Skip to content

बिरज में होली खेलत नंदलाल.

अम्माने केलेली पुरणपोळी आणि गिरगावची होळी या दोनच आठवणी माझ्या होळी या सणाशी निगडित आहेत.
घरात निदान चार पायली डाळ शिजायची. वेलची घातलेल्या पुरणाच्या ढीगाचा  घमघमाट घरभर पसरला की माझी खाण्याची इच्छाच जायची. “प्रसाद म्ह्णून एक तरी खा” असा धाक असल्याने पोळपाटाच्या आकाराची मऊ आणि लुसलुशीत पोळी कशीबशी संपायची.
गिरगावची होळी मात्र खूप आवडायची. त्याला कारण म्हणजे तिला बांधलेले रंगीत पतंग. जिलेटीनच्या पेपरचे असायचे ते. होळी पेटली की ते सुद्धा पेटायचे. आणि रंगीत ठिपक्यांची उधळण आकाशात जायची.
त्या केवळ एका दृश्यासाठी मी वर्षभर वाट पाहायचे.
होळीचे रंग ते हेच. बाकीच्या रंगांशी संबंध नव्हता. इथे अम्मा  आणि तिथे काकाजोबा , कुणालाच खेळणे  आवडायचे नाही. त्यात गिरगावला बायका भाग घेत नसत.कोकणी माणूस, होळी नाही  तर शिमगा साजरा करायचा. ती बोंब आणि ते शब्द, माझ्या कानातील  शब्दकोशाला परिचित नव्हते. शिवाय ज्या तर्हेने अंगविक्षेप करून म्हंटले जात, त्यामुळे तर  एक भीतीच होती.  गुलाल आणि ऑइलपेंट असा संमिश्र रंग तोंडाला लावून, ही टोळी बाहेर पडली की, वर्ह्यांड्यातून काढता पाय घेऊन मी माजघरात पुस्तक घेऊन बसायचे.
होळीचा परिचय झाला तो नवव्या वर्षी.
काफी रागातले “ आज खेलो शाम संग होरी, पिचकारी रंग भरी केसरकी” हे गीत  गाण्याच्या अभ्यासाला होते. केसर म्हणजे केशर हे समजल्यावर तर होळी  नुसती रंगीत नाही तर सुगंधी झाली.
मग तर ठरवूनच होळीशी सलग गाण्यापुरतीच ठेवली.

आपल्याकडे प्रत्येक सणाशी निगडित कथा आहेत. होळी सुद्धा त्याला अपवाद नाही. हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिका हिची कथा तर सर्वांना परिचित आहे. विष्णू भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकाची नेमणूक होते आणि  द्वेषाच्या अग्नीत तीच जळून जाते. अधर्मावर धर्माची मात म्हणून होळी साजरी केली जाते.
भक्तीचा आणि विजयाचा भगवा रंग ल्यायलेली त्रेतायुगातील होळी,  द्वापारयुगात मात्र  गुलाबी झाली..
तिला कृष्ण-राधेच्या विशुद्ध प्रेमाचा रंग चढला.
याच्या मागची कथा अतिशय सुंदर आहे.
आपल्या सर्वानाच माहित आहे की कृष्ण हा सावळा होता. गोऱ्या रंगाच्या राधेला पाहून त्याला आपल्यासावळ्या  रंगाचे वैषम्य वाटले. “ ती गोरी आणि मीच का सावळा ?” अशी तक्रार यशोदा मातेकडे केल्यावर ती म्हणाली, ‘ त्यात काय मोठे! तू राधेवर तुला हवा तो रंग टाक. मग त्या तुला अजिबात चिडवणार नाहीत”
ही कल्पना कृष्णाला आवडली. दुसऱ्या दिवशी राधेच्या चेहेऱ्यावर कृष्णाने रंग लावला. राधा थोडीच ऐकणार ! तिनेही उलट कृष्णाला रंगाने माखून टाकले. हा खेळ पाहून बाकीचे रहवासी सुद्धा यात सामील झाले आणि होळी रंगीत झाली.
विजयाचे प्रतीक असलेली होळी प्रेमाचे प्रतीक झाली.
कौशिकी चक्रवर्ती गातात,

रंग पिचकारी मत मारो कान्हाई 
कलाई मोरी छोडो ना करो धिटाई 

हृदयात दडलेल्या प्रेमाला ओठावर आणायची किमया या गुलाबी रंगाने केली. सर्व लोकांसमोर हात धरणे म्हणजे प्रेमाचा समाजासमोर स्विकार करणे. त्याला समाजमान्यता मिळवून देणे.
भारतीयांच्या मनात राधेला अढळ स्थान आहे. कृष्ण चरित्र राधे शिवाय अपूर्ण आहे. राधा म्हंटली की कृष्ण आठवतो आणि कृष्ण म्हटले की राधा. हे भाग्य रुक्मिणीच्या किंवा सत्यभामेच्या नशिबी नाही. राधा खरंच होती? असली तर तिचे नक्की नाते काय? सखी, प्रेयसी, भार्या ? या प्रश्नांची उत्तरे शोधता येत नाहीत. दुर्गा भागवत म्हणतात तसे ,  भारतीय पातिव्रत्याच्या सोवळेपणाला राधा कृष्णाची प्रेमकथा हे एक आव्हान आहे.
तर्कानेच पाहायचे झाले तर, कृष्ण -राधा समीकरण पटले नाही. बाळशास्त्री हरदास यांची कृष्ण आख्याने न कळत्या वयात वाचली. यातला कृष्ण हा राजकारणी, धूर्त , त्याचे आयुष्यच कर्माशी बांधलेले , त्यामुळे असेल, कोणत्याही नियमांत न बांधलेले  आणि न निभावले गेलेलं हे नाते हृदयात शिरलेच नाही. राधेला तसाही महाभारतात आधार नाहीच, हरिवंश मध्ये सुद्धा राधा नाही. रासेश्वरी राधाला प्रसिद्ध केले ते गीत गोविंद या काव्याने. राधे सारखे नृत्य कुणालाही जमले नाही असे म्हंटले जाते. कृष्ण , निपुण पण त्यानेही हार पत्करली. बिना राधा, कृष्ण आधा असे अजूनही म्हंटले जाते.
बरसान्यात राधेचे मंदिर आहे. इथे होळी पारंपरिक पद्धतीने खेळली जाते.

बरसान्यातील लोक नंदगावच्या लोकांना आमंत्रित करतात. होळीच्या दिवशी बरसान्यातील स्त्रिया लाठ्या घेऊन येतात तर नंदगावचे पुरुष , उलट प्रहार न करता तो मर चुकवतात.
कधीकधी पुरुषच स्त्रियांचा वेष घेऊन होळी खेळतात.
शोभा गुर्टू गातात,

आज बिरज में होली रे रसिया
अबीर गुलाल के बादल छाये 
धूम मचायी री सब मिल सखियां  

काफी रागात अनेक  होरी  गीते  बांधलेली  आहेत. लोकसंगीताचा  स्रोत आहे हा राग . होळी येते वसंत ऋतूत. सारा निसर्गच नटलेला. या ऋतूत मदनाने विद्ध न  होणारा क्वचितच कुणी आढळेल.
तरीही  असतात काही असे निर्दयी.
पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले गीत आहे,
पिया तो मानत  नाही.
“अब पिया तो मानत नाही
“ या गीतात असा प्रियकर आहे जो आपले प्रेम विसरून गेला आहे.
जेवढे प्रयत्न करणे शक्य  आहे तेवढे करून झाल्यावर , हताश झालेली ती , त्यालाच प्रश्न टाकते.
अब, कौन गुनन से मनाऊ रे
होळीचा जो फास्ट पेस  आहे तो इथे नाही. म्हणून ते नैराश्य आणि चिंतेचे काहूर  मनाला  भिडते..
त्याला मनवणे सोपे नाही पण तीही जिद्दी आहे.एक नाही,  दोन नाही  अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ती आचरणात आणते. 
पंडितजी गाताना ही ओळ अनेक प्रकारे गातात . कधी जोर आहे, कधी हट्ट , तर कधी विनवणी , त्यानुसार  शब्दांचे उच्चारण सुद्धा बदलते.
एवढ्या विनवणीचा सुद्धा तिच्या “ निष्ठुर पिया “ वर परिणाम होत नाही म्हंटल्यावर नैराश्येच्या गर्तेत लोटली गेलेली ती, “ पिया तो मानत नाही” ही एकच गोष्ट उराशी धरून  राहते.
इथे गाण्याची लय वाढते, स्वरातली आर्तता , आतुरता आणि हतबलता  सुद्धा.
असेच विरहातील शृंगाराचे गीत आहे, ही होरीच  पण खेळणारी आहे मीरा.
“किणु संग खेलूं होली, पिया तज गए हैं अकेली-”– लता  मंगेशकर

राधेच्या प्रेमाला  स्थळ आणि काळाचे बंधन  आहे. कृष्ण मथुरेला जातो  आणि राधा दिसेनाशी  होते. कृष्णाची कोवळीक ही तिथे संपते.या प्रेमकथेच्या अंताबरोबर, एका युगपुरुषाचा जन्म, होतो.
मीरेचा प्रियकरच पाच हजार वर्ष येऊन गेलेला  आहे.
त्याचे  अस्तित्व , निदान जगासाठी केवळ मंदिरात आहे. पण मीरेच्या प्रेमाला मात्र स्थळ , काळ  आणि शरीराचे सुद्धा बंधन नाही.

माणिक मोती सब हम छोड़े, गल में पहनी सेली
भोजन भवन बलो नहीं लागे, पिया कारण भई रे अकेली, 
मुझे दूरी क्यों मेलि, पिया तज गए हैं अकेली
किणु संग खेलूं होली…

केवळ  धन दौलत  नाही  तर सगे सोयरे  आणि स्वतःचा  नाव लौकिक  सुद्धा  मीरेने  त्यागला. कृष्णाची आस  ही जन्मभराची  तहान  आहे आणि त्यासाठी  तिला  विषाचा पेलाही  मंजूर  आहे. हा  प्रेमाचा गुलाबी रंग नाही. हा  रंग आहे  रक्ताचा .
विरक्तीच्या आसक्त रंगात  रंगलेली साध्वी  ही मीरेची ओळख  आहे. प्रेमाच्या  धुंदीत ती केवळ वास्तवाची वेस  ओलांडत  नाही तर सर्व रूढी, परंपरा, रीतीच्या मर्यादा ओलांडते . 

धर्मरक्षणासाठी आणि खलदमनासाठी कृष्णाने स्वतःचे नितीनियम ठरवले. जिथे गरज , तिथे परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या. त्याच्या आधीचा अवतार मात्र मर्यादा पुरुषोत्तम ओळखला जातो. प्रेमाच्या रंगात भिजवणाऱ्या होळीला रंग खेळण्याचा मोह , त्यालाही टाळता आला नाही. ह्याच्या मागे सुद्धा एक छान कथा आहे.
प्रभू रामचंद्राच्या चरण सेवेचा अधिकार लक्ष्मणाला होता. लग्नानंतर सीता देवीकडे ही परंपरा सोपवली गेली. लक्ष्मणाला अत्यंत दुःख झाले.श्री रामाने सांगितले, “पहिला अधिकार पत्नीचाच. पण होळीच्या दिवशी आपल्या वहिनीकडे बक्षीस मागायचा अधिकार दिराला मिळतो. तू त्यांच्याकडे हा अधिकार माग”
मिथिला मध्ये होळी रंगते. एका बाजूला हे  भाऊ तर दुसऱ्या बाजूला आपल्या बहिणींबरोबर आणि मैत्रिणीबरोबर अबीर आणि गुलाल घेतलेली नव वधू सीता.



बिहारच्या मैथिली ठाकूरने फार सुंदर गायले आहे हे लोकगीत.

हो मिथिला में राम खेले होली मिथिला में…..
किन्न्का हाथ कनक पिचकारी,
अरे किन्न्का हाथ अबीर झोली मिथिला में,
हो मिथिला में राम खेले होली मिथिला में……

राधा कृष्ण, सीता राम .. आपल्या संस्कृतीत नारीशिवाय नराला पूर्णत्व नाही. परमेश्वर निराकार रूपात पुजण्यापेक्षा त्याला मानवी चेहेरा दिला तर तो जास्त भावतो. मानवी चेहेऱ्याला भावनांची जोड मिळाली तर तो ओळखीचा वाटतो.
म्हणून कृष्ण सखा होतो, राम भ्राता होतो  आणि देवांच्या देवाला भोळा म्हणून आपण त्याला आपल्यातलाच एक मानतो.
प्रेमाचे प्रतीक म्हणून कृष्ण राधा अमर आहेत खरे पण वयात आल्यानंतर मनात शिरला तो कर्पूरगौर शिव.
सतीच्या मृत्यू नंतर वेडापिसा झालेल्या, वैराग्याचा स्विकार केलेल्या, चंदन नाही तर भस्म लावणाऱ्या , भूता खेतांसहीत स्मशानात राहणारऱ्या या विराग्याला परत संसारात आणणारी पार्वती मनात रुतलीच .
धर्म, अर्थ ,काम आणि मोक्ष जगलेली ही जोडी.
सतीच्या आत्मदहनानंतर हा योगी तिचे शव खांद्यावर घेऊन मृत्यूचे तांडव करतो तेव्हा देवत्वाचा हा मानवी चेहेरा पाहून आपण नतमस्तक होतो..पार्वतीचे मन रिझवण्यासाठी सारीपाटाचा खेळ शंकराने निर्मिला. तिच्या विरहाच्या दुखाःतून नृत्याचा पाया रचला गेला. दक्षाविरुद्ध जो यल्गार झाला, तेव्हा डमरू च्या नादातून संगीताची निर्मिती झाली…. .
कामसुत्राची निर्मिती शंकर-पार्वती यांच्या कामक्रीडेतून झाली असे मानण्यात येते…
व पूंचे एक वाक्य आहे,
‘जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.’
चितेत  उडी  मारून जीवन  संपवणारी , सती आणि  सर्वसंग परित्याग  करून महेशाला  जिंकून घेणारी पार्वती
महादेवाच्या असण्यातच आपले अस्तित्व विरघळून टाकते.
हे प्रेम इतके उत्कट आहे की  शंकर-पार्वतीच्या मीलनाला पिंडीच्या रूपाने जगमान्यता मिळाली. पिंडी हे जीवनाच्या सातत्याचे प्रतिक आहे.पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाचे प्रतिक आहे..
या आगळ्या वेगळ्या जोडीची होळी सुद्धा फार वेगळी आहे.

सतीच्या मृत्यूनंतर शिवाने जगाशी ,पर्यायाने जगण्याशी फारकत घेतली. तो वैरागी झाला. पार्वतीने घोर तपस्या आणि आपल्या समर्पणाने त्याला जिंकून घेतले. विवाहासाठी शिव आपल्या गणांबरोबर निघाले. या वरातीत देव, दानव, भूत प्रेत यक्ष, गंधर्व सर्वच सामील होते. शिवाचे अक्राळ विक्राळ रूप आणि त्याचे भक्तगण पाहून पार्वतीच्या माहेरील लोक घाबरले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन शिवाने एका सुंदर राजस कुमारचे रूप घेतले. महाशिवरात्रीला हा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर , पत्नीला कैलास पर्वतावर घेऊन जाण्यासाठी शिव आले तो दिवस होता रंगभरी एकादशीचा.
गुलाल लावून शिव पार्वतीने होळी साजरी केली खरी पण ह्या होळीत काही शिवगण सामील झाले नाहीत.
त्यांनी दुरूनच ह्याचा आनंद घेतला.
त्यांचे मन राखण्यासाठी शिवाने, त्यांच्याबरोबर स्मशानात होळी साजरी केली.


पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी गायलेले फार सुंदर भजन आहे.

खेलैं मसाने में होरी दिगंबर, खेले मसाने में होरी
भूत पिशाच बटोरी दिगंबर, खेले मसाने में होरी

जीवनाच्या सर्व रंगापासून मुक्त झालेले हे गण , त्यांच्या आयुष्यातील रंग हा राखाडी ..भस्माचा रंग .
ही होळी साजरी झाली ती चिताभस्माने.
ज्या प्रकारे, ब्रज ची होळी प्रसिद्ध आहे, तशीच काशीतील स्मशानात खेळली जाणारी होळी सुद्धा पाहायला देशाच्या सर्व भागातून लोक येतात. हा उत्सव जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्याचा. 
माणसाला सर्वात भीती असते ती मृत्यूची. जेव्हा त्याच्या मनातून ते भय जाते , तेव्हाच निरामय जीवनाचा आनंद घेता येतो.
होळीगीते ही केवळ लोकसंगीत नाही.संस्कार, रीती, रिवाज या बंधनाच्या बेड्या तोडण्याचे आवाहन आहे ते.
यामुळे असेल अनेक मुस्लिम गायकगायिकांनी सुद्धा आपल्या बैठकीत होरीला  स्थान दिले आहे.
अवध चा नबाब , वाजिद अलीशहा ने मुहर्रम असतानाही होळीचा सण   साजरा करायचे फर्मान सोडले. दबलेल्या इच्छा , होळीच्या निमित्ताने उघडयावर आल्या . तेव्हा आपल्या हृदयाची भाषा बोलण्याचे स्वातंत्र्य कुठे होते? हा एकच दिवस होता जेव्हा खुले  आम इजहार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. कृष्ण आणि राधेच्या  नावांमुळे त्याला दैवत्व सुद्धा प्राप्त झाले. हिंदी सिनेमात सुद्धा असंख्य होळीगीते आहेत…पण त्याबद्दल परत कधीतरी.

35 thoughts on “बिरज में होली खेलत नंदलाल.”

  1. प्रिया,
    कमाल केलीस.

    आज वेगळेच रंग ..
    होळीच्या रंगात राधा कृष्ण असतातच.त्यांच्या बरोबर राम सीता आणि शिव पार्वती पण आले.
    एकदम विशेष लेख.
    🎉💐❤️

    1. उदय शेवडे

      अप्रतिम रंग उधळलेत….ते शब्दांचे आहेत, होरी गीतांचे आहेत, राधा – कृष्ण, राम – सीता, शंकर – पार्वती यांच्या अपार प्रेमाचे आहेत.

  2. अप्रतिम लिहीलंय .आजचा लिखाणाचा ढंग वेगळाच आहे पण खूप सुंदर शब्दात मांडलय .हॅप्पी होली .

  3. अप्रतिम लेख. प्रत्यक्ष देवदेवतांच्या होळीचं वर्णन सुंदर रीतीने शब्दबध्द केलंस. आपल्या नृत्यसंगीत परंपरेत सणांना किती महत्त्व आहे हे ही उत्तम मांडलंस. 💐

  4. भारतात खेळल्या जाणाऱ्या होळीचे मातीशी जोडलेले रंग,गंध,रीती ज्या प्रकारे या लेखात वर्णिले आहेत त्यासाठी केवळ अप्रतिम …हीच पहिली प्रतिक्रिया . लोकगीते,उपशास्त्रीय ,शास्त्रीय संगीत या अनमोल रत्नाटील होळी गीते म्हणजे तर मोठाच खजिना . आपल्या समृद्ध गान परंपरेची आणि भारत भराच्या रीतिंची श्रीमंत ओळख सुरेख रीतीने झाली .

    1. Thank you Pradnya.
      थोडी वेगळी गाणी घेतली यात
      मुद्दाम ऐक .
      Actually ही पारंपारीक होळी. त्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथा आहेत

      1. फार सुरेख लिहिलं आहेस प्रिया. यातली बरीच गाणी ऐकली आहेत. जी नाही ऐकली ती शोधून ऐकणार आहे.

  5. कमाल लिहिलंय…. ♥️❤️ होळीचे किती तरी रंग दाखवले.

  6. अप्रतीम लेख प्रिया…. राधा कृष्णाची होळी ऐकली होती पण श्रीराम सीता, शिव पार्वती ह्यांची होळी आत्ताच समजली. कायमच तुझे लेखन नवीन पैलू उलगडते आणि ते ही अनेक विवीध विषयांवरचे…. असेच सुंदर लिहीत राहा आम्ही वाचत राहू ग 💜🎶🙏😇.

  7. किती सुंदर झालाय हा लेख! होरी मधल्या रंगांसारखाच उत्फुल्ल, प्रसन्न

  8. आजचा लेख आणि गाणी दोन्ही खूपच खास … इतक्या आगळ्यावेगळ्या गाण्यांवर इतकं सुंदर लिहीलयेस .

  9. खूप छान लेख..
    आज होळीचे अनेक रंग त्यांच्या अर्थासह समजले…खूप घटना समजल्या..
    सुंदर लेख प्रिया…💐

  10. व्वा अप्रतिम लिहीलयेस … गाणी तर सगळीच खूप वेगळी निवडलीस …. मी ह्यातलं फक्त शोभा गुर्टु आणि मैथिली ठाकूर ने गायलेली गाणीच ऐकलियेत … बाकीची शोधून ऐकावी लागतील ….

Leave a Reply to Nayana Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *