Skip to content

छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में.


मुंबईसारख्या शहरात सारे आयुष्य गेले त्यामुळे जेमतेम ५०० स्क्वेअर फूट फ्लॅटलाच घर समजण्याची माझी मानसिकता होती. सर्वसामान्य मध्यम-वर्गियांचे घर म्हणजे एकमेकांना जोडलेल्या तीन किंवा चार खोल्या. वर्हांडा तेव्हा सामायिक असायचा. आपल्या दारासमोरची जागा आपली समजून, कुंड्यात दोन चार झाडे लावून स्वतःच्या बागेचे स्वप्न माणसे पूर्ण करीत.  आठ, दहा वर्षाची असताना, मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या एका नातेवाईकांकडे जाण्याचा योग आला आणि तीन, चार मजली इमारतीत, एखाद्या मजल्यावर असणाऱ्या राहण्याच्या जागेला  घर नाही तर  फ्लॅट म्हणतात हे पहिल्यांदा समजले . 
छोट्याशाच जागेवर बांधलेले ते बंगलीवजा घर होते. बाहेरच्या मोकळ्या जागेत घरापेक्षाही उंच झाडे होती.  मागच्या भागात एक छोटीशी बाग होती. जी फुले, फुलवाल्याच्या पुडीतून घरात यायची ती सर्व तिथे मोकळ्या वातावरणात बहरलेली पाहूनच मी हरखून गेले. या घरातील प्रत्येक माणसाची स्वतंत्र खोली होती. तीन खोल्यात आठ जणांबरोबर राहणाऱ्या मला त्या घराचे विलक्षण अप्रूप वाटले. 
“राहतेस का इथे?” असे त्या मावशीने विचारल्याबरोबर मी कोणाकडेही न बघता मोठ्ठा होकार दिला.  
पहिले दोन, तीन दिवस तर नवलाईचे होते. पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या छोट्याश्या जिन्यावरून वर खाली करणे, देवाच्या छोट्याश्या स्वतंत्र खोलीत माझ्या एवढ्या उंचीच्या समईत वात घालून त्याच्या मंद प्रकाशात प्रार्थना म्हणणे, बाहेरील प्राजक्ताच्या झाडाचा जमिनीवर पडलेला सडा स्वतःच्या हाताने ओच्यात भरणे, झोपाळ्यावर बसून झोके घेणे, फुलपाखराच्या मागे धावणे यात पटकन निघून गेले. नंतर मात्र घरातील माणसांची आठवण येऊ लागली. खरेतर इथे झोपायला स्वतंत्र खोली होती. त्याच्या खिडकीतुन येणारे चंद्राचे चांदणे थेट माझ्या कुशीत येत होते पण ते दाखवायला जवळ आम्मा नव्हती. आम्माचे वाट पाहणारे डोळे साद घालू लागले. आईची अंगाई, बाबांच्या गोष्टी, भावाचा खोडकरपणा, बहिणीची मस्ती या सर्वांची आठवण येऊ लागली. पंधरा दिवस तरी इथे रहायचंच हा सुरुवातीचा निश्चय पुढच्या दोन दिवसातच कोलमडला आणि मी “माझ्या घरी”  परतले.  
घर म्हणजे निव्वळ भिंती, खोल्या नाहीत तर घर म्हणजे घरातील, माझी हसती, खेळती माणसे याची जाणीव त्या लहान वयात अगदी प्रकर्षाने झाली. चार दिवस त्या मायेच्या  सावलीपासून लांब राहिल्याने असेल, माझ्या छोट्याश्या तीन खोल्याबद्दल माया, जिव्हाळा वाटू लागला. जी वास्तू ओढ लावते, जिथे जीवाला जीव देणारी माणसे असतात, जी  प्रेमाची उब देते, उपेक्षांच्या हुंदक्यांचे अश्रू पुसते, कधी सावरते तर कधी दरडावते ती वास्तूच  माझे घर ही व्याख्या मनात घर करून बसली. 
कामानिमित्त जगभर फिरणारी माणसे, त्या निमित्ताने उत्तमोत्तम हॉटेल्समध्ये राहणारी माणसे सुद्धा स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतात. तुमचे घर हे बंगला असू दे किंवा फ्लॅट; झोपडे असू दे किंवा तंबू; अगदी गुहेत राहणाऱ्या आदि-मानवाचीही  आपल्या हक्काच्या भिंतीशी बांधिलकी असते. “चल, आपण घरी जाऊ” असे जेव्हा मनात येते तेव्हा आपण फक्त चार भिंतीचा विचार करत नसतो. ही अशी जागा असते जी तुम्हाला विश्वास, आराम, सुरक्षा  आणि माया देते. जिथे आपण आपला मुखवटा बाहेर पार्क करून येऊ शकतो.   
घराचे स्वप्न जेव्हा माणूस बघतो, तेव्हा तो केवळ चार भिंतीचे स्वप्न पाहत नाही. निवाऱ्याची गरज ही मूलभूत गरज आहे. त्या बरोबरच समाजात वावरूनसुद्धा आपला हक्काचा असा एकांताचा कोपरा असावा असेही प्रत्येकाला वाटते. त्याच्या खिशाला कितीही मर्यादा असू दे, त्याच्या स्वप्नांना त्या मर्यादा संकुचित करत नाहीत. घर बांधण्यापेक्षा सुद्धा, स्वप्नात रंगवलेले घर त्याच्या आशा जिवंत ठेवते.   

” छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में, आशा दीवानी मन में बँसुरी बजाए “
————————————————————————————
( सिनेमा -नोकरी, गीतकार- शैलेंद्र, संगीतकार-सलील चौधरी, गायक-नायक – किशोर कुमार)

१९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “नोकरी” या सिनेमातील हे गीत म्हणजे प्रत्येक तरुणाचे स्वप्न . यातील नायक हा  गरीब आहे . घरात आहे ती विधवा आई आणि आजारी बहीण. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत आहे.  आपण पदवी मिळवणार आणि मग नोकरी मिळणार इतके  साधे स्वप्न आहे त्याचे. नोकरीनंतर आपल्या आईला आणि बहिणीला त्याला हक्काची जागा, त्यांचे स्वतःचे घर द्यायचे आहे.
 
चाँदी की कुर्सी पे बैठे मेरी छोटी बहना 
सोने के सिंहासन पे बैठे मेरी प्यारी माँ 
मेरा क्या मैं पड़ा  रहूँगा अम्मीजी के पाँव में ..

सामान्य माणसाचे सामान्य  स्वप्न म्हणजे सरळ, सोपे आणि शांत जीवन घालविण्यासाठी लागणारे एक लहानसे टुमदार घर. चार भिंतींना घरपण येते ते  माणसांमुळे. ही माणसे तुमची असतात, तुमच्या सुख दुःखाची भागीदार असतात. बाहेरच्या जगात अनुभवाला आलेली उदासीनता घरातील माणसांच्या प्रेमामुळे नाहीशी होते. व्यवहारी जीवनाचे खाचखळगे आपोआप समजतात म्ह्णून तर कितीही थकलेला माणूस उंबरठा ओलांडून घरात येतो तेव्हा लक्षात येते की मनाला एक सुकून मिळाला आहे.

तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा
—————————————–
(सिनेमा – तेरे घर के सामने, गीतकार- हसरत जयपुरी , संगीतकार- एस डी बर्मन, गायक- मोहम्मद रफी , लता मंगेशकर, कलाकार-नूतन, देव आनंद)  
” तेरे घर के सामने ” ह्या  सिनेमाचा नायक एक आर्किटेक्ट आहे. एकाच वेळी दोन घरे बांधण्याची जबाबदारी त्याने स्विकारली आहे. त्यातले एक घर आहे प्रेयसीच्या वडिलांचे तर दुसरे त्याच्या स्वतःच्या वडिलांचे. ह्या दोन्ही घरातील माणसे एकमेकांचे हाडवैरी आहेत. बाहेरील जग तुम्हाला कितीही त्रास देवो, तुमच्या घरी एकदा पाय ठेवला की नको असलेल्या कोलाहलापासून मुक्तता देण्याचे सामर्थ्य तुमच्या घरात असते. तुम्ही कितीही लांब गेलात तरी तुमचा परतीचा रस्ता घराकडे येतो कारण कोणीतरी खास व्यक्ती तुमची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असते.  
त्या व्यक्तीमुळेच तर घराला अर्थ येतो. नायकालासुद्धा आपल्या  या खास व्यक्तीसाठीच घर बांधायचे आहे.
 
” दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने “
कितीही विरोध झाला तरी मी तो मोडून काढेन हे वचन आहे त्याचे. पण ती मात्र साशंक आहे.

घर का बनाना कोई आसान काम नहीं
दुनिया बसाना कोई आसान काम नहीं
थोड्या दमानेच घे असा सावधगिरीचा  इशारा देते ती पण त्याचा आपल्या प्रेमावर विश्वास आहे. प्रेमाचा रस्ता म्हणजे खाचखळग्यांची वाट. ती त्याला थांबवते आणि तरीही तो बधत नाही म्हंटल्यावर खुले आव्हान देते,

तुम क्या करोगे देखें, उल्फत के वास्ते
त्याचा आत्मविश्वास मात्र दुर्दम्य आहे. तो तिला समजावतो, प्रेमासाठी सिंहासन सोडलेली उदाहरणे आहेत तर बांधलेला ताजमहाल ही  प्रेमाचीच देणगी आहे. तिला वचन देताना तो सांगतो,

“मैं भी कुछ बनाऊंगा, तेरे घर के सामने ” 
देव आणि नूतन यांचा या काळातील सिनेमातला वावर एवढा आधुनिक होता की आई वडिलांना न दुखावताना सुद्धा घर हे आपले दोघांचेच हे दोघांनाही माहित होते.

इक बंगला बने न्यारा
————————-
( सिनेमा -प्रेसिडेंट, संगीतकार- रायचंद बोराल , गायक -कलाकार-कुंदनलाल सैगल )
के एल सैगल यांचे “इक बंगला बने न्यारा” हे गीत म्हणजे मध्यमवर्गीयांच्या आशा आकांक्षांचे प्रतीक. आज माणूस शहरात  रहातो तो कामासाठी पण  शहरापासून  स्वतःचे स्वतंत्र घर असावे ही इच्छा तो  बाळगून असतो. सेकंड होम ही कल्पना  वास्तवात येते आहे  हे जाहिरातींवरून लक्षात येतेच.  
सैगलजी यांची जी काही मोजकी गीत माझ्या पिढीला माहीत आहेत त्यात हे गीत आहेच. घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर रेंगाळणारे हे गीत आहे.

सोने का बँगला, चंदन का जँगला 
विश्वकर्मा के द्वारे 
अति सुन्दर प्यारा प्यारा एक बँगला ..

१९३७ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेसिडेंट या सिनेमातील हे गीत. ब्रिटिश निघून जातील आणि भारत परत स्वर्णभूमी म्हणून गणला जाईल असे वेडे स्वप्न पाहणारी पिढी होती ती. त्यामुळे हा बंगला सोन्याचा असेल अशी कल्पना कवीने केलेली आहे. प्रत्यक्ष विश्वकर्मा, जो देवांचा शिल्पी आहे तो या बंगल्याचे निर्माण करेल असे स्वप्न हा नायक पाहतो. हा बंगला म्हणजे त्याच्या मनातील समृद्धीचे प्रतीक आहे . 
स्वातंत्र्यानंतर अकरा वर्षांनी प्रदर्शित झालेल्या ” अजी बस शुक्रिया ” या सिनेमातील जोडप्याच्या जीवनात मात्र  देश स्वतंत्र झाला तरी समृद्धी आली नाही. मूलभूत गरजांची वानवाच आहे, शिवाय त्यांची नोकरीही गेली आहे. कितीही कष्ट केलं तरी फळ न मिळाल्याने आत्मविश्वासाची वानवा.
आता आसरा आहे तो देवाचाच.
ओ दाता, ओ दाता, दे हमको भी एक प्यारा बँगला

——————————————————–
सिनेमा -अजी बस शुक्रिया, गीतकार -प्रेम धवन, संगीतकार -रोशन, गायक -मोहम्मद रफी , आशा भोसले, कलाकार -जॉनी वॉकर, गीता बाली )

राहायला केवळ घरच पुरेसे नसते. यांच्या मागण्या जास्त आहेत. बंगल्यात राहणाऱ्या माणसांच्या कीर्तीला शोभेल अशी शोफरसहीत शानदार गाडी, जमिनीवर अंथरलेले रेशमी गालिचे आणि मदतीला नोकरांची फलटण तर हवीच पण आता काम मिळाले नाही तर हे वैभव नष्ट होईल इतकी समज असल्याने लंडन आणि डेहराडून इथे फोफावलेला धंदा सुद्धा दे ही विनवणी ते देवाला करतात. एवढ्या सगळ्या वैभवातही  महत्वाच्या गरजांची जाणीव आहे. वीज आणि पाणी ह्यासारख्या मूलभूत गोष्टी त्यांनी गृहीत धरल्या नाहीत. 

फिर देंगा पंखा ठंडी ठंडी हवा, दिल को उडाये लिये जाये 
ओ दाता, ओ दाता 

वीज, पाणी या गोष्टी देवाकडे मागायची वेळ यावी ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे हे आता समजते कारण एवढी साधी गरज सुद्धा जगात अनेक लोकांची पुरी होत नाही  ही आजची वस्तुस्थिती आहे. 

घर या शब्दच लाघवी. या शब्दात एक विलक्षण आत्मीयता आहे. ते सिमेंटचे असो किंवा मातीचे, जेव्हा दोन माणसे काड्या काड्या जोडून आपली वास्तू उभारतात, तेव्हा जरी ती साधी झोपडी असेल तरीही प्रेमिकांना त्याचे मूल्य एका महालाएवढेच वाटते.  

ये तेरा  घर, ये मेरा घर
—————————
( सिनेमा -साथ साथ, गीतकार- जावेद अख्तर, संगीतकार -कुलदीप सिंग , गायक -चित्रा  सिंग जगजीत सिंग, कलाकार- फारुख शेख , दीप्ती नवल)
“साथ साथ” या सिनेमातील नायक नायिकांचे घर उभे आहे ते त्यांच्या तत्वाच्या, आदर्शाच्या पायांवर. खरेतर श्रीमंत घरात जन्माला येऊन सुद्धा त्यांनी स्वतःचा एक वेगळा रस्ता निवडला आहे. हा रस्ता आहे प्रामाणिकपणाचा. हा रस्ता खडतर म्ह्णून तर त्यांच्या घरावर ना सावली आहे, ना चांदणे तिथे वस्तीला आले आहे.   ह्या घराला मातीचा स्पर्श आहे. त्यांच्या राहणीमानासारखेच हे घर साधे पण पवित्र आहे. त्याच्या इच्छा समजून घेणारे हे सुजाण घर आहे.
या गाण्याची पहिली ओळ पहा .
हे तुझे घर आहे आणि हे माझे सुद्धा आहे.
“मी “ किती सहज गाळून पडला आहे इथे . 

ना बादलो के छाओ मे न चांदनी के गांव में 
ना फूल जैसे रास्ते बने है इसके वास्ते 
मगर ये घर अजीब है, ज़मीन के क़रीब है 
ये ईँट पत्थरों घर ,  हमारी हसरतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर किसीको देखना हो गर 
तो पहले आके माँग ले मेरी नज़र तेरी नज़र

पण ह्या घराची सुंदरता पाहायची असेल तर ती आमच्या डोळ्यांनी, आमच्या नजरेतून पाहावी लागेल असं कोडे हा नायक घालतो. 

आँधी सिनेमातील ” इस मोडसें जातें है ” या गीतात घर आणि नाती यांचा अप्रतिम मेळ गुलझारजी यांनी गुंफला आहे.
 इस मोड़ से जाते हैं 
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
( चित्रपट – आँधी, गीतकार-गुलजार , संगीतकार – आर डी बर्मन, गायक-किशोर कुमार, लता मंगेशकर, कलाकार -संजीव कुमार, सुचित्रा सेन) 

जे के आणि आरती यांचे नुकतेच लग्न झाले आहे. भविष्याची स्वप्ने रंगवत असलेल्या त्या दोघांचा रस्ता प्रवासाच्या सुरुवातीला तरी एकच आहे. दोन वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या त्या दोघांचे एकत्र येणे हे जीवनातील पहिले वळण. नंतरचे वळण येते जेव्हा ते विभक्त व्हायचे ठरवतात. जे के महत्वाकांक्षी नाही. सामान्य गृहस्थासारखे, पत्नी आणि मुलीबरोबर शांत आयुष्य घालवणे त्याला आवडते. त्याचा वेग आहे एका पायवाटेसारखा पण आरती मात्र राजकारणात शिरली आहे. तिला जीवनाकडून बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत. तिची स्वप्ने भव्य आहेत. तिचा रस्ता हा एक्स्प्रेस वे सारखा, गतिमान. दोन वेगवेगळे रस्ते आवडणे ही पुढील वादळाची चिन्हे आहेत. 

पत्थर की हवेली को शीशे के घरौंदों में 
तिनकों के नशेमन तक इस मोड़ से जाते हैं.
पथ्थर की हवेली म्हणजे न तुटले जाणारे भक्कम नाते पण ते आता शक्य नाही. मने दुभंगली की नाते ही डळमळीत होते. त्यांचे घरसुद्धा एका काचेच्या घराप्रमाणे ठिसूळ झाले आहे. वादळच कशाला, वाऱ्याचा साधा झोका सुद्धा ह्या काड्यांच्या घरट्याला नष्ट करू शकतो.

 अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला..

शाळेत असताना  शिकलेल्या ह्या  कवितेचा अर्थ मोठे झाल्यावर, स्वतःचे घर झाल्यावर समजतो. जगाच्या पाठीवर कुठेही फिरले तरी संध्याकाळी माणसाची पावले त्याच्या घराकडे वळतात.
असे काय असते या घरकूलात जे बाहेर नसते? 
ह्या घरातील माणसे एकमेकांशी समान संस्कृती, मूल्ये, भाषा, रिवाज, इतिहास या सर्वानी जोडलेली असतात. या घरातील प्रत्येक भिंती, प्रत्येक वस्तू, टांगलेली चित्रे, फोटो, आजीने शिवलेली गोधडी अशा बऱ्याच गोष्टी  तुमच्याशी स्पर्शाने आणि आठवणीने बांधलेल्या असतात. येथील प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या हक्काची वाटते.  जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा ह्याच सर्व गोष्टी, समृद्ध  गतकाळाच्या साक्षीदार असतात त्या धीर देतात,  समजवतात, सांगतात की, चांगला काळ नक्कीच येणार आहे.
जर वाटेवर वाटसरूच नसेल तर वाट एकटी पडेल; जर फुलाला सुगंध नसेल तर त्याच्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही; तसेच जर घरात  आपले माणूस नसेल तर घर अबोल होईल. घराला बोलके करणारी तर घरातील माणसे असतात. 

ही एकाकीपणाची, सुनेपणाची  जाणीव “जिस गली में तेरा घर न हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नही” ह्या ” कटी पतंग” मधील गीतात दिसते.

“जिस गली में तेरा घर न हो बालमा
————————————–
( सिनेमा-कटी पतंग , गीतकार -, संगीतकार -आर डी बर्मन, गायक – मुकेश , कलाकार -राजेश खन्ना )
जी वाट तिच्या दारा वरून जात नाही, त्या वाटेवर पाय सुद्धा ठेवायची त्याची इच्छा नाही. ही प्रियकराची प्रेयसीच्या प्रती असलेली  निष्ठा बोलतेय.  
घर ही फक्त वास्तू नाही ती एक भावना आहे. आपलेपणाची भावना. ती निर्माण होते ती प्रेयसीच्या सहवासात.  मग जर तीच नसेल तर कोणत्याही वैभवाला काय अर्थ आहे! जी वाट तिच्यासाठी खाच-खळग्यांची असणार आहे तिथे फुले जरी आच्छदली, तरीही त्यावर चालण्याची नायकाची इच्छा नाही.
जिन्दगी में कई रंगरलियाँ सही,
हर तरफ मुस्कुराती ये कलियाँ सही
खूबसूरत बहारों की गलियाँ सही
जिस चमन में तेरे पग में कांटे चुभे, उस चमन से हमें फूल चुनना नहीं 

काही वर्षापूर्वीचीच गोष्ट.
घरापेक्षा, कुटुंबापेक्षा करिअरला प्राधान्य देण्याचा काळ नव्हता तो. संधी कमी होत्याच पण त्याही पेक्षा महत्वाकांक्षाना धुमारे फुटले नव्हते. माणसे मोजक्या गोष्टीत खुश असायची. स्वतः पलीकडचे जग पाहायची सवय नव्हती, म्हणून असेल , भौतिक गरजा कमी होत्या. माणसांना , वस्तूंपेक्षा माणसांची ओढ होती. संध्याकाळी येण्याची वेळ ठरलेली असायची. घड्याळाचा काटा जरा पुढे गेला की गृहिणीची घालमेल व्हायची.
ह्या काळातले गाणे आहे हे.
बप्पी लाहिरी ने कधी कधी फार सुंदर गाणी रचली. त्या मोजक्या गीतांतले हे गीत.

“सैया बिना घर सुना “
( सिनेमा -आंगन की कली , गीतकार-शैली शैलेंद्र, संगीतकार- बप्पी लाहिरी, गायक -भूपेंद्र , लता मंगेशकर)

अंधियारे बादल छाये, कुछ भी ना मन को भाये
देख अकेली घेरे मुझे, यादों के साये साये
चाँद बिना जैसे सूनी रतिया
फूल बिना जैसे सूनी बगिया
सैंयाँ बिना घर सूना   …

किती सोपे शब्द , पण भावना किती अचूक शब्दांत मांडली आहे.

भारत हा कधीकाळी शेतीप्रधान देश होता. लोक खेड्यात राहायचे. खेडी स्वयंपूर्ण होती तेव्हा.
स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली. पावसावर अवलंबून असलेला हा व्यवसाय करणे कठीण होऊ लागले.  जमीन वाढत्या कुटुंबाला अपूरी पडू लागली आणि कामाच्या शोधात माणसे शहराकडे धाव घेऊ लागली.  येथील जागेच्या किमती अफाट वाढल्या. निवाऱ्याच्या शोधात असलेल्या सामान्य माणसाच्या कपाळी वणवण आली.  

एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में
आबोदाना ढूंढ़ता है, आशियाना ढूंढ़ता है
(सिनेमा -घरोंदा, संगीतकार – जयदेव, गायक-भूपिंदर, कलाकार-अमोल पालेकर) 

घरोंदा या चित्रपटातले जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत.  कामाच्या शोधात या शहरात हरवलेल्या सर्वच माणसांची ही व्यथा. अन्न ,वस्त्र आणि निवारा मिळवण्याची धडपड.
भूपेंद्रच्या आवाजातील खोली आणि खिन्नता या गाण्याला एक वेगळीच उंची देते. 

दिन खाली-खाली बर्तन है, और रात है जैसे अँधा कुआं
न सूनी अँधेरी आँखों में, आँसू की जगह आता हैं धुंआ
जीने की वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढूंढ़ता है

गावाकडचे आयुष्य वेगळे. घर माणसांनी भरलेले असते. गरम अन्न प्रेमाने वाढणारी आई किंवा पत्नी असते. इथे मात्र जेवण बनवणारे कोणी नसते. “प्रेमाने खाऊन घे रे” असे बजावणारे सुद्धा. संध्याकाळी घरी आल्यानंतर मात्र दिसणारी रिकामी भांडी आणि रिकामी खोली माणसाला अजूनच एकटे बनवतात. एकटेपणा आणि जगण्यासाठी  करावी लागणारी तडजोड माणसातील कोवळीक  नष्ट करते . हळूहळू जगण्याची उमेदसुद्धा माणूस गमावून बसतो .

इन उम्र से लम्बी सड़कों को, मंजिल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती फिरती रहती हैं, हमने तो ठहरते देखा नहीं
इस अजनबी से शहर में, जाना पहचाना ढूंढ़ता है

जगण्यासाठी धडपड करत असतानाच माणसे  स्वप्न पाहत असतात. जिथे पोचायचे आहे त्याचे स्वप्न पण या कसरतीत ते पूर्ण होईल  याची शाश्वती नसते. हळूहळू डोळ्यांच्या फक्त खाचा उरतात. स्वप्ने विरून जातात. या अनोळखी वाटणाऱ्या शहरात एक ओळखीची खूण  दिसावी, चेहेरा दिसावा यासाठी प्रत्येक माणूस आसुसलेला असतो.  

भारतात औद्योगिकीकरणाचे वारे होऊ लागले आणि गरजूंनी शहराकडे धाव घातली. अपुरी जागा, वृद्धांना शहरी जीवनात समरस होण्यात आलेल्या अडचणी, स्त्रियांचे शिक्षण आणि नोकरीनिमित्त घराबाहेर पडणे या सर्वांमुळे कुटुंबे विभक्त झाली. घरे दुभंगली.
या आधीच्या काळात एकत्र कुटुंबात एकमेकांना सांभाळून घेत तीन तीन पिढ्या एकत्र रहात.  वाद विवाद होत होते पण सर्वच जण एकमेकांवर अवलंबून असल्याने मिटत सुद्धा  होते. एकत्र कुटुंब म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे  केंद्र होते पण त्याचबरोबर ते वैयक्तिक आशा आकांक्षा आणि स्वार्थत्याग यावर उभं होते. पूर्वी स्त्रियांना स्वतःचे घर असते ही कल्पनाच नव्हती. आपली कुटुंबपद्धती पुरुषप्रधान होती.  अजूनही आहे. वडिलांचे घर हे फक्त लग्न होईपर्यंत असायचे. लग्न होणे हाच स्त्रीचा महत्वाचा संस्कार मानल्याने पतीचे घर ती आपले मानायची. स्वतःच्या आई-वडिलांच्या घराचा त्याग करून, नवीन घरात साखरेसारखी विरघळून जायची.

” छोड़ बाबुल का घर, मोहे पी के नगर आज जाना पडा “
( सिनेमा -बाबुल, गीतकार-शकील बदायुनी, संगीतकार- नौशाद, गायिका- शमशाद बेगम)  

अगदी लहानपणापासून मुलींना जाणीव करून दिली जाते की हे घर तुझे नाही. तू इथे फक्त काही दिवसांची पाहूणी आहेस. तुझे घर म्हणजे तुझ्या पतीचे घर. हे सोडून एक दिवस तुला जावे लागणार आहे. यात मात्र एक गोम होती. ती एका घरातून जरी दुसऱ्या घरी गेली तरी कोणतेच घर तिच्या हक्काचे नसते. नवल नाही, मनातील सर्व भावभावना दडपून ती नवीन घरात स्वतःला गुंतवून घ्यायची.  

संग सखियों के बचपन बिताती थी मैं 
ब्याह गुड़ियों का हँस-हँस रचाती थी मैं |
सब से मुँह मोड़ कर, क्या बताऊँ किधर
दिल लगाना पड़ा 
ये था झूठा नगर, इसलिये छोड़ कर, मोहे जाना पडा . 

सुरक्षितता आणि सुख याचे घर हे प्रतीक मानले जाते. घराचा उंबरठा ओलांडून जाणारी मुलगी ही गृहलक्ष्मी मानली जाते.
मात्र अनेकवेळा हे मृगजळ ठरते.
नवऱ्याकडून झालेली फसवणूक हे काही नवीन नाही. तिच्या समोर, तिच्या अपरोक्ष काहीबाही घडत असते. आणि त्या विरुद्ध काही पावले उचलावीत तर घराचा दरवाजा उघडला जातो. माहेरी स्वागत तर सोडाच, स्विकार केला जाईल याची खात्री नसते. आता सुशिक्षित घरात सुद्धा बंद दाराआड जे घडते ते अनेकवेळा बाहेर येत नाही. 
घराचे महत्व तेव्हा समजते.
अन्न, वस्त्र या गरजा तरी आवाक्यात असतात. घराच्या किमती एवढ्या प्रचंड आहेत की डोक्यावरचे  छप्पर हिरावून घेतलेली स्त्री या दुहेरी आघातात मोडून पडते.

वो देखो जला घर किसीका
————————————
( सिनेमा-अनपढ, गीतकार -राजा मेहदी अली खान, संगीतकार-मदन मोहन, गायिका-लता मंगेशकर, कलाकार-माला सिन्हा) 

अनपढ ची कथा स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणारी होती. श्रीमंत  घरातील, लाडावलेली मुलगी, भावाने, थाटामाटात लग्न करून दिल्यावर सासरी जाते. भाऊ लाड तर करतो पण शिक्षणाचे महत्व त्यालाही माहित नसल्याने त्या सुशिक्षित घरात हिचे अडाणी पण स्वीकारले जात नाही. नवरा तरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या मृत्यूनंतर तिला घराबाहेर काढले जाते. त्याच वेळी भाऊ परागंदा होतो.

गया जैसे झोंका हवा का हमारी ख़ुशी का ज़माना
दिए हमको क़िस्मत ने आँसू जब आया हमें मुस्कराना
बिना हमसफ़र है सूनी डगर किधर जाएँ हम बेसहारे
वो देखो जला …
आताच्या काळात हा सिनेमा मेलोड्रामा वाटतो तर जरा बातम्या पहा. आजूबाजूला नजर टाका. घटस्फोटित महिलांना भाड्याने सुद्धा घर द्यायला सोसायटीत ऑब्जेक्शन घेतले जाते. अनेकवेळा माहेरच्याच सपोर्ट नसल्याने, कुठे जायला  जागा नाही म्हणून आत्महत्या केल्या जातात. काळ सहज पुढे जातो , समाज जात नाही. बदलण्याची प्रक्रिया, स्वतःची स्वतःला करावी लागते. 
याची दुसरी बाजूही आहे. आधुनिक विचारसरणी आणि जीवनपद्धती यामुळे मीच का सर्व सोसायचे ही भावना वाढली आणि एकत्र कुटुंबाचा पाया  ढासळला. स्त्रिया शिक्षित झाल्या, कमावू लागल्या, स्वतंत्र झाल्या.  मोठी घरे मोडून पडली. शहरात तरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेली जोडपी दिसू लागली आहेत  जरी ती एकत्र राहत असतील तरीही ती पूर्णपणे स्वतंत्र आहेत, असणार आहेत.  पूर्वी एकांताची गरज होती आता तो एकांत, एकटेपणात परावर्तित होत आहे. याची परिणिती शारीरिक आणि मानसिक आरोग्य गमावण्यात होत आहे.  ह्याचा अतिरेक होतो आहे हे सुजाण व्यक्तींना समजू लागले आहे. घरपण जपणाऱ्या घराची गरज म्हणून तर आता परत जाणवू लागली आहे.  हीच भावना ” दुरीयां ” या सिनेमातील ” ज़िन्दगी, ज़िन्दगी, मेरे घर आना ” या गीतात दिसते. 

ज़िन्दगी-ज़िन्दगी मेरे घर आना आना ज़िन्दगी
——————————————————
( सिनेमा -दूरियां , गीतकार- सुदर्शन फकीर,  संगीतकार-जयदेव  , गायक -भूपिंदर अनुराधा पौडवाल) 

यातील नायक नायिका एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांचे लग्न होते. संसारवेलीवर एका फुलाचा जन्म होतो . मनातली तृप्तता घरातही नांदते. या घराचा पाया आहे एकमेकांवर असलेले प्रेम आणि विश्वास . 

मेरे घर का सीधा सा इतना पता है,  मेरे घर के आगे मुहब्बत लिखा है 
न दस्तक ज़रूरी, न आवाज़ देना 
मैं सांसों की रफ़्तार से जान लूंगी

घर प्रेमाने आपलेसे करायचे का एखाद्याच्या मनात घर करायचे?

बड़ी धूप है दोस्त खड़ी धूप है दोस्त 
तेरे आंचल का साया चुरा के जीना है जिंदगी . 

चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी असते ते घर’ ह्या व्याख्येत मनातले घर बसत नाही.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तुझ्या मदतीने मी त्यांचा सामना करेन अशा व्यक्तीचा सहवास जिथे मिळतो ते घर ही कल्पनाच मनात घर करून राहणारी आहे नाही का ! 

20 thoughts on “छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में.”

  1. प्रिया,
    बँकेच्या गृह कर्जाची जाहिरात अशी सुरुवात करुन घर या शब्दाशी निगडित सुंदर गाणी निवडलीस .

    आणि विशेष म्हणजे जास्त संख्येने गाणी घेतलीस.
    तू छान लिहिलं आहेस म्हणणं म्हणजे द्विरुक्ती नाही का?

  2. किती सुंदर गाणी निवडलीत आणि विवेचन तर फारच सुरेख👌👌
    स्वतः चे घर, घरातील हक्काची माणसं हीच जमापुंजी असे पूर्वीचे लोक म्हणत ते किती खरे आणि अनुभवातून आलेले होते , हे वाचल्यावर अजूनच ठळक झाले.
    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
    आकाशावर झेप असावी उंबरठ्यावर भक्ती
    आजही माझी लेक जेव्हा जेव्हा होस्टेलमधून घरी येते तेव्हा उंबरठ्यावर माथा टेकते.
    घरातील माणसांच्या सुसंवादयुक्त आपुलकीने घर तरोताजा राहते.
    आजही आमचे घर माझ्या आजेसासऱ्यांच्या नावावर असून, माझे सासरे स्वतः च्या वा मुलांच्या नावाने करून देण्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. गरजच नाही भासली अजूनतरी.
    काही नव्हे कित्येक लोक आज भाड्याच्या घरात राहतात. त्या प्रत्येकाला स्वतः चे छप्पर मिळावे.
    फार फार सुंदर लिहिलंय 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤

    1. Thank you Kamini 🙂 . मुलीचे संस्कार चांगले आहे .
      घर नि घरातील माणसे यांचा आयुष्यावर पगडा असतोच .
      घर छोटे मोठे , बांगला , फ्लॅट कसेही असो , परिसर स्वच्छ असो , आजूबाजूची माणसे चांगली असो ,
      त्याचा पगडा पडतोच

  3. Khupach sundar lihile ahe. ।pratyek gane, tyacha arth, vishleshan ani ghar ya vishaya bhovati keleli vicharanchi sundar gunfan. Sagale kahi mast.

  4. नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख … गाणीही सुरेख निवडलीस

  5. फेबु पोस्टवरून हा ब्लॉग वाचला . पोस्ट आणि ब्लॉग दोन्ही सुंदर . घर हा काळजाजवळचा विषय आहे .

  6. तूझ्या लेखाबद्दल काय लिहावं? प्रत्येक लेख अप्रतिम असतो, संग्रहित ठेवावा असतो. खुप मनापासून, आनंदाने, अभ्यास करून, अतिशय मेहनतीने तू लिहितेस.

    तुझी माहितीची, आणि सर्वांगीण अभ्यासाची ही पोतडी अशीच सदैव भरलेली राहूदे, आणि आम्हाला सुखद आनंद उपभोगूदे.

    खुप धन्यवाद 🙏

    1. Kiran ji,
      किती सुंदर अभिप्राय .
      अशामुळे लिहावेसे वाटते .. खरेतर लेखनात सुधारणा होत जाते जेव्हा असे दर्दी वाचक मिळतात .
      मनापासून धन्यवाद.

  7. प्रिया, अग काय म्हणू..
    ती add पासून सुरुवात केलीस आणि पुढे पुढे वाचताना रमून गेले. किती सुंदर लिहितेस तू. इतकी छान ,साजेशी गाणी निवडून, त्याबद्दल
    अक्षरशः संग्रही ठेवावा असा लेख असतो नेहेमी तुझा.
    मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻.

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *