Skip to content

एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.

बंगाली शब्द “अबोशेही” ( Abosheshey) चा अर्थ आहे “ शेवटी”  “At last”

पार्थ आणि सुचिस्मिता रॉय. त्यांचा प्रेम विवाह आहे. रॉय हे आडनाव आणि त्यांचा मुलगा ह्या दोनच गोष्टी त्या दोघांच्या सामायिक आहेत. नाहीतर Opposites attract हे घासून पुसून गुळगुळीत झालेले वाक्य या दोघांबाबत प्रत्यक्षात आले आहे.
तसे म्हंटले तर हा प्रेमविवाह.
ती कलाकार. संवेदनशील, हळवी. तो प्रचंड व्यवहारी.
आपले शहर, माणसे, संस्कृती या बाबत ती आग्रही. त्याचे जग, त्याच्याभोवती फिरणारे. त्याला जे सोयीस्कर, त्या बाबतीतच तो आग्रही.
ती गर्भ श्रीमंत , तो मध्यमवर्गीय.
हा फरक त्याला खुपतो. त्यालाही श्रीमंत व्हायचे आहे. जर कोलकातामध्ये ते शक्य नसेल तर शहर सोडून अमेरिकेला जायची त्याने तयारी केली आहे. मागे त्याचे वृद्ध वडील आहेत. त्यांच्यावर त्याचे प्रेमही आहे पण त्याची स्वप्ने आणि त्याचा भाग्योदय जास्त महत्वाचा आहे. तिला मात्र कोलकाता सोडून जायचे नाही. तिचे तिच्या शहरावर प्रेम आहे. तो तिला पर्याय देतो, “त्याची स्वप्ने किंवा कायदेशीर विरह”.
ती स्वतःच्या स्वप्नांना महत्व देऊन जायचे नाकारते. तो जातो, जाताना त्यांच्या मुलाला घेऊन जातो. “एक वर्ष. त्याच्या आत तुझा निर्णय झाला नाहीस तर मी दुसरा मार्ग स्विकारायला मोकळा आहे” त्याचा निर्वाणीचा इशारा. 
ती आपल्या मनाचा कौल स्विकारून कायमची पाठ फिरवते. त्यांच्यातला एकुलता एक दुवा मात्र ती तोडू शकत नाही. 

अबोशेही हा सिनेमा म्हणजे एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा.

सिनेमाची सुरुवात होते ती सुचिस्मिता रॉयच्या अपघाती मृत्यूने. वेगाने गाडी चालवण्याचे वेड तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. मृत्यूनंतर तिचा फ्लॅट, तिची प्रॉपर्टी तिने मुलाच्या नावे केली आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे , जमल्यास हे सगळेच विकून टाकून अमेरिकेला जाणे या हेतूने सौम्या कोलकाताला येतो. फार लहान वयात वडिलांबरोबर परदेशात गेल्याने त्याच्या आठवणीच कमी आहेत. ज्या आहेत त्या अंधुक तर आहेतच, शिवाय त्याला कडवटपणाची किनार आहे. एवढ्या वर्षात त्याचा आईशी कसलाही संबंध नाही, तिने ठेवलाच नाही त्यामुळे एक सूक्ष्म अढीही आहे.
आईचा उल्लेख तो सुचिस्मिता रॉय असा करतो. हे शहर त्याच्यासाठी संथ आहे. केवळ पासपोर्ट वर त्याचे नाव एवढाच या शहराशी त्याचा संबंध. 

जेवढे लवकर होईल तेवढे लवकर आटपायचे या निश्चयाला येत्या क्षणीच सुरुंग लागतो. त्याच्या वडिलांचे मित्र त्याला कागदपत्र देतात. एक लिफाफा , ज्यात आईने त्याला लिहिलेले पत्र असते. ते निदान उघडून वाच अशी विनंती ही करतात.
आईच्या फ्लॅट मध्ये तो जातो खरा पण त्याला तिथे राहावेसे वाटत नाही. आपण उपरे आहोत, तिला नकोसे ही जाणीव अस्वस्थ करते. तो हॉटेलमध्ये आपले सामान हलवतो.

आई आणि मुलामध्ये असलेला बंध मात्र तुटता तुटत नाही.. कितीही नकोसे वाटले तरी त्याच्या आईचा उल्लेख पदोपदी येतोच. तिचे मित्र, मैत्रिणी, बिल्डिंगचा रखवालदार, एक छोटासा संगीत प्रेमी ग्रुप, ज्यांना त्याच्या आईने मदत केलेली असते, तिची बहीण, तिचा भाऊ, तिचे शेजारी या सर्वांच्या गप्पातून त्याला आई उलगडायला लागते. न राहवून तो तिचे पत्र वाचतो.
त्यातून वीस वर्षे तिने जपलेल्या त्याच्या आठवणी त्यालाही आठवायला लागतात.
आपण आईला समजून घ्यायला चूक करतो आहे का , पहिल्यांदाच हा प्रश्न पडतो.
हॉटेल सोडून देऊन, तो आपले सामान आईच्या फ्लॅटमध्ये हलवतो.

जन्मभूमी सुद्धा आईच. कितीही लांब गेले तरी शहराची ओढ सुद्धा आटत नाही. कोलकाता बद्दल त्याच्या आईचे मत आहे
“ कोलकाता  फक्त शहर नाही. जगण्याचा अंदाज आहे. “ 

या सिनेमातील एका नाव नसलेल्या पात्राचे मत मात्र वेगळे आहे.
त्याच्या मते, कोलकाता हे संपत चाललेले शहर आहे. जगाचा वेग प्रचंड वाढलेला आहे पण इथे काही हलतच नाही. इथे राहणारी माणसे फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारतात पण काही करायचे हे त्यांच्या गावी नाही. माणसे फक्त निवृत्त व्हायला ह्या शहरात येतात. 
सुचिस्मिता रॉय सुद्धा या शहरासारखीच आहे. तिच्याजवळ आहेत फक्त आठवणी आणि कधीतरी आपला मुलगा आपल्यासाठी परत येईल याची आस. रवींद्र संगीत आणि चित्रकला या ती मन रमवते. या शहरासारखीच ती सुद्धा अत्यंत हट्टी आहे. तिची बदलायची तयारी नाही.
मनाला जे मुरड घालू शकत नाही,  ते कुणाबरोबर राहूसुद्धा शकत नाही.
दोन आडमुठ्या, स्वकेंद्रित लोकांचे एकमेकांपासून दूर जाणे हे अटळ असते.  माणसे वाईट नसतात. त्यांच्या बाजूने ती  बरोबर असतात.
बंगाली लोक, जगाच्या पाठीवर कुठेही जावो, त्यांची भाषा, संगीत, खाद्य पदार्थ, त्यांचे सण लक्षात ठेवतात, कोलकाता च्या हावरा ब्रीज, प्रिंसेप घाट, कॉलेज स्ट्रीट, काली घाट या जागा त्यांना बोलावतात पण ते या शहरात राहू शकत नाही. लांबूनच ह्या शहरावर प्रेम करणे त्यांना शक्य असते. काही नाती आणि माणसे सुद्धा अशीच असतात. 

सिनेमा अतिशय संथ आहे. आई आणि मुलगा यांच्यातील बंध हा विषय असला तरी यात आई_मुलाची भेट नाही.
त्यातून निर्माण होणारे नाट्य ही नाही. आहेत ती फक्त पत्रे, तिच्या आठवणीतील तो छोटासा मुलगा, त्याच्या वस्तू, त्याचे फोटो, त्याची खेळणी आणि तिने सोसलेला विरह.
मुलासाठी हे सर्व आईला जाणून घेण्याचे मार्ग आहेत. त्यावर नक्की काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न सुद्धा  त्यानेच सोडवायचा आहे. त्यातून नक्की समोर काय येईल याचीही त्याच्या मनात भीती आहे. मुळातच तिने आपल्याला दूर केले याचा राग आहे, नाकारल्याचे दुःख आहे , या सर्व भावनांशी त्याने एकप्रकारे तडजोड केली असताना आता परत त्यांना उघडे करणे त्याच्यासाठी कठीण आहे. तो सारा प्रवास ह्या सिनेमात फार हळुवार आलेला आहे. 

एक प्रकारे पाहायचे तर आपण सुद्धा नाती एका साच्यातून पाहतो. ती तशीच असावीत असा आग्रह धरतो. नात्याच्या पलीकडे असलेला माणूस पाहायचा आपण प्रयत्न करतो का ? चौकटीत बंदिस्त असलेली नाती, चौकटी बाहेर जातात तेव्हा त्याच्याशी चिकटलेल्या माणसांनी नक्की काय करणे अपेक्षित असतें!
सिनेमा हा विचार करायला भाग पाडतो. 

मुख्य पात्र दोन. आई (रूपा गांगुली) आणि मुलगा सौम्या (अंकुर खन्ना )
त्यांनी अप्रतिम भूमिका वठवली आहे. 

सुची स्मिता चे मनस्वीपण, संवेदनशीलता, आयुष्य भरभरून जगायची असोशी वृत्ती प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. , मग ते जुन्या हवेलीत रमणे असो , त्या भिंतीवर काढलेली चित्रं, रवींद्र संगीत गाणे हे सर्व ती आनंदाने करते..त्यात रमून जाते..या शहरावर तिचे प्रेम आहे. उदयोन्मुख कलाकाराचा ग्रूप आहे त्याला वाद्ये देण्यासाठी पैसे देणे, त्यांच्या जॅम ला उपस्थित राहणे, पावसाच्या सरी सुरू झाल्या की  गॅलरीत त्याचे तुषार अंगावर घेवून मनसोक्त गाणे , बहिणीकडे जाऊन, तिच्याकडे तिच्या हातचे  खास बंगाली पदार्थ खाण्याचा हट्ट धरणे..भरपूर गप्पा मारणे. 
तिला या शहरापासून या संस्कृती पासून वेगळे करताच येत नाही. ती का गेली नसावी याचे उत्तर तिच्या या व्यक्तीमत्वात आहे पण तरीही डोळ्यातली उदासी कुठे जात नाही.   आनंदी असताना सुद्धा , घेतलेला निर्णय निभावताना सुद्धा, मुलाला निदान एकदा तरी पहावे ही इच्छा तिच्या काळजात तिने जपून ठेवली आहे.

कथेच्या अनुषंगाने येणारी पात्र, सुचीचा भाऊ, बहीण, मित्र, बहिणीचा नवरा , यांच्याशी झालेल्या भेटीतून सुची समजते. तिची हुशारी, कलेतील कसब, आणि त्याच बरोबर कुठेही न वाकण्याचा स्वभाव. स्वतःला थांबवणे ना तिला जमले, ना पार्थला. सिनेमात दोषाचे ओझे एकाच्याही खांद्यावर टाकलेले नाही. संसार का टिकतो याचे एकच उत्तर  असते; “टिकवायचा नाहीच”
मग मार्गच बंद होतो. 

पार्थचें पात्र अदृश्य आहे या सिनेमात. मुलाचा तो लाडका बाप आहे. मुलगा त्याच्या संपर्कात आहे. कोलकाता येथे पोचल्यावर फोन करणे , त्याला घडामोडींची माहिती देणे, आपण परत कधी येवू हे कळवणे या साऱ्या गोष्टी त्याचे चांगलें वडील असणे दर्शवतात. आईची पत्रे मात्र ते मुलाला पोचू देत नाहीत. ह्याचा हेतू कदाचित असाही असावा, की जर पाश तोडून टाकले आहेत तर ते पूर्णतः तुटावेत. लहान वयात मुलांना दूविधा असू नये. बालपणात पर्याय खरेतर देवू नयेत. हे मोठ्यांचे प्रश्न समजण्याचे त्यांचे वय नसते. मुलं स्वतःला अपराधी मानतात. मला निदान सिनेमा पाहताना हा निर्णय बरोबर वाटला.

सर्वात महत्वाचे पात्र रीमा सेन हिने रंगवले आहे. सुचीच्या शेजारी राहणाऱ्या नंदिनीचे एक आगळे नाते आहे सुचीशी. ती खूप लहान आहे. तिच्या बालपणात सुचीने आपल्या मुलाला शोधले आहे. तिचा वाढदिवस साजरा करणे, एकत्र गाणी गाणे, फिरणे, हॉटेल मध्ये जाणे या साऱ्या गोष्टीने तिचा एकाकी पणा काहीसा दूर झाला आहे. तिच्या वाट्याला आलेला एकाकीपणा दूर करताना नंदिनीने तिच्या आता दडलेल्या व्यथित सुचीला सुद्धा जाणून घेतलें आहे. कुठेही प्रश्न न विचारता तिला बोलके केलं आहे. कदाचीत म्हणून, तिच्या मुलाला तिच्या आठवणींशी जोडणारी ती महत्वाचा दुवा आहे.

नाते संबधांवरील सिनेमा म्हणजे फक्त लग्नाबाहेरील शारीरिक संबध असं समीकरण झालेय. ते ह्या सिनेमात नाही. उगाच केलेली गुंतागुंत, कसलाही पोच नसलेले स्पष्टीकरण, त्या अनुषंगाने दाखवली जाणारी उत्तान दृश्ये या सिनेमात नाहीत. सुचीनी सिगार ओढणे किंवा दारू पिणे याची एक दोन दृश्ये आहेत . माणसे एकटी असतात.दुःखी असतात. आपापल्या परीने दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे व्यसन झालं नाही तर उलट सकारात्मक परिमाण होतो. शिवाय हे थांबव असे प्रेमाने सांगणारी, समजवणारी अनेक जण तिच्या भोवती आहेत.

तिचा मित्र हे एक वेगळे समीकरण आहे. तो विवाहित आहे. त्याला सुची बद्दल soft corner आहे. सुप्त आकर्षण आहे  पण ते आकर्षण कौतुकात बदलले आहे. अभिलाषेत नाही.  हे लिहायला सुद्धा मला फार छान वाटत आहे. कुठेही बेछूट वागणे या सिनेमात नाही. सर्व पात्रांच्या वागण्यात एक संतुलितपण आहे. संयम आहे.

शेवट मात्र थोडासा खटकतो. सुचीचे पात्र चांगले दाखवण्यासाठी तिच्या नवऱ्याचे एक अफेअर सूचित केले आहे..त्याची अजिबात गरज नव्हती. दोन माणसे एकमेकांपासून लांब जायला तिसऱ्या व्यक्तीची गरज नसते. तुमचा आडमुठेपणा फक्त कारण असतो. कधीकधी माणसे एकमेकांसाठी बनलेली नसतातच. अशावेळी आपले आयुष्य समांतर जगणे हा एकच पर्याय असतो. दोन्ही माणसे हे ओळखून आहे त्यामुळें कुठेही आदळआपट नाही. समंजस स्विकार आहे. त्यामुळें हवे असेल त्यांचा मुलगा फार चांगला निपजला आहे. तो सुशिक्षित आहे . त्याची स्वतःची करिअर आहे. वडिलांवर त्याचे प्रेम आहे आणि आईची बाजू समजल्यावर त्याने तिला माफ सुद्धा केलें आहे. “आता पर्यंत आईच्या मनात मी होतो , यापुढे ती माझ्या मनात राहील” हा शेवट अशा नात्यांकडे कसे पहावे हे शिकवून जाणारा.

आवडलेल्या गोष्टी.

१. नो मेलोड्रामा.
२ पूर्णतः मध्यमवर्गीय माणसांची  गोष्ट जी कुणाच्याही घरात होऊ शकते.
३. अप्रतिम अभिनय आणि कोलकता साड्या 
४. कोलकता 
ज्या तऱ्हेने हे शहर चित्रित केले आहे. आहा.. मला तिथं असल्याचा फील आला.
५. संगीत. रूपा गांगुलीनेच आपली गाणी गायली आहेत. तिला त्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक आहे. गाण्या सारखेच त्याचे चित्रण .

न आवडलेली गोष्ट.

१ खूप संथ..काहीवेळा फास्ट फॉवर्ड करायचा मोह होतो.
२. जेव्हा एखादी स्त्री चाकोरीच्या बाहेरचे जगणे स्विकारते, तेव्हा निदान ती स्वतःच्या हिमतीवर उभी आहे हे दाखवणे अपेक्षीत असतें. चरितार्थासाठी सुची काय करते ते कुठेही स्पष्ट झाले नाही त्यामुळे हे कधीतरी अरण्य रुदन होतें आणि हा एकाकी लढा फार वरवरचा वाटतो.

एकत्र राहण्यासाठी व्यक्तींत बंध असावा लागतो. त्याचे जेव्हा बंधन होते तेव्हा नाते मोडकळीला येते.
या सिनेमाचे एक विशेष आहे. यातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे पण ती दुसर्यांचा मताचा आदर करते आणि ते मत स्विकारते.  पार्थ अमेरिकेला जायचा निर्णय घेतो तेव्हा सुचिस्मिता त्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. मुलालाही थांबवत नाही. इथे राहणे हा तिचा निर्णय आहे. तिची मुळे या  शहरात खोल रुजली आहे. 
आपले स्वतंत्र विश्व ती निर्माण करते. आजारी सासर्यांची काळजी घेते. चित्रकला आणि संगीत जोपासते. तिचे मित्रमंडळ मोठे आहे. विविध कार्यक्रमांना जाते. अनेक उपक्रमांना मदत करते. नंदिनीची मानस आई होते. तिच्याशी विश्वासाचे नाते जोडते. आपला एकाकीपणा सत्कारणी लावते.
सुचिस्मिता म्हणजे सुंदर हास्य असणारी.
कोणत्याही दुःखात ते हास्य तिची साथ सोडत नाही.  
सुरुवातीला पूर्णतः तटस्थ असलेला, अमेरिकन संस्कृती अंगात मुरलेला सौम्या हळूहळू कोलकाताशी एकरूप होतो.
ज्या मातीत त्याचा जन्म झाला आहे तिला जाण्याचा प्रयत्न करतो. तो वडिलांना जाब विचारत नाही पण त्याचवेळी आईकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्यात यशस्वी होतो.  
फ्लॅट मध्ये, बाल्कनीत उभे राहून, क्षितिजाकडे पाहणारे माय लेक ही सिनेमाची शेवटची फ्रेम आहे. अर्थात तिचे असणे virtual. पण त्यांच्यातले मिटलेले अंतर घशात आवंढा आणते. 
पूर्ण सिनेमात एकदाही तो आईला , आई म्हणून संबोधत नाही. तो तिला सुचिस्मिता म्हणूनच संबोधतो किंव तिचा उल्लेख करतो पण सिनेमाच्या शेवटी ते खटकत नाही. सुचिस्मिता एक अत्यंत स्वतंत्र स्त्री असते. केवळ आईच्या चौकटीत तिला बांधता येत नाही आणि मुलाने तेच स्विकारणे हे मला फार वेगळे वाटले. 

10 thoughts on “एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.”

  1. चित्रपट जेवढा संयमी आहे तेवढचं तुमचं परीक्षण संयमी आहे. तुमच्या परीक्षणामुळे दुधात साखर पडावी तसं चित्रपटाची गोडी वाढतीय. परीक्षण वाचल्याने सिनेमा बघण्याची उर्मी तीव्र झाली. तुम्ही वडिलांसंबधी लिहिलेल्या लेखापासून मी तुमच्या लेखणीचा फॅन आहे. खूप सुंदर प्रवाही आणि साधं सोपं लिहिल आहे तुम्ही. ग्रेट .

  2. सिनेमा बघावाच लागतोय इतके सुरेख लिहिलंय👌👌
    संपूर्ण लेख अगदी सर्वांगसुंदर!
    पालकांचे समुपदेशन सुद्धा होतेय यातून. खूप छान 👌🏼👌🏼💐

  3. Namrrataa Sawant

    खूप सुंदर लेख लिहिला आहे प्रिया दी. Nakkich बघणार. बघताना एक दृष्टिकोन मिळाला आहे.

  4. खूप छान लिहिले आहे. वाचुन सिनेमा बघावासा वाटतो 👍👍

  5. काय सुरेख लिहिलं आहेस! सिनेमा बघेन की नाही माहिती नाही पण लेख फार आवडलाय👌

    1. गौरी , ऍमेझॉन वर आहे ,…अजिबात टाळू नकोस
      फार सुंदर अभिनय आहे.

Leave a Reply to Namrrataa Sawant Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *