Skip to content

दीपावली मनाई सुहानी.

” आत्या, प्रियाला उठवा पाहू . फटाका फोडायचा आहे आम्हाला.”
तीन वाजले होते तेव्हा पहाटेचे. खरेतर रात्री महेश झोपला नसणारच. कंदील बनवायला सगळी टोळी एकत्र असायची पण तरीही पहाटे तीनला उठून फटाका उडवणे मस्ट. तळ मजला आणि आमचा पहिला मजला यात पहिला फटाका कोण उडवणार याची स्पर्धा असायची आणि आम्ही नेहेमीच जिंकायचो … श्रेय महेशलाच . 🙂
अम्मा खरेतर झोपत नसावीच. फराळ होता होता रात्र व्हायची. रात्री दोन अडीच वाजताच ती बंबात कोळसे पेटवायची .तांबूस रंग अजूनच झळझळायचा. अख्या न्हाणीघरात एक मंद सुगंध भरून राहायचा. उटणे, मोती साबण आणि कोळशाचा गंध न्हालेले गरम पाणी. झोप सुद्धा गेली नसायची . यातच अम्माचे केस धुणे, अगदी खसखसून.  तोंडातून ब्र काढायची शामत नव्हती पण नंतर शरीराबरोबर मन सुद्धा पिसासारखे हलके व्हायचे. शेगडीत पेटलेल्या कोळशावर ती थोडा धूप टाकायची आणि त्यावर माझे केस सुकवायची. छान कमरेपर्यंत असलेले केस तिच्याच अभिमानाचा विषय .
साधारण पाच वाजता तळमजल्यावरून भूपाळीचे सूर येत. रेकॉर्ड प्लेअर त्यांच्याच कडे होता आणि घनश्याम सुंदरा पासून उठी उठी गोपाला पर्यंत सुरेल गाण्याची मैफिल रंगे. …
दिवाळीची पहाट तेव्हा अशी सुगंधी आणि सुरेल असायची. नंतर नवीन कपडे घालून देवदर्शन.
आमच्याकडे या दिवशी पाच प्रकारचे पोहे बनायचे. गुळाचे, बटाटा पोहे, दुधातील पोहे, दह्यातील फोडणीचे पोहे आणि तुपात परतवून वरती साखर टाकून केलेले कुरकुरीत पोहे. नंतर ओवाळणी व्हायची ती घरातील सर्व बायकांसाठी असायची. अगदी काम करणाऱ्या बायका सुद्धा त्याला अपवाद नसत.  मी त्याला बोनस म्हणायचे.
ही आमची खरी दिवाळी. नंतर पाडवा  आणि भाऊबीजेला याची केवळ पुनरावृत्ती. 

सणांमागील गोष्टी आणि परंपरा याही पेक्षा निदान लहानपणी, या  सणांची मजा वर्षातून एकदा मिळणाऱ्या नवीन कपड्यांसाठी, सुट्टीसाठी आणि त्या त्या सणाला बनवल्या जाणाऱ्या पक्वान्नांचा आस्वाद घेण्यासाठी यायची.
हिंदी सिनेमात सुरुवातीच्या काळात तरी दिवाळीच्या या रूपाचे वर्णन करणारी असंख्य गाणी आहेत. दिवाळीचे फटाके, रांगोळ्या, नवीन कपडे आणि फराळ या सर्व गोष्टी सर्वांना आवडतात. यात सर्व भाग घेऊ शकतात. या सणाच्या मागे कथा असतील, सणाला केली जाणारी पूजा असेल पण त्याचे विधी सुद्धा सर्वांना सामावून घेणारे असतात. आस्तिकच कशाला नास्तिक लोक सुद्धा हे चार दिवस मजेत घालवतात.

दिवाळीच्या या रूपाचे वर्णन नजराणा या सिनेमातील “मेले हैं चिरागों के रंगीन दिवाली है” या गीतात आले आहे.
(सिनेमा-नजराणा, संगीतकार-रवी, गीतकार – राजेंद्र कृष्ण, गायिका- लता मंगेशकर, कलाकार वैजयंती माला)

१९६१ मध्ये प्रदर्शित झालेला नजराणा हा सिनेमा दक्षिणी थाटाचा मेलोड्रामा होता. तगडी स्टारकास्ट आणि उत्तम संगीत यामुळे हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
नायक नायिकेचे प्रेम पण आपल्या बहिणीचे सुद्धा आपल्या प्रियकरावर प्रेम आहे हे समजल्यावर नायिकेने केलेला त्याग अशी कथा. यात राज कपूर आणि वैजयंतीमाला  यांच्या मुख्य भूमिका तर उषा किरण हिची फार महत्वपूर्ण भूमिका होती.
या गीतात राज आणि उषा किरण यांचे लग्न झालेले आहे. त्यांना एक गोड़ मुलगा आहे. आणि वैजयंतीमाला त्याच्याबरोबर दिवाळी साजरी करत आहे. 

खा जाये नज़र धोख़ा, जुगनू हैं या फुलझड़ीयाँ
बारात है तारों की या रंगभरी लड़ीयाँ
होंठों पे तराने हैं, बजती हुई ताली है

गेले काही वर्ष शिवाजी पार्कवर मनसे तर्फे रोषणाई केली जात आहे. मैदानाच्या चारही बाजू उजळून निघाल्या आहेत. जिथे लक्ष जाईल तिथे डोळे दिपवणारा झगमगाट. आकाशातील तारे सुद्धा हेवा करतील असा हा नजारा आहे. आता पैशाचे हिशोब बदलले आहेत. कुणीही काही म्हणो, बाजारपेठा फुलल्या आहेत, शहरातल्या उंच इमारती असो किंवा धारावीतील झोपडपट्टी , सर्वच रस्त्यांवर खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे. सोन्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याच्या बातम्या पेपरात येत आहेत. जसे लोकं , तशाच राजकीय पार्ट्या. त्यांचाही खर्च तेवढ्याच तोलामोलाचा आहे.
मला आठवते , माझ्या लहानपणी सुद्धा शिवाजीपार्कवर एक दिवस फटाक्यांसाठी राखीव असे. जवळपासच्या भागातील सर्व स्तरातील लोक फटाके उडवायला येत. त्यात हजारांच्या माळा लावणारे असायचे  आणि लवंगी माळेतील  एक एक फटाका सुटा  करून ते वाजवणारी लहान मुलं सुद्धा खूप असायची. आनंद दोन्ही कडे होता मात्र  नव्हती ती ईर्ष्या.
नव्वद च्या आधी एवढे पैसे होतेच कुठे लोकांकडे. पगार महिन्याअखेर संपून जायचा. दिवाळी साठी पैसे बाजूला ठेवले जात आणि त्यातून हौशी पुरवल्या जात. अर्थात काही लोकांकडे मात्र दिवाळी नाही तर दिवाळं आयुष्यभर वस्तीला असायचे. हे गाणे अशा कमनशिबी लोकांचे गीत आहे. 
दारिद्र्य हा नशिबाचा भाग असतो, कधी आर्थिक नियोजनाचा अभाव असतो तर कधी सत्तेपुढे शहाणपण नसते.
सामान्य लोकांच्या वाट्याला आलेले दैव खुपू नये म्हणून जॉनी वॉकरच्या तोंडी दिले आहे. उपहासाचा वापर करून सत्य पचवणे थोडे सोपे जाते ते असे.

कैसे दिवाली मनाई हम लाला
(सिनेमा -पैगाम, संगीतकार -सी रामचंद्र, गीतकार- कवी प्रदीप, आवाज -मोहम्मद रफी, कलाकार-जॉनी वॉकर)
तो काळच जॉनी वॊकर च्या लोकप्रियतेचा होता. दिलीपकुमार, राज कुमार, वैजयंती माला यांच्यासारखी स्टार कास्ट असूनही त्याच्यावर चित्रित करणारे गाणे घालणे हे बॉक्स ऑफिसचे गणित होते.

हम तो खिचड़ी ही खाते रहे
अरे हलवा लफज उड़ाते रहे
हम मुफ्त में झाड़ू लगाते रहे
गंगा में
अरे गागा में गधे नहाते रहे
डाटा तेरी अक्ल को
डाटा तेरी अक्ल को है काय झाला
अपना तो बारह महीने दिवाला

सामान्य माणसाचे बाराही महिने दिवाळे वाजलेले असते. त्याच्या नशिबी साधी खिचडी येणे मुश्किल तर त्याच्याच कष्टावर श्रीमंत लोक पक्वान्ने झोडतात. बाकी कितीही पापे केली तर गंगा किनारी जाऊन पापे फेडण्याचा मार्ग त्यांना मोकळा आहेच. गरिबांची तर तिथेही डाळ शिजत नाही. दिवाळीचा एक वेगळाच अर्थ ह्या गीतात आहे.
उत्तर भारतातील दिवाळीची रोषणाई ची तुलना इथे करता येणार नाही. त्यांचा तो मुख्य सण. राम परत आला म्हणून अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली. ती परंपरा आणि तो जल्लोष आजही इथे अगदी खेड्या खेड्यात सुद्धा आहे. शहराचा तर दिमाखच वेगळा.
माझ्या मामाची बदली दिल्लीला झाली असताना एक दिवाळी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर घालवायची संधी मिळाली होती. आर के पुरम या भागात सरकारी ऑफिसर्सच्या क्वार्टर्स होत्या. संध्याकाळी सर्वांच्या बाल्कनीत कठडा भरून पणत्या. मुंबईत एक तर आमच्या घराला बाल्कनी नव्हतीच आणि असती तरी घरभर पणत्या लावायला आम्माने दिल्या नसत्याच . माझ्यासाठी ती अपूर्वाईचं.
इथे घराघरात, खोलींत पणत्या. सर्व इमारती सोनेरी दिसत होत्या. यांच्या जवळच एका इमारतीचे बांधकाम चालू होते.
तिथली मजुरांची मुले पणत्यांकडे पाहून नाचत होती. कोणते तरी गाणे गात होती.
मामेभाऊ तेव्हा कॉलेजला असावा. पणत्या दिल्या तरी त्यांच्याकडे काही तेल नसणार याची कल्पना होती. लाईट गेले तर हाताशी असावे म्हणून घरी मेणबत्यांची पाकिटे आणलेली होती. माझा हात धरून तो खाली उतरला आणि माझ्या हातातून त्यांनी त्या मेणबत्या मुलांना दिल्या . हॅपी दिवाली म्हणतानाचा त्याचा हसरा चेहेरा आणि घाबरत घाबरत मेणबत्या हातात घेणारी ती मुलं मला अजून आठवतात. “घर घर खुशियों के दीप जले” ह्या ओळीत जो अर्थ आहे तो त्याच्या छोट्याश्या कृतीने समजला.
आता दिव्यांच्या माळा ने शहर सजते पण “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया” जशी पणत्यात साजिरी दिसते ती सर दिव्यानं येत नाही. तो भपका वाटतो.
खजांची सिनेमात आशा भोसले यांच्या आवाजात हे फार सुंदर गीत आहे. आणि त्याहीपेक्षा त्याचे चित्रण आहे.
मोठा वाडा आणि जिथे नजर जाईल तिथे पणत्याच पणत्या.

आयी  दिवाली आयी, कैसे उजाले लायी
सिनेमा खजांची, संगीतकार- मदन मोहन, गीतकार- राजेंद्र कृष्ण, आवाज- आशा भोसले)

व्हाट्सऍप आणि मोबाईल वजा काळ होता तो. संपर्क साधने तसे कठीण होते. पोस्टमन हा दुवा होता. दिवाळीच्या आधी जी पत्रे जायची त्यात एक प्रश्न हमखास असायचा. “ अरे दिवाळीला कधी पोचतो आहेस?”
केलेला फराळ मुलाला मिळावा म्हणून आईची घालमेल व्हायची. भाऊबीजेच्या भेटीची एक बहीण उत्सुकतेने वाट पाहायची.  जरी बोलत नसले तरी कर्त्या मुलाच्या मदतीच्या हाताची थकलेल्या वडिलांना अपेक्षा असायची.
काय आणू या प्रश्नाला मात्र एकच उत्तर असायचे “ लवकर ये”
कुठेही असलो तरी हा सण असा आहे की मन घरी ओढ घेते. 
चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले होते. आताही करिअर म्हणा, शिक्षण किंवा नोकरी माणसे घरापासून दूर जातात. तसा स्विकारलेला वनवासच असतो तो.
दुसऱ्या शहरात घरे बनवली जातात, मित्र मैत्रिणी नातलगांची जागा घेतात. पण दिवाळी फक्त सण नसतो. Diwali brings nostalgia. आठवणींचा कोलाज असतो तो. फराळ, फटाके, ओवाळणी , बांधलेले किल्ले, सकाळचे अभ्यंगस्नान ह्या साऱ्या आठवणी एकट्याच्या नसतात. त्यात अनेक माणसांचा हात असतो म्हणून तर त्या आठवत असतात.
दिवाळीला माणसे या आठवणी जागवण्यासाठी घरी येतात. आपले बालपण शोधण्यासाठी, परत लहान होण्यासाठी घरी येतात.

“कभी ख़ुशी कभी गम” हा सिनेमा लार्जर दॅन लाईफ असेलही पण ह्यातल्या दिवाळीचा हा सीन मला खूप आवडतो. रायचंद कुटुंबाच्या दिवाळीत काय नाही! मोठ्या हवेल्या, रोषणाई, सजलेले स्त्री पुरुष, हातात न मावणारे लाडू  आणि दिवाळीला ओवाळणीच्या वेळी मुहूर्ताला पोचलेल्या मुलाला पाहून आईच्या चेहेऱ्यावर उमटलेले वात्सल्य, वडिलांच्या चेहेर्यावरील अभिमान, भावाच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि प्रेयसीच्या गालावरील लज्जा .
दिव्याची ही दिवाळी आपल्या जवळच्या लोकांना पाहून अजून लखलखून येते.

कभी ख़ुशी, कभी ग़म
( सिनेमा- कभी ख़ुशी कभी गम, संगीतकार-जतीन-ललित, गीतकार समीर, आवाज -लता मंगेशकर)
आमच्याकडे कंदील म्हणून आई चांदणी आणायची. बाजारात जाऊन, नवीन डिझाईन, रंग अगदी पारखून आणायची. एकदा सगळ्यांचे पाहून काड्यांचा सुंदर आकाश कंदील आणला . रंगीत आणि मोठ्या झिरमिळ्या. तो लागेल म्हणून अगदी आतुरतेने बाबांची वाट पाहत होतो आम्ही बाल्कनीत पण बाबा यायच्या आधीच  मामे भाऊ गेल्याची बातमी आली. तो कंदील आम्ही लावलाच नाही आणि आईने परत म्हणून काड्यांचा आकाश कंदील कधी आणला नाही.
दिवाळीत माणसांनी घेऊन जाऊ नकोस  असे यमधर्माला सांगायला हवे. हा सण आनंदाचा, उत्साहाचा. हा सण त्या आठवणीं जपण्याचा. माणसे येतात, जातात , जागा रिकामी झाली तरी निदान आठवणी उबदार असाव्यात.
आज भारतातील प्रत्येक घर दिव्यानी सजलेले आहे. प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर दिवाळी साजरी करत असताना भारतीय जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांना सुट्टी मिळेलच असे सांगता येत नाही. खरेतर त्यांच्यासाठी सुट्टी, सण या शब्दांना सुद्धा तुम्हाला माहित असलेला अर्थ नाही. कोणत्याही हवामानात, कसलीही तक्रार न करता ते आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून आपली दिवाळी इथे साजरी होत आहे. हा केवळ त्यांचाच त्याग नाही तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
सैनिकांची दिवाळी कशी असते याची सुरक्षित वातावरणात बसून कल्पना येत नाही. सीमेचे रक्षक, कधीही गोळीचे भक्ष्य होऊ शकतात.
माझ्या आजूबाजूला कुणी सैन्यात नव्हते. सगळेच सुरक्षित पेशात. पैशाची कमतरता असेल नसेल , आयुष्य बळकट. सुरक्षित बालपण गेले माझे. नववीत असताना , एका स्पर्धेत , १९७१ चे अभिमन्यू हे पुस्तक मिळाले. त्यात मुंबई शहरातील, सैन्यात असलेल्या आणि ७१ च्या युद्धात प्राणांचे बलिदान केलेल्या मराठी वीरांची नावे होती. प्रदीप आपटे, मकरंद घाणेकर , दिलीप गुप्ते अशी काही नावे आठवतात. ते ज्या भागात वाढले ते भाग परिचयाचे.
घरातील कुणीतरी जवळचे गेलं ही भावना तेव्हा पहिल्यांदा झाली.

बालक तरसे फुलझड़ियों को,
दीपों को दीवारें, दीपों को दीवारें
माँ की गोदी सूनी सूनी, 
आँगन कैसे संवारे आँगन कैसे संवारे
राह में उनकी जाओ उजालों
बन में जिनकी शाम ढले
आई अब की साल दिवाली
मुंह पर अपने खून मले
हकीकत चे गीत एक वेगळीच दिवाळी दाखवते.
सारे शहर प्रकाशात न्हाऊन निघत असताना, कोणत्यातरी कारणांनी घरात अंधार असतो तेव्हा दिव्याचे महत्व जाणवते.
निदान या अंधाराचे अस्तित्व थोडे दिवसच आहे नंतर घर परत उजळून निघणार आहे ही वस्तुस्थिती  पोळलेल्या मनावर फुंकर घालते पण ज्यांच्याकडे दिवे लावायचीच परिस्थिती नाही त्यांचे दुःख फार मोठे आहे याची जाणीव होणे हा दिवाळीचा उद्देश आहे. सुख दुःखाच्या रहाट गाडग्यात अडकलेल्यासामान्यातील  सामान्य माणसाला सुद्धा काही आनंदाचे क्षण वाट्याला यावे हाच तर सण असण्याचा उद्देश. स्नेहाच्या ज्योतीने माणसामाणसांतील बंध  बळकट होतात ..
गरज असते थोडासा मदतीचा हात पुढे करण्याची.
पणतीने पणती लावावी आणि सारे जग उजळून टाकावे हा संदेश देणारे फार सुंदर गीत शिर्डी के साईबाबा या सिनेमात आहे.
दीपावली मनाई सुहानी
( सिनेमा शिर्डी के साईबाबा, संगीतकार -पांडुरंग दीक्षित, आवाज -आशा भोसले)

गरीब अस्पृश्य मुलीला दिव्यासाठी कुणीही तेल देत नाही. सारे गाव दिवाळी साजरी करत असताना ही मुलगी, रडत, साई बाबांकडे येते आणि तेलावर नाही तर पाण्यांवर दिवे लावून बाबा तिची इच्छा पुरी करतात. गांवाबाहेरची मठी शत दिव्यांनी उजळून येते अशी या गाण्याची पार्श्वभूमी आहे.
अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणे हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. दिव्यांचा हा सण तर ऊर्जा आणि चैतन्य रुजवणारा. नैराश्य आणि विफलतेतुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा. ज्ञानेश्वरांचे हे शब्द किती प्रेरक आहेत!

“सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची
तैसी श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी……

तुम्हां सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा . 

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

12 thoughts on “दीपावली मनाई सुहानी.”

  1. क्या कहने, भई वाह👌👌
    दिवाली मानो और रौशन हो गयी!
    काय सुरेख गुंफलाय लेख. आठवणींचा पिंगा सोबत नव्या जुन्या गोष्टींचा मेळ, आजचे संदर्भ… सगळा लेख म्हणजे दिवाळीची मेजवानी!!
    दीपावलीच्या खूऽऽऽऽऽऽप खूऽऽऽऽऽऽप शुभेच्छा प्रियादी 👌👌🪔🪔🪔

  2. True spirit of Deepavli is captured on screen! दीपावली हा आशा, उत्साह, चैतन्य आणि प्रकाश यांचा उत्सव आहे तसाच तो मानवी भावभावनांचा, सुखदु:खांचाही उत्कट अभिव्यक्तीकाळ असतो. ‘दिवाली आयी रे आयी घर घर दीपक जले, माँझी आ जा रे माँझी आ जा’ या ‘लीडर’ मधल्या उत्कट गीतापासून ‘लाखो तारे आसमान में एक मगर ढ़ुँढ़े ना मिला, देखके दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला’ या विषादपूर्ण गीतापर्यंत मोठा रेंज आहे. It is enriching! That is all about spirit of Diwali!

    Happy Diwali!!

    1. मेले हैं चिरागो़ं के रंगीन दिवाली है
      हमहका हुवा गुलशन है हँसता हुवा माली है

      हे नितांत सुंदर गीत आठवलं..

  3. अप्रतिम लिहीलंय
    किती सुंदर शब्दात गुंफत गेलाय लेख .दीपावली सचमे सुहानी हुई🌹💐🎈🎈🎈🎈🙌🙌

  4. अप्रतिम लेख! तुझ्या अम्माला इथूनच साष्टांग नमस्कार

  5. दिवाळी आठवणींचा कोलाज..
    अगदी खरंय….
    अम्माला प्रणाम….

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *