Skip to content

हम तो सफर करते है – किशोर कुमार 

आठवणी, आनंदाच्या असूदे  किंवा विरहाच्या, त्या छळवादीच असतात. अनामिक हुरहूर लावतात. गेलेले क्षण काही परत येत नाहीत. ते आपले  त्यांच्या प्रवासाला निघून जातात; आपण त्यांची ती वाट वर्तमानात निरखत बसतो. दिवसाच्या लखलखाटात या आठवणी  पुसट होत असतील पण रात्रीच्या अंधारात मात्र त्यावरील काजळी जाते. निद्रादेवीची आराधना करावी तर मनाच्या कोपऱ्यात  बसलेल्या त्या, भोज्या  करायला येतात.
आठवणी काळ्या पांढऱ्या रंगात असतात. होऊन गेलेल्या घटना, आपण केलेल्या चुका, वाटलेली खंत, न बोललेले शब्द, कधी न बोलले असते तरच बरे झाले असते असे वाटलेले शब्द लख्ख दाखवतात. गमावलेल्या माणसांची तीव्रतेने आठवण करून देतात.

आए तुम याद मुझे गाने लगी हर धड़कन
ख़ुशबू लाई पवन महका चंदन

१९७५ मध्ये हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित “मिली”  प्रदर्शित झाला.
एका आनंदी, खट्याळ, प्रेमळ  मुलीची ही गोष्ट. गोष्ट घडते, मुंबईतील एका सोसायटीत. ह्या मुलीचे सर्वांवर प्रेम आहे. सगळ्यांशी गट्टी आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे, सोसायटीतील सर्वांची, मिली(जया भादुरी) लाडकी आहे.
तिच्याच सोसायटीत फ्लॅट घेणाऱ्या, आयुष्याशी फटकून वागणाऱ्या शेखरच्या (अमिताभ )आयुष्यात सुद्धा ही मुलगी येते आणि वठलेल्या झाडाला जणू पालवी फुटते. नियती मात्र परत खो द्यायला डोकावते.
तिच्या सोबतीने रस्ता चालण्याच्या स्वप्नात रंगलेल्या शेखरला मिलीच्या दुर्धर रोगाबद्दल समजते.

आए तुम याद मुझे गाने लगी हर धड़कन
(सिनेमा – मिली, गीतकार -एस डी बर्मन, गीतकार – योगेश, नायक -अमिताभ बच्चन)

अनेकवेळा दुःखाचा पहिला ओघ संपला की उरलेले जीवन, जगण्याची आठवण करून देते. दैनंदिन आयुष्यातील कामे तर थांबलेली नसतात. माणूस उठतो, कामाला लागतो. दुःख  तसेच मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहते. त्याला वाट मिळत नाही. उभे राहण्यासाठी, प्रयत्नपूर्वक नकारार्थी भावनांना माणूस दाबून टाकतो पण त्याचवेळी आनंद, उत्साह याही भावना आटतात. मनात उदासी साकळून येते. अर्थ माहित नाही, कारण कळत नाही पण डोळे उगाच भरून येतात. एक हताशपणा जाणवत राहतो. काय करावे ते समजत नाही,  काही करावेसे वाटत ही नाही. मन दगड होते. येणारा दिवस यंत्रवत पुढे ढकलला जातो. नैराश्य  दूर करण्यासाठी माणूस कामात गुंतवून घेतो, कधी व्यसनात अडकतो, हल्ली सोशल मीडियाच्या आभासी जगात रमतो. या साऱ्याचा उपयोग नसतोच. कितीही विसरायचा प्रयत्न  केला तरीही न दिसणारे दुःख मनाच्या तळाशी ठुसठुसत राहते.
एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतात असंख्य भावनांचा कल्लोळ आहे. शेखरचे एकाकीपण, मिलीबद्दल त्याला वाटणारे अपार प्रेम,  ती नसली तर आयुष्य परत विराण होईल याची त्याला असलेली जाणीव, तिच्या आठवणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्यासाठी काहीतरी करण्याची उर्मी . .

हर पल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन में तू खोया रहता है
भर दे फूलों से उसका दामन

पण त्याला आणि तिलाही माहित आहे पुढचा प्रवास त्या दोघांसाठीही एकटेपणाचा प्रवास आहे. आठवणींचा प्रवास हा एकट्याचाच प्रवास असतो. घटना आठवते पण त्यात भाग घेणारी माणसे नसतात. असली तरी ते क्षण नसतात, ती उत्कटता नसते, असोशी नसते ..
आठवणी जगता येत नाहीत.

कलावंतांच्या आठवणी मात्र त्यांच्या कलेच्या रूपाने तरी त्याच उत्कटतेने परत जगता येतात. तशीही आपली त्यांच्याशी बांधिलकी नसतेच. त्यांच्या गाण्याशी असते. ते स्वर,ते शब्द, ती भावना परत जगता येते.  पुण्यतिथी आणि जयंती पकडून, हल्ली लोकं ब्लॉग लिहितात, युट्यूब वर कार्यक्रम सादर करतात.फेसबुकवर लेख असतात. ती व्यक्ती आपलीही आवडीची असते. तिच्या भूमिका, गाणी, कविता यांच्यावर आपणही भरभरून प्रेम केलं असते. आयुष्याचा बराच मोठा कालखंड त्यांच्या सोबतीने आपण पार केला असतो.
काल  रात्री बारा पासूनच किशोरवर लिहिलेले लेख वाचत होते. त्याने गायलेली गाणी ऐकत होते. ऐकताना लक्षात आले, हसरा चेहेरा असलेल्या या माणसाने आपल्या कारकिर्दीत शेकडो दर्दभरी गाणी गायलेली आहेत जी अत्यंत लोकप्रिय आहेत. विरह, दुःख, आकांत, वेदना, तक्रार  याही पेक्षा ही गाणी एकाकी माणसाची गाणी आहेत. छत्तीस वर्षांपूर्वी किशोरने  या जगाचा निरोप घेतला. त्याच्या आयुष्याचा विचार केला तर कलावंताच्या वाट्याला येणारे एकाकीपण त्यानी झेलले . त्याच्या  गीतातही या एकाकी प्रवासाचा स्विकार जाणवतो. मध्येच कुठेतरी रेंगाळणे असले तरी परत एकला चलो.  
अशा गाण्यांची ही सफर.

ठंडी हवा ये चांदनी सुहानी, ऐ मेरे दिल सुना कोई कहानी
(सिनेमा- झुमरू, संगीतकार- किशोर कुमार, गीतकार-मजरुह सुलतानपूरी , नायक-किशोर कुमार ) 

लम्बी सी एक डगर है ज़िंदगानी 
ऐ मेरे दिल सुना कोई कहानी
नायक आणि नायिकेच्या पहिल्या भेटीचे साक्षी आहे हे गीत. .
रात्रीच्या अंधाराला  छेद  देणारे, चांदणे पांघरलेले आकाश, आसमंतात भरून राहिलेली शांतता, गुलाबी थंडीची शिरशिरी आणि कोणा मुसाफिराच्या येण्याचा इंतजार असलेले तारुण्य. पियानोवर बसून ती स्वरांशी खेळताना अचानक कोणाच्यातरी गाण्याचा आवाज येतो.
पर्वताच्या रांगेतून, आपले  सामान  गाढवाच्या  पाठीवर लादून, एक प्रवासी आपल्या  स्वप्नाची वाट चालत असतो. तिच्यासारखाच तोही एकटाच आहे पण  त्याच्या सोबत  त्याचे गाणे आहे.

सारे हसीं नज़ारे, सपनों में खो गये 
सर रख के आसमाँ पे, पर्वत भी सो गये 
मेरे दिल, तू सुना, कोई ऐसी दास्तां 
जिसको, सुनकर, मिले चैन मुझे मेरी जाँ

चांदण्याच्या प्रकाशात जरी रस्ता उजळलेला आहे तरीही आजूबाजूचे सृष्टी सौन्दर्य रात्रीच्या अंधारात लपून गेले आहे. हे सारेच स्वप्नांच्या राज्यात हरवून गेले आहेत, इतकंच काय, वरच्या आभाळाची उशी करून पर्वत सुद्धा निद्राधीन झाले आहेत. प्रवाश्याच्या सोबतीला आहे तो फक्त त्याचा आवाज. तोच त्याचा आधार बनला आहे.
हे गीत म्हणजे स्वतःचा स्वतःशीच असलेला संवाद. आयुष्य  नेहेमीच ठरवून जगता येत  नाही. अनेकवेळा वाट जरी चुकली तरी त्याचमुळे कधीही न पाहिलेल्या वाटा शोधल्या जातात. त्या जीवनाच्या उद्धिष्टापर्यंत सोबत करतात.
गंतव्यापर्यंत सर्वानाच  जायचे असते पण महत्वाचे असते ते  या वाटेवर चालण्याचा आनंद घेणे.
वाट खडतर असूनही, त्याच्या ओठावर हसू आहे, हृदयात गीत आहे,, चराचरातील साध्या साध्या गोष्टीचे  त्याला कुतूहल आहे, अप्रूप आहे. सर्वात महत्वाचे हे की, ही रात्र संपणार ह्यावर त्याची श्रद्धा आहे.

प्रसिद्ध कलाकार अशोक कुमार यांनी आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार याला या मायानगरीत आणला. सुरुवातीला कोरस मध्ये गाता गाता हळूहळू अभिनयाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे झाले. आपल्या आवडत्या गायकाची, कुंदनलाल सैगलची भेट घेणे हा एकमेव हेतू ठेवून मुंबईत आलेल्या किशोरला अभिनयाची फार आवड नव्हती. इलस्ट्रेटेड वीकली या मासिकात प्रीतीश नंदी ला दिलेल्या मुलाखतीत किशोरने सांगितले आहे की या अभिनय क्षेत्रापासून पळून जाणे ही त्याची एकमेव इच्छा होती. सिनेमातून आपल्याला काढून टाकावे यासाठी त्यांनी आपले संवाद बोलताना सुद्धा मुद्दाम चुका केल्या होत्या. अभिनेता म्हणून यशस्वी होणे , त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी आहेत , हा त्याला  नको असलेला पण नियतीने त्याच्यासाठी निवडलेला रस्ता होता.

ओ मांझी रे, अपना किनारा, नदिया की धारा है
(सिनेमा- खुशबू, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार – गुलजार, नायक- जिंतेन्द्र)

नावाड्याला नदीचे स्वरूप माहित असते. कुठे नांगर घालायचा, कुठे वल्हवत जायचे, कुठली दिशा पकडायची याचे ज्ञान असते. प्रवाशाला मात्र याचा गंध नसतो. आपल्याला तरी आयुष्य कसे जाणार याची कुठे कल्पना असते! पडद्यावर जरी नावाड्याला उद्देशून हे गीत असले तरी सुद्धा हे गीत म्हणजे संवाद. स्वतःच्या आत्म्याशी केलेले हितगुज. 
बंगालच्या लोकसंगीताचा आधार घेऊन हे गीत बनलेले आहे. त्यामुळे यात कमीतकमी वाद्यांचा वापर केला आहे. बंगालच्या मातीतील मृदूंग,  आंबट गोड आठवणीचा पाठलाग करणारी बासुरी आणि त्याला साथ देणारा, पाणी कापत जाणारा वल्ह्यांचा आवाज. हा आवाज निर्माण करण्यासाठी पाणी भरलेल्या बाटल्यांचा उपयोग पंचमने केला .
प्रत्येक अंतराच्या शेवटी “ओ मांझी रे” ही साद किशोरने उंच पट्टीत दिली आहे. नायकाची आंतरिक वेदना त्या तीव्र स्वरातून आपल्याही हृदयापर्यंत पोचते .

पानियोंमे बह रहे हैं , कई किनारे टूटे हुए
रास्तो में  मिल गये हैं , सभी सहारे छूटे हुए .

केरळ मध्ये प्रवाश्यांना नदीतून घेऊन  जाताना, रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यांवर असलेल्या घरांकडे प्रवासी बोटी थांबतात . त्यांना शहाळी, काही खास पदार्थ दिले जातात. थोडावेळ बोट विश्राम करते पण तिथे नांगर घालत नाहीत. जागाच नाही.  थोडावेळ विसावा घ्यायचा आणि प्रवास सुरु.
आयुष्यात सुद्धा नात्याच्या, मैत्रीच्या माध्यमातून अनेक विसाव्याची ठिकाणे मिळतात पण अंतिम प्रवास हा एकट्याचाच असतो. 

कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा
(सिनेमा – झुमरू, गीतकार- मजरुह सुलतानपुरी,संगीतकार- किशोर कुमार, नायक- किशॊर कुमार) 

आयुष्याची संध्याकाळ जवळ आलेली माणसे पाहिली आहेत? जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. जगण्याचा उद्देश्य जगणे एवढाच शिल्लक असतो.  काही करायची उर्मी असेल तरी ताकद संपत चाललेली असते. पुढे गेलेल्या पिढीची स्वप्ने वेगळी असतात, ती पूर्ण करण्याचे त्यांचे मार्ग वेगळे असतात,  त्यांच्या आयुष्यात सोबत देणारी त्यांची हक्काची माणसे असतात, त्यांचा जगण्याचा वेग प्रचंड असतो आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या वाटेवर त्यांच्या सोबतीने चालणे अशक्य आहे हे मनाने जाणण्याची वेळ आलेली असते ..आयुष्याची संध्याकाळ तेव्हा होते जेव्हा एक एक माणसे हात सोडून पुढे न फिरण्याच्या वाटेवर निघून जातात.

शाम तन्हाई की है, आएगी मंज़िल कैसे
जो मुझे राह दिखाए, वही तारा न रहा

हमदम म्हणजे फक्त शरीराची सोबत नसते.
हमदम म्हणजे ज्यांच्या साथीने प्रवास करायचा आहे ती माणसे. आपल्या सुखात सुख असणारी, आपल्या स्वप्नात स्वप्ने शोधणारी माणसे. कितीही वाटले तरी प्रत्येकाचे श्वास मोजून पाठवले असतात.  जाणारी माणसे  तुमचा श्वास चालू आहे का यासाठी थांबत नाहीत.

क्या बताऊँ मैं कहाँ, यूँ ही चला जाता हूँ
जो मुझे फिर से बुला ले
वो इशारा न रहा

जीवन नैय्या सिनेमासाठी, अशोक कुमार यांनी हे गीत गायले ज्यांची चाल सरस्वती देवी यांनी रचली होती. जवळ जवळ दोन दशकांनी किशोर कुमार यांनी या चालीचा आपल्या सिनेमात उपयोग केला. किशोरच्या अत्यंत लोकप्रिय गीतांत याचा समावेश आहे.

एकटी असणारी आणि एकाकी होणारी यातही फरक आहे. पहिला स्वतः घेतलेला पर्याय आहे आणि दुसरा हातातून काढून घेतलेला निर्णय आहे.
माणसाला सोबत हवीच असते हे सुद्धा चुकीचे गृहीतक आहे. सोबतीची भीती वाटणारी, सोबतीची गरज नसणारी, सोबतीची सवय नसणारी असंख्य माणसे असतात. फेसबुकवरच पहा, आपण म्हणतो, माणसे, माणसाच्या ओढीने येतात, संवादाची भूक भागवायला येतात. तसेही नसते. असंख्य माणसे कोणताही संवाद साधत नाहीत. त्यांना हवे ते वाचतात आणि पुढे जातात. ती त्यांच्याच सोबतीत खुश असतात. सोलो ट्रॅव्हल्स आता लोकप्रिय होत आहेत ते पाहतो आहोत आपण. कधीकधी स्वतःला शोधायला, लोकांपासून दूर जाणे आवश्यक असते.
Embracing solitude is also an art. 

 हम तो सफर करते है .
(सिनेमा-नमकीन, गीतकार-गुलजार, संगीतकार-आर डी बर्मन, नायक- संजीवकुमार)

नमकीन मधले ” राह पे रहते है ”  हे एका ट्रक ड्रायव्हरचे गीत. त्याच्या आयुष्याचे सार आहे. मनाने भटका असणारा कोणीही या गीताशी समरस होऊ शकतो. जीवन हे निराशादायी असले, तरीही आशेचा सहारा  घेऊनच माणसाने आपले आयुष्य जगले पाहिजे असा संदेश या गीतात आहे .

राह पे रहते है , यादों पार बसर करते है
खुश रहो अहले वतन , हम तो सफर करते है .

काही कामासाठी आलेला गेरुलाल एका जुनाट घरात पेइंग गेस्ट म्हणून राहतो. त्या घराची मालकीण आणि तिच्या तीन अविवाहित मुलींशी त्याचे भावबंध जुळतात पण अचानकच  त्याला दुसऱ्या ठिकाणी कामावर रुजू  होण्याची ऑर्डर येते . त्याच्या जाण्याने ते घर तर दुखावले जातेच पण गेरुलाल सुद्धा मनाने तुटतो.
या गीताला या प्रसंगाची पार्श्वभूमी आहे . निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशातून जाणारा घाटाचा वळणावळणाचा न संपणारा रस्ता आणि त्यातून आपली वाट शोधणारा गेरुलाल. त्याच्या असहाय्य एकाकीपणाचे साक्ष असणाऱ्या या गीताला  साथ आहे ती गिटार आणि संतूरच्या तारांची . किशोरचा धीर गंभीर, खोल आवाज त्या एकाकी वाटेचाच आवाज होतो. गाण्याचा ठेक्यात सुद्धा एकच लय आहे . गेरुलालचा प्रवास सुद्धा तसा एकाकीच. हा सरळसोट एकाकीपणा आयुष्याला सोबत करणारा.

ऐसे उजड़े आशियाने तिनके उड़ गये हो
बस्तियों तक आते-आते रस्ते मुड़ गये
हम ठहर जायें जहाँ, हो उसको शहर कहते हैं
राह पे रहते हैं
यादों पे बसर करते हैं
खुश रहो अहल-ए-वतन
हो हम तो सफर करते हैं

घरे उजाडलेली, घर नसलेली, बरेच काही आयुष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेली, पाठीवर कुणाचाही हात नसणारी माणसे एकीकडे स्थिरावू शकत नाहीत. माणसे जागेशी बांधली जात नाहीत , तिथे राहणाऱ्या माणसांशी त्यांचे नाते जुळते. जिकडे याचीच वानवा असते त्या माणसासाठी सारे जगच घर होऊन जाते.

.किशोर कुमारला त्याचा एकांत आवडायचा . त्याच्या बंगल्यातील झाडे आवडायची . त्या प्रत्येक झाडाला नाव होते . ती सोबती होती त्याची . संगीत आवडायचे आणि आवडायच्या त्या हीचकॉक च्या फिल्म्स . त्याच्यासारख्याच विक्षिप्त त्याच्या आवडी होत्या.
त्याच्या विचित्र वागण्याचे अनेक किस्से आहेत.  हेतू एकच. सिनेसृष्टीला लांब ठेवणे .
नाही शक्य झाले . त्याच्या आवाजाने जी भुरळ घातली ती आज तो जाऊन तीन दशके झाली तरी कायम आहे .
” मी एवढी विरहगीते गायली आहेत की माझ्या मृत्यूनंतर दूरदर्शन एक दिवस फक्त रडगाणी लावेल ही त्याची खंत होती .”
एवढे म्हणूनही, स्वतःच्या सिनेमांना संगीत देताना मात्र त्याचा टोन फार उदास आहे.
किशोरच्या शेकडो आवडत्या गाण्यांमधून आपली आवडती निवडणे कठीण. त्यात मूड नुसार लिस्ट बदलते हा माझा अनुभव आहे पण काही गाणी मात्र ऑल टाइम ऐकली जातात .. त्याला त्याची दुःखी गाणी ऐकणे आवडत नसेल तरीही ऐकली जातात, त्यातले एक गाणे आहे,

जिंदगी का सफर , है ये कैसा सफर
( सिनेमा – सफर, गीतकार -इंदीवर , संगीतकार -कल्याणजी आनंदजी , नायक -राजेश खन्ना )

खूप लहान असताना वाटायचे शिक्षण, करिअर, नोकरी , लग्न , मुलं , त्यांचे मार्गी लागणे आणि आपण निवृत्त होणे या गोष्टी चांगल्या रस्त्यावरून गेल्या की निश्चित येणारी ठिकाणे आहेत.
मग कधीतरी मोठी झाले. उद्याची अनिश्चितता ही एकच गोष्ट नक्कीच निश्चित आहे. त्याही पेक्षा उद्या येऊन तो परत रात्रीच्या अंधारात विलीन होणार आहे हे ही सत्य आहे. हातात आहे ते प्रत्येक क्षणाचे अर्ध्य देणे.
माझ्या बाबांचे एक खूप लाडके वाक्य होते , आनंदात माजू नये , दुःखात खचू नये .. येणारा क्षण जाणार आहे हे नक्की आहे. आपण गेल्यांनतर लोकांनी म्हणावे माणूस सुखी होता. जाईपर्यंत तसेही पुढच्या क्षणाची हमी कुणीही देऊ नये.

ज़िन्दगी को बहुत प्यार हमने दिया
मौत से भी मोहब्बत निभायेंगे हम
रोते-रोते ज़माने में आये मगर
हँसते-हँसते ज़माने से जाएँगे हम
जाएँगे पर किधर, है किसे ये खबर
कोई समझा नहीं..

कोई समझा नाही म्हणणाऱ्या किशोरने आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगणारी अनेक गाणी गायली आहेत. जिंदगी एक सफर है सुहाना, कुछ तो लोग कहेंगे, जिंदगी के सफर में गुजर जाते है वो मकाम, रुक जाना नही तू कही हारके, मुसाफिर हूँ यारो .. अशी अनेक गाणी,  ज्यांनी जगण्याचा धडा सोपा केला आहे.
Pratish Nandi had rightfully said, “ Kishore never really passed away. It’s impossible for a man like him to die because he personified life itself.”
माणसे एकाकी असतात किंवा माणसे एकटेपण भरभरून जगतात. किशोर कुमार स्वतःची सोबत एन्जॉय करत असावा. रुमा देवी सोडून गेल्यानंतर स्वतःच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणे, आजारी मधुबालाशी लग्न करणे, शेवटी लीना चंदावरकर बरोबर संसार थाटणे , चित्रपटासारख्या बेभरवशाच्या कारकिर्दीत, सांगीतिक शिक्षण घेतले नसूनही दीर्घ काळापर्यंत स्वतःचे स्थान राखणे, एकेकाळी,  तुला सिनेमाचे पैसे मिळतात ना , आणि गाण्यासाठी कशाला असे एका मोठ्या संगीत दिग्दर्शकाने त्याला ऐकवले होते, त्या नंतर निर्मात्यांकडून आपले पैसे वसूल करणे … त्याच्या चक्रमपणाच्या  अनेक कथा आहेत , आख्यायिका आहेत. त्यात एक गोष्ट खरी आहे.
आयुष्याचा प्रवास त्यानी समरसून केला.

हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलिये
( सिनेमा -नौ दो ग्यारह, संगीतकार – एस डी बर्मन, गीतकार -मजरुह सुलतान पुरी, नायक -देव आनंद)

हे गीत देव आनंद बरोबर किशोरचे  सुद्धा आहे. राजेश खन्नाचा आवाज म्हणून किशोर गाजला तरी त्या अगोदर देव आनंद चा आवाज बनायला हेच गाणे कारणीभूत होते. मला यातले सगळेच आवडते. काहीसा बेफिकीर देव आनंद, त्याचा मोडका  ट्रक, आणि तमाम स्त्रियांनां भुरळ पाडणारे त्याचे वाकड्या  दातातून दिसणारे हास्य. सुरुवातीची शीळ आणि गाण्याच्या अंतरामधले उडते संगीत.

दर्द भी हमें कबुल, चैन भी हमें कबुल
हमने हर तरह के
फूल हार में पिरो लिए
जो भी प्यार से मिला , हम उसी के हो लिये

फक्त सैगलला बघण्याची आस घेऊन आलेला, सगळ्यांनी हा काही चांगले करून दाखवेल याची आशा सोडलेला वात्रट मुलगा अभिनेता , गायक, संगीत दिग्दर्शक, पट्कथालेखक, निर्माता, दिग्दर्शक झाला  ह्याचे सारच किती सोपे करून या गीतात दिलं आहे.
जे वाट्याला आले , त्याच्यावर त्यानी प्रेम केलं. ज्याच्यावर त्यानी प्रेम केले, त्या सर्वांनी आभास कुमार गांगुलीचा किशोर कुमार होण्याकडचा प्रवास सुकर केला. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

20 thoughts on “हम तो सफर करते है – किशोर कुमार ”

  1. उदय शेवडे

    किशोरजींची जयंती आणि आपला लेख दिसला नाही म्हणून आपली आठवण झाली आणि अखेर दिसला…..सुंदर लेख, गाण्यांची हटके निवड.
    झुमरू तल्या दोन गाण्यांची निवड काय ताकद आहे गाण्यात ?

    आठवण आणि सोबत यांची छान मांडणी केलीत. यामुळे गाण्यांचा किंवा किशोर यांचा लेख न होता तो तात्त्विक पातळीवर जातो हे आपल्या लेखाचे वेगळेपण !

    1. जरा वेळ झाला
      अश्या गाण्यांवर लिहायचे म्हणजे रात्र हवी ,.नाहीतर ती मजा येत नाही
      Thank you Uday .

      1. Suvarna Pralhad Joshi

        अप्रतिम लेख प्रिया,
        हीच गाणी आणि यात उल्लेख केलेली गाणी माझीही अतिशय आवडती गाणी आहेत. गाण्यांचा जगण्याशी संदर्भ जोडून लिहीण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे. या तुझ्या लेखांची मी वाट बघत असते.

  2. केवळ सफर / प्रवास यावर किशोरदाने इतकी सुरेख गाणी गायली आहेत!!
    काल सकाळीच तुमच्या पोस्टची वाट बघत होते. आता अगदी अधाशासारखी वाचली 😍
    फारच बढिया👌
    सगळ्या गाण्यांची निवड अगदी हटके 👌
    विवेचन तर काय सुरेख लिहिलंय!!

  3. विदुला

    प्रिया,
    एखाद्या सेलिब्रिटी च्या जन्म दिनी ,मृत्यू दिनी
    त्या व्यक्तीच्या कारकीर्दीचा लेखा जोखा मांडणारे लेख सगळीकडे भरभरून वाहत असतात.
    पण तुझ्या लेखाचे वेगळेपण प्रत्येक वेळी जाणवते.
    तुझ्या लेखाची सगळे वाचक वाट पहात असतात.
    आभास कुमार उपाख्य किशोर दा वरचा हा लेख अर्थात च 👌👌👌
    ❤️❤️❤️❤️

    1. एवढ्या सुंदर थीम घेऊन लिहिता येते ना
      कामाचा आवाकाच प्रचंड आहे या लोकांचा
      Thank you Vidula

  4. Santosh Suresh Kulkarni

    राह पे रहते हैं….निव्वळ क्लास कितीही आणि केव्हाही ऐकतो. माझ्या मोठ्या भावाला हे गाणं खूप आवडायचे, आज तो ह्या जगात नाही पण हे गाणे ऐकताना तो कायम बरोबर आहे असेच वाटते.
    किशोर द ग्रेट…आपले लिखाण ग्रेट 🖖🙏❤️

  5. किशोरकुमार या नावाने माझ्या मनाचा एक कप्पा कायमच व्यापलेला आहे.
    जीवनाचे सार सांगणारी गाणी संख्येने जास्त आहेत, अभिनयाला विनोदाची झालर आहे, संगीतदिग्दर्शन करताना कारूण्याची किनार आहे आणि आवाजाला दैवी देणगी आहे.
    प्रिया, छान गाणी निवडली आहेत. संदर्भ आणि विश्लेषण नेहमीप्रमाणे सहजसुंदर झाले आहे.

    1. Thank you Deepa ,
      खरे आहे . चेहेरा हसरा मिश्किल पण आतमध्ये बरेच काही सहन करणाऱ्या माणसाची गाणी वाटतात ही
      आयुष्य पाहिलेल्या आणि तरीही जगलेल्या माणसाची गाणी

  6. रत्नाकर

    सुंदर लहान लहान वाक्ये आहेत पण किती मार्मिक. रात्रीच्या अंधारात काजळी ….., आठवणी जगता येत नाहीत.

Leave a Reply to Santosh Suresh Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *