Skip to content

चिरतरुण, चतुरस्त्र गायिका “आशा भोसले”

भाग २
फिल्म इंडस्ट्री नायकप्रधान आहे. पुरुष केंद्री आहे. इथे कथानक पुरुषाला नजरेसमोर ठेवून लिहिले जाते. पुरुषांच्या मैत्रीवर अनेक सिनेमा आहेत. मित्रांनी एकत्र गायलेली दोस्तीची गाणी आहेत. दोन भावांचा बॉण्ड आहे. वडील -मुलाच्या नात्यातील बंधावर सुद्धा अनेक सिनेमा आहेत. आई -मुलगी , दोन बहिणी, दोन मैत्रिणी यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली कथानके मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी आहेत.
एक गोष्ट मात्र आहे , स्त्रियांची द्वंद्व किंवा कोरस गीते पुरुषांच्या गीतापेक्षा जास्त आहेत. दोन किंवा जास्त स्त्रियांना एकत्र आणले की त्या गायला आणि नाचायला लागतात असा काहीसा निर्मात्यांचा समज आहे. 
So, here goes; some  female duets.

मध्ये एका मैत्रिणीने लिहिले होते, फेसबुकवरचे क्लोज फ्रेंड्स इनबॉक्स मध्ये नाहीत, तर भिंतीवर  लिहितात. जेवढी जास्त जवळीक, तेवढ्या  त्यांच्या प्रतिक्रिया. ह्या एका मागून एक  लिहिलेल्या प्रतिक्रियांची स्वतंत्र थ्रेड ही  स्वतंत्र पोस्ट होऊ शकते. इतर  लोकांच्याही ते  लगेच  लक्षात येते. जर  हे दोघे “मित्र -मैत्रिण” असतील तर बाकीचे गॉसिप करतात.
जवळची मैत्रीण मात्र भीड भाड न ठेवता विचारते, “काहे खनके है तोरा कंगना”
२) जानूँ जानूँ री, काहे खनके है तोरा कंगना

(सिनेमा- इन्सान,जाग उठा, सह गायिका –गीता दत्त, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-शैलेंद्र )
अर्थात हे काही गॉसिप नाही, दोघांना एकमेकींच्या मनाची पूर्ण कल्पना आहे. दोघी जिवलग मैत्रिणी असल्याने त्यांना एकमेकांबद्दल मत्सर नाही.

अरी जानूँ री, छुपके कौन आया तोरे अंगना,
सखी जानूँ री, झूमे है काहे तोरा झुमका,
गोरी जानूँ मैं कहाँ पे गिरी है तोरी बिंदिया

बांगड्या का वाजत आहेत, कोण भेटायला  येणार आहे,  कोणाची बिंदी पडली आहे, का, कशामुळे,
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत.
प्रेमामध्ये वेड्या झालेल्या मुलींचा संवाद आहे हा.

जानूँ जानूँ री, काहे खनके है तोरा कंगना
मैं भी जानूँ री, छुपके कौन आया तोरे अंगना

त्यांच्या प्रत्येक पावलात, त्यांनी घेतलेल्या गिरकीत, त्यांच्या हास्यात, त्यांच्या एकमेकांना चिडवण्यात, सगळ्यात प्रेमात पडल्याचा उल्हास भरून राहिलेला आहे.
जर कुणाकडे तो शेअर करता आला  नाही  तर त्या आनंदाचा तरी उपयोग काय ! 
अर्थात हे गुपित बाहेर  जाणार नाही हा विश्वास सुद्धा  आहे या दोघात.

निदान पन्नाशीच्या सुरुवातीच्या दशकात एस डी बर्मन  यांची  गीतादत्त ही  मुख्य गायिका होती नंतर त्याची जागा लताने घेतली. गीताने, इतर बॅनर साठी गाणे बंद केल्यावर हळूहळू आशाची एंट्री झाली. त्यात  लता आणि एस डी यांचा वाद झाल्यावर , काही वर्षे ते एकमेकांबरोबर काम करत नसताना, आशाचे स्थान पक्के झाले.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात चुनरिया सिनेमात, गीतादत्त आणि झोहराबाई अंबालेवाले बरोबर गायची आशाला संधी मिळाली. त्यावेळी गीताचा दबदबा होता. तिच्या स्टाईलचा पगडा सुरुवातीच्या आशाच्या गीतात दिसून येतो.  
नशिबाचे पारडे फिरले की जागा बदलतात.
एस डी बर्मन यांनी गीताच्या जागी आशाला आणले. अर्थात त्यांच्या मैत्रीवर याचा परिणाम झाला नाही. ती घट्ट राहिली.
इथे मुख्य अभिनेत्रीसाठी आशा आणि सह अभिनेत्रीसाठी गीता असा कॉम्बो आहे.
“एक सह गायिका एक गीत” असे ठरवले असूनही, गीता आणि आशा याचे अजून एक गाणे द्यायचा मोह आवरता येत नाही.

बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. सर्वच गोष्टीप्रमाणे त्याला ही अंत असतो. बघता बघता वर्षे उलटतात, पौगंडावस्था येते न येते तोच, घरातून आता मोठी झालीस, जबाबदारीने वाग अशा आदेशवजा सूचना यायला सुरुवात होते.
लहानपण जाऊन आपण नक्की कधी मोठे होतो!
आपण कधी मोठे झालो हे नाही लक्षात येत, जबाबदारीचे ओझे तसेही कुणाला आवडते! पण आता आतापर्यंत आपल्यावर अवलंबून असणारी मुलं शिकायला घराबाहेर पडतात तेव्हा लक्षात येतं, मोठे होणे म्हणजे नक्की काय हरवते!
वेळ असा भुर्रकन उडतो! 

बालपण संपून तारुण्यात पाय ठेवणे एकाच वेळी  थरारक आणि रोमांचक असते. एक वेगळेच जग तुमच्या समोर येते. इथे पालकांची धास्ती नसते. घरापासून लांब राहण्याचा काळ वाढला असल्याने स्वातंत्र्य असते. तारुण्याचा जोश असतो, नवीन आव्हाने असतात, कर्तृत्वाचे आकाश साद घालत असते. स्वतःची ओळख पटण्याचा आणि जगाला पटवण्याचा हा काळ असतो.
2)बचपन के दिन भी क्या दिन थे

(सिनेमा -सुजाता, सह गायिका – गीता दत्त, संगीतकार- एस डी बर्मन, गीतकार -मजरुह सुलतानपुरी)

कभी रोये तो आप ही हँस दिये हम
छोटी छोटी ख़ुशी छोटे छोटे वो ग़म
हाय रे हाय हाय हाय हाय रे हाय
कभी रोये तो आप ही हँस दिये हम
छोटी छोटी ख़ुशी छोटे छोटे वो ग़म
हाय क्या दिन थे वो भी क्या दिन थे

या गीताचे चित्रीकरण सिनेमातील दोन पात्रांतील फरक स्पष्ट करतो. शशिकला, घरची एकुलती एक मुलगी. सुखवस्तू घरात लाडात वाढलेली मुलगी. घरात पियानो वाजवत गाते आहे. एकुलत्या एक मुलीवर काही घराची जबाबदारी नाहीच. कामे करायला एवढी माणसे आहेत. ते स्वातंत्र्य आणि मोकळेपणा तिच्या हालचालीत आहे, गीताच्या आवाजात सुद्धा आहे.
नूतनला घरात वाढवले आहे. मुलीसारखे,  पण ती मुलगी नाही. तिच्यावर घरातील कामांची जबाबदारी आहे.
जे दुय्यम स्थान तिला बालपणात मिळाले आहे, त्याची खंत आता मनात नाही. जाणीवपूर्वक तिने मनाला समजावले आहे. एकदा स्विकार केला की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा सुख मिळते. ते सुख तिने गायलेल्या आलापात आहे, तिच्या गुणगुणण्यात आहे. आशाने नूतनला आवाज दिला आहे. भले स्थान दुय्यम असेल, पण तिचा भाग या गीतात तेवढाच महत्वाचा आहे.
दोन गायिकांचे द्वंद्वगीत बहुधा मैत्रिणींचे असते. आई मुलगी , बहिणी बहिणी अशी नाती काही सिनेमाने फार जोपासली नाहीत. आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांचे “प्यार ऐसा हमारा तुम्हारा “ थोडे हटके. ,
प्रत्येक वयातील मैत्री, मग पाठोपाठच्या बहिणीत का असेना, थोडी वेगळी असते. लहान वयात  वेळ घालवायला, मजा करायला समानधर्मी व्यक्ती, जिला आपण मैत्रीण म्हणतो. पुढे स्वतःच्या महत्वाकांक्षा, वेगळे होणारे रस्ते, अनेकदा असूया यात ही मैत्री राहतेच असे नाही. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर,, जे जे मिळवायचे ते मिळवून झालेले असते, आयुष्यात एक ठहराव आलेला असतो, गरज आणि हाव यातला फरक समजला असतो आणि काही मागून मिळणार नसते किंवा मागायचेच नसते एवढी समजूत आलेली असते, तेव्हा झालेली किंवा टिकून राहिलेली मैत्री/नाते  मात्र जन्माची सोबत बनते, त्यासाठी एकत्र राहायची सुद्धा गरज नसते ..
A true soulmate.
मला हा सिनेमा माहित नाही पण हे गाणे खूप गोड़ आहे.

३) प्यार ऐसा हमारा तुम्हारा, जैसे गंगा और जमूना  कि धारा हो
(सिनेमा -प्यार दास्तान , सहगायिका सुमन कल्याणपूर, संगीतकार – नौशाद , गीतकार -शौकत दहलवी )

अरमान बनकर ओ मेरी गुडिया, दिल में सदा यूं ही रहना
तू साज है, मै आवाज ‘तेरी , तू जान है, मैं तन हूँ बहना 

कितना सुंदर है नाता हमारा
जैसे गंगा और जमूना  कि धारा

सुमन कल्याणपूरचा आवाज खुपसा लता सारखा, आशाचा भरीव .. तो कॉन्ट्रास्ट इथे फार छान ऐकू येतो.

माझ्या घरापासून शाळा जेमतेम दहा मिनिटाच्या अंतरावर होती. शाळा सुटण्याच्या वेळेस आजी शाळेबाहेर वाट पाहत असायची. तिच्याबरोबर चालतच घरी यायचे. आम्ही घरी पोचायची वेळ आणि दुसऱ्या एका शाळेची बस, आमच्याच घरावरून जायची वेळ एकच होती.  हाताला पकडून, मला घरी घेऊन जाणाऱ्या आजीला पाहून ह्या बसमधील मुले हसायची.चिडवायची.एकदा त्यातल्याच एका वात्रट मुलाने गाणे म्हणायला सुरुवात केली, “जाडी अम्मा,जाडी अम्मा मान जा”
आजीला आम्मा म्हणायचो.आम्माबरोबर येणे आवडत नव्हते तरी तिला जाडी म्हटले याचा राग आला मला. मी काही बोलणार इतक्यात आम्माच हसून म्हणाली,” चिडतेस कशाला?जाडी मी आहेच. “मी तुझी आजी आहे म्हणून नाही वाटत तुला.” तो मुलगा खजील झाला.
नंतर एका क्लासमध्ये आमची ओळख झाली, तेव्हा त्याने कबूल केले की त्याला थोडासा मत्सरच वाटायचा माझ्या आजीला पाहून. माझ्या आई वडिलांसारखे, त्याचेही आई वडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असायचे. माझ्याच वयाचा तो, स्वतःच्या हाताने कुलूप काढून रिकाम्या घरात, स्वतःचा खाऊ गरम करून आईची वाट पाहत बसायचा .
काही म्हणा, आजी, आजोबांच्या थकलेल्या हातात प्रेम, लळा, काळजी बरेच काही होते. वाढीच्या वयात त्यांचे लक्ष होते, त्यांचे असणेच एक भावनिक आधार होता. मायेची उब होती. त्याकाळी तरी असे एकत्र कुटुंब म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालते बोलते समुपदेशनकेंद्रच होते. याचे प्रतिबिंब सिनेमातही दिसायचे. केवळ नायक आणि नायिकांनाच नाही तर आजी, आजोबा आणि नातवंडे यांनाही महत्वाच्या भूमिका होत्या. “घराना” या सिनेमात सर्वात सशक्त भूमिका आहे ती ललिता पवार यांनी केलेली, आजीची भूमिका. ही आजी कुटुंबाची कर्ती स्त्री. सत्ता तिच्याच हातात. मनासारखे घडले नाही म्हणून ती रागावली आहे. तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले आहे. जेवण सुद्धा सोडले आहे तिने. तिची नातवंडेही तिच्या सारखीच जिद्दी. तिला हसवण्याचा त्यांनीही निश्चय केला आहे. तिच्या रागाकडे दुर्लक्ष करून ते विनवतात,

४) दादी अम्मा दादी अम्मा मान जा

(सिनेमा –घराना , सह गायिका -कमल बारोट, संगीतकार -रवी, गीतकार -शकील बदायुनी)
दादी अम्मा,दादी अम्मा मान जाओ
छोडो जी ये गुस्सा जरा हँसके दिखाओ

ती कडक आहे पण प्रेमळ सुद्धा आहे. त्यामुळेच तिच्या रागाची भीती न बाळगता ते तिला सांगतात,
कहो तो तुम्हारी हम चंपी कर दें, पियो तो तुम्हारे लिये हुक्का भर दें
हँसी न छुपाओ, जरा आँखे तो मिलाओ.

कधी थट्टा करून तर कधी समजूत घालून आजीची नातवंडे तिच्या ओठावर हसू आणतात. आशा चा आवाज एवढा मिस्कील आणि खोडकर वाटतो! अनेकवेळा लहान मुलांना मोठ्या माणसांचे आवाज शोभत नाहीत. ती गाणी मिसफिट वाटतात ..हा  मात्र सुखद अपवाद.

५) काहे तरसाये जियरा

( सिनेमा -चित्रलेखा, सह गायिका -उषा मंगेशकर, संगीतकार -रोशन, गीतकार -साहिर लुधियानवी)

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रलेखाला रोशन यांचा परिसस्पर्श लाभला होता. सिनेमाचा विषय हटका. मीना कुमारीचा उत्कृष्ट अभिनय आणि साहिर लुधियानवी यांची  गीते असूनही सिनेमा आणि गाणी काही रसिकांच्या पसंतीला तेव्हा तरी उतरली नाहीत. त्यावेळेच्या बिनाका गीतमाला कार्यक्रमात या गीतांचा समावेश न झाल्याने अमीन सयानी यांनीही नापसंती दर्शवली होती. कधीतरी एखादा सिनेमा किंवा गीते काळाच्या पुढे असतात.
ही गाणी टिकली आणि नंतर रसिकांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान निर्माण केले.
मौर्य सेनापती, सामंत  बीजगुप्त युद्ध जिंकून पाटलीपुत्र येथे परत येतो. शहरात मात्र चर्चा असते ती चित्रलेखाची . नवीन राजनर्तिकेच्या  सौन्दर्य आणि नृत्यावर पूर्ण नगरीच फिदा असते. चित्रलेखा मात्र सामंत बीजगुप्तला पाहण्यास उत्सुक असते.

नित-नित जागे ना, सोया श्रृंगार
झनन झन झनन, नित ना बुलाए
काहे जियरा तरसाए
काहे तरसाए जियरा…

कलावती रागावर आधारित हे गीत आशा आणि उषा या दोघांनीही फार सुंदर गायले आहे. गाण्याचे शब्द शुद्ध हिंदीत आहेत म्हणून जाणवत नाही पण अतिशय बोल्ड आहेत.
हिंदी सिनेमातील स्त्रियांची द्वंद्वगीते ही अनेकदा नृत्याच्या कार्यक्रमासाठी वापरली गेली आहेत. स्टेजवर सादर केलेले नृत्य.
कथेला ब्रेक मिळण्यासाठी घातलेले गीत ज्याचा कथानकाशी काही संबंध नाही. ही गाणी अत्यंत गाजतात कारण ती कोणत्याही कार्यक्रमात सादर करता येतात. ज्यांचा भर नृत्यावर असतो.
असे अत्यंत गाजलेलं गीत आहे,

६)रेशमी सलवार कुर्ता जाली का

(सिनेमा -नया दौर, सहगायिका-शमशाद बेगम, संगीतकार-ओ पी नय्यर, गीतकार- साहिर लुधियानवी)
रेशमी सलवार कुर्ता जाली का
रूप सहा नहीं जाये नखरे वाली का होय
जा रे पीछा छोड़ मुझ मतवाली का
काहे ढूँढे रास्ता कोतवाली का

ही गाणी म्हणजे नर्तिकेसाठी पर्वणी. कुमकुम तर आघाडीची नर्तिका होती. तिच्या नावाला वजन होते. भले, वैजयंतीमाला सारखी प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका नायिका असेल तरीही  तिच्या नावावर एकतरी गाणी असायचेच. पडद्यावर नाणी उडवली जायची.
सिनेमाच्या सुरुवातीला नायिकेचे काम करायला सुद्धा स्त्रिया तयार नसत. नाटकात तर पुरुष, स्त्रीभूमिका करत. इथे मात्र मिनू मुमताज ने पुरुषाचा रोल निभावला आहे.  एक मजा म्हणजे , पुरुषाचा पार्ट  आशाला दिला आहे तर जाड, दमदार आवाज असलेल्या शमशादने स्त्री भाग गायला आहे.
आताच्या इनबॉक्स सारखे गाणे वाटते हे. आवडते म्हणून बोलणे सुरु ठेवायचे आणि नंतर कांगावा करायचा ..असो. 
हिंदी सिनेमाचा सांगीतिक इतिहास अतिशय वैभवशाली आहे. अनेक संगीतकार, गीतकार आणि गायक गायिकांचे त्यात प्रचंड योगदान आहे. मंगेशकर भगिनींचे नाव कधीही कुणालाही  पुसता येणार नाही एवढे संख्यात्मक आणि गुणात्मक त्यांचे  कर्तृत्व आहे.
प्रत्येकाची स्वतंत्र गाणी हजारात असूनही दोघांनी मिळून गायलेली गाणी मात्र जेमतेम पंच्याहत्तर आहेत. त्या दोघांच्यात स्पर्धा आहे हे जगजाहीर आहे. त्याचे नवल का वाटावे  किंवा खटकावे हे मला कधीही  समजले नाही.
सर्वोत्तम हा ‘किताब एकासाठीच असतो आणि जेव्हा  माणसात प्रचंड गुणवत्त्ता  असते तेव्हा त्याला  त्या स्थानापर्यंत पोचायची ईर्ष्या असतेच. जिंकण्याची ईर्ष्या असणारे लोकच तिथे पोचतात.
कोणत्याही  क्षेत्रात पहा. जे पहिले येतात ते हुशार असतातच पण त्याहून जास्त स्पर्धात्मक असतात.
पार्श्वगायनाच्या क्षेत्रात या दोघींचा हात धरणारे तेव्हा कुणीही नव्हते. त्यांच्या, त्या काळातील आवाजाचा विचार केला तर आजही जवळपास सुद्धा कुणीही नाही. मन क्यों बहका सारखे sensuous गीत, हमरे गांव कोई आयेगा सारखे उत्स्फूर्त खेळकर गीत, वो चांद जहाँ वो जाये सारखे विरह गीत , कर गया रे मुझपे जादू हे मुजरा गीत ही सगळीच गाणी अत्यंत आवडीची .
त्यांचे संवादात्मक असे एक अतिशय गोड़  गाणे आहे
७)ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये.

( सिनेमा-आये दिन बहार के, सहगायक –लता मंगेशकर, संगीतकार –लक्ष्मीकांत प्यारेलाल –गीतकार-आनंद बक्षी)

सुरुवातीच्या काळात आशा, लताच्या प्रभावाखाली होती. पन्नाशीच्या सुरूवातीच्या दशकात शमशाद बेगम आणि गीता दत्त यांचाही दबदबा होता. त्या सावलीमधून वाट काढून आशाने स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
उपजत प्रतिभा, कमावलेला आवाज आणि प्रचंड मेहेनतीच्या जोरावर तिने यश मिळवले. आवाजाची अफाट रेंज आणि कोणत्याही जॉनरचे गीत गाण्याचा आत्मविश्वास आणि अष्टपैलुत्व. क्वचितच  असा  कलाकार जन्माला येतो.
दोघांनी गायलेल्या गीतात,  मुख्य नायिका लताच्या आवाजात आणि  सहनायिका, ही, आशाच्या आवाजात गायली आहे. 
अगदी ऐशीच्या दशकातील सिनेमात सुद्धा यात बदल झाला नाही.
तरीही दोघांमधली स्पर्धा सहज जाणवते आणि अतिशय सुंदर गीत रसिकांच्या वाट्याला येते.
हे गीत सुद्धा मैत्रिणींचे पण इथे बरेच काही घडायचे आहे ..
हा संवाद खरेतर स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब.

“ ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये” हे गीत सुरु करते ती आशा.

यातल्या उत्कृष्ट ओळी (शब्द) तिच्या वाट्याला आले आहेत.
These lines reflect her outlook towards life. Her easy going, gleeful lust for life.  .तिच्या गाण्यात जगण्याची असोशी आहे, हवे ते मिळवण्याची जिद्द आहे,   Her life is an unashamed celebration of life, longing and love. 

आशा —
ऐ काश किसी दीवाने को हम से भी मोहब्बत हो जाये
हम लुट जाये, दिल खो जाये, बस आज कयामत हो जाये
..
प्रेमात, स्वतःचे काय होईल याची पर्वा करणारे, प्रेम करू शकत नाहीत. त्यासाठी जीवन उधळून द्यायची तयारी हवी आणि 
हे सर्वाना जमत नाही. वाहत जाणे जसे DNA मध्ये असते तसे सावध राहणे सुद्धा उपजत असते. 
लता म्हणते ,
लता , “है वक्त अभी तौबा कर लो,
है वक्त अभी तौबा कर लो,
अल्लाह मुसीबत हो जाये”

प्रेमाच्या रस्त्यावर चालतानाचे धोके दाखवताना लता सांगते, 

“तुम को मालूम नहीं शायद कितने बेदर्द सनम होंगे”

माणसाचा भरोसा कुणी द्यावा. प्रेमाच्या खेळात समोरचा माणूस अनेकवेळा निर्दयी असू शकतो.
आशाला हा धोका माहित आहेच. खेळात तर हार जीत असतेच पण  म्हणून काय कुणी खेळणे सोडते का!.
ती समजावते,
ये आपने सच फरमाया हैं, उल्फ़त में लाख सितम होंगे
हैं लाख सितम मंजूर हमें, बस एक इनायत हो जाये

लताने पन्नाशीतल्या दशकाच्या नायिकेला आवाज दिला. A pure and virginal heroine. तिचा आवाज सुद्धा  तसाच. पवित्र, निर्मल आणि दैवी But shyness or modesty wasn’t a quality associated with heroines in the seventies ..
जो स्लॉट आशाने पटकावला. आयुष्य जसे आले तसे स्विकारून, त्यातला आनंद घेण्याची तिची वृत्ती तिच्या गाण्यात सुद्धा दिसते.
ह्या गीताचे शेवटचे कडवे हा फरक फार स्पष्ट दाखवते

लता –हर एक खता इस दुनिया की इस एक खता से बेहतर है

बाई जगात कोणतीही चूक कर पण प्रेमात पडू  नकोस. दुःख , वेदना , प्रतारणा , विरह या सर्वच भावना या शब्दाला लगडून येतात.
खरे आहे ते. शंभर वेळा विचार करावा आणि “स्वतःच्याच” प्रेमात पडावे ..
पण ह्या शहाणपणाला आशाचे उत्तर आहे ,

आशा –ये प्यार नहीं एक दर्द सही, ये दर्द दवां से बेहतर है
बस चैन हमें आ जाये जो बेचैन तबियत हो जाये

दुःखाशी सुद्धा खेळण्याची जिद्द असणाऱ्या आशा ताईंना खूप शुभेच्छा .

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

14 thoughts on “चिरतरुण, चतुरस्त्र गायिका “आशा भोसले””

  1. उदय शेवडे

    निवडीतला वेगळेपणा हे आपल्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. दोन स्त्री गायिका हा विषय घेऊन गाणी निवडणं सोपं नव्हतं त्यात वैविध्य जपणं अजून कठीण ते लीलया पेललं आहे. आशाबाईंचे सुमनताईं बरोबर गाणे आहे हे मला आज समजले. (घोर अज्ञान) .
    छान लेख ! या मालिकेला ( दोन स्त्री गायिका) एका लेखाने न्याय मिळेल ?…..विचार करा. 🙂

    1. Thank you Uday.
      या निमित्ताने माझी ऐकली जातात. थीम घेतली तर हे शक्य होते. शमशाद आणि लता बरोबर तर असंख्य आहेत आणि अनेक गाजलेली.
      सुमन बरोबर गाणी दोनच बहुतेक ..पण मजा म्हणजे एकही फोटो त्यांचा एकत्र नाही

  2. आशाताईंना शुभेच्छा देतांना बऱ्याच गाण्यांचा उल्लेख होईल परंतु दादीअम्मा चा उल्लेख करणाऱ्या एकमेव असाल.

    नेहमीप्रमाणे सुंदर लेख👌

  3. आशाताई एकच अशी गायिका जी प्रत्येक गाण्यात फिट बसते .मग ते अंगाई असो ,प्रेमगीत,विरहित,कॅमेरा….आणि बरोच
    माझी आवडती गायिका

  4. क्या बात❤
    क्या बात❤
    क्या बात❤
    काय काय कमाल लिहिता प्रियादी!!
    आशाताई पुन्हा पुन्हा नव्याने आकळत जातात!
    या लेखात उत्सव सिनेमाचे गाणे सुद्धा ॲड करा नं.
    फार फार सुरेख लेख👌👌👌

    1. Thank you Kamini .
      लता आणि अशा वर स्वतंत्र सिरीज करेन …तेव्हा नक्की घेईन
      खूप गाणी आहेत त्यांची ..आणि सगळीच सुंदर आहेत

  5. काय सुरेख नि अनवट गाणी निवडलीस!
    विवेचनात तर तू मास्टर आहेसच

    1. थीम घेतली की शक्य होते हे Gauri.
      नाहीतर आपण तीच तीच गाणी ऐकतो . तरीही पन्नास च्या शतकातली गाणी मी घेत नाही ..अनेकांना माहित नाही

  6. सुन ले पुकार आयी आज तेरे द्वार लेके आँसूओं की धार मेरे सांवरे, ए रोम रोम मे बसनेवाले राम, वो ज़िंदगी जो थी अबतक तेरी पनाहों में अशी थेट काळजाला हात घालणारी गीते; अरे जारे हट नटखट ना छेड़ मेरा घुँघट पलटके दुंगी आज तुझे गाली रे, झुमका गिरा रे सारखी अवखळ ग्रामीण गीते, बेक़सी हदसे जो गुज़र जाये…ची काळीज हेलावणारी स्वरबद्ध वेदना , कँब्रे, डिस्को गीते ते थेट लखनौच्या नबाबी माहौलमधे घेऊन जाणा-या खानदानी उर्दू ग़ज़ल….असा सगळा गोवर्धन एका स्रवरयंत्रावर लिलया पेलणारे ते संगीतगोवर्धन गिरीधारीचेच रुप आहे!

    1. फार सुंदर अनकॉमन गाणी दिली तुम्ही Hemant. ही ऐकायला हवीच.
      आशा चा आवाज अफाट फिरतो. हे नैसर्गिक नाही , यामागे तेवढीच जबरदस्त मेहेनत आहे. दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यगीते गळ्यातून काढून वडिलांचा वारसा सांगण्याची जिद्द त्यांना कुठच्या कुठे घेऊन गेली .

  7. Yashwant Kamlapurkar

    खूप छान लिहिलेस प्रिया. As the songs enthrall, so does the writing! Many of the songs coverd are favourites. Some I’m going to play , now that you have included them here. And how wonderfully narrated! अप्रतिम आशा जी. अप्रतिम लेख.

    1. Thank you Yashwant. Thanks for visiting the blog .
      I tried to cover few duets . its difficult , especially if you consider OP-Asha-Rafi trio or RD-Asha Kishor .
      will try to cover in a separate article . My humble tribute .

Leave a Reply to Kamini Amrutkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *