Skip to content

कल्पिताचे, सत्यात रूपांतर घडवून आणणारा- गॅसलाईट



“तू किनई अगदी मूर्ख आहेस, काहीच कसे  जमत नाही ग तुला, कसे काही  कळत नाही”  ही आणि अशा प्रकारची दूषणे घरच्या स्त्रीला सतत देणे काही नवीन नाही. आपण काही चुकीचे करत आहोत हे अनेकवेळा लक्षातही येत नाही. बऱ्याच ठिकाणी तर त्या घरच्या बाईच्याही हे अंगवळणी पडलेले दिसते.
बायका तशाही संवेदनशील असतात, भावनाशील असतात, दुःख कुरवाळत असतात असाही शिक्का मारून झालेला असतोच. त्यामुळे संवादाचे वादात रूपांतर होऊ नये, किंवा प्रश्नाला उत्तरच द्यायला लागू नये म्हणून हेटाळणी करून तिला गप्प बसवणे , पथ्यावरही पडते.
आपल्या सहचारीचा, सहकाऱ्याचा सुद्धा आवाज दाबून टाकणे, व्यक्तीच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावणे, विचारशक्ती निकामी करणे आणि त्यायोगे तिचा  ताबा घेणे, कह्यात करणे याला मनोविज्ञान शास्त्रात “गॅस-लायटिंग” अशी संज्ञा आहे.
ह्या संज्ञेचा जन्म एका नाटकावरून झाला. ह्याच नाटकाचे पुढे चित्रपटात रूपांतर झाले. तो चित्रपट होता, १९४४ मध्ये प्रदर्शित झालेला जॉर्ज ककर  दिग्दर्शित “गॅसलाईट”.

दुसऱ्यावर सत्ता गाजवणे ही काही लोकांची गरज असते. त्याची कारणे अनेक असतात. दुसऱ्यांना खाली पाडणे, त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणे हे अनेकवेळा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी केले जाते. स्वतःच्या :प्रेमात डुबलेली माणसे हे नकळत करतात. अनेकवेळा न्यूनगंडातून हे केले जाते तर काही वेळा त्यांचा अंतस्थ हेतू हा फार धोकादायक  असू शकतो. आपल्या पत्नीच्या मनात संशयाचे वादळ उत्पन्न करून, तिला वेडेपणाच्या काठावर उभे करणे ह्या गाभ्यावर ह्या चित्रपटाची कथा बेतली आहे.

लुकलुकणाऱ्या गॅसलाईटच्या अंधुक प्रकाशात चित्रपटाचे नाव झळकते.
“गॅसलाईट “

कडाक्याच्या हिवाळ्यात, सारे लंडन शहर धुक्याची चादर ओढून निवांत पहुडले असतानाच, एक अभद्र बातमी येते. प्रसिद्ध ऑपेरा गायिका, एलिस ऑलक्विस्ट हिचा, तिच्या राहत्या घरात, थॉर्टन स्केअर पार्क या आलिशान हवेलीत खून होतो. खुनी बेपत्ता असतो. या प्रसंगाची साक्षीदार असते, ऍलिसची भाची, पॉला.
अतिशय भेदरलेल्या या पोरक्या मुलीला, या दुःखद प्रसंगाचा विसर पडावा म्हणून  इटलीला पाठवले जाते. काही वर्षे उलटतात. संगीताचे शिक्षण घेणारी पॉला, ग्रेगरीच्या प्रेमात पडते.
संगीत का लग्न या दुविधेत असणाऱ्या पॉलाला, तिचे शिक्षक समजावतात,
आयुष्यात घडलेल्या शोकांतिकेला विसरण्याची ही एक सुरेख संधी आहे. वेदनादायी भूतकाळाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी, जो राजकुमार तुझ्या आयुष्यात आलेला आहे, निःशंकपणे त्याचा स्विकार कर. कलेपेक्षाही आयुष्यातील आनंद निदान आता महत्वाचा आहे.
ग्रेगरी, हा सभ्य, संवादकुशल, प्रेमळ, कुणाचेही मन जिंकून घेईल असा देखणा तरुण असतो. जो स्वतःही चांगला पियानो वादक असतो. खरेतर त्यांची ओळख जेमतेम दोन आठवड्यांची. तिला त्याच्याविषयी काहीही माहित नसते.
“ I too don’t know about you but I want to marry you “  असे जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो, तेव्हा  जेमतेम दोन आठवड्याची ओळख असूनही, पॉलाला नाही म्हणणे शक्यच नसते.
तरीही विचार करायला थोडा अवधी मिळावा म्हणून पॉला एका आठवड्याची मुदत घेऊन शहराच्या बाहेर जायचे ठरवते.
प्रवासात तिची ओळख एका स्त्री बरोबर, मिस Thwaites बरोबर होते. ही सुद्धा लंडनची रहिवासी. गप्पा मारताना थॉर्टन स्केअर पार्कचा विषय येतो. ओघाने त्या हवेलीत झालेल्या खुनाचा सुद्धा. ज्या अप्रिय विषयापासून दूर जाण्याचा पॉला प्रयत्न करत असते तो विषय इथेही आल्यावर पॉला अस्वस्थ होते. पिच्छा सोडवण्यासाठी ट्रेन मधून उतरते तर काय समोर ग्रेगरी. एका आठवड्याचा काय , एका दिवसाचा विरह त्याला सहन होत नाही.

पॉला विचार करायचा विचार सोडते आणि ग्रेगरीशी लग्न करते.

लग्न झाल्यावर, इटलीत मधुचंद्र साजरा करत असताना, ग्रेगरी, लंडनमध्ये स्थायिक व्ह्यायची इच्छा व्यक्त करतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ज्या घरात जाण्याच्या कल्पनेनेच पॉला गर्भगळीत होत असते, त्याच घरात पॉला परत जाते.
ती ग्रेगरीला त्याचे स्वप्न  पुरे करण्याचे आश्वासन देताना सांगते,
“हे घर, माझ्यासाठी एक दुःखद स्वप्न होते, एक अनामिक भीती या घराशी निगडित होती पण आता तुझ्या येण्याने हे भय नाहीसे झाले आहे. तुझ्या प्रेमाने मन आश्वस्त झाले आहे. तू बरोबर असशील तर या घराचा सुद्धा मी स्वर्ग करू शकेन याची मला खात्री आहे”
नवपरिणित जोडपे, पॉलाच्या मावशीच्या घरात स्थायिक होते. पहिल्याच दिवशी तिची भेट, ट्रेन मध्ये भेटलेल्या, मिस Thwaites बरोबर होते. ग्रेगरी मात्र तिच्याशी तुटक वागतो. एवढेच नाही तर पॉलाला तो तिच्याबरोबर बोलायलाही देत नाही.
घरात शिरल्यावर पॉलाच्या आठवणी जागृत होतात.
दुसऱ्या मजल्यावरच्या आलिशान खोलीत पार्टी होत असे. फुलांनी घर सजवले जाई. मावशीने वेगवेगळ्या देशांमधून असंख्य वस्तू आणल्या होत्या. त्या इथे व्यवस्थित मांडून ठेवल्या जात. काही वस्तू मावशी पेटीत सांभाळून ठेवत असे. कधी वेळ मिळाला की त्याबद्दल दोघींच्या गप्पा रंगत.
जे स्मरणात ठेवायला सुद्धा पॉला घाबरत होती, आज त्या सर्वच आठवणी बाहेर पडल्या होत्या. साथीला ग्रेगरी असल्याने पॉला निर्धास्त होती आणि अचानक तिला ती काळरात्र आठवते. मावशीचा गळा आवळून कुणीतरी खून केल्याची भयावह रात्र. आतापर्यंत दबून राहिलेली भीती आणि वेदना परत उफाळून येते.
या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पॉलाच्या मावशीचा खून झालेला असतो.
या खोलीत, मावशीला लिहिलेले एक जुने पत्र पॉलाला सापडते.
कुणातरी सर्जीयस बौर नावाच्या माणसाने, तिच्या खुनाच्या दोन दिवस अगोदर ते पाठवले असतं. हे पत्र पाहताच ग्रेगरीचा चेहेरा पालटतो. तो काहीसे ओरडूनच पत्र खेचून घेतो. 
तिच्या वास्तव्याच्या खुणा पॉलासाठी वेदनादायक ठरतील म्हणून ग्रेगरी ते सर्व सामान तिसऱ्या मजल्यावरील माळ्यावर हलवतो. या स्मृती नष्ट होईपर्यंत पॉलाने कुणालाही भेटू नये  याचीही व्यवस्था करतो. 
या प्रसंगानंतर ग्रेगरीचा नूर बदलतो.
घरात स्वयंपाकाचे काम करणारी एलिझाबेथ आणि घर सांभाळणारी नॅन्सी यांना पॉलाची मानसिक स्थिती बरी नाही, तिला त्रास द्यायचा नाही, काही शंका असेल तर ग्रेगरीकडून त्याची माहिती घ्यायची हे ग्रेगरी दोघांना निक्षून  सांगतो.
आपल्या पत्नीवर बंधने लादतो. तिचे घराबाहेर पडणे थांबवतो. कुणाशीही बोलायला बंदी करतो. घरात काम करण्याऱ्या दोन नोकराणींचा तिच्याबद्दल गैरसमज करून देण्यात यशस्वी होतो. घरात विचित्र घटना घडू लागतात.
एका कार्यक्रमाला जाताना, ग्रेगरी त्याच्या आईचा ब्रूच पॉलाला भेट म्हणून देतो. त्याची पीन सैल झाली आहे म्हणून तिला घालून न देता, तो ब्रूच तिच्या पर्समध्ये ठेवतो. तुला विसरायची सवय झाली आहे म्हणून तुला सांगून ठेवतो असेही बजावतो.

हा ब्रूच हरवतो. तिच्याच वेंधळेपणाने हरवला हे ग्रेगरी तिच्या मनावर ठसवण्यात यशस्वी होतो.
ग्रेगरी नसताना घरातले दिवे मंद होत असतात. कुणी ते करत असेल का असे नॅन्सीला विचारल्यावर ती नकार देते. हे आपल्याच मनाचे भास असतील असा विचार करून पॉला अस्वस्थ होते.
याच वेळी स्कॉटलंड यार्डचा डिटेक्टिव्ह  ब्रायन कॅमेरॉन, थॉर्टन स्केअर पार्क येथे कुणी जोडपे राहायला आले हे समजल्यावर तिथे चौकशीसाठी जायचे ठरवतो.  तो पॉलाचा लहानपणीच मित्र असतो. आतापर्यंत यांच्या चौकस शेजारणीला, थॉर्टन स्केअर पार्कमध्ये काही अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय येतो. “या घरातून कुणीही बाहेर पडत नाही, मालकिणीला भेटायला देत नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे” ही शंका ती स्कॉटलंड यार्डचा डिटेक्टिव्ह  ब्रायन कॅमेरॉनला बोलून दाखवते.
वरिष्ठांनी ही दहा वर्षाची जुनी केस बंद केली असूनही, काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्याने डिटेक्टिव्ह, एलिस ऑलक्विस्टच्या खुनाची फाईल उघडतो. ह्या फाईलमध्ये केवळ खुनाची माहिती नसते. तिच्याकडे असलेले अतिशय किमती जडजवाहीर सुद्धा  तिच्याच खुनाबरोबर गायब झाले असतात. त्यासाठी खून झाला असे म्हंटले तर त्याचाही पत्ता आजपर्यंत लागलेला नसतो. कुठे विकायला सुद्धा ते आलेले नसतात.
इथे ग्रेगरी नोकरांच्या समोर पॉलाचा अपमान करतो.
तिच्यासमोर नॅन्सीशी फ्लर्ट करतो. तिने आक्षेप घेतल्यावर ती नोकरांना वाईट वागवते असा आरोप करतो. याच वेळी मिस Thwaites तिला भेटायला आल्यावर तिची तब्येत बरी नाही असे तिच्या आणि नॅन्सीच्या मनावर ठसवून, तिला भेट नाकारतो. नंतर काहीच घडले नाही असे दर्शवून तिला थिएटरला घेऊन जायचे ठरवतो. अनेक दिवसांनी ती आनंदी होते. हा आनंद मात्र काही क्षणच टिकतो. दुसऱ्या क्षणाला  घरातले एक चित्रच तिने नकळत गहाळ केले असा आरोप करतो. तिला खोटे ठरवतो. ती विसराळू झाली आहे, मज्जातंतूच्या बिघाडामुळे ती स्वतःच्याच घरात चोऱ्या करत आहे असा आरोप करतो. तिची आई वेड्याच्या इस्पितळात मरण पावली होती असे सांगून तिच्या हळव्या मनस्थितीवर तो अजून आघात करतो.
त्याला क्षीण विरोध करणारी, स्वतःचे निर्दोषत्व करायला धडपडणारी पॉला, एकटी असताना मी घरात राहायला घाबरते असे जेव्हा त्याला सांगते, तेव्हा , घरातील गॅसचे दिवे मंदावतात, पुन्हा चमकतात, माळ्यावर आवाज येतात, हे सर्व तुझ्या मनाचे भास आहेत, तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे हे सांगून ग्रेगरी पॉलाला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करतो आणि  तिच्या विनवण्यांना न जुमानता, घराच्या बाहेर पडून, बाहेरील अंधारात मिसळून जातो .
पुढच्या काही दिवसांत डिटेक्टिव्ह  ब्रायन कॅमेरॉनला, पॉलाला भेटायची संधी मिळते. शहरातले धनीक जोडपे डेलरॉय यांनी संगीत मैफिल आणि त्या नंतर जेवणाचे आयोजन केलेले असते. या कार्यक्रमाला पॉला आणि ग्रेगरीला सुद्धा आमंत्रण असते. पॉलाच्या शेजारी माझी जागा ठेव अशी गळ ब्रायन, मिसेस डेलरॉयला घालतो पण पॉला येणार नसल्याचे मिसेस डेलरॉय ब्रायनला सांगते. ग्रेगरीने तिची तब्येत बरी नसल्याचे सांगून आमंत्रणाला नकार दिलेला असतो.
पार्टीला जायला ग्रेगरी नकार देतो पण त्याच्याशिवाय जाण्याचा निश्चय पॉलाने केल्यावर तोही तिच्याबरोबर कार्यक्रमाला जातो. या पार्टीत तिने आपले घड्याळ स्वतःकडे ठेवून नंतर ते विसरल्याचा आरोप तिच्यावर करतो. भर पार्टीत असे झाल्याने आधीच मनाने तुटलेली पॉला पार कोसळते.
तिच्या वेडेपणावर शिक्का लावण्यात ग्रेगरी यशस्वी होतो.

ब्रायनच्या नजरेतून काहीही सुटलेलं नसते. प्रत्येक रात्री ग्रेगरी बाहेर पडतो आणि काही पावले चालल्यानंतर परत आपल्या घराकडे जातो हे सुद्धा संशयास्पद . ब्रायन आता त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवायला लागतो.
ग्रेगरी नक्की कोण असतो? त्याचा अंतस्थ हेतू काय असतो?

ग्रेगरीचे  खरे नाव सर्जीयस बौर असून, रत्नांच्या आशेने, त्यानेच पॉलाच्या मावशीचा खून केलेला असतो. त्या भयानक रात्री, कुणीतरी पाहिले असणार या संशयाने तो पळ काढतो पण रत्नांचा मोह त्याला सोडवत नाही. पॉलाशी लग्न करण्याचा हेतू असतो, त्या घरात परत प्रवेश करणे आणि रत्नांचा शोध घेणे. एकदा तिला वेडी ठरवून रुग्णालयात दाखल केले की कसलाही अडसर न येता, तिसऱ्या मजल्यावरील अडगळीत, रत्नांचा शोध घेणे त्याला शक्य असते. 
त्याची ही योजना यशस्वी होत आलेली असतेच पण कॅमेरॉनला संशय येतो. घरात काम करणारी वयस्क हाऊसकीपर, एलिझाबेथ सुद्धा त्याला मदत करते आणि ग्रेगरीला रत्नांची चोरी करतानाच पकडले जाते.

ग्रेगरीची भूमिका चार्ल्स बॉये या अभिनेत्याने अप्रतिम रंगवली आहे.” पॉला, तू वेडी आहेस, तुझी आई वेडी होती, ती वेड्याच्या इस्पितळात मरण पावली “ हे सांगतानाचे त्याचे खुनशी डोळे, विखारी भाव, त्याचा संताप अंगावर येतो.
पण ग्रेगरी आणि पॉला यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीत बाजी मारली आहे ती इन्ग्रिड बर्गमनच्या पॉलाने.
भयाच्या असंख्य छटा ती डोळ्यातून व्यक्त करते.  स्वतःवरचा विश्वास उडाल्यामुळे, वेडेपणाकडे होत असलेला तिचा प्रवास पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो.

ब्रायन तिला भेटण्यात यशस्वी झाल्यावर मात्र आपण वेडी नाही, आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे हे तिला समजते. आपल्याला ऐकू येत असलेले आवाज, गॅसच्या दिव्याचे मंद होणे परत पेटणे हे भास नसून असे घडत आहे हे जेव्हा ब्रायन सांगतो, तेव्हा तिचा आत्मविश्वास परत येतो. आपली फसवणूक झालेली आहे हे समजल्यावर मात्र ती स्वतःच्या हातात सूत्रे घेते.

डिटेक्टिव्हने बांधून ठेवलेला ग्रेगरी, तिला ड्रॉवर मधली  सूरी घेऊन, स्वतःला सोडवायची विनंती करतो.
सूरी फेकून देऊन, त्याच्या डोळ्यात डोळे घालून , छद्मी हसून ती सांगते,
“ ओह , मी वेडी आहे. मी तर नेहेमीच वस्तू हरवते किंवा लपवते. आता हेच बघ, तू मला सूरी दिली खरी पण मी तर हरवली. आता नक्की कुठे असेल ती? चित्राच्या पाठी का तूच जिथे ब्रूच लपवून ठेवलास त्याच्या पाठी? मी नक्कीच माझ्या आईसारखी वेडी आहे”
तू वेडी नाहीस असे ग्रेगरी कळवळून सांगतो पण खूप उशीर झालेला असतो.
“मी वेडी नसते तर तुला नक्कीच मदत केली असती. तुझी कीव करून का होईना, तुला निश्चित वाचवले असते पण मी तर वेडी आहे म्हणून तर तुझा तिरस्कार करते. आता या क्षणाला माझे हृदय आनंदाने नाचत आहे, मला ना तुझी दया येते आहे; ना माझ्या मनात अजिबात माझ्या कृतीचा पश्चाताप आहे.”
If I were not mad, I could have helped you. Whatever you had done,I could have pitied and protected you. But because I am mad, I hate you. Because I am mad, I have betrayed you, and because I am mad…I am rejoicing in my heart without a shred of pity…”
संपूर्ण चित्रपटभर इन्ग्रिड एका दडपणात वावरते.
सुरुवातीची अल्लड, प्रेमवेडी युवती, वेडेपणात खचत गेलेली पत्नी आणि  संतापाने वेडी झालेली, आत्मभान आलेली स्त्री या तिन्ही वेगवेगळ्या टप्प्यात इन्ग्रिड कमाल करून जाते .
झुकलेले खांदे, निर्जीव होत गेलेले डोळे, विनवणी करणारा चेहेरा, स्वतःची कीव आणि जाण आणि भ्रम यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारी पॉला शेवटच्या सीन मध्ये हळूहळू खुनशी होत जाते.
चेहेऱ्यावर असलेले वेडसरपणाचे भाव तेच पण  आधीचे नकळत आलेले आणि आताचे मुद्दामहून आणलेले यातला फरक पाहताना इन्ग्रिड बर्गमन ही कुशल अभिनेत्रींमध्ये का अव्वल मानली जाते याची जाणीव होते.

स्वतःचे घर आणि स्वतःचे हक्काचे माणूस नेहेमीच विश्वासाचे केंद्र मानले जाते. या सिनेमात मात्र घर भक्षक होते तर विश्वासघात होतो तो स्वतःच्याच नवऱ्याकडून. ही थीम, हॉलीवूड मध्ये लोकप्रिय झाली. रिबेक्का,  सस्पिशिअन आणि जेन आयर हे गाजलेले चित्रपट याच थीम वर आधारित होते. गॅसलाईटच्या यशाने “गॅसलाईट” हे रूपक मनोविज्ञान शास्त्रात नात्यातील सत्तासंघर्ष अभ्यासण्यासाठी वापरण्यात येऊ लागले.
कल्पिताचे, सत्यात रूपांतर घडवून आणणारा हा सिनेमा अभिजात चित्रपटांच्या यादीत फार वरच्या स्थानावर आहे.  

(MX player वर हा सिनेमा पाहायला उपलब्ध आहे)  

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner



10 thoughts on “कल्पिताचे, सत्यात रूपांतर घडवून आणणारा- गॅसलाईट”

  1. प्रिया,
    ❤️❤️
    मस्त
    मस्त
    मस्त..

    बघायला पाहिजे.

  2. खूप छान लिहिलं आहेस प्रिया 👍 आता पाहीन मी हा चित्रपट.

  3. उदय शेवडे

    काय लिहू ? खरोखर शब्द नाहीत. आपली या लिखाणातली हुकूमत वाखाणण्याजोगी आहे.

    पूर्ण चित्रपट डोळ्यासमोर आणलात तुम्ही !

    बास्स एवढंच ! 💞

    1. Uday, Thank you .
      खरंच बघा
      अभिनयातील ताकद समजते असे सिनेमा पाहिले की.

  4. फारच अप्रतिम परीक्षण. तसा डायरेक्ट पाहिला असता तरी आवडला असता हा सिनेमा, पण तुम्ही त्याचे कंगोरे इतके सुंदर खुलवून सांगितले आहेत की , जाणकाराने एखाद्या पोर्ट्रेटची ओळख करून द्यावी अन् त्याचं सौंदर्य वाढवावं, तसं समाधान या लेखाने दिलं.

    1. Thank you so much Doctor.

      सिनेमा खूप सुंदर आहे .
      ४४ चा असला तरी कथा , संवाद आणि अभिनय आजचे वाटतात. कुठेही outdated होत नाही .
      आणि इन्ग्रिड ही भूमिका जगली आहे.

Leave a Reply to Vidula Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *