Skip to content

आप से भी खूबसूरत आपके अंदाज है -गुलज़ार 

असे म्हणतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे अगदी लहान वयातच मूल कसे निपजेल याची झलक दिसायला सुरुवात होते. बंदिनी सिनेमासाठी, “मोरा गोरा रंग लै ले” हे गुलज़ारजीने  लिहिलेले पहिले गीत आणि बॉलीवूडच्या संगीत क्षेत्रात एका नवीन ताऱ्याचा उदय झाला.
नवीन असून आणि त्या वेळेस वय लहान असूनही निर्मात्याच्या मर्जीनुसार त्यांनी गीते लिहिलेली दिसत नाहीत. प्रत्येक गीतांत त्यांचा ठसा दिसतो एवढा दर्जा त्यांनी गेली साठ वर्षे राखला.
गाणी ऐकणे हे सुख आहे. त्या सुरांत जर गुलज़ारजींच्या शब्दांची गुंफण असेल तर दुप्पट सुख आहे. सुरांना भावना असतात आणि शब्दांना अर्थ. गुलज़ारजींचे शब्द तुमच्या मनातील भावनेला अधोरेखित करतात. समजून घेतात.
हिंदी सिनेमाचा गीतकार म्हंटले की प्रसंगानुसार गीत लिहिणे क्रमप्राप्त असतेच.
त्यामुळे सर्वच भावनांना आवाज देणारी गीते चांगला गीतकार लिहितोच पण प्रेमाला जेवढ्या रूपात त्यांनी दाखवले ते फारच कमी गीतकारांना जमले. त्यातील काही माझी आवडती गीते.

मोरा गोरा रंग लैले (आर्जव)
————————
(सिनेमा -बंदिनी,संगीतकार -एस डी बर्मन, गायिका -लता मंगेशकर, नायिका-नूतन)
गुलज़ार यांचा बिमल रॉय यांच्या चित्रपटात कसा प्रवेश झाला याच्या मागे एक कथा आहे. गीतकार शैलेंद्र यांनी बिमल रॉय यांच्या मुलीला तिच्या प्रेमप्रकरणात पळून जायला मदत केली. यामुळे रॉय आणि शैलेंद्र यांच्यात मतभेद झाले. बिमल रॉय एका नवीन गीतकाराच्या शोधात असताना, त्यांचे असिस्टंट डायरेक्टर, देबू सेन यांनी एका तरुण गीतकाराचे नाव सुचवले. गुलज़ार हे नाव मुस्लिम वाटल्याने हा मुलगा वैष्णव तत्वज्ञानावरील कविता कशी काय लिहिणार हा प्रश्न रॉयना पडला. जेव्हा “मोरा गोरा रंग लै ले “ हे गाणे एस डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्याकडे सुपूर्त झाले, तेव्हा चित्रपटातील एका अद्वितीय कालखंडाची सुरुवात झाली.

बंदिनी सिनेमातील “मेरा गोरा अंग लैले, मोहें शाम रंग दैदे “ म्हणणारी ही नायिका म्हणजे संध्याकाळच्या कळत्या उन्हात, सावल्या गढद होताना प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास जाणारी धिटुकली युवती. सामाजिक बंधने तिच्यावर आहेत तरीही ती तोडून चौकटीतल्या प्रणयाची सीमा ओलांडणारी तरुणी.
गोऱ्या रंगाचे खरेतर आकर्षण असते आणि हव्यास सुद्धा पण गोऱ्या रंगाचे अतोनात वेड असणाऱ्या या देशातली ही मुलगी वेगळी आहे. रात्रीच्या अंधारात जर तिचा रंग मिसळून गेला तर प्रियकराला सहज भेटता येईल अशा कल्पनेने ती जगापासून स्वतःला लपविण्यासाठी म्हणते, 
“मला सावळा  रंग दे कारण रात्र तिच्या अंधारात मला लपवू शकेल …”

इक लाज रोके पैया
इक मोह खीचे बैया

मनाची दुविधा तर आहेच.
एकीकडे प्रियकराला भेटण्याची आतुरता तर दुसरीकडे स्त्रीसुलभ लज्जा, पण ही नायिका धीट आहे, रसिक आहे. भावनांना बंध घालणे तिला मान्य नाही. कोणत्याही संकटाची पर्वा न करता, समाजाच्या रीती रिवाजाला न जुमानता ती प्रियकराला भेटायला आतुर झाली आहे. ही नायिका एकटी आहे. तिच्या सोबतीला आहेत फक्त लुकलुकणारे तारे, सळसळणारे वारे. अंधार किर्र्र तरीही त्याला भेटण्याच्या उत्कंठेने भितीवरही मात केली आहे.

कूछ खो दिया है पाय के
कूछ पा लिया गवाय के
शेवटी प्रेम म्हणजे तरी काय ? सर्व नात्यात असणारी देवाण घेवाणच न? काहीतरी गमवायचे आणि त्या बदल्यात बरेच काही मिळवायचे ही. स्वता:ला हरवून बसल्यावर मन कुठे भरकटतेय त्याची तरी कशाला चिंता आणि पर्वा करायची?

गीतातील शब्दात आतुरता आणि अबोधता याचे एवढे सुंदर मिश्रण आहे. निरागस नूतन , तसाच लताचा कोवळा आवाज आणि एस डी यांचे स्वर. गुलज़ार यांच्या पहिल्या गीतानेच बाजी जिंकली.

मेरा नाम अदा लिखना ( आशा)
————————————
(सिनेमा- यहाँ , संगीतकार- शंतनू मोईत्रा, गायिका- श्रेया घोषाल, नायिका- मिनिषा लांबा)

यहाँ या सिनेमाची नायिका “अदा” ही सुद्धा अबोध युवती. तारुण्यात नुकताच प्रवेश झालेली. काहीशी अल्लड, काहीही भाबडी. ती जिथे राहते ते काश्मीर पेटले आहे. तिचा भाऊ सरकारविरोधी लढ्यात सामील आहे. या सगळ्या निराशजनक घटनांत सुद्धा तिच्या मनातली आशा जिवंत आहे. साध्या गोष्टीत आनंद शोधायची तिची प्रवृत्ती आहे. अगदी जीन्स घालून उड्या मारता येणे हे सुद्धा तिच्यासाठी सुखच आहे.
त्यामुळे भारतीय सेन्याचा अधिकारी कॅप्टन अमनच्या प्रेमात पडणे तिच्यासाठी सहज घडणारी गोष्ट आहे. कितीही कठीण परिस्थितीत सुद्धा मार्ग निघणारच ही खात्री असलेल्या आशावादी प्रेमाचे हे गीत आहे.
खंबीर असली तरीसुद्धा आपले प्रेम जगापुढे आणायची नायिकेला  भीती वाटते. प्रियकराला भेटायची ओढ तर आहे पण त्याच्या गंभीर परिणामांची जाणीव आहे अशा कात्रीत सापडलेल्या तिला,  तिचा प्रियकर म्हणतो, मला तर लोकं माझ्या प्रेमाबद्दल विचारत आहेत, तिची ओळख करून द्यायला सांगत आहेत.
त्याला उत्तर देताना ती सांगते,

पूछे जो कोई मेरी निशानी, रंग हिना लिखना
गोरे  बदन पे ऊँगली से मेरा नाम अदा लिखना
कभी कभी आस पास चाँद रहता है
कभी कभी आस पास शाम रहती है

मेंदीला शुभ शकुनाचा रंग मानतात. मेंदी हे सौभाग्य आणि प्रजननशक्तीचे प्रतीक. इथे ती स्वतःलाच मेंदी म्हणवून घेते. 
जिच्या भावावर देशद्रोहाचा आरोप आहे, तिच्यासाठी एका भारतीय सेनाधिकाऱ्याशी लग्न करणे अशक्य गोष्ट आहे तरीही ती सांगते, संध्याकाळच्या सावल्या जरी दाटून आल्या असतील तरी त्यातून मार्ग काढू शकणारा, मला मार्ग दाखवणारा चंद्र सुद्धा माझ्या बाजूला आहे.

आऊं तो सुबह, जाऊं तो मेरा नाम सबा लिखना
बर्फ पड़े तो बर्फ पे मेरा नाम दुआ लिखना
ज़रा ज़रा आग-वाग पास रहती है
ज़रा ज़रा कांगड़ी की आंच रहती है

स्त्रीचे एवढे सुंदर वर्णन गुलज़ार यांनी केले आहे. ती पहाट बनून येते , ती रात्र बनून निघून जाते. ती आत्म्याने म्हंटलेली प्रार्थना असते .कधीकधी ती पेटत्या आगीचा गोळा बानू शकते पण प्रेमापोटी ती कांगडी होते. स्वतःच्या उष्णतेचा उपयोग फक्त उब देण्यासाठी करते.
ती आपल्या प्रियकराला सांगते,

शामें बुझाने आती हैं रातें
रातें बुझाने तुम आ गए हो

सायंकाळचा प्रकाशावर रात्र अंधाराचे पांघरूण घालते पण तू मात्र माझ्या आयुष्यातील अंध:कार दूर करण्यासाठी आला आहेस.
प्रेयसीने गायलेल्या अंगाईसारखे गीत वाटते हे.

भारतीय पुरुष आपल्या भावना उघड बोलून दाखवत नाहीत असा अनुभव आहे. म्हणजे फेसबुकवर लग्नाच्या वाढदिवसाला एक दिवस केलेले कौतुक, ते ही  आत्ता,  हा अपवाद. पार्टीत, समारंभात,  एखादा नवरा आपला बायकोचे  कौतुक करतो असा प्रसंग बघायला मिळत नाही. दारू घेतली तर उलट दुसऱ्याच्या बायकोकडे लक्ष जाण्याचा धोका जास्त. म्हणून
मासूम मधले पार्टी सॉंग फार दुर्मिळ आहे.(वक्त या सिनेमातले “ऐ मेरे जोहरा जबी “अजून गायले  जाते यावरून अशी गाणी किती कमी आहेत ते लक्षात येईल. )
 दारूचा एक पेग पोटात गेला की स्वतःला लावून घेतलेली शिस्त हळूहळू काढता पाय घेते. अंग सैलावते , नंतर जीभ सुद्धा.
इथे भूपिंदर, आणि सुरेश वाडकर  गात असल्याने सूर मात्र हलत नाहीत.
कधीही न येणारी अशी दुर्मिळ स्तुतीफुले अचानक कोसळू लागली तर बिचाऱ्या बायकोची काय स्थिती होईल! वरून कानकोंडे आणि आतून गुदगुल्या .
मासूम मधले हे गाणे धमाल आहे. 

हुज़ूर इस कदर भी न इतरा के चलिये (खेळकर)
——————————————————— 
(सिनेमा -मासूम , संगीतकार आर डी बर्मन, गायक -भूपिंदर , सुरेश वाडकर, नायक – नासिरुद्दीन शहा )

भारतीय समाजात स्त्रिया आपला पदर सावरून चालतात , मर्यादा पाळतात . नायक आपल्या पत्नीला सांगतो ,
“खुले आम आँचल न लहरा के चलिये”
अर्थात यालाही कारण आहे. रीती विरुद्ध असे वागणे पाहून कुणीही भुलू शकतो, भाळू शकते आणि त्याचा तोल जाऊ शकतो .

कोई मनचला गर पकड़ लेगा आँचल
ज़रा सोचिये आप क्या कीजिएगा
लगा दें अगर बढ़ के ज़ुल्फ़ों में कलियाँ
तो क्या अपनी ज़ुल्फ़ें झटक दीजिएगा
हुज़ूर इस कदर…
अर्थात मूड खेळकर आहे , माहौल मस्तीचा आहे आणि तो गुलज़ार यांनी शब्दांत व्यवस्थित पकडला आहे. 

चुपके से लग जा गले रात की चादर तले (आतुरता)
———————————————————
(सिनेमा -साथिया, संगीतकार- रहमान, गायिका–साधना सरगम, नायिका-राणी मुखर्जी)

प्रेमाची परीक्षा विरहात होते.
सौरव गांगुलीचे डोना बरोबर झालेले लग्न अनेक महिने त्यांच्या घरच्यांना माहीतच नव्हते. दोन घरात पिढ्यान पिढ्यांची दुष्मनी आणि त्यामुळे वातावरण निवळण्याची वाट पाहत असलेले ते दोघे. एकत्र असायचे लायसन्स असूनही स्वतःला दूर ठेवणे किती असह्य असेल.
चुंबकीय क्षेत्रात असूनही विलग होण्यास किती ताण पडत असेल ना, असेच काहीसे आहे साथियातील जोडीचे.
लग्न झालेले सांगणे शक्यच नाही. घरातील विरोध निवळण्याचा इंतजार असलेली ती दोघे.
चुटपुटता स्पर्श, पटकन संपणाऱ्या भेटी, दिवसांगणिक वाढत जाणारी ओढ, मुसमुसते तारुण्य आणि त्याला बांधून ठेवल्याने वाटणारी घुसमट ..मन आणि शरीर दोन्ही तहानलेले.

दिन भी न डुबे , रात न आये , शाम कभी न ढले
शाम ढले तो सुबह न आये, रात ही रात चले

कुणीही जे प्रेमात आकंठ बुडले आहेत आणि ज्यांना परिस्थितीपायी दूर राहावे लागत आहे, त्या कुणालाही ह्या ओळींतील आर्तता सहज जाणवेल.

दोस्तों से झूठी-मूठी दूसरों का नाम ले के
फिर मेरी बातें करना, यारा रात से दिन करना
लम्बी जुदाई तेरी बड़ा मुश्किल है
आहों से दिल भरना, यारा रात से दिन करना
कब ये पूरी  होगी, दूर ये दूरी होगी
रोज सफ़र करना

कुणाला समजू नये म्हणून आपल्या  प्रेयसीचे नाव लपवून, वेगळ्या नावाचा आधार घेऊन बोलणे. ज्या नावाच्या उच्चारानेच अंगावर शहरा  येतो ते नाव घ्यायला सुद्धा बंदी .. केवढी त्रासदायक आहे आहे ही जुदाई.  हृदयात केवळ तिच्या आठवणीने दाटून आलेला कढ नी तिच्या आठवणीत त्रासदायक झालेली रात्र. 

चुपके से चुपके से, रात की चादर तले
चाँद की भी आहट ना हो, बादल के पीछे चले
जले कतरा कतरा, गले कतरा कतरा
रात भी ना हिले आधी आधी
चुपके से लग जा गले…

तिला कल्पना आहे त्याच्या मनस्थितीची आणि तिच्याच कडे तर त्याच्या रोगाचा इलाज आहे.
रात्रीची चादर अंगावर पांघरून आपण भेटलो तर! ती सांगते,  ढगांच्या आड लपून आणि त्या खट्याळ चंद्राला हुलकावणी देऊन आपण भेटूया.
इतके दिवस विरहाने तापलेल्या आपल्या देहांचे हे  मिलन रात्र सुद्धा श्वास रोखून बघेल ..

गुलज़ार यांच्या गीतात चंद्रप्रकाशात भेटणारे प्रेमिक अनेक वेळा दिसतात. मोरा गोरा रंग ले लै .यात नायिका चंद्राला स्वतःचा रंग देते म्हणजे काळोखात ती तिच्या प्रियकराला निर्धास्त भेटू शकेल तर याच सिनेमातील ओ हमदम सुनियो रे या गीतात चंद्र प्रियकराला सोबत करत तिच्या घरी येतो.

फरवरी कि सर्दियो कि धूप में 
मूंदी मूंदी अखियोंसे देखना 
हाथ कि आर से 
निम्मी निम्मी ठंड और आग में 
हौले हौले मारवा कि राग में 
मीर कि बात हो……

फेब्रुवारी महिना ….गुलज़ार यांनी महिना सुद्धा कसा निवडला आहे ते पाहा. थंडी संपून उन्हाळा सुरु होण्याचा काळ. ही  थंडी बोचरी नसते आणि येणारा उन्हाळा ही उबदार असतो.
नायिका सांगते, मी या दिवसांची वाट पाहीन जेव्हा तू आपल्या हाताच्या आडोशातून माझ्याकडे टक लावून बघत राहशील. मीरचे शब्द नी मारव्याचे सूर मिलनाचा रंग अजून गढद करतील. आपण बरोबर असताना मनापासून वाटते की हा दिवस संपूच नये, संध्याकाळच्या किरणांपुढे मान तुकवून रात्रीने पुढे सरकूच नये, संध्याकाळ मावळू नये आणि जर तिने तो गुन्हा केलाच तर निदान सूर्याने तरी दर्शन देऊ नये.  ह्या ओळी ऐकल्या  की विरहाच्या रंगाचे अजून एक गीत आठवते.

ओ साथी रे , दिन डुबे ना (उत्कट)
—————————————
(सिनेमा -ओंकारा , संगीतकार-विशाल भारद्वाज, गायक– श्रेया घोषाल, विशाल भारद्वाज, नायिका नायक –करीना , अजय देवगण)

आम्ही कॉलेज मध्ये असताना तासांचे वेळापत्रक घरी पाठ असायचे. त्यामुळे उशीर झाल्याची कारणे, सबबी सांगता यायच्या  नाहीत.  उगाच टवाळक्या करत हिंडायला परवानगी नव्हतीच. त्यामुळे ज्यांचे जमले होते त्यांच्यासाठी अगदी तासाला एकत्र बसणे सुद्धा स्वर्गसुख . हळूच पास ऑन केलेल्या चिठ्या (ते सुद्धा धाडसच), इतरांची नजर चुकवून, टाकलेला कटाक्ष, खाली मान घालून लाजणे वगैरे मधेच दिवस संपायचा आणि असा वेगवेगळा राहूनही घालवलेला दिवस सुद्धा संपूच नये असे वाटायचे…

प्रेम आणि विरहाचे एक अगम्य नातं आहे. विरहाच्या भीतीने प्रेम जास्त बळकट होते. हट्टी होते. जर ताटातुटीची भीती नसेल, जर मृत्यूची शक्यता नसेल तर कदाचित आपण बंधनाचा आग्रह धरू असे खरंच वाटत नाही. एकदा शक्यता संपल्या की त्या नात्यातील आव्हान संपते. 
म्हणून प्रेमगीतांपेक्षा सुद्धा विरहात घातलेली साद माणसाला जास्त जवळ आणते.
कोणाशी तरी एकरूप होण्याची तीव्र इच्छा जन्मापासूनच माणसाला असावी. या जगात येण्याआधी सुद्धा त्याची नाळ जोडलेली असतेच की त्याच्या जन्मदात्रीशी. जेव्हा ती तुटते तेव्हा ती अपूर्णता त्याला जाणवत असणारच.  A need to be known, to be embraced and to be sheltered.
फोडलेला पहिला टाहो हा त्या अज्ञात्याला साद असणार.
प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर जेव्हा जाणीवा  जागृत होतात तेव्हा ती ओढ सुरक्षा, सत्य, मर्यादेच्या आणि औचित्याच्या सीमा ओलांडून  जाते. 

ओ साथी रे दिन डूबे ना . 
आ चल दिन को रोके , धूप के पीछे दौडे
छांव छुहे न ….

सूर्याच्या पाठी धावलो तर आपली सावली सुद्धा आपल्याला स्पर्श करणार नाही. अंधाराला थांबवण्यासाठी केलेले वेडे साहस केवळ प्रेमच करू शकते.

थका थका  सूरज जब नदी से होके निकलेगा 
हरी हरी कायी पे पांव पडा तो फिसलेगा 
तुम रोक के रखना , मै जाल गीराऊ 
तुम पीठ पे लेना मैं हाथ लगाऊ 
दिन डूबे ना .

दिवसाच्या श्रमांनी दमलेला सूर्य जेव्हा नदीजवळ टेकतो तेव्हा तिच्या काठाशी असलेल्या शेवाळावर घसरून, आत गुडूप होण्याच्या अगोदरच तू पकड.  मी मदत करीन तुला जाळे  घेवून . पण त्याला मावळायला देवू नकोस.
मोह, अनावर होणारी ओढ याची तीव्रता जास्त. ही आकर्षणाच्या पुढची पायरी. नीतीनियम , रूढी ,कर्तव्य यांच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडण्याचे आवाहन करतो तो हा मोह.  खरी तगमग, अस्वस्थता असते ती या काळात. मनाच्या कडेकपारीतून हाक उठत असते एका आवेगाने. कितीही स्वताला आवरायचा प्रयत्न केला, कितीही नितीमत्तेची आवरणे चढवली तरी त्या आवरणाखाली एकाच इच्छा असते … ” I want you “

तेरे दोहरे बदन में सील जाऊंगी रे 
जब करवट लेगा छील जाऊंगी रे

पूर्ण गाण्यातील मला भावलेली ओळ . 
एकमेकांच्यात इतके सामावून जावू, जणू काही दोन भाग शिवल्यासारखे. इतके की तू जरी कूस पालटशील तरी मला वेदना होतील.
This is an irresistible temptation making the sanest man go mad.

बॉलीवूड जरी प्रेम आणि शृंगाराच्या पायावर उभे असले तरी स्त्रियांच्या नजरेतून, शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली गाणी अतिशय कमी आहेत आपल्याकडे . प्रेम खट्याळ, पवित्र, निरपेक्ष सगळे काही असते पण जेव्हा त्याची कामूक  बाजू दाखवायचा प्रश्न येतो, तेव्हा सेन्सॉर बोर्ड जागा होतो. खजुराहोची जी मंदिरे या देहाच्या सोहळ्याला समर्पित आहेत, तिथे शारीरिक प्रेमाचा अर्थ फार वेगळा आहे. समागम ही नुसती क्रिया नाही तर ते आहे पुरुष आणि स्त्री दोहोंसाठी स्वतःचे काहीही मागे न ठेवता सर्वस्व अर्पून टाकणे.  प्रेमाची संपूर्णता स्वतःच्या विलयातून अनुभवणे. त्याची सुरुवात होते ती मनाच्या ओढीतून. मग ती एवढी वाढत जाते की देहाचे स्वतंत्र अस्तित्व सुद्धा सहन होत नाही . “मी” पण विरघळण्याचा हा क्षण तितकाच पवित्र असतो कारण त्यातून नवनिर्मितीचे, पर्यायाने सृष्टीचे सातत्य सांभाळले जाते.
चार पुरूषार्थात कामाचे एवढे महत्व असताना सुद्धा त्याविषयी लिहिण्याची, बोलण्याची मोकळीक का नसावी ?
पुरुषसत्ताक समाजात, सहवास सुखाची मागणी करणाऱ्या अशा नायिका आणि त्यांचे गीते अभावानेच दिसतात.  तरीही इतिहासात , साहित्यात अशा स्त्रिया दिसतात ज्या आदीम स्त्रीशी नाते जोडतात. भावना, वासनांनी परिपूर्ण अशा इव्हची प्रतिमा बनतात. स्त्रीसुलभ ओढीने पुरुषाला सर्वस्व समर्पण करण्यासाठी झेपावतात. गंगा , उर्वशी , अहिल्या , क्लीओपात्रा आणि अनेक .
स्त्रीचे एक रसरशीत उत्तेजक रूप.

रात का नशा अभी , आँख से गया नही (मादक)
———————————————
(सिनेमा -अशोका, संगीतकार-अन्नू मलिक, गायिका- के एस चित्रा , नायिका -करीना कपूर)

तो आणि ती एकत्र आलेल्या एका रात्रीची कहाणी. तृप्ततेची आणि नंतरच्या विरहाची .
रात का नशा अभी, आँख से गया नही
तेरा नशीला बदन, बाहों ने छोडा नही
आँखे तो खोली मगर, सपना वो तोडा नही
सासो पे रखा हुआ तेरे होठो का सपना अभी हैं वोही .

रात्रीच्या उन्मादाची नशा अजूनही माझ्या डोळ्यात आहे. तुझा स्पर्श माझ्या नसानसात भिनलेला आहे. माझ्या ओठावर फुललेले स्वप्न अजून ओठावरच रेंगाळत आहे आणि हो, रात्र संपून गेली हे माहीत आहे मला पण तुझ्या सहवासाचे स्वप्न मी आता उघड्या डोळ्याने पाहत आहे .रात्रीची सुद्धा नशा चढते आणि ती उतरत नाही.  एका रात्रीच्या बदल्यात जन्माची अतृप्ती घेऊन जगणे यासारखे दिव्य नाही .
एका रात्रीचा सहवास आणि त्या नंतरची कासावीस जीवघेणीच

तेरे गले मिलने के मौसम बडे होते हैं
जन्मो का वादा कोई . ये गम बडे छोटे हैं
लंबी सी इक रात हो , लंबा सा इक दिन मिले
बस इतना सा जीना हो ,मिलन की घडी जब मिले

तुझ्याबरोबर घालवलेले हे क्षण एवढे अमूल्य आहेत , की आता भाळी लिहिल्या गेलेल्या विरहाचे दुःख वाटत नाही . आपले एकत्र येणे हे याच जन्माचे नाही तर प्रत्येक जन्माचे संचित आहे But , as of now ,I only want a whole day and one lasting night of togetherness.

गुलज़ार यांची असंख्य गीते आहेत, काही अतिशय प्रसिद्ध पण त्यांचे भाषांतर करणे माझ्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. केवळ शब्दच नाही तर त्यातील अर्थही बहुपेडी आहे. तरीही एका गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होत नाही.
प्रत्येक गीतात गुलज़ार यांनी प्रेमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे गीत त्याचा निष्कर्ष वाटतो मला

लबोसे चुम लू , आँखोंसे थाम लो मुझको (समर्पण)
———————————————————
(सिनेमा-आस्था, संगीत- शारंग देव, गायिका- श्रीराधा बॅनर्जी, नायिका-रेखा)

कोणतीही भावना एका जागी स्थिर होत नाही. प्रेम नाही,  ममता सुद्धा नाही. त्याची तीव्रता बदलत जाते.
It keeps on evolving.
प्रेमाची सुरुवात होते आकर्षणातून. नजरेचा खेळ असतो तो
मग शब्दाची भाषा बोलली जाते. प्रश्न विचारला जातो, उत्तर मागितले जाते. मिळाले की स्पर्शाची भाषा बोलली जाते.
आधी नजरेला नजर मिळाली की ती पहिल्यांदा झुकते. नंतर धीट होते; मग हातात हात अडकले जातात . नंतर शब्दांची गरज भासत नाही .
आता ओठ एकमेकांची ओळख पटवतात. ओठापर्यंत मजल आल्यावर मात्र अंतर ठेवणे कठीण होऊ लागते . 
दोनाचे एक होण्याची निकड वाटू लागते . मंत्राक्षता डोक्यावर पडतात . आता जो आवेग असतो त्याला अडवणारे कोणीही नसते. ती दोघेच; शरीराच्या कणाकणावर आपला अधिकार प्रस्थापित करतात. दोन प्रेमात असणाऱ्या माणसांसाठी हा फक्त शारीरिक अनुभव नसतोच. अशा जागेला ते शरीराच्या माध्यमातून स्पर्श करतात जिथे कोणी पोचले नसते . One soul touches the inner core of the other soul.

मैं आरजू की तपीश में पिघल रही थी कहीं 
तुम्हारे जिस्म से होकर निकल रही थी कहीं 
बडे हसीन थे जो राह में गुनाह मिले

दोनाचे एक होतात आणि तिसऱ्याची चाहूल लागते. हा जीव त्या दोघांना जोडणारा. त्याच्याबरोबर त्यांचे नाते ही फुलू लागते. त्यांचे बालपण त्यांच्या समोर आकार घेवू  लागते . नंतर त्यांचे ही नाते फक्त प्रियकर प्रेयसीचे रहात नाही. त्यात इंटेन्सिटी असतेच पण फक्त शारीरिक नाही … कधीतरी एका उत्कट क्षणाला त्याला ती त्याची आईही वाटते.  तिच्या कुशीत नुसते डोके ठेवून पडून राहावेसे वाटते . केसात फिरणारी तिची बोटे फक्त रोमांचित नाही करत आता; एक तृप्ती ही देतात.
आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर हे नाते असाही मोड घेते …

तुम्ही से जन्मू तो शायद मुझे पनाह मिले.
हे एक आश्वासक, विश्वासाच्या पायावर उभे असलेले नाते असते.

(दुर्दैवाने दिग्दर्शक या गाण्याला न्याय देऊ शकला नाही .. गुलज़ारजींच्या एका मुलाखतीत त्यांनी हा अर्थ सांगितला आहे)  

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


22 thoughts on “आप से भी खूबसूरत आपके अंदाज है -गुलज़ार ”

  1. प्रिया,

    असंख्य गाण्यातून अशी वेगळी,हटके गाणी निवडून लिहिणं हे तूच करु शकतेस.
    अप्रतिम.
    ❤️❤️❤️

    1. Thank you Vidula .
      गुलजार बाबतीत खरंच कठीण ..म्हणून थीम घेतली
      नाहीतर जीवन आणि एकाकीपणा यावर सुद्धा त्यांची अप्रतिम गाणी आहेत.

  2. अरे बापरे बाप…
    खरंच बाप आहेस तू
    कोपरापासून नमस्कार तुला🙏🙏

    काय सुंदर लिहिलं आहेस ग…
    एक से एक गाणी निवडली आहेत..❤️🥰
    काय वर्णन केलयेस…वर्णन वाचून पुन्हा ते गाणे ऐकण्याचा मोह होतोय…❤️

    एक घट्ट मिठी यासाठी तुला डियर❤️🥰🌹💐🍫
    अतिशय सुंदर🌹🥰❤️👌👌👌👌

    1. गाणी खरंच सुंदर आहेत ना ..बघायला सुद्धा .
      आधीची गाणी ..आंधी म्हण किंवा घर …तीही छान पण एवढ्या वेळा लिहिलंय
      म्हणून यावेळी जरा नवीन गाण्यांचा शोध घेतला
      मजा आली
      आता भेटूया आपण Archana 🙂 Hugs .

  3. फारच अप्रतिम! माणुसही तसा आहे. काय गाणी निवडली आहेत…. वाह्ह्ह. एकदम वेगळी…. मला नेहेमी मजा वाटते की दर वेळी ‘ प्रेम ‘ ‘ ओढ ‘ ‘उत्कटता ‘ अशा सगळ्या भावनांवर ‘गुलजार ‘ हे नावं आले की लिहिले जाते. गाणी कोणतीही असोत… नवी, जुनी, अगदी आत्ता लिहिलेली… पण उत्कटता तेवढीच जाणवते…. कमाल आहे नै!!

    1. Vaishali ,
      हो ..वयामुळे फक्त शैली बदलली ,
      आधी त्यांची गाणी साधी शब्दरचना होती ..नंतर उर्दू जास्त ..कदाचित सुफी शैली जी विशाल भारद्वाज आणि रहमान वापरतात म्हणून असेल
      पण उत्कटता तशीच आणि वयानुसार
      म्हणजे कॉलेजच्या मुलांचे गाणे असेल तर भाषा तशीच ..मला नवल वाटते ..या वयात

  4. असंख्य, अगणित गाणी लिहिणाऱ्या गुलजार सरांची ही अगदी वेगळी गाणी निवडून जे काही लिहिले आहे ते अगदी अफलातून आहे. म्हणजे गुलजार सरांनी जर वाचले तर ते सुद्धा आवाक होतील इतके सुरेख लिखाण झाले आहे💕💕💕💕

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *