Skip to content

चिरतरुण, चतुरस्त्र गायिका  “आशा भोसले” 

भाग १ 

“सी सी डी त भेटूया का? आरामात बोलता येईल.”
खूप खूप वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणीला बोलल्यावर तिची पहिली प्रतिक्रिया होती, “नको, कॉफीशिवाय मिळते काय तिथे “
“कॉफी प्यायला कुठे भेटणार आहोत आपण? आपण भेटल्यावर खूप बोलणार आहोत. गेल्या वीस वर्षाचे बोलणार आहोत आणि मध्ये विश्रांती घ्यायला कॉफी पिणार आहोत. त्या पॉज मध्ये काय फरक पडतोय, कॉफी कशीही का असेना!
सी सी डी सारखी महागडी जॉइंट्स अगदी निम्न मध्यमवर्गीयात सुद्धा लोकप्रिय झाली कारण कुणाकडेही लक्ष न देता स्वतःमध्ये गुंतली गेलेली माणसे, मध्ये न घोटाळणारे कर्मचारी आणि एकांत नसूनही केवळ एकमेकांसाठी असलेले कान, यांनी माणसांना सहज बोलते केले.
एकमेकांना जाणण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, संवाद हा मानवी जीवनात महत्वाचा आहे मग तो कोणत्याही स्वरूपातला असो. भांडण, वादावादी, प्रेमाच्या गुजगोष्टी, सहज मारलेल्या गप्पा किंवा मन वळवणे सुद्धा योग्य त्या शब्दांनी साधले जाते.
हिंदी चित्रपटातील युगल गीते हा एक धमाल प्रकार आहे. युगलगीते  म्हणजे चित्रपटाचा मुख्य कणा असलेल्या पात्रांतील  सुरमयी संवाद. प्रेमाचा  इजहार, त्यातील गैरसमज, थोडीशी थट्टा मस्करी, सूचक बोलणे, जे कदाचित शब्दांच्या साहाय्याने अवघड वाटेल ते सुरांच्या संगतीने सहज बोलते करणारे हितगुज, तक्रार, तिरस्कार …किती भावना आणि किती मूड्स ह्या युगल गीतांनी आपल्या पर्यंत पोचवल्या आहेत.

आठ सप्टेंबरला आशा भोसलेंचा वाढदिवस आहे. कितवा ह्याला आता तसे महत्व नाही, अगदी नव्वदीला सुद्धा नाही.
काही दिवसांतच त्यांचा लाईव्ह कार्यक्रम आहे असे ऐकले. उत्साहाने रसरसलेल्या आशा ताई नव्वदी  गाठणार असे म्हंटले तर नव्वद हा आकडा सुद्धा भांबावेल.
तसेही आशा अमर आहे.
आशा भोसले यांच्या काही लाईव्ह मुलाखती पाहिल्या आहेत, त्यांना लाईव्ह गाताना पहिले आहे, स्वरांच्या ताकदी बरोबर आणि एक खुबी लक्षात येते म्हणजे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आणि हजरजबाबीपणा.
कसलाही गोत्यात आणणारा बॉल असू दे ,त्यांची मुलाखत म्हणजे षटकार आणि चौकाराची आतिषबाजी. संवाद साधण्याची त्यांची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे.
ही पोस्ट त्यांच्या संवादी गाण्यांची.
हजारोंनी म्हंटलेल्या गाण्यातून निवडक गाणी शोधली तर ती एवढी ताकदवान आहेत की त्यांना नव्वद काय शेकडो वर्षांचे आयुष्य लाभेल..
१) अच्छा जी मै हारी चलो मान जावो ना

( सिनेमा –कालापानी,  सहगायक–रफी , संगीतकार -एस डी बर्मन–गीतकार–मजरुह सुलतानपुरी )
कणेकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर चित्रपट सृष्टीचे मदन-रती या गीतात आहे. प्रत्यक्ष लाजवेल असे सोंदर्य माफी मागत असेल ते ही आशा ताईच्या लडिवाळ आवाजात तर काय बिशाद आहे हा लुटीपुटीचा राग राहण्याची!
प्रत्येक नात्यात चढ उतार येतातच. भांडणे असतात, अबोला धरला जातो,  चेहेरा शांत  असेल तरी मनातली खळबळ आग्रह धरत असते तो समेटाचा. अर्थात मने दुखावली जातात पण ज्यांच्यावर प्रेम असते त्याच्याशीच भांडणे होणे, वाद होणे अपरिहार्य असते .
कालापानी या सिनेमात देव एका खुनाची  चौकशी करत असतो. त्यासाठी त्याला एका कोठ्यावर जावे लागते.
आता बायकांचे कान हलके असतात असे जरी मानले तरी पुरुषांचे कटी वस्त्र तसे सैल असते(अपवाद असतात)  मग या गैरसमजाचा दोष तिला तरी कसा द्यावा!
त्यात पुरुष अनेकवेळा स्वतःची चुकी झाली तरी क्षमा मागत नाहीत. इथे तर याची चूक नाहीच. 
मग तिला नाक घासणे क्रमप्राप्त  होऊन  बसते.  

छोटे से क़ुसूर पे, ऐसे हो खफ़ा…,
एवढीशी तर चूक होती मग नाकावर एवढा राग का बरे?
तो मात्र रागाने  धुमसत आहे, त्यामुळे माफीच्या प्रत्येक शब्दाला आणि तिच्या दिलखेचक अदावर सुद्धा पलट वार करून तो म्हणतो,

“ रूठे तो हुज़ूर थे, मेरी क्या खता” 
अर्थात त्याला रागवायचे कारण आहे आणि तो निरपराधी असल्याने हक्क ही आहे. त्यात तिचे गालातल्या गालात हसणे आणि मान जाओ ना ही  विनवणी पेक्षा, मागणी च जास्त आहे.
तिला माहित आहे की त्याचे तिच्यावर प्रेम आहे, याचा सरळ सरळ फायदा घेऊन ती त्याला म्हणते ,

जीवन के ये रास्ते, लम्बे हैं सनम
चार कदम भी चल न सकोगे, समझे?…
आता या अशा half baked माफीला काय माफी म्हणणार ! I can’t really blame Dev for being grumpy ..संभाषण हा संवाद आहे, स्वगत नाही. एकमेकांच्या हृदयाला स्पर्श करू शकतील असे शब्दच सहसा सापडत नाहीत.
दोन स्वतंत्र विचारांची माणसे, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व  कायम  ठेवून  जेव्हा एका पातळीवर येऊन एकमेकांशी  संवाद साधतात, तेव्हा  ते शब्द ओठातून नाही  तर हृदयातून आलेले असतात .

२) दो दिल  धडक रहे है और आवाज एक है

(सिनेमा -इन्साफ, सहगायक –तलत, गीतकार – असद भोपाली, संगीतकार -चित्रगुप्त )
संगीताच्या तिसऱ्या वर्षाला होतो आम्ही .ख्याल गायकी नुकती सुरू झाली होती . सुरुवातीचे काही महिने शिकवलेले आलाप घोटण्यात गेले. नंतर मात्र आमचे स्वतःचे योगदान अपेक्षित होते. चौघांची बॅच होती . एकाचा आलाप संपला की त्याला मिळता जुळता  सूर उचलून आलापाची सुरुवात करायची. सुरुवातीला कठीण गेले मग एकमेकांचा अंदाज आला.
कोण कोणत्या नोटवर आलाप संपवेल हे लक्षात आल्यावर मेलडी निर्माण करणे सोपे होऊ लागले.
नगमे जुदा है , मगर साज एक है
It is said ” Music is expression of harmony in sound, love is expression of harmony in life “
“दोन विरुद्ध व्यक्तीत आकर्षण होते . बरोबरच आहे;  जे नाही त्याचे कुतूहल वाटणे स्वाभाविक. कुतूहलापोटी आकर्षण निर्माण होतेच पण दुर्दैवाने ते राहत नाही . कुतूहल संपले की नावीन्य संपते आणि मग फक्त त्रुटी दिसायला लागतात ..

रंगीन हर अदा है , बेचैन हर  नजर है
एक दर्द सा आधार है , एक दर्द सा उधर है
दोनों की बेकरारी का अंदाज एक हैं .
इथे  हे एक होणे फक्त शारीरिक नसते. तुमची मूल्ये, तुमचे विचार  अगदी  तुमचे व्यक्त होणे सुद्धा एक असावे लागते .
तलत आणि  आशाचे हे अतिशय गोड़ गाणे आहे

3) फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला 


( सिनेमा–फिर सुबह कभी तो आयेगी, सहगायक–मुकेश, गीतकार–साहिर, संगीतकार- खय्याम)
फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझको

मुकेश आणि आशाचे हे नितांत सुंदर गीत आहे. 
गढद निळ्या रात्रीच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी हे चित्रित झाले आहे. मंद सुटलेला वारा, रात्रीची निरव शांतता, लांबून येणारी समुद्राची गाज आणि मुकेशचा हितगुज करणारा आवाज. प्रेमाची कबुली सगळ्यांनाच काही स्पष्ट शब्दात देता येत नाही. इथे शब्द जरी बुजलेले असले तरी नजर धीट आहे. तिचा अन्दाज त्याला नाही. ती रागावली नसेल याची खात्री तिच्या लाजऱ्या नजरेने दिली असली तरीही खात्री करून घेण्यासाठी तो विचारतो,
एक यूँ ही सी नजर दिल को जो छू लेती है
कितने अरमान जगाती है तुम्हे क्या मालूम

प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, त्यात पुढची स्वप्ने आहेत. सोबतीची अपेक्षा आहे. जिच्या प्रेमभऱ्या नजरेने त्याला ती हिम्मत दिली आहे. त्यांची नजर भिडते मग गडबडून दुसरीकडे वळते .. त्याचा आता धीर वाढतो.

हर नज़र आपकी जज्बात को उकसाती है
मैं अगर हाथ पकड़ लूं तो खफ़ा मत होना
साहिरचे धीट शब्द, मधात बुडून येतात आणि मग मात्र ती स्पष्ट कबुली देऊन टाकते,

मेरी दुनिया-ए-मोहब्बत है तुम्हारे दम से
मेरी दुनिया-ए-मोहब्बत से जुदा मत होना
फार कमी गाण्यात साशंकता,लज्जा, धिटाई आणि समर्पण एकमेकांचे हात धरून आले आहे. राज कपूर आणि माला सिन्हा साठी सुद्धा हे गीत पहा. त्यावेळचा मेलोड्रामा लक्षात आणला तर खूप वेगळे आणि खरे वाटते.
४) रे मन सूर में गा

(सिनेमा–लाल पथ्थर, सहगायक-मन्ना डे, संगीतकार–शंकर-जयकिशन,गीतकार-नीरज)
अनेकदा स्वत:शीही सूर जुळत नाहीत. आपल्या भोवती असतात अनेक कुंपणे. नात्याची, परिस्थितीची, स्वार्थाची मग
तारा छेडणार कधी ? शंकर आणि जयकीशन यांचे सूर  मात्र ५० च्या दशकात  जुळून आले. १९४९  मध्ये बरसात साठी राजकपूरने शंकरला साइन केले . आणि सुरु झाली न संपणारी स्वरांची बरसात . श्री ४२०, आवारा, पतिता, आह, अनारी, चोरी चोरी, दाग, यहुदी. नौशादने क्लासिकल संगीत आणि रागदारी सिनेमात आणली. तीच परंपरा एस – जे नेही समर्थपणे पेलली. वसंत बहार आणि आम्रपाली या चित्रपटातील सर्व गाणी रागदारीवर आधारित आहेत.  

जीवन है सूख दूख का संगम
मध्यम के संग जैसे पंचम
दोनो को एक बना 
रे मन सूर में गा 
कोई तार बेसूर ना  बोले

अनेक वर्षे दोघेही  स्वतंत्रपणे स्वर -रचना करत होते पण ब्रंड एकाच होता …”S -J”. 
दोघांचे सूर एकमेकात मिसळून गेले होते. १९७१ पर्यंत दोघांनीही एकाच नावाखाली काम केले आणि नंतर जय किशनच्या मृत्यू नंतरही स्वतंत्र रित्या काम करताना  शंकरजीने कंपोजर म्हणून, S -J चा ब्रंड कायम ठेवला . 
लाल पथ्थर या सिनेमात राखी आणि विनोद मेहरा वर चित्रित झालेले हे गाणे म्हणजे S -J च्या संगीत संगमाचे प्रतिक …
मन्नाडे यांच्याबरोबर क्लासिकल गाण्यात टिकणे काही सोपी गोष्ट नाही. आशानी सहज निभावले आहे. राखी शास्त्रोक्त संगीत शिकते हे दाखवले असल्याने यात तिला मिळालेली गाणी  रागदारीवर आधारभूत होती. रे मन हे राग यमन तर  स्वतंत्र सोलो “ सुनी सुनी  साँस “ हे जयजयवंतीवर आधारित आहे.
मनातले गुपित सांगणे सोपे नसते. समोरच्या व्यक्तीचा अंदाज असला तरी खात्री नसते. मग सुरुवात करायला भलत्याच गोष्टी बोलल्या जातात.
जसे इनबॉक्समध्ये “जेवण जेवलात का?”
इथे किशोर हवापाण्याच्या गप्पा मारायला सुरुवात करतो.
५)ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा 

(सिनेमा  -दिल्ली का ठग, सहगायक -किशोर कुमार, संगीतकार – रवी, गीतकार -,शैलेंद्र )
ती आणि तो घराच्या गच्चीवर उभे आहेत. दाटून  आलेला काळोख आणि अस्वस्थ करणारा  एकांत . 
नूतन, किशोरला घरी जायला सांगते. हीच तर वेळ आहे मनातले सर्वच सांगण्याची. ही संधी गमावायची नाहीच. तिच्या खोट्या रागाकडे लक्ष न देता, आपले हात फैलावून तो म्हणतो,
“ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा”
Talking about irrelevant things is important. हवा, पाणी, ऋतु. अगदीच हुशार असेल तर साहित्य, संगीत, तुमची स्वप्ने …
आपल्याला कुणीतरी योग्य समजतंय किंवा एवढा विश्वास टाकतंय ह्याने  समोरचे अंतर पटकन कापले जाते.
पटवण्याची जुनी ट्रिक आहे ही.
रागाची जागा, आता खोडकर हास्य घेते. तिचा हा नवीन पवित्रा त्यालाही नवीन. हा किशोरचा आवाज, का वातावरणातला गारवा? कदाचित दोन्ही.
त्याला आश्वस्त करताना, हळूच  त्याच्या सुरांना जोडून तिचे  स्वर येतात.
“ कहा दो दिलों ने, कि मिलकर कभी हम, ना होंगे जुदा”

संवादाचा संबंध शब्दांशी नसतो. तो काही प्रशोत्तरांचा खेळ नाही. अनेकदा एकही शब्द न बोलता किंवा शब्दांचा अर्थाअर्थी संबंध नसेल, तरी मनातले जे जाणतात तेच संवाद साधू शकतात. A good conversation always involves the play of minds.
कधीकधी माणसे फसतात कारण शब्द प्रभावी असतात. शब्दांच्या जाळ्यात अडकले की अर्थाकडे दुर्लक्ष्य होते. कशालाही न भुलता अर्थाचा मागोवा घेता आला की संभाषण स्वतःला हवे त्या दिशेला वळवता येते. हे जमवता आले पाहिजे. 

गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालीज भोळं, त्यात मासोली झालं
माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
६)गोमू संगतीने माझ्या तू येशील का ?

(सिनेमा-हा खेळ सावल्यांचा, सहगायक-हेमंत कुमार, संगीतकार–हृदयनाथ मंगेशकर, गीतकार- सुधीर मोघे)
हेमंत कुमारचा मधाळ आवाज आणि त्यात ते बंगाली गोल गोल उच्चार ऐकले की मला कोल्हा आणि कावळ्याच्या गोष्टीची आठवण येते. कावळ्याच्या चोचीतील  मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी कोल्ह्याने केलेली स्तुती. अर्थात तिथे कावळा फसतो इथे काळे(आशा) फसत नाही …

रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय
“चोरा” हा शब्द किती ठाम आणि तोऱ्यात म्हंटला आहे आशानी आणि  किती खरा सुद्धा. प्रेम असेल तर मात्र माणूस समोरची  व्यक्ती जे बोलेल ते मान्य करण्यावर उतरतो.

ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
नथ म्हणजे  सौभाग्याचे प्रतीक  आणि मिरवत नेणे म्हणजे जगासमोर नाते मान्य करणे…
An acknowledgement of the relationship. 

खुळा पारधी ग, जाळ्यामंदी आला आला आला
आता  लग्न म्हणजे स्वतः फसणे नाही तर फासणे  हा कन्सेप्ट होता. जुना  झाला तो.
(हेमंत कुमार आणि आशा ची अनेक हिंदी गाणी आहेत पण रंगलेले संभाषण याहून दुसऱ्या कुठल्याच गीतात नाही. )

गाताना शब्दांचे भान असणे आवश्यक. सिनेमात शब्द आणि भावना, शब्द आणि कथा सुद्धा हातात हात घेऊन येतात.
गीतातच कशाला, आयुष्यात सुद्धा शब्दाचे भान असणे आवश्यक आहे. अनेकवेळा शब्द गुंगवतात. वस्तुस्थिती विसरली तर होणाऱ्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो.
आशा काळेला याची जाणीव आहे म्हणून सोबतीला जाण्याअगोदरच ती लग्नाची गाठ बांधते.
धूल का फूल मधली नायिका मात्र शब्दांवर विश्वास ठेवते.
लग्नाअगोदर झालेले मूल, प्रियकराने केलेला विश्वासघात आणि आयुष्याचे निघालेले धिंडवडे यांना हे पोकळ शब्द आणि भानावर नसलेले डोके जबाबदार ठरते. सिनेमा कसाही असो, हे गाणे मात्र फार बहारदार आहे. महेंद्रकपूर, मला सिन्हा आणि राजेंद्र कुमार फार आवडीचे नसले तरी हे गीत अतिशय मधाळ आहे. 
७)धड़कने लगे दिल के तारों की दुनिया,

(सिनेमा -धूल का फूल, सह गायक-महेंद्र कपूर, संगीतकार-एन दत्ता, गीतकार- साहिर लुधियानवी)
महेंद्र कपूरने हे गीत अगदी मोहम्मद रफीच्या स्टाईल ने  गायले आहे आणि खरंच सुंदर गायले आहे. सुरुवातीचे हुळूवार  humming आणि नंतर प्रेमात संपूर्ण बुडलेल्या तरुणीचा आवाज .

आशा –धड़कने लगे दिल के तारों की दुनिया
आणि तो त्याचे श्रेय तिलाच देताना म्हणतो.
महेंद्र कपूर –जो तुम मुस्कुरा दो

हसली की फसली उगाच म्हणत नाही. एकदा फसल्याचे ठरवले की निसर्ग सुद्धा विरुद्ध जातो. मग धुंवाधार पाऊस पडतो.
वीजा कडकडतात, ढग गडगडतात. खरेतर हा लांब जाण्याचा सिग्नल सुद्धा असू शकतो पण प्रेमात पडलेली माणसे स्वतःशिवाय कुणाचेच ऐकत नाहीत.
महेंद्र कपूर –ये बोझल घटाएं बरसती हुई
ये बेचैन रूहें तरसती हुई
साहिरचे शब्द अतिशय sensuous होतात..
आशा त्याला प्रतिसाद देते,

ये साँसों से शोले निकलते हुए
बदन आँच खाकर पिघलते हुए
धड़कने लगे…
अत्यंत प्रेक्षणीय गाणे आहे हे. अर्थात जे जे सुंदर दिसते ते तसे असतेच असे नाही असा इशारा देणारे सुद्धा.
सत्तर वर्षे  गाता राहिलेल्या या गळ्याचा आलेख एका लेखात साकारणे अत्यंत कठीण आहे. अशा मोठ्या कारकिर्दीचा आढावा घेताना थीम निवडणे क्रमप्राप्त होते. हा लेख पुरुष गायकांबरोबर गायलेली द्वंद्वगीते. खरेतर आशा -रफी, आशा -किशोर अशीही लिस्ट होऊ शकते आणि त्यातही कोणती गाणी निवडायची  यापेक्षाही पडणारा कठीण प्रश्न असतो, कोणती गाणी वगळायची. संगीतकारांच्या पिढ्यांबरोबर आशाने काम केले. सरदार मलिक ते अन्नू मलिक, रोशन ते राजेश रोशन,  एस डी  बर्मन ते आर डी बर्मन. एवढा मोठा हा कालखंड आहे. ही नुसती गाण्यांची संख्या नाही तर अत्यंत दर्जेदार अशी असंख्य गाणी आहेत. इतकी दशके हे सातत्य ठेवणे, संख्येत म्हणा, दर्जा मध्ये म्हणा, हा चमत्कार आहे.
लेखाचा शेवट करताना, काही सुंदर गाण्यांचा उल्लेख करते. त्याबद्दल परत कधीतरी लिहिता येईल.
जाने जा ढुंढता फिर यहाँ (किशोर), जाने मन जाने मन (येसूदास), राधा कैसे ना जले (उदित नारायण), आणि ओपी -रफी -आशा यांची असंख्य गाणी परत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येतीलच.
शेवटचे गाणे मात्र आर डी बर्मनचे.
दोघांनी मिळून फिल्मी संगीतात क्रांती घडवली. ज्या प्रकारे आर डी ने आशाच्या आवाजाचा उपयोग केला, ज्या स्केल मध्ये तिला गायला लावले ते क्वचित कुणी , एखाद्या गायकाला गायला लावले असेल. सत्तर नंतर मला वाटत नाही , असा कुठलाही प्रकार असेल जो आशाने गायला नाही. त्याचे क्रेडिट निःसंशय आर डी ला जाते. They grew together. He was her soul companion.
त्यांची सात आठ द्वंद्व गीते असतील. सर्वात पहिले द्वंद्वगीत “द ट्रेन “ मध्ये होते. मेरी जां मैने कहा .. हे कॅबरे गीत आहे.
गुलाबी आँखे आणि लताचे किस लिये मैने प्यार किया या गीतांपुढे हे मागे पडले.
त्या नंतर आलेले “ दुनिया में लोगों को” हे गाणे मात्र चार्टबस्टर होते. चित्रपटाचा क्लायमॅक्स ह्या गाण्यावर आहे.

दुनिया में, लोगों को, धोखा कभी हो जाता है

(सिनेमा -अपना देश, सह गायक -आर डी बर्मन, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार -आनंद बक्षी)
हे गाणे फ्युजन आहे. जपानी पॉप संगीत, लुई आर्मस्ट्राँग च्या संगीताचे काही पिसेस आणि ढोलकचा ठेका ह्यात वापरला आहे. राजेश खन्नाला त्याचा जो bass -grunt rasp आवाज आहे तो शोभेल का असा प्रश्न गाणे चित्रित होण्याअगोदर निर्मात्याला पडला होता. हा सुद्धा कॅबरे आहे आणि नायिकेवर चित्रित आहे. पण गाण्याच्या यशाने हा प्रश्न मोडीत निघाला.

पिंजरे में चलके आप, आ जाता है शिकार
क़ातिल पे भी कभी, आ जाता है यूँ प्यार
बातों ही, बातों में
होना है जो हो जाता है
आँखों ही, आँखों में
यारों का दिल खो जाता है
लोकांनी हा सिनेमा आणि गाणे डोक्यावर घेतले.
ओपी आशा युग अस्ताला चालले होते आणि नवीन जोडीचाच नाही तर नवीन संगीताचा उदय होण्याची सुरुवात होत होती.  

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


18 thoughts on “चिरतरुण, चतुरस्त्र गायिका  “आशा भोसले” ”

    1. वाह.. वाह.. वाह…!
      प्रियाजी.. ती सुरेल गाणी तो आशाताईंच्या दैवी स्वर… आणि तसाच गोडवा ल्यायलेला हा शब्दप्रवास..!
      क्या बात है..!

      बहोत खूब…!🙏🏻❤️🙏🏻

  1. क्या बात है, यातली तीन गाणी आजपर्यंत ऐकली नाहीत.
    गाण्यांची निवड आणि लिखाण दोन्ही सुंदर 👌👌, नेहमीप्रमाणे

    1. कोणती तीन Heramba Joshi ? मुकेश आणि तलत ऐकाच. मुकेश बरोबरचे बघा सुद्धा

  2. क्या बात है❤
    एका अद्भुत सफरीला जाऊन आल्यासारखे झाले. वाचता वाचता गाणी कानात वाजत होती, शब्द डोळ्यांनी मनात झिरपत होते, आशा अमर आहे हे पुनःपुन्हा मनात आवर्तनासारखे घुमत होते आणि मेंदू आज्ञा देत होता की एवढ्या नितांतसुंदर लेखनासाठी प्रियादी ला धन्यवाद तर द्यायलाच हवेत ❤❤❤❤❤❤

  3. उदय शेवडे

    किती हटके गाण्यांची निवड केलीत आपण. सगळी उत्तम…..आपण इतकं वैविध्यपूर्ण लिहिता की अभिप्राय देता देता आमची भंबेरी उडून जाते. शब्द कोठून आणायचे हा प्रश्न पडतो त्यामुळे आमच्या अभिप्रायात तोच तोच पणा येतो त्याला नाइलाज आहे.
    आशा आर्डी बद्दल लिहिलंय ते एकदम सही.

    दो दिल धडक …..बद्दल अभिनंदन माझ्या आवडीचे गाणे आणि गोमू संगतीनंचं निरीक्षण जबरदस्त !

  4. अप्रतिम..
    अशी आशा प्रथमच भेटली .लताबाई आदरणीय , आशा मात्र घराची ताईच आहे. प्रिया , फार छान व्यक्त झालीस .धन्यव्वद

Leave a Reply to Swati Deshpande Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *