Skip to content

अनेक रंगी रफी.

जेव्हा गाणे शिकायला सुरुवात केली, सुरांची ओळख  झाली तेव्हा लता आणि रफी यांचे बोट धरून शिकलो .
“भूप रूप गंभीर शांत रस” ही चीज म्हणजे भूप रंगाची ओळख करून देणारे पहिले गीत.  तरीही “ज्योती कलश छलके” नी भूप राग जास्त लक्षात राहिला तसेच  मन रे तू काहे न धीर धरे नी “यमन ”..
पन्नास ते साठ चे दशक हा तर चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ. माझ्या जन्माच्या बरीच आधीची ही  गाणी असली तरी आई , आजी , मावशी याच्या तोंडून ऐकलेल्या गाण्याचेच मनावर संस्कार झाले.
रफीजींचा पहिला कार्यक्रम लाहोर येथे होता. खरेतर सैगलजी गाणार होते पण मायक्रोफोन मध्ये बिघाड झाल्यामुळे , तो दुरुस्त होईपर्यंत , गाण्यास , त्यांनी नकार दिला. अस्वस्थ श्रोत्यांना शांत करणाऱ्यासाठी रफीजींना गायला सांगितले. तेरा वर्षाच्या रफीजींनी गाण्याच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले ते या महान गायकाच्या साक्षीने. संगीत दिग्दर्शक शाम सुंदर यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि पार्श्वगायनाचे दरवाजे रफीजींसाठी उघडे झाले . १९४१ मध्ये त्यांचे पहिले पंजाबी  गीत रेकॉर्ड झाले. लाहोर वरून मुंबईकडे प्रयाण , इथे चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी केलेला संघर्ष , १९४४ मध्ये नौशादजींच्या दिग्दर्शनाखाली “पहले आप“ या चित्रपटासाठी मिळालेली संधी .
A star is born.

१९४४ पासून रफीजींनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. रफीजींच्या अकाली निधनाने १९८० ला त्याला पूर्ण विराम मिळाला .
संगीताचा या प्रदीर्घ कारकिर्दीतून त्यांची काहीच  गाणी निवडणे खरंच कठीण काम आहे.
या आधीची रफीवरील पोस्टची थीम होती — पुरुषाला समजून घेण्याची गाणी
आताची थीम आहे . “अनेक रंगी रफी” 

फ्लर्टींग
———–
आताचीच गोष्ट. रात्रीचे दहा वाजले होते. ट्रेन मध्ये तुरळक गर्दी. माझ्या समोर एक  मुलगी बसली होती. पंचविशीत असेल. डोळे पुस्तकात आणि चेहेऱ्यावर हलकसं हसू . आधी वाटले, विनोदी काहीतरी वाचत असेल पण तसे नव्हते तसे. समोरच्या बाकड्यावर, तिच्यापासून तीन एक फुटावर एक होता. नजर तिच्यावर खिळलेली.
माणूस सभ्य आणि काहीही त्रास देण्यासारखे करत नव्हताच तरीही ती नजर लक्षात येत होती. ते नेहेमीचे प्रवासी असावेत. अगदीच अनोळखी नव्हता. तिला ओळख करून घ्यायची सुद्धा नसेल पण त्याची नजर तिला सुखावत होती हे निश्चित. कदाचित ते सहज होत असावे पण तिच्या ओठावर फुललेले हसू तिला लपवता येत नव्हते.
हल्ली टेन मध्ये , अगला स्टेशन माटुंगा रोड सांगतात ते बरे नाहीतर मी  त्यांच्यापैकी आधी कोण उतरतात तिथे पोचले असते.
पुरुष कळत, अगदी न कळत सुद्धा फ्लर्ट करतात. स्त्रीला आकर्षून घेणे डीएने मध्ये असावे. अनेकवेळा ते सहज घडते.
त्यातून काही निष्पन्न होईल अशी त्याला अपेक्षाही नसते आणि जर ते सभ्यतेच्या मर्यादा पळून असेल तर ते आवडते सुद्धा.
मिशीत दडलेले हसू, डोळ्यातील खट्याळ भाव शब्दांपेक्षाही खतरनाक असतात. काहीतरी घडते आहे ही जाणीवच मनाला एक रोमहर्षक अनुभव देते. त्यात तो आकर्षक असेल तर स्वतःचा इगो ही सुखावतो.

अपनी तो हर आह एक तुफान है ( देव आनंद)
——————————————–
हिमतीची दाद द्यायला हवी. ती एकटी नाही. गाडीत अनेक लोक आहेत. त्यात या गाण्याची प्रत्येक ओळ एक वेगळाच अर्थ सांगते आहे. त्याची नजर चोरणारी ती वरच्या बर्थ वर आहे.
“उपर वाला जानकर अंजान है “
हा उपरवाला कोण? 
तिला संशय तर येतोच . शिवाय आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधल्याने ती थोडीशी गडबडते. मग त्याच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून तिला वाटते, “छे , बिचारा देवाला साद घालतो आहे.” थोडीशी सैलावते.
गाणे पुढे सरकते.

सर पे मेरे तू जो अपना हाथ ही  रख दे
फिर तो भटके राही को मिल जायेंगे रस्ते
दिल कि बस्ती बिन तेरे विरान है
उपरवाला जान कर अनजान है …आता मात्र त्या निरागस चेहेऱ्याआड़ दडलेले खट्याळ डोळे तिला काहीतरी वेगळेच सांगतात.  An ultimate mischief. Imagine flirting with the girl in front of her parents .

अनुनय
———
फ्लर्टींग निर्हेतुक असते पण एकदा का  मुलगी आवडली की तिला मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू होतो.
फ्लर्टींग म्हणजे पडला तर आंबा आला, चुकला तर दगड गेला पण जर मुलीला आकर्षित करून घेण्याचा विचार करत असाल; तर बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. मॅनर्स; स्वतःबरोबर दुसऱ्याचीही कदर करणारा माणूस नजरेत भरतो , हसणे .. हुकुमी अस्त्र आणि  खिळवून ठेवेल अशी संभाषणाची कला.
मुद्दाम दुर्लक्ष करून मुलगी पटत नाही. उलट तुमचे तिच्याच साठी असणे आवश्यक असते. थोडीशी स्तुती, छोट्याश्या भेटवस्तू, विश्वासाने सांगितलेल्या आयुष्यातील गोष्टी, तिला गृहीत न धरणे  या सर्व गोष्टी पुढचा मार्ग सुकर करतात.

मुझे देखकर आपका मुस्कुराना (जॉय मुखर्जी)
——————————————–
मात्र अगदी बुद्धिमान पुरुष सुद्धा मुलगी हसली तर ती फसली असे का समजतात हे मला कधीच समजले नाही. ती स्वतःशीच हसत असेल, तुमच्यावर हसत असेल, तुमच्या आत्मविश्वासाला पाहून हसत असेल, तुम्ही आवडला म्हणून हसत असेल(आवडणे अगदी स्वाभाविक असू शकते)अशा अनेक शक्यता असतात. स्वतःबद्दल नको तेवढा आत्मविश्वास असला की अनेक वेळा तोंडावर पडतो माणूस …असो ..
इथे जॉय मुखर्जी पडत नाही कारण तो हिंदी सिनेमातला हिरो आहे 

मुझे तुम बेगाना कह लो या के दीवाना
मगर ये दीवाना जाने दिल का फ़साना
बनावट में दिल की हक़ीक़त चुपाना
मुहब्बत नहीं है तो फिर और क्या है

उत्साह
———
ती हसली, ती फसली …या खेळात अनेक वेळा “शिकार खुद्द यहाँ , शिकार हो गया “ असे पाहायला मिळते. स्त्रिया प्रेमात पडताना बराच विचार करून पडतात. अनेकवेळा त्या लाजऱ्या असतात, त्यांच्यावर बंधने असतात, त्यांना धैर्य नसते, त्या योग्य सावज शोधत असतात…काहीही कारणे असू दे पण जे काही त्यांच्या डोक्यात असते, ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो ..(अनेक वेळा, तोंडातून बाहेर पडण्याऐवजी, ते डोक्यातूनच बाहेर जाते) पण  पुरुषाची एकदा का खात्री पटली की तो आरोळीच ठोकतो. या एका बाबतीत त्याचा मेंदू पुरातन नरासारखा चालतो.
“अरे ती कोण आहे, तिला तू नक्की आवडला आहेस का, कसा काय मी आवडू शकतो, असे काही प्रश्न पडायला हवेत खरोखर पण नाही पडत. तो मनापासून सुखावतो आणि जमेल त्या भाषेत आपला आनंद व्यक्त करतो …..कुणी याहू म्हणून तर कुणी “अफ़्फ़ू खुदा!”

हमको तुमपे प्यार आया, प्यार आया (शशी कपूर )
———————————————-
तो काश्मीर मधला एक साधासुधा नावाडी , ती बड्या घरची शहरी, आधुनिक, एकुलती एक मुलगी. 
ह्या प्रेमाचा अंतच प्रत्यक्ष जीवनात अनेक वेळा होतो. सिनेमात मात्र अनेक वळणा वळणातून जात, ही बोट कशीबशी तरते. दोन माणसे एकत्र राहताना, त्यांना तडजोड करावी लागते हे मान्यच पण तडजोडीला सुद्धा मर्यादा असतात .
प्रेमात असताना त्या दिसत नाही.

मरना-जीना, खाना-पीना, हँसना-रोना
नहाना-धोना, सोना-उठना, चलना-फिरना
आना-जाना हम दीवाने ने मुहब्बत में भुलाया
हमको तुमपे प्यार आया, प्यार आया

इथे रफीच्या आवाजात तो उत्साह, जोशिलेपण स्पष्ट ऐकू येते आणि शशी, केवळ काश्मिरी दाखवल्याने, गरीब नावाडी म्हणून शोभतो.

साशंक
———
प्रेम होते, ते व्यक्त सुद्धा होते, कदाचित त्या भावनेला सकारात्मक प्रतिसाद ही मिळतो आणि मग माणूस स्वप्नातून जागा होतो. प्रेम असे फबसारखे आभासी असेल तर पटापट लव्ह मारता येते पण प्रत्यक्ष जीवनात प्रेम व्यक्त केले की आपोआप ते निभावण्याची जबाबदारी येते. एकदा जबाबदारी आली की वास्तविकता येते आणि मग व्यावहारिकता. नंतर डोळे आंधळे न राहता, पांढरे होतात . त्या वळणावरच हे गीत आहे

मुझे दर्द दिल का पता न था (धर्मेंद्र )
————————————-
हवे तर आहे पण आत्मविश्वास नाही ..अशावेळी जे घडले त्याचा दोष दुसऱ्यावर ढकलून मोकळे व्हायचे याला काय म्हणायचे! स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसणारे, तोंडघाशी पडतात आणि ऐनवेळी दुसऱ्यालाही खड्यात घालतात.
म्हणजे अंगावर आले की दुसऱ्याकडे बोट दाखवून आपण निराळे.

यूँ ही अपने अपने सफ़र में गुम.
कहीं दूर मैं कहीं दूर तुम.
चले जा रहे थे जुदा जुदा.
मुझे आप किस लिए मिल गए.
मैं अकेले यूँ भी मज़े में था
मुझे आप किस लिये मिल गये?

“ मैं अकेले यूँ भी मज़े में था” 🙂
खरेतर हे उशिरा का होईना आलेले शहाणपण आहे पण नशिबापुढे त्या शहाणपणाचा उपयोग होत नाही हे खरे. जे जे अप्राप्य,  ते ते हवेहवेसे वाटणे हा मानवी स्वभाव आहे, मग ते खड्यात घालणारे का असेना!
There is a sort of pensiveness, as well as a sense of awe and marvel in Rafi’s voice . A lovely song and handsome Dharmendra ,

आनंदी
———
तिच्याकडून हो येतो आणि शंका कुशंकांचे जाळे फिटते.
It’s a moment of sheer happiness of saluting the love they share. आता हा आनंद पोटात सुद्धा मावणारा नाहीच. साऱ्या गावकऱ्यांपुढे आपल्या प्रेमाचा इजहार करण्याची ही सुवर्णसंधी तो कसा सोडेल !
प्रेम सच्चे असेल तर जगासमोर उघड करायला प्रेमी घाबरत नाही.  तो साऱ्या गावकऱ्यांना स्वतःच्या भावना सांगतो. जेव्हा लाजरी धन्नो आपल्या घरातून बाहेर येते , तेव्हा हा उघड इजहार पाहून लाजते , सुखावते , त्याहीपेक्षा आश्वस्त होते.
प्रेमापुढे माणूस कसा झुकतो हे पाहायचे असेल तर दिलीपला पाहावे. He is both –grateful and graceful.

नैन लड़ जईहे तो मनवा मा कसक होइबे करी (दिलीप कुमार ) 

लागा गोरी गुजरिया से नेहा हमार
होइ गवा सारा चौपट मोरा रोजगार
नैन लड़ जईहे तो मनवा मा कसक होइबे करी
प्रेम का चुटीहे पटाखा तो धमक होइबे करी

रफींना, चित्रपट सृष्टीत आणण्याचे श्रेय जाते नौशादजींना.  या दोघांची शास्त्रीय संगीतावर आधारित अशी अनेक गीते प्रसिद्ध आहेत. पण हे गाणे वेगळे आहे. ह्या गीताची भाषा भोजपुरी पण लिहिले आहे शकील बदायुनी यांनी. भाषेचा लहेजा सांभाळून.
नृत्य हा काही दिलीप कुमारचा प्रांत नाही. तो डोळ्यानेच बोलणारा माणूस. पण इथे त्यांच्या हालचालीत सुद्धा एक डौल आहे. मर्दानी नृत्य कसे करावे ह्याचा उत्तम उदाहरण.

आसक्ती
———–
राजेशने आराधनाच्या यशानंतर किशोरचा गाता गळा साथीला घेतला तरीही रूप तेरा मस्ताना या गीतापेक्षा ही उत्कट आणि sensuous गीत त्याने रफीच्या आवाजात गायले आहे.

और कुछ देर ठहर और कुछ देर न जा (राजेश खन्ना )

हा सिनेमा काळाच्या पुढे. यातील नायक सुद्धा चारित्र्य संपन्न वगैरे नाही. फिरायला आलेला असताना एका पहाडी मुलीशी त्याचे शरीर संबंध जुळतात. केवळ शरीराने मन जिंकता येते अशी भाबडी समजूत असलेला त्या मुलीला दिवस जातात. आपल्या प्रियकराच्या शोधात ती शहरात येते. त्याचा विश्वामित्र झालेला असतो. जेव्हा संबंध चोरटे ठेवण्याची गरज भासते , तेव्हा त्यांनी कारणे  कोणतेही सांगो, माणूस खोटारडा आणि कोणतीही जबाबदारी न स्विकारणारा असतो.
माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरुष पण एक फरक आहे. शक्य तो शारीरिक संबंध आले की स्त्री त्याचा उपयोग करून पुरुषाला जखडून ठेवायला पहाते  आणि पुरुषाचे इस्पित साध्य झाले असल्याने कमरेच्या वर असलेल्या हृदयाकडे त्याचे लक्ष जात नाही .

रात बाक़ी है अभी रात में रस बाक़ी है
पाके तुझको तुझे पाने की हवस बाक़ी है
और कुछ देर ठहर और कुछ देर न जा

हे शब्द उघड उघड उत्तेजक आहेत . चित्रीकरण पाहिले की लक्षात येते, जे घडायचे ते घडून गेलेले आहे. तरीही गात्रा गात्रात, श्रांत शरीरात अतृप्तता भरून उरली आहे. रात्र संपायला अवकाश तर आहेच आणि त्याचे मन भरायला सुद्धा ..
म्हणून केलेली ही मागणी ..आर्जवाच्या रसात भिजलेली . “और कुछ देर ठहर और कुछ देर न जा”
इंद्राणीचे समर्पण, ज्याच्यावर प्रेम केले त्यावर विश्वास ठेवण्याचा भाबडेपणा आणि राजेशच्या डोळ्यातील कुतूहल, पुरी न झालेली तृष्णा, थोडेसे अवघडलेपण  सगळे काही स्पष्ट दिसते. पडद्यावर आणि गीतात सुद्धा.

ओढ
———
दोन वेगळी माणसे, त्यांचे स्वतःचे वेगळे विश्व; एका अनपेक्षित वळणावर भेटतात आणि त्यांचा मार्ग ठरतो. एकमेकांच्या सोबतीने चालताना, दोघांची स्वप्ने एक होतात. हा काळच भारलेला. प्रेम नंतर होते जेव्हा स्वतःचे अस्तित्व दुसऱ्यात विरघळून जाते.आणि जेव्हा हे अस्तित्व मिटून जाते; तेव्हा एकमेकांना गृहीत धरण्याची शक्यता सुद्धा वाढते. मग प्रेम राहते पण त्यातली नवलाई संपते. जवळीक सुद्धा आटते. हे टाळण्यासाठी प्रेमात रोमान्स टिकवणे आवश्यक असते.
तो फुलांत असतो, एकच चॉकोलेट वाटून खाण्यात असतो, कधीतरी तयार कॉफी हातात देण्यात असतो, नुसता हात हातात घेऊन सूर्यास्त पाहण्यात असतो. मला तू हवी / हवा  आहेस हे डोळ्याने बोलण्यात असतो. नात्याला ते टिकवण्याची जाग द्यावी लागते ते काम प्रेमातला रोमान्स करतो .

तुमसे कहूँ इक बात…(संजीव कुमार)

रोमान्स ची हिंदी सिनेमातील व्याख्या शारीरिक आहे.  जो  कृतीने दाखवता येतो तो रोमान्स. 
तुमसे कहू एक बात हे गाणे उत्तेजक आहे . त्यातला आशय सुद्धा उघड आहे आणि त्याला साजेसे चित्रीकरण सुद्धा. जे घडत आहे ते नैसर्गिक आणि त्यामुळे असेल. हे शब्द सुद्धा इरॉटिक .
खरेतर सेक्सचे चित्रीकरण हिंदी पडद्याला नवीन. मी १९७० ची गोष्ट करतेय.
दोन शरीरे जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा त्यात एका व्यक्तीच्या तोंडी गीत आले तर विचित्र वाटेल पण इथे वाटत नाही.
रफीचा आवाज seductive आहे.. गाणे अत्यंत संथ. वाद्ये गरजेपुरती.
महत्वाचं आहे ते आवाजातले मार्दव, ओढ आणि लालसा.
Rafi’s sensuous whispering tone sets the mood.
कुजबुजणाऱ्या आवाजात गाण्याची लय सांभाळणे; विलक्षण कठीण आहे हे .

है भीगा सा जिस्म तुम्हारा इन हाथों में
बाहर नींद भरा पंछी भीगी शाखों में
और बरखा की बूंद बदन से ढलकी-ढलकी
तुमसे कहूँ इक बात…

दस्तक या सिनेमासाठी मदन मोहन याना नॅशनल अवॉर्ड मिळाले.  यात शेवटी जलतरंग चा वापर केला आहे आणि त्यावर होणाऱ्या अंधारातला हालचाली. तेव्हढ्याच हळुवार आणि त्यावरून वाहत येणारा रफीचा स्वर. 
त्यात ओढ आहे , आतुरता आहे आणि देण्याघेण्यातले समर्पण सुद्धा
A  pure liquid romance … 

ह्या फक्त गुलाबी छटा. आयुष्य करडे असते. ते परत कधीतरी.





20 thoughts on “अनेक रंगी रफी.”

  1. Song from हीर रांझा
    मेरी दुनिया में तुम आये क्या क्या मेरे साथ लिये ….
    दस्तक मधील गाण्याबरोबर आठवण आली.

  2. LOVELY POST ASKING TO GO FOR EVERY SONG MENTIONED.
    WILL DO THAT.
    OH…RAFI SAAB…

    MEANWHILE LET ME LABEL THIS WONDERFUL JOURNEY OF A TALENTED AUTHOR WITH HER INCREASING FAN-BASE AS-

    “pink story.”

  3. अप्रतिम लिखाण प्रियाताई!
    सगळ्याच गाण्यांच्या भावछटा सुरेख लिहिल्यात…. लता – रफी दैवतं आहेत!
    दस्तकचं गाणं माझ्या ओळखीचं नाहीय! आता ऐकेन…
    खूप छान आणि खूप आभार, ह्या लेखासाठी.

    1. Thank you Harshada . फार वेगळे गाणे आहे
      संथ ,,वाद्ये नाहीतच आणि बोलल्या सारखे
      संवादाचे गीत

  4. Shraddha Kandalgaonkar

    प्रिया,
    मेजवानी असते तुझा लेख म्हणजे..एक एक गायक आणि गायिकांची गाणी घेतली तर आयुष्य संपेल पण गाणी संपणार नाही..
    ए फुलोकी रानी बहरोंकी मालिका

    1. Thank you so much Shraddha,
      ऐ फुलोंकी छानच आहे … ती एक वेगळी पोस्ट होईल …स्तुती करणारी गाणी

  5. नेहमप्रमाणेच खूप सुंदर…लेख
    रफिजींच्या आवडत्या गाण्याची निवड करणे खरच कठीण काम आहे …

  6. वा. खूप वेगळी गाणी घेतलीयस. आणि प्रत्येक गाण्याचं समग्र विश्लेषण. क्या बात 👌👌👌💐💐❤️❤️

Leave a Reply to PRADEEP RASSE Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *