Skip to content

तुम गगन के चंद्रमा हो,”लता मंगेशकर”

पार्ट १

भारतीय सिनेमाला २०२३ मध्ये ११० वर्षे पूर्ण झाली. नाट्य, नृत्य, संगीत आणि रोमान्स यांचे कोलाज असलेला सिनेमा या शतकात अनेक संक्रमणातून गेला. तांत्रिक, सामाजिक, आर्थिक बदलाचा परिणाम  नक्कीच झाला तरीही बदलला नाही तो “ती“ आणि “ तो” चा कथेतील सहभाग.  त्यांच्यातील नाते हा कथेचा प्रमुख विषय राहिला. सिनेमाच्या यशात या जोडीचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या भावना व्यक्त करण्यात शब्दांनी हातभार लावला पण सुरांनी या जोडयांना अमर केले. जेव्हा कोणीतरी तुमच्यावर प्रेम करते, तेव्हा जे शब्द येतात ते हृदयातून येतात. गळा फक्त निरोप्याचे काम करतो. जर गद्याला , पद्याची जोड असेल तर मात्र ते कोणालाही गुणगुणता येतात.  स्वरामुळे आणि लयी मुळे ते  अंतःकरणाला स्पर्शही करतात.
प्रेम हा  पुरुष आणि स्त्री मधला  मूलभूत दुवा असला तरीही तो सहज, सोपा आणि हवाहवासा करण्यात या गीतांचा हात आहेच.
सिनेमात कथेला अतिशय महत्व आहे. ही कथा वेळेत बसवायची असेल तर शब्द जपून वापरायला हवेत. गद्याचा पसारा कमी केला तर मोजक्या शब्दांना मीटर मध्ये बसवून भावना तर प्रेक्षकांपर्यंत पोचवता येतात शिवाय कथा सरकायला मदत होते.त्यात ह्या  शब्दांना सुरांची जोड मिळाल्याने ती लक्षात राहतात, गुणगुणली जातात.प्रेक्षक जेव्हा ती गातात तेव्हा ते सिनेमाचाही भाग  होतात.
ही गाणी त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्यात सुद्धा नायक, नायिकेचे स्थान प्राप्त करून देतात.त्याच्या भावना , तिच्यापर्यंत पोचवण्यासाठी ही गीते निरोप्याचे काम करतात. सोलो गीते ही स्वतःची भावना व्यक्त करण्यासाठी गायली जातात तर द्वंद्व गीते हा सादेला मिळालेला प्रतिसाद असतो. Blending of two voices is a magical thing .  मग ते मतैक्य असो , सुसंवाद असो किंवा वादविवाद सुद्धा . जे असते ते उघड , समोरासमोर. म्हणूनही असेल the  best duets move us in ways that other music may not.
आज लता बाईंचा वाढदिवस.  खरेतर त्यांना देण्यासारखे रसिकांकडे काही नाही. इतकी वर्षे यांनीच इतके भरभरून दिले आहे की त्यांच्यातलेच काही त्यांना परत करावे लागेल. त्यांचेच द्यायचे तर काही भर घालून.
पंचाहत्तर वर्षे गाता गळा असलेल्या या गायिकेने असंख्य गायकांबरोबर, गायिकांबरोबर द्वंद्व गीते गायली आहेत.
ही पोस्ट आहे ती द्वंद्वगीतांची.

१) इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने
( सिनेमा -तेरे घर के सामने, सहगायक -मोहंमद रफी, संगीतकार -एस डी बर्मन, गीतकार- हसरत जयपुरी, कलाकार- देव आनंद , नूतन) 

हे गीत केवळ द्वंद्व गीत नाही , हे दोघांचे रंगलेले संभाषण आहे.
राकेश आणि सुलेखा यांचे वडील सख्खे शेजारी आणि सख्खे वैरी आहेत. व्यावसायिक स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेली ईर्षा यामुळे हे वैर संपणे काही शक्य नाही. दोघांच्या जमिनी एकमेकांना लागून आहेत. त्यावर घर बांधणे हे दोघांचे स्वप्न .
घर बांधण्याचा हेतू तेथे राहण्यापेक्षा, दुसऱ्याला खिजवणे हा जास्त.
दोघांनाही आपले घर प्रशस्त हवे आहे. प्रशस्त आणि सुंदर. ते कुणाचे असावे हेच तर वादाचे मोठे कारण आहे.
दिल्लीत वास्तुविद्याविशारदाची काही कमी आहे का! नाहीच.
इथे मात्र दोघांनाही उत्कृष्ट वास्तुविद्याविशारद हवा असल्याने, दोघांचाही वास्तुविद्याविशारद एकच आहे.

”आपला नायक “
आणि तो चक्क यांतील एकाचा  मुलगा आहे. त्यात तो जिच्या प्रेमात पडला आहे, ती दुसऱ्याची मुलगी आहे.
A classic recipe for  romantic comedy.
केवळ प्रेमच दुष्मनीचा अंत करू शकते. दोन मोठ्या माणसांच्या भांडणात गुदमरून गेलेल्या राकेशला फक्त त्याचा आधार आहे. जळी स्थळी त्याला सुलेखा दिसू लागते.
तिला विसरण्यासाठी एकच प्याला घ्यावा तर त्यातूनही ती डोकावते. तिला आणि स्वतःलाही धीर देण्यासाठी तो म्हणतो,

इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने

हे काही फक्त गाणे नाही, हे त्याने तिला दिलेले वचन आहे.
पुरुषांच्या स्वप्नांना, आकांक्षांना बळ देताना स्त्री ची नजर त्यातले धोके पक्के हेरते. तिला माहित आहे, घर बांधणे; अगदी तो  वास्तुशिल्पी असला तरीही, या परिस्थितीत  काही सोपे नाही.

घर का बनाना कोई, आसान काम नही
दुनिया बसाना कोई, आसान काम नहीं
पण त्याचा निश्चय पक्का आहे. जर माझे हृदयच तुझ्याशी बांधले गेले आहे तर मला काहीही अशक्य नाही.

दिल में वफ़ाये हो तो, तुफ़ां किनारा है

बिजली हमारे लिये, प्यार का इशारा है
तन मन लुटाऊंगा, तेरे घर के सामने 
आता मात्र तिने त्याच्यापुढे हार मानली  आहे. तो वचनाला पक्का आहे हे जाणून आहे ती तरीही एक प्रश्न, एक आव्हानही ती ठेवतेच.

कांटों भरे हैं लेकिन, चाहत के रास्ते
तुम क्या करोगे देखें, उल्फत के वास्ते
त्याचे उत्तर इतके गोड़ आणि प्रामाणिक आहे ..त्याच्या तुटक्या दातातून हसताना तो सांगतो, अगदी खरे सांगतो ..
“प्रेमासाठी लोकांनी राज्ये सोडली आहेत, त्याचवेळी  महाल सुद्धा बांधले आहेत की “

मैं भी कुछ बनाऊंगा  तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने…
ह्या गाण्यात एक सुंदर शॉट आहे. राकेशला जरी जिथे तिथे सुलेखा दिसत असली तरी त्याच्या मित्राच्या डोळ्यांसाठी तो फक्त व्हिस्कीचा ग्लास आहे. त्यात तो बर्फाचा खडा टाकतो आणि ग्लासमधली नूतन थंड स्पर्शाने शहारते …
विजय आनंद चे दिग्दर्शन कमालीचे सर्जनशील आहे.
( माझा दुसरा चॉईस होता-  दिन सारा गुजारा तोरे अंगना, सिनेमा-जंगली )

२) दिल में समा गये सजन, फूल खिले चमन चमन, प्यार भी मुस्कुरा दिया.
(सिनेमा संगदिल-  सह गायक – तलत महमूद, संगीतकार-सज्जाद हुसैन, गीतकार -राजेंद्र कृष्ण , कलाकार-दिलीप कुमार, मधुबाला) 

आज प्रीत ने तोड़ दी बंधन की दीवार
हार मान के प्रीत से चला गया संसार
सर्व बंधनांपासून मुक्त झाल्या नंतरचा जो उन्माद आहे, जो उल्हास आहे तो या गीतात आहे. ती संन्यासिनी, देवाला वाहिलेली, समाजासाठी अस्पर्श आणि तो, आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवाने कडवट बनलेला ठाकूर. दोन वेगळ्या परिस्थिती मधल्या प्रेमिकांना एकत्र आणणारा एकच दुवा आहे ते त्यांचे बालपणीचे प्रेम. त्याची ओळख पटल्यावर येते हे गीत.  
दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा हा चित्रपट फारसा गाजला नाही पण गीताचे चित्रीकरण म्हणजे डोळ्यांना सुद्धा मेजवानी आहे. तिचा ग्रामीण लहेजा, शहरी, सॉफिस्टिकेटेड नायकासमोर थोडासा विसंगत वाटतो. दरी मिटते ती त्यांच्यातील सहज जाणवणाऱ्या आकर्षणाच्या लहरीने. ही  संवेदनाच तलम. अंगावर शहारा  आणणारी. ती लता बाईंनी हुबेहूब गायली आहे.
त्यातील “समा गये” मधली हरकत ऐकली तर ते जाणवेल.

दिल में समा गये सजन
फूल खिले चमन चमन
प्यार भी मुस्कुरा दिया.
दिलीपच्या हालचालीत एक संयम आहे. मनावर ताबा ठेवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत आहे पण मधुबालाने मात्र सर्व बंधने झुगारून दिली आहेत. खेडवळ मुलीच्या अंगी असणारा संकोच तिच्या ठायी दिसत नाही.. समर्पणातील उत्कटता आणि बेदरकारपणा  तिच्या हालचालीत आहे. आधीचे आयुष्य नियमांनी बांधलेले, अनाथ असल्याने वागणुकीत आपोआप आलेला संकोच,  देवाला आपले आयुष्य समर्पित केल्याने आलेली विरक्ती, प्रेमाच्या दर्शनाने नाहीशी झाली आहे.

पहले कोई ख़ुशी न थी, दिल की कली खिली न थी
तीर -ऐ -नज़र चला न था , ज़िन्दगी जिंदगी न थी.
तेरे क़दम की आहटें बन गईं मुस्कुराहटें
मेरा जहाँ बसा दिया
या गीतात मधुबालेला पाहणे हा नितांत सुंदर अनुभव आहे. आयुष्यात प्रेम नाही केले तरी जगता येईल असा अनुभव. उगाच  हसणे, त्याच्या स्मितहास्याने संपूर्ण देहाचेच मोरपीस झाले आहे, हातात आलेले सुख निसटून जाईल म्हणून ते मुठीत बांधून ठेवण्याचा लाडिक चाळा आहे हे गीत.
वरचे सूर लावणे हा लताचा स्थायीभाव आहे.  ह्या स्वरांवर आणि हरकतीवर तिची हुकूमत ही आहे. याला मॅच करतो तो तलतचा खोल, हळवा सूर. लता आणि तलत हे माझे सर्वात आवडीचे कॉम्बिनेशन आहे. परस्परांना जुळणारी मधुरता , नजाकत आणि पवित्रता दोन्हींच्या आवाजात आहे.
(माझा दुसरा चॉईस – आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे – उसने कहा था )

३) ओ मेरे सनम , ओ  मेरे सनम
(सिनेमा -संगम, सह गायक -मुकेश , संगीतकार -, शंकर -जयकिशन,  गीतकार- शैलेंद्र,  कलाकार -राज कपूर , वैजयंती माला)

असे म्हणतात, मृत्यू सुद्धा विश्वासघातापेक्षा दयाळू असतो. मृत्यू मध्ये कसलीही फसवणूक नसते. जे त्याचे वचन असते, ते तो पूर्ण करतो.  विश्वासघात, दाखवलेल्या आशेची, प्रेमाची निर्घृण कत्तल करतो.
सर्वात वाईट म्हणजे ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असतो, तोच तुमचा घात करतो.
जगण्यावरची श्रद्धा उडते कारण जगावरचा विश्वास उडतो.
बायकोवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसाला तिच्या भूतकाळातले काही क्षण अपघाताने समजतात. तिने जपून ठेवलेले एक प्रेमपत्र त्याच्या हाताला सापडते. तिने ते अजूनही जपले आहे म्हणजे त्या क्षणांत तिचाही सहभाग असतो हे निश्चित असते. तो कोण हे सांगणे तिला शक्य नाही. तो त्याचा जीवलग मित्र आहे. त्यांची मैत्री एवढी घट्ट आहे की त्या मैत्रीसाठी तिच्या प्रियकराने प्रेमाचा त्याग केला आहे, तिलाही करायला लावला आहे.
हे रहस्य समजले तर त्याचे काय परिणाम होतील ह्याची कल्पनाही तिला सहन होत नाही. त्याग करून जरी हे वैवाहिक सुख तिला मिळाले असले तरीही ती बरीच पुढे निघून आली आहे. आपल्या पतीशिवाय तिच्या मनात कुणाचाच विचार नाही आणि हे त्याला कसे पटवून द्यायचे हा मोठा प्रश्न आहे तिच्यापुढे.
तिने व्यभिचार केला असावा हा संशय आणि त्याला बसलेला धक्का, स्वतःचे निर्दोषत्व त्याला पटवून देता न आल्याने आलेली हताशा, त्याने दूर केल्याची वेदना , संसार तुटण्याची भीती असे अनेक पैलू या गीतात आहेत.

ओ मेरे सनम ओ मेरे सनम
दो जिस्म मगर एक जान हैं हम
एक दिल के दो अरमान हैं हम

लग्न हे अनेकदा दोन अनोळखी जीवांना बांधणारे आणि ते मृत्यूपर्यंत टिकेल अशी अपेक्षा करणारे बंधन आहे. ह्याच्या आधीच्या आयुष्यात जे घडते, तो विश्वासघात नसतो ..ती घटना असते. होमाभोवती फेऱ्या घेताना ते जळून गेले आहे हेच गृहीत धरून माणसे नवीन आयुष्याला सुरुवात करतात.
जिथे प्रेम असते तिथे हे मान्य होते. जिथे हक्क असतो तिथे स्वतःच्या फसवणुकीचा अहसास उरतो. जे डोळ्यासमोर आहे ते खोटे वाटते , जे घडून गेले आहे त्याची अदृश्य सावली वर्तमानाला झाकोळून  टाकते.
तो म्हणतो,
सुनते हैं प्यार की दुनिया में
दो दिल मुश्किल से समाते हैं
क्या गैर वहाँ अपनों तक के
साये भी न आने पाते हैं
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यों हैरान है हम

तिचे अश्रू, तिची भीती, तिची वेदना त्याला तिच्या गुन्ह्याची कबुली वाटते. तिला भीती आहे, तो दूर जाईल. त्याला खंत आहे ती आपल्याआधी कुणाचीतरी होती ..
तरीही त्याची माफी मागताना ती सांगते ,

जो सच है सामने आया है
जो बीत गया एक सपना था
ये धरती है इन्सानों की
कुछ और नहीं इन्सान हैं हम

आपण सुद्धा सामान्य माणसे आहोत ज्यांच्याकडून चुकी घडू शकते ,…Humans are fallible because we are not perfect beings  हे बायबल मध्ये सुद्धा सांगितले आहे  पण एकदा न्यायाधिशाची जागा स्वतःकडे घेतल्यावर चुकीची क्षमा करण्याएवढी माणुसकी, माणूस दाखवत नाही.
(दुसरा चॉईस –  प्यार हुआ इकरार हुआ है -श्री ४२०)

४)शोला जो भडके दिल मेरा धडके
(सिनेमा-अलबेला, सहगायक- चितळकर, संगीतकार- सी रामचंद्र, गीतकार- राजेंद्र कृष्ण, कलाकार -भगवान, गीताबाली)

काही गाणी, स्टेज परफॉर्मन्स साठी लोकप्रिय असतात. त्यांचा ठेका हे एक कारण असतेच पण त्या गाण्याचा आणि चित्रपटातील कथेचा तसा रूढार्थाने संबंध नसल्याने , गाण्याविषयी ठोस प्रतिमा नसते. ती कुठेही बसवता येतात आणि त्याचा रस बहुधा हास्य रस असतो.  
उदा . “तेरे बिना जिंदगी से कोई “ हे गाणे कुणी बसवणार नाही. या गाण्याला ठोस पार्श्वभूमी आहे. त्यात संजीव आणि सुचित्रा सेन बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पन्नास टक्के प्रेक्षक उठून जातील.
पण शोला जो भडके ह्या गाण्याला तुम्ही थोड्या कल्पकतेने स्वतःचा चेहेरा देऊ शकाल. 
अलबेला सिनेमात बारा गाणी आहेत आणि त्यातली दोनच गाणी स्टेज वर सादर झालेली नृत्ये आहेत. हे नवल अशासाठी की एक अंगाई सोडली तर प्रत्येक गाण्याला फार सुंदर ठेका आहे.
गीताबाली चा उत्स्फूर्तपणा आणि खास भगवानने लोकप्रिय केलेल्या नृत्याच्या , कुणालाही जमतील अशा स्टेप्स यामुळे हे गाणे अतिशय खास आहे. ह्या चित्रपटासाठी अनेक तारकांना विचारले होते पण भगवान हिरो असल्याने सर्वानी नकार दिला. गीताबाली ने मात्र लोकप्रिय असूनही चित्रपटात काम केले यासाठी भगवान यांनी तिचे जाहीर आभार मानले आहेत.
महकी हवाएं बहके कदम मेरे
ऐसे में थाम लो आ के बलम मोरे
पत्ता भी खड़के तो तो बिजली सी कडके
दर्द जवानी का सताये बढ बढ के

किती उघड भावना आहे. संदेहाला जागा नाही इथे. न सोसवणाऱ्या तारुण्याचा भर एकट्याने का बरे सोसावा म्हणून दिलेलं खुलं आमंत्रण!
आणि अजूनही आपण  J1 झाले का वर अडलो आहोत!
(दुसरा चॉईस – फिर वोही चाँद, बारिश)

५) तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
(सिनेमा- , सहगायक- महेंद्र कपूर, संगीतकार-एन दत्ता,  गीतकार-साहिर लुधियानवी, कलाकार-राजेंद्रकुमार, माला  सिन्हा)


कॉलेजमध्ये आमच्या पिढीच्या मनाला पंख फुटले. आताच्या पिढीच्या तुलनेत फारच उशिरा असणार. मनाला फुटले तरी ओठापर्यंत भावना यायला बराच वेळ गेला. त्यामुळे सुद्धा पाखरे भुर्रर्र उडाली. मनातल्या भावना कागदावर लिहून वहीतून पास करण्याचा बावळटपणा काही जणांनी केला सुद्धा तरी बहुतेकांच्या नशिबी प्रिंसिपलकडे हजेरी लावणे आले होते, चिठ्ठीसकट.
नाही म्हणायला, अंताक्षरी हा खेळ भावना पोचवायला कामी येत असे. म्हणजे  पडला तर आंबा, नाहीतर दगड.
जरी प्रतिसाद आला नाही तरी शिक्षा टळत असे.
हे गॅदरिंग मध्ये बघून, त्यातही नको तसे हातवारे करून  प्रपोज मारणे कोणत्या कॉलेजात असावे याचा अंदाज नाही.
धूल का फुल त्या काळाच्या मानाने बराच बोल्ड सिनेमा होता. नायक , नायिकेला फसवतो म्हणजे सरळ फसवतोच. आपल्या तोलामोलाच्या मुलीशी लग्न करतो. नायिका गरोदर राहते, मुलाचा त्याग करते, नंतर लग्न ही करून मोकळी होते.
पुरुषाचा खरा चेहेरा या सिनेमात उघड दाखवला.
यातली गाणी सुद्धा महेंद्र कपूर असूनही फार सुरेल आहेत.
शब्द साहिर लुधियानवी चे असल्याने , त्यात विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा , सामाजिक आणि ताकदीने मांडल्याने हा पूर्ण अल्बम चांगला आहे.

हा ट्रॅकच प्रेमाच्या रस्त्याचे , त्यातील प्रत्येक टप्याचे वर्णन करतो.
सुरुवातीला तो तिच्या सुंदरतेचे वर्णन करतो. ती सुंदर असल्याने त्याच्यात काही तिला नावीन्य नाही. समाजाची परवानगी विचारली आहेस का असे बोलून ती त्याच्या हेतूचा माग काढायचा प्रयत्न  करते. तो पोचलेला खेळाडू आहे. श्रीमंत, देखणा आणि हुशार असल्याने कसे पटवायचे ह्याचे तंत्र जाणून आहे. तिची नाराजी, त्याच्या जवळ येण्याचा बहाणा त्याला माहित आहे. हे स्पष्ट सांगून तो तिच्या हृदयालाच हात घालतो.

दुपट्टे के कोने को मुँह में दबा के
ज़रा देख लो इस तरफ़ मुस्कुरा के
मुझे लूट लो मेरे नज़दीक आ के
कि मैं मौत से खेलना चाहता हूँ,

तिला लुटणे सोपे आहे हे माहित आहे त्याला. त्यासाठी आधी झुकावे लागते हे सुद्धा. ही खेळी बरोबर पडली आहे. आपल्यासाठी मृत्यूला कवटाळणारा प्रेमवीर कुणाला आवडणार नाही!
थोडेफार शाबूत असलेले डोके ठेवून ती अंतर राखायचा प्रयत्न करते

गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो,

तिचे डोळे मात्र त्याला सांगून चुकतात; सावज जाळ्यात अडकले आहे.
(माझा दुसरा चॉईस – आज की मुलाकात बस इतनी, भरोसा) 

.७) आ नीले गगन तले प्यार हम करें,हिल मिल के प्यार का इक़रार हम करें
( सिनेमा -बादशाह, सह गायक -हेमंत कुमार, संगीतकार – शंकर जयकिशन- गीतकार-हसरत जयपुरी) 


प्रेम झपाटते. अगदी नॉर्मल, व्यवहारी माणसे सुद्धा प्रेमात पडली तर भारली जातात. खुल्लम खुल्ला ची संकल्पना नंतरची.
ते जगाला आव्हान आहे. हे आव्हान नाही कारण जगाचे भानच मुळी त्या दोघांना नाही.

आ नीले गगन तले प्यार हम करें
हिल मिल के प्यार का इक़रार हम करें
गाणे सुरु करते लता. आ या शब्दातली साद किती गोड़ आहे. गावाबाहेरील एकांत, उतरत गेलेली सांज, आकाशाच्या पटलावर गढत होत गेलेला निळा रंग, फुलून आलेला निसर्ग आणि तिने मारलेली हाक “ये”
नीले आणि करें या शब्दांतील “नी” आणि “रे “ थोडासाच रेंगाळतो पण त्यातली मादकता आणि सलज्जता सुरात साकाळून येते. हेमंत कुमार दुसऱ्या कडव्यात येतात.

दो जां हैं हम ऐसे मिले एक ही हो जाएं
ढूँढा करे दुनिया हमें हम प्यार में खो जाएं
बेचैन बहारों को गुलज़ार हम करें

लताच्या आवाजातील थरथरणे आणि हेमंत कुमार यांच्या यांच्या आवाजातील स्थिरता अतिशय  पूरक आहे इथे.. या आवाजात संयम आहे, गांभीर्य आहे , one can understand, this is the voice of a no nonsense man.
दुसरा चॉईस खरेतर पहिला पण यावर अनेकदा लिहिले आहे. छूपा लो यूँ दिल में प्यार मेरा,  -ममता)

८) फिर छिड़ी रात बात फूलों की
( सिनेमा –बाजार ,  सहगायक -तलत अझीझ, संगीतकार –खय्याम, गीतकार – मकदूम मोहिउद्दीम, फारुख शेख-सुप्रिया) 


लता-तलत अझीझचा  हा एकच ट्रॅक आहे.
संध्याकाळ नेहेमीच उदास करत नाही. दिवसभराची कामे आटपून सूर्य क्षितिजापलीकडे निघून जातो आणि सायंकाळच्या धूसर प्रकाशात प्रेमिकांची पावले एकांताला शोधतात.
एकट्या पडलेल्या आभाळाला सुद्धा त्यांच्याकडे चोरून पाहण्याची भूल पडते आणि  त्यांच्या आवेगाने तेच चहू अंगानी बहरून येते ..
रंगाची उधळण होत असतानाच तलतचा आवाज सुरांचीच नाही तर सुगंधाची बरसात करत येतो ,
फिर छिड़ी रात, बात फूलों की

तिच्या केसातील गजरा त्याला बेभान करत असतानाच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत तो म्हणतो… कालच तर फुलांची उधळण करून गेलीस न..आता  परत …
त्याचा प्रयत्न उधळून लावून तीच  खट्याळपणे विचारते,
रात है या बारात फूलों की…
तू रात्रीची गोष्ट करतो आहेस  का फुलांनी सजलेल्या रात्रीची
मिलनाची स्वप्ने  डोळ्यात उतरलेल्या सुप्रियाला  पाहणे हे सुख आहे..
This song is an anticipation of the union ..
नायक आणि नायिका  खूप  साधे अगदी आपल्यासारखेच … ह्या गीतात नृत्य नाही .. कोणत्याही तालबद्ध हालचाली नाहीत
नुसते एकमेकांच्यात गुंतणे , भेटीतली , मिठीतली उत्कटता एवढी सुरेख उतरलीय इथे .
बहुधा गझल ही विरहाच्या अंगानी जाते किंवा  प्रेम
ही गझल श्रुंगाराचा सोहळा आहे…
आणि लता …तिच्या मखमली आवाजाचे  काय वर्णन करणार !
तारुण्याची नव्हाळी , कोवळेपण , त्या वयाची धिटाई आणि लज्जा सर्वच भाव आले आहेत या गीतात ..
ऐशीच्या दशकातील हे गीत …कलाकाराला वय नसते  म्हणतात ते  दिसते.

९) तुम गगन के चंद्रमा हो, मैं धरा की धूल हूँ
(सिनेमा -सती सावित्री, सह गायक -मन्ना डे, संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार-भरत व्यास, कलाकार-अंजली देवी -महिपाल ) 


ह्या गीताचा व्हिडिओ नाही हे प्रेक्षकांवर उपकार आहेत. लता -मन्नाडे  यांची अनेक गाजलेली युगलगीते आहेत पण हे गीत अत्यंत मधुर आहे. केवळ यमन ची सुरावट म्हणून नाही तर ही शुद्ध हिंदी भाषेतील रचना आहे.

तुम महासागर की सीमा, मैं किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मैं अधूरी साजपर
तुम हो काया, मैं हूँ छाया, तुम क्षमा मैं भूल हूँ
तुम गगन के चंद्रमा हो.

हिंदी सिनेमा हे नायक प्रधान आहेत. स्त्रीचे स्थान इथे दुय्यम आहे. हे अनेक गीतात प्रेम आणि भक्तीच्या पडद्यामागे राहून दर्शवले आहे. “आपकी नजरो ने समझा प्यारके काबील मुझे” म्हणा किंवा “अब हमें आपके कदमों में यु रहना होगा” ही गाणी सुद्धा  प्रेमातील समर्पण दर्शवते, जे एकाच बाजूने असते.   
कुठेतरी वाचलेले, “ प्रेमाची  सुरुवात आकर्षणाने होते आणि त्याची सांगता समर्पणाने.'” मुळात समर्पण म्हणजे स्वताला पूर्णतः दुसऱ्या व्यक्तीत विरघळून टाकणे, त्याच्यात सामावून जाणे पण जर ते एका बाजूने झाले तर ते अर्पण केले नाही का.?
Submission to each other, completely and unconditionally, is the ultimate form of Love; that is deep & boundless as the sea; the more you give, the more you have, for both are limitless…………
.जे दोन्ही बाजूने ,तितक्याच ताकदीने आणि श्रद्धेने होते ते समर्पण…..
आणि ते खूप कठीण आहे..कोणतेही नाते घ्या बळी तो कान पिळी हे सर्वत्र दिसते. मग ही असमानता शिक्षणात असते, पैशात किंवा प्रसिद्धीत असते. जो मोठा तो सन्मानाने स्वीकारतो आणि जो छोटा तो स्वतःला अर्पित करतो.
सारा अहंकार बाजूला ठेवून तो तिला म्हणतो,

तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणों की हो गुंजन, मेरे मन की मयूर हो
तुम हो पूजा मैं पुजारी, तुम सुधा मैं प्यास हूँ
तुम गगन के चंद्रमा हो
केवळ शब्दांचा विचार केला तर  हे गीत माझ्या आवडीच्या पहिल्या पाच गीतात आहे.
मन्नाडे यांच्या युगलगीतातील कमाल गीते लता मंगेशकर यांच्याबरोबर आहेत. सुरांवर असलेली पकड, शास्त्रोक्त संगीताचा अभ्यास, ताना, हरकती, आलाप यांच्यातील सहजता लक्षात  घेतली तर ते स्वाभाविक आहे.
( दुसरा चॉईस – झुमता मौसम, उजाला)

१०)मैने प्यार किया–टायटल गीत
(सिनेमा-मैने प्यार किया, सहगायक-एस पी  बालसुब्रह्मण्यम, संगीतकार–राम लक्ष्मण, गीतकार– देव कोहली, कलाकार माधुरी–सलमान) 


सलमान चे सिनेमातले कोवळेपण आणि सभ्यता खरी वाटावी, या काळातील हा सिनेमा.
राम लक्ष्मण यांनी हे गीत, स्टीवी वंडर च्या “ आय जस्ट वॉन्ट टू से , आय  लव्ह यु “ वरून  उचलले आहे …
कॉपी तरीही मला हे आवडते.

आते जाते, हँसते गाते, सोचा था मैं ने मन में कई बार
वो पहली नज़र, हलका सा असर, करता है क्यों दिल को बेक़रार
रुक के चलना, चल के रुकना, ना जाने तुम्हें है किस का इंतज़ार
तेरा वो यकीं, कहीं मैं तो नहीं, लगता है यही क्यों मुझको बार बार
यही सच है, शायद मैं ने प्यार किया

मूळ  गाण्याचे शब्द अतिशय सुंदर आहेत..
त्याचा भावार्थ असा ,
ना ही  नवीन वर्षाची सुरुवात आहे, ना वसंत ऋतूची चाहूल.
माझ्याकडे तुला द्यायलाही काही नाही…ना चॉकलेट्स, ना फुले …ना लग्नाचे वचन
फक्त तुला काहीतरी आतून सांगायचे आहे…
जे अगदी  खरे आहे …
I just called to say I love you…

काहीही न मागता आणि कदाचित  काहीही न देता सुद्धा आलेले तीन शब्द. त्यात कसलीही अपेक्षा नाही आणि कसलीही स्वतःला खरे शाबीत करण्याची जबाबदारी सुद्धा. आपल्याला सवय  झाली आहे. .काहीतरी  द्यायची मग  रिटर्न गिफ्ट  मागायची  आणि नंतर  तेच रेटत राहायची.    
म्हणून हे साधे तीन शब्द  आपल्या नरड्यातून पडत नाही  कारण ती / तो  काय म्हणेल? हो म्हणेल? हो म्हंटले तर काय मागेल? मग मला काय  द्यावे  लागेल? देता  येईल, मी पुरे पडेन …. ब्ला ब्ला  
हे कसले काहीच नाही इथे … फक्त “मैने प्यार किया”  .. 

गाण्याची चाल सुद्धा  अगदी  सरळ. कुणीही गाऊ शकेल इतकी सरळ. फक्त मन हवे तसे.  मला सत्तर नंतर लता मंगेशकर यांची गाणी फार आवडत नाहीत, क्वचित काही चांगले हे आवडते आणि दुसरे, हम आपके है कौन चा टायटल ट्रक.

११) दिल धुंडता है फिर वोही , फुरसत के रात दिन
(सिनेमा -मौसम, सहगायक-भूपिंदर, संगीतकार- मदन मोहन, गीतकार-गुलजार, कलाकार- संजीव कुमार, शर्मिला) 


गुलझारजींच्या “मौसम” या सिनेमात हे गीत अगदी सुरुवातीला येते. वळणावळणांचा पहाडी रस्ता आणि  डोंगर-रांगांच्या कडेकडेने मार्ग कापणारी गाडी. बऱ्याच वर्षांनी एक प्रवासी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून काही काळ विश्रांती घ्यावी म्हणून निवांत क्षणांच्या शोधात येतो आहे पण इथे आल्यावर मात्र त्याची गाठ पडते त्याच्या भूतकाळाच्या हरवलेल्या क्षणांशी. अमरनाथ आणि त्याच्या प्रेयसीचे, प्रेमात आकंठ बुडलेले ते क्षण.

दिल धुंडता है फिर वोही , फुरसत के रात दिन ….
बैठे रहे तसव्वूर ए जाना किये हुए ….

एखाद्या निवांत दुपारी, कपाट  लावायला घ्यावे, बरेच काही जुने,अडगळीत टाकून दिलेले मिळावे आणि मन कुठल्या कुठल्या आठवणीने भरून आले की हे गाणे आठवते मला. त्यातल्या अनेक गोष्टीना आज महत्व नसते. ते कधीच मागे टाकून आपण एवढे अंतर कापलेले असते. जुनी पुस्तके, वह्या, एखादा परिचित सुगंध कवटाळून बसलेला रुमाल, काही पत्रे. त्याला आज इथं नसेल तरी जीवनाचा एक भाग त्याने घडवला असतोच. भविष्याच्या भीतीत आणि वर्तमान भोगायच्या आसक्तीत आपण एवढे गुंतून जातो की भूतकाळाच्या या सुंदर क्षणांना गाडून टाकतो आणि मग कधीतरी ते डोळ्यासमोर सरकतात तेव्हा हातातून काय निसटले आहे ते लक्षात येते.
जाडोंकी नर्म धूप और , आंगन में लेट कर
आंखोपे खिचकर तेरे आंचल के साये पर …

दार्जिलिंगची ती आळसावलेली दुपार आणि चुकार उन्हाला चुकवण्यासाठी त्याने डोळ्यावर ओढून घेतलेला तिचा स्कार्फ.  .
ओल्ड वर्ल्ड चार्म. 

गुलज़ारजीं यांनी इथे फ्लॅश बॅक या तंत्राचा वापर केला आहे. पडद्यावर एकाच वेळी अमरनाथची दोन रूपे दिसतात. एक तरुणपणीचे ,आपल्या प्रेयसीबरोबर गाताना आणि  वर्तमानातले; प्रौढ वयाचे, झाडाआडून आपला निसटलेला भूतकाळ निरखताना .

बर्फीली सर्दियो में किसी भी पहाडपर
वादी में गुंजती हुई  खामोशीया सुने
आँखों में भीगे   भीगे  से , लम्हे लिये हुए

जगण्यासाठी केवढी तडजोड करतो आपण. जीवनाच्या शर्यतीत पुढे जाताना काय हरवले आहे ते लक्षात सुद्धा येत नाही . नंतर मात्र आयुष्याच्या सायंकाळी आपण नक्की काय गमावले आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. राहतात त्या फक्त आठवणी. बर्फाळ, थंड आठवणी
दिल ढुंढता है फिर वोही …
( दुसरा चॉईस अर्थात ..बीती ना बिताई रैना –परिचय )

हिंदी सिनेमातील युगलगीते हा एक स्वतंत्र अध्याय आहे. ह्यात खूप वैविध्य आहे.मानवी मनाच्या संवादाचे सर्व पैलू ह्या गीतांतुन दाखवले आहेत. क्वचित काही गीते, दोघांच्यातील वादाचे दर्शन दाखवत असतीलही पण म्हणून काही या गीतांना द्वंद्व म्हणू नये.
दोन मनांना जोडणारा हा साकव आहे.
लता बाईंच्या शेकडो गीतातून काहीच गाणी हा रसिकांवर अन्याय आहे पण ही लिस्ट आता या क्षणाची लिस्ट आहे. 
आताच्या क्षणी मला आवडलेले किशोर आणि लताचे गीत आहे,

१२) अच्छा चलो सो जाते है
(सिनेमा-चरस, सह गायक-किशोर कुमार, संगीतकार- लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार-आनंद बक्षी- कलाकार-धर्मेंद्र-हेमा )


हे सुद्धा संभाषण. निरोप घेताना केलेले गुड नाईट. आपल्या मधुर आवाजात ते लता सुरुवातीलाच करते. म्हणून आपण थोडेच यु ट्यूब बंद करतो!
प्रेमिकांचे तसेच असते. त्यांचेही गुडनाईट असेच लांबत  जाते. अगदी पहाटेपर्यंत कारण निरोप घेतल्यानंतर ते एकमेकांच्या स्वप्नात जातात.
मला धर्मेंद्र आणि हेमा आवडतात.
त्यांच्यात एक प्रामाणिकपणा आहे. चुकीच्या जागी असेल पण आहे.
अनेकवेळा बरोबर करतो आहे असे दाखवून आपण नाही का कितीतरी चुकीच्याच गोष्टी करतो. हे चुकीच्या गोष्टी करताना काहीतरी बरोबर करतात.
तर आता गाणे ! किशोर -लता हे कॉम्बो मला तलत -लता एवढेच आवडते.
ती गान सरस्वती आहेच , तो सुरांचे शिक्षण न घेतलेला स्वयंभू गंधर्व आहे, नाहीतर हे असले शाब्दिक बोलणे सूर म्हणून स्विकारले जाणे सोपे आहे का !
सुरुवातीची साधी मैत्री, आता रात्र चढते आहे, तशी काही वेगळ्याच अंगाने पुढे जाते आहे.
आकर्षणाच्या या नशेच्या आहारी जाताना सुद्धा लता मात्र सावधगिरीचा इशारा देते,

देखो पहेले हम थे अजनबी
हो गई मगर अब दोस्ती
“बदले हुए हालत के लिए”
आज रात के लिए
हम तुम जुदा हो जाते हैं अच्छा चलो सो जाते हैं. 

28 thoughts on “तुम गगन के चंद्रमा हो,”लता मंगेशकर””

  1. उदय शेवडे

    सर्व गाण्यांची उत्तम निवड….. पैकी बादशहा सोडून सगळी गाणी ऐकलेली आहेत. हे ही ऐकेन.

  2. सगळीच गाणी अतिशय सुरेख मला तुम गगनके चंद्रमा .
    ……..
    खूप आवडते

  3. सगळी गाणी लताची अगदी अप्रतिम आणि अगदी अनवट!
    फार सुरेख लेख 👌👌❤

  4. प्रिया,

    लता च्या गाण्यावर लिहिणं खूप मोठं काम. शिव धनुष्य पेलण्याएवढं.
    तू वेगवेगळे विषय घेऊन अप्रतिम लिहितेस. द्वंद्व गीत , नाही युगलगीत
    हा विषय घेऊन आजची लेखमाला सुंदर आहे.
    ❤️❤️❤️❤️❤️

  5. छान चॉईस गाण्याचा . लता तलत चं सिने मे सुलगते है अरमान पण छान आहे . अप्रतिम लेख बाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

  6. वीणा रणदिवे

    नादमधुर गाणी..❤️
    खूप छान लेख
    अभ्यासपूर्ण 👍

  7. नौशाद, रोशन, वसंत देसाई, चित्रगुप्त यांचीही अजरामर द्वंद्वगीतं आहेत. लताबाई-नौशाद, लताबाई-मदनमोहन हे अधिक impactful वाटतात.

    1. Yes Hemant .
      A different list for each of them . लता -मदन मोहन
      लता – सी रामचंद्र सुद्धा …खूप कोवळा आवाज आहे तो .
      मला लता सलील चौधरी सुद्धा आवडते ..पण गाणी कमी आहेत त्यांची

  8. प्रिया… अप्रतिम आहे गाण्यांची निवड आणि तुझं लेखन
    सुंदर झाली सकाळ

  9. शब्दातीत सुंदर आणि सुरेल लेख प्रिया.
    एकेक गाणे जणू अनमोल रत्न आणि त्याला तितक्याच सुंदररित्या शब्दजडित करणारी तुझी अप्रतिम लेखणी.
    Take a bow🙏❤️

  10. अनंत राजाध्यक्ष

    तूम गगन के चंद्रमा…… “या गीताचा व्हिडिओ नाही हे प्रेक्षकांवर उपकारच” हे मनाला भावलं कारण व्हिडिओमध्ये चलत चित्रावर लक्ष असतं आणि श्रवणीय गीत थोडं मागे पडतं, काही म्हणा पण एक-दोन आत्ताची नवीन गाणी मैने प्यार किया नंतरची सोडली तर सर्व गाणी पाहिली ऐकली आहेत, तुमची गाण्यांची निवड छानंच आहे, वाचताना आनंद तर मिळालाच पण थोडा नोस्टाल्जीक झालो, मला स्वतःला काही सोलो गीतं सोडली तर द्वंद्व गीतच जास्त आवडतात, धन्यवाद 🙏

    1. Thank you so much Anant ji.
      हा सिनेमा काही पाहिला नाही पण नावांवरून अंदाज आला. चांगल्या गाण्यांची खराब अभिनयामुळे वाट लागते. मदन मोहन च्या बाबतीत हे अनेक वेळा झाले. उत्तम गाणी चुकीचे चेहेरे.

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *