Skip to content

भाग्य दिले तू मला.

गिरगावला दर शनिवारी जायचे. चर्नीरोड स्टेशन जवळ आले की आम्ही दरवाज्याकडे जायचो. स्टेशनच्या जवळ एक बिल्डिंग आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये एक मोठी गणपतीची फ्रेम आहे. ती दिसली की लोक नमस्कार करायची. माझी उंची लहान आणि गर्दीत असल्याने मला काय तो बाप्पा दिसायचा नाही पण मी सुद्धा नमस्कार करायचे.
हल्ली पेडर रोड वर जाताना सिग्नलच्या सुरुवातीलाच प्रभुकुंज इमारत दिसते.  बाहेरील मोठ्या भिंतीमुळे पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट दिसत नाही.  बस जरा पुढे जाते. बाल्कनी दिसते पण कुणीच नसते. फक्त माहित असते की इथे सुरांना लीलया खेळवणारी, जोजवणारी स्वरमाता … हो , स्वरसम्राज्ञी आमच्यासाठी, ती त्यांची आईच, राहत होती. आपोआप हात जोडले जातात.

लता मंगेशकरना जाऊन आज दोन वर्षे झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी पाच पिढयांना आवाज दिला आणि त्यांच्याहून मोठ्या, कमीतकमी दोन पिढ्यानी हा स्वर्गीय आवाज ऐकला. सात पिढ्यांवर आपल्या सुरांची मोहिनी घालणे हे अद्भुत आहे.
सुरुवातीला आवाजाचा पोत पातळ आहे म्हणून बाईंना नाकारले. संगीतकार गुलाम हैदर यांनी मात्र हा आवाज ऐकून भविष्य केले, आज तुम्ही हिला नाकारत असाल पण एक दिवस असा येईल की सारी इंडस्ट्री ह्या मुलीच्या पायी लोळण घेईल. अल्पावधीतच हे भविष्य खरे ठरले. लता मंगेशकर हे सप्तसूर साऱ्या भारतभर गुंजले.
हिंदी सिनेगीतांचा प्रेक्षकवर्ग भारतभर पसरला आहे. त्याचा आवाका मोठा, त्याचे मार्केट मोठे. यात अतिशय व्यस्त असताना सुद्धा लता बाईंनी मराठी भावगीतांत फार  दर्जेदार कामगिरी केली आहे. मोजकीच गाणी त्यांनी गायली असतील पण त्यांच्या दैवी, ईश्वरदत्त सूराने  भावगीतात एक क्रांतिकारक पर्व आणले.
समीक्षक अशोक रानडे म्हणतात,
लताबाईंचे मूळ भांडवल आहे अलभ्य आवाज, अफाट  ग्रहणशक्ती आणि भावुक ते भावात्मक गाण्याची ओढ. भावगीतांच्या संदर्भात बोलायचे झाले तर, ज्याच्या आवाजाला गीताच्या भावापर्यंत  पोचता येते तो गुणी गायक.
भावरंग फार विस्तारित संज्ञा आहे. वात्सल्य, प्रेम शृंगार, वासना, विरह वेदना, भीती , वैराग्य ..बाईंच्या गीतात हे सर्व भाव दिसतात. ज्या तर्हेने आवाजाच्या लगावातून त्या गीतातील भाव सहज व्यक्त करतात, तेच त्यांच्या यशाचे गुपित आहे.

बाईंचा प्रवास, “तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा , गेला कुठे बाई कान्हा” या दोन गीतांनी सुरु झाला आणि त्यांची गायकी, विलक्षण मधुर आवाज, नवनवीन शिकण्याची तयारी यामुळे भावगीताने एक वेगळे वळण घेतले. भावगीताचे पूर्वीचे नियम, संकेत, मर्यादा बदलल्या गेल्या. बाईंमुळे स्त्री गीताचे नवीन पर्व सुरु झाले. दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर अशा ताकदीच्या संगीतकारांच्या निर्मितीला लताबाईंनी स्वर दिला. त्यातली काही निवडक माझ्या आवडीची गाणी इथे देते आहे

“:नीज माझ्या नंदलाला” हे मी ऐकलेले पहिले गीत. माझी आई गायची. तिचे नावही लता. ह्या गाण्यातली माया आईची आणि स्वरांची साथ लता बाईंची .. अशी दुहेरी नाळ जोडली आहे या गीताशी.  युट्युब चे उपकार आहेत आता. जेव्हा झोप दगा देते तेव्हा मी हे गाणे लावते.  आईचा स्पर्श स्पष्ट जाणवतो. 

झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे

बाहेर नीरव शांतता नसते. मुंबई तशी झोपत नाही पण हे गीत लागले की बाहेरील आवाज विरून जातात. आभाळ, वारा, तारे सगळेच शांत आणि कुठूनतरी दुरून येणारा तिचा स्वर. कृष्णाच्या बालरुपासाठी सारे वात्सल्य ओतून रचलेल्या शब्दांचा हा सूर गाई आणि पाखरांबरोबर माझ्या मनातील खळबळ सुद्धा शांत करतो. जसे सती अनुसूयेने तिन्ही देवांचे  रूपांतर तीन बाळांत केले तसे हा  सूर  ऐकला की  कोणत्याही वयात. पाळण्यातील नंदलाला होतो आपला. खळेंनी यात कमीतकमी वाद्यवृंद वापरला आहे. चाल सुद्धा संथ. लता बाईंचा आवाज किती आश्वासक आहे. कुशीत घेऊन हळुवार थोपटल्याचा फील येतो हे गीत ऐकताना.
गीतकार गोविंदाग्रज यांनी लिहिलेला, अजून एक अप्रतिम पाळणा, बाईंनी गायला आहे. यातला बाळ कुणी साधासुधा नाही. तो राजपुत्र आहे. भावी स्वराज्याचा पाया त्याच्या हातून घातला जाणार आहे. ह्या बाळाच्या स्वप्नात काही चंद्र, तारे येणार नाहीत. त्याला तेवढी फुरसतच नाही.
स्वराज्याचे शत्रू, त्याचा घास करायला चालून येत आहेत. काळाकभिन्न सिद्दी, अक्राळ विक्राळ अफजल.. ह्या साऱ्यांशी त्याला लढायचे आहे याची आईला कल्पना आहे. ती माता सुद्धा काही साधी सुधी नाही. स्वराज्याचे बाळकडू तर तिनेच त्याला पाजले आहे.

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरी डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाही जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय, चालेल जागता चटका
हा असाच घटका-घटका, कुरवाळा किंवा हटका
का कष्टविशी तुझी सावळी काया?
निज निज रे शिवराया.
उद्याच्या संकटाला तोंड द्यायचे आहे तर सर्व शक्ती गमावून कशी चालेल! आता शांत झोप. संकटाला परतवून लावायला तुला जायचे आहे. जिजाबाईंच्या मनातली भीती, हुरहूर आणि ठाम  निर्धार सर्व काही बाईंच्या आवाजात सामावले आहे. 

वात्सल्याचे  अनेक रंग असतात.  “नीज माझ्या” मधील भाव जिव्हाळ्याचा, “निज निज रे शिवराया” मधला कातरतेचा, काळजीचा  तर भा रा तांबे ह्यांच्या “निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी “ ह्या  गीतातील भाव जबाबदारीचा नी कृतार्थतेचा.
काय मजा आहे पहा. दोन्ही गाणी अंगाईच पण एका गाण्यात माझा नंदलाल होतो तर दुसऱ्या गाण्यात मात्र त्यातल्या आईच्या भूमिकेशी मी समरस होते.
आई होण्याचा नक्की क्षण कोणता? गर्भ राहणे का पहिल्यांदा मुलाला हातात घेणे?
कोणताही असो पण एक मात्र नक्की आहे, ते छोटेसे गाठोडे जेव्हा हातात येते तेव्हा सहन केलेल्या वेदनांचा क्षणात विसर पडतो.एवढासा जीव पाहून मन दडपते. त्याला लागणार नाही न, आपल्या हातातून निसटणार नाही न ह्या काळजीने मन घाबरते.
सवय कुठे असते!
कितीही बिनधास्त मुलगी असुदे, आई होते तेव्हा मात्र जबाबदार होते. भा रा तांबे लिखित या गीताला संगीतकार वसंत प्रभू यांनी चाल दिली आहे.  

निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी
तिचा कलीजा पदरी निजला
जिवापलिकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला
चुंबी वरचेवरी

हे सूर पहिल्या गीतापेक्षा वेगळे आहेत ..यात मनात न मावणारा आनंद आहे , ओढ आहे, आणि जबाबदारीची जाणीव आहे .मातृत्वाचे मोहक रूप बाईंच्या स्वरातून पुरेपूर रेखले गेले आहे. आईपणाची किती रूपे आपल्या गीतातून लता बाईंनी पोचवली आहेत.

जे स्वर आईपण जगले आहेत, त्यांना आईपणाची महती सांगायची गरजच नाही. “प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई”
( माधव ज्युलियन –वसंत प्रभू ) या गीताच्या शेवटी “आई” ही साद येते तेव्हा काहीतरी हलून जातं. दगडाला सुद्धा पाझर फुटेल असे हे स्वर आहेत.
मुलगी जेव्हा आई होते तेव्हा आई समजते आणि मुलीची मुलगी जेव्हा मोठी होते तेव्हा आईची कुशी हवीशी वाट्ते. कुणीतरी हवेसे वाटते जे आपला भार घेईल.  थकलेल्या मनावर कसलीही अपेक्षा न ठेवता फुंकर घालेल,  आईच्या मायेपेक्षा निरपेक्ष असे दुसरे काहीही  नसते ह्याची जाणीव कधीना कधी प्रत्येकाला होते.

नाही जगात झाली आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची

विरहाच्या चिरंतर वेदनेला अमर केले आहे या गीतानी. वात्सल्याचे मोल कशातही होत नाही. मान वाकवून कृतज्ञतेने त्याचा स्विकार करणे एवढेच आपल्या हातात असते. कृतज्ञतेने वाकलेले आणि प्रेमाने ओथंबलेले अजून एक नितांत सुंदर गीत लता बाईंनी आपल्या वडिलांसाठी गायले आहे.

“कल्पवृक्ष कन्येसाठी” हे फक्त गीत  नाही, हा मंगेशकरांचा अनुभव आहे. मुले लहान असतानाच वडिलांचे  निधन झाले. नाटक कंपनी बंद पडली त्या बरोबर लक्ष्मीने काढता पाय घेतला. जाताना राहिले  ते सप्तसूर आणि  वडीलांचा आशीर्वाद.“आयेगा आनेवाला” ह्या गीताने इतिहास घडवला आणि लता मंगेशकर हे नाव सर्वदूर पोचले. धन-दौलत, प्रतिष्ष्ठा, रसिकांचे प्रेम, अमाप कीर्ती चालून आली ज्याने गळ्यात सूर जगवले तो मात्र आता कधीच परतणार नव्हता. ही मुलीने वाहिलेली श्रद्धांजली आहे. कृतज्ञता आहे. पितृऋणाची उतराई आहे.
“तुम्हाविण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला” ही ओळ गळ्यात आवंढा आणते. ह्या गीतातली वेदना व्यक्तिगत आहे मात्र अतिशय भावनाप्रधान असूनही याची चाल संयत आहे.
नवथर, तारुण्यसुलभ प्रेमाचा अविष्कार भावगीतात ठायी ठायी प्रत्ययास येतो. किंबहुना भावगीताची निर्मितीच स्त्री पुरुषांच्या दबलेल्या भावनांना वाट मिळावी म्हणून झाली.  असे म्हणतात, माणसांच्या मनातील भावनांचे  उत्कट प्रकटीकरण भावगीतात असावे, शब्द साधे, आशय सुलभ आणि स्वररचना आशयाला पूरक असावी. रागदारीचा वापर जरी केला तर शब्दाला सुरांनी  मागे टाकता कामा नये ह्याचे भान संगीतकार आणि गायकांनी ठेवले पाहिजे.

“प्रतिमा उरी धरोनि मी प्रीतिगीत गावे” (केसकर – वसंत प्रभू ) हे गीत म्हणजे भावगीताचा उत्कृष्ठ नमुना आहे. 

नुकती ओळख होते. डोळे डोळ्यांना भिडतात, हृदयाला हृदयाचे  गुज समजते आणि न कळत मन गुंतत जाते. जुना काळ आहे हा. भेटीगाठी तेव्हा सहज होत नसत मग आधार तो फोटोचा. प्रतिमा पाहून तहान भागवायची.

ते प्रीतीचे रे हळुवार मी म्हणावे
अस्फुट भावनांच्या स्वप्नात गुंग व्हावे
यातला “अस्फुट” हा शब्द किती नजाकतीने, मनातले केवळ त्या प्रतिमेलाच समजावे एवढ्या हळुवारपणे  गायलाय.
आपण मानो या न मानो, कुणावर तरी जीव लावायला मन तयार होत नाही. प्रेमात पडण्याची भीती मनात दडून असतेच. ते यशस्वी झालेच नाही तर आपल्याला ते दुःख पेलवेल का ही आशंका मनाला मोकळे सोडत नाही. व्यवहारीपणाच्या आणि सुरक्षिततेच्या बुरख्याखाली कितीही दडायचा प्रयत्न केला तरीही जे मनातून हवे असते, त्यापासून पळण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असतो हे स्वतःलाही ठाऊक असते.
नवीन नाते म्हणजे न चाललेली वाट. त्या वरची वळणे, खाच खळगे कुठे ठाऊक असतात! कुणावर तरी विश्वास टाकणे याचाच अर्थ स्वतःभोवती असलेली तटबंदी तोडणे.
This  makes us feel exposed and vulnerable.

तुझ्या प्रीतीचें दु:ख मला दाउं नको रे
वधुनिं जाई प्राण घेई ठेउं नको रे

जेव्हा काही मिळते, त्याच बरोबर ते हातातून निसटणार तर नाही ना , ह्या भीतीचा उदय होतो. जेवढा माणूस प्रिय होतो , तेवढा विरह कठीण होत जातो. आणि विरहाच्या भयाने माणूस जवळिकीला घाबरतो.
असेच दुसरे गीत आहे “सावर रे सावर रे , उंच उंच झुला “ ( मंगेश पाडगावकर–पंडित हृदयनाथ )

या गीतात स्वप्नाळूपण आहे, भारावलेपण आहे, प्रेमाच्या मंत्राने वेडावलेले; तरीही त्या सुखाच्या कल्पनेने घाबरलेले गीत आहे हे.

सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

हा प्रश्न त्याला नाही, तिला पडला आहे.
प्रेमाचा आनंद सुद्धा पोटात मोठा खड्डा पाडतो. आपल्या समाजात प्रेम ही सहज स्विकारली जाण्याची गोष्ट नाही. सामाजिक मान्यता अनेक पदर घेऊन येते. अनेक समस्या आणि ताण यांचा गुंता होतो. एका बाजूला प्रेमाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला त्याला निभावण्याची जबाबदारी, माणसाला दोलायमान करते.
नंतर कधीतरी प्रश्न संपतात, शंका विरतात आणि कशाचीही पर्वा न करता, धास्ती न बाळगता, जगाकडे पाठ फिरवून मन,  प्रेमाचा हात धरते.  शरीर मनाची बंधने झुगारते, एक एक श्वास त्याच्या नावाबरोबर घेतला जातो, भय जाते,  धीर येतो, उंबरठा ओलांडून, पाश तोडून बाहेर पडताना जाणीव असते ती फक्त त्याच्या बळकट हाताची.
.एक एक पायरी चढून हे गीत त्याच्या इस्पिताकडे आपल्याला घेऊन जाते.

बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग
बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग

स्वतःच काहीही मागे न ठेवता बाई स्वतःला समर्पित करते. पुरुष तत्वात स्वतःचा विलय करणे तिला जमू शकते. स्वतःला मिटवून दुसऱ्याची निर्मिती करणे हे सुद्धा तिलाच जमते..संत मीराबाईचे उदाहरण घ्या. ती प्रेममार्गावरील यात्री आहे. प्रियकराकडे  जगाची नात्याची बंधने सोडून आलेली स्त्री. भले हे न पटणाऱ्या  समाजानी तिला  संतत्वाच्या जोखडात अडकवले असेल पण तिची भक्ती मोकळी, निसंकोच म्हणून त्याला पापाचा  स्पर्श नाही..
सर्व संतांनी सुद्धा स्वतःकडे स्त्री ची भूमिका घेऊन, परमेश्वराला, पर्यायाने स्वतःच्या प्रियकराला आळवले आहे..

घनु वाजे घुणघुण , वारा वाहे रुणझुण
भवतारकु हा कान्हा , वेगीं भेटवा का
अर्थाने गूढ रचना, आपल्या चालींमुळे रसिकांपर्यन्त पोचवल्या हे हृदयनाथ मंगेशकरांचे मोठे उपकार आहेत रसिकांवर.
“घनु वाजे घुणघुण, वारा वाहे रुणझुण”
ही आहे एका कासावीस झालेल्या स्त्रीची विराणी. तिला  ध्यास  आहे तो तिच्या कृष्णाचा. 
हा महाभारताचा युगपुरुष नाही, हा आहे गोपींचा कान्हा. ह्या गीतातली भक्ती प्रेमाचे रूप घेते.

चंदनाची चोळी माझे, सर्व अंग पोळी 
कान्हो वनमाळी वेगीं भेटवा का ..

कान्हाचा विरह गोपीला असह्य होत आहे. चंदनाची चोळी तो दाह शमवू शकत नाही. फुलांची सेज,सख्यांची गीते काही काही तिच्या देहाचा ताप कमी करू शकत नाहीत.
तिला ध्यास आहे तो फक्त कृष्णाचा.
“ वेगीं भेटवा का” या शब्दांत तिची आतुरता, ओढ तोच आवेग घेऊन उतरली आहे.

लताजींच्या संदर्भात हे बोलले जाते की त्यांच्या आवाजात आवेग नाही, शृंगार नाही..
आवेग असणे आणि उत्तान  असणे यात फरक आहे. नायिकेची एक स्वतःची प्रतिमा आहे,  ती सोज्वळ आहे आणि एका पुरुषाप्रती, ज्याच्यावर तिचे प्रेम  आहे, त्याच्याशी समर्पित आहे.
जेव्हा स्त्री  समर्पित होते तेव्हा त्यात प्रेम असते, शृंगार असतो आणि वासनाही असते. तो फक्त देण्याचा व्यवहार असतो..एकमेकांवर अनुरक्त असलेले स्त्री पुरुष  शृंगारात देतात आणि जेव्हा एकरूप होतात, तेव्हा देण्या घेण्यामधले  अंतर संपले जाते मग  उरते ते निव्वळ सुख. तनामनात भरून राहिलेली तृप्ती. 
शरीर सुखावणे हे  कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत होते. त्याची  अभिव्यक्ती वेगळी असेल. पण सुख देणे  आणि घेणे ही नैसर्गिक उर्मी आहे आणि त्याला तुम्ही पत्नी आहेत की व्हॅम्प याचे बंधन नाही.

प्रीतीची सांगता विवाहात व्हावी. त्याला सामाजिक मान्यतेचे कोंदण असावे असे प्रत्येक  स्त्रीला वाटतेच. शृंगाराला धर्माचे अधिष्ठान मिळते तेव्हा भय जाते आणि मिलनाची ओढ गात्रागात्रांत फुलून येते. नंतर जे घडते ते हवेहवेसे असते आणि बेभान करणारे असते.

प्रकाश पडता माझ्या वरती
फुलते बहरून माझे  यौवन
हसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात
आली हासत पहिली रात.
उजळत प्राणाची फुलवात

लग्नाच्या अक्षता पडलेल्या आहेत. समाजाने स्विकारलेले बंधन आहे हे. आता  या पुढे  घडणार आहे त्यात यज्ञाच्या भोवती घेतलेल्या फेऱ्यांचे पावित्र्य आहेच,. त्यामुळे येणाऱ्या रात्रीची उत्सुकता आहे, आतुरता आहे, लज्जा आहेच पण त्याहीपेक्षा  त्याचा  आनंद  आहे, आज सुखाची मागणी आहे कारण ते सुख हक्काचे आहे. तो फक्त तिचा  आहे.  मनाने आणि रीतीने ही.  हे गाणेच त्या अधिकाराचे, आनंदाचे, आतुरतेचे. 
त्याच्या तन, मन, धन या साऱ्याची  सम्राज्ञी असलेला दिमाख आहे यात.

मोहक सुंदर फुल जीवाचे
पती चरणावर प्रीत अर्पिता
मीलनाचा स्पर्श होता, विरली अर्धांगात
समर्पण आणि आवेग याचा एवढा सुंदर मिलाप आहे या गीतात.


नवविवाहितेचे अजून एक सुंदर गीत आहे. 

अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग

विवाह झाला आहे, त्याचा अर्थ ही समजला  आहे. लग्नाचे नव्हाळीचे दिवस  आहेत हे पण ती अजूनही या सहवासाला सरावलेली नाही. येणारी प्रत्येक  रात्र एक नवीन  अनुभव देणारी. नवीन काही शिकवणारी. ती तर काही  तरबेज नाही. कदाचित  तो सुद्धा नवीनच. 
अशावेळी एकमेकांना  शिकवत चढत गेलेल्या  रात्रीचे गीत आहे हे …
मोठेपण कवळे ग. हे लताजीने किती कोवळेपणाने  गायलेय.

शृंगारिक भावगीतांचा विषय आहे तर “मालवून टाक दीप “ हे गीत वगळता येणारच नाही. “मालवून टाक दीप” मध्ये न विझलेल्या वातीसारखी रात्रीच्या सुखाची तृप्ती रेंगाळलेली आहे. सरल्या रात्रीचा  अनुभव गात्रांगात्रांतून जागा आहे. जी जवळीक झाली आहे त्याच्या खुणा तिच्या अंगावरून आणि मनातूनही पुसल्या गेल्या नाहीत .

या गीताची सुरवातच तानपुऱ्याच्या साथीने आणि आलापाने होते.  “मालवून” ह्या शब्दातील वू लांबवला आहे. नायिकेला वाटणारी असोशी त्या शब्दात दिसते.

त्या तिथे फ़ुलाफ़ुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्न भंग

भर ओसरला आहे. आवेग नाही, उन्माद नाही पण जडावलेल्या पापण्यांवर अजून धुंदी आहे.
अपेक्षा आहे ती फक्त एक स्पर्शाची, रात्रीच्या घटनेशी जवळीक सांगणाऱ्या एका मिठीची पण पाठ फिरवून झोपणाऱ्या तिच्या पतीला ही असोशी का समजत नाही का तिंचा मूक प्रश्न आहे. 

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल?
सांग का कधी खरच एकटा जळे पतंग?
ह्यात अपेक्षा आहे, आर्जव आहे, हवीहवीशी मागणी आहे आणि लज्जेवर सुद्धा मात केलेला आग्रह आहे.
सुख असे अंगावर नव्याने दिसू  लागले की विरहाची घडी येते. मधुचंद्र संपतो. रहाट गाडगे सुरु होते आणि  त्याची कामासाठी बाहेर पडायची वेळ होते. चांदणे सुद्धा अंगाला डागण्या देते. नेहेमी लवकर संपणारी रात्र सरता सरत नाही.डोळ्याला डोळा लागत नाही. मन थकते, शरीर टाहो फोडते.

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
मन उदास उदास दूर पांगल्या सावल्या.. 

हे असे सुरांतले हिरमुसलेपण सुद्धा विरह सुरेल करते.
मराठीत लताजींने कमी काम केले.त्यांचे आणि अभंग यांचे नाते घट्ट. लावणीचा साज त्यांनी आपल्या तितक्याच ताकदीच्या बहिणींना सोपविला पण त्यांच्या काही लावण्या इतक्या सुंदर जमून आल्या आहेत की त्यांनी  हे क्षेत्र स्वखुशीने सोडले त्याचे वाईट वाटते.
“राजसा जवळी जरा बसा “ ही बैठकीची लावणी. शास्त्रोक्त संगीतावर आधारलेली .मात्र तिचा बाज मराठमोळ्या मातीतला आहे. 

त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत

“पिचला माझा चुडा” यातला “पिचला” हा शब्दच असा उच्चारलाय की भाषा न कळणाऱ्याला देखील सहज अर्थ कळेल.
त्यांची गायकी शब्दप्रधान आहे. “काथ लाल ओठात”  हे शब्द सुद्धा रंगलेल्या ओठांची स्पष्ट कल्पना देतात. बैठकीतील लावणी गाताना टार्गेट निश्चित असते. मोजक्या लोकांसाठी केलेला तो कार्यक्रम.
इथे शब्द एका ठराविक कानासाठीच असतात ..
तर फडावरची लावणी जमेल तेवढ्या  लोकांना आकर्षून घेण्यासाठी. शुद्ध व्यवहार  असतो तो. इथे शुंगार सुद्धा उघडा वाघडा.
अशी गाणी  कमी गायली आहेत त्यांनी पण माझी आवडती एक भन्नाट लावणी आहे.

किती जीवाला राखायचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकले.
यात त्यांनी आवाजाची पट्टी एक octave खाली घेतली असावी. भारदस्त आवाज वाटतो तो. बेरका, गल्ल्यावर नजर ठेवून असलेला …
दोन्ही लावण्याचं पण लक्ष देऊन ऐकले तर मादकता कशी प्रसंगानुरूप बदलते ते सहज समजेल .
आता विड्याचा उल्लेख आलाय तर असेच नर्म शृंगारातच रुतलेले एक गीत आहे,

नाही कशी म्हणू तुला  विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी..
भर दुपारची वेळ, घर गजबजलेले, मोठी माणसे आजूबाजूला आहेत.
त्याला जरी भान नसेल, पर्वाही नसेल तरी तिला तसे  थोडेच चालणार आणि त्यालाही कसे दुखावणार!  
हे सुख तर तिलाही हवेहवेसे ..
स्वतःचे मन मारायचे पण त्याचे मन राखायचे  ही तारेवरची कसरत लताजींनी किती सुंदर पेलली आहे.

मराठी गाणी जरी कमी असतील तरी  त्यातून निवड करणे अतिशय कठीण आहे.  चित्रपटातील गाण्यांवर लिहिताना कथा माहित असते, अभिनय दिसत असल्याने गाण्यांचा अर्थ जाणणे तसे सोपे होते पण
मराठी भावगीतांना चेहेरा नाही, कथा नाही आणि काही सिनेमातील असली तरी मी मराठी चित्रपट फार पाहिले  नाहीत. 
ही गाणी प्रेम या संकल्पनेभोवती फिरणारी.
आता उद्यापासून प्रेमाचा आठवडा सुरु होईल.
लता बाईंचे एक अप्रतिम गीत आहे जे मला अतिशय आवडते.

प्रेमा काय देऊ तुला,
भाग्य दिले तू मला …

नार्वे मध्ये सहा महिने रात्र असते असे म्हणतात. त्या काळात जन्माला येणारे मुल जेव्हा पहिल्यांदा सूर्याचे दर्शन घेते तेव्हा तो हरखून जाण्याचा आनंद असतो तो अनपेक्षित असतो. रात्रीची सवय झालेली असते आणि दिवस कसा असेल याची कल्पना सुद्धा नसते. त्यामुळे त्याची अपेक्षा सुद्धा नसते. अचानक हासभास नसताना झालेले प्रकाशाचे दर्शन असते ते.

प्रीतिच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देवू का ?
देवू तुला का हर्ष गंध हा जीव फुलातून मोहरलेला …
प्रेमा , काय देवू तुला ?
भाग्य दिले तू मला…

तृप्ततेतून ओठावर आलेले हे गीत आहे.

‘देणाऱ्याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे”
जर खऱ्या  प्रेमाची ओळख पटली असेल तर ती तृप्तीच एवढी विलक्षण असेल की अजून  काही मागावे अशी इच्छा होऊच नये. उलट कृतज्ञता म्हणून त्या प्रेमालाच काहीतरी द्यायची उर्मी वाटावी असा क्षण जर तुमच्या आयुष्यात आला असेल तर त्या भाग्याहून अजून काहीही मोठे नाही .
आज या क्षणाला सुरांच्या या  सम्राज्ञी बद्दल माझ्या ह्याच भावना  आहेत.  
आठवणीतील गाणी या पेज वर लता मंगेशकर या नावापुढे २६० गाणी आहेत. नवरसांचा अविष्कार त्यांच्या गीतांतून प्रत्ययास येतो. या एका लेखात आवडलेल्या गीतांचा सुद्धा संपूर्ण आढावा घेणे शक्य नाही. त्यांनी गायलेली विरह आणि भक्ती गीते हा एका वेगळ्या लेखाचा भाग होईल. अर्थात बाईंवर लिहायला अर्थात बाईंवर लिहायला एक जन्म पुरा पडणार नाही हे अध्याहृत आहेच.

34 thoughts on “भाग्य दिले तू मला.”

  1. अतिशय सुरेख पोस्ट …. खरच लताने आपल्याला इतकं काही दिलं आहे कि तिच्या ऋणातून उतराई होणं अशक्य … हे आपलं भाग्यंच कि आपण तिच्या काळात जन्माला आलो

    1. Thank you Nayana .
      हे मात्र खरे. आयुष्य या लोकांनी फार सुंदर केले आहे. लता नसती तर हा निबंध आला असता , तर काय वेडे झाला आहेत का असे लिहून आले असते बहुतेक
      कल्पना करवत नाही

  2. नितांत सुंदर लिहीलंय खरच लतादी तिच्या गाण्यांमधून अजरामर आहेत

  3. अप्रतिम लेख लिहिलायस..❤️
    एका पाठोपाठ सुरेल, सुंदर गाण्यांचा मागोवा घेतलायस..
    सर्व गाणी अवीट गोडीची आहेत.

  4. प्रिया,
    काय लिहू?
    लता….
    हे नाव च असं आहे की शब्द च अपुरे.
    आचंद्रसूर्य लता आणि तिचा स्वर,गाणी राहणार.
    आपली लता एकेरी उल्लेख प्रेमाने ,आदराने.
    स्वरमाऊलीच ती.
    तुझा लेख
    लता दीदींच्या नवरस आविष्कार वर्णन करणारा आहे.
    अर्थात तू म्हटल्याप्रमाणे बाईंवर लिहायला एक जन्म पुरा पडणार नाही.
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  5. नितांतसुंदर! अप्रतिम लिखाण प्रियाताई! सुरेख! लताबाईंवर कितीही लिहिलं, वाचलं तरी कमीच वाटतं!

    1. Harshada , Thank you.
      खरंय ..त्यांचे काम च अफाट आहे …आणि दर्जेदार
      एक जन्म अपुरा पडेल

  6. अप्रतिम लिहीले आहे ! काही गाण्यांमध्ये अध्यात्मिक खोली गाठण्याचे बळ आहे. वात्सल्य, श्रृंगार, वीररस, अध्यात्म काय नव्हतं त्या आवाजात? लेख फार छान ओळख करुन देतो पण असं वाटतं संपु नये लेखही व त्यांच्या गाण्यांबद्दल माहीती ही !

    1. अगदी Rahul. . नवरसांचे दर्शन त्यांच्या आवाजातून होते .
      गीता ऐकताना असे वाटते की प्रत्यक्ष भगवान कृष्णांनी सुद्धा थांबून त्यांच्या आवाजात ऐकली असती

  7. त्यांच्या आवाजात आवेग नाही पण तीव्रसंवेग आहे, श्रृंगार नाही पण सर्वोच्च भक्ती, प्रेम, समर्पण आहेत जे transcendental आहेत, जे मर्त्यतेची सीमा मानत नाहीत. ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा बीते ना मिलन की बेला’ या त्यांनी गायलेल्या हिंदी गीतामधे हे पुरेपूर जाणवतं. ‘जीवनसीमा के आगे भी आऊँगी मै संग तुम्हारे’ ही भावना त्यांच्या अलौकिक कलेचा आत्मा आहे, सारभूत आहे.

    ‘भेटीलागे जीवा लागलीसे आस’ या तुकोबांच्या अभंगात तीव्रसंवेग आहे. ‘पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाही’ ही भावना प्रेम आणि भक्ती यांना एकाच पातळीवर आणतात जी इतर निम्न भावना ओलांडून जाते. ज्ञानोबा, तुकोबा, मीराबाई या नावांच्या ओघात लताबाई हे नांव कसं सहजपणे येतं…त्यांचे स्वर याच भारतीय परंपरेतले चिरंतन, कालजयी आहेत.

    1. ज्ञानोबा, तुकोबा, मीराबाई या नावांच्या ओघात लताबाई हे नांव कसं सहजपणे येतं…

      अगदीच हेमंत.
      मलाही हे जाणवते. अनेकवेळा वाटते , संतांच्या रचना भक्तांपर्यंत पोचायला असे आवाज जन्माला आले असावेत .
      दैवी अनुभूती

  8. अप्रतिम! अंजोर ताई आणि तुझा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असे आहेत

  9. Kamini Sunil Amrutkar

    कमाल कमाल लिहिलंत 👌👌
    त्यांची दोन तीन गाणी तर इतकी हटके आहेत की पुन पुन्हा ऐकाविशी वाटतात. एक म्हणजे घे जवळी भगवंता, सूर आम्ही चोरितो का आणि कोकिळ कुहू कुहू बोले…
    अवीट माधुरी आहे.
    हा लेख म्हणजे गानसरस्वती ला अप्रतिम शब्दांजली ❤❤❤❤

    1. Thank you Kamini
      सूर आम्ही चोरीतो का ..आता ऐकते.
      बाकीची दोन तर अफाट .
      मला आठवते , घे जवळी , दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात मी प्रथम ऐकले .
      आधी आशा आणि अनेक चांगल्या लोकांची गाणी झालेली .
      आशाने युवतीमना म्हंटले …वाटले आता या नंतर कोण गाणार !
      पण हे गाणे आणि सगळेच बदलले

  10. खरंच मराठीत लताबाईंची गाणी आशाताई किंवा सुमनताईंच्या तुलनेत कमी आहेत. पण जी आहेत ती खणखणीत नाण्यासारखी आहेत. आपण सर्वच गाणी सुरेख निवडलीत . हि गाणी ऐकताना जशी तन्द्री लागते तशी ह्या गाण्यावरचा तुमचा लेख वाचताना तन्द्री लागते. म्हणजे गाणे जसे ऐकतच रहावे असे वाटते तसे तुमचा लेख वाचतच रहावा असं वाटते.

    1. Thank you Jayantji,
      खरे आहे तुमचे. गाण्याची संख्या कमी आहे कारण त्या हिंदीत व्यस्त होत्या. मात्र जी गाणी त्यांनी केली ती त्यांच्या दर्जाला शोभेशी. त्यांच्या आवडीला साजेशी ,
      तो पर्याय त्यांना इथे होताच

  11. लता दीदी यांच्या आवाजात जादू आहे होती राहील कायम, तुमच्या हातात जादू आहे प्रिया दि….. ईतकं अफाट वाचन, ते शब्दाशब्दातून ओघवत,

Leave a Reply to Rashmi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *