Skip to content

सिनेमातला पाऊस 

भाग ३ 

नायकाला आकर्षित करून घेण्यापासून ते नायिकेचे अंग तरंग  ठसठशीत दाखविण्यापर्यंत पावसाची पार्श्वभूमी उपयोगाला येते.
ढंगाचा गडगडाट, विजांचा कडकडाट, त्यातून नायिकेचे घाबरणे, नायकाला लपेटणे ( Pun intended ) ऐनवेळी निरोध नसल्याने आणि नायिका सुसंस्कारी असल्यामुळे कुटुंब नियोजनाकरिता गोळ्या असतात हे ही माहित नसल्याने जगाच्या लोकसंख्येत एकाची भर पडणे अशी अनेक वळणे त्या तीन तासाच्या प्रवासात शक्य होतात.
मेघगर्जना, विजा, वारा आणि पाऊस हा चौकोन माणसाला कामूक बनवतो.
काळेकुट्ट आकाश, जोराचा वारा, विजांचा लखलखाट पोटात गोळा आणतो . अनेक वेळा भीती शरीरात ऍड्रेनलीन  आणि डोपामाईन  हॉर्मोन्स उत्सर्जित करते. ही रसायने त्याला वास्तव विसरायला लावतात.  And these chemicals goad us to reach out for things that enable our survival. 
मनात भीती उत्पन्न करणारे सिनेमा कामोत्तेजीत करतात हे उगाच नाही म्हंटलेले. आठवा रामसे बंधूंचे सिनेमा .
पडकी हवेली, काळाकुट्ट अंधार, बाहेर मुसळधार पडणारा पाऊस, निर्मनुष्य आसमंत आणि त्या भयाण परिसरात रंगलेला रोमान्स .
दुसऱ्या माणसाचा आधारासाठी घेतलेला स्पर्श हा जवळीक वाढवतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना स्पर्श करतात, तेव्हा त्यांच्यात एक बंध  निर्माण होतो. काळजी घेतली नाही तर दोघांत तिसरा माणूस येण्याची ती सुरुवात असते ..
हिंदी सिनेमातील पावसाने अनेक प्रेमकथांनाही  एक वेगळेच वळण दिलेले आहे . त्यातलाच एक आहे, “आराधना”
——————————————————————————————————–
दोन प्रेमी, धुंवाधार पाऊस, फक्त त्या दोघांसाठीच असलेला आसरा; तो नंतर हव्या हव्याश्या एकांतामध्ये बदलला जातो . एअर फोर्स पायलट अरुण वर्मा(राजेश खन्ना) आणि वंदना(शर्मिला टागोर)प्रेमात डुबलेले दोन जीव . हातात हात घेऊन गाणे म्हणत स्वप्ने पाहण्याचा हा काळ .

पुढील आयुष्याची मधुर स्वप्ने डोळ्यात साठवत फिरत असलेले ते दोघे वादळात फसतात. बाहेर कडकडणाऱ्या वीजा, गडगडणारे ढग, कोसळणारा पाऊस आणि आत प्रणयाला आलेले उधाण . 
व पू म्हणतात ” एक क्षण भाळण्याचा बाकी सावरण्याचे ” पण या भाळलेल्या क्षणाची किंमत चुकवताना आयुष्य खर्ची पडते . पावसाळी रात्र, वातावरणातला गारवा, पेटलेली शेकोटी आणि तापलेली शरीरे मात्र वंदनाच्या आयुष्याच्या होळीला हा पाऊसच जबाबदार असतो .
पुढे येणाऱ्या अतर्क्याची ती सुरुवात असते.

दोन प्रेमी, निर्मनुष्य आसमंत आणि पाऊस.
मनावर ताबा नसेल तर सर्वनाशाची नांदी ठरते. 
सिनेमा धूल का फूल.
————————–
मीना(माला सिन्हा) आणि महेश( राजेंद्र कुमार) हे एका कॉलेजात शिकत आहेत. सुरुवातीची वैर प्रेमात बदलते. मग हातात हात गुंफले जातात, पाय थिरकतात आणि पावसाला सुरुवात होतें. पाऊस जाणून असतो ह्यांचा काय इरादा आहे ते. बिचारा त्यांनी घरी जावे म्हणून धो धो पडतो तर हे एका निर्मनुष्य झोपडीवजा घराचा आश्रय घेतात. पाणी आग विझवते, तारुण्याची आग मात्र अपवाद ठरते.

बाहेरील वादळ, जग उद्ध्वस्त करत असताना, ह्यांच्या हातून सुद्धा तीच  ती चूक होते आणि लोकसंख्येत एकाची भर पडण्याची तयारी होते.स्वप्ने उध्वस्त करणारा हा पाऊस “अमर”  या चित्रपटात सुद्धा आहे . 
————————————————————-
यात सुद्धा वादळी, पावसाने भिजलेली रात्र आहे पण ती प्रणयाची नाही. ती विश्वासघाताची रात्र आहे. गावातील गुंडापासून स्वतःच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी सोनिया, गावातील एक साधीसुधी मुलगी (निम्मी) एका सुशिक्षित,  सुसंस्कृत वकील अमरनाथाच्या (दिलीप कुमार) घरात आश्रय घेते .. त्याचे लग्न एक सुंदर, शिकलेल्या, श्रीमंत कुटुंबातील मुलीशी (मधुबाला) ठरलेले आहे. 
बाहेर कोसळणारा पाऊस, मनातील सैतान जागा करतो. ज्या कारणासाठी सोनिया या घरात आश्रय घेते, त्याच गोष्टीला ती बळी पडते. चांगल्या, भल्या माणसाची सारासार बुद्धी नष्ट करण्याएवढा हा पाऊस बेईमान ठरतो . 
नायकाने प्रेमात नाही तर वासनेत तोल सोडण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल हिंदी सिनेमाच्या इतिहासात. 
वडिलांच्या आजारपणाची बातमी आल्याने नायक खचलेला आहे. बाहेर तुफान कोसळणारा पाऊस अस्वस्थता वाढवणारा . त्याच वेळी सोनिया (निम्मी ) त्याच्या घरात येते ..

तिच्या विषयी एक अनामिक आकर्षण आहेच. लग्न ठरलेले असूनही या खेडवळ मुलीविषयी अशा भावना आहेत म्हणून आधीच अपराधीपणाची भावना सुद्धा आहे पण क्षणिक मोहापासून त्याला सावरता येत नाही.
सुसंकृत माणसाचे अधःपतन पावसाच्या  साक्षीने घडते आणि प्रेक्षक अवाक होतो ..

आराधनातील जोडप्यात प्रेम आहेच, त्यांचे पावसाच्या साक्षीने एकत्र येणे हा प्रेमाचा एक अपरिहार्य असा पुढचा भाग आहे.
अमर या चित्रपटात नायकाला या मुलीबद्दल आकर्षण आहे तर त्या मुलीला त्याच्याबद्दल आदर. त्यातून मात्र जे घडते तो बलात्कार आहे.
धूल का फूल यातील नायक आणि नायिका, वास्तवात दिसणाऱ्या भूमिका आहेत. जगात अनाथ आश्रमातील असंख्य मुलांच्या ज्या कथा आहेत त्याचेच प्रतिबिंब या सिनेमात आहे.
मुलगी गरोदर राहते. मुलगा जबाबदारी नाकारतो. स्वतःला योग्य ठरेल अशा मुलीशी लग्न करून आपले जग वसवतो. आपल्याला आधीच्या संबंधातून मूल आहे हे समजताच, त्याचे पितृत्व नाकारतो.
सर्व बाजूनी कोंडीत सापडलेली नायिका मुलाचा त्याग करते. पावसाच्या साक्षीने जगाची ही क्रूर बाजू हा सिनेमा उघडी करतो.
या सर्वच चित्रपटांचे शेवट खऱ्या अर्थाने अपूर्ण आहेत किंवा दुःखांत आहेत.
वासना ही पूर्णतः नैसर्गिक प्रेरणा आहे तरीही माणसाच्या जगात त्याचा अंत नाशाकडेच जाणारा आहे. वासनेला जबाबदारीच्या कोंदणात बांधणे ही फक्त माणसाला मिळालेली देणगी आहे ..त्यालाच प्रेम म्हणायचे का?
Lust with responsibility हा प्रश्न मला अशी दृश्ये पाहताना पडतो.

हिंदी सिनेमातला पाऊस हा पाय घसरवतो तर पाश्चात्य  सिनेमातील पावसाची दृश्ये भानावर येण्यास कारणीभूत ठरतात.
“द ब्रीफ एन्काऊंटर” हा सिनेमा विवाहबाह्य संबंधावर आधारित आहे.
——————————————————————–
दोन विवाहित व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात हा विषयच गुंतागुंतीचा. त्याचा  शेवट ही गुंता वाढवणारा मग निर्णय कोणताही असो आणि कुणाच्याही बाजूने दिलेला असो.
व्यभिचार आणि प्रेम यातली रेषाही खूप पुसट असते. मनाने दिलेला कौल खरा का समाजाने मान्य केलेले  नाते? हा प्रश्न सुद्धा विवाद्य. अनेकवेळा तर जे घडते ते सुद्धा मुद्दाम  घडवलेले नसते. दोन अनोळखी जीव एकत्र येतात आणि कोणत्यातरी बाधित क्षणाला एकमेकांकडे आकर्षित होतात. अनेक वेळा हे आकर्षण, विवेकी मनाच्या , बुद्धीच्या   मर्यादा ओलांडून प्रेमाच्या निसरड्या वाटेवर प्रवास करायला लागते आणि मग सुरु होतो तो स्वतःच्या मनाशी झगडा.

सिनेमाची नायिका आहे लॉरा,(सिलिया जॉन्सन )  एक गृहिणी. दोन मुले, नवरा आणि ती असे चौकोनी सुखी कुटुंब. नवरा सज्जन पण त्याला कसलीच आवड नाही. कामावरुन घरी  आल्यावर क्रॉसवर्ड सोडवणे हा त्याचा विरंगुळा. आठवड्यातून एक दिवस उपनगरातून शहराच्या मुख्य भागात शॉपिंग साठी बाहेर पडणे ही लॉरासाठी बाहेरचे जग पाहायची एक संधी आहे.  रेल्वेस्टेशनवरील कॅफेत कॉफी पिणे, एखादा सिनेमा पाहणे, लायब्ररीतून पुस्तक आणणे, थोडे  शॉपिंग आणि परत ट्रेन पकडून घरी. अशाच एका गुरुवारी तिची ओळख डॉ ऍलेकशी होते. आधी मैत्री आणि मग त्याचे प्रेमात रूपांतर होते.
आठवड्याचा हा एक दिवस ते एकत्र घालवतात आणि संध्याकाळी आपल्या घरी परत जातात.
अशाच एका गुरुवारी ऍलेकची ट्रेन चुकते. त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर जाऊया का ? तो लॉराला सुचवतो.
“ No , I have to go “ त्याचा हात सोडून ती प्लॅटफॉर्मकडे धावत सुटते. तिचे घर , तिचा नवरा , तिची मुले आणि एका बाजूला ऍलेक , तिचे सर्वस्व.
गाडी येते ती चढते सुद्धा पण आकर्षणाच्या खोलीचा अंदाज येत नाही. ज्या वेगाने ती ट्रेन मध्ये चढते, त्याच वेगाने उतरून, ती ऍलेक कडे धावत सुटते. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो.
फ्लॅटच्या एकांतात हे दोघेच. त्याचा निर्णय झाला आहे. जर मने एकत्र आली असतील तर शरीराला तरी बंधनात कशाला ठेवायचे ? तिच्या मनाची तयारी ती करते न करते तोच … बेल वाजण्याचा आवाज आणि त्याच वेळी किल्लीने दार उघडल्याचा आवाज येतो.

आपण काय करत आहोत त्याचे भान, शरम, अपराधीपणा  या सगळ्याचे ओझे असह्य होऊन ती मागच्या दाराने बाहेर पडते आणि भर पावसात, धावत,  रात्रीच्या अंधारात नाहीशी होते.
पावसाच्या धारा तिच्या बाह्य शरीराला स्पर्श करत असतात. शरीर भानावर येत असते आणि मन मात्र कायमचे विझून जाते.
उचललेले पाऊल थांबवणारा पाऊस “द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी” या सिनेमात सुद्धा आहे.
—————————————————————————————–
ही कथा आहे एका फोटोग्राफर आणि एका गृहिणीची.
१९६५ मध्ये नॅशनल जीओग्राफिक मॅगझीनचा फोटोग्राफर या भागात फोटो काढण्यासाठी येतो आणि त्याची फ्रान्सेस्काशी ओळख होते. ही एक मध्यमवयीन गृहिणी आहे. मोठी मुले आहेत. नवरा प्रेमळ आहे. संसारात सुखी असणे हा अनेकदा आभास असतो कारण सुख म्हणजे काय हे ही माहित नसते. अचानक कुणीतरी आयुष्यात येते, मने जुळतात आणि संसारात असणे म्हणजे सुखी असणे असे नाही याचा अर्थ कोणत्यातरी क्षणाला समजतो. ओढ ह्या शब्दाचा अचूक अर्थ सांगणारे माणूस आयुष्यात आले की मन आणि शरीराची ओढाताण चालू होते.
शरीराला बंधने असतात, जबाबदाऱ्या असतात, मन मात्र बेबंद उधळते.
चार दिवस कापरासारखे उडून जातात आणि वास्तवाची जाणीव होते.
हा बदल नैसर्गिक आहे आणि योग्यही . तुझ्या घरच्यांना सुद्धा आधी दुःख होईल पण नंतर सावरतील ते. जे काही आपल्यात आहे ते फार अमूल्य आहे. ते आपण गमावायचे का ? त्याचा प्रश्न ..
“ तू मला घेऊन जायचे ठरवलेस तर मी तुला अडवू शकणार नाही. माझ्यात तुला नाही म्हणायची ताकद नाही. पण जी मी आहे ती तशी राहणार नाही . अपराधीपणाच्या भावनेने मी कोलमडून जाईन. प्रत्येक क्षण आनंदात घालवताना , मी कुणावर तरी अन्याय केलेला आहे ही जाणीव मला तो आनंद उपभोगायला देणार नाही. जे तू चार दिवसात दिलेस , ते मला रिचर्ड कधीच देऊ शकणार नाही. त्याची ती क्षमता नाही पण तो चांगला माणूस आहे. प्रेमळ नवरा , चांगला बाप . त्याची थी थू होईल .. लोक बोलतील , तो दुभंगून जाईल या प्रतारणेमुळे . माझी मुलगी , जी आता सोळा वर्षाची आहे , ती कुणाच्यातरी प्रेमात पडेल , संसाराची स्वप्ने पाहिलं …तिला काय वाटेल!

चित्रपटाचा शेवटचा सीन हा भानावर आल्यानंतरचा सीन आहे.

चार दिवस बाहेर गेलेले तिचे कुटुंबीय परत आले आहेत. रॉबर्ट बरोबर न जाण्याची तिची कारणे आहेत आणि ती तिने मान्यही केली आहेत.
नवऱ्याबरोबर सामान आणण्यासाठी बाहेर पडलेले असताना तिला रॉबर्ट दिसतो. बाहेर धुंवाधार पाऊस आहे. त्यात गाडीला रेलून तिच्याकडे बघत असलेला रॉबर्ट. तिच्याशी बोलावे का , त्याच्या चेहेऱ्यावर तिला स्पष्ट दिसते. तो एक पाऊल पुढे येतोही, पण जो निर्णय घायचा आहे तो तिलाच घ्यायचा आहे हे त्याला माहित आहे. काहीही न बोलता तो तिच्याकडे टक लावून बघत बसतो. डोळ्यातले अश्रू लपवून ती त्याच्याकडे बघून स्मित हास्य करते. एकही शब्द न बोलता तिचा निर्णय जाणून तो मागे वळतो. त्याच्या चेहेऱ्यावर काय नसते ! विलक्षण ओढ, याचना, प्रेम आणि काहीतरी अमूल्य असे गमावण्याची वेदना.
This is the silent goodbye I have ever seen.

12 thoughts on “सिनेमातला पाऊस ”

  1. प्रिया,

    सिनेमातला पाऊस ही मालिका च भन्नाट आहे.

    हिंदी सिनेमे सगळे बघितले आहेत.
    तुझ्यामुळे “द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी”
    हा सुध्दा तुझ्यामुळे बघितला होता.
    सगळे चित्रपट परत बघितल्या सारखं वाटलं.
    ❤️❤️

  2. उदय शेवडे

    अतिशय छान आढावा आणि नाजूक विषय असून संयत मांडणी.

  3. बाहेर पाऊस सुरू आहे आणि मी हे वाचते आहे…
    पावसाचा आवाज आणि तुम्ही लिहिलेले वाक्ये, सिनेमातील संवाद असे दोन्हीही अनुभवते आहे.

    खूप छान खरच खूप छान❤️❤️
    पाऊस भन्नाट आहे….रडवतो, हसवतो, आठवणीत रमवतो, रोमँटिक मूड बनवतो👍

    1. Veena ,
      हे सर्व सिनेमा सुद्धा अतिशय सुंदर आहेत ..अजिबात चुकवू नये असे.

  4. नेहमी प्रमाणे छान लिहलंय. प्रेम, आकर्षण, मानवी मनाची घालमेल व नात्यांची गुंतागुंत, त्यातून trigger करणारा पाऊस.. पाऊस जसा अचानक येतो,वातावरण बदलून टाकतो, तस जीवनही.
    आशयपूर्ण सिनेमे जीवनाचे प्रतिबिंबच.. छान बैलेन्स करणारा लेख.

    1. Rajeshji, Thank you.
      खरे आहे .
      आकर्षण आणि प्रेमात एक महत्वाचा फरक आहे ..प्रेम जबाबदारी घेते
      नाहीतर राहतो तो फक्त उन्माद

  5. अतिशय छान लिहिलं आहे.
    पाऊस धारेत … माणसाच्या अंतरंगाच्या अनेकविध छटा !!

  6. सज्जन माणसाची नियत खराब करणारा असाच अजुन एक प्रसंग आहे, “कुदरत” चित्रपटात. !
    मात्र याचा अंत होतो तो एका खुनात जो कधीच उघडकीस येत नाही!

Leave a Reply to Milind Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *