील पण खय्याम यांचे सिनेसंगीताला दिलेले योगदान दर्जेदार आहे.
खय्याम यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना “उमराव जान” या सिनेमाला वगळता येत नाही. कलावंतीण आणि तिची गाणी यांना पाकिजाने प्रतिष्ठा दिली. मीना कुमारी आणि गुलाम मोहम्मद यांनी या सिनेमाला अमरत्व दिलें. त्याच्या नंतर उमराव जान बनवणे हे दिग्दर्शक, संगीतकार आणि नायिकेसाठी खरंच आव्हान होतें. रेखा, मुजफ्फर अली आणि खय्याम यांनी ते समर्थपणे पेलले. रेखाला सुद्धा मीना कुमारी प्रमाणेच आवाजाची देणगी आहे. उमरावचे दुःख, तिचा एकटेपणा, तिची हतबलता तिच्या आवाजाने जीवंत केली.
या सिनेमातले “दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये” हे गीत अत्यंत लोकप्रिय आहे, ज्यासाठी आशा भोसले यांना राष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केलं गेलं पण मला आवडणारे गीत आहे,
ये क्या जगह है दोस्तों (सिनेमा उमराव जान)
————————————————
चित्रपटाच्या शेवटचे हे गीत. जिथे तिचा जन्म झाला, जिथे तिचे बालपण गेलं आणि जिथून तिला पळवून नेले, आयुष्याच्या त्या टप्प्यावर नियतीने तिला परत आणलेले आहे. एकेकाळी या घराची ती लाडकी मुलगी होती, घराची शान, पित्याचा मान , आज ती त्या सर्वांच्या नजरेत परकी आहे. आपण कोण आहोत हे ती सांगूही शकत नाही. रोखलेल्या नजर तिला ती धमकी देत आहेत. तिच्या आईच्या नजरेत अश्रू आहेत पण जवळीक नाही.
आपली माणसे आजूबाजूला असूनही ओळख गमावल्याचा अहसास या गीतात आहे.
ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है
हद-ए-निगाह तक जहाँ, ग़ुबार ही ग़ुबार है
या अशा जागी मला नियतीने आणून सोडले आहे की आता यापुढे कुठे जायचे हेच मला समजत नाही. आयुष्यभर वाहिलेले दुःख आणि परिस्थितीबद्दल येणारा राग याने मनाचा ताबा असा घेतला आहे की मनाला कोणत्याही भावना स्पर्शू शकतील अशी संवेदनाच राहिली नाही. जिथे नजर जाईल तिथं रखरखीत वाळवंट दिसते आहे.
तमाम उम्र का हिसाब मांगती है ज़िन्दगी
ये मेरा दिल कहे तो क्या, ये खुद से शर्मसार है
एवढ्या वर्षाचा हिशोब करायचा तो नक्की कशात ! पैसे, कीर्ती , प्रेम आपण नक्की काय मिळवले आणि त्या साठी काय गमावले हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा अनेकदा जमेची बाजू रिकामी होत जाताना दिसते. आयुष्य जगताना जे मिळवायचे त्यासाठी बार्टर सहज करतो, आयुष्य संपताना त्याचा फोलपणा लक्षात येतो.
स्वतःच्या हिमतीवर , स्वतःच्या तत्वांवर जगणारी माणसे कमी असतात आणि अनेकांना नियतीचा तो पर्याय सुद्धा उघडा नसतो.
ही सगळी गाणी म्हणजे शब्द आणि सुरांचा संगम.
१९ ऑगस्ट २०१९ ची सकाळ उजाडली तीच त्यांच्या मृत्यूच्या बातमीने. त्यांचा मृत्यू धक्कादायक नव्हता. वय झाले होते आणि एक संपन्न , समृद्ध कारकीर्द यशस्वीरीत्या संपली होती. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर सुन्न वाटले. रेंगाळणारी उदासी, जी त्यांच्या गाण्यात दिसते तशीच.. एक पर्व अस्ताला गेले. मदनमोहन, एस डी बर्मन, अनिल विश्वास, सलील चौधरी..आणि त्या वेळचे अनेक, ज्यांच्यासाठी संगीत हा व्यवसाय नाही तर त्यांचा श्वास होता.जगण्याचे माध्यम नाही तर जगण्याचे कारण होते. त्या काळातील गीतांनी आमचे बालपण, तारुण्य समृद्ध केले . ही केवळ लिहिण्याची गोष्ट नाही. ते अर्थपूर्ण शब्द, अंतःकरणाला स्पर्श करून जाणाऱ्या गीतांनी जगण्याची जाण दिली. ते युग खय्यामजीं बरोबर अस्ताला गेले.
बरसता-भीगता मौसम धुआँ-धुआँ होगा
पिघलती शमों पे दिल का मेरे ग़ुमां होगा
हथेलियों की हिना, याद कुछ दिलायेगी
तुमची गीते सदैव स्मरणात राहतील . भावपूर्ण श्रद्धांजली खय्यामजी.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

प्रिया,
किती सुंदर लिहितेस..
त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत..
🩷🩷🩷🩷
Vidula, Thank you 🙂
मस्त लिहीलंय. खय्याम यांचा गुणवतेबद्दल शंकाच नाही. गुणी माणसाला पृथ्वीवर पाठवतांना, देव नशीबाचा वाटा थोडा कमी देत असावा.
चित्रपट संगीतात यमन, पहाडी रागाचा खूप उपयोग केला गेला आहे. आखरी खत, या चित्रपटातील, बहारों मेरा जीवन भी सवारों, हे गीत पहाडी रागातील. हुरहूर लावणारा, आठवणी जागवणारा, मात्र यांत कारूण्य कमी, असा भाव दाखवायचा, तर बहुदा पहाडी राग योजतात.
मला आखरी खत, हा चित्रपट म्हटला, की शाळेतील दिवस आठवतात.
Thank you Bhokarikar sir.
आखरी खत हा सिनेमा तास बोल्ड आणि खरा होता.
तो फारसा चालला नाही. खय्याम आणि मदन मोहन यांच्या वाट्याला हे का आले समजत नाही
.उत्तम कथा आणि अभिनय असूनही सिनेमा चालले नाही आणि त्याची शिक्षा या गुणिजनांना भोगावी लागली.
खय्याम यांचे एक विशेष म्हणजे ते व्यसनांच्या आहारी गेले नाहीत. अर्थात यातही त्यांच्या पत्नीचा वाटा असणार .
पहाडी राग , जयदेव यांनीही वापरला.
खूप छान लिहिलेय
Thank you Ajay ji.
अप्रतिम लेख👌👌 खय्याम सरांचा सांगीतिक प्रवास किती सुंदर शब्दबद्ध केलात!!
त्यांचे खाजगी आयुष्य सुद्धा गाण्यासारखेच निर्मळ .
Thank you Kamini.
खूप सुंदर लेख,या महान संगीतकारांची महत्ती या निवडक गाण्यांच्या रसग्रहणातून उत्तमरीत्या मनावर ठसते.काही छान वाचल्याचे समाधान हा लेख नक्कीच देतो.
Thank you so much Pramod ji.
खूप छान लिहिलंय! मनात अनेक आठवणींची एकच गर्दी झाली!
खरंय समीरजी . त्या काळातील गीतांनी आपले आयुष्य व्यापलय.