निर्मनुष्य रस्ता, छातीत धडकी भरवणारी वळणे, मिट्ट काळोख, अवकाळी आलेले तुफान, पावसाच्या वेगाला रोखून धरण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे वायपर्स आणि त्यात कसाबसा आपला मार्ग शोधणारी गाडी.
निरव शांततेत सोबत आहे ती फक्त ओल्याचिंब झाडांची.
अचानक डॉ आनंद ओठावर आलेले अपशब्द परतवतो आणि कचकन ब्रेक मारतो. सोसाट्याच्या वाऱ्यात, बेधुंद पावसात तसे काहीच दिसत नसले तरी होणारा अपघात मात्र टळतो. भर रस्त्यात समोर येते एक धवल वस्त्रांकित सुंदर युवती.
निश्चल, निर्विकार. चेहेऱ्यावर साऱ्या दुनियेला वेडे ठरवणारे मंद हास्य.
“ ऐकायला येत नाही का? बाजूला हो “ ड्रायव्हरच्या रागावलेल्या स्वराचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही.
चीड आली तरी तो एक डॉक्टर असतो. ज्याचे कामच जीवदान देणे, तिच्या बेदरकार, काहीश्या उद्धट स्वराकडे दुर्लक्ष करून तो तिला लिफ्ट देऊ करतो.
कुठे जायचे आहे या प्रश्नाला तिचे उत्तर असते , ” जहाँ मुझे जाना है, वहाँ तुम नहीं पहुंचा सकते ”
त्याचे अनेक प्रश्न, तिची उत्तरे मात्र दुसऱ्या प्रश्नाला जन्म देणारी.
कोणतेही प्रश्न न विचारायच्या अटीवर ती ते आमंत्रण स्वीकारते.
बाहेरचे दृश्य अंधुक, पुसट पण तिच्या नजरेला मात्र सारा रस्ता लख्ख दिसत असतो. अंधाराने गिळून टाकलेल्या रस्त्यातील खड्डे, वळणे तिला पाठ असतात. अंधारात दिसणाऱ्या तिला, दिवसात मात्र चित्र काढताना जखम झाली असते. बोटावर रक्त सुकलेले.
“मला रक्त आवडते” न विचारलेल्या प्रश्नाचे हे भलतेच उत्तर ऐकून डॉक्टर अजून बुचकळ्यात पडतो.
अचानक वायपर्स थांबतात. गाडी एक हिसका बसून थांबते.
“ इथे कुठे उतरतेस? हे तर कबरीस्थान आहे”
“ तू वचन दिले आहेस ना , काहीही विचारणार नाही म्हणून “
त्याला वेड्यात काढणारे तसेच मंद हास्य चेहेऱ्यावर ठेवून ती उतरते.
जिथे कोणीही जात नाही तिथे तिचे शेवटचे स्थानक असते … “कबरीस्थान”.
ती दाराकडे पोचते आणि तिचे जणू स्वागत करावे तसे स्मशानाचे दरवाजे उघडतात . हळूहळू आतला काळाकुट्ट अंधार तिला गिळून टाकतो.
आसमंतात विलक्षण स्वर गुंजतात “ पिया तोरे आवन की आस, नैना बरसे”
पुढे घडणारे अघटित जाणून , आकाश डोळे टिपत असते!
ही स्त्री आहे का आत्मा, का भूत ? कोण असेल ही ? ” वो कौन थी” या सिनेमाची सुरुवातच अशी पावसाच्या साथीने होते.
————————————————————————————————————
हिंदी सिनेमात पाऊस हा नेहेमीच एक पात्र बनून येतो. अनेकवेळा तो कथेला दिशा देतो. कधी घाबरवतो, कधी रडवतो, कधी हसवतो तर कधी आयुष्याच्या जोडीदार मिळवून देतो. कधी, काहीतरी अघटित घडवून आणतो तर कधीतरी आयुष्य सुरळीत बनवतो.
पाऊस मूड बनवतो, बदलवतो. जर मन उदास असेल तर या पावसाच्या सरी गळ्यात आवंढा आणतात. आनंदी असेल तर आपल्या कुशीत घेऊन भिजवतात, चिंब करतात. चहा आणि कांदा भजीच नाही तर काही सिनेमे सुद्धा या पावसाची मजा द्विगुणित करतात .
असेच काही आहेत “मला आवडलेल्या सिनेमातील भिजलेले क्षण” ज्यांचा खोल ठसा माझ्या मनावर उमटलेला आहे .
“वह कौन थी” या सिनेमात पाऊसच नायक आणि नायिकेची ओळख करून देतो पण ही ओळख काही हवीहवीशी नसते. ही स्त्री खरी का खोटी हा संभ्रम मनात बाळगूनच नायक या सिनेमात वावरतो. पाऊस असा गूढतेचा पेहराव पांघरून अनेक सिनेमात वावरतो.
मेघगर्जना, वीज कोसळणे, अतिवृष्टी या नैसर्गिक घटनांना अनेक धर्मात देवाचा कोप म्हणून पहिले जाते. काहीतरी अमंगल , अघटित घडणाऱ असेल तर हे वादळ त्याचा इशारा असते असेही मानले जाते. गढद अंधार, निर्मनुष्य परिसर, पावसाचे तांडव, त्यातच विजांचे नर्तन मनातल्या भीतीला जाग आणते. हे जे काही घडत असते, त्यावर आपला ताबा नसतो. त्याला थांबवण्याचे ना आपल्यात सामर्थ्य नसते ना त्याच्याशी लढण्याचे बळ सुद्धा . ही असहाय्यतेची जाणीव आणि हतबल करते. मनाच्या या संभ्रमित अवस्थेत असुरक्षित वाटणे, भीती वाटणे स्वाभाविकच. पावसाचे अस्तित्व अशा गूढ सिनेमाला पूरक ठरते.
हॉरर सिनेमात आवाजाला आणि लायटिंगला फार महत्व आहे. मिट्ट काळोख, घोंगावणारा वारा , उघडझाप करणारी दारे , खिडक्या , चमकून जाणारी वीज , पावसाची रिपरिप या साऱ्यांचा वातावरण निर्मितीला अतिशय उपयुक्त ठरते.
पावसाचा असाच उपयोग करून घेणारा सिनेमा होता , बिमल रॉय यांचा मधुमती .
——————————————————————————————–
देवेंद्र ( दिलीप कुमार ) आणि त्याचा मित्र देवेंद्रच्या पत्नीला राधाला आणायला जात असतात. एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला भोवळ येईल अशा दऱ्या. वळण वळणातून मार्ग कापत असताना रस्त्यातच आडवे पडलेल्या झाडानी प्रवासच थांबवावा लागतो. त्यात ती वादळ वाऱ्याची पावसाळी रात्र. जवळच्या हवेलीत ते आश्रयाला जातात.
प्रशस्त शब्दाला जागेल असा त्या हवेलीच्या आकार असतो. आजूबाजूला मात्र कसलीच जाग नसते. वैभवशाली असूनही अडगळीत पडलेली ती वास्तू धो धो पावसात भिजत असते. नको असलेले काही तरी धुवून काढण्याचा प्रयत्न असतो का हा!
कुणीतरी दार उघडेल या आशेत प्रवासी असताना, अचानक दार उघडते. आतमधून कुणीतरी कंदील घेऊन येत असते.
दार कसे उघडले असावे, हा प्रश्न न कळत ओठावर येतोच.
“ दार उघडायची कळ बाजूला आहे ”
आत गेल्यावर दिसतात त्या गतकाळातील वैभवाच्या खुणा …
देवेंद्रची मनस्थिती तर अजूनच वेगळी. तिथे कधीही पोचलेला नसताना सुद्धा त्याला ती जागा ओळखीची वाटते. एका रिकाम्या भिंतीकडे थांबून तो एका पोट्रेटची चौकशी करतो जे त्याने कधीही पाहिलेले नसते.
आता बाहेरील पावसाचा जोर वाढतो. मनातील वादळ तर त्याहून तीव्र. कोणाच्यातरी धूसर आठवणी, ज्या आतापर्यंत कोंडलेल्या असतात, त्यांना हवा मिळालेली असते. बाहेरील वृद्ध रखवालदार, जुनाट जीर्ण कसल्यातरी ओझ्याने दबलेली ती हवेली, गतकाळाच्या का गत जन्माच्या स्मृतीने भांबावलेला देवेंद्र आणि बाहेर कोसळणारा पाऊस.
पावसाच्या साक्षीने देवेंद्र गत-जन्माला परत जिवंत करणार असतो.
हॉरर किंवा भयपट म्हंटले की रामसे बंधू हे नाव डोळ्यासमोर येते.
त्यांच्या अनेक सिनेमांना या पावसानेच तारले आहे. सुमार नट –नटी, टुकार पटकथा, दर्जाहीन मेकअप या सर्व मारक गोष्टी असूनही कॅश काउंटर वरची जी बरसात आहे त्यात या पावसाचा मोठा हातभार आहे नक्की.
अंधाराची भीती वाटते कारण बाह्य जग अस्पष्ट होते. त्या धूसर वातावरणात काही अज्ञात दडून राहिले असेल का ही भीती मनाला पोखरते. पावसात तर अंधाराची तीव्रता वाढते. कल्पनेला भयाची साथ मिळून अकल्पित घडण्याच्या शक्यतेनेच माणूस खचतो. मोठ्या दिसणाऱ्या सावल्या मनावरचा ताण अजून वाढवतात. मधूनच चमकणारी वीज मनाला आश्वस्थ करण्याऐवजी एकाकी करते. सारे जगच संशयास्पद वाटू लागते.
“द रिटर्न ऑफ द डेड “ या सिनेमात पाऊस हा घडणाऱ्या घटनांचे मुख्य कारण आहे.
———————————————————————————————-
हॉस्पिटलला लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या एका स्टोअर हाऊसला, मेडिकल कॉलेजला, दोन स्त्री सांगाडे पुरवायचे आहेत. ही तीन जुलै ची दुपार आहे. बाहेर अंधारून आले आहे. स्टोअरचा बॉस, जरा लवकरच काम संपवून बाहेर पडतो. चार जुलैचा दिवस, आपल्या कुटुंबियांबरोबर त्याला घालवायचा आहे. तिथल्या फोरमनला, फ्रॅंकला, सुद्धा तो लवकर घरी जाण्याची सवलत देतो. फ्रॅंकला मात्र हे काम पूर्ण करून जायचे आहे. नवीन लागलेल्या फ्रेडला सुद्धा काम समजावून सांगायचे आहे.
काम सुरु असतानाच, फ्रॅंकचे लक्ष तिथल्या काही धातूच्या मोठ्या पेट्यांवर जाते. ज्या आर्मीच्या मालकीच्या असतात.वीस वर्षांपूर्वीची प्रेते असतात त्यात. पेटीच्या बाहेर गंज लागलेला असतो. त्याचे डाग दिसत असतात.
ह्या पेट्या मधून काही बाहेर तर येणार नाही ना ?
मनाची खात्री करून घ्यायला फ्रॅंक त्या पेटीच्या झाकणावर हात मारतो आणि एक मोठ्ठा आवाज येऊन त्या पेटीचे झाकण उघडते. आतून पिवळ्या रंगांची वाफ बाहेर पडते.
फ्रँक आणि फ्रेडीच्या तोंडावरच हा आघात होतो. धूर नाका तोंडात जाऊन ते तिथेच बेशुद्ध होतात.
आता कॅमेरा त्या पेटीच्या तोंडावर स्थिरावतो. आतले प्रेत आता वितळायला सुरुवात होऊन , त्याचे एका काळपट द्रव्यात रूपांतर होते.
तोपर्यंत गॅस पूर्ण स्टोअर हाऊस मध्ये पसरायला लागतो. काही प्रेते प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली असतात, त्यांना वेटाळुन घेतो. गॅस आता बाहेर पडतो. आकाशाच्या दिशेने झेप घेतो आणि ढगात मिसळतो.
विजेचा कडकडाट होतो. साऱ्या आकाशात तिचे तांडव सुरु होते. तिचीच आज्ञा ऐकावी असा पाऊस कोसळतो.
पृथ्वीला झोडपून काढतो. एक चूक , पण त्याचे भयंकर परिणाम सारे जग भोगणार असते.
स्टोअर हाऊसच्या बाजूला असलेल्या कबरीस्थानावर पावसाच्या धारा कोसळू लागतात आणि आत झोपलेल्या मुडद्यांना जाग येते.
१९७९ मध्ये प्रदर्शित झालेला सुस्पिरिआ हा सिनेमा भयचित्रपटात अत्यंत नावाजला जातो. सुस्पिरिआ चा अर्थ “ सुस्कारा ”, निःश्वास”, “ उसासा” आपण दुःखात उसासा टाकतो, सुटकेचा निःश्वास सोडतो. दमल्यावर सुद्धा आपण सुस्कारा सोडतो. वेगवेगळ्या घटना पण क्रिया एक.
सुस्पिरिआ हा सिनेमा बघताना या शब्दाचा अर्थ आपण अनुभवू शकतो. ह्या चित्रपटात जाणवणारे भय हे फार वेगळे आहे. रूढार्थाने भयप्रद असे काहीही नाही पण रंग, संगीत, ध्वनी या माध्यमातून प्रेक्षकांच्या अंगावर भयाचा काटा निर्माण करण्यात दिग्दर्शक, डॅरिओ अर्जेंटो, यशस्वी झाला आहे.
सुस्पिरिया सिनेमातला पाऊस हा खलनायक नाही. तो निरोप्या आहे.
——————————————————————————-
काहीतरी अघटित होणार आहे याची सूचना नायिकेला मिळते , जेव्हा ती न्यूयॉर्कहुन जर्मनीत पोचते.
रात्रीची वेळ आहे. स्थळ विमानतळ.
नेहेमीचे दृश्य. विमान नुकतेच पोचलेले आहे. बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गर्दी, जर्मन भाषेत सुरु असलेली अनाउन्समेंट, अत्यंत दुरून आल्यासारखे शब्द, लोकं संवाद साधत असावेत.
संपूर्ण विमानतळावर लाल रंग पसरला आहे. जणूकाही कॅमेऱ्याला लाल जिलेटीन पेपर लावून शूटिंग केले असावे.
लाल, रक्ताचा रंग, पुढे धोका आहे हे सांगणारा रंग.
विमानतळावर असंख्य लोकं आहेत पण या रंगात एकाचाही चेहेरा स्पष्ट दिसत नाही.
त्यातच आपली नायिका सुद्धा आहे. जेमतेम विशी गाठलेली, बॅले नृत्य शिकायला आली असल्याने, नर्तिकेला साजेशी अंगकाठी, पहिल्यांदाच परदेशात आलेली असल्याने, चेहेऱ्यावर असलेली निरागसता आणि भीती.
या सगळ्या गडद रंगात , तिचा पांढरा पोशाख आणि मोठे डोळे मात्र स्पष्ट दिसत आहेत.
दाराकडे आल्यावर बाकी आवाज अस्पष्ट होत जातात. आता विलक्षण गूढ संगीत सुरु होते. त्यात पावसाचा आवाज मिसळतो.
बाहेर पाऊस धो धो कोसळत आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि पावसाचे कोसळणे पुढे घडणाऱ्या भीतीदायक घटनांची नांदी आहे.
एकही टॅक्सी थांबायला तयार नाही. अचानक एक टॅक्सीसमोर तिनेच पाऊल ठेवल्याने ड्रायव्हर थांबतो. तिला ज्या नृत्य शाळेत जायचे आहे, ती बरीच लांब आहे. गडद अंधार, रस्त्यावर सुद्धा भसाभसा ओतणारे पाणी, जवळजवळ निर्मनुष्य भाग, उंचच उंच पाईन च्या झाडाचे रान ..या साऱ्यातून मार्ग कापत जाणारी गाडी.
ती थांबते आणि डोळ्यासमोर येते , नृत्य शाळेची लाल भडक इमारत.
नायिका, आत कुणी आहे हे पाहायला जात असतानाच, दार उघडते. आतमधून एक भेदरलेली मुलगी बाहेर पडते. काहीतरी पुटपुटत असते ती, कुणाशी का स्वतःशी ते समजत नाही. येणाऱ्या नायिकेकडे तिचे लक्षही नसते.
अचानक ती जोरात पळत सुटते. त्या इमारती पासून दूर. धावत धावत जंगलात गुडूप होते.
पाऊस कोसळत असतो.
कदाचित त्या नायिकेला तो सांगत असतो “ पळ , लवकर इथून दूर जा , जीव वाचव “
दुर्दैव , तिला ते जाणून घेता येत नाही.
भयपट “ तुंबाड” या सिनेमात तर पाऊस हे महत्वाचे पात्र आहे.
———————————————————————–
खऱ्या खुऱ्या पावसात या सिनेमाचे चित्रण केले आहे. सतत कोसळणारा पाऊस, साऱ्या चित्रपटात भयाची चाहूल देणारा निळसर अंधार , उजेडाची जराही तिरीप म्हणून दिसत नाही. कुठे दिवस संपतो आणि रात्र सुरु होते हे उमजत नसल्याने तुंबाड हे गावच कालातीत वाटते.
मानवी स्वभावाची लालसा हा तुंबाडचा पाया आहे. ही लालसा एवढी भयावह, विध्वंसक , किळसवाणी आहे की हस्तरच्या अमंगल शक्तीपेक्षाही ती अस्वस्थ करून सोडते. हस्तर या देवाची पूजा सुरु केली म्हणून पूर्ण गावाला शाप आहे. साऱ्या गावावरच हस्तरची अमंगल सावली आहे म्हणून या गावातला पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही.
सिनेमाचा पहिला शॉट , सिनेमाचा मूड बनवतो.
धो धो कोसळणारा पाऊस झेलणारा, उंच टेकडीवर उभा असणारा जीर्ण दगडी वाडा. पूर्ण पडद्याला व्यापून राहणारा करडा रंग आणि सभोवतालचा उदास, वैराण , ओसाड आसमंत.
वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी एक बाई उभी आहे. त्या निळसर राखाडी रंगात तिच्या अलवणाचा लाल रंग खूप विसंगत दिसतो. त्या पावसात ती सुद्धा भिजलेली. हताश, एकाकी आणि पिचलेली. डोक्यावरचे केस भादरलेले. समोरचा भव्य वाडा आणि हिची छोटीशी मूर्ती. निर्बळ आणि सबळ हा विरोधाभास नजरेत भरतो.
त्या वाड्यात खरे काय आहे जाण्यासारखे! एका म्हाताऱ्याने आपली भूक भागवण्यासाठी तिचा वापर केला आहे. दोन पोरं जन्माला घालूनही, ना त्यांना बापाचे नाव आहे , ना प्रेम ..पण त्या वाड्यात खजिना आहे. भयंकर हाव असलेल्या देवाची पूजा करायचा अपराध केल्याने, शाप मिळालेला असूनही, धन नाही पण ही अघोरी लालसा मात्र सर्वांच्या मनात दडलेली आहे.
तीच त्यांच्या अंताला कारणीभूत ठरणार आहे.
सुरुवातीला काहीही संवाद नाही. पावसाचा जोर वाढलेला आहे. फक्त त्याचाच आवाज , त्याचीच सत्ता. तुंबाड हे शक्त्तीहीन, लालची लोकांनी भरलेले जग आहे हे सांगण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो.
कौन
———-
राम गोपाल वर्मा च्या कौन या सिनेमात पाच पात्रे आहेत.
उर्मिला , मनोज बाजपेयी , सुशांत सिंग , जिथे हे घडते ते घर आणि पाऊस.
न कंटाळता , प्रचंड संयम ठेवून बरसणारा पाऊस. सर्वात मोठा रोल तर बहुतेक पावसाचा आहे.
सर्व चित्रीकरण चार भिंतीच्या आत झालेले असल्याने, बाहेरच्या जगाची चाहूल देतो तो फक्त बॅक ग्राउंड स्कोअर. ह्यात पावसाच्या संतत धारेचा मोठा वाटा आहे. नेहेमी बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली की पात्रांचे मन फुलून येते. तापलेल्या शरीराला तृप्त करणाऱ्या धारा अंगावर घेण्यासाठी सिनेमातील पात्रे निवाऱ्याचा उंबरठा ओलांडतात. इथे मात्र तो वाव नाही. बाहेरचा पाऊस आपल्या भक्ष्याची दबा धरून वाट पाहत आहे.
एका वादळी रात्री सिनेमाची कथा सुरु होते आणि रात्रीतच संपते. कथेची नायिका घरात एकटी. आई वडील बाहेर गेले असावेत. बाहेर तुफानाचे थैमान. तेवढ्यात बातमी येते , एक खुनी मोकाट सुटला आहे. एकट्या स्त्रिया त्याचे भक्ष्य आहेत.
आतापर्यंतचा हवाहवासा एकांत आता भीतीचे रूप घेतो. तिच्या सोबतीला कुणी नाही.बाहेरील गडगडणारे ढग , लखलखणाऱ्या वीजा येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देत आहेत का ?
दारावर कुणाचीतरी टकटक. की होल मधून दिसणारा चेहरा अपरिचित . हा आगंतुक नखशिखांत भिजलेला. त्यात त्याला हवा असलेला पत्ता चुकीचा आहे. घाईत बाहेर पडताना, चावी गाडीत राहिल्याने, गाडीत बसून राहण्याचा मार्ग ही आता खुंटलेला .
मृत्यूचे सावट त्या एकाकी मुलीच्या चेहेऱ्यावर .
हा तोच तर नसेल !
बाहेर पडणारा पाऊस ह्या संभ्रमाला खतपाणी पुरवतोय.
आणि चित्रपटाचा शेवट ..
विजेच्या लखलखाटात खुनी व्यक्तीचा चेहेरा प्रेक्षकांच्या नजरेसमोर येतो तेव्हा तिच्या भक्ष्याबरोबरच प्रेक्षक सुद्धा मुळापासून हादरतो.
आता शूटिंग होते ते बंगल्याच्या मोकळ्या उघड्या गच्चीत.
पावसाचा मुक्त संचार आहे. खुन्याचा सुद्धा.
गच्चीवर जमलेले पाण्याचे थारोळे. त्यात आता रक्ताची मिसळणं होते. मरणाऱ्याच्या चेहेऱ्यावरचे भीती, मारणाऱ्याच्या चेहेऱ्यावरचा जिंकण्याचा आनंद …
जगण्याची धडपड, मारण्याची जिद्द. अख्या प्रेम मध्ये तीन रंग आहेत. पांढरी गच्ची, काळा काळोख आणि चांगल्या वाईट कशाचेच सोयर सुतक नसलेला मृत्यूचा लालभडक रंग .
धुंवाधार वारा, मुसळधार पाउस, शरीराला आधार देणारी क्षमाशील धरती, अंगात उसळलेला आगीचा डोंब आणि ह्या साऱ्याचा साक्षीदार असणारे निर्विकार आकाश .. महाभूतांच्या साक्षीने एक जीव मुक्त होत असतो.

वाह हटके विषय.
चित्रपट आहे पाऊस आहे पण गाणी नाहीत हे पोस्टचे वैशिष्टय आहे.
चित्रपट निवड आवडली.
Thank you Uday.
प्रिया,
वेगळाच विषय..
पाऊस हा नायक..
केंद्रस्थानी..
एकदम झकास..
Vidula , Thank you 🙂
भारी वाटले वाचताना ते पण रात्री ११.१५ वाजता! 😃
पावसावर हटके लेख मस्त आहे…
Aai shapath:)
Vrushali, enjoy The movies too at night 🙂
पावसाची मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटां वरील अतिशय सुरेख लेख …. नेहमीचाच सदाबहार विषय पण एकदम हटके लिखाण
Nayana , Thank you 🙂
अप्रतिम…
पाऊस परत परत अनुभवावा असा….
खूप छान 👍
Thank you Mangala 🙂
Nageshji, Thank you.
तुमच्या आवडीचा विषय….मस्तच लेख….आवडला
Thank you Prashant ji.
फार सुंदर लिहिलंय
पावसाचा फार कमी जणांनी छान उपयोग करून घेतलाय
हो हे मात्र खरंय. Thank you Abhay .