समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले की मला मृत व्यक्ती दिसतात, त्या माझ्याशी बोलतात, माझ्या आजूबाजूला वावरतात, तर तुमची काय प्रतिक्रिया होईल ?
भुतांवर विश्वास नसेल तर तुम्ही त्याला वेडा ठरवून मोकळे व्हाल पण जर असेल तर!
सरसरून काटा येईल ना?
अपर्णा सेन दिग्दर्शित गोयनार बक्शो ( Goynar Baksho), The Jewelry Box ह्या सिनेमात जेव्हा नववधू सोमलता, (कोकणा सेन) आपल्या मृत आते सासू बाईला, राशोमणीला (मौशमी चॅटर्जी) पहाते तेव्हा पूर्ण प्रेक्षगृह हास्याने भरून जाते.
हे भूत आहे अतृप्त. अर्थात जर माणूस समाधानी असेल तर कशाला भूत होऊन परत येईल, नाही का?
तर हे भूत, इथे ती, मिस्कील, चिडखोर, भांडखोर आणि प्रेमळ सुद्धा आहे. खूप रडणारी, तक्रार करणारी अशी ही भूतनी नाही पण ज्या समाजाने त्रास दिला किंवा ज्या रूढी आणि परंपरेमुळे तिचे आयुष्य निरस झाले त्या समाजाच्या नावाने शंख करायला तिची जीभ अजिबात कचरत नाही. तिला सुक्या माशांचा वास प्रिय आहे. कधीही पुरुष सहवास न मिळाल्याने, सेक्स कसा असतो याची तिला त्या जगात सुद्धा उत्सुकता आहे. जर नवरा सुख देत नसेल, किंवा दुसऱ्या बायकांशी सूत जुळवत असेल तर त्याच्या बायकोने सुद्धा परपुरुषांशी संबंध जुळवण्यात काहीही हरकत नाही असे समजणारे हे भूत, तिच्या परीने न्याय्य आहे. मरूनही जगण्यावर भरभरून प्रेम करणारे हे भूत आहे आणि म्हणून ते लोभसही आहे.
“गोयनार बक्शो”ही तीन पिढ्यांची गोष्ट आहे. स्वातंत्र्य पूर्व काळ, स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचा काळ ते स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या पुढील पिढीचा काळ असा जवळजवळ नव्वद एक वर्षाचा कालखंड या कथेत आला आहे.
कथेत एक भूत आहे, थोडेसे तोतरे बोलणारी, घाबरट, लाजाळू पण वेळ आल्यावर, यशस्वी उद्योग सुरु करणारी गृहिणी आहे, तिचा बावळट नवरा आहे, ऐय्याशीत दिवस घालवणारे तिचे सासरे आणि दीर आहेत, एक सुरु न होताच संपणारी प्रेमकहाणी आणि नुकतीच सुरु झालेली प्रेमकहाणी आहे.
शिवाय मध्ये मध्ये डोकावणारी क्रांतीसुद्धा आहे.
एवढा गुंतागुंतीचा प्लॉट असूनही पटकथा बांधीव आहे. सिनेमाची ही मोठी जमेची बाजू आहे.
तिसऱ्या पिढीतील चैताली कथेला सुरुवात करते. कथा आहे तिच्या आईची, सोमलता आणि आते आजीची, राशोमणीची.
अकरा वर्षाच्या राशोमणीचे एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात लग्न होते. नवरा वयाने मोठा पण त्याकाळी मुलीची पसंती हा प्रश्नच नव्हता. वयात येईपर्यंत मुली माहेरी राहत. राशोमणी सुद्धा माहेरी होती. माहेरही गडगंज. राशोमणीच्या अंगावर पाच किलो सोने घातले जाते. सर्वात धाकटी आणि एकटीच मुलगी म्हणून लाडाकोडात वाढलेली राशोमणी अत्यंत गर्विष्ठ, हट्टी होती. 
सौन्दर्याचा गर्व आणि दागिन्यांचा मोह असलेली ही मुलगी बाराव्या वर्षीच विधवा होते. माहेरी असली, लाडाची असली तरी परंपरा पाळणारे हे घर. तिचे लांबसडक केस कापून टाकतात. अंगावर पांढरे वस्त्र येते, दागिने उतरवले जातात, मसाला आणि स्वाद नसलेले अन्न दिले जाते. एका खोलीत तिची रवानगी होते पण लाडाकोडाच्या बहिणीची सत्ता मात्र अबाधित असते. तिच्या ताब्यात असलेल्या स्त्री धनाला ती जीवापाड जपते. कुणीही नसते तेव्हा दागिने चढवून केस नसलेले आपले रूप सतत न्हाहाळत बसते. अनेक गोष्टींच्या अभावाने आलेला कडवटपणा बोलण्यात उतरतो.
करवतीसारख्या तिच्या भाषेला सर्व जण घाबरून असतात.
वर्षे उलटतात, फाळणी होते, घर दार सर्व टाकून हे कुटुंब पूर्व बंगाल सोडून, भारतातील बंगाल मध्ये स्थायिक होते.
तरुण राशोमणी काहीही सुख न भोगता, वृद्ध होते. घराची पिशीमा होते .
जमीनदारांचे वैभव जाते पण सवयी राहतात. खोटा अहंकार, प्रतिष्ठा अंगात मुरल्यामुळे घराचे पुरुष काहीही कामधंदा न करता असलेल्या वस्तू विकून, गुजारा करण्यात मग्न असतात. लग्न थाटाने करायचे पण त्यासाठी घरातील पलंग विकला जातो, झुंबर काढले जाते पण प्रतिष्ठा मात्र प्राणपणाने जपली जाते. दोन भावांच्यात हवेलीसाठी भांडण सुरु आहे. कोर्टात केस आहे पण दोन्ही भाऊ खर्च वाचवण्यासाठी एकाच टांग्यातून कोर्टात जातात आणि परत येतात. कोर्टात दुश्मनी पण गॉसिप मात्र एकत्र करायला त्यांची ना नाही.
अशा परिस्थितीत त्या घरातील सर्वात धाकट्या मुलाचे लग्न होते आणि अत्यंत गरीब कुटुंबातील सोमलता ( कोकणा सेन) आपल्या सोन पावलांनी या घरात प्रवेश करते. 
तिच्या लग्नांनंतर काही दिवसातच राशोमणीचे निधन होते. शरीर जाते पण वासना उरते. आपल्यानंतर आपले दागिने पैशासाठी आसुसलेल्या, कर्जात बुडलेल्या आपल्या कुटुंबियांच्या हातात जाऊ नये ही राशोमणीची इच्छा असते. मृत्यूनंतर तिला त्या स्थितीत पाहणारी पहिली सोमलता असते. त्यामुळे ती सोमलताला वेठीस धरते. चक्क मानगुटीवर बसून, सोमलताच्या खोलीत तिची दागिन्यांची पेटी लपवायला सांगते.
“ खबरदार पण माझ्या एकाही दागिन्याला हात लावलास तर! तुझ्या नवऱ्याची मान मुरगळून मी त्याचे रक्त पिऊन टाकेन, मग तू सुद्धा विधवा होशील आणि दागिन्यांची हौस तिथेच संपेल “ असे बजावायला विसरत नाही.
सोमलता गरीब असते, भित्री असते. गरिबीमुळे बुजरी असते पण प्रामाणिक असते.
दागिन्यांच्या लोभामुळे का असेना, पिशीमा आणि सोमलता यांच्या भेटी होतात.
पिशीमा, कडवट, काहीशी दुष्ट, मत्सरी का झाली याचे उत्तर सोमलताला समजते. अत्यंत हौशी असणारी ही मुलगी जेमतेम बारा वर्षाच्या आत सर्व सुखाला मुकते. तारुण्य येते, मनाला त्याची जाणीव होते, शरीर स्पर्शाला आसुसते आणि तसेच सुकून जाते. पूर्वी चांगलें मसालेदार चाखलेली रसना, खमंग पदार्थांना आसुसते पण तिच्या नशिबी ते सुख नसते.
भावांचा फुलणारा संसार, त्यांचा शृंगार, वात्सल्यात रमलेल्या त्यांच्या बायका, चवदार पदार्थ शिजवणाऱ्या गृहिणी, त्यांचा आस्वाद घेणारे घर हे सर्व लांबून पाहणारी पिशीमा मात्र भुकेलीच असते.
आधी नवरा मेला, मग सरकारने जमिनी घेतल्या, देश सुटला, सगळ्यांनीच फसवले असे वाटणारी पिशीमा कडवट झाली तर त्यात नवल ते काय!
“ तू नवऱ्याबरोबर एकांतात काय करतेस ? “ हा प्रश्न विचारल्यावर सोमलता लाजते.
पिशीमा चिडते .
ते चिडणे सोमलतावर नसते. स्वतःच्या असहाय्यतेवर, स्वतःच्या अज्ञानावर आणि तिला असे अतृप्त ठेवणाऱ्या समाजावर असते.
“ नवरा जिवंत राहिला असता तर तू काय केलं असते ?” यावर ती उत्तर देते, “ माझ्या पदराला बांधून ठेवले असते. त्याच्यासाठी जेवण बनवले असते, त्याची सेवा केली असती”
नेहेमीच्या चिडक्या चेहेऱ्यावर आता स्वप्नाळू भाव असतात.
सोमलता तिला जाणून घेण्याच प्रयत्न करते. तिची सच्चाई पिशीमाला समजल्याने त्यांच्यात एक विश्वासाचा बंध निर्माण होतो . पिशीमाचे दागिने गहाण ठेवून सोमलता आपल्या नवऱ्याला साडीचा व्यवसाय करायला भाग पाडते. पहिल्यांदाच कुणीतरी या घरात काम करण्यासाठी बाहेर पडते. साडीचा धंदा यशस्वी चालवून ती पिशीमाचे दागिने सोडवून आणते. तिचा विश्वास मिळवते.
पिशीमा तिला सल्ला देते. तिच्यातील आत्मविश्वास जागृत करते. तिच्यासाठी पिशीमा लाईफ कोचची भूमिका घेते.
दागिन्यांची पेटी हे एका बालविधवेच्या अतृप्त आकांक्षांचे प्रतीक आहे. शरीर आहे पण त्याचा भोग घेता येत नाही तसेच ते दागिने. जवळ आहेत पण ते घालून मिरवणे तिच्या नशिबी नाही.
हे कुणाचे नियम आहेत ? कुणाच्या साठी बनवले आहेत?
“ हे सर्व हरामखोर आहेत. पूर्ण आयुष्य मजेत घालवतात. त्यांना कसलेली नियम नाहीत, बंधने नाहीत, मला मात्र त्यांनी या दागिन्यांच्या पेटीशी जखडून ठेवले , ज्यांच्या मोहाने मी या घराशी बांधली गेले.
हातात मात्र काहीही सुख आले नाही. सारे आयुष्य आभासात गेले “ पिशीमा घरातील पुरुषांबद्दल आणि एकूणच पुरुषांच्या मानसिकतेबद्दल कडवटपणाने बोलते.
धन वाहते असायला हवे आणि वाढायला हवे, तरच विकास होतो. पिशीमा दागिन्यांच्या मोहात अडकते पण सोमलता त्याचा उपयोग करून धंदा वाढवते. हुशारीने नवऱ्याला व्यवसायात गुंतवते, प्रसंगी स्वतः दुकानात बसून , रागावलेल्या गिर्हाईकांना परत जोडून घेते. घराचे नशीब बदलते. गहाण ठेवलेल्या वस्तू परत येतात, हवेलीला पूर्वीचे वैभव मिळते.
सोमलता एका सुंदर मुलीला जन्म देते.
कुणीतरी म्हणते, “ पिशीमाचे रूप आहे हे “
दुकानाला राशोमणीचे नाव दिलेले असते तेव्हाच पिशीमा खूप भारावून जाते.
“माझे नाव, एका विधवेचे नाव, जे कुणी उच्चारत सुद्धा नाही. ते तू ठेवलेस ?”
आता तर तिच्याच रूपाची मुलगी या घरात येते आणि पिशीमा अदृश्य होते.
अहं , घरासाठी अदृश्य होते पण आता लहान चैताली आणि पिशीमा मध्ये एक नवीन नाते निर्माण होते.
चैताली लाडाकोडात मोठी होते. तरुण होते. कॉलेजमध्ये जायला लागते. हा काळ असतो १९७१चा.
बांगलादेशात क्रांतीचे वारे वाहू लागतात. हजारो निर्वासीत भारतात आश्रय घेतात.
सोमलताला खात्री असते की चैतालीच्या रूपाने राशोमणीने जन्म घेतला आहे. तिच्या वाढदिवसाला, दागिन्यांची पेटी ती चैतालीला देते.
मात्र ही पिढी वेगळी असते. त्याच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात. तिचे कॉलेज, तिचे मित्र मैत्रिणी, बदलणारे जग, येथील अन्याय दूर करण्याची तळमळ, तिच्या आवडीच्या विषयात दागिने येतच नाहीत. तिचे एका मुलावर प्रेम आहे जो बांगलादेश मुक्ती वाहिनी साठी काम करणारा पत्रकार आहे.
ह्या मुलीचे आणि पिशीमाचे मित्रत्वाचे नाते आहे. तिच्या सर्व गोष्टी पिशीमा जाणून आहे. या नवीन पिढीच्या मुलांचे तिला कौतुक आहे कारण साऱ्या जगाकडे समानतेच्या नात्याने बघण्याची त्यांची नजर आहे.
सिनेमाच्या शेवटी ही दागिन्यांची पेटी क्रांतिकारकांच्या साठी वापरली जाते. त्यांची औषधे , लढा देण्यासाठी लागणारी शस्त्रे यासाठी ह्यातून पैसे उभे केले जातात आणि राशोमणी मुक्त होते.
ही एका कुटुंबाची गोष्ट आहे पण त्यातूनच अपर्णा सेन इतिहासाचे दर्शन घडवते.
स्वातंत्र्य पूर्व काळातील फाळणीचा दुःखद प्रसंग. माणसे हरवतात, जमिनी जातात, वारसाहक्क जातो, वैभव जाते. जात नाही तो अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना.
या सिनेमातील पुरुष कशाच्या कामाचे नाहीत. आला दिवस घालवणे, मग ते निरर्थक गॉसिप असो किंवा मासे पकडणे.
त्यांना महत्वाकांक्षा नाही, घरातील सामान विकायला काढल्यावर सोमलताचा नवरा आत्महत्या करायला जातो पण तेही त्याला जमत नाही, त्याच्यात तो दमच नाही. कलावंतीण त्याच्या दुकानात येऊन, पैसे न देताच महागड्या साड्या घेऊन जाते पण तिला थांबवणे त्याला शक्य होत नाही.
या सिनेमातील स्त्रिया खऱ्या अर्थाने सिनेमाच्या नायकाची भूमिका बजावतात. वैधव्याने लहान वयात वैधव्य येऊनही पिशीमा खचत नाही. ती द्वेषी होते. तिखट जीभ आणि दागिने, हत्यार म्हणून वापरून, स्वतःला सुरक्षित ठेवते. या घरात स्वतःचा आब राखते. तिची कीव कुणी करण्याचा प्रश्नच नसतो, उलट घरातील लोक तिला दबून असतात एवढी ती खंबीर असते.
विक्षिप्त पण चलाख म्हातारीचे पात्र बंगाली सिनेमाला नवीन नाही. शुभो मोहरत मध्ये राखी गुलजारने अशाच एका पिशीमाला जिवंत केले आहे. अपर्णा सेनची पिशीमा मात्र विक्षिप्त आणि चलाख या बरोबर फार हिंस्त्र आहे. अतृप्त असल्याने तिच्या वासना जागरूक आहेत. तिच्या बोलण्यात शिव्या आहेत. ती शाप देते, अनेकदा समाजमनाला पटणार नाही असे सल्ला देते, हुक्का ओढते, तिला मांसाहार आवडतो. कामानिमित्त महिनों महिने सोमलताचा नवरा बाहेर असतो.
“ तू तुझे तारुण्य का जाळतेस? एकदा वय गेले तर पश्चातापाशिवाय काहीही राहत नाही “ पिशीमाचा हा उपदेश अर्थात सोमलता धुडकावून लावते.
एका तरुणाला सोमलता आवडते. तो आपल्या भावना तिला सांगू शकत नाही पण त्याचे तिच्यावर प्रेम आहे. ती त्याची प्रेरणा आहे. सगळीकडे नजर ठेवून असलेल्या पिशीमाला हे माहित आहे.
” पाप पुण्य असे जगात काहीही नसते. मला विचार, आता तर मी मेले आहे त्यामुळे तुला निश्चित सांगू शकते “असेही ती बजावते.
सोमलताला जे वैवाहिक सुख मिळते, त्या बद्दल तिला मत्सर आहे पण तरीही या मुलीच्या चांगुलपणावर तिचे प्रेम आहे.
“ सासऱ्यांनी तुला व्यवसाय करते म्हणून घराबाहेर काढायचे ठरवले तर त्यांच्या समोर सांग, मला चमेली माहित आहे. मग ते गप्प बसतील”
चमेली ही तिच्या सासऱ्यांची आवडती कलावंतीण आहे. तिच्यावर त्यांनी पैसे, दागिने उधळले आहेत. घर दार विकून तिचे हट्ट पुरवले आहेत. पुरुषांनी सर्व मजा करायची आणि नियम फक्त बायकांच्या वाट्याला?
पिशीमा ही चुकीच्या समाज नियमांवर बोट ठेवण्याएवढी सुज्ञ आहे, निडर आहे. पिशीमा, सैल चारित्र्य असूनही, लोकांच्या मनात घर करून बसते कारण तिचे दुर्दैवी आयुष्य आणि मौशमी चॅटर्जीचा अभिनय.
शांत सोमलताला दागिन्यांचा सोस नाही. दागिन्यांचा वापर करून ती हुशारीने व्यवसाय वाढवते. घराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देते. तिच्यासाठी ते दागिने केवळ तिची सुरक्षा करत नाहीत तर घराला स्थैर्य देतात. पिशीमाचा हात धरून ती दुनियादारी शिकते. नवऱ्याला कामाला लावते. घराचे वैभव आणते, तरीही तिला गर्व नाही. ती आदर्श सून आहे.
एका प्रसंगात, तिचा दीर दुकानात आलेल्या गिर्हाईकाला फसवतो. त्याचा अपमान करतो. अशावेळी दीराला सांभाळून घेऊन, ती त्या गिऱ्हाईकाची स्वतः माफी मागते आणि त्यांचा विश्वास जोडते.
नवरा, नुसता नवरा असून चालत नाही. रसिकता लागते, सहवास लागतो. एका कातर क्षणी, कुणा दुसऱ्याबद्दल तिच्या मनात विचार येतात खरे, पण त्याच क्षणी ती स्वतःला सावरते. घराकडे परत वळते.
कोकणा सेनची सोमलता अत्यंत लाघवी व्यक्तिमत्व आहे.
सास्वता चॅटर्जी (सोमलताचा नवरा), श्रबंती चॅटर्जी (चैताली), परन बंडोपाध्याय(सासरे) ह्या सर्वांच्याच भूमिका सुंदर आहेत.
सिनेमाची चित्रीकरण देखणं आहे. बंगालचे सृष्टीसोंदर्य, गावात पन्नास वर्षात झालेला बदल एवढा छान टिपला आहे. तसेच संगीत. शुभा मुद्गल यांचे सखी री तर अत्यंत श्रवणीय.
न आवडलेल्या गोष्टी.
गरज नसताना, एका मुस्लिम कवीचे हिंदू सोमलताच्या प्रेमात पडणे. प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी घुसडणे हा अजेंडा होतो मग. कुठेही अशी घटना नाही की सोमलताकडे हा माणूस आकृष्ठ व्हावा. त्यात तिचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. वरवर पाहता, सामान्य असलेल्या स्त्रीची अशी काय ओळख ह्या माणसाला की तो तिच्यासाठी झुरत मरावा? सिनेमात हे पात्र नसते तरी फार फरक पडला नसता.
हा एक मोठा drawback. सुदैवाने त्यात फार रिळे फुकट घालवली नाहीत.
बंगाली स्त्रीची स्वातंत्र्याकडे, सक्षमीकरणाकडे होणारी वाटचाल हा विषयच अत्यंत महत्वाचा आहे. पिशीमाला जाणीव असते की तिच्यावर लादलेली बंधने चुकीची आहेत आणि सोमलता ती तोडून स्वतःला आणि पर्यायाने घराला दारिद्र्यातून मुक्त करते.
पाहायलाच हवा असा सिनेमा
Prime/ hoichoi वर पाहता येईल.

फारच अप्रतिम लिहिलेय.वाचत राहावेसे वाटते. किती गुंतागुंतीची स्टोरी तुम्ही छान मांडलीत. 👍
Thank you Ajayji,
बघणार सिनेमा. तू लिहिलंच आहेस असं की भाग आहे बघणं. पिशीमांची घालमेल इतकी बारीक टिपलीयस की क्या बात असंच म्हणावं लागेल. 👌👌👌💐💐
Thank you Shalmali.
बंगाली लोकं खूप संवेदनशील आणि प्रागतिक. त्यामुळे त्यांचे सिनेमा वेगळी वाट दाखवतात. मोस्टली मध्यम वर्गीय लोकांच्या भावना लक्षात ठेवून बनवले आहेत ..त्यामुळे खूप वास्तववादी वाटतात. अगदी ही फँटसी असली तरीही .
किती मोठा पट आहे या चित्रपटाचा….छान मांडणी आणि तितकेच साजेसे आपले सविस्तर लिखाण.
Thank you so much Uday.
प्रचंड आवाका आहे या सिनेमाचा!
एवढा मोठा कालखंड आणि व्यक्तिरेखांची एकूणच बांधणी त्या त्या काळानुरूप दिग्दर्शकाने खूप मस्त मांडलीय. त्या व्यक्तिरेखांची मानसिक जडणघडण, भावनिक आंदोलने, मन बुद्धीच्या सीमारेषांवर होणारी घालमेल किती सुरेख उलगडलीत!!
पिशीमांसाठी नक्की बघणार हा सिनेमा.
फारच सुंदर लेखन
अप्रतिम..
कथा मांडला खिळवून ठेवणारी आहे..नक्की पहाणार हा सिनेमा..
Yes and please let me know how you like ,
Thank you Kamini.
तुला तर खूप आवडेल.
दिग्दर्शन आणि अभिनय , या बरोबर चित्रीकरण सुद्धा अप्रतिम.
फारच सुंदर लेखन
अप्रतिम..
कथा मांडला खिळवून ठेवणारी आहे..नक्की पहाणार हा सिनेमा..
Thank you Nilima . बघ हा सिनेमा .
यु ट्यूब वर हिंदीत आहे.
चुकून मांडला असे टाईप झाले आहे..
मनाला असे वाचावे..
Yes .
खुप खुप देखणे शब्दचित्र ऊभे केले
आहेस प्रिया!! बंगाली सिनेमाचे
ऐश्वर्य ते नेहमी पाहाणार्यांनाच कळते. नावेही किती सुंदर पारंपारीक पद्धतीची!….मौसमी तरखास आवडतीच… या बंगालनी जीवघेण्याच असतात. शर्मिला टागोर,मौसमी,सुचित्रा सेन,!नक्की बघणार ही राशोमणी..
Thank you Vrushali.
मुद्दाम बघ हा सिनेमा .
यु ट्यूब वर हिंदीत आहे.
बंगाली लोकं खूप संवेदनशील आणि प्रागतिक. त्यामुळे त्यांचे सिनेमा वेगळी वाट दाखवतात. मोस्टली मध्यम वर्गीय लोकांच्या भावना लक्षात ठेवून बनवले आहेत ..त्यामुळे खूप वास्तववादी वाटतात. अगदी ही फँटसी असली तरीही .
प्रिया,
तुझ्यामुळे चांगल्या चित्रपटांची ओळख होते.
लेख नेहमप्रमाणेच छान.💐💐
Thank you Vidula.
मुद्दाम बघ हा सिनेमा .
यु ट्यूब वर हिंदीत आहे.
खूप सुंदर चित्रपटविवेचन प्रिया !
संपूर्ण चित्रपट नजरेपुढून गेला.
अप्रतिम लेख !
Thank you so much Dr Jayshree. 🙂 मुद्दाम बघा हा सिनेमा .
यु ट्यूब वर हिंदीत आहे