वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. घरातील वडीलधारी व्यक्ती एकाकी पडणे, त्यांची काळजी घ्यायला घरात जवळची माणसे नसणे, त्यांची आबाळ होणे, अनेकवेळा त्यांची आर्थिक, शारीरिक आणि भावनिक हानी होणे ह्या गोष्टी सतत कानावर पडतात. अर्थात दोषाची सुई पुढील पिढीवर रोखली जाते. काही बाबतीत त्यात सत्यता असूही शकते पण खरंच यात कोणी दोषी असतोच की हा बदललेल्या परिस्थितीचा एक अटळ भाग असतो?
कामाचा ताण, आर्थिक विवंचना, व्यक्तीगत आयुष्यातील तणाव, नैराश्य, कुटूंबात असूनही वाटणारा एकाकीपणा या गोष्टी आता नवल वाटू नये एवढ्या सामान्य होत चालल्या आहेत. नवीन पिढीला त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. कामानिमित्त बाहेर जाणे आता अपरिहार्य होत आहे. एकदा परदेशी झाले की परत येण्याचा मार्ग सहज मिळेल असेही सांगता येणं कठीण आहे. त्यात ह्या गोष्टी जुन्या पिढीला सहज उमजतील असेही नाही. काळ बदलला आहे, अपेक्षा बदलल्या आहेत, माणसे सुद्धा आधीच्या पिढीहून वेगळी आहेत.
कथा आहे आर्यनील आणि त्याच्या वडिलांची, सुशोवनची. त्यांच्या मधील प्रेमाच्या बंधाची.
आर्यनील शिकागोमध्ये स्थित आहे. मोठ्या हुद्द्यावर आहे. अर्थात पैसे आणि प्रतिष्ठा याची किंमत मोजावी लागते. कितीही मनात असले तरी कामात व्यग्र असल्याने वडिलांना वेळ देणे त्याला शक्य नाही. पैशाने त्याची भरपाई करण्याचा तो मनापासून प्रयत्न करतो. आपण तिथं राहू शकत नाही याची त्याला खंत आहे पण नाईलाज आहे. परदेशात आहे म्हणून माणूस सुखी आहे या गृहीतकाला आधार नाही. त्याचा घटस्फोट झाला आहे. मुलगा डून स्कूल मध्ये शिकत आहे. दुर्दैवाने दुसरे नाते ही न टिकल्याने द्याव्या लागणाऱ्या पोटगीचा भार आणि वडीलांचा खर्च , ह्यामुळे परदेशात डॉलर देणारी नोकरी सोडून कोलकाता मध्ये स्थायिक होणे अशक्य आहे.
वडिलांची तब्येत खालावली असून, त्यांना विस्मरणाचा त्रास सुरु झाला आहे हे समजल्यावर वडिलांना भेटणे आणि डॉक्टरांशी बोलून पुढचा निर्णय घेण्यासाठी आर्यनील भारतात येतो.
वडील, एके काळचे अत्यंत हुशार प्राध्यापक. त्यांचे बुद्धीमंत वर्तुळात नाव आहे, त्यांचे अनेक पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत पण हा भूतकाळ आहे. आता त्यांना अनेक घटना आठवत नाहीत. काळ किती पुढे सरकला आहे त्याची जाणीव नाही.
आर्यनील त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संभाषणातून भूतकाळ उलगडत जातो.
सुरुवातीच्या चित्रीकरणातूनच सिनेमाची गती समजते. ऐंशीच्या घरातील एक वृद्ध गृहस्थ , कोलकाताच्या प्रशस्त घरात एकटेच राहत आहेत. सोबतीला एक नोकर, जो कितीतरी वर्षे या घरात आहे आणि एक हाऊस किपर , जी एका संस्थेमार्फत या घरात आलेली आहे. आर्यनील येतो तेव्हा सुशोवन वऱ्हांड्यात वर्तमानपत्र वाचतानाच झोपी गेले आहेत.. उजव्या हातात वर्तमानपत्र आणि डाव्या हातात चष्मा. मुलगा हळूच त्यांचा चष्मा आणि पेपर काढून टेबलवर ठेवतो. हळुवारपणे त्यांच्या हाताला थोपटतो.
त्या स्पर्शाने वडिलांना जाग येते.
“ कधी आलास ?”
अनेक वर्षांनी आलेल्या आर्यनीलला काय उत्तर द्यावे हे समजत नाही. एवढ्या वर्षांनी वडिलांची अशी अवस्था पाहून जीव गलबललेला. अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी मुलगा हवापाण्याच्या गप्पा सुरु करतो.
“कोलकाता खूपच गरम आहे “
“ लखनौ कसे आहे ? “ वडिलांचा अनपेक्षित प्रश्न .
ते मुलाला ओळखतात आणि रणजी मॅच का हातातून घालवली हा प्रश्न विचारतात. मुलगा तरुण असताना क्रिकेट खेळत असतो. त्या घटनेला वर्षे लोटली आहेत. उलटलेला काळ मात्र त्यांच्या जाणिवेत नाही.
असे नाही की ते फक्त भूतकाळात जगतात. त्यांच्या कोशात काळाची मिसळण झाली आहे. एकटेपणा, त्यामुळे आलेले नैराश्य, वयोमानाने थकत जाणारी गात्रे आणि मज्जासंस्थेत झालेले काही बिघाड याचा एकत्रित परिणाम म्हणजे सुरु झालेला स्मृतिभ्रंश.
वाढत्या वयाने होणारा स्मृतिभ्रंश (dementia) हा अचानक होत नाही. आठवणीतील काही भाग विसरला जातो, काही नावे , काही चेहेरे, काही घटना. हे बदल एवढे सूक्ष्म असतात की आपण वाढत्या वयाला दोष देऊन मोकळे होतो.
तासंतास क्रिकेट बघण्यात रमणारे ते आता मॅच पाहत नाहीत. पुस्तके अशीच धूळ खात पडलेली आहेत. चेहेऱ्यावर हरवल्याची जाणीव, या जगात ते वेगळे पडले आहेत. कधी कधी काहीतरी सांगावेसे वाट्ते पण ऐकायला आपली माणसे नाहीत, त्यामुळे शब्द सुद्धा आटत आहेत.
“ते वेडे तर झाले नाहीत ना? कपडे काढून बाहेर धावत जाणार नाही ना ? “ त्यांच्या घरातील नोकर काळजीत पडला आहे. त्याला त्यांचा आदर आहे, प्रेम आहे पण या आजाराची कल्पना नाही. तसेही या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत.
मुलगा त्यांना अनेक गोष्टी सांगून आठवायचा प्रयत्न करायला सांगतो .
“अरे, मी करतो आहे रे, पण नाही आठवत, काय करू ? “
हा प्रसंग पाहताना भडभडून येते आणि तरीही हा सिनेमा मेलोड्रामा नाही. हे असे होणार आहे आणि त्याला उत्तर नाही हे प्रेक्षकांना समजते आणि स्विकारले जाते ह्यात ह्या सिनेमाचे यश आहे.
आपला मुलगा सुखी नाही हे त्यांना जाणवते पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यांच्या लक्षात नसल्याने कारण समजत नाही. त्यांच्या भेटीत एवढे अंतर पडले आहे की फक्त पाश्चात्य क्लासीकल संगीत ऐकणारे आपले वडील फ्युजन संगीत ऐकतात हे ऐकून त्याला आनंद मिश्रित नवल वाटते. ए आर रहमान चे संगीत आठवताना त्यांना संगीतकाराचे नाव आठवत नाही. हातात व्हाओलीन असल्याची कल्पना करून ते एक पीस म्हणून दाखवतात.
हा प्रसंग कॅफेत घडतो. डॉक्टरकडून येताना ते कॅफेत जातात. “जीवनातं काही प्रसंग एवढे छान असतात की त्याला पार्श्व संगीत हवे “ असे म्हणून ते चक्क मोठ्याने गुणगुणतात. काचेपलीकडे एक तरुण जोडपे आपल्यात दंग असतं ..त्यांच्यासाठी ती अविस्मरणीय भेट असतेच.
जुन्या गोष्टी तुकड्या-तुकड्यात आठवताना त्यांना “मयुराक्षी “ आठवते. फक्त नाव बाकी, कसलीही ओळख नाही. तिच्या बद्दल कुणालाही माहिती नाही. तिला एकदा भेटायचे आहे असे ते मुलाला सतत सांगतात.
असे म्हणतात.“ पालकांनी, स्वतःच्या मुलाचा मृत्यू बघणे आणि मुलांनी, पालकांचे स्वतःला हरवणे भोगणे या सारखे दुःखदायक काहीही नाही “
वाढत्या वयाने होणारा स्मृतिभ्रंश (dementia)आणि आकलन शक्तीत होणार बिघाड (cognitive dysfunction) हा बरा होणार आजार नाही. हळू हळू हा आजार वाढत जाणार आणि एका स्टेजला फक्त श्वास चालला आहे म्हणून माणूस राहणार ही सत्य स्थिती डॉक्टर समजावून सांगतात.
त्यांच्या साठी म्हणून आणि त्यांच्या आयुष्यातील माहित नसलेला एक भाग जाणून घ्यावा म्हणून, आर्यनील, मयुराक्षीचा शोध घेतो. आता नको ते गुपित बाहेर येणार असे वाटलें ना तुम्हाला!
तर नाही. हा सिनेमा असे धक्के देत नाही. एका अत्यंत सुसंस्कृत, “सर्वसामान्य” माणसांची ही गोष्ट आहे.
मयुराक्षी, आर्यनील च्या वडिलांची विद्यार्थीनी असते. त्यांच्या काही रिसर्चमधे तिचाही हातभार असतो. बराच शोध घेतल्यानंतर आर्यनील, तिला ओळखणाऱ्या एका अपंग मुलीला भेटतो. ही मुलगी त्याला मयुराक्षीची माहिती देते. तीचे लग्न होऊन ती स्थिरावली आहे असे सांगते. खरेतर आपल्या मुलाशी हिचे लग्न व्हावे अशी आर्यनीलच्या वडिलांची इच्छा असते. ही गुणी मुलगी आपल्या मुलाला सुखी ठेवेल अशी खात्री असते.
मुलासाठी मात्र आता खूप उशीर झालेला असतो. जे आपले नाही ते शोधून उपयोग नाही. उगाच जीवाची तडफड. वडीलांच्या मनातून हा विषय काढून टाकण्यासाठी तो मयुराक्षी मरण पावली असे त्यांना सांगून एक कप्पा बंद करतो.
मध्यमवयीन अपंग मुलगीच मयूराक्षी असेल का प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो पण त्याचे उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायचे आहे. सिनेमात मयुराक्षी हे पात्र फक्त एक उल्लेख म्हणून येते.
मयुराक्षी हे नदीचे नाव आहे.
जेव्हा पाऊस येतो तेव्हा तिला पूर येतो. पाण्याचा वेग अनावर होतो. इतरवेळी तिचा प्रवाह शांत असतो. या दोन व्यक्तीच्या आयुष्यात घडणारे बदल, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम या साठी मयुराक्षीचे प्रतीक वापरले आहे.
“आयुष्य म्हणजे तरी काय! वादळात स्वतःला जिवंत ठेवून पुढे जायचा मार्ग शोधणे “ आर्यनील चे उद्गार सिनेमाची थीम आहे.
हा सिनेमा अतिशय संथ आहे. ह्या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे अभिनय.
प्रसिद्ध अभिनेता, सौमित्र चॅटर्जी यांनी सुशोवनची भूमिका निभावली आहे. सिनेमात, सौमित्र यांचे वय ऐंशीच्या जवळपास असावे. या वयात ही भूमिका समजून करणे, हे संवेदनशील माणसासाठी दिव्य आहे. त्या वेदना जाणून घेणे आणि आपणही त्या वयाच्या उंबरठ्यावर आहोत ह्याची जाणीव असणे हा विचार केला तर लक्षात येईल ही भूमिका किती कठीण असेल.
नुसते खुर्चीत बसून शून्यात पाहणे हे दृश्य पाहताना सुद्धा तुम्हाला जाणवते हा माणूस आतून संपत चालला आहे.
जसजसा काळ जातो , तशी रोगाची तीव्रता वाढते. एखादी गोष्ट, परत परत सांगणे, शब्द विसरणे, योग्य तो शब्द न आठवणे, बोलणेच थांबणे, ओळखीच्या वातावरणात सुद्धा अनोळखी वाटणे, कधीतरी हसणे आणि अचानक रडायला सुरुवात करणे , ह्या सर्व गोष्टी त्यांनी अभिनयातून दाखवल्या आहेत.
आठवणींच्या धुक्यात हरवून जाताना, जे काही छोटे छोटे स्मरणाचे तुकडे मिळतात, त्यांना घट्ट पकडून जगाचा अंदाज घेणे.
He is a treat to watch.
त्याच्या समोर प्रसेनजीत चॅटर्जी तेवढ्याच ताकदीने उभा राहिला आहे. आर्यनीलचे आयुष्य म्हणजे प्रत्येक दिवसाचा हिशोब, ह्या स्थितीला आले आहे. ना कुठेही आशेचा किरण आहे ना आनंद. माणसे हरवतात. काही जगाला दिसतात, काहींना वाचता येत नाहीत. दोघांकडे पाहिल्यावर वाटते, यात नक्की कोण स्वतःला विसरून गेला आहे!
त्याला फार संवाद नाहीत. एका हताश, अपराधाची जाणीव घेऊन वावरत असलेला माणूस काय बोलणार !
पण काही प्रसंगात न बोलताच त्याने कमाल केली आहे.
एका प्रसंगात वडिलांच्या मानेला घामोळे आले ते बघून तो हळुवारपणे पावडर लावतो. त्यांना हळूच मान तिरपी करायला सांगतो. शर्टाची बटणे उलटसुलट लावलेली पाहून, बटणे सोडून परत नीट जागेवर लावतो.
आज तो आपल्या वडिलांचा बाबा होतो.
वडील एकटे पडल्याचे दुःख, या काळात आपण त्यांच्याकडे राहू न शकल्यामुळे आलेली अपराधीपणाची भावना, बरेच काही गमावले आहे याचा पश्चाताप आणि त्यातूनच स्वतःला सावरून पुन्हा प्रवासाला सुरुवात असे अनेक पैलू आर्यनील च्या व्यक्तिरेखेत दिसतात. वडील -मुलगा हे नाते जेवढे सहज सुंदर असते तेवढेच अत्यंत गुंतागुंतीचे असते हे जाणणाऱ्या आजच्या आणि कालच्या पिढीतील सर्वांसाठीच हा सिनेमा एक आरसा आहे.
या दोन व्यक्तिरेखां बरोबर अजून दोन सहाय्यक भूमिका आहेत .
“सहाना” आर्यनील ची बालमैत्रीण. एक उद्योजिका. तिच्या बोलण्यातून नवऱ्याचा उल्लेख येतो. तो कामात मग्न असलेला उद्योगपती, मुलगी IIT त शिकायला आहे. ती एकटी असावी पण आपल्या कार्यक्षेत्रात तिने स्वतःला गुंतवून ठेवले आहे.
एक फार सुंदर प्रसंग आहे.
स्वतःचे मन मोकळे करता करता आर्यनील थकतो, हरतो आणि तिच्याच मांडीवर झोपून जातो , अगदी एका लहान मुलासारखा. त्याला आधार देऊन , ती cheer करते. तू कामाकडे लक्ष दे , परत जा, आम्ही आहोत ना असा धीर ही देते.
आर्यनीलसाठी, त्याच्या अंधाऱ्या आयुष्यातील एक रुपेरी कडा आहे ती.
हा थोडासा कुंपणावरील रोल . जरा तोल गेला तर मैत्रीला एका वेगळ्या नात्याचे रूप येईल असा. इंद्राणी हलदारने या भूमिकेला न्याय दिला आहे.
दुसरी भूमिका आहे हाऊसकिपरची.
मल्लिका ( सुदिप्ता चक्रवर्ती) ला आपल्या पेशंट ची काळजी आहे. ती कामातही चोख आहे. जबाबदार, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ, हुशार पण तरीही अलिप्त. तिच्याही जबाबदाऱ्या आहेत. तिला लहान मुलगा आहे. त्याची काळजी, घरी जाण्याची ओढ तरीही आपल्या कामाप्रती निष्ठा . हा ही रोल कठीण होता.
दिग्दर्शक अतनू घोष ने अशा पेशंटचे हरवत जाणारे जग या सिनेमात अत्यंत संवेदनशील पण तितक्याच तटस्थपणे
दाखवले आहे. हे असे प्रश्न आहेत की त्यांना उत्तरे नाहीत. ते वाढतच जाणार आहेत. आपले कर्तव्य करणे आणि एका क्षणाला मन कठोर करून सर्वांना योग्य तो निर्णय घेणे एवढेच आपल्या हातात आहे.
सिनेमाच्या शेवटी मन घट्ट करून आर्यनील परतीच्या प्रवासाला निघतो. त्यालाही पर्याय नाही. विमानतळावर मात्र, आतापर्यंत रोखून ठेवलेला बांध फुटून तो ओक्साबोक्शी रडतो. काय अप्रतिम शॉट आहे हा!
सारे विमानतळ भरलेले पण दुःखाची वाटणी होऊ शकत नाही. आपला क्रॉस आपल्यालाच वाहावा लागतो. तितक्यात एक माणूस उठतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. एक अबोल सहभाग.
सिनेमा एका सकारात्मक बिंदूवर संपतो.
उद्याचा दिवस जगायला हवा हे लक्षात आल्यावर आर्यनीलची पावले अडखळत नाहीत. शेवटी अंतर जरी पडले तरी वडिलांचा तोच आधार बनणार असतो.
इथे सुशोवंन अनेक दिवसांनी ब्रश घेऊन एक चित्र रंगवायला घेतात. उघड्या खिडकीचे , ज्यातून सूर्यकिरण आत येत असतात.
पुढील काळ नवीन आव्हाने घेऊन येणार आहे हे दोघांनाही समजलेले असते. येणारा दिवस आपला आणि तो आनंदाने घालवायचा हे ही ते समजून जातात. आयुष्य तसेही वाहते असते. थोडं हास्य, थोडं प्रेम, मायेचा स्पर्श, मी आहे हे सांगणारी मिठी . जो पर्यंत जाणीव जागृत आहेत, तो पर्यंत जगायला एवढे पुरेसे असते.
Must watch. हा सिनेमा होईचोई (Hoichoi) वर आहे.

Terrible Reality,
What exactly are we looking for in life?
Million dollar question It is !
we hardly get the answer and even if we get , its too late Chandrakantji.
प्रिया,
तुझ्यामुळे हा चॅनल आणि या सिनेमा बद्दल कळलं.
किती सुंदर लिहितेस..💜💜
*अस्तु * चित्रपटाची आठवण आली.
अस्तु चांगला सिनेमा होता सुमित्रा भावेंचा
Thank you Vidula,
आपल्यामुळे एका अप्रतिम चित्रपटाची माहिती मिळाली.धन्यवाद. हा चित्रपट हिंदी रिमेक अमिताभ व अभिषेक यांना घेवुन होवु शकेल. असे वाटते.
Thank you Ram .
खरे आहे ,
सरकार मध्ये ही त्यांनी उत्तम केले होते
एक चांगल्या चित्रपटाची कथा समजली..किती छान लिहिले आहे!
Thank you Nilima Taai.
मयुराक्षी… सद्यपरिस्थितीत अशा संवेदनशील भावनोत्कट आव्हानांना सामोरं जावं लागु शकते हा विचार छान मांडला आहे. खूप सुंदर परिक्षण!
Thank you Praful Patil ji.