Skip to content

ढासळलेल्या कुटुंबसंस्थेचा  साक्षीदार — “ज्येष्ठोपुत्रो”

समाज तयार होतो तो अनेक कुटुंबांमुळे;  तर कुटुंब तयार होते एकमेकाशी नात्याच्या आधाराने जोडलेल्या व्यक्तींमुळे. माणसाने आपल्या गरजेनुसार, माणसा माणसाला जोडले जावे म्हणून नात्यांची निर्मिती केली, त्यातून कुटुंब संस्थेचा जन्म झाला. एकमेकांची सुख दुःखे वाटून घेता यावी , विचारांची, भावनांची देवाण घेवाण व्हावी हा कुटुंब संस्थेचा हेतू होता.
भारतीय मध्यमवर्गीयात सुरुवातीला तरी कोणत्याही मोठं मोठ्या अपेक्षा न ठेवता, वाट्याला आलेले जीवन आनंदाने घालवायचा प्रयत्न कुटुंबातील व्यक्ती करत होत्या. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र  भौतिक सुखाकडे आकर्षित झालेल्या माणसाचे जीवन, त्याची वित्तलोलूप वृत्ती याचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष परिणाम कुटुंब संस्थेवर झाला. स्व च्या प्रगतीला महत्व आले. पैसे आणि प्रतिष्ठा , प्रेम आणि विश्वासापेक्षा वरचढ झाल्या. भौतिक प्रगतीसाठी माणसे , आपल्या माणसांपासून, पहिल्यांदा शरीराने नंतर मनाने दूर जाऊ लागली.
त्यांचे विश्व, त्यांची मूल्ये, त्यांच्या आशा अपेक्षा ह्या वेगळ्या झाल्या.
अशा विघटनशील कुटुंब व्यवस्थेतील तुटणाऱ्या, विखुरल्या जाणाऱ्या भावबंधनाचा वेध घेण्याचा प्रयत्न “ज्येष्ठोपुत्रो “ या सिनेमात केला आहे.

जेष्ठ पुत्र ही दोन भावांची गोष्ट आहे. एका सुशिक्षित, सुसंकृत मध्यमवर्गीय कुटुंबात ही मुलं वाढतात. मोठा  भाऊ, इंद्रजीत,  आपल्या सुखाच्या शोधात गाव सोडून जातो. महत्वाकांक्षी असल्याने शहरात सिनेइंडस्ट्रीत काम मिळवतो. बऱ्यापैकी अभिनय, रूप आणि चांगले  नशीब याच्या जोरावर सुपरस्टार होतो. या सगळ्यात गाव, गावातील त्याची माणसे, त्याच्या जबाबदाऱ्या मागे राहतात. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. तो  यशस्वी होण्यासाठी त्याच्यावर जीव लावणारी  माणसे सोडतो. धाकटा , पार्थो,  तिथेच राहतो. छोटीशी नोकरी आणि गावातीलच एका लहान नाटक संस्थेत काम करणे यात व्यस्त होतो. घराच्या लोकांची जबाबदारी तक्रार न करता उचलतो.
भावांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य, त्यांनी घेतलेली जबाबदारी, त्यांचे यश -अपयश, यामुळे वाटणारी खंत , मत्सर यांची ही कहाणी आहे.

शूटिंग चालू असताना गावाकडून फोन येतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले असते. ही बातमी सेट वर पसरते, मग वाऱ्यासारखी शहरात पसरते. मुख्यमंत्र्यांचा फोन  येतो. गावी जाण्यासाठी हेलिकॉप्टर, आणि तिथे राहण्यासाठी गेस्ट हाऊस ची सोय सरकार करते. तो फक्त मृत व्यक्तीचा मोठा मुलगा नसतो , तो त्या राज्याच्या  लोकांच्या गळ्यातील ताईत असतो.

एक नावाजलेला लोकप्रिय नट जेव्हा बल्लभपूर सारख्या छोट्या गावात कितीतरी वर्षांनी परत येतो तेव्हा गावकऱ्यांची त्या दुःखद प्रसंगात प्रतिक्रिया काय असू शकते हा एक भाग आणि वडिलांचे क्रियाकर्म केवळ वयाने मोठा म्हणून इंद्रजीतकडून व्हावे हे योग्य का ज्यानी न बोलता ही जबाबदारी पेलली त्याला हा हक्क मिळावा हा दुसरा भाग , ह्या दोन्ही प्रश्नांवर हा सिनेमा विचार करायला लावतो.
वडिलांच्या मृत्यूनंतर या छोट्याश्या गावात एका मोठ्या नटाने येणे ही मृत्यूपेक्षाही मोठी बातमी बनते. हेलिकॉप्टरमधून उतरणारा, पांढऱ्या डिझायनर कुर्त्यातील  देखणा स्टार, त्याच्याबरोबर असलेली त्याची इंग्रजीत बोलणारी सेक्रेटरी, त्याचा ड्रायव्हर, त्याला हवे नको पाहणारा खाजगी माणूस, त्याचे बॉडीगार्डस हा सर्व लवाजमा  पाहायला मिळणे ह्याचे अप्रूप या खेडेगावातील माणसांनां असणे स्वाभाविक.

वडिलोपार्जित मोठी हवेली असूनही त्याची व्यवस्था एका मोठ्या गेस्ट हाऊस मध्ये होते. त्याचे आपल्या भावाला भेटणे हा सुद्धा एक इव्हेंट असतो. त्याचे चित्रिकरण केले जाते. हवेली बाहेर लोकांची गर्दी जमते. बाहेरील लोकांचे सोडाच, भेटायला येणारे नातलग सुद्धा सेल्फीचा आग्रह करतात.
ह्या सर्वात स्वतःचे स्टारडम बाजूला ठेवून दुःखात असलेल्या मुलाच्या भूमिकेत शिरणे इंद्रजीत सारख्या कसलेल्या नटाला ही अवघड जाते. शेवटी लोकांसमोर असलेली त्याची प्रतिमाही  त्याच्यासाठी महत्वाची असते. तसेही जेव्हा तो खराखुरा मुलगा बनायचा प्रयत्न करतो, तेव्हा बाहेरील लोकांचा एवढा हस्तक्षेप असतो की आधीच मृतवत असलेले ते घर आणि नाती , अजून मोडकळीला येतात.
एखाद्या सिनेमातील भूमिकेप्रमाणेच तो त्याला दिलेल्या गेस्ट हाऊस मधील बंगल्याच्या बाल्कनीत जाऊन जमलेल्या लोकांना हात करतो, नमस्कार करतो आणि एका सेकंदात नम्रतेचा मुखवटा फेकून त्यांना जायची आज्ञा देतो.

चित्रपटाचा सुरुवातीचा सीन इंद्रजीतचा  खरा परिचय करून देतो. एका वृद्ध माणसाचा तो रोल असावा. त्याच्या डोक्यावर विग आहे. मेकअपचा थर आहे. मृत्यूची बातमी आल्यावर पॅक अप केलं जाते. त्याचा विग काढतात. मेकअप पुसला जातो. आतला  चेहेरा हळूहळू बाहेर येतो.
पण केवळ त्वचा म्हणजे चेहेरा नसतो. तो फक्त वरचा मुखवटा. अनेकवेळा चेहेऱ्यावर एवढे मुखवटे असतात की त्यातला आपला खरा कोणता असला पाहिजे ते  लक्षात येणे अवघड असते आणि आले तरी तो घालणे त्याहून कठीण होत जाते.
काम करता करता सामान्य जगणे इंद्रजीत कधीच गमावून बसला आहे.
हा जेष्ठ पुत्र सुद्धा लोकांसाठी घातलेला एक मुखवटा आहे .

ह्या सगळ्या कोलाहलात त्याच्या धाकट्या भावाची, पार्थोची,  परिस्थिती फार विचित्र होऊन बसते. दहा वर्षात दोन्ही भावांचा संपर्क नसतो. त्याचे एखाद्या प्रसंगानुरूप येणं झालं असेलही तरी त्याची कोणतीही मदत नसते. एवढ्या वर्षात वडिलांचे खचत जाणे त्यानी पाहिलेलं असते, भोगलेले असतं. आपला भाऊ आपल्या दुःखात सहभागी होणार आहे याचा दिलासा मिळत असतानाच, एका यशस्वी नटाच्या उपस्थितीने आवश्यक असलेली शांतता सुद्धा मिळणे  अशक्य आहे याची जाणीव त्याला अस्वस्थ, दुःखी आणि क्रोधीत करते. फोटोग्राफर, बातमीदार, बघे, चाहते, उत्साही नातलग यांच्या कोलाहलात या प्रसंगाची गंभीरता आणि पवित्रताच नाहीशी होते.

पार्थोची पत्नी गरोदर आहे. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिच्या हालचालीवर मर्यादा आली आहे. याशिवाय वेडेपणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बहिणीची, इलाची,  जबाबदारी सुद्धा तो कितीतरी वर्षे मुकाट पेलतो आहे. वेडेपणाच्या भरात इला, कदाचित कुणाला इजा करेल किंवा घर सोडून जाईल या कारणासाठी इलाला कोंडून ठेवणे आवश्यक आहे असा पार्थोचा अनुभव आहे पण इंद्रजीत इलाला मोकळे सोडण्याची विनंती करतो. त्याचा परिणाम काय होईल याची त्याला जाणीव नाही. इला खरंच घर सोडून जाते. तिला शोधणे ही घरच्यांसाठी जबाबदारी तर बघ्यांसाठी आणि बातमीदारांसाठी बातमी ठरते. इंद्रजीत तिला शोधून आणतो खरा पण तेही फ्लॅश लाईट्स च्या कडकडाटात, ज्याची त्याला सवय असते पण पार्थोसाठी मात्र हा तमाशा सहन करणे अवघड होत जाते. त्याचे खाजगी आयुष्य अशा तर्हेने लोकांसमोर येणे त्याला असह्य होते.

या घरच्या मंडळींबरोबर इंद्रजीतची लांबची बहिण सुद्धा त्याच्यासाठी आली आहे. कधीकाळी त्यांच्यात आकर्षण होते.आता तिचे लग्न झालं आहे, तिच्या सासरी ती सुखी आहे पण इंद्रजीत बद्दल अजूनही तिच्या मनात आसक्ती आहे. आपल्या आकांक्षा पोटी इंद्रजीतने केवळ घराचा त्याग केला नाही तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, जिच्याशी लग्न ठरलेलं होत अशा मुलीचा, गार्गीचा,  सुद्धा त्याग केला आहे. ज्या शाळेची स्थापना त्याच्या वडिलांनी केली, त्याच शाळेत ती शिक्षिका आहे. समाजसेवेचा वारसा तिच्याकडे आला आहे. त्याच्या प्रतिमेच्या प्रभावापासून ती दूर आहे. कदाचीत इंद्रजीत हा माणूस तिने जवळून अनुभवला आहे.

या दोघांचे आधीचे आयुष्य कसे होते, त्यांचे प्रेम कसे जुळले , का तुटले ह्याचा उल्लेख सिनेमात येत नाही ते मला फार आवडले. ते कसेही असले तरी इंद्रजीतच्या महत्त्वाकांक्षेने आणि गार्गीच्या आपली भूमिका न सोडण्याच्या जिद्दीने तुटणार होतेच .. मग पाठी पाहून तरी काय उपयोग !

इला चे वेडेपण एका अपघाताचा, दुर्दैवी घटनेचा  परिणाम आहे हे संवादातून समजते. तसेतर तिच्या दुर्दैवाची जेवढी थोडक्यात बोळवण केली आहे तशीच तिचीही. ह्या घराची विक्री होऊन वाटणी व्हावी ही पार्थोची इच्छा आहे. घर सांभाळणे त्याला अशक्य आहे. यासाठी त्याला इंद्रजीत कडून  NOC ची गरज आहे पण ह्या साऱ्यात इला ची भूमिका काय असावी , ती कुठे राहणार याला फारसे महत्व नाही. ती निर्णय घ्यायला सक्षम आहे की नाही हा वेगळा प्रश्न. ..मध्यमवर्गीय कुटुंबात तसेही मुलीला कुठे महत्व असते! अग्नी कुणी द्यायचा इथपासून मुलाचे महत्व अधोरेखित आहे. पार्थोची पत्नी राय हिलाही त्या घरात तसे महत्व नाही. अधिकार नाही. पार्थोचे तिच्यावर प्रेम आहे पण घरात तिच्या मताला अर्थ नाही.

एकाच पातीची दोन मुले मोठेपणी एकमेकांपासून पूर्णतः वेगळी होतात. हे पचवणे पार्थोसाठी  कठिण आहे. पार्थो हा खरेतर उत्तम अभिनेता आहे पण नशीब म्हणा किंवा त्याचा कमी पडलेला आत्मविश्वास, तो आणि त्याची कला त्या छोट्याश्या गावा पुरती सीमित राहाते. याची त्याला खंत आहे. भावा बद्दल हेवा सुद्धा. 
काहीच होऊ न शकणारी माणसे जे मिळाले नाही त्याला खाली पाडायचा प्रयत्न करतात. पार्थोने कितीही नाट्य कलेची महानता सांगायचा प्रयत्न केला तरी सिनेमा बद्दल असलेले आकर्षण, काहीसा मत्सर, तिथं मिळणारी लोकप्रियता आणि वैभव त्याला कधीही मिळणार नाही याचे दुःख त्याच्या देहबोलीतून दिसते. आपण वडिलांची देखभाल करण्यात कमी पडलो ह्या अपराधी पणाच्या भावनेतून इंद्रजीत सुरुवातीला पार्थोचा  राग सहन करतो पण नंतर मात्र त्याचा कमीपणा त्याला स्पष्ट शब्दात बोलून दाखवतो .

सिनेमातली ही जुगलबंदी अतिशय सुंदर रित्या चित्रित केली आहे. संवाद आणि अभिनय यात नक्की कोण उजवे ठरले आहे हे निवडणे कठीण होते . दोघांची प्रवृत्ती, दोघांची परिस्थिती आणि पुढे जाण्याची मानसिकता यातील फरक या दोन सीन्स मध्ये छान दाखवला आहे.
प्रसेनजीत (इंद्रजीत) यांनी ही भूमिका जगली आहे. एकतर तो स्वतः बंगाल फिल्म इंडस्ट्रीचा नावाजलेला नायक आहे पण त्याही पेक्षा या भूमिकेला त्याच्या आयुष्यात एक वेगळा अर्थ आहे.
प्रसेनजीत यांची आई, मृत्यू पावल्यानंतर, प्रेस, त्याचे चाहते, इतकंच काय तर त्याचे स्वतःचे मित्र यांचा जो अनुभव त्याने घेतला आहे, खरेतर त्या अनुभवावर ही कथा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, ऋतुपर्ण घोष तेव्हा प्रसेनजीत बरोबर असल्याने त्याने ह्या अनुभवाला चित्रपटाचे रूप द्यायचे ठरवले. त्या आधी त्यांचे निधन  झाले आणि चित्रपट कौशिक गांगुली यांनी दिग्दर्शित केला.
संवादाबरोबर सुद्धा असे अनेक क्षण आहेत की केवळ आपल्या नजरेने त्यांनी जिवंत केले आहेत. आपल्या बहिणीकडे बघतानाची त्याची प्रेमळ पण हताश नजर, किंवा गार्गी बरोबर वडिलांच्या शोकसभेत गाताना त्याचा शोकाकुल चेहेरा, आपल्या लांबच्या बहिणीने चुंबन घेतल्यानंतर वाटलेली शिसारी , काहीही न बोलता , रुमालाने तिचा स्पर्श पुसण्याचा प्रयत्न हे सर्वच प्रसंग अतिशय सुंदर अभिनित आहेत.
रित्विक चक्रवर्ती (पार्थो ) हा ग्लॅमरस नाही, त्यामुळेच  भूमिकेला साजेसा आहे आणि  हाच फॅक्टर त्याला कुठल्याही भूमिकेत फिट्ट बसवतो.
प्रसेनजीतच्या रुबाबाचा त्याला थोडा मत्सर आहे, स्वतःच्या अपयशाबद्दल खंत आहे पण कुठेही त्याला न्यूनगंड नाही ..फार सूक्ष्म फरक आहे हा , त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवला आहे. सुरुवातील इंद्रजीत आणि त्याच्या फॅन्स आणि प्रसिद्धी बद्दल  तटस्थ असलेला पार्थो, नंतर प्रसंगाची गंभीरता आणि पवित्रता कायम राखण्यासाठी स्वतःच्या हातात सूत्रे घेतो आणि क्रियाकर्म करण्याचा अधिकार मला दे असे इंद्रजीत ला सांगतो.
इंद्रजीतची यावरची प्रतिक्रिया हा या सिनेमाचा क्लायमॅक्स आहे. केवळ मोठा म्हणून जेष्ठ, केवळ कर्तव्य पालन करणारा म्हणून जेष्ठ का परिस्थितीचे आणि त्याबरोबर स्वतःचे मूल्यमापन करून प्रगल्भता दाखवणारा जेष्ठ ..  प्रेक्षकाला स्वतःचे उत्तर निवडायचे आहे.
सुदीपा चक्रवर्ती (इला) हिची भूमिका सत्य आणि कल्पना यांच्या सीमेवर अडकलेल्या मुलीची भूमिका आहे. कधीतरी अतिशय नितळ चेहेरा आणि अचानक कोणत्यातरी आठवणीने पिळवटलेला चेहेरा , कोणत्या क्षणी ती काय करू शकते याचा अंदाज कुणालाही येत नाही. इलाच्या वाट्याला या सिनेमातील अत्यंत सुंदर संवाद आलेला आहे.
“ एवढे मोठे घर आणि तेवढ्याच रिकाम्या खोल्या “
मोठी घरे , मोठ्या कुटुंबासाठी असतात. माणसे मरतात किंवा निघून जातात आणि घरात राहतात ती आठवणींची भुते. असे आठवणीने झपाटलेले घर राहण्यासाठी योग्य मानले जात नाही.

कौशिक गांगुली या अडचणींवर तोडगा सांगत नाहीत. मध्यम वर्गाच्या ढासळत चाललेल्या कौटुंबिक मूल्यांवर तसाही काही उपाय नाही. सिनेमाची कथा सरळसोट आहे. त्यात कसलीही वळणे किंवा धक्के नाहीत.
त्यामुळेच सिनेमा धक्कादायक वाटतो कारण आपणही याहून वेगळे वागू शकलो नसतो ही सामान्य प्रेक्षकांची प्रतिक्रया होईल एवढा हा वास्तव सिनेमा आहे.  
ऍमेझॉन प्राईम वर हा सिनेमा पाहायला उपलब्ध आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

20 thoughts on “ढासळलेल्या कुटुंबसंस्थेचा  साक्षीदार — “ज्येष्ठोपुत्रो””

  1. प्रिया,

    इतर प्रांतातील ,भाषेतील चित्रपटांवर तू लिहीत होतीस.
    त्यामुळे ते ते चित्रपट बघितले गेले. नाहीतर त्या रस्त्याला कधीही गेले नसते.
    आता हा सुद्धा बघणार नक्की.
    नेहेमी सारखं अप्रतिम लिखाण..
    ❤️❤️❤️
    “लक्ष्या “चा ‘एक होता विदूषक ‘ हा चित्रपट आठवला.
    जब्बार पटेल दिग्दर्शित,
    पु.ल. देशपांडे लिखित
    या चित्रपटात एका प्रसिद्ध कलाकाराची आई गेल्यावर त्याला लोक ते दुःख सुद्धा नीट व्यक्त करु देत नाहीत.
    बाकी कौटुंबिक गुंतागुंत त्यात नाही.
    तू बघितला असशील तर त्यावर पण लिही,प्लिज.

    1. हा बघ
      ह्यात दोन पैलू आहेत ..एक नट म्हणून आलेला एकटेपणा आणि दुसरे कुटुंब संपले म्हणून आलेला एकाकीपणा .

      लक्ष्मीकांत चा विदूषक पाहिला नाही .
      पाहीन नक्की

  2. पार्थो, इंद्रजित अगदी डोळ्यासमोर आलेत. एकाचं अधःपतन (भावनिक आणि आर्थिक) तर एकाचे तत्वाला चिकटून राहणं… वाचताना थोडं हळवंही व्हायला झाले. खूप सुरेख लिहिलंत. नक्की बघणारंच. एकत्र कुटुंब असणं उत्तमच आहे पण ते टिकविण्यासाठी किती किती काय काय तडजोडी, आपलेपणा जपणं, समजून घेणं, मुरड घालणं करावं लागतं यासाठी तरी हा सिनेमा बघावाच. 👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    1. Thank you Kamini .
      प्रसेनजीत खूप चांगला नट आहे पण पार्थोचे काम सुद्धा रित्विक चक्रवर्तीने ताकदीने केले आहे. अफाट काम.

      Actually आता वाटले तरी शक्य नाही ..
      संथ आयुष्य होते तेव्हा ठीक आता जग आणि आपले जीवन एवढे गतिमान झालेय .की हे असे एक एक माणसांचे बेट होणे अपरिहार्य आहे

  3. तुम्ही लिहिताय इतकं सुंदर आणि प्रभावी की तो चित्रपट पाहण्याकरता मन आतुर होतं. वेळात वेळ काढून,
    बघण्यासाठी चित्रपटाचे नाव लिहून ठेवल्या जाते. हा ही बघणार

    1. Thank you so much Veena .
      चांगल्या गोष्टी शेअर करावं असे वाटते .
      आणि एकदा पहिले की लिहून सांगावेसे वाटते .
      एकतर हे सिनेमा आपल्या आत बघायला मजबूर करतात हा एक फायदा .
      आणि हल्ली सहज पाहता येतात .

  4. खूप छान लिहिलंय तू
    आज खरंच हेच वास्तव आहे .सिनेमा नाही पाहिला पण दाहक सत्य मांडलंय .

    1. Thank you Rashmi.
      अगदी
      मला माझ्या घरात हे जाणवते .
      तरी किती वर्ष मी सासरे होते म्हणूनही असेल , केलं
      पण संबंध चांगले राहिले एवढेच .
      माणसे बिझी होतात आणि लांब राहतात
      पहिले आहे.

  5. प्रिया किती छान analysis केलं आहे….अप्रतिम 🙏🏻🙏🏻 वेळ काढून बघते हा चित्रपट.

  6. तुमचे परिक्षण फारच सुंदर असते. तुम्ही हे चित्रपट कसे आणि कुठून शोधता याचे नवल वाटते, आणि तो चित्रपट बकेट लिस्टमध्ये समाविष्ट होतो.
    दोन भाऊ, परिवारातील इतर सदस्य , त्यांच्यातले नाजुक नातेसंबंध, भावना … फारच सूक्ष्मतेने तुम्ही उलगडल्या.
    तुमच्या पोस्ट मध्ये एक परिपूर्णता असते. इथेही ती अनुभवली.

    1. थँक यु Doctor.
      तुम्हाला आठवते का ? सत्तर , ऐंशीच्या दशकात रविवारी प्रादेशिक सिनेमा लागायचे. With subtitles. तेव्हा इंग्रजीचा जरा प्रॉब्लेम असला तरी मी मुद्दाम पाहायचे.
      त्यावेळेस सुद्धा लक्षात आले होते, बंगाली , कन्नड आणि मल्याळम अप्रतिम सिनेमा असतात. आपल्याकडे जब्बार पटेल यांचे होते ,समांतर चळवळ होती हिंदीत सुद्धा .
      पण बंगाल आणि दक्षिण च्या सिनेमाला दर्जा होता.
      आता सोपे झालेय
      Ott वर मिळतात आणि नेट मुळे साधारण कोणते पाहायचे याचा अंदाज येतो.

  7. खूप सुंदर विश्लेषण। आता शोधून नक्कीच बघीन।

  8. आत्ताच पाहिला. शेवटची दोन भावांची भेट आणि त्यांच्या मधील संवाद अविस्मरणीय. ‘ पार्थो’ ने पूर्ण चित्रपटात डोळ्यातून anguish आणि pain carry केलं आहे ते शब्दातीत. Must see.

  9. अतिशय सुंदर. असे परिक्षण वाचायला मिळाले की चित्रपट पाहण्याची ओढ लागते. मन:पूर्वक आभार

Leave a Reply to Girish Lovekar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *