Skip to content

कर्तृत्व आणि  कुटुंब यामधील “क” एवढा वेगळा “का” असावा हा विचार करायला लावणारा ऋतुपर्ण घोष याचा सिनेमा “ उनिशे एप्रिल “ 

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयीच्या आत्मचरित्रातील ही एक गाजलेली गोष्ट.
‘पेप्सिको’च्या अध्यक्षपदी बढती मिळाल्यानंतर त्या आनंदानं घरी आल्या.
‘माझ्याकडं तुला सांगण्यासाठी अत्यंत अविश्वसनीय बातमी आहे” घरात पाऊल टाकतानाच त्यांनी आपल्या आईला सांगितलं. . ‘‘मी ‘त्या’ बातमीसाठी थोडी वाट पाहू शकते. तू आधी बाहेर जा आणि दूध घेऊन ये,’’ ही त्यांच्या आईची त्यावरची प्रतिक्रिया होती!
इंद्राचे पती, राज तेव्हा घरी होते. ते दमलेले असल्याने आईंनी त्यांना मात्र हे काम सांगितलं नव्हतं.
इंद्राला एक मैल गाडी चालवत जाऊन लिटरभर दूध आणावं लागलं.घरी पोचल्यावर रागानेच त्यांनी दुधाची पिशवी टेबलवर आपटली आणि आपल्या आईला मोठ्यानं ओरडून सांगितलं, ‘‘मी ‘पेप्सिको’ची अध्यक्ष झाली आहे.’’ यावर त्यांची आई उत्तरली,

‘माझं ऐक, तू ‘पेप्सिको’ची अध्यक्ष किंवा आणखी कोणी झाली असशील, मात्र तू घरी येते तेव्हा कोणाची तरी पत्नी, आई, आणि मुलगी असतेस. तुझी ही जागा कोणीही घेऊ शकत नाही. तेव्हा अध्यक्षपदाचा तो मुकुट गॅरेजमध्येच सोडून येत जा.’

या पार्श्वभूमीवर मला ICICI च्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, ललिता गुप्ते यांची मुलाखत आठवते. एक ट्रेनी ते जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर च्या प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना मोलाची साथ दिली. आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर मुलांची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांची शाळा , अभ्यास ,हे सर्व त्यांनी बघितले. “मुले कोणत्या इयत्तेत आहेत हे सुद्धा कधीतरी आठवायला लागे एवढी  मी माझ्या करिअर मध्ये गुंतले होते पण त्यासाठी मला कुणीही दोष दिला नाही . पूर्ण घरच माझ्या पाठी उभे होते.” ललिता गुप्ते यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते.
आपल्या या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबियांना दिले.
हे  भाग्य फार कमी कर्तबगार स्त्रियांच्या वाट्याला आले असावे जे कर्तबगार पुरुषांच्या वाट्याला बहुधा सहज येते.
There is a popular saying, ““Whenever you are on a crossroad, follow your heart”.
आयुष्याच्या प्रवासात कधीतरी असा रस्ता येतो की ज्याला फाटे फुटलेले असतात. दोन्ही आकर्षक , हवेहवेसे. पर्याय निवडायचा तर कोणता !
हा निर्णायक पर्याय असतो जो आयुष्याची दिशा ठरवतो. करिअर का कुटुंब हा तसाच एक निर्णायक पर्याय आहे.
स्त्रियांच्यासाठी अजूनही कुटुंब ही प्रायोरिटी समजली जाते. तिच्या आयुष्याची सार्थकता लग्न आणि मुलं ह्यात आहे असे मानले जाते. नोकरी करणारी स्त्री गेली कित्येक दशके आहे. एकाच्या पगारात घरखर्च चालत नाही म्हणून अनेक स्त्रियांनी नोकरी केली, संसाराचे दुसरे चाक समर्थपणे चालवले पण आर्थिक नाड्या घरातील पुरुषाच्या हातात राहिल्या. नोकरी म्हणजे हातभार हे चित्र मात्र हळूहळू बदलत गेले. मुली , मुलांसारखेच शिक्षण घेऊ लागल्या. मोठ्या पदावर काम करू लागल्या. पगार वाढले, जबाबदारी वाढली, कामाचे तास वाढले , महत्वाकांक्षा वाढल्या आणि करिअर -कुटुंब यांचा समतोल सांभाळण्यासाठी घरच्यांचे सहकार्य मिळवणे क्रमप्राप्त झाले.
दुय्यम भूमिकेत स्त्री ला पाहायची सवय असलेल्या समाजासाठी हे स्विकारणे अवघड झाले.
आतापर्यंत सिनेमात , साहित्यात स्त्रीची एक प्रतिमा रंगवली गेली होती. सात्विक,सोज्वळ,त्यागमूर्ती, दुय्यम स्थान स्वतःहून स्विकारणारी ..या प्रतिमेला तडे जाऊ लागले.
ह्याचे वादळ घरात घोंगावू लागले.
प्रत्येक स्त्री पत्नी आणि आई या रोलसाठीच जन्माला आली असते का?  जिथे विकासाच्या प्रचंड संधी दोघांनाही उपलब्ध आहेत तिथे एका स्त्रीने कुटुंबासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षाचा  बळी देणे आवश्यक आहे का ? घर का करिअर हा निर्णय पुरुष सहज घेतो …उलट त्याच्या उत्कर्षासाठी सारे घर त्याच्या पाठी उभे राहते. ह्याच्या जागी त्याची पत्नी कर्तबगार असेल तर तिच्यासाठी सुद्धा हाच नियम लावू नये का ? असे अनेक प्रश्न घेऊन येणारा एक सिनेमा १९९४ मध्ये रिलीज झाला . या सिनेमाने ऋतुपर्णा घोष ला मान सन्मान मिळवून दिला नी प्रेक्षकांना , especially मध्यम वर्गीयांना स्वतःकडे पाहायचा आरसा.

उनिशे एप्रिल ( Unishe April — १९ एप्रिल )
———————————————————–

१९ एप्रिल ची पहाट . दिवाणखान्यात एका व्यक्तीचे प्रेत आहे. मृत्यू होऊन काही तास उलटले असावे. मृत्यूच्या वेळेस त्याच्याकडे फक्त आठ वर्षाची त्याची मुलगी होती .
“ तिनेच तर बोया ला बोलावले . बोयाने मला फोन केला . मी डॉक्टरला बोलावले पण खेळ संपला होता “ कुणीतरी कुणाला सांगतं . .  दिवाणखान्यात पुरुष जमले आहेत तर आतल्या खोलीत बायकांची कुजबुज.
“ सरोजिनी नाही का ? तिला कळवले ? “
त्यांच्या आपापसातल्या संवादावरून  समजते, “सरोजिनी”त्या मृत डॉक्टरची पत्नी, एक नामांकित नर्तिका आहे. तिचे मॅगझीनवर सुद्धा फोटो येतात. तशी ती तिच्या करिअर मध्ये मग्न . घरात लक्ष द्यायला वेळ नाही. आज सुद्धा कार्यक्रमानिमित्त ती बाहेर आहे.
आपल्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूने हादरलेल्या त्या छोट्या मुलीला ताप भरला आहे. तिच्या कानावर हे संवाद आधीही येत असतील . आईच्या नसण्याचीही तिला सवय असणार. ह्या जमलेल्या गोतावळ्याला तिची सहानुभूती आहे पण मिठू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या मुलीचे खरे नाव सुद्धा त्यातल्या अनेकांना माहित नाही. एकाकी पडलेल्या त्या मुलीचा आधार फक्त तिला सांभाळणारी दाया आहे. तिची बोया .

काही मिनिटात सिनेमा पंधरा वर्षांनी पुढे जातो. ती आठ वर्षाची मुलगी , मिठू उर्फ अदिती आता डॉक्टर झाली आहे.
होस्टेलवरून ती आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला घरी आली आहे. 

एकोणीस एप्रिल हीच तारीख आहे , जी मिठुच्या मनावर कोरली गेली आहे. ती डॉक्टर होते त्यालाही कारण आहे.
आपली आई संसारापेक्षा आपल्या करिअरला महत्व देते हा विठूच्या मनातील सल आहे.
ज्या दिवशी वडिलांचा मृत्यू होतो त्या दिवशी सुद्धा ती नृत्याच्या कार्यक्रमामुळे शहराबाहेर असते. जर ती गेली नसती तर ..तर  कदाचित वडील वाचले असते ! खरेतर या तर्काला काहीही आधार नाही पण मिठूच्या दुःख्खाला नी रागाला त्याचे भान नाही.
मेडिकलला जाणे म्हणजे एकप्रकारे आईच्या नृत्याच्या करिअरकडे पाठ फिरवणे , पर्यायाने आईलाच नाकारणे असा हा विचित्र हेका आहे. शिवाय वडील डॉक्टर म्हणून सुद्धा त्यांचा पेशा चालवणे हे तिला तिचे कर्तव्य वाटते. ह्यात स्वतःला काय हवे ह्याचा विचार सुद्धा ती करत नाही.
जे काही घडले त्यात तिचा दोष नसूनही तिला एक अपराधी भावना आहे. समाजाकडून स्त्रीबद्दल ठोस अपेक्षा असतात. त्याच चाकोरीतील स्त्री बनण्याचा तिचा अट्टाहास आहे.
ती डॉक्टर आहे , कमावती आहे , सुंदर आहे , हुशार आहे पण बॉयफ्रेंडच्या आईला करिअर करणारी स्त्री नको असेल तर तिची घरी बसायची तयारी आहे.
आईचा राग , वडील जाण्याचे दुःख ह्यात ती एवढी गुरफटून गेली आहे की तिने स्वतःच्या डोळ्यावर समाजाचा चष्मा चढवला आहे. मिठूची व्यक्तिरेखा अशी गुंतागुंतीची आहे.

जवळजवळ पंधरा वर्षांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला ती घरी येते.
हा काळ एका माणसाचे अस्तित्व संपून टाकायला पुरेसा आहे. मिठूची आई ही आता अत्यंत यशस्वी कलाकार आहे. असंख्य पुरस्कारांनी गौरवलेली तिची कारकीर्द आहे. तिचा शिष्य वर्ग मोठा आहे . तिचा चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. तिच्या नावाला प्रतिष्ठा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सरोजनीचे आपल्या कलेवर आत्यंतिक प्रेम आहे. तिच्या आयुष्याचा तो महत्वाचा भाग आहे.” एकोणीस एप्रिल” हा दिवस  मिठूच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे कारण त्या दिवसानंतर तिच्यासाठी वडिलांचे नाही तर आईचे अस्तित्व संपलेले आहे.
सरोजिनी साठी मात्र वर्षातील एक दिवस एवढेच त्याचे महत्व आहे.  

आपली आई ही तारीख विसरली हे विठूच्या लक्षात येते. दोघांच्यातलं अंतर अजून वाढते. तिची अढी , तिचे स्वतःपासून दूर जाणे सरोजीनीला जाणवते पण त्यासाठी काय करावे हे तिला समजत नाही.

तिची शाळा , तिचे कॉलेज , मेडिकलची फी , हॉस्टेल या सर्वांचा खर्च मी केला , करू शकले कारण माझी कारकीर्द होती .. तीच जर केली नसती तर हे कसे शक्य होते ! एवढेही या मुलीला समजू नये याचे तिला वैषम्य वाटते. प्रत्येक गोष्टीला औपचारिक रीतीने आभार मानणे तिला खटकते . . त्यात याच दिवशी सरोजीनीला नृत्य कलेसाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर होतो. घरात पत्रकार, चाहते , मान्यवर यांची गर्दी होते .
घर उत्साहाने , आनंदाने भरून जाते . मिठू अजून एकाकी होत जाते.
सरोजिनी कार्यक्रमाला निघून जाते. पेपरमध्ये याची बातमी येते आणि  मिठूच्या प्रियकराची आई , एका नर्तिकेची मुलगी म्हणून या लग्नाला नकार देते. एकटी पडलेली , नैराश्येने खचलेली मिठू आत्महत्येचा निर्णय घेते.

बाहेर वादळ घोंगावत असते. तुफान पाऊस. सगळ्याच बाजूनी हरलेल्या मिठूला आता लढायची ताकद नसते. ती शेवटचे पत्र लिहून झोपेच्या गोळ्या घेणार …तोच बेल वाजते. बाहेर असते , तिची आई .. भिजलेली , थकलेली.

तिच्या नजरेस तो कागद पडतो नी इतक्या वर्षाचे मनात साठलेले वादळ बाहेर येते. शब्दांना वाट मिळते. संवाद, जो हरवलेला असतो , तो आरोप प्रत्यारोपातून का होईना सुरु होतो .
द्वेष. संताप, वेदना,कटुतेचे साचलेले मळभ दूर होऊ लागते.
आईची सुद्धा बाजू आहे याची मिठूला जाणीव होते. जाणिवेच्या पायावर माय लेकीचा एकत्र प्रवास सुरु होईल का ?

ही केवळ दोन व्यक्तिरेखांमधली गैरसमजाची गोष्ट नाही. आई आणि तिच्या मुलाच्या नात्याला केवळ वात्सल्याचे पदर नसतात. आई कशी असावी , कुटुंबात तिचे स्थान काय असावे, तिची करिअर , कुटुंबाच्या आड येत असेल तर तिचे कर्तव्य काय असावे,  ह्याचे सामाजिक पदर आहेत. पिढ्यान पिढ्या आपल्या संस्कृतीत ते रुजले आहेत. मिठूच्या मनावर याचे संस्कार आहेत. आजूबाजूची कुटुंबे , त्यातील पती पत्नीचे नाते पाहून तिच्या समजुती घट्ट झाल्या आहेत. 
आपली आई , इतर आई सारखी नाही . तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे , ती कलाकार आहे आणि आपल्या कलेवर तिचे प्रेम आहे , कदाचित सर्वाहून जास्त आहे ..मिठूसाठी ही गोष्ट अत्यंत दुःखदायक आहे. आपल्या वडिलांच्याकडे आईचे दुर्लक्ष झाले, म्हणून  त्यांचा मृत्यू झाला ही समजूत सुद्धा ती समाजात मान्यता पावलेली आईची प्रतिमा नाही या समजुतीतून आली आहे. मैत्रिणीची आई केक बनवते तर आई विकत आणते, भले तो सर्वात उत्तम असेल याचाही तिला राग आहे. 

मिठूच्या जगात तिच्या वडिलांच्या आठवणी आहेत. तिचे डॉक्टर होणे , स्वतंत्र असूनही प्रियकराच्या हट्टाला बळी पडणे, त्याने नकार दिल्यावर , त्याचे वागणे चुकीचे असूनही , स्वतःचा आत्मविश्वास गमावणे . एका  आदर्श सोशिक स्त्रीच्या मोल्ड मध्ये स्वतःला बसवणे हे सारे वडिलांशी निगडित आहे. त्यांना आवडेल अशी स्त्री बनण्याचा तिचा प्रयत्न आहे. 

सरोजिनी याच्या विरुद्ध आहे. आधी नवऱ्याचा मृत्यू, सासरच्या लोकांशी दुरावा , एकुलत्या एक मुलीचा अबोला असे सर्व असूनही तिने आपली जागा बनवली आहे. स्वतःची कला,  नृत्य शाळा , कार्यक्रम या सर्वाला तिने वाहून घेतले आहे. आई मुलीच्या नात्यात पडलेली दरी बुजवण्याची तिची इच्छा आहे पण तिचे सेलिब्रिटी स्टेटस आणि मुलीचा समजून न घेण्याचा त्रागा यामुळे ही दरी वाढत चालली आहे.  याची भरपाई ती आपल्या विद्यार्थिनींना प्रेम देऊन करते. तिच्या शिष्यांसाठी ती दुसरी आईच आहे. 

ज्या वडिलांसाठी मिठू आईशी संबंध तोडायला तयार होते ते खरंच यात बळी पडले आहेत ?
आपल्या समाजात पुरुष कर्ता मानला जातो. त्याचे उत्पन्न , त्याची सामाजिक प्रतिष्ठा त्याच्या पत्नीहून जास्त असावी अशी समाजाची अपेक्षा असते. पत्नी हे त्याच्या कर्तृत्वाचे एक अंग असावे एवढेच तिचे स्थान असते. जेव्हा या धारणेला धक्का बसतो तेव्हा अनेक वेळा पुरुष ते पचवू शकत नाही . तिच्या नावाने आपल्याला ओळखले जावे हे त्याला अपमानास्पद वाटते आणि त्यातून पत्नीवर बंधने घातली जातात. त्यात स्वतःच्या अंगात तेवढे कर्तृत्व नसेल आणि पत्नीच्या आर्थिक साहाय्याची गरज असेल तर मात्र त्याची स्थिती तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी होऊ शकते.
यात पत्नीचा सुद्धा काही दोष नसतो. अनेकवेळा समजावून घेण्याच्या प्रयत्नाला सुद्धा समजूतदारपणाची जोड मिळत नाही . बायका हे सहन करतात किंवा खचतात.
काहीच , हे मनावेगळे करून स्वतःचा आनंद शोधतात , स्वतःची प्रगती करतात आणि एक वेगळे विश्व निर्माण करतात. असामान्य स्त्री , सामान्य पुरुषाला मिळणे ,ना त्याला सहन होते , ना समाजाला .. 
हे सगळे संवादातून उलगडत जाते हा भाग अतिशय सुंदर आला आहे. 

काही गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत आणि त्यासाठी ऋतुपर्ण घोष यांचे कौतुक करावे तेवढे थोडे.

१) सरोजिनींच्या या प्रवासात तिची साथ देणारा तिचा मित्र आहे. तिच्या कारकिर्दीत त्याचा महत्वाचा वाटा आहे .
“ तू लग्न का नाही केलेस ? “ मिठू तिला विचारते.
सरोजिनींच्या डोळ्यात राग नाही , त्रागा नाही , दुःख नाही  ना पस्तावा . तिच्या डोळ्यात नवल आहे .
स्त्री पुरुषात मित्रत्वाचे सुंदर नाते असू शकते . नर मादीचे रूप त्याला द्यायची अजिबात गरज नाही , हे वाटूच कसे शकते हा प्रश्न तिला पडतो .
I was not meant to be married . or even a mother …
———————————————————————
हे एवढे सहज आलेय . मुलींसाठी खंत आहे पण यात पस्तावा नाही .. आई किंवा पत्नी होण्यासाठी जे काही असते ते आपल्यात नाही ..आपले आयुष्य कलेसाठी आहे , ती गोष्ट बाकी सर्वाहून मोठी आहे याचा तिला अहसास आहे. त्याचे तिला वाईट वाटत नाही .. उलट कदाचित आपण लग्न केलेच नसते तर बरे झाले असते याची स्पष्ट कबुली देण्यात तिला वावगे वाटत नाही .
तू तेव्हा का लग्न केलेस ? मुलीच्या या प्रश्नाला सुद्धा ती प्रांजळ उत्तर देते . मी लहान होते आणि समाजाची एक अपेक्षा असते. योग्य त्या वयात लग्न , मूल ह्यात स्त्रीची सार्थकता असते याचा पगडा असतोच .. माझ्याही होता.
असे नाही की मी प्रयत्न केला नाही … तीन वर्षे करिअर सोडली पण ते सुद्धा चालण्यासारखे नव्हते .
मग मी स्वतःला माझ्या कलेत गुंतवले ..

२) या सिनेमात घर सुद्धा एक महत्वाचे पात्र आहे.
खालचा मजला सरोजिनी चा . तिच्यासारखा नीट, देखणा , सुबक . सर्व वस्तू जागच्याजागी . 
सरोजिनी ने स्वतःचे आयुष्य ताब्यात घेऊन नेटके बनवले आहे त्याचे प्रतीक , तर वरच्या मजल्यावरील खोली मिठूची . यातल्या सर्व वस्तू तिच्या वडिलांच्या आठवणींचा एक भाग आहे. अगदी इथल्या कॅलेंडरवर सुद्धा एकच तारीख आहे ..
ती कायम आहे .
नवल असे की या दोघींच्या मनातील पीळ सुटायला सुरुवात होते ती स्वयंपाकघरात ..
ही अशी खोली आहे की जिथे दोघींचा वावर नाही . दोघी करिअर करणाऱ्या स्त्रिया पण काम करणारी बाई , पावसात अडकल्याने अचानक स्वयंपाक करायची जबाबदारी दोघीवर येते.
एक जुनी पाककृतींची वही मिळते . इथल्या जुन्या फडताळात काही वस्तू, त्याचा परिचित गंध त्यांना भूतकाळात घेऊन जातो आणि  पुसलेल्या वाटा परत एकदा सामोऱ्या येतात . 
एका सुजाण नात्याची ती सुरुवात असते.  

अपर्णा सेन ( सरोजिनी) आणि देबश्री रॉय( मिठू) ह्या दोघींच्या अभिनयाची  जुगलबंदी आपली नजरबंदी करते.
चुकवू नये असा सिनेमा . ऍमेझॉन प्राईमवर पाहायला मिळेल .

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 



 

10 thoughts on “कर्तृत्व आणि  कुटुंब यामधील “क” एवढा वेगळा “का” असावा हा विचार करायला लावणारा ऋतुपर्ण घोष याचा सिनेमा “ उनिशे एप्रिल “ ”

  1. खूप छान लिहिलंय. लेख वाचून सिनेमा बघितला तर जास्त छान समजेल.

  2. काय कमाल लिहिलंत प्रियादी ❤
    दोघींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्वतः च्या आयुष्याचे निर्णय घेऊन ते पेलण्याची जबाबदारी घेणं आणि त्या दरम्यान दोघींचे आयुष्याला सामोरे जाणे… सगळंच अफलातून. नर्तकी आणि डॉ. या दोन व्यक्तिरेखा ऋतुपर्ण घोष यांनी जाणीवपूर्वक घेतल्या असाव्यात. दोन्ही क्षेत्रात समर्पण हवेच. त्या सोबतच समतोल सुद्धा साधता यायला हवा नात्यातील. फार सुंदर

    1. Thank you Kamini
      हा फारच वेगळा मुद्दा मांडलास.
      ती करिअरची निवड खरंच योग्य आहे

  3. अतिशय छान. परिपूर्ण लेख 👌🏻
    तुझा प्रत्येक लेख पटकन वाचून संपवावा असा नसतो. किमान दोनदा वाचते. आणि वेळ मिळेल तेव्हा, तो चित्रपट पाहून चिंतन करायला प्रवृत्त करतेस.
    😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  4. प्रिया,
    नेहेमीप्रमाणे उत्तम लेख.
    नक्की बघते हा चित्रपट.

  5. सुंदर शब्दात परीक्षण ! अतिशय वाचनीय व विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखन . पण समाज असाच एकाच बाजूने विचार करतो जरी हजारो स्त्रिया आज करीयर करताना दिसतात . सिनेमा पाहताना जास्त उमगेल हे वाचून
    धन्यवाद प्रिया मॅडम !

Leave a Reply to Sanjay Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *