Skip to content

क्रूरतेचा वारसा पेलवणारी “द हेअरेस “

असफल प्रेम आणि एकतर्फी प्रेम यांचे गंतव्य एकच असते. टाळता न येणारा विरह.
तरीही त्यात मोठा फरक आहे.
प्रेम सफल न होण्याची अनेक कारणे असतात. अनेकवेळा प्रेमींचा यावर ताबा नसतो. समाज, आर्थिक परिस्थिती, घरच्यांचा विरोध, अचानक आलेल्या आणि न सोडवता आलेल्या अडचणी.. मृत्यू.
मृत्यू , प्रवास तर थांबवतो पण प्रेमाला चिरंजीवत्व बहाल करतो. “तुम होती तो ऐसा होता” या शक्यतेला सत्याचे रूप देतो. जे घडले नाही त्याबाबत अपराधी वाटण्याची गरज नसल्याने, माणसे हृदयात प्रेमाची जागा जपून ठेवतात.
प्रेमाचा स्पर्श माणसाला बदलवतो. सारे जगच सुंदर भासते. पहिल्यांदाच कुणाच्यातरी  नजरेतून स्वतःकडे पाहताना आनंद होतो. ह्याला प्रतिसाद मिळाला तर अंजाम काहीही होवो, प्रेम होते, आहे यावर आयुष्य काढणे सोपे जाते.
प्रतिसादच मिळाला नाही तर आत्मविश्वास जातो.
“माणूस शिखरावर सुद्धा एकटाच असतो आणि  पायथ्याशी सुद्धा एकटा पडतो “ पण पायथ्याशी असताना  मिळालेला नकार हा व्यक्तीचे खच्चीकरण करतो. त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो. अनेक वेळा त्या  व्यक्तीला संपवतो. स्वतःला अपात्र समजून जगणे हे मृत्यूहूनही भयंकर असते.
निर्दयतेने चिरडलेली स्वप्ने , तुटलेली हृदये आणि त्यातून सावरून, कठोर निर्णय घेऊन सांधलेले आयुष्य याची कहाणी म्हणजे, विलियम वायलर यांचा गाजलेला सिनेमा,
“द हेअरेस”

बाहेर अंधार पडायला सुरवात होते. प्रकाशाचे साम्राज्य काही तासांसाठी लयाला जाते. घड्याळात आठचे ठोके पडतात. अजून एक तास वेळ असतो पण , स्वतःची बॅग भरून, कॅथरीन बाहेरील रस्त्यावर उघडणाऱ्या खिडकीकडे डोळे लावून बसलेली असते. सोबतीला कुणीच नसण्याची सवय, गेल्या तीस वर्षात असल्याने, काळोखाची भीती तिला वाटत नाही.
आता इंतजार असतो, नऊचा . मॉरिस येणार असतो. तिला खात्री असते.
घरासमोरच्या चौकात, त्याची गाडी वेळेवर पोचेल याचे वचन मॉरिसने तिला दिलेले असते. आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा कुणासाठी तरी जगावे असे वाटण्याएवढा महत्वाचा असतो तो .
दुसऱ्या दिवशी लग्न, मग नदीकिनारी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलात पहिली रात्र आणि मग मधुचंद्र. नवीन जीवनाची रोमांचक सफर सुरु व्हायला काही तासाचाच अवधी असतो.

“लग्नाच्या आधीच एक रात्र तू मॉरिसबरोबर असणार? तुझे वडील तुला कधीही स्विकारणे शक्य नाही ग.”
खानदानी कुटुंबात जन्म झालेल्या, त्यांच्या रीतीरिवाजांशी प्रामाणिक असलेल्या तिच्या आत्याला हे पटणे अशक्यच असते. कॅथरीनला मात्र याची पर्वा नसते.
“माझ्या पुढील आयुष्यात त्यांची सावली सुद्धा नको मला. त्यांचा पैसा, वारसा काहीही नको. मी मॉरिसला सुद्धा ह्याची कल्पना दिली आहे आत्या.”
“मॉरिस? त्याला माहित आहे हे?”
आपल्या भोळसट भाचीने हे सांगून चूक केली असे लॅविनियाला, तिच्या आत्याला वाटते पण वेळ गेलेली असते.

नऊ वाजतात, मग दहा , अकरा…रात्र पुढे सरकते,
कॅथरीनच्या मनात विचाराचे काहूर उठते. मॉरिस का आला नाही ? माझा वारसा हक्क गमावला म्हणून आला नाही?
नाही, हे शक्यच नाही. तो  येणार, नक्की येणार, त्याचे प्रेम आहे माझ्यावर , खरे प्रेम आहे, आतापर्यंत  कधीच मिळाले नाही ते प्रेम माझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही .
रात्र संपते. कॅथरीनच्या आशेला तिलांजली देऊन, क्षितिजावर प्रकाशाची रेघ उमटते. मॉरिस येत नाही.
डोळ्यातले पाणी कसेबसे परतवून कॅथरीन घरी परत येते. जड पावलांनी, तिसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत परतलेली ती  या प्रसंगाने मात्र पूर्ण  बदलून जाते.
या सिनेमाची कथा घडते ती एकोणिसाव्या शतकात. सिनेमाची नायिका कॅथरीन ही अतिशय श्रीमंत, यशस्वी पण अहंकारी डॉक्टर ऑस्टिन स्लोपरची एकुलती एक मुलगी. ऑस्टिन हे नामांकित सर्जन, स्वतःच्या हुशारीने, कष्टाने त्यांनी हे वैभव मिळवलेले आहे. न्यू यॉर्क शहरात वॊशिंग्टन स्क्वेयर नावाची तीन मजली, आलिशान वास्तू त्यांचे निवासस्थान आहे. प्रतिष्टीत, नावाजलेल्या लोकांच्यात त्यांची उठबस आहे. याचा रास्त अभिमानही ते बाळगून आहेत.
दुर्दैवाने या साऱ्या  वैभवाशी , कीर्तीशी विसंगत आहे ती त्यांची लेक.
कॅथरीन दिसायला अतिशय सामान्य आहे. सर्वसाधारण बुद्धिमत्ता , त्याला अपवाद फक्त भरतकामाचे कौशल्य पण  वडिलांना त्याचे कौतुक नाही. आत्मविश्वास गमावलेल्या कॅथरीनला उच्चभ्रू समाजात वावरता येत नाही. तिला संभाषण जमत नाही. वडिलांवर प्रेम आहे. त्यांचा अभिमानही आहे, वडिलांनी आपली दखल घ्यावी म्हणून ती धडपडते. त्यांच्या कौतुकासाठी तरसते पण डॉक्टरांना त्याची पर्वा नाही.
मुलीशी कठोर वागणाऱ्या डॉक्टरांचा एक हळवा कोपरा आहे. त्यांची देखणी, सुसंकृत पत्नी. जिच्यावर त्यांचा आत्यंतिक जीव आहे. कॅथरीनच्या जन्मानंतर झालेला तिचा मृत्यू,  हे आणि एक कारण आहे की मनात असूनही, डॉक्टरांचा कडवटपणा जात नाही. ह्यात होरपळ होते ती या निष्पाप जीवाची. या कुटुंबातील तिसरी व्यक्ती आहे, ती तिची विधवा आत्या लॅविनिया पेनिमन. ती आपल्या भाचीला पंखाखाली घेईल;  समाजात समर्थपणे वागायला शिकवेल अशी  डॉक्टरांची अपेक्षा असते.
आपल्या वडिलांना खुश ठेवण्यासाठी कॅथरीन मनात नसूनही पार्ट्याना जाते.लोकांत मिसळण्याचा प्रयत्न करते. खरेतर चांगले शिक्षण असूनही आत्मविश्वास नसल्याने, तिच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही.
तिला  उत्तम शाळेत घातले, संगीत आणि नृत्याचेही शिक्षण मिळाले पण ना तिला आवाज आहे ना डौल. तिला लोकांच्यात मिसळता येत नाही. संभाषण वाढवता येत नाही.
She is an  entirely mediocre and defenseless creature with not a shred of poise.
डॉक्टरांकडे मुलीसाठी या शब्दांशिवाय  दुसरे काहीही नाही.

वडिलांच्या या टीकेने कॅथरीन अजूनच आपल्या कोशात जाते पण एका पार्टीत नवल घडते. मॉरिस टाउनसेन्ड नावाचा एक खानदानी, देखणा तरुण तिला नृत्याचे आमंत्रण देतो. आपल्याला पदलालित्य नाही ह्याची लाज वाटून ती टाळायचा प्रयत्न करते पण नकार घेणे मॉरिसच्या स्वभावात नसते.
“तू पायाकडे पाहू नकोस ग, माझ्याकडे बघ.”
त्याची खिळलेली नजर, आवाजातले मार्दव, बळकट बाहूंचा स्पर्श..
कॅथरीनच्या आयुष्यात एका नवीन भावनेचा प्रवेश होतो.
पार्टीत झालेली ओळख तिथेच संपत नाही. मॉरिस तिच्या घरी येतो. फुले , छोट्या छोट्या गिफ्ट्स..वसंत असा अनपेक्षित रित्या प्रवेश करतो.

प्रेमाला आसुसलेली, एकाकी कॅथरीन, मॉरिसच्या सहवासात फुलून येते. तिच्या आत्याला, वडिलांना हा बदल सुखावतो.. सुरुवातीला डॉक्टर स्लोपर, मॉरिसला घरात प्रवेश देतात. त्याच्याशी गप्पा मारतात. काही दिवसांनी मात्र त्यांच्या लक्षात येते की हा माणूस खुशालचेंडू आहे. मुलीवर प्रेम हा बहाणा. खरा हेतू , तिची इस्टेट आणि पैसे हडपणे हा आहे, तेव्हा मात्र ते कडाडून विरोध करतात.
मॉरिस कडे वारसाहक्काने जे काही थोडेफार पैसे असतात, ते तर त्याने उधळून लावलेले असतात. आपल्या विधवा बहिणीच्या घरी राहूनही, तिला मदत करण्याची त्याची दानत नसते. हा मुलगा आपल्या मुलीचे वाटोळे करेल हे उमजल्याने ते लग्नाला नकार देतात.

“काय पाहिलेस तू या मुलात कॅथरीन ?
A handsome face and figure, and a very good manners. Oh, they’re excellent as far as they go, but they don’t go far enough.
तुझ्या आईचे 10000 डॉलर्स तुला  मिळतील  पण माझ्या इस्टेटीमधून मी तुला  बेदखल  करेन. “

असे धमकावून तिला मागे आणण्याचा प्रयत्न  करतात पण प्रेम  माणसाला  बदलवते. मॉरिसच्या नजरेतून कॅथरीन स्वतःला पहाते. त्याचे  प्रेम  तिला बळ देते. त्याचे आयुष्यात असणे ही तिची गरज होते. जगण्यापेक्षाही जास्त.
त्याची गरिबी, तिच्या श्रीमंतीपेक्षाही श्रेष्ठ ठरते.
पहिल्यांदाच स्वतंत्र  विचार करण्याचे धैर्य आलेली कॅथरीन, वडिलांचे पैसे, सुरक्षा, घर, नाव नाकारते.
नियतीचा डाव मात्र वेगळा असतो. मॉरिस परत येत नाही.

प्रेम काय  किंवा विश्वासघात, हे एक तुफान असते. आयुष्य ढवळून टाकते. जेव्हा तो भर ओसरतो, तेव्हा आपण त्यातून कसे वाचलो हे आठवत नाही, कसे तावून  सुलाखून निघालो हे समजत नाही, खरंच वादळ शमले तरी असेल हे जाणवत नाही पण एक गोष्ट नक्की असते, वादळात सापडलेला कुणीही तसाच राहत नाही. तो अंतर्बाह्य बदलतो.

कॅथरीनच्या आयुष्यात एवढी उलथापालथ होत असतानाच तिचे वडील आजारी पडतात. आपला शेवट त्यांना दिसत असतो. मुलीची अवस्था त्यांच्या नजरेतून सुटत नाही. तिचे लाल डोळे, सुकलेला चेहरा, ढासळलेली तब्येत आणि त्यातही स्वतःला सावरण्याचा, ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न..पहिल्यांदाच त्यांना तिचा अभिमान वाटतो. प्रेम वाटते. मात्र या गोष्टीला बराच उशीर झालेला असतो.

“तो मला सोडून गेला आहे, मला नाकारले त्यांनी”
वडिलांचे प्रेम कधीच अनुभवले नसल्याने कॅथरीन ला त्यांच्या या बदललेल्या स्वभावाचे काहीही सोयरसुतक नसते.
सारा संताप , हतबलता,  चीड , बरेच काही साचलेले बाहेर पडते . वरून संवेदनाशून्य पण  आतून  अपमानाने, वंचनेने खदखदत असलेली ती म्हणते,
“Don’t be kind to me. It doesn’t become you.”
केवळ त्यांना दुखावण्यासाठी ती सांगते, “अजून माझे मॉरिसवर प्रेम आहे.तुमच्या पैशाने मी त्याला विकत घेईन. त्यापेक्षा तुमची इस्टेट कुणालाही द्या..मला पर्वा नाही.”
डॉक्टर मात्र आपल्या एकुलत्या एक मुलीच्या बाबतीत एवढे निर्दय होऊ शकत नाहीत. कदाचित  आपल्या चुकीचे परिमार्जन म्हणून ते आपली इस्टेस्ट तिच्या नावावर करतात.
काही वर्षे उलटतात.
काळ नेहेमीच निर्दयी  नसतो. मिळालेले स्वातंत्र्य, वारसा हक्क, वय आणि  अनुभव या  सर्वाचा  एकत्र परिणाम म्हणून की काय एका लाजाळू, अबोल, बुजलेल्या मुलीचे रूपांतर आकर्षक, धीट, हुशार, स्वकेंद्रित, स्वतःवर ठाम विश्वास असलेल्या स्त्रीत होते आणि तेव्हा मॉरिस परत तिच्या आयुष्यात येतो.

“मी फक्त तुझ्यासाठी निघून गेलो. जिच्यावर आपले प्रेम असते  नुकसान आपण पाहू शकत नाही. माझ्यामुळे तुझ्या वडिलांनी  बेदखल करणे मला सहन झाले नसते पण माझे अजूनही तुझ्यावर प्रेम आहे कॅथरीन. We’ve only waited and now, now we’re free. Nothing stands between us, Catherine…Let us make the rest of life happy for each other…By picking up where we left off. By marrying, Catherine…You would make me the proudest and happiest man in the world. And I will try and be a good husband to you. I’m older. I’m wiser now. And I know that you love me. I need that. I need it more than anything else.” 

“ आपण कधी  लग्न  करायचे मॉरिस ?” कॅथरीन विचारते.
“ एक महिन्यानंतर ?”
 “ नाही मॉरिस  आजच, आजच संध्याकाळी , जिथून संपले तिथूनच सुरु करूया . आपण पळून जाऊ. तू नऊ वाजता ये . मी  वाट पहाते.”

ह्याचा साक्षीदार असलेली लॅविनिया आपल्या भाचीचे अभिनंदन करते.
“कशाबद्दल आत्या?  मॉरिस अजिबात बदलला नाही. तेच खोटे शब्द, तीच खोटी स्वप्ने. फक्त त्याचा हावरेपणा वाढला आहे. आधी त्याला माझे पैसेच हवे होते, आता मात्र त्याला माझे प्रेम सुद्धा हवे आहे पण खोटेपणा पचवायला चुकीचे घर निवडलंय त्यानी. तेसुद्धा दोनदा. एवढी काळजी मी नक्की घेईन की परत तो इथे फिरकण्याचे धाडस करणार नाही”

सिनेमाचा  शेवटचा  अंक  सुरु  होतो. रात्रीची वेळ. असाच त्या  वेळेसारखाच मनातही दाटून आलेला अंधार. नऊ वाजेपर्यंत कॅथरीन शांतपणे भरतकाम करत राहते. लांबून घोड्याच्या गाडीचा आवाज येतो. गाडी थांबते, बेल वाजते. शेवटचा टाका घालून कॅथरीन आपल्या नोकराणीला आतून कडी लावून घ्यायला सांगते.
“Bolt it, Maria…Bolt the door, Maria”

मॉरिसच्या जीवाची घालमेल होत असते. त्याचे स्वप्न त्याच्या  डोळ्यादेखत नष्ट होत असते. बाहेरून हाका ऐकू येतात.
जोरजोरात दरवाजावर मारलेल्या थापांत त्याचा आवाज सुद्धा मिसळतो..
“कॅथरीन कॅथरीन”

हॉलमधला गॅस लाईट विझवून कॅथरीन उठते.
बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करून एक एक पायरी चढून आपल्या खोलीकडे जाताना तिच्या पावलांत कमालीचा वेग असतो. सारा अपमान, प्रतारणा चिरडून टाकल्याची भावना असते.
ओठावर विजयाचे कुत्सित हसू , नजरेतला  विखार  आणि ज्या दोन माणसांवर तिने जीवापाड प्रेम केले, विश्वास केला, ज्यांनीच तिची फसवणूक केली त्यांच्यावरील सुडाचे समाधान.

अवाक झालेली लॅविनिया तिला विचारते,
“ Poor Morris. Can you be so cruel? तू कशी काय एवढी निष्ठुर होऊ शकतेस कॅथरीन?”

या उत्तरासाठी तरी मला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल
साऱ्या पडद्याला व्यापून उरलेली कॅथेरीन उद्गारते , “
Yes, I can be very cruel .. I have been taught by the masters“

वारसा  हा  फक्त  पैशाचा  नसतो. वारसा  रक्ताचा  असतो.
माणसं ओळखणे हा  वारसा, एकदा  खरे स्वरूप  लक्षात आले की कसलीही  पर्वा  न करता त्यावर  ठाम उपाय  करणे हा  वारसा. तत्वासाठी, प्रेमाचाही, प्रसंगी स्वतःच्या खुशीचाही बळी देणे  हा वारसा, निर्दयतेने निर्णय घेऊन दुसर्यांचा अहंकार चिरडणे हा वारसा. माणसांची जाण आणि  त्यांच्या खोटेपणाला चिरडून टाकणारा माज  हा  वारसा
डॉक्टर स्लोपरची मुलगी हा वारसा जपते.
SHE PROVES TO BE THE TRUE HEIRESS.
.
एकाकीपणा हा  दोन्हीकडे असतो. खोट्याच्या सोबतीला सोबत मानून, स्वतःचे सत्व गमावून भ्रमात रहाणे हा ही एकटेपणा आणि असत्याला लाथ मारून, स्वतःला भ्रमाच्या गर्तेतून बाहेर काढून जगणे इथेही एकटेपणाच कपाळी येतो .
फरक असतो तो तुम्ही  स्वतःला कुठे पाहता …
पायथ्याशी का  शिखराशी …
पूर्ण सिनेमात अतिशय सामान्य दिसलेली (अर्थात प्रत्यक्षात ऑलिव्हीया डि हेविलँड अत्यंत सुंदर स्त्री आहे) कॅथेरीन शेवटच्या प्रसंगात अत्यंत तेजस्वी दिसते. तिचा आत्मविश्वास सारा पडदा झळाळून टाकतो ..
१९४९ चे ऑस्कर ऑलिव्हीया डि हेविलँड ला मिळणे हा ऑस्करचा सन्मान होता .

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner



12 thoughts on “क्रूरतेचा वारसा पेलवणारी “द हेअरेस “”

  1. नात्याची बांधिलकी जपताना किंमत ही चुकवावीच लागते. Without any blame game. Very nice article👍The Heiress 👌👌👌💜

  2. प्रिया,
    पूर्वी तू लिहिलेलं वाचलं होतं.
    अप्रतिम..

    मा सरस्वती प्रसन्न आहे तुझ्यावर .

    चित्रपट पाहतोय असं च वाटतं.
    ❤️❤️❤️❤️

  3. उदय शेवडे

    अप्रतिम लिहिलंय….. चित्रपटाचा शेवट जबरदस्त.

    आपले इंग्रजी चित्रपट परीक्षण वाचत राहावे असे असते.

    1. Uday,
      जुना सिनेमा असूनही कुठेही ते जाणवत नाही .
      अभिनयात ना चित्रीकरणात

  4. अतिशय उत्तम मनोविश्लेशण करणारा चित्रपट! इतक्या छान शब्दात वर्णन केले आहे की या चित्रशैली लेखनाचं कौतुक किती करावं तेवढं थोडं आहे 🌹🌹🌹

Leave a Reply to Lata Parchure Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *