Skip to content

सिनेमातला पाऊस:

भाग २
वैशाखातील दुपार भगभगती, रखरखीत, असहनीय, अंगाची  लाहीलाही करणारी. अचानक आकाशातील पिंजून ठेवलेला पांढरा कापूस आपला रंग बदलतो. आता आता पर्यंत निळेशार असलेले आभाळ, घनगर्द ढगांनी झाकोळून जाते. तुफान वारे, उडणारी धूळ , त्या असीम आवेगाला शरण जाणारे वृक्ष, लखलखणारी वीज त्याच्या आगमनाची सूचना देतात आणि त्यांच्या साक्षीने तो कोसळतो. अगदी धुंवाधार वर्षाव करून तापलेल्या धरतीला शांत करतो. एवढा धसमुसळा असूनही तिची काहीच तक्रार नसते.
एवढ्या महिन्याच्या विरहाने उगवलेला असतो न तो, मग त्याच्यात विरघळून ती स्वतःच पाऊस होते.
पावसाळा  सुरु झाला आहे. निदान बॉलिवूडसाठी तरी वर्षातला सर्वात रोमँटिक काळ.  पहिली नजरभेट, आकर्षण, मोह , पहिले प्रेम, प्रेमाची कबुली, प्रेमिकांतील दुरावा, ओलांडलेली मर्यादा … थोडक्यात सर्व पायऱ्या  पावसाच्या साक्षीने होतात.  खरेतर मुंबईत तरी पाऊस म्हणजे, पाणी तुंबणे, ट्रॅफिक अडणे, रेल्वे बंद होणे, रोगराई वाढणे पण बॉलीवूडने  पावसाच्या खऱ्या रूपावर पांघरूण घातले आहे.  पाऊस आला की आठवतात; अंगाला चिकटलेल्या शिफॉन साड्या, पारदर्शक पांढरे शर्ट्स, हिरवागार निसर्ग, पेटलेली शेकोटी, भिडलेली शरीरे आणि गाण्यांची बरसात.

भिजलेल्या शृंगाराची सुरुवात ही झाली बरसात या सिनेमात.
पावसात चिंब भिजलेला नायक भान विसरून व्हायोलिन वाजवत राहतो आणि त्यातील आर्ततेने, आवेगाने आणि प्रेमाने त्याच्याकडे खेचली गेलेली नायिका, त्याच्या बाहूत विसावते.  प्रेमाच्या सादेला मिळालेला एवढा उत्कट प्रतिसाद प्रथमच पडद्यावर  चित्रित झाला. हे दृश्य शिल्पात कोरून RK स्टुडिओच्या दरवाजावर लावले गेले. नंतर आलेल्या श्री ४२० या चित्रपटातील “प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल “ हे गीत चित्रीकरण, अभिनय, संगीत आणि शब्द या सर्वच घटकांत अव्वल ठरले. या सिनेमानंतर, अनेक सिनेमांत पावसाची एंट्री झाली आणि असंख्य भिजलेल्या गीतांचा जन्म झाला.

“बरसात की रात” या चित्रपटात मधुबाला आणि भारत भूषण भेटतात ते धुंवाधार पावसाच्या साक्षीने.
——————————————————————————————-


हैद्राबाद रेडिओ वर आपल्या कविता घेऊन गेलेल्या अमनला काहीतरी नवीन, वेगळे लिहून आणा असे सांगितले जाते. काव्य लिहिण्याची प्रेरणा अशी सहज येत नाही पण हे कवी उत्तम असावेत म्हणून मदतीला पाऊसही  धावून येतो.
पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी अमन एका घराच्या वर्ह्यांड्यात आश्रय घेतो आणि चमचमणाऱ्या विजांच्या लखलखाटात समोर येते ते डोळे दिपवणारे सौन्दर्य, तेही भिजलेले. शबनमची गाडी बिघडलेली असते. दुरुस्त करणारा कुणी वाटेत दिसतो का या विचारात असताना भेटायला मात्र येतो तो पाऊस. हा सुद्धा कसा खट्याळ असतो.
एकटा येत नाही, साथीला असतो तो ढगांचा गडगडाट. आता अशा अनाहूत पाहुण्याचे स्वागत करायचे ते तिला तरी कसे कळणार! घाबरून ती आधार शोधते कारण काहीही असेल पण म्हणून काही कुणी अनोळखी हातावर विश्वास टाकत नाही न !
आपण एका अनोळखी माणसाबरोबर एकांतात आहोत हे लक्षात येते तेव्हा बसलेला धक्का, वाटलेली लाज, उडालेला गोंधळ सारे सारे तिच्या चेहेऱ्यावर झरझर उमटत जाते .
कोण जास्त धोकादायक! बाहेरील कोसळणारा पाऊस का ह्या निर्जन एकांतात साथीला असलेला हा नवागत ..
अंगाला चिकटलेल्या दुपट्याचाच आधार घेण्याचा तिचा निष्फळ प्रयत्न आणि काहीही न सुचल्यामुळे तिथून पळ काढणे हे सगळेच इतके देखणे की अमनच्या प्रतिभेला बहर येतो आणि एका अजरामर गीताचा जन्म होतो
“जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात की रात “ 
“ जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात की रात “ हे गीत पावसात चित्रित केलेले नाही. ते गीत रेडिओवर गायलेले आहे. चार भिंतीतले गीत आहे . त्याची प्रेरणा आहे हा पाऊस. पावसात भिजलेल्या एका सौन्दर्याला दिलेली दाद आहे ती.
पहिल्या नजरेत प्रेम ही कविकल्पना वाटते पण साचलेल्या भावनांचा उद्रेक पावसाच्या साक्षीने व्हावा हा काही योगायोग नाही. तसाही हा सृजनाचा मौसम .

दिल से या सिनेमात धुंवाधार पावसाच्या साक्षीने  पहिल्या नजरेतच अमरकांत वर्माची विकेट पडते. 
——————————————————————————————


अमरकांत वर्मा हा ऑल इंडिया रेडिओचा प्रोग्रॅम एक्सिक्युटीव्ह. आसाम मध्ये त्याची नेमणूक झाली आहे. स्टेशनवर गाडीसाठी वाट पाहणे ,तेही एकटे, कंटाळवाणेच.  रात्रीचा अंधार आणि त्यात दबा धरून बसलेले पावसाळी ढग. थंडीने हुडहुडी भरलेली. सिगारेट पेटवायला सुद्धा माचीस नाही आणि ती मागायला जावे तर चिटपाखरू नाही. रेल्वे स्टेशनचा लांबलचक, निर्मनुष्य प्लॅटफॉर्म मुक्यानेच त्याची सोबत करतोय.
तेवढ्यात त्याचे लक्ष बाकड्यावर एक शाल गुंडाळून घेतलेल्या एका प्रवाशावर पडते. डुलकी काढत जरी असला, तरी तो ट्रेनचीच  वाट पाहत असावा. त्याच्याकडे माचीसची चौकशी करणार तितक्यात जोराचा वारा, शाल उडवून लावतो. काही क्षणापुरतेच त्या प्रवाशाचे त्याला दर्शन होते. परक्या माणसाला पाहून गोंधळलेली ती, पकडलेल्या शालीच्या टोकात परत आपला चेहरा लपवते.
क्षण एक पुरे प्रेमाचा …
दिल से या सिनेमात नायक आणि नायिकेची ही पहिली भेट होते पावसाच्या संगतीने .
संवाद सुरु करण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्याला टाळण्याचा तिचा प्रयास.
“ चहा मिळेल का ?” तिची विनंती टाळणे कसे शक्य आहे!
चहाच्या टपरीवरून दोन कप घेऊन तो परत येत असतानाच, आपल्या साथीदारांबरोबर ती गाडीत चढते. पावसाचे टपोरे थेम्ब आता कोसळू लागतात. कपातील चहा थंड होत असतो आणि त्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यासमोरून सरकत जात असते.
“दुनिया की सबसे छोटी प्रेम कहानी “ तो पुटपुटतो …
पण कदाचित पाऊस वरती रडत असावा …
ही प्रेमकहाणी जीवघेणी असते हे त्यालाच माहित असते. 

Cast away
————–
चक नोलान एका कुरिअर कंपनीसाठी काम करतो. कोणतेही पार्सल वेळेवर पोचते करावे या बाबतीत तो आग्रही आहे.
कामात व्यस्त असला तरी काही वेळ तो आपल्या मैत्रिणीसाठी राखून ठेवतो.
नाताळ हा तर कुटुंबीयांबरोबर, आपल्या जीवलगांबरोबर साजरा करायचा सण. त्या वर्षी मात्र त्याला ऑफिसमध्ये काम असते. रात्रीच्या जेवणासाठी  उपस्थित राहणे त्याला शक्य नसते. तो आणि त्याची प्रेयसी, केली भेटींची देवाणघेवाण गाडीत करतात. परत लवकर येण्याचे वचन देऊन चक कामावर जायला निघतो.
वादळात त्याचे विमान सापडते. त्याला जग येते तेव्हा तो एका निर्मनुष्य बेटावर असतो. आजूबाजूला कुणीही नाही आणि कुठूनही मदत येण्याची शक्यता नाही अशा परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवणे एवढेच त्याच्या हातात उरते.
चार वर्षानंतर तो आपल्या जगात परत येतो पण त्याचे जग पुढे निघून गेलेले असते.
निराश झालेला असतानाही केलीला भेटायची दुर्दम्य इच्छा त्याला जिवंत ठेवते पण त्याचा ठावठिकाणा लागत नाही हे जाणल्यावर केली लग्न करते. तिला एक मुलगाही असतो. आपल्या जगात ती स्थिरावलेली असते. हे समजूनही, शेवटचे भेटण्यासाठी तो तिच्या घरी जातो.
ती त्याचे स्वागत करते. त्याची गाडी परत करते.
जड मनाने परत जाताना, न राहवून ती साद घालते.
बाहेर पाऊस कोसळत असतो. 
एवढ्या वर्षांनी भेटलेल्या प्रेमिकांसाठी काळ मात्र थांबून राहतो. त्याच्याही हातात मागे जाणे नसते पण निर्णय त्या दोघांवर सोपवून तो फक्त बघत राहतो.

हात पुढे येतात, घट्ट मिठीत एकमेकांचे चुंबन घेत असताना, केली सांगते, तू या दुनियेत नसशील हे माझे मन स्विकारत नव्हतेच पण जगाने  मात्र तुझा मृत्यू मान्य केला होता. परत जगण्याचा त्यांचा आग्रह मला टाळता आला नाही.
एकमेकांत गुंतलेल्या त्या दोघांकडे श्वास रोखून पाहताना, प्रेक्षकांनाही वाटते की या कथेचा गोड़ शेवट आहे पण जे आपल्या मनात असते तसे झाले असते तर !
हा “तर” नियती स्वतःच्या मुठीत बंद करून ठेवते.
त्याच्यावर प्रेम असले तरी तिचे, त्याला वगळून आयुष्य असते. तिची माणसे, तिचा संसार, असे थोडेच सोडून जाणार!
काळ पुढे जातो, तो पुसता येत नाही.
स्वप्ने पुसून चक आपल्या मार्गाने जातो.
रडणारा पाऊस मनातून त्याला आशीर्वाद देत असतो.

कागज के फुल या चित्रपटात सिन्हा आणि शांती यांची भेट सुद्धा पावसात होते .
—————————————————————————-
ही पहिली भेट पण नेहेमीसारखे नायक नायिका यात प्रेमात पडत नाहीत; मात्र भविष्यात जुळल्या जाणाऱ्या नात्याची ती सुरुवात असते. सिन्हा (गुरुदत्त) आपल्या पत्नीपासून वेगळा झालेला आहे. मुलांना भेटण्यासाठी तो तिच्या घरी जातो पण ती त्याच्या तोंडावर दार लावून घेते. दुखावलेल्या मनस्थितीत परतत असतानाच तो वादळात अडकतो .
खरेतर बाहेरचे वादळ त्याच्या मनातल्या वादळापुढे काहीच नाही.  एका वडाच्या झाडाचा आश्रय घ्यायला जात असतानाच त्याच्या लक्षात येते की आधीच तिथे एक तरुणी थांबलेली आहे.

धोधो वाहणारा पाऊस, थंडीने कुडकुडणारी ती, काळोख दाटून आलेला आणि निर्मनुष्य रस्ता. मनातुन तिची खात्री पटलेली  आहे की हा माणूस तिचा गैरफायदा  घेण्याचा  प्रयत्न करेल .
थंडीने कुडकुडणाऱ्या तिला पाहून तो विचारतो. “आप अपना गरम कोट क्यों नही लायी?”
“ सर्दीला पैसे मोजावे लागत नाही .. एवढा उबदार कोट थोडाच फुकट मिळतो ?”
परिस्थितीला साजेसे उत्तर पण तो गरिबीने शिकवलेला हजरजबाबीपणा त्याला आवडतो.
दोन वेगळी माणसे. एक श्रीमंत, वयाने मोठा, जग पाहिलेला, पत्नीच्या वर्तुणकीने दुखावलेला आणि दुसरी गरीब, जगाची ओळख नसलेली, निरागस. टॅक्सी थांबवून सिन्हा तिथून निघतो खरा पण तिची कणव येऊन आपला कोट तिच्याभोवती पांघरतो. या अनपेक्षित कलाटणीने चकित होते ती ..
अप्रतिम  टेकिंग आहे .

काल एका मित्राने विचारले होते , पावसातच कवितेचा जन्म का होत असावा ! त्याने मुंबईचा पाऊस बहुतेक पाहिला नसणार !
हिवाळा हा मुंबईत अनपेक्षित मिळालेला बोनस असतो त्यामुळे वर्षभर घामाच्या धारांमध्ये सचैल स्नान करणारा मुंबईकर, लोकल नंतर वाट पाहतो तो बरसणाऱ्या धारांची.  ट्रॅफिकजॅम होणे, गाड्या रद्द होणे, गटारे तुंबणे, रस्ते भरून वाहणे ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पावसाचे स्वागत जो करतो , तो “मुंबईकर” अशी माझी व्याख्या आहे.
पावसाने न्ह्यायलेली मुंबई, राजा रविवर्माच्या पेंटिंगपेक्षाही फार सुरेख दिसते. नेहेमीच्या चौपाटी अशावेळी ऑफ लिमिट्स असतात.  पावसाने उचंबळून आलेल्या लाटांचे थैमान लांबून निरखायचे.
एवढ्या मोठ्या त्या अजस्त्री लाटा , काँक्रीटच्या टेट्रापॉडस वर कोसळतात आणि मग ते पांढरेशुभ्र तुषार बघ्या लोकांच्या डोक्यावरून समोरच्या रस्त्यावर आदळतात.
मुंबईचा पाऊस वाचून समजणार नाही; तो अनुभवावा लागेल. रिमझिम कोसळणारा पाऊस बघता बघता वादळी होतो.  मग त्यातून स्वतःला सावरणे कठीण . पाऊस एवढ्या आवेगाने मुंबईला कुशीत घेतो ते निरखले तर एखादा दगड सुद्धा मेघदूत प्रसवेल ! कविता लिहिणे ही तर फार सोपी गोष्ट आहे. मुंबईचा पाऊस, प्रेमाची ओळख पटवतो. कधीही न येणारे शब्द ओठावर आणतो . दोन मनांना एकत्र आणतो .
वेक अप सीद मधला क्लायमॅक्स असा पावसाच्या साक्षीने साजरा होतो.
———————————————————————-
Opposites attract, आपण सहज म्हणून जातो पण त्यांच्यातही काही साम्य असते, जे त्या दोघांना बांधून ठेवते.
आयुष्य येते तसे जगायचे असे जगणारा सीद आणि आयुष्याच्या प्रत्येक  क्षणाला मोल असते हे मानणारी आयेशा ही दोन टोके.
काही तरी करायचे या जिद्दीने कोलकाताहुन मुंबईत आलेली आयेशा आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत जगते; आपल्या ध्येयाच्या मागे धावते आणि या धावण्यात तिच्या लक्षात येते की ह्या उरापोटी धावण्याला लय दिली आहे ती सीदने.
त्याची सोबत, त्याची मैत्री तिच्या जगण्याचा एक आवश्यक भाग बनली आहे.
She is in love .
जो बरसें सपने बूँद-बूँद
नैनों को मूँद-मूँद
कैसे मैं चलूँ, देख न सकूं अनजाने रास्ते 



मुंबईच्या प्रेमात आपण का पडलो आहोत ते मनोगत ती आपल्या लेखातून सांगते. प्रेमाचा हा इजहार तिच्यासारखाच खूप वेगळा .प्रत्येकवेळी मुलानेच आपले मन उघडे करावे असे थोडेच आहे ! 
मुंबईचा हा पाऊस एका मुलीला आपले मन उघडे करायला उद्युक्त करतो ! 
कथा, कादंबरी आणि सिनेमात प्रेम आणि पाऊस एकमेकांना चिकटून येतात. मेघदूताचा आरंभच आषाढातील पावसाच्या साक्षीने होतो.  यातील  पात्रांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगाचा साक्षीदार म्हणूनही पाऊस भूमिका बजावतो.

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

आयुष्यातील वादळांची पर्वा न करता , तुम्ही तुमच्या हृदयाच्या हाकेला ओ दिलीत, तर कुठलेही वादळ शमते, अडचणी तर असतातच पण जर प्रेम खरे असेल तर त्या पार करून जाण्याचे धैर्य ही प्रेमच देते. पावसाचा असाही रूपक म्हणून वापर होत असावा. पाऊस रुसलेल्या  जीवांना एकत्र आणतो,  मनात कोंडून ठेवलेल्या जाणिवांना प्रकट करण्याच्या सामर्थ्य पावसाच्या सरीत असते . आतापर्यंत जपलेल्या लक्ष्मणरेषा पावसाचा हात धरून ओलांडल्या जातात. पहिला थेंब मनातला संकोचही धुवून टाकतो. घराच्या चार भिंतीत सुद्धा कधीही पाय न थिरकवलेली माणसे , पावसाच्या संगतीत गातात , नाचतात , साचलेल्या पाण्यात उड्या  मारून आपले हरवलेले बालपण शोधतात .
आत कुठेतरी लक्षात येते,  थोडीशी हिंमत , मनावरचे दडपण सहज घालवू शकते. जुन्या समजुती  पुसल्या जाऊन, मन स्वच्छ ,नितळ होते.
प्रेम आणि मोह  यांची  एकदा मनावर पकड आली की तिच्यातून सुटणे भल्या भल्याना जमत नाही . यांचे गारुड झपाटून टाकणारे. पावसाचे ही तसेच की . एकदा ढग दाटून आले की झरझरणाऱ्या सरींना अडवणे अशक्य होऊन जाते. आभाळ पूर्ण रिकामे झाल्यावरच हा आवेग शमतो. 
I want to walk in the open wind
I want to talk like lovers do
I want to dive into your ocean
Is it raining with you?

हा मनातला प्रश्न ओठावर आणणे तितके सोपे नाही. प्रेम मुक्त नसते. न सांगता, न मागताही त्याची बांधिलकी असते. त्या बदल्यात घेतलेली जबाबदारी असते.
हॉलीवूड मध्ये तरी प्रेमाला, चुंबनाचे अधिष्ठान असल्याशिवाय पूर्णत्व नाही. भिजलेली शरीरे त्यात अजून रोमांचित करतात.
पावसातली प्रेम दृश्ये, चुंबनाशिवाय पूर्ण होत नाहीत. पाऊस भान हरपून कोसळतो आणि धरतीला आपल्या बाहुपाशात
सामावून घेतो.  हा अनावर आवेग, मानवी मनाला सुद्धा मर्यादा ओलांडून जाण्यास उद्युक्त करत असावा. 

फोर वेडींग्स अँड अ फ्युनेरल मधला पाऊस सुद्धा सर्व बंधनांना मुक्त करणारा पाऊस आहे.
——————————————————————————————————-
लग्न आणि प्रेम यांचा संबंध असतोच असे नाही. जबाबदारीचे बंधन असावे म्हणून लग्नाचा शोध लागला असावा.
क्वचित का असेना, लग्नाशिवाय सुद्धा माणसे एकत्र राहतात. त्यांच्यातील बंधाला, बंधनाची आवश्यकता भासत नाही. कोणत्याही बांधिलकी वर विश्वास न ठेवणारा, त्याची भीती असणारा चार्ल्स, लग्नापासून लांबच असतो. सिनेमाच्या शेवटी मात्र कॅरी बद्दल असणाऱ्या भावना तो लपवू शकत नाही. लग्नाचे वचन काही ते एकमेकांना देत नाही पण एकमेकांचा हात  हातात  घेऊन, आयुष्याचा रस्ता एकत्र चालण्याचे वचन मात्र ते एकमेकांना देतात,

ओठांची भाषा एकमेकांना समजवतानाच साक्षीदार म्हणून पाऊस हजेरी लावतो.
ह्याचे शूटिंग इंग्लंड मध्ये झाले आहे जिथे पाऊस कोणत्याही वेळेला पूर्व सूचना न देता येतो. प्रेम तरी कुठे परवानगी घेऊन दार ठोठावते , नाही का ?
कुछ कुछ होता है या सिनेमात पाऊस दोनदा येतो.
————————————————————–
एकाचे मन मोकळे करून टाकतो तर दुसरा मात्र पूर्ण रिकामा होत जातो.
टीना वरील प्रेम कसे व्यक्त करायचे, तिला आपल्या भावना कशा सांगायच्या ह्या गुंत्यात सापडलेला राहुल, अंजलीकडे जेव्हा आपली अडचण सांगतो , तेव्हा तिला, त्यालाही काही सांगायचे आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही.त्याने रिहर्स केलेले ”आय लव्ह यु” हे अंजलीसाठी नसून टीनासाठी आहे हे जेव्हा अंजलीला समजते, तेव्हा उशीर झालेला असतो.
प्रेमाची अनुभूतीचा  क्षण हा भारलेला पण त्याचवेळी  ते प्रेम आपल्याला कधीही लाभणार नाही हे सुद्धा समजणे, आणि पचवणे किती कठीण असणार !
मनातल्या भावना व्यक्त न करता येणे हे दुःख, नकार स्विकारण्या पेक्षाही कठीण.  त्याचा आनंद हा आपल्या स्वप्नांचा मृत्यू आहे हे समजूनही , मित्राच्या आनंदात सहभागी होण्याची कसरत करतानाच तिच्या मदतीला पाऊस धावून येतो.

पावसाचे आणि प्रेमाचे काहीतरी नाते असतेच. दाटून आले की दोहोंची बरसात होते. कुणीतरी मनातल्या भावना कागदावर उतरवतो, कुणी कॅनव्हॉसवर रंगांची उधळण करतो, बरेचसे आळशी नवरे, बायकोला भाजीची ऑर्डर देतात( म्हणून लग्नानंतर प्रेम संपते ) तर क्वचित कुणी waltz च्या सोबतीने, सात पावलांची सप्तपदी चालतो.
डम्ब शराडचा खेळ चालू असतो. सिनेमा असतो “ आय लव्ह यु “ पण शाहरुखला हे सांगता येत नाही. कृतीतून मांडता येत नाही. तसेही charade हा खेळ तर्काचा, अंदाज बांधण्याचा. प्रेमात तर्काला जागा नसतेच.
हा खेळ तर नायक हरतो पण त्याचवेळी येणारा पाऊस त्याला दिशा दाखवतो, धीर देतो. एकदा मनाची तयारी झाली की शब्दाचीही गरज लागत नाही. इथे संगीत आहे पण ते फक्त त्या दोघांना ऐकू येते. एकही शब्द न घेतात हा सीन घेतला आहे.

चिंब भिजलेली ती दोघे, निर्मनुष्य बेट, एक छोटीशी लाकडी केबिन आणि मनात गुंजणारे संगीत.
Waltz हा एवढा सुंदर नृत्य प्रकार आहे! शरीरे जरी भिडलेली असली तरी सुद्धा त्यात अंतर आहे, हवे तितके, अंतर मिटवायचे स्वातंत्र्यही आहे. त्याच्या नजरेतले आर्जव, तिचे गोंधळणे, पावसाचा वाढलेला जोर, मनावरचे सुटलेला ताबा , इतक्या वर्षाने मिळालेला प्रतिसाद, हळूहळू दोघातले अंतर कमी होत जाते आणि निर्णायक क्षणी तिला आलेली जाग.
अलगद मिठीतुन सोडवून घेणे आणि परत आपल्या कक्षेत जाण्यासाठी भर पावसाची पर्वा न करता, नको असलेल्या जगात तिचे परत जाणे.

भिजलेली नायिका, अंगाला घट्ट चिकटलेली लाल भडक रंगाची शिफॉन, उडणारा पदर; भले शेकोटी नसूदे, तरीही ह्या प्रसंगात उद्यपीत करणारा रोमान्स नाही. नायकाच्या मागणीत आर्जव आहे, नायिकेच्या प्रतिसादात थोडासा अविश्वास , थोडासा गोंधळ , थोडीशी लज्जा आणि बराचसा इंनोसेन्स आहे. एक नवखेपणा …
९० च्या दशकात ही हा प्रसंग प्यार हुआ इकरार हुआ ची आठवण करून देतो .

काला पथ्थर
————–
कागज के फुल मधील पाऊस फक्त  दोघांना भेटवतो तर काला  पथ्थर मध्ये मैत्रीचे प्रेमात रूपांतर करून देणारा उप्रेरक  होतो.
विजय ( अमिताभ ) आणि सुधा ( राखी ) यांची ओळख तर आहे, ती डॉक्टर आहे त्या छोट्याश्या गावात तर तो खाणीत काम करणारा एक मजूर. जगण्याची इच्छाच नसलेला, मृत्यूशी भांडण करणारा. हाताला जखम झाली तरी त्याच्या डोळ्यात टिपूस नाही. फक्त कळत न कळत वेदनेने एखादी रेषा  उमटते . तिला कुतूहल आहेच  पण फाजील उत्सुकता नाही.
“तू मला माझ्यापेक्षाही ओळखतेस “असे बोलून जातो तो पण त्या पलीकडे मात्र एक शब्दही बोलत नाही .
तिला तो आवडायला लागला आहे पण हे तिला त्याला सांगायचे नाही. त्याच्या मनाची तिला ओळख पटत नाही.
त्याने जेवढा हात दिला आहे तेवढाच ती स्विकारते. निरपेक्ष मैत्री .
एका रात्री विजय तिला बोलवायला येतो. एका रुग्णाच्या घरी जायचं असते. काळोखी रात्र, पाऊस मी म्हणतोय. एक छत्री आणि आपल्या विचारात गर्क असलेले ते दोघे.



अचानक सुधाचा तोल जातो. विजयाचा हात तिला आधार देण्यासाठी पुढे येत असतानाच मधले अंतर कापले गेले आहे  याची जाणीव होते त्या दोघांना.
मनातील अंतर सुद्धा तेव्हा नाहीसे झालेले असते .
अंगाला घट्ट चिकटलेली साडी पण त्याचे लक्ष तिथे नाहीच. मान समोर तरीही तिच्या श्वासाबरोबरच त्याच्या श्वासाची लय जुळली आहे.
कोणी न सांगता , बोलता पाऊस सांगतो त्यांना … ते प्रेमात पडले आहेत.

Life in a metro
——————-
कथा घडते मुंबईत. सिनेमाची सुरुवातच धुंवाधार पावसात  होते.
पावसाळा सुरु झाला की पाऊस असो व नसो, छत्री विसरायची नसते हे नवख्या माणसाला माहित नसते. राहुल विसरतो पण त्याच्याच ऑफिसमधली नेहा, त्याला आपल्या छत्रीत घेते.
पावसाला कसे सामोरे जातो यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो. 
नेहा, अतिशय महत्वाकांक्षी आहे. तिचा शॉर्ट स्कर्ट , हातात घट्ट पकडलेली छत्रीची मूठ, पावसाच्या थारोळ्यात चालताना सुद्धा जपलेला डौल आणि तिच्यावर फिदा असलेला बुजरा राहुल ..


एका अबोल प्रेमकहाणीचा साक्षिदार हा पाऊसच तर असतो .
प्रेम कुठेही, कधीही, कोणाबरोबरही होऊ शकते. अगदी ठरवून होऊ घातलेल्या विवाहात सुद्धा पहिल्या भेटीतच व्यक्ती मनात जागा करते. मॉन्टीला तर श्रुती आवडली आहे. श्रुतीचा मात्र पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. हॉटेल मध्ये पहिल्यांदाच भेटलेली ती दोघे. काहीशी अवघडलेली, काहीशी अस्वस्थ ..
बाहेरची पावसाची रीप रीप त्या अस्वस्थपणात भर टाकणारी .
आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांपासून दुरावलेले दोन जीव अमोल आणि शिवानी,  एकत्र येतात , त्यांनाही आशीर्वाद देणारा हा पाऊसच असतो .
वृद्ध माणसांच्या गराड्यात असूनही, रुटीन मध्ये अडकलेली शिवानी, जगण्यातील उरला सुरला आनंद सुद्धा टिपून घेते . अचानक वर्षांनी आलेले अमोलचे पत्र पासूनच ती  हरखून गेली आहे.
आपल्या करिअरसाठी अमोल तिला सोडून जातो पण तिला त्याचा राग नाही. चुका होतात, आयुष्य नको त्या मार्गावरून जाते, गेलेली वर्षे परत येत नाहीत पण राहिलेली, त्याची खंत करण्यात घालवायची नसतात ह्याची जाण  तिला आहे. 
अमोल येणार आहे ह्याचाच आनंद तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतो. बाहेर लयबद्ध पडणारा पाऊस, हे लाजणे आनंदाने निरखत असतो.
मुंबईच्या वादळी पावसात छत्री न उघडणे, काही नवीन नाही पण अशावेळी कुणीतरी मदतीला येणे आणि त्यानी छत्री दुरुस्त करून देणे हा मात्र केवळ योगायोग नसतो.
पुढे येणाऱ्या अनाहूत वादळाची ती नांदी असते.
भर पावसात , वादळात अडकलेल्या शिखाची छत्री दुरुस्त करायला आकाश पुढे येतो. छत्री तर दुरुस्त होते पण जेव्हा बस येते , तेव्हा आत शिरताना शिखाच्या लक्षात येते की धरायला दिलेले आकाशचे पुस्तक तिच्याकडेच राहुन गेलंय.
पहिले पुस्तक आणि मग मन

महानगरात स्वतःच्या स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आलेल्या माणसांची ही गोष्ट.  हे जगच स्पर्धेचे. इथे थांबला तो संपला.
या गतीमय जीवनात तगून राहण्यासाठी अनेकदा स्वतःच्या आत्म्याला सुद्धा गहाण ठेवावे लागते.
महत्वाकांक्षा , हव्यास आणि सत्तेचा माज ह्या सर्वात आपण काय गमावतो आहे हे लक्षात येत नाही.
निदान सिनेमात तरी ही पात्रे आपल्या अंतरंगाचा वेध घेतात. अनेकदा पाऊस केवळ शरीरच स्वच्छ करत नाही तर मनातले किल्मिष सुद्धा धुवून काढतो . लाईफ इन अ मेट्रो या सिनेमात पाऊस एका पात्राचा रोल निभावतो.

पाऊस हा असा उप्रेरक आहे की  जो अनेक सुप्त भावनांना वाट करून देतो. अगदी सुपरहिरो सुद्धा त्यापासून अलिप्त राहू शकत नाही.
पीटर पार्कर , सुपर मॅन होण्याआधी , मेरी जेन वॉटसन वर प्रेम करत असतो. ते शेजारी असतात, एका शाळेत शिकलेले असतात पण आपल्या भावना बोलून दाखवणे काही पीटरला जमत नाही आणि एक दिवशी एक रेडिओऍक्टिव्ह कोळी, त्याच्यात बदल घडवतो. लाजऱ्या बुजऱ्या पीटर चे स्पायडर मॅन मध्ये रूपांतर होते.
केवळ शरीर बदलत नाही तर मन सुद्धा धीट होते.
रात्रीची वेळ आणि त्यात धो धो कोसळणारा पाऊस .
मेरीच्या पाठी गुंड लागले आहेत. स्पायडर मॅनचा धावा करत असतानाच तो पाठी उभा ठाकतो. डोके खाली आणि आधारासाठी त्याच्याच शरीरापासून निर्माण झालेले जाळे. गुंडाचा नायनाट व्हायला काही वेळ लागत नाही .
गुंडापासून तिची सुटका झाली आहे पण एक अनामिक भावना तिच्या मनात जागी झाली आहे. 
त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात जखडलेली ती, त्याचा मास्क खाली खेचते पण तिला त्याचे गुपित जगासमोर उघडे करायचे नाही आहे.  त्याचा चेहेरा तर उघडा  पडणार नाही पण तिचा हेतू पूर्ण होईल एवढाच मास्क खाली सरकवला जातो आणि wow , she is thrilled to be kissing “The spiderman”

स्पायडर मॅन च्या मालिकेतील हे पहिले चुंबन. ह्याचे शूटिंग एवढे सुंदर आहे की बेस्ट किस चा अवॉर्ड हा सीन घेऊन गेला आहे.
मेरी साठी हे आकर्षण आहे, थ्रिल आहे . पीटर जाणून आहे की ते चुंबन त्याच्यासाठी नाही; ते स्पायडर मॅन साठी आहे.
स्वतःला उघड करणे त्याला शक्य नाही. त्याचा मार्ग कठीण आहे.  त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे धोक्याचे आहे.
त्याचेच उद्गार आहेत ,  “With great power comes great responsibility.” This is my gift, my curse. Who am I? I’m Spider-man!

मला आवडलेले हे काही पावसाळी प्रेमाचे सीन्स. तुम्हाला आवडलेला सीन कोणता आहे ?


14 thoughts on “सिनेमातला पाऊस:”

  1. आहा, किती वेगवेगळे सिनेमे, प्रसंग, पावसाच्या साक्षीनं उघड झालेल्या भावना, काय सुरेख मेळ आहे. तुझ्या लेखाचं इंद्रधनुष्य अतिशय रमणीय प्रिया. फार आवडला लेख.

  2. अप्रतिम. पूर्णपणे वेगळी फुलं एकत्र गुंफली आहेत. एरवी मला या सगळ्या सिनेमांना बांधणारा धागा दिसलाच नसता.

    1. Swati, Thank you,
      आधी हॉरर , आता प्रेम आणि नंतर रुद्र , शांत आणि विरह अशा रसांवर बेतलेला पाऊस अशी थीम केली आहे .
      शोधताना सिनेमा नव्याने समजतो एवढा पाऊस महत्वाचा आहे

  3. किती सुंदर लिहितेस प्रिया… मला एकूणच पाऊस फार आवडतो. त्यामुळेही हा लेख आवडलाच. पण किती बारकाइने प्रत्येक सीन सांगितलास… यातले गुरुदत्त चा सोडून सगळे सिनेमे पाहिलेत. त्यामुळे परत एकदा छान आनंद घेतला गं तुझ्यामुळे. धन्यवाद 🙏🙏

    1. Thank you so much Savita .
      पूर्ण कागज के फुल हे भिजलेले स्वप्न आहे.
      अर्थात आता दुःखी करणारे सिनेमा नको वाटतात. हा तर फार त्रास देतो

  4. प्रिया,
    किती वेगवेगळे चित्रपट निवडलेस.
    आहाहा..
    अप्रतिम..

    पावसात भिजल्याचा आनंद मिळाला.

  5. अहाहा काय कमाल लिहिल़त प्रियादी ❤
    अगदी मनमुराद भिजल्याचा फिल आला. एकसे बढकर एक गाणी आजच्या लेखासाठी निवडलीत आणि मुंबई च्या तुंबई पावसाची आम्हा नॉन मुंबईकर असणाऱ्यांच्या मनातील प्रतिमा सपशेल धुवून टाकली.
    क्या बात
    क्या बात
    क्या बात👌👌

    1. Kamini , मुंबईत आता तुफान पाऊस आहे . ये एकदा . मुंबईचा पाऊस झपाटतो
      🙂

  6. पावसासारखंच तुझ्या लेखातल्या गाण्यांनीही चिंब भिजवलं …. क्लास लिहिलयेस

  7. फार सुंदर वर्णन !! लेख वाचतांना पावसात चिंब भिजलयाचा फिल आला

Leave a Reply to Shalmali Gokhale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *