Skip to content

राम का गुणगान करिये.



अयोध्येत श्री रामचंद्रांच्या आगमनाची तयारी जोरात चालू आहे.त्यात आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. काहींसाठी ते भक्तीचे प्रतीक आहे, काहींसाठी अस्मितेचे.  प्राण प्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यापासून पूर्ण देशच राममय झाला आहे.
या कार्यक्रमाची चर्चा जगभरात चालू आहे. अनेक देशाचे प्रतिनिधी ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असा, २२ जानेवारीला असंख्य भक्तांचे मन राम रंगी रंगणार आहे.



“एका राजपुत्राने, दुष्ट राक्षसाकडून पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची केलेली सुटका.” केवळ इतकंच रामायणाचे मूल्य नाही.
रामायण हे निरपेक्ष प्रेम आणि भक्ती याची गाथा आहे.
धैर्य, पराक्रम, निष्ठा, चिकाटी आणि न्याय  याचे प्रतीक असलेला राम हा पूर्ण पुरुष आहे.  सदाचरण आणि त्याग याचे मूर्त स्वरूप आहे. उच्च कोटीची मूल्ये आणि तत्वे यांचे रूपक असलेला राम हा भारतीयांचा आदर्श आहे.
जन्म आणि मृत्यू, ज्या नावाशी जोडले गेले आहे तो प्रभू राम आहे.

श्रीरामाचे आयुष्य हे  शिल्पकला, चित्रकला, साहित्य, काव्य या सर्वच क्षेत्रांची प्रेरणा आहे. भारतीय चित्रपट त्याला अपवाद नाहीत. १९१७ मध्ये दादासाहेब फाळके यांनी “लंका दहन “ ह्या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट एवढा लोकप्रिय झाला की एका थिएटर मध्ये सकाळी सात वाजल्यापासून ते मध्य रात्रीपर्यंत त्यांचे शो आयोजित करावे लागले. रामायणातील अनेक प्रसंग केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती झाली. चित्रपटांची अनेक पात्रे रामायणातील पात्रांचा आदर्श घेऊन बनवली गेली.
असे म्हणतात, राम हे नाव व्यक्तीपेक्षा पवित्र आहे. केवळ राम नामाचा जप करून लोक मोक्षाला पोचली आहेत. राम हा एक महामंत्र आहे ज्याचा जप प्रत्यक्ष महादेवाने केला आहे.

हरि अनंत हरि कथा अनंता। कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता॥
रामचंद्र के चरित सुहाए। कलप कोटि लगि जाहिं न गाए॥
तुलसीदास म्हणतात,
राम चरित्र एवढे सुंदर आहे, की कोटी कोटी कल्पना सुद्धा त्याचे वर्णन करायला अपुऱ्या पडतात.
हिंदी चित्रपटात अशी असंख्य गीते आहेत ज्यांनी रामचरित्राचा गोडवा सुरात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गाण्यांची ही पोस्ट.

मंगल भवन अमंगल हारी
——————————-
( सिनेमा –गीत गाता चल, संगीतकार – रवींद्र जैन, गायक -जसपाल सिंग )

राजश्री बॅनरने  सातत्याने कुटुंबवत्सल  प्रेक्षकांसाठी चित्रपटांची निर्मिती केली. घरातील सर्व घटक एकत्र बसून चित्रपट पाहू शकतील अशी कथा, चित्रण, अभिनय आणि गीते हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. एकत्र कुटुंब व्यवस्था हा त्यांच्या कथेचा गाभा. आत्या, मावशी, काका , मामा , चुलत मामे भावंडे यांनी भरलेले आनंदी, समाधानी घर असावे हा त्यांच्या चित्रपटाचा मूळ हेतू. . शुद्ध हिंदी भाषेत बोलणारा, देशी पोशाख करणारा, निसर्गावर, प्राण्यांवर प्रेम करणारा आणि घरातील माणसांना जपणारा त्यांचा नायक हा प्रभू रामचंद्राचे प्रतिबिंब होता. या कथा इंडियाच्या नाहीत तर भारताच्या मातीत रुजलेल्या होत्या.  अर्थात या घराला आशीर्वाद देण्यासाठी बनवलेल्या मूर्ती या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या असाव्यात हे निश्चित होते.
संत  तुलसीदासाच्या या अमर चौपाईचा या सिनेमात उपयोग केला आहे.

मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सुदसरथ अजर बिहारी
राम सिया राम
सिया राम जय जय राम

अमंगळाचा नाश करणाऱ्या, मंगलदायी रामाची माझ्यावर कृपा होऊ दे. 
धीरज धरम मित्र अरु नारी
आपद काल परखिये चारी

वाईट काळात सुद्धा न सोडून जाणाऱ्या चार गोष्टी म्हणजे, धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी .
हा श्लोक राम चारित्र्याचे सार आहे

राम चरित्र एवढे विस्तारित आहे की त्यातील एक, एक प्रसंग हा नाटकाचा , कादंबरीचा , सिनेमाचा विषय आहे कारण ही काही साधी गोष्ट नाही, ही संस्कृतीची वहिवाट  आहे.  प्रत्येक प्रसंगात यातली पात्रे कशी वागली हा एक अनुकरणाचा विषय आहे.
राम पित्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात जायला निघतो हा प्रसंग. चौदा वर्षाचा वनवास. राजसी जीवनाचा राम, लक्ष्मण आणि सीतेने स्वेच्छेने त्याग केला आहे. आता प्रवास करण्यासाठी रथ, हत्ती, घोडे असणार नाहीत. हा प्रवास पायी करायचा आहे. खडतर आहे.
मध्ये गंगा नदीचे पात्र लागते. ते ओलांडण्यासाठी राम , तिथे असलेल्या नावाड्याला विनंती करतो. नावाडी काही तयार होत नाही . एका पाषाणाला रामाचा स्पर्श झाल्यावर , तिचे स्त्री मध्ये परत रूपांतर झाले ही गोष्ट त्याने ऐकली आहे. अहिल्येच्या उध्दाराची कथा , पर्यायाने रामाच्या महतीची कथा दूरवर पसरली आहे.
“ माझी बोट तर लाकडाची आहे. तुझ्या पायाला लागलेल्या धुळीच्या स्पर्शाने  जर दगड रूपांतरित होतो तर माझ्या या साध्याश्या लाकडी बोटीचे काय ? जर त्याचेही स्त्री मध्ये रूपांतर झाले तर माझा उदरनिर्वाह कसा होईल?”  असा त्याचा भाबडा प्रश्न आहे. 
लक्ष्मणाच्या संतापाकडे दुर्लक्ष करून तो रामाला सांगतो, मला तुमचे पाय धुण्याची परवानगी द्या. तुमच्या पायाला लागलेली धूळ मला साफ करू दे. तरच मी तुम्हाला होडीत पाय ठेवायला देईन “
दैवताचे आणि भक्ताचे केलेले हे मानवीकरण किती गोड़ आहे.

भैया रे भैया रे भैया नैया छूआओ ना
——————————————-
( सिनेमा -भरत मिलाप, संगीतकार -वसंत देसाई, गीतकार- भरत व्यास , गायक – मोहम्मद रफी आणि कमल बारोट )
उत्तर भारतातील लोकसंगीतावर आधारित याची चाल आहे आणि चित्रीकरण फार सुंदर आहे.
नावाडी म्हणतो,

हमने सुनी कहानी
गाँव वालों की जबानी
जादू वाला है रे ये रमइय्या
दैय्या दैय्या दैय्या
इक पत्थर छूआ तो
झट बन गई फट से लुगईय्या

रामाला त्याने विनंती  करू दे, अटी घालूदे पण राम हे परमेश्वराचे रूप आहे याची त्याला कल्पना आहे. परमेश्वराकडे हट्ट नाही करायचा तर अजून कुणाकडे करणार! तो प्रभूचे चरण कमल धुवून त्यांना आपल्या नावेत बसवताना प्रार्थना करतो,

हम भी केवट प्रभु
तुम भी केवट हो तो
भाईचारा हम से निभईओ, प्रभु जी
नदिया के पार लगाएँ तुम्हें तुम
हम को भी पार लगईओ
भव सागर से पार लगईओ
हो हो भव सागर से पार लगईओ

इथे एका क्षणात भक्ताने अंतर पार केले आहे बघा.
तो म्हणतो, मी नावाडी आणि तू सुद्धा नावाडीच तर आहेस. तुला नदी पार करून देताना , मी सुद्धा एक मागणे मागतो.
मी गंगा नदी ओलांडायला तुला मदत करतो , त्या बदल्यात या संसाराचा भवसागर ओलांडून जायला तू मला मदत कर.

देवाला आठवण्याचा, समर्पित करण्याचा, प्रसन्न करण्याचा मार्ग भक्तीतुन जातो.
विष्णू पुराणात भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत. राजा परीक्षिताची श्रवण भक्ती, भक्त प्रल्हादाची स्मरण भक्ती, संत तुकारामांची  कीर्तन भक्ती, स्वतःला कनिष्ठ समजून पायाकडे बसण्याची (पाद सेवन) लक्ष्मीने केलेली भक्ती , पूजा , साष्ठांग नमस्कार, अर्जुनाने भगवान कृष्णाशी केलेले सख्य , मीराबाईचे समर्पण आणि हनुमानाचे दास्य.
रामकथेला हनुमानाशिवाय  पूर्णत्व नाही. नि:स्वार्थी सेवा, निष्ठा आणि शक्ती यांचे प्रतीक म्हणजे हनुमान.

जय बोलो सियावर राम की
——————————–
(सिनेमा -पवनपुत्र हनुमान, संगीतकार -चित्रगुप्त, गीतकार -गोपाळ सिंग नेपाली, गायक -मोहम्मद रफी )

जेव्हा जेव्हा अधर्माचे राज्य उच्छाद मांडते तेव्हा तेव्हा देवाला सुद्धा धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो.
दशरथ पुत्र रामाचा जन्म रावणाच्या नाशासाठी होतो. त्याचवेळी अंजनी मातेच्या पोटी वायुपुत्र हनुमान जन्म घेतात.
सिनेमाची सुरुवात रामाच्या वनवासापासून होते. कांचन मृगाच्या मोहात पडलेल्या सीतेला पळवले जाते. राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात वणवण फिरत असताना , त्यांची सुग्रीवाशी भेट होते आणि त्याच वेळी रामाच्या दर्शनाने हनुमानाला आपल्या जन्माचे इस्पित उलगडते.

सबसे निराली महिमा है भाई
दो अक्षर के नाम की,
जय बोलो सियावर राम की

लंकेवर स्वारी करणार हे निश्चित आहे पण मध्ये पसरलेल्या समुद्राचे काय ! तो कसा ओलांडणार!
राम सेतू बांधण्याची तयारी सुरु होते. राम नाम लिहून मोठेमोठे दगड पाण्यात सोडले जातात आणि काय नवल !
केवळ राम नामाने ते तरंगतात.. एका भव्य कार्याची सुरुवात होते.

अब ना रहेगी सोने की लंका
नाम मिटेगा अब रावण का
भार हटेगा धरती गगन का
राम नाम का गुंजेगा डंका

ट्रिक सीन्स चा बादशहा बाबुभाई मिस्त्री यांनी या चित्रपटाची निमिर्ती आणि दिग्दर्शन केले होते. तंत्र ज्ञान फार विकसित झाले नसताना सुद्धा यातली दृश्ये अत्यंत सुंदर घेतली आहेत.

साहित्य निर्मिती किंवा लोकरंजन असा कोणताही उद्देश नसताना अंतःकरणाच्या तळमळीतुन परमेश्वराला घातलेली साद म्हणजे भक्तिगीते. भक्तिगीतांनी उच्च मानवी मूल्ये समाजाच्या प्रत्येक स्तरात, अगदी अक्षर ओळख सुद्धा नसलेल्या समाजात, पोचवली आहेत रुजवली आहेत. त्यांची जोपासना केली आहे.
भक्तिगीतांतील आवाहन सामाजिक असते. वैश्विक असते. टाळ, मृदूंगाचा गाजर सुरु झाला की ऐकणारा आणि ऐकवणारा , समान पातळीवर येतात. त्यात ऐकवणारा आवाज लता बाईचा असेल तर!
शारदा सिनेमात लता बाईंना गाताना ऐकणे आणि मीना कुमारीला ते गाताना पाहणे हा स्वर्गीय अनुभव आहे. 

रघुपति राघव राजा राम
—————————
( सिनेमा -शारदा, संगीतकार -सी रामचंद्र,, गायिका -लता मंगेशकर)

सब धर्मो का सार है राम
जीवन सफल करे यही राम
सत्य नाम है राम नाम
जन गण मंगलदायक राम

हिंदू धर्मात,  राम हा एका कथेचा फक्त नायकच नाही तर सद्गुण, सदाचार, पावित्र्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. रामाचे गुणगान ऐकणे आणि गाणे म्हणजे त्या दैवी तत्वाशी संवाद साधणे. राम नाम जप हा फक्त सराव नाही, हा प्रवास आहे.
A journey to a more heartfelt, intense, soothing and purified self.

सूरज की गर्मी से जलते हुए तन मिल जाये तरुवर की छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम ॥
————————————————————————————-
( सिनेमा -परिणय, गायक -शर्मा बंधू )

परिणय चित्रपटाचा नायक राम आहे. आजच्या काळातील राम. जो ऐश्वर्य आणि सुखासीन आयुष्याचा त्याग करून एका खेड्यात येतो. तिथल्या लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करतो. त्याची प्रेयसी सुरुवातीला त्याच्याशी लग्न करून येते खरी , पण हे सतीचे वाण आहे; सर्वांना पेलवत नाही. प्रेम का कर्तव्य हा पेच कठीण पण राम आपल्या सत्वाला जागतो.
हे गाणे ऐकणे म्हणजे रामतत्वाची अनुभूती घेणे.

देवाला न मानणाऱ्या  आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या,  दोन्ही माणसांना या जन्मात अडीचणींचा सामना करावा लागतो.
अनेकवेळा शरीर थकते, मन विटते, अशांत होते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग ही बसल्या जागी मिळत नाही. हात पाय त्यालाच हलवावे लागतात. ज्यांच्या बाजूला कुणीही मदत करणारे नसते त्यांच्यासाठी हा मार्ग नुसताच खडतर नाही तर एकाकी असतो. आस्तिक लोकांच्या मनातील देव मात्र त्यांची सोबत करतो. तसेही देव ही दिसण्याची नाही अनुभवाची स्थिती आहे. तो माझ्याबरोबर असणार आहे हा विश्वास हत्तीचे बळ देतो हा माझा अनुभव आहे.
पद्यातील या ओळी कधीही ऐकल्या तरी डोळे पाणावतात आणि ओठ हसतात.
राम नामाची ही अद्भुत किमया आहे. 

भटका हुआ मेरा मन था, कोई मिल ना रहा था सहारा
लहरोंसे लडती हुई नाव को जैसे मिल ना रहा हो किनारा
उस लडखडाती हुई नाव को, जो किसी ने किनारा दिखाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम ॥
 
पूर्ण जीवनभर मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागतो. पैसे, प्रतिष्ठा आणि शारिरीक भोग हे त्याचे उद्धिष्ट ठेवतो. अंतिम क्षणी मात्र हे कुणीही त्याची साथ देत नाही. अगदी प्रेमाची माणसे सुद्धा वेशीकडे आल्यावर, जड अंतःकरणाने का होईना, त्याला निरोप देऊन आपल्या मार्गाला लागतात. हा प्रवास फक्त एकट्याचा आहे हे त्याला उमजते. उशीर झालेला असतो आणि जवळ असते ते त्याचे कर्म . मृत्यू निश्चित आहे आणि त्याची जाणीव ठेवून सत्कर्म करणे हेच सत्य आहे हे निदान त्याला आणि मागे राहिलेल्या सर्वांना आतातरी उमजावे यासाठी राम नामाचा जप केला जातो. अशावेळी त्याला बाकी कुणी नाही तर केवळ राम नाम तारून नेईल अशी श्रद्धा आहे. आता रामच का , बाकी इतर देव का नाहीत, तर, “आदर्श मानव”, नीतिमत्ता आणि सद्गुण हे सर्व भगवान रामाचे प्रतिनिधित्व करतात. मानवासाठी आदर्श हा मानवाच्या रूपातील देवाचा अंश असावा म्हणून श्रीमानयोगी राजा राम, त्याचा जयघोष.

सुख के सब साथी, दुख में न कोई, मेरे राम, तेरा नाम, तेरा नाम एक सांचा, दुजा न कोई
————————————————————————————————-
( सिनेमा- गोपी, संगीतकार -कल्याणजी आनंदजी , गीतकार -राजेंद्र कृष्ण, गायक -मोहम्मद रफी )
१९७० मधील गोपी या सिनेमात हे गीत आहे. दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या काळातील हा सिनेमा.
एका असाध्य भोळ्या मुलावर चोरीचा आळ येतो. सावत्र भाऊ त्याला घरातून घालवून देतो. तो मात्र सत्याची कास धरून आपल्यावरील आळ दूर करतो.
राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले हे गीत म्हणजे आयुष्याचे अंतिम सार आहे.

जीवन आणि जानी छाया, जूठी माया, झूठी काय।
फिर काहे को साड़ी उमरिया, पाप को गठरी ढोई॥
ना कुछ तेरा, ना कुछ मेरा, यह जग योगी वाला फेरा।
राजा हो या रंक सभी का, अंत एक सा होई॥

राम कथा या फक्त कथा नाहीत,  शौर्य, नैतिकता, सदाचरण आणि मूल्ये यांचा धडा आहेत. म्हणून त्याला धर्माचे, सीमेचे बंधन नाही. असे म्हणतात, रामानंद सागर यांचे रामायण सुरु झाले की रस्ते ओस पडायचे. अगदी भिन्न धर्मीय लोकांच्या देशात सुद्धा रामायण पाहिले जायचे. आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी वनात जाणाऱ्या पुत्राचे कुणाला कौतुक वाटणार नाही!

राम मंत्र पठण हा केवळ शब्दांचा क्रम नाही, तो इतिहासाचा दैपिप्यमान कालखंड आहे. युगानुयुगे चालत आलेल्या ज्ञानाचा आणि विवेकाचा धागा आहे. हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. राम नामाचा जयघोष म्हणजे इतिहासाचे स्मरण, संस्कृतीचे रक्षण आणि दैवी वारशाचे जतन. 
२२ जानेवारीला त्याला मूर्त स्वरूप येत आहे. नमन. 

6 thoughts on “राम का गुणगान करिये.”

  1. हे रोम रोम मे बसनेवाले राम

    सगळ्यात आवडतं गाणं…

    रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी…

    1. Hemant , आवडीचे आहेच ते . खरेतर मराठी गाण्यांवर करायला हवी होती एवढी गाणी आहेत .
      नंतर कधीतरी

Leave a Reply to Mangala Bhoir Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *