गावाला जात होतो. रस्ता तसा निर्जन होता. दिवसाची सत्ता संपायला सुरुवात झाली. .उन्हातील ठसठशीत आणि नेमक्या आकृत्यांची जागा आता सावल्यांनी घ्यायला सुरुवात केली. सगळे जग हळूहळू शांत होऊ लागले. झाडे, दूरवरचे पर्वत,शेते आणि सावल्या सुद्धा.
अचानक एका वळणावर आम्ही थबकलो. समोरच्या गर्द झाडीतून, अंधाराला छेद देणारे दुधाळ चंद्रबिंब उदयाला येत होते. त्याच्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात सारा आसमंतच न्हाहून निघाला. रात्रीच्या पहिल्या प्रहारातला तो मधुर पिवळा चंद्र पाहून मन अगदी.हरखून गेले .
जगाकडे विरक्त मनाने बघणारे मर्ढेकर सुद्धा म्हणतात, “सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें , राहिलें काय अता मागणे!’
चंद्राचे सौन्दर्य कुणालाही हार मानायला लावतेच.
चंद्राबरोबर देखणेपण जोडले गेले असले तरी त्याची मूर्ती फारशी प्रचलित नाही.त्याची खूप शिल्पे सुद्धा कुणी कोरली नाहीत. त्याची गरजही भासत नाही. चवथीची चंद्रकोर असो किंवा मृदू मोतिया रंगाचा घवघवीत गोल, कोणत्याही रूपात तो मनाचा स्वामी आहे.
चंद्र आहे भावनांचे प्रतीक, मनाच्या सौन्दर्याचे प्रतीक. तो माती, दगड धोंड्यानी बनलेला एक उपग्रह आहे हे ही आपल्याला माहित आहे आता, तरीही तो आपल्या भावविश्वाचा भाग बनून राहिला आहे.
रामाने केलेला चंद्राचा हट्ट, महादेवाने भाळावर मिरवलेला चंद्र अशा अनेक गोष्टीतून लहानपणातच त्याची ओळख होते. अंगाईगीतांतील चंद्राबरोबरच गाई गाई करत आपण मोठे होतो. चंदा राजा ये म्हणून कधी त्याला विनवतो तर कधी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी ?म्हणून काळजीने चौकशीही करतो . दशम ग्रहात हा एकच ग्रह आहे की ज्याची साथ जन्मापासून आहे आणि अंगाईगीतांच्या सुरांनी ती सुरेल झाली आहे.
१) चंदा रे, चंदा रे,
( चित्रपट-लाजवंती, संगीतकार -एस डी बर्मन, गीतकार – मजरुह सुलतानपुरी, गायिका -आशा भोसले, कलाकार -नर्गिस)
चंदा रे, चंदा रे, छुपे रहना
सोये मेरी मैना, लेके मेरी निंदिया रे
अंगाईगीताचे शब्द समजण्याएवढे बाळाचे वय नसते. तरीही तरीही त्यातील प्रेम , लळा , वात्सल्य , देऊ केलेले संरक्षण आणि नात्यातील बांधिलकी मात्र त्या लहानग्या जीवाला निश्चित समजते . एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि त्याहीपेक्षा विश्वासाचा संवाद साधण्याचे कौशल्य या गीतामध्ये असते.
असे म्हणतात , की आपल्या बाळाला कुशीत घेऊन गीत गायल्याने शरीरातून आनंदाचे हार्मोन्स स्त्रवू लागतात. आईच्या मनावरील ताण तर हलका होतोच पण बाळाला सुद्धा आश्वस्त वाटते .
जगातल्या पहिल्या बाळाला छातीला धरून किंवा पायावर टाकून जोजवताना शब्दाची गरज भासलीही नसेल . तिचा हळुवार स्वरच त्याला सुंदर स्वप्नाच्या जगात घेऊन जात असेल.
आईच्या कुशीतील बाळ गाढ झोपले आहे. तिच्यावर आपला भर टाकून , तरीही चंद्राच्या प्रकाशाने त्याची झोपमोड होईल या भीतीने आई त्याला विनविते, अरे आता ढगांच्या आड तू लपून बस बघू. माझ्या डोळ्यातली झोप घेऊन माझी राजकुमारी झोपली आहे.
आता रात्रीच्या प्रहरात आईला चंद्राचा अडथळा झाला असेल खरे पण चंद्राला खरेतर बाळाच्या छोट्याश्या विश्वात महत्वाचे स्थान आहे. तो त्याचा मामा आहे. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो, तिचे संरक्षण करतो म्हणून तिचा भाऊ असे म्हंटले जाते. पृथ्वी आपली माता तर चंद्र मामाच झाला की नाही!
चंद्र मामाच का, काका का नाही याचे उत्तर बाळाच्या लहानपणात दडलेले असावे. तेव्हा काही माहेरी सतत जाणे शक्य नव्हते. वर्षाकाठी काहीच दिवस मुली माहेरी जात असत. कौतुकाने, प्रेमाने त्यांचे लाड पुरवले जात. अशावेळी कौतुक करण्याची जबाबदारी मामा आपल्या खांद्यावर घेई. अपूर्वाईची बहीण आणि भाचरे.
कधीकाळी भेटणारा आणि लाड करणारा जवळचा आणि आवडता नातलग म्हणजे मामा. म्हणूनही चंद्राला मामाची उपमा दिली असावी. भाऊ नसलेली मुलगी चंद्राला ओवाळून आपली इच्छा पुरी करते म्हणूनही असेल तो लहान मुलांचा मामा आहे.त्यांच्यासाठी खाऊ, खेळणी,पुस्तके आणणारा देवदूतच.
२)चंदा ओ चंदा , चंदा ओ चंदा
(सिनेमा -लाखो में एक, संगीतकार -आर डी बर्मन, गीतकार- आनंद बक्षी, गायक -किशोरकुमार, कलाकार -मेहमूद)
सिनेमाचा नायक अनाथ आहे. गरीब आहे. त्याचा फायदा घेणारे त्याच्या भोवतीचे जग आहे. तक्रार कुणाकडे करणार आणि कोण ऐकणार. अशावेळी मनातले दुःख सांगायला दूरच्या आकाशातला , जवळचा चंद्र आहे.
रडणाऱ्या मुलाला चांदोबा दाखवून त्याला हसवतानाच , तो स्वतःलाही समजावतो,
सपनो में खोई , दुनिया है सोई
‘तेरी और मेरी खबर पूछे न कोई
आजा करी बातें, मुलाकातें, बीती रातें
चंदा ओ चंदा
बालपण सरते आणि मामा असणारा चंद्र तारुण्यात मैत्रीचा हात पुढे करतो.
अनेकांसाठी तो खुशाली सांगणारा प्रेमदूत बनतो. निसर्ग निर्मित दूतांमध्ये निदान तरुणींचा सर्वात लाडका दूत आहे तो “चंद्र”
३)ओ चाँद जहाँ वो जाएँ
(सिनेमा -शारदा, संगीतकार-सी.रामचंद्र, गीतकार-राजेंद्र कृष्ण, गायिका- लता मंगेशकर, आशा भोंसले, कलाकार-मीना कुमारी, शामा)
“शारदा” सिनेमातील नायक परदेशाला गेला आहे. तेव्हा तर सोशल मीडिया नव्हती, घराघरात टेलीफोनही नव्हते. पोस्टमनवर विश्वास नसल्याने इथे नायिका, अहं, एक नाही तर दोन नायिका चंद्राला विनंती करून, आपल्या प्रियकराची खबरबात विचारत आहेत, आपला निरोपही त्याच्याबरोबर पाठवत आहेत.
ओ चाँद जहाँ वो जाएँ, तू भी साथ चले जाना
कैसे है, कहाँ है वो, हर रात खबर लाना
ही तर जासूसी झाली पण प्रत्येकीचं कारण वेगळे आहे.शारदा हे आश्रमात राहणारी गरीब मुलगी. प्रेमाची ओळख होऊन हरखलेली, तरीही तिच्या भावना मात्र संयमित. त्याच्या आठवणीने ती व्याकुळ झाली असली तरी,स्वतः पेक्षा तिला आपल्या प्रियकराची काळजी आहे. तिचा निरोप प्रियकराला नाही तर चंद्राला आहे. तो परदेशी गेला आहे, त्याचा हा पहिलाच प्रवास आहे तर त्याला मदत कर एवढेच तिचे मागणे आहे.
वो राह अगर भूलें, तू राह दिखा देना
परदेस में राही को मंज़िल का पता देना
है पहला सफर उनका और देस है अंजाना
हर रात खबर लाना…
दुसरी प्रेयसी चंचल, ही नावाप्रमाणेच अवखळ, श्रीमंत कुटुंबातील मुलगी. तिला त्याची आठवण येते आहे कारण तिला तो आपल्या जवळ हवा आहे.
कहना मेरे होंठो पर, रूकती हुई आहें हैं
या रास्ता उनका है, या मेरी निगाहें हैं
बेताब मोहब्बत का, बेताब है अफसाना
ओ चाँद जहाँ वो…
किती फरक आहे या विनवणीत.
रात्र, चंद्र आणि प्रियकर, साहित्यात या तीन शब्दांना एकमेकांच्या साथीने गुंफले आहे. फक्त भारतीय साहित्यातच नाही तर पाश्चिमात्य साहित्यात सुद्धा चंद्र हा प्रेमाचा साक्षीदार आहे. शेक्सपिअरच्या मिडसमर नाईट्स ड्रीम या नाटकात तर चंद्राच्या कलांचा संबंध प्रेमाचा उदय आणि अस्ताशी जोडलेला आहे.
चंद्र देवता लुना आणि डायना या एकनिष्ठता आणि प्रजनन क्षमता शी संबंधित देवता आहेत आणि लग्न यशस्वी होण्यासाठी या दोन गुणांची आवश्यकता आहेच. या सर्व कारणांमुळे असेल, चंद्राला उद्देशून जेवढी म्हणून गाणी आहेत त्याचा मूलभूत पाया हा प्रेम आहे.
४)फिर वही चांद, वही हम, वही तनहाई है
(सिनेमा -बारिश, संगीतकार–सी रामचंद्र, गीतकार-,राजेंद्र कृष्ण, गायक-लता मंगेशकर,सी रामचंद्र, कलाकार-नूतन–देवानंद)
उजेड असतो तेव्हा आजूबाजूच्या कोलाहलाची सोबत असते. सूर्यास्तानंतर जग काळोखाच्या स्वाधीन होते. ओळखीच्या आश्वासक खुणा हरवू लागतात आणि मन उदास होते. वातावरणातील निरव शांतता जीवघेणी. रात्रीचा मिट्ट काळा रंग नायकाच्या मनातही उतरत असताना, ती येते
काळया पटलावर रेखलेल्या सफेद रांगोळीसारखीच. आतापर्यंत ढगाआड दडलेला पूर्ण चंद्र, या धरतीवरील चांदणीला पाहायला हळूच बाहेर येतो. प्रेमाची शपथ घ्यायला याहून चांगला मुहूर्त कोणता असणार!
फिर वही चांद वही हम वही तनहाई है
आज फिर दिल ने मोहब्बत की क़सम खाई है
लताबाईंचा आवाज वातावरणात हळूहळू पसरत असतानाच, दीड अंतरा झाल्यावर सी रामचंद्र यांचा आवाज त्या आवाजात मिसळतो. दुधात मिसळलेल्या साखरेप्रमाणे विरघळतो. भीतीच्या वावटळीचे, अनिश्चिततेचे, आनंद लहरीत परिवर्तन होते.
दूर दुनिया से कही भीगी हुई रातो मे..
दो मोहब्बत भरे दिल गुम है हसी बातो मे..
दिल मे जो बात है आंखो मे चली आई है
तिचा सुरच आश्वासक. मायेच्या कुशीत घेणारा. धीर देणारा. देव जेव्हा तिच्या स्वरात आपला सूर मिसळतो, तेव्हा लक्षात येते की तिच्या सुरातली शक्ती त्याला धीर देते आहे. त्याच्या मनातील शंका कुशंका निपटून टाकत आहे.
चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वाने जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो.
५)बदली में छुपे चाँद ने कुछ मुझसे कहा है
(सिनेमा शतरंज, संगीतकार–सी रामचंद्र, गीतकार-राजिंदर कृष्ण, गायक -लता मंगेशकर–हेमंत कुमार
कलाकार-मीनाकुमारी, अशोक कुमार )
सी रामचंद्र यांनी १९५० च्या दशकात लता बाईंना जी गाणी दिली ती त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात रोमँटिक, मधुर गाणी आहेत. शतरंज हा थ्रिलर होता. श्रीमंत खाणमालकाची मुलगी, मीना हिचे प्रेम बसते ते घरात नोकरीला ठेवलेल्या ड्रायव्हर वर. हा ड्रायव्हर फार वेगळा आहे. त्याचे वागणे, बोलणे मापात. अतिशय सभ्य. थोडासा अबोल आणि ड्रायव्हरला न शोभणारे त्याचे व्यक्तिमत्व …
Sauve, handsome, intelligent gentleman .. He fascinates her.
दोन वेगळया स्तरातील माणसे आणि त्यांना एकत्र आणणारी चांदणी रात्र. पोटातले ओठावर येणे सोपे नाही. त्याच्यासाठी ती अप्राप्य. पुढाकार तिनेच घेणे क्रमप्राप्त आहे.
आकाशातून डोकावणारा चंद्र खरेतर दोघांना एकत्र आणणारा जीवलग पण त्याच्यापुढे मनातले कसे सांगणार !
पहिले पाऊल उचलण्याअगोदर ती चंद्रालाच ढगांच्या आड जायला सुचवते .
कदाचित रात्रीचा अंधार चेहेऱ्यावरची साशंकता, भीती आणि प्रेम ..हो प्रेमच लपवायला मदत करेल.
अर्थात प्रेमिकांची सोबत करणारा चंद्र असे भलते सलते ऐकत नाहीच पण तिची कबुली, त्यालाही आपले मन मोकळे करायला उद्युक्त करते.
बदली में छुपे चाँद ने कुछ मुझसे कहा है,
त्याला त्याचे उत्तर आहे, “ हमने भी सुना है”
त्या हमने भी सुना है मध्ये खूप काही आहे. तिचे मन ओळखल्याची पावती, स्वतःच्या मनाने दिलेली कबुली आणि आवाजात दडलेले आणि आता कुणालाही न जुमानता ओसंडून आलेले प्रेम.
प्रेमिकांच्या भेटीला वेळेचे भान नसतेच. घड्याळाचा काटा कुठेही सरकला तरी प्रेमिकांसाठी मात्र वेळ अपुरा पडतो.
निरोप घेताना झालेली तगमग या गीतात आली आहे.
६)आधा है चन्द्रमा रात आधी
(सिनेमा-नवरंग, संगीतकार-सी.रामचंद्र, गीतकार-भरत व्यास, गायक-महेंद्र कपूर, आशा भोंसले, कलाकार-संध्या)
नजरेच्या भाषेत प्रश्नच संपत नाही तर त्यांची उत्तरे तरी कशी मिळणार! त्यात प्रेमिकांच्या राज्यातले प्रश्न समाजाला मान्य असतातच असे नाही. भेटीत याचे भान नसते. प्रेमी स्वतःलाच विसरून जातात. त्यांच्यासाठी काळ थांबलेला असतो. जेव्हा काळाचे भान येते तेव्हा भविष्याची चिंता सतावते. पुढली भेट कधी होईल, होईल का नाही या काळजीने डोळे भरून येतात.
पिया आधी है प्यार की भाषा
आधी रहने दो मन की अभिलाषा
आधे छलके नयन
आधी पलकों में भी है बरसात आधी
आधा है चन्द्रमा…
चांदण्या रात्रीच्या वर्षावात न्हाहून निघणे हे सर्वच प्रेमिकांच्या नशिबात नसते. विरहाच्या वणव्यात पोळलेल्या अनेकांना मधू इथे अन चंद्र तिथे चा अनुभव असह्य होतो तर कधीतरी विरहात प्रेमाची आहुती पडते.
७) चांद मद्धम है आसमां .चूप है
सिनेमा – रेल्वे प्लॅटफॉर्म , संगीतकार-मदन मोहन , गीतकार- साहिर लुधियानवी, गायिका-लता मंगेशकर, कलाकार- नलिनी जयवंत)
आठवणी , मग त्या कसल्याही असोत , आनंदाच्या किंवा विरहाच्या , त्या छळंवादीच असतात . हुरहूर लावणाऱ्या
गेलेले क्षण जातात त्यांच्या प्रवासाला आणि आपण मात्र ती वाट निरखत बसतो.
दिवसाच्या लखलखाटात त्या पुसट होत असतील पण रात्रीच्या अंधारात मात्र त्यावरील काजळी जाते. मनाचा परत ताबा घेतात त्या .
चांद मद्धम है आसमां .चूप है ,
नींद की गोद में जहाँ चूप हैं .
सारा आसमंत निद्रादेवीच्या कुशीत थकून श्रांत झाला आहे पण झळाळणाऱ्या चंद्रप्रकाशात ती वाट पहात आहे , आपल्या प्रियकराची . त्या वाट पाहण्याला अंत नाही . दूरवर दिसणाऱ्या खोल दरीत लपलेले ढग सुद्धा आता अंधारात दडलेल्या पर्वतांना स्पर्श करत आहेत . किती काळ लोटला आहे त्याची तमा नाही आहे तिला .पण आपले तारुण्य ओसरत असल्याची जाणीव तिला अस्वस्थ करत आहे . हे गीत म्हणजे प्रेमिकेने प्रियकराला परत परतून येण्यासाठी केलेली उत्कट विनंती .
रोज की तरह आज भी तारे , सुबह की गर्द में न खो जाये
आ तेरे गम में जागती आँखे , काम से काम एक रात सो जाये
दिवस उजाडायला आता थोडाच वेळ आहे . नेहेमीप्रमाणे हे तारे सुद्धा थकून विश्रंती घेतील . पण माझ्या थकलेल्या डोळ्यांचे काय ! आता तरी परत ये. या डोळ्यांना समाधानाने तुला साठवून घेण्याचे भाग्य मिळूदे . प्रेमात पडलेल्या मुलीची साशंकता, अस्वस्थता, एकाकीपणा, वेदना, नैराश्य सारे काही साहिर लुधियानवी यांच्या शब्दात आणि लताच्या स्वरात साकळून आले आहे .
चंद्राच्या साक्षीने गायलेले अजून एक गाजलेले विरहगीत लताच्याच आवाजात आहे.
८) चांद फिर निकला , मगर तुम ना आये
(सिनेमा -पेइंग गेस्ट, संगीतकार -एस डी बर्मन, गीतकार-मजरुह सुलतानपुरी, गायिका -लता, कलाकार-नूतन)
वाट पाहणाच्या अनेक छटा असतात. नैराश्य, दुःख आणि तो येणार याची खात्री असेल तर आनंद सुद्धा. हे गाणे मात्र नैराश्येत आलेले आहे.
प्रेमिकांच्या भेटीचा साक्षीदार, तो खट्याळ चंद्र आकाशात कधीचा येऊन बसला आहे पण त्याचा काही पत्ता नाही, हे वाट पाहणे एवढे जीवघेणे आहे की थंड वाहणारा वारा, रात्रीची गूढ शांतता, लुकलुकणारे तारे , कशाकशाने तिच्या मनाची उद्विग्नता दूर करू शकत नाहीत. प्रेमात हरल्याची जाणीव तिच्या मनाला झाली आहे. दुःख आहे ते ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो कुणा दुसरीच्या मोहात अडकला आहे. तो आपला कधी नव्हताच हे सत्य पचवणे कठीण.
सुलगते सीने से धुंआ सा उठता है
लो अब चले आओ के दम घुटता हैं
जला गये तन को बहारों के साये
मैं क्या करुँ हाय के तुम याद आये
चाँद फिर निकला…
कालिदासाच्या काळापासून, कदाचित आधीही असेल, चंद्र हे सौन्दर्याचे परिमाण आहे. स्त्रियांच्या सुंदरतेची चंद्राबरोबर तुलना केलेली आहे. शास्त्रज्ञांनी चंद्रावर उतरून त्याच्या चेहेऱ्याची पोलखोल केली असेलही, दूरस्थ चंद्र मात्र अत्यंत आकर्षक आहे यात शंका नाहीच.
सिनेनायिकांच्या सुंदरतेला न्याय देण्यासाठी अनेक गीतकारांनी चंद्राचा आधार घेतला आहे.
९)चौदहवी का चांद हो
(सिनेमा-चौदहवी का चांद, संगीतकार-रवी, गीतकार-शकील बदायुनी, गायक- मोहम्मद रफी, कलाकार- गुरुदत्त, वहिदा रहमान)
चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजबाब हो
पूर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल आहेस का सूर्यासारखी तेजस्वी ते मला सांगता येणार नाही पण तू जी कोणी आहेस तशी या जगात दुसरी कोणीही आढळणार नाही . गुरुदत्तला वाटले यात काही नवल नाही पण आज सुद्धा वहिदाचे सौंदर्य नावाजणारी आहेत त्याचे नवल आहेच .
मोहात पाडणारे सौंदर्य
यात आणि एक गोष्ट मला भुरळ घालते . रफी .
The passion, warmth and soul in his voice makes this a timeless masterpiece .
या सिनेमाचे चित्रीकरण सुद्धा फार सुंदर आहे. तिच्या सौन्दर्याने खिळून राहिलेला नायक आणि झोपेतून अचानक जाग आल्यावर त्याच्या नजरेतले उघड आकर्षण, प्रेम पाहून गोंधळलेला आणि लाजलेला तिचा देखणा चेहेरा.
वहिदाचेच आणि एक सुंदर गीत आहे.
१०) रात भी है कुछ भीगी भीगी , चांद भी है कुछ मध्यम मध्यम
( सिनेमा-मुझे जीने दो , संगीतकार-जयदेव, गीतकार- साहिर लुधियानवी, गायिका-लता मंगेशकर, कलाकार- वहिदा रहमान)
तुम आओ तो आंखे खोले , सोयी हुई पायल की छम छम
एवढी गोड तक्रार आहे ही ! तुझी वाट पाहून रात्र सुद्धा आळसावलेली आहे . विरहाने डोळेही शिणले आहेत . चंद्र अस्ताला चालला आहे . पण जर तू येशील तर सैलावलेल्या पावलांना सुद्धा तुझी चाहूल लागेल …
छम छम … पैजणांच्या किणकीणीचा एवढा सुंदर उपयोग केला आहे या गीतात !
तपते दिल पर युं गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम
डोळ्यांचा सुंदर उपयोग केला आहे.. सुनिल दत्तच्या डोळ्यातील रासवट वासना, आणि त्याला उत्तेजन देणारी वहीदाच्या डोळ्यातील मादकता.
खरेतर वहीदाचे रूप उत्तेजक नाही . She radiates warmth . तिचे डोळे भावनांचा गोफ सहज गुंफतात आणि बघणारा त्या डोळ्यात हरवून जातो . She mesmerizes you .
पण इथे मात्र शालिनता,सल्लजता नाही. इथे आहे ते आवाहन, देहाचे निमंत्रण, प्रणयाचे उन्मुक्त आमंत्रण.
जाणिवेचा चंद्र जेव्हा नेणिवेच्या डोहात उतरतो, तेव्हा त्याच्या साक्षीनेच अशी अजरामर गीते जन्माला येतात. कथा जिवंत होतात. साहित्याच्या पानापानातून डोकावणारा चंद्र मनाला भुरळ पाडतो. कितीही व्यापात बुडलेले असो, थोडावेळ का होईना कृत्रिम दिव्याच्या झगमगाटापासून दूर जाऊन, आकाशाच्या फटीतून झिरपणारे चांदणे पांघरायची ओढ प्रत्येकालाच असते. सर्वांनाच हवे असतात,मन प्रसन्न करणारे चंदेरी क्षण.
लेखाची सांगता अशाच एका प्रसन्न गीताने करते.
११)चाँद रात तुम हो साथ
(सिनेमा-हाफ टिकिट, संगीतकार-सलील चौधरी, गीतकार-शैलेंद्र, गायक-किशोर -लता, कलाकार-किशोर , मधुबाला)
चंद्र, रात्र, एकांत कुणालाही भूरळ घालायला समर्थ आहे पण ती मात्र अपवाद आहे. असणारच. चंद्राला सुद्धा झपाटून टाकणारे तिचे सौन्दर्य आहे. त्याच्यावर मात्र तिची मोहिनी पडलेली आहे आणि हार मानायची त्याची तयारी नाही.
रूप नसेलही पण कुणीही प्रेमात पडेल असा त्याचा आवाज आहे. त्याचाच आधार घेऊन तो चिकाटीने तिला मनवण्याचा प्रयत्न करतो ,
चाँद रात तुम हो साथ
(सिनेमा-हाफ टिकिट, संगीतकार-सलील चौधरी, गीतकार-शैलेंद्र, गायक-किशोर -लता, कलाकार-किशोर , मधुबाला)
आता असे प्रेमवीर काही तिला नवीन नाहीत. नाक उडवून ती त्याचा हा प्रयत्न हाणून काढताना म्हणते,
दिल का ऐतबार क्या
क्या करोगे जी कल जो ये बदल बदल गया
पुरुषाचे हृदय , उद्या बदलणार नाही कशावरून ? कुणी द्यायचा त्याचा भरवसा !
फार मस्त हलके फुलके संवादात्मक गाणे आहे हे.
अर्थात तो मुरलेला खिलाडी नसला तरी प्रेम त्याला धीर देते. आपली केस नेटाने लढवताना तो म्हणतो,
जुल्मी नज़र, कैसी निडर, दिल चुरा लिया
तिला हे अर्ग्युमेण्ट माहित आहेत. स्वतःचे हृदय सांभाळताना ती त्याला बजावते,
ये भी कोई दिल है क्या
जहाँ मौका मिला फिसल-फिसल गया
नकार स्विकारेल तर तो हिंदी सिनेमातला हिरो कसला! आणि तिचे हास्याचे चांदणे च एवढे मोहक आहे की वरच्या चंद्राला सुद्धा मोह पडावा!
कोजागरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

अफाट असतं ग तुझं लिहिणं. एक एक गाणं आणि त्या मागची भावना शब्दात मांडणं, अप्रतिम.🌹
गाण्यावर लिहिताना मला तेवढी मजा येते ग
काय काय सुटलेले लक्षात येते
Thank you Gauri.
क्या बात है 👌👌👌
चांद की नर्म मध्धम् रौशनी की तरह समा बंध गया, पढा तो जैसे चांद को छुकर आयी हूँ ऐसा लगा|
बेहद, बेहद बढिया 👌❤❤🌟🌟🌟✨✨✨✨✨✨✨✨✨
Thank you so much Kamini 🙂 I am honored .
खुपच सुंदर लिहले आहे. अनेक गाणी अगदी माहितीची आणि आवडीची. आवडीची म्हणून फक्त गुणगुणन होतं.इतका अर्थ लक्षात घेतला नव्हता. आज हे लेखन वाचताना अजून मन कोमल झाले.. धन्यवाद.
Thank you so much Sulabhaji.
प्रिया दी लेख फार फार आवडला. कोजागिरी शीतधवल शांत. तसेच तुझे हे लिहिणे. गाणी सगळी प्रिय….”चांद भी है कुछ मद्धम मद्धम ” हे तर जीवाजवळचं गाणं आहे माझ्यासाठी. ❤️ मस्त
Thank you Alka . चांद भी है मध्यम मध्यम , मलाही अत्यंत आवडीचे गाणे
वहिदा त्यात अफाट दिसली आहे
छम छम मध्ये घुंगराचा आवाज किती सुंदर वापरला आहे .