Skip to content

मदन मोहन –लता मंगेशकर

भाग १
————
माझ्या काका आणि मामांकडे दीड दिवसाचा गणपती असतो. घरचा प्रसाद दाखवून कितीतरी वर्षे मी दोन्ही गणपतीला जायचे. एका वर्षी मात्र गणपतीच्याच मनात नसावे. आम्ही रस्ता चुकलो. अंधारून आलेले आणि पाऊस तुफान. मुंबईत ट्राफिक जाम नेहेमीच असतो. तो आज जाणवण्याइतपत कंटाळवाणा. त्यात फ्लाय ओवर्स ची कामे सुरु. रस्ते ठीक ठिकाणी बंद. आम्ही वन वे मध्ये घुसलो. पुढे डेड एंड. चिंचोळी गल्ली, ही गर्दी; त्यात दोन्ही बाजूने  पार्किंग. मधेच मंडप . आणि तिथेच कर्कश आवाजात गाणी. कोणाला विचारण्याची सोय नाही . गाडी पाठी घेताना ती खड्यात  रुतली आणि जगदीपचा संयम सुटला. 

” बस तुझा गणपती. मी नाही येणार या पुढे. सरळ घरीच जाऊया “
” अरे, असे काय करतोस! मी कधीच चुकवला नाही “
” मग आता चुकव. मी नाही येणार. तुला पाहिजे तर उतर आणि जा. एक गणपती पुरे. सगळे सारखे “

उतरायचे का?  एक क्षण वाटले पण हा भडकला असता. त्याचीही चुकी नव्हती. रस्ता अर्धा कापलेला. पुढे का मागे यात त्याने, त्याला योग्य, ती त्याची दिशा  ठरवली. स्टीअरिंग त्याच्या हातात. मुकाट घरी आले.
नंतर कितीतरी वर्षे मला ती खंत होतीच. थोडीशी भीती सुद्धा. काही वाईट नाही न होणार …
साधी गोष्ट पण नाही निर्णय घेता आला.
असे किती क्षण येतात आयुष्यात. इकडे आड आणि तिथे विहीर. बऱ्याच वेळी मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतो. कधी स्व:ताच्या हृदयाला स्मरून कधी मेंदूला. कधी स्वताच्या सुखासाठी पाऊल उचलले जाते कधी दुसऱ्यासाठी स्वतःला  थांबवले जाते.
महत्वाचे असते ते त्या क्षणाला स्मरून निर्णय घेणे आणि त्याला निभावणे. जेवढा वेळ घालवू , तेवढे मनावरचे ओझे फक्त वाढत जाते. कोणत्याही निर्णयापेक्षा, न घेतलेले निर्णय आयुष्याचा चुराडा करतात.
जिथे तत्वांची लढाई असते, तिथे मात्र निर्णय घेणे ही आपली परीक्षा असते. आपल्या माणसांचा आनंद महत्वाचा की स्वतःचा, देश महत्वाचा की धर्म, आयुष्य मह्त्वाचे की कर्तव्य , लिहिण्याएवढे हे सोपे नाही. अनेकवेळा क्षणिक चूक दुसऱ्यांना महागात पडू  शकते आणि त्या अपराधाची जाणीव आयुष्य कुरतडून टाकते. 
A moral dilemma is equally tough . It may cause us to diverge from our paths and choose a new one or narrow down the destinations altogether , either way it changes the course of our life.

 १) रस्मे उल्फत को निभाए .
(सिनेमा -दिल की राहे, गीतकार-नक्श लायलपुरी, आवाज-लता मंगेशकर)

ह्या गीताचा विडिओ नाही. आंतरधर्मीय प्रेम हा सिनेमाचा विषय होता. 

रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे
हर तरफ़ आग है दामन को बचाएं कैसे

सारे जगच प्रेमाच्या विरुद्ध असेल तर माझ्या प्रेमाला मी कसा न्याय देऊ ? प्रश्न कठीण आहे. ज्यांच्यासाठी वचनांचे महत्व आहे त्यांच्यासाठी स्वतःला वाचवणे खरंच कठीण आहे. एका बाजूला आपले आईवडील, आपले जीवलग, समाज, ज्या परंपरेत आपण वाढलो ते रीतिरिवाज आणि दुसऱ्या बाजूला आपला प्रेमी.
कोणाचे पारडे जड होणार हे स्वतःच्या मनाला सुद्धा विचारून अर्थ नाही कारण मन फितूर आहे.

दिल की राहों में उठते हैं जो दुनिया वाले
कोई कह दे के वोह दीवार गिराएं कैसे

विरोध ज्यांना करायचे ते सुद्धा कधीकाळी आपलेच तर होते, केवळ स्वतःसाठी त्यांना परके करणे कसे शक्य आहे!
केवळ विरह वेदना सहन कराव्या लागल्या असत्या तर त्याही केल्या असत्या पण त्याच्याशिवाय जगणंच ओझे झाले असेल तर आयुष्य कसे कंठायचे हा प्रश्न आहे. 

बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते
ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाएं कैसे
Rasm e ulfat is a dilemma song, from the movie Dil ki rahen, a flop movie, and the nice songs of this movie suffered as a result.
मदन मोहन यांच्या आयुष्यात हा आशा  निराशेचा खेळ अनेक वेळा नियतीने खेळला. त्यांच्या कर्तबगारीला शोभेसे यश काही नियतीने त्यांच्या पदरात घातले नाही पण रसिकांच्या मनात मात्र त्यांची गाणी अजरामर झाली. काळाला जिंकून उरली.
The unbeatable combo of Madan -Lata gave us many eternal hits.


ओपी नय्यर एकदा म्हणाले होते, “ मदन मोहनला,  लतासाठी का लताला मदन मोहनसाठी, देवाने खरंच कुणाला,  कुणासाठी बनवले असेल! “ आपकी नज़रो ने समझा “ आणि “ है इसी में प्यार की आबरू” ह्या दोन गीतांच्या बदल्यात नौशाद यांनी आपले संगीत देऊ केलं होते. असे म्हणतात,  भाई भाई या सिनेमातील “ कदर जाने ना “ गझल सम्राज्ञी,  बेगम अख्तर यांना एवढे आवडले होते की त्यांनी दस्तूर खुद्द मदन मोहन यांनाच  टेलिफोन करून, गायला लावले होते. सर्व संगीतकार, गायक यांनी गौरवलेला एकमेव संगीतकार म्हणता येईल, ज्यांच्या संगीताविषयी कुणाचेही विरुद्ध मत नसावे.

२५ जून  १९२४ मध्ये,  बगदाद येथे मदन मोहन यांचा जन्म झाला. काही वर्षे कामानिमित्त, मध्य पूर्वेत राहिल्यानंतर, त्यांचे वडील राय बहादूर चुनीलाल,  लाहोरला स्थायिक झाले.  इथेच मदन मोहन यांचा  संगीताशी परिचय झाला.  हिमांशू रॉय यांच्या बॉम्बे टॉकीज मध्ये  राय बहादूर पार्टनर झाले आणि सारे कुटुंब, मुंबईला स्थायिक झाले.
सिनिअर केम्ब्रिजची परीक्षा झाल्यावर, वडिलांच्या आग्रहामुळे मदन मोहन यांनी डेहराडून येथील सैनिकी प्रशालेत प्रवेश घेतला.  दोन वर्षे सैन्यात चाकरी केली खरी पण संगीत हा त्यांचा श्वास होता. जागतिक महायुद्ध संपल्यावर त्यांनी सैन्यातली नोकरी सोडून,  AIR लखनौ येथे नोकरी स्विकारली.  शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले नव्हते. त्यांची संगीताविषयी असलेली जाण हे ईश्वरी वरदान असावे पण रेडिओवर त्यांचा अनेक गायक, संगीतकार आणि वादक यांच्याशी संबंध आला आणि दैवदत्त देणगीला ज्ञानाची जोड मिळाली. 
सत्तेचाळीस साली रेडिओ मधील नोकरी सोडून मदन मोहन मुंबईत आले. गुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केलेल्या “पिंजरे में  बुलबुल बोले “ ह्या गीतासाठी, लता मंगेशकर यांच्याबरोबर गायची त्यांना संधी मिळाली.  जिच्याबरोबर त्यांनी आपले पहिले गीत गायले, तिच्याच साथीने त्यांनी सिनेसंगीतात आपले नाव कोरून ठेवलं.
When you listen to his songs sung by Lata,  you could clearly feel the strong emotional connection between the singer and the composer.
मदन मोहन यांचे हे जन्म शताब्दी वर्ष. त्यांची सर्व गाणी एका पोस्टमध्ये येणे कठीण. काही बंधने स्वतःवर लादून घेतली तर ते काम थोडे सोपे होईल म्हणून ही पोस्ट फक्त मदन मोहन आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांची.

२) चांद मध्यम है
सिनेमा -फूटपाथ, गीतकार -साहिर लुधियानवी )

आठवणी, मग त्या कसल्याही असोत, आनंदाच्या किंवा विरहाच्या, त्या असतात छळंवादीच. हुरहूर लावणाऱ्या.  गेलेले क्षण, जातात त्यांच्या प्रवासाला आणि आपण मात्र ती वाट निरखत बसतो. दिवसाच्या लखलखाटात त्या पुसट होत असतील पण रात्रीच्या अंधारात मात्र त्यावरील काजळी जाते. परत फिरून मनाचा ताबा घेतात त्या.

चांद मद्धम है आसमां चूप है ,
नींद की गोद में जहाँ चूप हैं .
दुधाळ चांद रात्री, निद्रादेवीच्या कुशीत, सगळे जग झोपी गेलं असताना, ती मात्र आपल्या प्रियकराची वाट पाहत, रात्र जागवत आहे. The song is a passionate request to her beloved to come back while she is still young .

रोज की तरह आज भी तारे, सुबह की गर्द में न खो जाये
आ तेरे गम में जागती आंखे, कम से कम इक रात सो जाये

दिवस उजाडायला आता थोडाच वेळ आहे . नेहेमीप्रमाणे हे तारे सुद्धा थकून विश्रंती घेतील . पण माझ्या थकलेल्या डोळ्यांचे काय ! आता तरी परत ये . या डोळ्यांना समाधानाने तुला साठवून घेण्याचे भाग्य मिळूदे .
हा न संपणारा विरह,  एकटेपणा आणि कधीही पुरी न होणारी आस.  The song depicts the deep anguish, loneliness and futile desire of a girl.
प्रेमाचे अंतिम गंतव्य विरह हेच असावे , त्यामुळे प्रेम अमर होते. 

दूर वादी में दूधिया बादल, झुक के परबत को प्यार करते है
दिल में नाकाम हसरतें लेकर, हम तेरा इंतज़ार करते हैं

दूर दरी मध्ये चंद्रप्रकाशात न्हाहून निघालेले ढग, खाली वाकून पर्वताला कुरवाळत आहे. काय सुंदर कल्पना आहे ना ! लताचा आवाज इथे एवढा हळुवार होतो. माझ्यासाठी मदन मोहन यांची ही  सर्वश्रेष्ठ रचना आहे.

असे म्हणतात, शांतता बोलकी असते पण त्यासाठी दोन माणसे एकमेकांशी जोडलेली असणे आवश्यक असते. हृदयाचे हृदयाला समजणे ही प्रेमिकांची भाषा आहे. डोळे बोलतात, स्पर्श सांगतो, शब्द खरंच फार तोकडे ठरतात.
शब्दांची गरज तेव्हाच भासते जेव्हा माणूस अनोळखी होऊ लागतो,.
“ spell it out “ हे आपण केव्हा बोलतो माहित आहे, जेव्हा नको ते ऐकण्याची भीती वाटत असते. एकदाचा सोक्ष मोक्ष लावू दे ही गरज असह्य ताणातून आणि निराशेतून येते.

३) वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है 
( सिनेमा -जहाँआरा, गीतकार-राजिंदर कृष्ण)
Someone has said ,” Silence was not the absence of sound but was itself a sound that could be loud or soft, soothing or disturbing, complex or simple.”

वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है 
वो बात करले तो , बुझते चिराग जलते है ….

जेव्हा दोघांचे डोळेच बोलतात आणि स्पर्श सांगायचे काम करतो, तेव्हा शब्दावाचून कळले सारे , शब्दाच्या पलीकडले .  हा एकांत खूप बोलका आणि हवाहवासा …पण कधी कधी शब्दच आटून जातात . बोलण्यासारखे विषयच राहत नाही . फक्त नको वाटणारे अस्तित्व जाणवत राहते … हा एकांत मात्र बोचरा. 

कहो बुझें कि जलें, हम अपनी राह चलें
या तुम्हारी राह चलें
बुझे तो ऐसे कि जैसे किसी ग़रीब का दिल
जलें तो ऐसे कि जैसे चिराग़ जलते हैं

“रस्मे उल्फत को निभायें, तो निभाएं कैसे” ह्या गीताच्या पुढची स्थिती आहे ही. अनिश्चितता आता असह्य झाली आहे. पुढे काय हा विचार करण्यापेक्षा , आता जे आहे ते स्विकारायची माणसाची तयारी आहे. प्रेमात एक तर होकार नाहीतर नकार. आनंद किंवा दुःख दोन्ही पेलण्याची तयारी जेव्हा होते तेव्हा प्रेमी निर्वाणीचा  इशारा देतो.
एक तर हो सांग किंवा नाही .. आयुष्यातील अंधार ही मला मान्य आहे पण झिजत मरणे आता सहन होत नाही. 

ती मुघल खानदानात जन्म घेतलेली राजकन्या आहे. लग्न न करण्याचा अभिशाप घेऊन जन्माला आलेली. तख्तासाठी असलेली स्पर्धा जीवघेणी. एक तर सिंहासन किंवा कबर हाच पर्याय. स्पर्धा टाळण्यासाठी राजकन्यांना कुमारी ठेवत पण प्रेम नियम पळत नाही  अशावेळी जग जरी बाजूला असेल तरी हवी असलेली व्यक्ती नसलेले जग म्हणजे नियतीने कपाळावर कोरलेला एकांतच .

ये खोई खोई नजर 
कभी तो होगी इधर, या सदा रहेगी उधर 
उधर तो एक सुलगता हुआ है विराना
मगर इधर तो बहारो में बाग जलते हैं 
त्याच्या आयुष्यातील अंधार दूर करायला तयार आहेत अनेक दिवे पण ते अंधाराला समजायला हवे न !

खरेतर नियतीने “लैला मजनू “आणि “मौसम”  यशस्वी करून यशाचे दान दिले होते पण मदन मोहनचा धीर सुटला होता. त्याच्या आधीच ह्या दुनियेला नाकारून त्याने वरची वाट धरली. ह्या गीतात रामदासी मल्हार आणि जयंत मल्हार या रंगांचा उपयोग केला आहे . अंतरा मध्ये मधुवंती डोकावून जातो.
राग ह्या कलाकाराच्या सेवेला हजर असावेत असे वाटण्यासारखी ही रचना आहे. नाहीतर रूढार्थाने शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण न घेतलेला अशी मेलडी निर्माण करणे अशक्य आहे.
जहाँआरा सिनेमा पडला पण यातली गाणी अत्यंत गाजली.

४) हाल-ए-दिल यूँ उन्हें सुनाया गया
( सिनेमा-जहाँ आरा, गीतकार-राजिंदर कृष्ण) 

तशी ही सुद्धा नशिबाने केलेली प्रतारणा.
What you do speaks so loudly I can’t hear what you are saying.― Henri Adams ने म्हंटलेले प्रसिद्ध वाक्य आहे.
आपले शब्द कुणाच्या कानावर पडूनही त्याला ते न समजणे किंवा जे बोलायचे आहे ते बोलता न येणे.  दोन्ही दुर्दैवी.
एकवेळ शब्द न ऐकणे किंवा ऐकूनही पाठ फिरवणे, दुसऱ्याचा मार्ग मोकळा करते पण काहीही न बोलल्याने, काहीच  न घडलेले उघड्या डोळ्यांनी पाहणे ही माणसाची घुसमटच.
मुघलांच्या जनान्यात राजकन्येचा वनवास अटळ होता . तिच्या पूर्वजानीच लिहिला होता . तख्तासाठी असलेली स्पर्धा जीवघेणी होती . एकतर सिंहासन किंवा कबर . वारशांसाठी हाच पर्याय खुला असल्याने गादी साठी होणारी भांडणे टाळण्यासाठी राजकन्यांना लग्न करण्याची परवानगी नव्हती . परपुरुषाचे दर्शन जरी झाले तरी मृत्यू निश्चित  पण प्रेम या अडचणींना जुमानत नाही . ते  व्हायचे तेव्हा होतेच . परिणामाची शक्यता मात्र डोळ्यासमोर दिसत असेल तर त्याला तोंड देण्याची कुवत फार कमी  जणांत असते . 
स्वतःबरोबर प्रियकराचा जीव धोक्यात घालायचा का आपली नियती  मुकाट स्वीकारायची ?  

इश्क  की वो भी एक मंजिल थी 
हर कदम पे फरेब खाया गया
हाल-ए-दिल यूँ उन्हें सुनाया गया… 

आमच्या जवळ एक काका रहातात. सगळ्यांचेच काका. माझी त्यांच्याशी ओळख बाबांचे ब्रीज पार्टनर म्हणून.
सर्वाना मदत करायला तत्पर  आणि ती ही हसतमुखाने. एकटेच रहातात पण त्याची खंत आम्हाला तरी जाणवली नाही कधीच .  त्यांच्याकडे जुन्या रेकॉर्ड्सचा मोठा संग्रह आहे. दोन तीन महिन्यातून एकदा जमतो आम्ही. अशीच मैफिल रंगात आली होती आणि आमीर खान यांचा मारवा सुरू झाला. काकांचा चेहराच त्या स्वरांच्या सरीत चिंब भिजलेला. मन पिळवटून टाकणारी वेदना. नेहेमीचा हसरा मुखवटा उघडा पडलेला. आत दाबून ठेवलेल्या आठवणी आक्रमक .लांबून कुजबुज. 
पुढे झालेला हात मी मागे घेतला. किती तरी दिवसांनी आम्मा आठवली. पाणी पापण्याच्या बाहेर येता कामा नये असे बजावणारी. ओठ घट्ट मिटून घेणारी. अकाली गेलेल्या मुलाच्या फोटोवरून हात फिरवणारे,  आम्ही दिसल्यावर डोळे कोरडे करणारे बाबा आठवले. नवऱ्याच्या मागे एकटीने मुलांना वाढवताना हसणे आणि रडणे दोन्ही विसरलेली वहिनी आठवली आणि हळूच काकांना न सांगता दार ओढून घेतले.

५)आज सोचा तो आँसू भर आये मुद्दते हो गयी मुस्कुराये 
( सिनेमा- हसतें जख्म –गीतकार -कैफी आझमी ) 

आज सोचा तो आंसू भर आए
मुद्दतें हों गई मुस्कुराये
कोणीतरी इथेच लिहिले होते, फेसबुक आहे म्हणून मानसिक रोग आटोक्यात आहेत. मेलोड्रामा आणि मानापमानाच्या खोट्या बंधनात अश्रूंना कोंडून ठेवले आहे आपण. त्यामुळे त्यातील सहज सौंदर्य लक्षात येत नाही आपल्या. नुसते खारे पाणी नाही ते, एक एक थेंब त्या क्षणाला चिकटलेल्या भावनांशी निगडीत आहे… प्रेम, विरह, वेदना, अपमान. वंचना आणि… आनंद सुद्धा. खरेतर त्या क्षणांचे अर्ध्य देऊन रीते व्हावे माणसाने. पुढचा प्रवास सोपा होतो. 

हर कदम पर उधर मुड़कर देखा
उनकी महफिल से हम उठ तो आए
आज सोचा तो आंसू…

मागे वळून पहिले की लक्षात येते , पर्याय होते पण नाही घेतले. अडचणी काही होत्या, अगदी खऱ्या खुऱ्या . जरा धीर धरला असता तर सुरळीत झाले असते , मनासारखे पण सोयीस्कर पर्याय स्वीकारला गेला आणि मनाचा कौल नाकारला . 
शांत बसले की केलेली  चुक आणि हुकलेली संधी  परत मागे पाहायला भाग पाडतात.
परतीचा रस्ता नसतोच पण तरीही अश्रूंना समजावता येत नाही न !

दिल की नाज़ुक रगें टूटती हैं
याद इतना भी कोई न आए
आज सोचा तो आंसू…
हृदय पिळवटणाऱ्या आठवणी उधारीचे हास्य घेऊन विसराव्या लागतात हे खरंच.
अनेक नायिकांना देखणे करण्यात मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचे योगदान आहे. जीव ओतून केलेली गाणी अजरामर झाली आणि त्यांनी नायिकांना सुद्धा रसिकांच्या मनात स्थान दिले , अगदी मनात नसूनही.
दगडी चेहेऱ्याला बाईंनी सुरेल बनवले . ” आज सोचा तो आंसू भर आये”  हे अजरामर गीत प्रिया राजवंशवर चित्रित झाले आहे .
हसते जख्म बॉक्स ऑफिसवर चालला.
हिंदुस्थान की कसम चे भाग्य तेवढे चांगले नव्हते. हसते जख्म मध्ये एक प्रिया राजवंश आहे , ह्या सिनेमात दोन.
लता सुद्धा आवाज देईल पण प्रेक्षकांची सहनशक्ती कशी वाढवणार बिचारी ! आपटला सिनेमा पण ह्यातली गाणी फार सुंदर आहेत.

६)है तेरे साथ मेरी वफा , मै तो नही क्या
( सिनेमा हिंदुस्थान की कसम , गीतकार -कैफी आझमी)
१९७१ च्या युद्धात, भारतीय हवाई दलाने जी कामगिरी केली त्यावर हा सिनेमा आधारित आहे. इंडियन एअर फोर्स क्राफ्ट चा उपयोग या सिनेमात केला आहे. शूटिंग करताना, युद्धात कामगिरी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घेतली गेली होती. 

चेतन आनंद यांचं प्रिया राजवंश वेड, सिनेमाला डब्यात घेऊन गेले.
प्रिया राजवंश हेर आहे. पाकिस्तानी रेडिओ वर गात असताना भारतीय सैन्याकडून युद्धाला तोंड फुटते. त्याचवेळी तिची खरी ओळख समजल्याने पाकिस्तानी सेनाधिकारी तिला पकडण्यासाठी येत असतात. आपल्या प्रेमीला ती या गीतातून शेवटचा निरोप देते. 
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तिचे धैर्य आणि तिचे प्रेम , या दोन्ही भावना , शब्दात फार सुंदर मांडल्या आहेत. 

कुछ धड़कनों का ज़िक्र हो, कुछ दिल की बात हो
मुमकिन है इसके बाद, न दिन हो न रात हो
मेरे लिये न अश्क़ बहा, मैं नहीं तो क्या
है तेरे साथ मेरी वफ़ा   

प्रेमाचे अनेक समानार्थी शब्द आहेत . वफा, एकनिष्ठता हा महत्वाचा शब्द. प्रेम सच्चे असण्याची महत्वाची खूण. माझे शरीर नसेलही पण जीव तुझ्यातच गुंतला असेल याहून दुसरे काय मोठे आहे! 
मला एकाहत्तरच्या युद्धात हुतात्मा झालेल्या  एका वैमानिकाची आठवण येतेय. तो गेला तेव्हा त्याची मुलगी एक वर्षाची होती. आईने मुलीला वाढवले, मोठे केलं..तिचे लग्न झाले तेव्हा बातमी पेपरात आलेली  
“तुम्हाला दुसरा विवाह करावासा वाटला नाही?” 
या प्रश्नाला तिने सांगितले, “ तो गेला असे कधी वाटलच नाही. त्याच्या आठवणी माझ्यासाठी जिवंत होत्या .” 
प्रेमाला भांडवल आणि लग्नाला व्यवहार समजणाऱ्या अनेकांसाठी हा वेडेपणा असेलही पण मदन मोहन यांच्या अनेक गीतांत ही भावना दिसून येते.
संगीताच्या दर्जाशी त्यांनी तडजोड केली नाही. संगीताशी निष्ठा का अपयश यात पाहिल्याशी बांधिलकी असल्याने अकाली मृत्यू झालेल्या संगीतकारासाठी प्रेम या शब्दाचा अर्थच निष्ठा होता.
असेन मी , नसेन मी , तरी असेल गीत हे ..शांता शेळके यांच्या कवितेची आठवण झाली ना.

चेतन आनंद यांचा पहिला युद्धपट , जो १९६२ च्या चीन भारत युद्धावर आधारित  होता, तो  प्रचंड गाजला.
अत्यंत वादळी विषय, इतिहासाशी प्रामाणिक, खरी वाटणारी युद्धदृश्ये आणि अभिनय या बरोबर अजून एक बलस्थान होते ते याचे संगीत.

७)जरा सी आहट होती है तो दिल सोचता है
( सिनेमा -हकीकत, गीतकार-कैफी आझमी )

खलिद हुसेनी मस्त बोलून गेला आहे ““…of all the hardships a person had to face none was more punishing than the simple act of waiting.”
But waiting is also the first step of falling in love . It teaches you to be tolerant and forgiving . Waiting is yearning .  प्रत्येक पावलाची चाहूल तिच्या हृदयाचा ठोका चुकवते.
हा तोच आहे … Is it really him?. 
पहिल्या भेटीची आतुरता आणि उत्सुकता शब्दात मांडता नाही येणार. एकमेकांची ओळख पटलेली असते. मनाची,  नजरेची भेट हा निव्वळ सोपस्कार असतो आणि मग घरातील सर्वाना चुकवून भेटण्याचा तो क्षण येतो.
थोडीशी धास्ती असते. पकडले जाण्याची भीती सुद्धा . मनाने लाजेचे पहारे झुगारून दिले असतात पण नजरेने नाही . भेटीची वेळ जस जशी जवळ येवू लागते तस तसे सर्वच किंतु विरतात. सर्व इंद्रियांचा फोकस एकीकडे एकवटतो .

कही ये वो तो नही ?

शक्ल फिरती है निगाहों में वही प्यारी सी
मेरी नस-नस में मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा, किसके दामन की
कही ये वो तो नही ?

डोक्यात तोच , मनात तोच आणि डोळ्यात सुद्धा त्याचेच चित्र असेल तर वाहणारी हवा सुद्धा त्याचा गंध लेवून येते . 

चेतन आनंदच्याच “हीर रांझा”  या सिनेमात प्रिया राजवंश आणि राज कुमारला घेऊन दिग्दर्शकाने मूळ जोडीवर अतिशय अन्याय केला आहे. त्याची भरपाई मदन मोहन आणि लता यांनी थोड्या प्रमाणात का होईना केली.
सिनेमा तुफान चालला कारण सिनेमाचे संगीत नाहीतर दोन ठोकळे एकमेकांवर प्रेम करताना पाहणे हे असहनीय आहे.

८)मिलो न तुम तो हम घबराये , मिलो तो आँख चुराये
( सिनेमा-हीर रांझा, गीतकार–कैफी आझमी )

मैत्रिणीच्या घोळक्यात त्याला शोधणारे डोळे, तो नजरेस पडल्यावर झुकतात. हृदयात जे लपविले आहे ते सारे गुज त्याला सांगून मोकळे व्हावे असे वाटत असतानाच, साऱ्या हृदयाचाच ताबा तू घेतला आहेस हे ओठातून बाहेरच पडू शकत नाही , नजरेनेच बोलायचं म्हंटले तर ती ही साथ देत नाही अशी विचित्र अवस्था होते खरी .

रूठे कभी कभी मान गये,बातें तुम्हारी हम जान गये
ऐसी अदायें क़ुरबान गये; तुम्हें मनाये दिल बहलायें
क्या क्या नाज़ उठायें
हमें क्या हो गया है …

कधी उगाच चिडतोस आणि मग हळूच माफी मागतोस . ही खोडी तू मुद्दाम माझे लक्ष स्वतःकडे खेचून घेण्यासाठी करतोस ते माहित आहे मला . पण मी ही वेडीच झाली आहे की तुझ्या प्रेमात . रागवायचे सोडून तुझ्या मनाला जपते हा मनाचा खुळेपणा मलाही समजतो पण उमजत नाही त्याला मी तरी काय करू !
एकदा मनाची खात्री पटली की ओठावर शब्द येतात. कधी मैत्रिणीच्या मदतीने, कधी चिठ्ठीतून तर कधी स्वतःलाच धीर देऊन प्रेम उघड केले जाते. आमच्यावेळी सर्वांकडे फोन नव्हतेच. कोणाकडे निरोप ठेवला तरी त्याची बातमी व्हायची . . लाज हा शब्द फक्त शब्दकोशात नव्हता. होकार असेल का नकार हा किंतु तर असायचाच शिवाय जर नाही म्हंटले तर तो पचवता येण्याची क्षमता त्या काळात खरंच नव्हती. ही नाही तर दुसरी ही अगदी निर्ढावलेल्या मुलांचीसुद्धा मानसिकता नव्हती . प्रेम करणेच ,हिमालय चढण्याहून कठीण . त्यामुळे असेल , एकदा पडले की त्यातून बाहेर येणे नाही जमले बऱ्याच जणांना .

मदन मोहन शापित गंधर्व असावा. देवाने जे काही भरभरून दिले ते नियतीने हिसकावून घेतले. संगीतावर भारत भूषण सारख्या हिरोचा बैजू बावरा चालला पण ते भाग्य काही जहाँआरा च्या नशिबात नव्हते. देख कबीर रोया, बहाना, मनमौजी, आशियाना, अदालत या सर्व सिनेमातली सर्वच गाणी अप्रतिम आहेत. पूर्ण अल्बम अत्यंत चांगला असूनही , सिनेमा न चालल्याने अवॉर्ड्स आणि कीर्ती याने या गुणी संगीतकाराकडे पाठ फिरवली.
सिनेमा जग अत्यंत स्पर्धात्मक आहे. ही स्पर्धा निकोप नाही. ज्याच्या हातात सिनेमा, त्याच्या हातात पैसे आणि त्याच्याच हातात रेकॉर्डिंग स्टुडिओ च्या चाव्या. अनेकवेळा तारीख मिळवण्यासाठी अनेकांच्या दारात या संगीतकाराला जावे लागले. हे सगळंच आतून खचवणारे. सांगायचे कुणाला ! 
जिथे पैसे, प्रसिद्धीचा, स्पर्धेचा संबंध असतो, तिथे मदत करणारे हात ही पुढे येत नाहीत. ह्याची तक्रार करूनही काही उपयोग नसतो. करणारे जे , त्यांच्याच कडून काय न्याय मागणार !

९)उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते
(सिनेमा – अदालत, गीतकार- राजिंदर कृष्ण)
एकेकाळी परस्परांशी गुप्ततेने विवाहबद्ध झालेले दोघे, त्यातून राहिलेला  गर्भ .
समाजाची मान्यता नसल्याने माथी आलेली  अवहेलना आणि नशिबाचा फेरा. 
परिस्थितीत आता पडलेलं अंतर बरेच आहे . 
विवाहवेदीवरून कोठ्यावर पोचलेली ती आणि तो प्रतिष्टीत  वर्गात  गणला जाणारा. त्यात तिच्या मुलाचे भवितव्य तिने गप्प राहण्यात  आहे हे ठाऊक  आहे तिला.  

“अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते” ही सवय आता अंगवळणी पडलेली . 

कहने को बहुत कुछ था अगर कहने पे आते
दुनिया की इनायत है के हम कुछ नहीं कहते
उनको ये शिकायत है…
असहनीय या शब्दाच्या पलीकडे  जाणारी ही भावना आणि वेदना .

मदन मोहन यांच्यावरील लेखाचा हा पहिला भाग. उणेंपुरी एकोणपन्नास वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या सरस्वती पुत्राचे हे जन्म शताब्दी वर्ष. त्यांना जाऊन आज पन्नास वर्ष होतील. आजची बातमी उद्या शिळी होणाऱ्या या काळात ही गाणी ऐकली जातात, गायली जातात आणि गौरवली जातात याहून कोणता पुरस्कार मानाचा आहे !

To be continued 

14 thoughts on “मदन मोहन –लता मंगेशकर”

  1. उदय शेवडे जी

    शापित चित्रपटांचा यशस्वी संगीतकार असं थोडक्यात वर्णन करता येईल. हा माणूस म्हणजे एक चमत्कार होता.

    लेख गाणी उत्तम ! आणि काकांचा किस्सा हेलावून गेला.

    1. Thank you Uday ,
      हो खरंय.
      तो काय , जयदेव काय
      त्यांच्या हयातीत काही त्यांना दिले नाही रसिकांनी .
      नंतर डोक्यावर घेतले

  2. Madhav Bhokarikar

    संगीत व साहित्यात नवरस सांगीतले आहेत, त्यात श्रृंगार रसाला, रसांचा राजा म्हणतात; मात्र या रसासोबत ज्यावेळी करूणरस येतो, त्यावेळी ती वेदना दुधारी असते. आपले आहे, आणि मिळत नाही, ही अंतरीची भळभळती वेदना असते, यांत काय नसते ? आपली फसवणूक असते, जगाच्या व जगातील माणसांबद्दल असलेल्या विश्वासाला तडा गेल्याचा धक्का असतो, कोवळ्या व अधुऱ्या मनाने बघीतलेल्या स्वप्नांचा चुराडा असतो.

    खूप व मनांतील त्यातल्या त्यात, परिपूर्ण असे सांगता येईल, अशी वेदना फक्त मग सांगता येते, ती स्वरातून ! मग ती तोडीतून असो, मारव्यातून असो, आसावरीत असो, शोमन राजकपूरला आवडणाऱ्या शिवरंजनीमधील असो, का गायनाच्या असो वा राहूलदेव बर्मनच्या रचनेत सांगायचे, तर ‘हमे तुमसे प्यार कितना, ये तुम नहीं जानते, मगर जी नहीं सकते, तुम्हारे बिना ‘ या शेवटी म्हटली जाणाऱ्या भैरवीतील असो !

    बस ! थांबतो. आज पहिल्यांदा आपल्या ब्लॅागवर लिहीतोय !

    1. Thank you Madhav Bhokarikar sir,
      अप्रतिम प्रतिक्रिया सर .
      खरे आहे , वेदनेतून उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती होते आणि मदन मोहन तर दर्द चा बादशहा .
      उत्तम असून त्याला राजाश्रय नाही हे दुःख कुणालाही खचवू शकते. तो गेला , झुरुन गेला आणि गाणी अजून सुरेल झाली

  3. मदन मोहन
    लता
    हे असं काही विलक्षण अद्भुत रसायन आहे की वर्णन करायला शब्द अपुरे.
    तू अप्रतिम लिहिलं आहेस.
    क्रमशः असल्याने आणखी वाचायला मिळेल.❤️❤️❤️❤️

    1. Vidula , Thank you.
      हो ,
      एकतर दिवाळी अंकासाठी आहे ..रफी आणि मदन मोहन , त्यामुळे तो नंतर येईल .
      पण काही भाग असतील . या वर्षात घालेन हळूहळू
      त्यांची गाणी ऐकणे हे बक्षीस

  4. Anuradha Yadwadkar

    फारच सुरेख लिहिलं आहेस नेहमीप्रमाणे.
    मी देखील मदनमोहन यांची फॅन आहे.
    दस्तक सिनेमातील गाणी तू बहुतेक पुढील पोस्टसाठी राखीव ठेवली असावीस.
    त्या गाण्यांनी एकेकाळी जबरदस्त वेड लावले होते.
    त्यातील
    बैयां ना धरो ओ बलमा
    हम हैं मता ए कुचा..
    माईरे….
    सगळीच अजूनही व्यवस्थित आठवतात..मी गुणगुणत असते.
    यातील माई रे हे मदनमोहन यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले बहुतेक एकमेव गाणे होते.दुसरी कोणती गाणी त्यांनी गायली होती का नाही माहित नाही,पण माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव होते आणि लता दिदिंपेक्षा त्यांच्या आवाजातील गाणे जास्त भावले होते.
    पुढचा पार्ट वाचायला आवडेल.❤️

    1. अनुराधा, थँक यु.
      हो वो कौन थी, दस्तक आणि मेरा साया ह्या तीनही चित्रपटांना हात लावला नाही.
      त्याला यश देणारे हे मोजके सिनेमा.
      तो शापित गंधर्व होता. आपले काम संपवून निघून गेला

  5. Ratnakar A Markandeywar

    Prologue खूपच सुंदर आहे. I will not spoil the feelings now. गाण्यांविषयी नंतर वाचेन.

  6. एका मनस्वी कलाकाराला चित्रपटसृष्टीत म्हणावे तसे कौतुक वाट्याला नाही आले.
    हम तो है मता_ए _कुचा… ऐकावं आणि भावना डोळ्यातून मोकळ्या कराव्यात..

    1. True, Kamini,
      खरंच , तो शापित गंधर्व होता. आपले काम संपवून निघून गेला

Leave a Reply to Kamini Amrutkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *