Skip to content

चाकोरी बाहेरील अनुबंधांचा वेध घेणारा -अनुरणन 

कितीतरी जणांना असा  अनुभव येत असेल , तुम्ही कुणालातरी भेटता, ती तुमच्या ओळखीची असेल किंवा नसेलही, पण तिच्याशी बोलावसं  वाटते, तिचे बोलणे ऐकावसं वाटते, तिचे तुमच्याबरोबर असणे , तुम्ही, तुमच्याबरोबर असण्यासारखेच नैसर्गीक असते.  कुणीही न बांधता आपोआप एक बंध निर्माण होतो. कसलाही संकोच न बाळगता, तुम्ही मन मोकळे करतात.  ज्या गोष्टी स्वतःशी सुद्धा मान्य केलेल्या नसतात त्याची चर्चा करतात, जणू काही तो तुमचा आरसा असतो.
स्वप्ने, जी कधी सत्यात येणार नसतात, ध्येय, जे  कधी गाठले गेले नसते,  निराशा, जी पदोपदी वाट्याला आलेली असते, हे सगळे तुम्ही सांगता आणि समोर असणाऱ्याला याच्या पलीकडचे सुद्धा लक्षात येते.
त्यांच्या सहवासात ना ताण येतो, ना स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव असतो, ना स्पर्धा असते,  ना मत्सर वाटतो. पोळलेल्या मनाला, अस्वस्थ मनाला आश्वस्त करण्याचे सामर्थ्य त्या जवळिकीत असते.
तुमच्या मनाचा प्रतिध्वनी तुम्हाला त्याच्या मनात सापडतो

हा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी येतो. आईवडिलांबरोबर असेल तर तो आदर असतो, गुरुजनांबरोबर असेल तर ती भक्ती असते, मैत्रिणीला मैत्रिणीबरोबर किंवा मित्राला मित्राबरोबर येत असेल तर ती मैत्री असते, पती किंवा प्रियकराबरोबर असेल तर ते प्रेम असते . हे सर्व समाजमान्य संबंध असतात. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर हा अनुभव आला असेल तर ह्याला काय नाव द्यावे हा प्रश्न अनेकवेळा त्या व्यक्तींना पडतो.
समाजात कुजबुज होते. त्यात विवाहित असतील तर संबंध खराब होत जातात.
आजच्या काळात जिथे पुरुष आणि स्त्रियांनी भेटणे, एकत्र काम करणे, कामानिमित्त एकत्र राहणे हे सर्रास होत असताना, हे हवेहवेसे असणारे पण या कडे इतरांच्या नजरेमुळे नकोनकोसे होणारे नाते , याचे नक्की काय होते या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित “अनुरणन” या सिनेमात केला आहे.
अनुरणन ( Anuranan ) म्हणजे resonance ..अनुनाद.

राहुल चॅटर्जी (राहुल बोस), त्याची पत्नी नंदिता (रितूपर्णो सेनगुप्ता), अमित बॅनर्जी (रजत कपूर) आणि त्याची पत्नी  प्रीती  (रायमा सेन ) या चौघांची ही गोष्ट. सिनेमाची सुरुवात होते लंडन मध्ये..
आपले आयुष्य, ठरवून सुद्धा,  ठरवलेल्या वाटेवर जात नाही. प्रवासात कोणत्या तरी वेगळ्याच वाटेवरील ठिकाणे त्याला हाक मारतात आणि त्या हाकेची  गुंज त्याच्या अंतःकरणातून आली की  पावले नकळत तिथे वळतात. राहुल चॅटर्जी (राहुल बोस) एका नामांकित कंपनीत आर्किटेक्ट म्हणून नोकरीला आहे.

कंपनीला  तीन  महत्वाचे प्रोजेक्ट मिळतात. त्यातला  एक  प्रोजेक्ट, हिमालयाच्या कुशीत असतो.
कांचनगंगा  येथे रिसॉर्ट बनवण्याच्या कामावर राहुलची निवड होते. बदली होते ती कोलकत्त्यात. लहानपण इंग्लंडला गेलेल्या, राहुलला कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्त्यात यावे लागते. वडिलांची बदलीची नोकरी त्यामुळे इलाज नसतो. सुरुवातीला अवघड जाते पण  नंतर मात्र या शहरात तो रमतो. इथेच  त्याची पत्नी, नंदिता (रितूपर्णो सेनगुप्ता) त्याला भेटते.
दुर्दैवाने नंदिताचा गर्भपात होतो .हे  शहर आता त्यांना परके वाटू लागते. इंग्लडला आल्यानंतर ह्याची बोच कमी होते.
राहुल कामात रमतो, नंदिता या नवीन शहरात जुळून घेण्यात व्यस्त होते. जीवन एका अर्थशून्य पटकथेसारखे पुढे सरकत असतानाच कोलकत्याला परत जाण्याची संधी मिळते.

काळ हे सर्व दुःखा वरील औषध असते. आपल्या देशात परत जाण्याच्या कल्पनेने दोघेही आनंदित होतात.
वातावरणात भरून राहिलेला डिझेलचा गंध, फेरीवाल्यांच्या गाड्या, मध्य रात्री ऐकू येणारे भटक्या कुत्र्यांचे भुंकणे, घराघरांतून ऐकू येणारे भांड्याचे आवाज, चिखल  घेऊन  येणारा पाऊस आणि  दुर्गा पूजा .
आयुष्य  परत  एकदा  वेगळ्या वळणावर उभे राहते.
वरवर कितीही आनंदाचा मुखवटा चढवला तरी नंदिता दुःखी असते. मुलं नसल्याची खंत कुरतडत असते. राहुन राहून, तिच्या मनात येते, राहुल बाप म्हणून एवढा आदर्श झाला असता; कारण तो  असतोच तसा प्रेमळ आणि आनंदी.  जिथे जाईल तिथे चैतन्य घेऊन येणारा. 
तिचे  दुःख त्यालाही समजत असते. त्याच्या परीने तिला खुश ठेवण्याचा तो धडपड करत असतो पण मातृत्वाची भूक फार मोठी असते. आपापल्या परीने आपल्या जगात रमण्याचा दोघे प्रयत्न करत असतात.
लंडनला असतानाच या प्रोजेक्टचे मार्केटिंग सांभाळणाऱ्या अमित बॅनर्जी (रजत कपूर)  या माणसाची त्याची ओळख होते. कोलकत्याला आल्यावर ही ओळख गाढ होते. राहुल सर्जनशील, काहीसा स्वप्नाळू तर अमितचा फक्त विक्रीशी संबंध.. प्रोजेक्ट च्या व्यवहाराशी त्याचा संबंध आहे.
राहुल अमितला घरी बोलावतो. या परक्या देशात आपली भाषा बोलणारा भेटला म्हणून नंदिताही खुश होते. तिथे सूर जुळल्यावर भारतात परत यांची मैत्री होणे हे स्वाभाविकच असते. 

एका पार्टीत अमितची पत्नी , प्रीती  (रायमा सेन ) आणि राहुल -नंदिता भेटतात. प्रीतीला पुस्तकांची आवड असते. बंगाली माणसाच्या रक्तातच, कविता, साहित्य , संगीत याचे  वेड असते. अमित चांगला असतो पण कामात गढलेला, त्याला पैसे , करिअर, शेअर्स याची आवड.
पत्नीला  काय हवे हे समजत नाही. खरेतर त्याला वेळ नाही. दोघांच्यातले अंतर वाढत चाललेलं आणि त्याचीही त्याला जाणीव नाही.
रसिक, संवेदनशील  प्रीती, राहुल कडे समान आवडीमुळे ओढली  जाते. 
इथे कलकत्त्यात नंदिता मॉन्टेसरीत नोकरी धरते. तिला मुलं होण्याची शक्यता नाही हा रिपोर्ट आलेला आहे. उन्मळून गेलेली ती आणि कामाच्या कचाट्यात अडकलेला राहुल.
राहुलचा कांचनगंगेत प्रोजेक्ट सुरु असतो तिथे काही आदिवासी विरोध करतात. त्यांना भेटण्यासाठी राहुलला जाणे आवश्यक असते. त्याच्या  कलासक्त मनाला  कांचनगंगाची  शिखरे   मोह  घालतात . चांदण्यातले  ते  दृश्य  अत्यंत  मनोहर. 

त्याचे वर्णन ऐकून प्रीती  भारावून जाते.  तिचा  नवरा काही  कारणासाठी लंडनला गेलेला असताना,  कुणालाही न  सांगता ती  राहुलबरोबर प्रोजेक्टच्या साईटवर जाते. राहुलला तिच्या येण्याची काहीही कल्पना नसते. तिला बघून तोही चकित होतो.

आता  काय  वाटते ? हा  नेहेमीचा विवाह बाह्य संबंधांचा सिनेमा असेल का ?

ही रात्र गप्पांत रंगते, निस्तब्ध  राहुन चमचमणाऱ्या शिखरांना पाहून  भारावून जाण्यात सरते. 

वेगवेगळ्या खोलीत गुड नाइट म्हणून ते जातात खरे पण सकाळचा सूर्य नेहेमी सारखा उगवत नाही. राहुलचा अचानक मृत्यू होतो . त्याच्याबरोबर रात्री प्रीती असल्याने अफवांना उधाण येते. मोठ्या कंपनीची प्रतिष्ठित लोकांची नावे असल्याने समाजात खळबळ माजते. पेपर मध्ये ही केस गाजते. दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळते .
एक चांगली विवाहित स्त्री आणि तिचे संबंध!
सोसायटीत थी  थू होते . लोकं हजारो तोंडानी बोलू लागतात.
अमितसाठी सुद्धा हा धक्का असतो. प्रीतीचे बोलणे कुणी ऐकून घेण्याचा प्रश्न नसतोच. अमित, प्रीतीबरोबरचे नाते तोडून टाकतो.  प्रीतीचे आईवडील सुद्धा प्रीतीला दोष   देतात.
राहुल असे कसे करू शकतो हा प्रश्न नंदिताला कुरतडतो! आपले वांझ असणे त्याला नकोसे  झाले होते का ही टोचणी तर  दुधारी ! त्यात त्याचा झालेला मृत्यू. नंदिता उध्वस्त होते.
सगळे  असह्य  होऊन प्रीती आत्महत्येचा प्रयत्न करते. याचवेळी राहुलच्या सामानात असलेली त्याच्या आवाजातील कॅसेट नंदिताला मिळते. अनेक लोक डायरी लिहून मन मोकळे करतात तसेच रेकॉर्ड करून काय घडले ते नंदिताला सांगण्याची राहुलला सवय असते.
या कॅसेट मुळे अनेक गैरसमज मिटतात. नंदिता प्रीतीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते. एकमेकांना आधार देत असतानाच्या क्षणाला हा सिनेमा, प्रीती आणि नंदिताला एकत्र भेटवून संपतो.

हा सिनेमा व्यभिचारावर नाही अगदी प्रेम संबंधावर सुद्धा नाही. .दोन व्यक्तीतले नाते केवळ ते भिन्न लिंगी आहे म्हणून शारीरिक असतेच असे नाही. रूढार्थाने स्त्री पुरुष यातले प्रेम एवढेच मर्यादित असते असेही नाही.
एका वेगळ्या पातळीवर, शरीराच्या ओढीने नाही तर समान आवड, समान विचार यामुळे माणसे एकत्र येतात आणि बंध निर्माण होतो . .रेशमी , तलम आणि तरीही  घट्ट असे नाते.
दोन  व्यक्तीत असे नाते होणे संभवनीय आहे का ?
हा प्रश्न सिनेमातील व्यक्तरेखाना सुद्धा पडतो ..अगदी सख्खे आईवडील सुद्धा मुलीला दूर लोटतात. अशावेळी या सिनेमाचे रसग्रहण केवळ सिनेमापुरते मर्यादित राहत नाही. 

हा सिनेमा शहरी लोकांचा आहे. ही सर्व पात्रे उच्च शिक्षित आहेत. त्यांना स्वतःची अशी ओळख आहे. त्यांची ठोस करिअर आहे.  आयुष्य मेट्रो सारख्या शहरांत गेल्यामुळे  स्त्री पुरुष सहवासाच्या कल्पनांना एक वास्तव आकार आहे..
राहुल कलाकार आहे. संवेदनशील आहे, त्याचे आपल्या व्यवसायावर अत्यंत प्रेम आहे. नोकरी ही केवळ पैसे मिळवून देणारी साधन नाही असे त्याला वाटते. काहीतरी वेगळे करणे , नवीन निर्मिती करणे , प्रयोग करणे हा त्याचा ध्यास आहे म्हणून तो दार्जिलिंगची निवड करतो. तेथील निसर्ग आणि त्याची निर्मिती ह्यात एकरूपता असावी यासाठी तो प्रयत्नशील आहे.
तो अतिशय चांगला नवरा आहे, पत्नीवर त्याचे प्रेम आहे. त्यांचे शारीरिक संबंध चांगले आहेत.

मूल न होणे कितीही क्लेशकारक असेल तरीही त्याने ते मनापासून स्विकारले आहे. त्याचे व्यक्तिमत्वच अतिशय प्रगल्भ त्यामुळे कुणालाही त्याच्या सहवासात मानसिक शांती मिळणे हे स्वाभाविक आहे.
प्रीती त्याला अपवाद नाही. .पुस्तके , साहित्य , कविता आणि निसर्ग हा त्यांना जोडणारा दुवा .
प्रीतीच्या डोळ्यात एक रिकामपण आहे. अर्थात नवरा कामात बिझी म्हणून तो खलनायक नाही. तो मार्केटिंगचा माणूस आहे. जे कुणी मार्केटिंग मध्ये यशस्वी असतील त्यांना कल्पना असेल की  टार्गेट पूर्ण करणे त्यांच्या करियर साठी  किती महत्वाचे आहे ! अमित हुशार आहे आणि अतिशय महत्वाकांक्षी आहे. हे कारण आहे की त्याचे फार घराकडे लक्ष नाही.  पत्नी एकटी पडली आहे त्याची त्याला जाणीव नाही पण याचा अर्थ असाही  नाही की त्याचे पत्नीवर प्रेम नाही.
तो बाहेरख्याली नाही, व्यसनी नाही. तो नवीन पिढीचा, आपल्या कामावर प्रेम करणारा, कामात डुबलेला माणूस आहे. काम प्रथम मग संसार यात काहीही वावगे नाही. यशस्वी  माणसांचा हा असाही नजरिया असू शकतो. तो स्त्रियांचा आदर करतो. प्रीतीच्या आईवडिलांचा सुद्धा तो लाडका जावई आहे. एका अतिशय यशस्वी , महत्वाकांक्षी माणसाचे चित्रण आहे हे ज्याच्या आयुष्यात करिअर हे प्राधान्य आहे. घर हे त्याचे गंतव्य नाही.
अमित, राहुल, प्रीती आणि नंदिता यांचे एकत्र येणे हे सामान्य स्त्री पुरुषांनी एकत्र येणे नाही.  हे चार सुजाण , सुशिक्षित , मॉडर्न , सुखवस्तू माणसांचे एकत्र येणे आहे.
सिनेमाचा हा एक अतिशय वेगळा मुद्दा आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे.

मला यातले काही सीन अतिशय आवडले जे ह्या माणसांचे वेगळेपण अधोरेखित करतात.
चित्रपटाच्या सुरुवातीला लंडनमध्ये अमित, राहुलच्या आमंत्रणामुळे त्यांच्या घरी येतो. नंदिता अतिशय देखणी आहे, हुशार आहे, मोकळी आहे. अमित बोलत असताना, ती त्याच्या बोलण्यात रस घेते. त्याला बोलते करते.
स्वतःच्या घरात सोफ्यावर रेलून बसलेली ती अतिशय सुरेख दिसते.  मोकळे वागणे असल्याने मादक सुद्धा पण अमितचे तिच्या सौन्दर्याकडे लक्ष नाही. अर्थात तिचे कौतुक आहे पण अभिलाषा  नाही.
तो आपल्या कामात एवढा गढलेला आहे की त्याचे बोलणे ही कामाशी संबधीत आहे.

ती मन लावून ऐकते यामुळे तर तो अगदी भरभरून बोलतो पण ते तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाही.
  राहुल आणि अमित ची पात्रे एवढी वेगळी वाटली. स्त्री सहवासाला हपापलेले किंवा त्यांच्यात गुंतणारे हे जे पुरुषाचे चित्रण असते आणि त्यांना आकर्षून  घेणारे जे स्त्रियांचे टिपिकल चित्रण असते ते या सिनेमात नाही.
मेट्रोत असल्याने असेल, मोठ्या हुद्यावर काम करत असल्याने असेल, स्त्री सहवास, कॉलेज म्हणा , ऑफिस म्हणा , सहज मिळत असल्याने एकूणच जेण्डर बायस्ड ह्यातले कुणीही नाही. स्त्री पुरुषांचे इथे आकर्षण दाखवले नाही.
इथे व्यक्ती आवडतात, त्यांचे बोलणे, वागणे आवडते. ते नजरेत दिसते.
ह्या  एका कारणासाठी हा चित्रपट मनात भरतो. फार न चालायचे सुद्धा हेच कारण आहे की असे असू शकते हे पटत नाही ..
नंदिता- अमित चे एका पार्टीत डान्स करणे, प्रीतीला आवडते म्हणून पदार्थ करून  नंदिताने रात्री  स्वतःच्या नवऱ्याबरोबर,  तिला डबा पाठवणे, घरात त्या पावसाळी रात्री दुसरे कुणीही नसताना, टागोरांच्या कवितेवर प्रीती, राहुलने चर्चा करणे,

दार्जिलिंगच्या त्या सायंकाळी, कांचनगंगाचे सौन्दर्य राहुलने वर्णन करणे आणि प्रितीने आसुसून ऐकणे, .ह्या सर्वात जी जवळीक आहे ती कुठेही शारीरिक होत नाही आणि तरीही खोटी वाटत नाही …
इथे कुणालाही संशय सुद्धा येत नाही एवढी प्रगल्भता आणि एकमेकांबद्दल असलेला विश्वास दोन्ही  नवरा बायकोच्या नात्यात सुद्धा आहे…
एकच चुकते ते न सांगता , प्रितीने जाणे.
नंतर जे घडते तो अपघात.
हा सिनेमा  अतिशय संथ आहे. दर दिवशीचे चित्रण , जसे काही  घरातली रोजनिशी चालू आहे.  कदाचित त्यामुळेंच  ते जीवन जगणाऱ्या सर्वांनाच आयुष्यात  आलेला एक पॉज खटकतो. अतिशय साध्या सरळ असलेल्या प्रीतीचे, असे अचानक न सांगता राहुल बरोबर जाणे हे  त्या रुटीनच्या विरुद्ध केलेले बंडच आहे.तिच्या नजरेतून पाहिले तर ते चुकीचे वाटत नाही . अमित स्वतः एवढा प्रगल्भ आणि मोकळा आहे  की सांगून प्रीती गेली असती  तरीही त्याने अडवले असते असे वाटत नाही.
त्याचा स्वतःवर आणि त्याने निवडलेल्या माणसांवर  विश्वास आहे …
माणसे, माणसांच्या ओढीने जवळ येतात. भिन्न लिंग व्यक्ती सुद्धा एकत्र यायला शरीराच्या जवळीकीची गरज नसते. हा अँगलच त्यांच्या नात्यात नसतो. हे असेही सहज शक्य असते हा प्रत्यय हा सिनेमा देतो.
म्हणून जेव्हा  प्रीती आत्महत्या करते तेव्हा अमित हादरतो.
.हॉस्पिटलमध्ये  तिला  ऍडमिट  करून , नंदिताला  बोलवणारा अमित, तिच्या आत्महत्येच्या  प्रयत्नाने  हादरलेला , पत्नीची काळजी  वाटणारा , स्वतःच्या  चुकीने  विस्कटलेला  अमित आणि  प्रीतीचा  हात  हातात  घेऊन  तिला  आधार  देणारी  नंदिता ही पात्रे,  स्त्री पुरुष , त्याच्यातली  शारीरिक दुवा याच्या पलीकडे गेल्याचा सुखद  प्रत्यय  देतात …
आवर्जून पाहावा असा सिनेमा. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


20 thoughts on “चाकोरी बाहेरील अनुबंधांचा वेध घेणारा -अनुरणन ”

  1. प्रिया,
    छान परीक्षण.
    ❤️❤️❤️
    तुझ्या परीक्षणामुळे मी इतर भाषेतील सिनेमे पाहिले होते.
    आता हा पण पाहते.
    राहुल च्या मृत्यू च कारण काय दाखवलं आहे?

  2. मस्त ओघवत लिहीले आणि हा चित्रपट मी फार पुर्वी पाहीला व मला फार आवडला होता. राहुल बोस व इतर सर्व कलाकार आवडीचे. अभिनय देखील तोडीचा. मला ती स्टोरीलाईन खूप आवडली. तुमची पोस्ट चित्रपटाला पुर्ण न्याय देते. It is my all time favourite movie especially about how perceptions overpower our decisions and conscience

    1. आणि तुमचे इंग्लंड आहे Rahul . . countryside काय सुरेख दाखवली आहे . थोडासाच भाग आहे तो .
      मला हा आताच्या काळात एवढा relevant वाटतो ..कारण असे बंध जुळण्याएवढा matured समाज दिसतो आहे

  3. अभिजित लिगदे

    अप्रतिम लिहिलेत .
    नाजूक विषय पण अनैतिक अस काही नसणारा .
    प्रसंगाची मांडणी आणि तो उकलवून सांगायची तुमच्या लेखणीची ताकद 👌👌
    खूप छान

    1. Thank you Abhijit Da.
      सर्वात महत्वाचे म्हणजे चारित्र्य , समाज , नियम असा काहीही घोळ न घालता हे नाते नैसर्गिक रित्या फुलवले आहे .
      कृत्रिमपणा , किंवा घाबरणे , किंवा समाजाची भीती असे कारण नाही .
      ती एक छान मैत्री आहे
      मला म्हणून हा खूप आवडला
      एकतर असे दिसतेही .. हल्ली एवढी निखळ मैत्री दिसते ..
      शिक्षण म्हणा , करिअर म्हणा , सोशल मीडिया असेल , माणसे सहज भेटतात ..आणि छान मिसळतात
      या काळात तर हा सिनेमा फार relevant वाटतो

  4. अतिशय सुंदर शब्दात मांडलय खूप छान परीक्षण .माझाही आवडता सिनेमा

  5. प्रिया ,किती छान हाताळाय विषय. सहज. सरळ. सुंदर.

  6. राहुल खूप वेगळे च सिनेमा करतो..त्याची स्वतः ची सुध्धा टेस्ट वेगळी च आहे…

    खरंच एका लेवल वर स्त्री पुरुष आले की विचार सरणी कोण व्यक्तीशी जुळते..त्यांच्याशी संवाद साधला जातो,..जास्त संपर्क येत जातो.. अवडी निवडी सारख्या असल्या की गप्पा रंगतात..मग जेंडर चा विचार त्या लेवल ला नाही येत.एक निखळ मैत्री अनुभवतो…
    अश्या व्यक्तीला समाज ,चाकोरी ह्याच्याशी फारसे घेणे देणे राहत नाही..कारण ते एक वेगळ्या उंचीवर पोहोचलेले असतात..
    ह्या पातळीवर जाणारे व्यक्ती फार कमी असतात..आणि म्हणून बरेच वेळा ते एकटे ही पडतात..मग अशी एखादी व्यक्ती भेटली की मोकळे होतात..
    हा सिनेमा रूपक आहे..ज्यात स्त्री पुरुष संबंध वर जाऊन वैचारिक पातळीवर त्यांच्या मनात चालणारे विचार वर भर आहे.

    छान लिहिले आहे.हा वेगळाच पैलू आहे..

    1. बरोबर Prapurika. 🙂
      त्या संवादातून अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे .
      मुळात एवढी प्रगल्भता असायला शिक्षण , एकमेकांचा सहज होणार सहवास , इकॉनॉमिक स्टॅबिलिटी also या गोष्टी आवश्यक आहेत .
      वानवा नसली तर भूक होत नाही .
      त्यामुळे एका विशिष्ट वर्गापुरता हा सिनेमा राहतो

  7. अप्रतिम !

    मित्र दिनाच्या निमित्ताने एका वेगळया चित्रपटावर आपण लिहिले आहे. किती बारकाव्यानिशी लिहिलंय….सलाम !

    मला तर असा सिनेमा आहे हेच माहिती नव्हते. अवश्य बघणार…..कुठे उपलब्ध आहे.

    स्त्री पुरुष मैत्रीचा उलगडा छान केलात. ❤️

    1. ऍमेझॉन वर आहे हा . कदाचित यु ट्यूब वर असेल पण subtitles नसतील
      Thank you Uday.

  8. Mrs smita dewappa Kokitkar

    व्वा प्रिया खूप छान विषय!!आपल्या समाजात ह्या अश्या संबंधांना का पवित्र किंवा स्वच्छ मैत्री समजत नाहीत तेच कळत नाही. एक स्त्री आणि पुरुष कधी एकमेकांचे निव्वळ मैत्र असू शकत नाहीत का? असो पण तू खूप सुंदर शब्दांकन केलय मी हा चित्रपट नक्कीच बघेन. खूप सुंदर असणार वाद नाही. कित्ती सुंदर नातेसंबंध असू शकतात हे लक्षात आणून देणारा चित्रपट आहे.

    1. ऍमेझॉन प्राईम वर आहे Smita. खरे आहे तुझे . आपण माणसांना अजूनही लिंगात अडकवले आहे .
      Thank you.

  9. अतिशय सुंदर रसग्रहण. आधी हा लेख वाचूनच मग चित्रपट बघायला हवा यातच सगळं आल. अतिशय सुंदर लेखन…

Leave a Reply to Rashmi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *