Skip to content

कळीचे फुलात रूपांतर करणारा “ तितली “ 

मुलांचे लहानपण जेवढे महत्वाचे, तेवढेच त्यांचे वयात येणं. हा टप्पा पालकांना अत्यंत हळुवार हाताळावा लागतो.
कळीचे फुल व्हायची सुरुवात होते. सुंदरतेवर प्रेम करणारे हे वय. तिथे स्वार्थ नसतो.अनुभवाच्या भिंतीही नसतात अडवायला. व्यवहार, पैसे,  प्रतिष्ठा याचा विचार करायची प्रगल्भता नसतेच.  एक सुरक्षित आयुष्य असते म्हणून स्वप्ने पाहणे सहज होते. या वयात तर्काला , शंकेला स्थान नसते कारण  अपयश माहित नसते.  आत्मविश्वासाने भरलेले आणि  भारलेले आयुष्य असते हे.
अचानक तिला / त्याला  लक्षात येते , आपण बदलत आहोत. .
रुटीनचा कंटाळा  येतो. मित्र मैत्रिणीच्या गप्पा मन रमवू  शकत  नाहीत. वडीलधाऱ्यांचे  प्रेम  आणि  शिस्त जाचक वाटते , कुणाचीतरी आपल्या  छोट्याश्या  जगात  चाहूल  लागते . नकळत मन  त्याचा मागोवा  घेऊ लागते .   
He / she becomes aware of the” possibilities of love. “
मुली लवकर वयात येतात. त्यांची प्रगल्भता ही  त्या वयातील मुलांपेक्षा जास्त असते.  बऱ्याच मुलींच्या नजरेतून त्यांचे वडील आदर्श असतात.  कदाचित त्यामुळे असेल त्यांच्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीचे आकर्षण बर्याच वेळा दिसून येते.
सिने, नाट्य क्षेत्रातील व्यक्ती लोकप्रिय असतात, ग्लॅमरस असतात. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा , (ज्या बहुधा larger than life) असतात, पगडा या न कळत्या वयात सहज पडतो. त्यांचा करिष्मा, सौन्दर्य,  फॅशन, प्रसिद्धी आणि पैसे यांचेही आकर्षण असतेच. ज्या समाजात यश हे नेहमीच पैसे ,कीर्ती तराजूत मोजले जाते , तिथे सिनेक्षेत्रातील माणसे रोल   मॉडेल्स बनणे स्वाभाविक असते. पडद्यावरील जग खरं समजणाऱ्या भाबड्या, आडनिड्या वयात क्वचित हे आकर्षण ध्यासात, (obsession) बदलते.
तितली ह्या सिनेमातील १७ वर्षाच्या शाळकरी मुलीला (कोकणा सेन) सुद्धा, सिनेमातील  प्रसिद्ध हिरोचे, रोहित रॉय चे (मिथुन चक्रवर्ती) वेड लागले आहे. ही अवस्था येते अनेकांच्या आयुष्यात. राजेश खन्ना ते शाहरुख खान यांचे फॅन्स पावलोपावलांवर आढळतात. सुप्त आकर्षण असते ते.  तितली उर्फ़ तिलोत्तमा आपल्या निवडीबाबत स्पष्ट आहे. तिच्या खोलीच्या भिंतीवर रोहित रॉय चे मोठे मोठे कट आउट्स आहेत. त्याचे चाललेले सिनेमा, त्यातील गाणी, त्याची कथा, त्याला मिळालेले अवॉर्ड्स, त्याला आवडणारे पदार्थ , त्याचे छंद  या साऱ्या गोष्टी तिला तोंडपाठ आहेत. त्याला बरीच पत्रे सुद्धा पाठवली आहे तिने , पण हाय! ..एकाही पत्राला त्याने काही उत्तर धाडलेले नाही. तिच्या मैत्रिणीला , पियाला मात्र त्याचे उत्तर आले आहे. त्याची तक्रार ती आपल्या आईकडे, उर्मिलेकडे (अपर्णा सेन) करते.
आई आणि मुलीचे संबंध मित्रत्वाचे आहेत. हे वय असेच असते, स्वप्ने पाहणारे, निरागस आणि भाबडे. हार्मोन्स आपला प्रभाव दाखवतातच. काही दिवसांचा तर प्रश्न , हे वेड डोक्यातून जाणार याची आईला खात्री आहे. एकूणच या गोष्टीकडे फार गंभीरपणे न बघता, थोडी मस्करी, थोडे दुर्लक्ष , थोडा उपदेश करून ती मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न करते.
“ मी रोहितशी लग्न केलं तर “ ह्या प्रश्नाला उत्तर देताना, हो किंवा नाही असे न म्हणता ती विचारते, “ तुला कल्पना आहे तो तुझ्याहून दुप्पट मोठा आहे?”
“ मग काय झाले? आजी-आजोबांच्या वयात तेवढे अंतर आहेच पण त्यांचे एकमेकांवर प्रेमही आहे”
तितलीची उत्तरे तिच्या वयाला साजेशी. अल्लड आणि काहीशी हट्टी. ह्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहित असल्याने, उर्मिला काहीशी हसून विषय टाळते. सुरुवातीची जी दृश्ये आहेत त्यात लक्षात येते, आई मुलीचे संबंध अत्यंत चांगले आहेत. एक सुखी , मध्यमवर्गीय कुटुंब आहे हे.
तितलीचे वडील दार्जिलिंग येथील टी इस्टेटमध्ये मॅनेजर आहेत. बाहेरगावाहून ते आज परतणार आहेत. या दोघी, मायलेकी , त्याला आणायला विमानतळावर निघाल्या आहेत. आषाढ महिन्याचा पहिला दिवस असावा. पाऊस भरून आला आहे.
याचा वेळी एक माणूस त्यांची कार अडवतो. फिल्मचे युनिट या परिसरात शूटिंग करायला आलेले आहे. एक कलाकार आजच मुंबईला परतणार असल्याने, विमानतळावर जात होता आणि नेमकी गाडी बिघडली. त्याला लिफ्ट देण्याची तो उर्मिलाला विनंती करतो. नाही म्हणणार असतानाच आईचे मुलीकडे लक्ष जाते. सिनेमा म्हंटल्यावरच आनंद आणि उत्सुकता यांनी भरून गेलेला तो चेहेरा पाहून उर्मिला नाही म्हणू शकत नाही.
कारकडे जवळ येणाऱ्या माणसाचा चेहेरा पाहून तितली मोहरून जाते. तो रोहित रॉय असतो. तिचा आवडीचा रोहित रॉय.
सुरुवातीच्या भांबावलेल्या अवस्थतेतून बाहेर आल्यावर तितलीची टकळी सुरु होते. आपल्या पत्राला उत्तर सुद्धा न आल्याची तक्रार करताच रोहित तिच्याकडे तिचा पत्ता मागतो. तिला पत्र पाठवायचे वचन देतो. हसत खेळत प्रवास चालू असतानाच, गाडीचे इंजिन गरम झाल्याने ड्रायव्हर गाडी थांबवतो. जवळपास असलेल्या गँरेजमध्ये मदत मागायला जातो. स्मोकिंग तब्बेतीसाठी चांगले नाही असे काहींसे  दटावून, तितली, रोहित साठी सिगारेटचे पाकीट आणायला जाते.
गाडीत आता दोघेच असतात. उर्मिला आणि रोहित.
मध्ये वीस वर्षाचा काळ गेलेला असतो. तिचे लग्न झालेले असते, तो यशस्वी अभिनेता असतो आणि दोघे काहीही विसरलेले नसतात. न विसरला गेलेला भूतकाळ आता त्यांच्यासमोर उभा राहतो.

सिनेमात फ्लॅश बॅक वापरला नाही. त्या दोघांची कथा , त्यांच्याच संवादातून प्रेक्षकांना समजते.  कॉलेजात असताना प्रेमात असलेले ते दोघे. त्याला नट होण्याचे वेड असते. सिनेमात जाणे हे एकच खूळ , त्यामुळे नोकरी न बघता, स्टुडिओत चकरा. बरे, कुटुंब सुद्धा गरीब. अशा घरात कोण मुलगी देईल. “ तू कुठेतरी नोकरी बघ ना , तरच मी वडिलांशी बोलू शकते “ उर्मिलाने  सतत सांगूनही काही उपयोग होत नाही.
अशा प्रेमकहाणीचा शेवट नेहेमीच अधुरा असतो. उर्मिलाचे लग्न होते. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलगी जशी संसारात रुळून जाते , तशीच ती जाते. रोहितशी संपर्क ठेवण्याचा प्रश्नच नसतो. रोहित मुंबईला जाऊन मोठा फिल्म स्टार होतो आणि नेमका उर्मिलाच्या मुलीचा लाडका नट होतो. घरातील भिंतीवरील फोटो, त्याचे मासिकात आलेले क्लीपिंग्स, त्याच्या चर्चा, त्याच्या बद्दल बोलणे,.. उर्मिलाच्या भावविश्वात तो नसतो पण तिच्या मुलीच्या भाव विश्वाचा भाग बनल्याने त्याचे अस्तित्व  काही घरातून पुसले जात नाही आणि आज वीस वर्षांनी हा भूतकाळ परत वर्तमानात उभा येऊन ठाकतो.

रोहितला टाळण्यासाठी उर्मिला स्वेटर विणण्याचे नाटक करते.
“ तू मुलीला सांगितलं नाहीस माझ्याबद्दल ? त्याचा प्रश्न. भूतकाळाला वर्तमानात  स्थान देऊ नये याचे भान असलेल्या उर्मिलाने कुणालाच सांगितले नसते आणि  त्याच्या  आठवणीपासून ती स्वतःलाही लांब ठेवते पण आता मात्र दार्जिलिंगच्या निसर्गरम्य वातावरणात कुठेतरी तिच्यात दडलेली प्रेमिका जागृत होते.
आसमंतात पसरलेले धुकं, हिरव्यागार झाडांची शाल पांघरलेले डोंगर, वळणावळणाच्या रस्त्यातून आपला मार्ग शोधात जाणारी पिटुकली ट्रेन, मधूनच डोकावणारी बुद्ध लोकांची मंदिरे  आणि पावसाळ्याचा पहिला दिवस.
पाठी जायला एवढ़े पुरेसे असते.. रोहित आणि उर्मिला भूतकाळातील आठवणीत हरवतात. तिचे लग्न,  लग्नाची पत्रिका मिळूनही  त्याचे न जाणे, त्याचा पहिला सिनेमा , मुंबईतील त्याचे घर , त्याचे यश.   गेलेला काळ , निदान गप्प्पातून परत जगताना तिला वर्तमानाचा विसर पडतो. उर्मिला त्याच्या आवडीची कविता गाते. एकमेकांच्या सहवासात, वर्तमानाचे भान हरवलेल्या त्या एके काळच्या प्रेमींना,  तितली हे संभाषण ऐकत असेल याची जाणीव नसते.

भरून आलेले ढग पांगू लागतात. आकाश परत एकदा निरभ्र होऊ लागते आणि भूतकाळातल्या ओलाव्यातून दोन्ही प्रेमी अलगद वर्तमानात उतरतात. तो आता  प्रसिद्ध नट असतो, ती एक सुखवस्तू गृहिणी. मधला काळ पुसावा सुद्धा लागत नाही कारण दोघेही समजंस आणि समजूतदार असतात. आलेला क्षण , काहीही न गमावता निसटून जातो पण तितलीचे भावविश्व मात्र  उध्वस्त होते.
रोहित रॉय , आपला रोहितच्या रॉय , आईचा भूतपूर्व प्रियकर !
हे कसे शक्य आहे ? तिने कधीही सांगितले नाही ? त्याला ओळखते असेही तिच्या वागण्यातून दर्शवले नाही ? बाबांना तरी माहित आहे का हे ?
आतापर्यंत सुरु असलेली बडबड थांबते. रोहित रॉयशी बोलायला उत्सुक असलेली तितली  येताना पूर्ण मरगळून जाते.
विमानतळ येतो. तितलीचे वडील  येतात. रोहितशी त्यांची ओळख होते. त्यांच्या गप्पा होतात.
तितली सोडून सारे काही पूर्वीसारखे होते.

उर्मिलाला तितलीचे मन उमजते का ? तितली आणि तिची आई यांचे संबंध पूर्ववत होऊ शकतील का ?
तर हो ..
अर्थात हे भावबंध कसे हळुवार उकलले आहेत ते पडद्यावर बघणे हा फार सुखद अनुभव आहे.

ऋतुपर्ण घोष यांचा उनिशे एप्रिल हा सिनेमा आणि तितली हा सिनेमा , हे दोन्ही सिनेमा आई आणि मुलगी  यांच्या नात्यावर आधारित आहेत. पहिल्या सिनेमात  हुशार, प्रसिद्ध आईचा नात्यावर नकारार्थी प्रभाव आहे तर दुसऱ्या सिनेमात आईच्या देखण्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची नात्यावर  पडलेली सावली आहे.
आपल्या आईकडे बघण्याचा एक समाजमान्य नजरिया असतो.  कुटुंबाला धरून ठेवणारी,  कुटुंबाचा आधार असणारी दैवतासमान आई हे नियम मनाच्या कोपऱ्यात एवढे फिट्ट आहेत  की या पलीकडे असलेली तिची बुद्धिमत्ता, सौन्दर्य आणि तिची लैंगिकता (sexuality) याला छेद देणारी असेल तर माणूस ते स्वीकारू शकत नाही.
भले ती संसाराशी  एकनिष्ठ असेल तरीही तिचे हे असणे असुरक्षित करते हे एवढे subtle दाखवले आहे की ऋतुपर्ण घोष ची कमाल वाटते.

उर्मिला ही आई आहे, पत्नी आहे आणि ती कधीकाळी प्रेमिका होती. त्याच्या पुसट आठवणी तिच्या वर्तमानात आहेत. त्या आठवणीत ती अडकून पडलेली नाही पण त्या आहेत म्हणून तिला खंत नाही. प्रत्येक व्यतीचा भूतकाळ , वर्तमानात , त्याच्या सोबत राहतोच असे नाही , पण म्हणून त्याचा तिरस्कार करावा , किंवा लाज वाटावी असे काही तिला वाटत नाही.
तिचे नवऱ्यावर प्रेम आहे. तिने त्याची कधीही प्रतारणा केली नाही पण तरीही रोहितला भेटल्यावर उन्मळून आलेल्या जुन्या आठवणी ती नाकारत नाही ..हळुवार पणे  भूतकाळातले क्षण जगून ती परत वर्तमानात परतते ..
तिची sexuality इथे मातृत्वाहून प्रबळ ठरते, ते ती नाकारत नाही.
सर्वात महत्वाचे हे आहे , की ती अत्यंत सुंदर आहे , आकर्षक आहे , तिच्या मुलीहूनही  देखणी आहे.
जो पर्यंत तिच्या मुलीला तिची ओळख , फक्त आई म्हणून आहे , तोपर्यंत आपण आई एवढे देखणे नाही ही जाणीव असूनही , तिला आईचे सौन्दर्य खटकत नाही पण आता ती कधीकाळी आपल्याला जो माणूस आवडतो , त्याची प्रेमिका होती हे कळल्यावर मात्र तिला असुरक्षित वाटते, एक स्त्री म्हणून हरल्यासारखे वाटते. एका क्षणापुरती का होईना , आई तिची स्पर्धक होते हे ती सहन करू शकत नाही.
हा सिक्वेन्स अभिनयात उतरणे फार कठीण आहे. एक मुलगी आणि एक स्त्री यांच्यातील द्वंद्व कोकणाने फार सुंदर दाखवले  आहे.
उर्मिला आणि तितली , (अपर्णा आणि कोकणा सेन) प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा माय लेक असल्याने त्यांच्यात एक सहजपणा आणि जिव्हाळा आहेच. पडद्यावरील सीन्स म्हणूनच खरे उतरले आहेत.

मिथुन चक्रवर्ती ला महत्वाचा रोल मिळाला आहे. एक फिल्म अभिनेता आणि एक महत्वाकांक्षी प्रियकर. अप्रतिम भूमिका आहे. मोठा नट  असल्याची जाणीव त्याच्या वावरण्यात आहे पण बोलण्यात नाही. तितली कडे एक फॅन म्हणून बघताना , तिचे obsession त्याच्या लक्षात येते. त्याच्या डोळ्यात कौतुक आहे आणि तिची ओळख पटल्यावर वात्सल्य सुद्धा.
उर्मिला बद्दल त्याच्या मनात आकर्षण किंवा लोभ नाही. प्रेम कधीकाळी होऊन गेले आहे , त्याच्या फुसट खुणा आहेत पण त्या क्षणांना हवा देण्याची त्याची इच्छा नाही. उर्मिला कुणाची तरी पत्नी आहे याचे त्याला भान आहे .
अतिशय सुजाण भूमिका आहे ही.
घरी परत आल्यावर, तितली , आईला जाब विचारते.
“ तुला वाटत नाही , तू बाबांना किंवा मला, तुझ्या या नात्या बद्दल काहीही सांगितले नाहीस ?”
सिनेमाचा हा भाग आपल्या कुणाहीसाठी फार महत्वाचा आहे. जरुरी नसते की ज्याच्यावर न कळत्या वयात प्रेम असते, त्याच्याबरोबर  आयुष्य घालवायची संधी मिळते. महत्वाचे असते , ते लग्नांनंतर एकनिष्ठ असणे , प्रतारणा न करणे.
“ तुला नाही वाटत , बाबाला हे समजले तर तो दुखावेल ?”
नाही वाटत –उर्मिला सांगते .
“ मी  जेव्हा तुझ्या वयाची होते तेव्हा माझे त्याच्यावर प्रेम होते. ते काही सफल झाले नाही. लग्न झाले आणि माझ्या आयष्यातून त्याच्या आठवणी सकट मी त्याला वगळले. ते नसते तर मी फसवले असे म्हणता आले असते. तरीही तुला वाटते , तर मी उद्या अमर ला सांगेन . हा काही हिंदी सिनेमा नाही की तुला मी तुझी स्पर्धक वाटावी. जर माझे रोहित शी लग्न झाले असते, तर तू आमची मुलगी असतीस. तुला असे का वाटते , की माझे तुझ्या वडिलांवर प्रेम नाही ? आम्ही वीस वर्षे एकत्र आहोत, आनंदी आहोत, प्रेमाशिवाय हे शक्य नाही “

“ पण तू त्याला  विसरू शकली नाहीस ?” हा प्रश्न आईला नाही , हा स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला विचारलेला प्रश्न आहे.
“ ते माझे  पहिले स्वप्न होते. मी काही त्याची फॅन नव्हते. तो सामान्य होता , मी सुद्धा सामान्य मुलगी होते. या भावना म्हणून सच्च्या होत्या . असतीलही कदाचित आत . “
आई आणि मुलीने पहिल्यांदाच नात्याच्या बाहेर जाऊन स्त्रीत्वाच्या नजरेतून एकमेकांना समजून घेणे मला फार आवडले.
चित्रपटाचा विषय वाचून वाटते ना , खूप बोल्ड असावा पण नाही , खूप सामान्य माणसाचे सामान्य आयुष्य दाखवले आहे.
त्याचे प्रेम ही साधेच असते म्हणून कुणालाही न दुखावता , ती दोन माणसे जेमतेम तीन तासात , गेलेले आयुष्य आणि न मिळणारे आयुष्य जगतात आणि परत आपल्या दिशेने जातात.
समुद्रात दगड भिरकावला की काही क्षण तरंग उठतात आणि मग परत शांत होते ,तसा सिनेमा आहे हा .
बाकी शेवट म्हणाल , तर एका कळीचे फुलात रूपांतर होते. भले  ती प्रक्रिया फार सुखावह नसते.
“ 

14 thoughts on “कळीचे फुलात रूपांतर करणारा “ तितली “ ”

  1. प्रिया,
    💐💐
    नक्की च बघते.
    तू वर्णन केल्या प्रमाणे खूप गोड,छान,सुंदर असणार चित्रपट.

  2. सुंदर परिक्षण. नक्कीच आवडेल बघायला. कुठे मिळेल?

  3. खूपच सुंदर परीक्षण!!
    तुमचा दृष्टिकोण फारच वेगळेपणाने व्यक्त होणारा व समृद्ध आहे.

Leave a Reply to madhuri Kaulgud Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *