Skip to content

आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’ 

हिंदी सिनेमाचा एक महत्वाचा घटक म्हणजे यातील सर्वगुणसंपन्न नायक. पन्नासच्या दशकाचा काळ पाहिला तर नुकते  स्वातंत्र्य मिळाले होते. असत्याचा पराभव होऊन सत्य जिंकेल अशी खात्री असल्याने हिंदी सिनेमाचा नायक सत्यवादी, परोपकारी, कुटुंबसंस्थेला मानणारा, आईची भक्ती करणारा, प्रेयसीचे मन जाणून तिच्याशी एकनिष्ठ असणारा, प्रसंगी तिच्या प्रेमासाठी सर्वस्वाचे बलिदान करणारा, देशाच्या शत्रूशी प्राणपणाने लढणारा, अगदी काळे धंदे करत असेल तरीही शेवटी पश्चाताप होऊन आपल्या पापाचे परिमार्जन करणारा असणे हे ओघाने आलेच.
एवढे सद्गुण असूनही आणि एक कसब त्याच्या अंगी असणे अपेक्षित होते ते म्हणजे त्याने पडद्यावर गाणे.
त्याच्या भावना , त्याचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचे संगीत हे अतिशय महत्वाचे माध्यम होते. सुरुवातीला असलेला/  नसलेला गळा गाता ठेवणारा नायक, रफीच्या आवाजात जेव्हा गायला लागला तेव्हा त्यानेच नाही तर संगीतावर प्रेम करणाऱ्या साऱ्या भारतीय नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असणार यात शंका नाही.
आवडते गायक-गायिका असे खरेतर म्हणू नये. एक एक गाणे त्या त्या गायकाला हृदय सिंहासनावर बसवते अशी गाणी चिक्कार. तरीही लता बाई आणि रफीजी हे अंगुळभर वरतीच. लता बाईचा आवाज हा आदर्श स्त्रीचा आवाज  आहे. नात्याला ठाम रूप देणारी, ते निभावणारी  स्त्री. त्याचे पुरुष अंग आहे ते रफींजींचे. हा आवाज नायकाचा आहे जो एक आदर्श पिता आहे, पुत्र आहे, भाऊ आहे, मित्र आहे. मनाने चांगला असणारा, आपली जबाबदारी निभावणारा पुरुष आहे.  त्यांच्या आवाजाची रेंज , गायकीची रेंज, कोणत्याही गीताला न्याय देण्याचे त्यांचे कसब  अफाट आहे. १९४४  मध्ये, गांव की गोरी या सिनेमासाठी त्यांनी पहिले गीत रेकॉर्ड केले आणि हा सिलसिला १९८० पर्यंत चालू राहिला.  जुलै ३१, १९८० मध्ये मोहम्मद रफी यांचे दुर्दैवी निधन झाले. रसिकांसाठी मागे राहिली ती असंख्य सुश्राव्य, सदाबहार, मधुर गीते.
पुरुषाला आपल्या भावना शब्दांत मांडणे कठीण वाटते. रफीच्या गाण्यांनी या दबलेल्या भावनांना मुक्त केलं. याचा पुरुषांना किती फायदा झाला हे सांगता येणार नाही पण पुरुष कसा असतो हे स्त्रीला समजणे सोपे झाले .
ही गाणी पुरुषाला समजून घ्यायची गाणी . 

किसी न किसी से कभी न कभी,कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. 
(सिनेमा-कश्मीर की कली, संगीतकार-ओ पी नय्यर, गीतकार-एस एच बिहारी, कलाकार शम्मी कपूर  )

पुरुष प्रेमात वारंवार पडतो, बाहेरही येतो, परत पडतो. हे चक्र अनेक पुरुषांच्या आयुष्यात बहुतेक वेळा चालूच असते पण जेव्हा तो तन, मन आणि धनाचा सौदा करतो तेव्हा मात्र तो गंभीर असतो.
गंभीर हं, प्रामाणिक राहतोच असे नाही पण तेव्हा त्याचा निर्णय पक्का असतो.
तारुण्याच्या सुरुवातीला फुटणारी मिसरूड त्याला जेव्हा त्याच्या पुरुषत्वाची जाणीव करून देते तेव्हा तिचा शोध सुरु होतो. आता शोध म्हंटले की वेगवेगळ्या रस्त्यांचा मागोवा घेणे आलेच. He has his own hope, dream and expectations of finding the right one.
या वयात तर त्यांना स्वतःला प्रूव्ह करावे लागते. शिक्षण, करिअर, स्पर्धा, आई वडिलांच्या, समाजाच्या अपेक्षा या सर्व गोष्टींचे ओझे असतेच. अनेक पुरुष स्वतःला वाटत असलेली भीती ,काळजी , नैराश्य , कमीपणा कोणाही कडे शेअर करू शकत नाहीत. अनेक वेळा मुलाची आपल्या आईशी जवळीक असते. तिच्यावर अनेक बाबतीत अवलंबून असतो तो. वयात येतो, तारुण्यसुलभ भावना मनात उचंबळून येत असतानाच अशा एका स्त्री ची गरज वाटते जी त्याला समजावून घेईल.
आपली असुरक्षितता तो जिच्याकडे व्यक्त करू शकेल अशी स्त्री, who is kind and understanding enough to be vulnerable with.ज्याच्यावर प्रेम असते, त्याच्यासाठी स्त्री काहीही करू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे  त्याची स्वप्ने तिची बनतात . त्याचे बोलणे , याचे शब्द तिच्यासाठी महत्वाचे ठरतात. आपले कुणीतरी ऐकते आहे ही भावना  त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते.

ढूँढ रहा हूँ मैं वो दुनिया, प्यार जिसे कहते हैं
कौन वो क़िस्मत वाले हैं, जो लोग वहाँ रहते हैं
मुझको मेरे दिल ले के वहीं चल ,
आए जहाँ हाथ कोई रेशमी आँचल
किसी न किसी से कभी न कभी,कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा

तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया
(सिनेमा- हंसते जख्म, संगीतकार- मदन मोहन, गीतकार- कैफी आझमी, कलाकार-नवीन निश्चल ) 


बायका खूप बोलतात आणि पुरुष फक्त ऐकतात ही दंतकथा आहे. 
आपल्या समाजात भावना, भिती उघडपणे दाखवणे पुरुषांसाठी सोपे नाही. मैत्रिणी स्वतःचे प्रॉब्लेम्स उघडपणे बोलू शकतात. आधार मागू शकतात, मित्रांना ते सोपे नसते. स्वतःची भावनिक, हळवी बाजू उघडी करणे पुरुषांना जमत नाही. जेव्हा अशी स्त्री त्यांच्या आयुष्यात येते, जी त्यांना समजून घेऊ शकते, जिच्याकडे स्वतःचा अहंकार, स्वतःचा गंड बाजूला ठेवून ते बोलू शकतात, जी त्यांच्या अडचणी समजू शकते, प्रसंगी त्यांना काही सांगण्याची कुवत तिच्याकडे असते आणि तरीही ती पाठी राहून त्यांच्या “ पाठीशी “ राहते, कुणाकडेच सांगू शकणार नाही अशा गोष्टी जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीला सांगतो, तेव्हा तो तिच्याकडे आकर्षित झालेला असतो. अर्थात ही रोमान्सची सुरुवात असतेच असे नाही, but plays right , it can be a start to the future together.
आवडलेल्या स्त्री बरोबर पुरुष खूप बोलतो.
His woman assures him that is not alone in a competitive world where it sometimes seems as though people only care about themselves.
रफी आणि मदन मोहनचे हे सर्वात सुंदर गीत. 

“Now that I have found you, it seems I have found the world “
” मिल गया ” हा या गाण्यातला महत्वाचा शब्द
मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे याची खात्री पटलेला क्षण. श्रीमंत घरातील हा मुलगा पण आयुष्याला दिशा नाही. एक भरकटलेले जीवन आणि भरलेल्या जगात जाणवणारे एकटेपण. कुठेतरी स्थिरावे असा किनारा नाही आणि ती येते.

तुम भी थे खोए-खोए, मैं भी बुझा-बुझा था 
अजनबी ज़माना, अपना कोई न था 
दिल को जो मिल गया है तेरा सहारा 
इक नई ज़िंदगी का निशां मिल गया

आयुष्याच्या चक्रव्युहात फसलेले दोन अनोळखी जीव . अपघाताने एकत्र येतात आणि आयुष्य उजळून निघते.
मदन मोहन च्या संगीताला एक haunting quality आहे . हे गाणे सुद्धा अपवाद नाही . यातली सिम्फनी, वाद्यांचा मेळ सुद्धा वेगळाच . कडव्या नंतर बदललेल्या chords आणि rhythm हा प्रयोग सुद्धा नवीनच . सुरुवातीला वेगळे बसलेले ते दोघे दुसऱ्या  कडव्याच्या सुरुवातीला एकत्र येतात आणि तेव्हा ताल आणि स्वर बदलतात .
मने जुळतात तेव्हा समाजात असलेले भेद गळून पडतात. जेव्हा पुरुष स्वतःचे हृदय उघडे करतो, मन मोकळे करतो तेव्हा त्याला कोणताही अडथळा नको असतो. When he is opening up about something, he wants his woman to offer him feedback if he asks or seems receptive, but for the most part he just wants to express himself.

या गीताच्या शेवटी लता फक्त शेवटी येते … “तुम जो मिल गये हो’, तिच्या आवाजातील ही ओळ म्हणजे त्याच्या सादेला दिलेला प्रतिसाद.  अर्थात इथे नवीन निश्चल असल्यामुळे असेही म्हणता येईल की नायिका कंटाळून म्हणते,” समजले रे बाबा … आता पुरे” 🙂
प्रतिसादातील आतुरता आणि आर्तता याचे श्रेय पूर्णतः लता बाईंनाच जाते हे निश्चित.

सुहानी रात ढल चुकी,ना जाने तुम कब आओगे
(सिनेमा -दुलारी , संगीतकार-नौशाद, गीतकार-शकील बदायुनी, कलाकार- सुरेश)

कन्याकुमारीचे नाव “वाट पाहणे” शी समानार्थी आहे. वाट पाहण्यासाठी लागणारा संयम हा स्त्रियांच्या अंगात असतोच. लहानपणापासून तो मुरवला जातो. स्वयंवर करा किंवा पत्रिका पाहून लग्न , योग्य तो वर आयुष्यात येण्याच्या प्रतीक्षेत असणे स्त्रियांना नवीन  नाही.
पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर आवडलेली स्त्री पळवून नेणे यातही पुरुषार्थ मानला  आहेच.  कदाचित त्यामुळे संयमाची उदाहरणे कमी दिसतात. स्त्री पुरुष नात्यात पुरुषाचे श्रेष्ठत्व सर्वच संस्कृतीत अलिखित नियम असल्याने , वाट पाहण्यात असलेली नकाराची शक्यता पुरुष झेलू शकत नाही.
He decides to move on for the fear of rejection rather than boredom.
नायक,नायिकेचा शत्रू आहे त्यांच्या परिस्थितीतील अंतर. तो एका श्रीमान घराण्यातील मुलगा आणि ती आहे जिप्सी . त्याच्या वडिलांच्या सर्व आकांक्षा केवळ तिच्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत. नायिकेच्या घरच्या लोकांनाही हा रिश्ता मान्य नाही पण प्रेमात पडलेल्या त्या दोघांना त्याची पर्वा नाही. पहिल्या नजरेतच तो तिच्या सौन्दर्याने घायाळ झाला आहे आणि आज तर ती त्याला भेटणार आहे.

नज़ारे अपनी मस्तियाँ,दिखा-दिखा के सो गये 
सितारे अपनी रोशनी, लुटा-लुटा के सो गये 
हर एक शम्मा जल चुकी, ना जाने तुम कब आओगे

भेटीची वेळ तर केव्हाच टळून गेली आहे.रात्रीच्या चांदण्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे.जळणारे दिवे ही हळूहळू शांत व्हायला सुरुवात झाली आहे आणि तरीही तिचा पत्ता नाही.
ती खरंच येईल का?

ऐसे तो न देखो, के हमको नशा हो जाए
. (सिनेमा-तीन देवियाँ, संगीतकार-एस.डी.बर्मन, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, कलाकार-देव आनंद)

काही लोकांच्यात फ्लर्ट करण्याचा अंगभूत गूण असतो. त्यांच्या बोलण्याने,वागणुकीने ते तुम्हाला आकर्षून घेऊ शकतात. त्याच्या सहवासात माणसे खुलतात. अशा लोकांची कंपनी आवडते. They make you feel good about yourself…
एखादे स्मित जे तुम्हाला तुमच्यासाठीच वाटते. एखादा प्रशंसेचा शब्द , ज्यात काही अपेक्षा नसतात, मिस्कील कौतुकभरा  कटाक्ष , ज्याने तुम्ही आक्रसून जात नाहीत तर थोडेसे मोहरून जातात.
ही माणसे जात्याच चुंबक असतात …
Charming can make others feel good and flirting can make others feel attractive. फ्लर्टींग मध्ये लैंगिकतेचा भाग असतोच पण तीची मागणी नसते. अनेक वेळा तो मुख्य उद्देश नसतोच.
It’s usually light and humorous . तिच्या स्त्रीत्वाची जाणीव असणारे , तिला करून देणारे पण तरीही
निरुपद्रवी.  फ्लर्टींग स्त्री आणि पुरुष दोघेही करतात तरीही त्यात एक फरक आहे. पुरुष पुढाकार घेतो, स्त्री तिच्या मनात असेल तर त्याला दुजोरा देते. अनेकवेळा पुरुषाच्या चाली सुद्धा वेल प्लँनड असतात. शिस्तीत खेळतो तो. ती अनेकवेळा भावनेत वाहत जाते. आपल्या मनातले त्याने ओळखावे अशी तिची अपेक्षा तर तिने हो की नाही ते एकदाचे सांगावे ही त्याची अधीरता..

तुम हमें रोको फिर भी हम ना रुकें
तुम कहो काफ़िर फिर भी ऐसे झुकें
क़दम-ए-नाज़ पे इक सजदा अदा हो जाये
ऐसे तो न देखो…

पुरुष जेव्हा फ्लर्ट करतो तेव्हा तो नजरेला नजर देतो. त्याचे हसणे, तिला पाहताच तिच्यावर स्थिरावलेली त्याची नजर, चमकलेले डोळे, सगळे सगळे तुम्हाला सांगत असते , he is fascinated by you.
हे गीत मी जेव्हा जेव्हा पहाते तेव्हा नंदा कशाला थांबलीय मला समजत नाही.
Sigh …..

मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम 
(सिनेमा-मेरे मेहबूब, संगीतकार -नौशाद, गीतकार-शकील बदायुनी, कलाकार-राजेंद्र कुमार  )

आकर्षणाला तर्कशास्त्रात उत्तर नाही. ४६ गुणसूत्रांबरोबरच ही ओढ सुद्धा  जन्माबरोबर मिळत असावी.  पृथ्वी तलावावरील  असंख्य माणसात एकच माणूस मनात जागा करून बसतं त्याला काय स्पष्टीकरण असणार !
एका क्षणाला लक्षात येते की आपल्याला कुणीतरी खूप खूप आवडून गेलेय. त्या व्यक्तीला आपण ओळखतो, किती ओळखतो हे गौण असते.
कुणी का आवडते याला काहीही उत्तर नाही. केवळ सुंदरताच आकर्षून घेते असेही नाही.  Some  enhance the quality of our  life. एखाद्याचा आवाज सुद्धा आकर्षून घेतो, एखाद्याचे हसणे किंवा साधे असणे सुद्धा मोहात पाडते.
पुरुषांना नक्की काय आवडते हे सांगणे कठीण आहे तरीही काही गोष्टीचा मोह आवरणे कठीण होत असावे.  Curvy and lovely always wins . शिवाय मोकळे हास्य, स्वतःला शोभणारे कपडे, आवाज, संवाद साधण्याची कसोटी पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे संभाषणात ऐकण्याची क्षमता.  
जेव्हा अनुभव नसतो आणि when you have raging hormones at work , then one can even fall in love with a girl over an expression.
जसे मेरे मेहबूब मध्ये राजेंद्र कुमार चे होते. घाईत विरुद्ध दिशेने चालणारी दोन माणसे, झालेली टक्कर , पडलेली पुस्तके आणि गमावलेले हृदय .
पहिले प्रेम एका नजरेत होते का?असेलही …
रोमिओ चे झाले होते. या सिनेमात तर तिला नायक पाहतही  नाही. त्याच्या नजरेला भिडते ती नजर, ती सुद्धा हिजाबामधून.  आणि दिसतो तो फक्त नाजूक, गोरापान हात. He is smitten just by a glimpse of her eyes.

भूल सकती नहीं आँखें वो सुहाना मंज़र
जब तेरा हुस्न मेरे इश्क़ से टकराया था

हा तर कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणजे परत ती दिसण्याची शक्यता सुद्धा जवळ जवळ शून्य .
मग त्याने काय करावे ?
सेंड ऑफ मध्ये गाणे हा हुकुमी उपाय. देखणा तर तो आहेच आणि वेड लावणारा त्याचा आवाज  . Indeed a potent combination. आपल्या हृदयातील भावनांना शब्दात आणि सुरात  गुंफून तो म्हणतो ,

मैने इक बार तेरी एक झलक देखी है
मेरी हसरत है के मैं फिर तेरा दीदार करूँ
तेरे साए को समझ कर मैं हंसीं ताजमहल
चाँदनी रात में नज़रों से तुझे प्यार करूँ
अपनी महकी हुई ज़ुल्फ़ों का सहारा दे दे

.केवळ देखणेपणावर तरून जाणारे नट सिनेसृष्टीने पाहिले आहेत. भारत भूषण, आय रिपीट , भारत भूषण  सुद्धा कुरूप नाही. प्रदीप कुमार , राजेंद्र कुमार हे नक्कीच कुरूप नाहीत पण “ फुल और पथ्थर “ या सिनेमात धर्मेंद्र शर्ट काढतो काय आणि थिएटर मध्ये काही बायका चक्क मूर्च्छित होतात काय अशी दंतकथा धर्मेंद्रने सत्यात उतरवली. 

 आज मौसम बडा , बेईमान है बडा
(सिनेमा -लोफर, संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार-आनंद बक्षी, कलाकार-धर्मेंद्र )

खरेतर बागेमध्ये भर उन्हात नायिकेबरोबर गाणे म्हणत बागडणे हा शाप आहे नायकाला. खूपच हास्यास्पद वाटते ते पण इथे मुमताज वाटत असेल, धर्मेंद्र नाही . अगदी ब्लेझर मधेही नाही. रांगडेपणा आणि लाजरेपणा याचे अनोखे मिश्रण आहे त्याच्या व्यक्तीमत्वात .

ऐ मेरे यार, ऐ हुस्नवाले
दिल किया मैने तेरे हवाले
तेरी मर्ज़ी पे अब बात ठहरी 
जीने दे चाहे तू मार डाले
तेरे हाथों में अब मेरी जान है

हे खरेतर मुमताज ने म्हणायला हवे … मी आत्ता म्हणेन 😉
पुरुषांची सुंदरता केवळ चेहेऱ्यात  नसते. प्रतिष्ठा, पैसा, अनुभवाने आलेली परिपक्वता , प्रगल्भता एकूण व्यक्तिमत्वाला उठाव आणते. टापटीप राहणे, चांगली भाषा , मुद्देसूद बोलणे, हजरजबाबी असणे , विषयाला पकडून बोलणे, शिष्ठाचार  … अनेक गोष्टी पुरुषांकडेही आकर्षित करण्यासारख्या असतात. In Loafer, Dharmendra is irresistible.  त्यात असे म्हणतात , पुरुष नजरेनी आणि स्त्री कानांनी प्रेमात पडते.
रफीच्या आवाजावर कोण भुलणार नाही !

मान मेरा एहसान अरे नादान
(सिनेमा -आन, संगीतकार-नौशाद, गीतकार-शकील बदायुनी, कलाकार -दिलीप कुमार )

नकाराचे दुःख असहनीय कारण आपला अहं दुखावला जातो. स्वतःवरचा आत्मविश्वास डळमळीत होण्याची ती सुरुवात असते. पुरुषांच्या बाबतीत हे पचवणे कठीण असते. आयुष्यात जिंकणे हे फार महत्वाचे आहे ह्याचे संस्कार लहानपणापासूनच झालेले असतात. पुरुष कणखर असतो, रडणारे पुरुष कमकुवत असतात, पुरुषांचे अस्तित्व त्यांच्या “मी “पणात सामावलेले आहे ह्या सर्व गोष्टीने स्वतःची एक भ्रामक कल्पना त्यांच्या मनात आधीपासूनच तयार व्हायला सुरुवात होते. त्यात समाजमान्य गुण त्याच्यात असतील , जसे हुशारी, पैसे, प्रतिष्ठा .. तर या कल्पनेला सत्याचे रूप येते आणि नकाराने त्या सत्याला छेद गेला तर ते सहन करू शकत नाहीत. स्त्री मुळातच दुय्यम समजली जाते. अगदी आताही एकविसाव्या शतकात ,मुले ,मुली यात भेदभाव होतोच. तिने नकार दिला तर त्याच्या पुरुषत्वावरच शंका घेतली असे तो समजतो.  त्यामुळे त्याची परिणीती संतापात आणि तोही काबूत  ठेवता आला नाही तर शोकांतिकेत होते. 
बलात्कार, खून , ऍसिड फेकणे , बदनामी करणे …ह्याचे मूळचं दुखणे हा नको तिथे डोकावणारा अहंकार.
दिलीप कुमार आणि नादिरा यांच्या भूमीका  असलेला “आन“ हा पहिला सिनेमा होता जो २८ देशात प्रदर्शित झाला. त्या वर्षीचा ब्लॉक बस्टर. गाजला त्यात काही नवल नव्हते. शेक्सपिअरच्या सर्व प्रेमकथांपेक्षा सुद्धा “The taming of the shrew….” हा सर्वाना आवडणारा विषय आहेच.  गावातील एक साधासुधा तरुण पुढारी , श्रीमंत पण गर्विष्ठ राजकन्येच्या प्रेमात पडतो. येन तेन प्रकारणेन , तिला जिंकायचा प्रयत्न करतो. तिला पळवून नेतो आणि तिचे हृदय जिंकायचा प्रयत्न  करतो .. त्यालाच प्रेम समजावे अशी त्याची , दिग्दर्शकाची आणि पर्यायाने प्रेक्षकांची सुद्धा इच्छा असते. 
केवळ तिच्या प्रेमात तो पडला आहे , म्हणून  तिने कृतज्ञ राहावे म्हणजे जरा अतीच होते न ? 

उल्फत न सही नफरत ही सही 
इस को भी मोहब्बत कहते है … 

What an attitude and arrogance! 
प्रेमाची व्याख्या मीच ठरवणार आणि तू ऐकणार … नाहीतर तूच मूर्ख !!

अपना न बना लूँ तुझको अगर, इक रोज़ तो मेरा नाम नहीं
पत्थर का जिगर पानी कर दूँ, ये तो कोई मुश्किल काम नहीं
छोड़ दे अब ये खेल, तू कर ले मेल मेरे संग
मान ले अपनी हार

नादिराच्या चेहेऱ्यावर खाऊ की गिळू असे भाव आहेत , ते शेवटपर्यंत तसेच राहिले असते तर काहीतरी बरा संदेश गेला असता 

 मन रे तू काहे न धीर धरे
(सिनेमा -चित्रलेखा, संगीतकार -रोशन, गीतकार-साहिर लुधियानवी, कलाकार-प्रदीपकुमार )

पुरुषाची, प्रेमात फसवले गेल्याची प्रतिक्रिया अभ्यास करण्यासारखी असते. मला कुणी फ़सवू कसे शकतो एवढा अहंकार असेल तर राग आणि या सर्व प्रक्रियेत जर मन गुंतले असेल तर दुःख.
संताप आणि दुःख या कोणत्याही प्रतिक्रियेचा परिणाम , जो फसला गेलाय त्याच्यावरच होतो. बाकी फसवणाऱ्याला त्याचे काहीही पडले नसते.  अनेक वेळा नियतीच गुन्हेगार असते अशावेळी कुणावर बोट रोखणार ! 
This is a pensive song about letting go.
राजनर्तिका चित्रलेखा आणि सामंत बीजगुप्त यांची ही प्रेमकहाणी. आपल्या प्रेमाने , राज्यकारभार आणि आपले कर्तव्य याकडे बीजगुप्ताचे दुर्लक्ष होते आहे हे लक्षात आल्यावर , चित्रलेखा, राज्याचा पर्यायाने बीजगुप्ताचाही त्याग करून,  वनात जाते. 

मन रे तू काहे ना धीर धरे 
वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे

हे स्वतःलाच समजावणे आहे. एकाद्या व्यक्तीविषयी जेवढी जास्त ओढ, ती न मिळाल्यास वेदनेची तीव्रता जास्त.
जे आपले नाही, जे होऊ इच्छित नाही , त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देणे इष्ट.
आयुष्याच्या भरती ओहोटीवर आपला ताबा नसतोच. जे जे काही सुंदर आहे, प्रिय आहे ते आपल्या सोबत राहावे असे वाटणे स्वाभाविक पण त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध बांधून ठेवणे अशक्य. आयुष्याला समजून घेणे हे आव्हान आहे. अनेक अनपेक्षित घटना घडतात ज्यावर आपला ताबा नसतो . जी गोष्ट आपल्या हातात नाही ती धरून ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येक क्षण आहे तसा स्विकारणे, मन शांत करते.

२०१० मध्ये आउट लूक मॅगझीन ने गेल्या साठ दशकातील सर्वात लोकप्रिय गाणे शोधण्यासाठी अनेक संगीतकार , गीतकार यांचे मत घेतले होते . यात “ मन रे तू काहे न धीर धरे “ या गीताने पहिला क्रमांक पटकावला.
आयुष्य जगण्याचा मूलमंत्र देणारे गीत म्हणून ते अजूनही लोकप्रिय असेल का !

उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे
जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे

रफीवर लिहिणे म्हणजे न संपणारी सिरीज सुरु करणे.
शेकडो उत्तम गीतांतून लिस्ट बनवणे “ऐ दिल है मुश्किल” असते आणि  तुम्ही जी लिस्ट बनवता त्यातून गाणी वगळणे त्याहूनही कर्मकठीण असते.   
अर्थात आत्ता या क्षणाला ही सर्व गाणी अत्यंत आवडीची आहेत .. पुढच्या वर्षी कदाचित ह्याहून ही वेगळीच मोठी लिस्ट बनेल याचीही जाणीव आहे . त्यामुळे आता फक्त अर्धविराम..

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner



30 thoughts on “आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’ ”

  1. अत्यंत सुरेख, ओघवत्या आणि मनभावन शैलीत लिहिलेला लेख!
    काय गाणी निवडलीत एक सो एक!
    संपूर्ण लेख म्हणजे बकुळीच्या फुलांचा सडा 🌿
    प्रत्येक गाणं खूप विचारपूर्वक निवडलंयत विवेचनासाठी फारच सुरेख👌👌👌
    झक्कास👌 ❤

    1. Suvarna Pralhad Joshi

      अप्रतिम लिहिलंय प्रिया, रफिची गाणी निवडणं फार अवघड!! त्याबरोबर उत्तम आणि प्रवाही लिहीणं अजून अवघड, पण तुला दोन्हीही झक्कास जमलंय!!़

    2. बकुळीचा सडा हे खरंच .
      किती फुले वेचली तरी संपत नाही .
      त्यांचा सुगंध आज एवढ्या वर्षांनी सुद्धा तसाच ..हे नवल

      Thank you Kamini 🙂

  2. नो word’s… काय बोलू, दुसऱ्याच्या मनात जाऊन ते उतरवणे हे सगळं खुप भारी आनंद देणार आहे तुम्ही ईतका विचार करुन ते इतकं परफेक्ट कस आणि कधी लिहीता ती वेळ काय असेल रोज हा च विचार मी करत राहिले आहे. रोज ईतके व्याप सूरु असतात विचार तर डोक्यात चालूच असतात पण ते असा खास वेळ काढून लिहून ठेवणे इतकं अप्रतिम सौंदर्य आहे प्रत्येक शब्दात की अगदी शब्द न शब्द नीट वाचूनच पुढं जातो आहे
    तूम्ही अद्वितीय बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व आहात.

    1. काय लिहू समजत नाही . Anagha, Thank you .

      Actually ठरवून लिहिणे असे होत नाही … गाणे ऐकल्यावर जे सुचेल तसे .
      ही थिम आधी ठरवली नव्हती ..
      पण वेगवेगळी गाणी ऐकत होते आणि लिहिलं

      1. Maksud Husen Bohari

        फारच अप्रतिम लेख आपण लिहिलेला आहे सुंदर निरीक्षण आणि परीक्षण आपण हिंदी फिल्म गीताचे केलेले आहे. स्वर्गीय मोहम्मद रफी गाणं कोकिळा लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजाने माणसाचे जीवन सुकर झालेले आहे असं मला वाटतं .आपल्या भावना कोणाकडे व्यक्त करावे त्यापेक्षा स्वतःच ते गीत माणूस हा गुणगुणत असतो असं मला वाटतं ! सुंदर लेख बद्दल धन्यवाद

        1. Thank you Maksud Husen Bohariji.
          अगदी बरोबर निरीक्षण आहे. शब्द अपुरे पडतात तिथे सूर येतात.
          रफीसाब आणि लता बाईंनी भावना व्यक्ती करण्यासाठी सामान्य लोकांना आपला आवाज दिला आहे हे मलाही वाटते.
          आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यांच्या गाण्यांनी साथ दिली आहे.
          आयुष्य सोपे केले आहे.

  3. ग्रेट प्रिया! किती सुंदर लिहीतेस गं ❤️

    1. Krantikumar Kantak

      Dev Anand perfect flirt as mentioned. In Navin nischal song …. पुरे रे बाबा फार पटलं … प्रत्येक गाणं छान निवडलं. मन रे खरेच १ क्रमांकाचे गाणे… चपखल शब्दात वर्णन … थोड्या शब्दात मांडणी सुंदर वाटली..

  4. Dear Priya mam 🙏
    Thank you soooooo much for this lovely writeup 🌷🍫😍🙏
    जसा लेख वाचायला सुरू केला तशी भाराऊन गेले ,जातच राहिले ..
    किती सुंदर विश्लेषण केले आहे तुम्ही पुरुषाचा स्वभाव,रफिची गाणी , ओघवते लिखाण, छोटे छोटे संदर्भ आणि त्याचे detaling इत्यादी इत्यादी 😊
    वाचून पूर्ण झाला लेख आणि स्तब्ध झाले खूप वेळ…
    Meditation चा फील आला 😍
    अशाच छान लिहीत रहा , आम्हाला वाचनाची मेजवानी मिळत राहील .
    Once again ,thank you so much 😍🙏

  5. कमाल केवळ कमाल! सुंदर झालाय लेख
    पुन्हा पुन्हा वाचावा असा

    1. A very interesting topic indeed Gauri . म्हणजे पुरुष गीतकार सुद्धा नकळत biased होतात ते असे ..मजा आली शोधताना

  6. उत्तम विश्लेषण. ते सुसंगत आणि परिशीलन करून लिहिल्यामुळे रंगतदार झालंय. विश्लेषणं कितीही उत्तम असली तरी ‘तर्कदुष्ट’ असल्याने कंटाळवाणी होतात. पण हे वाचावेसे वाटतं यातच त्याचे यश आहे.
    खूप छान!

    1. Thank you so much Pramod Ganu . Actually विश्लेषण पेक्षा सुद्धा आपल्याला कसे भावते असे थोडे पर्सनल पहिले तर गाण्याचे खूप हटके पैलू दिसतात हे अनुभवले आहे .

  7. विदुला

    प्रिया,
    रफीच्या असंख्य अप्रतिम गाण्यातून गाणी निवडणे हे च खूप मोठं काम.
    अर्थात च ही निवड क्लास.
    तू लिहिल्याप्रमाणे अर्ध विराम हे खरे.
    सागरातून मोती शोधण्या सारखे.
    ❤️❤️💐💐

  8. मो.रफी साहेबांनी इतकी अनेक भाषा,अनेक रसांतली गाणी गायली आहेत नं की त्यातून योग्य पेक्षा तू जी थीम घेतली आहेस त्याला समर्पक गाणी निवडणे म्हणजे केवळ अशक्य पण ते काम तू खूप जाणिवपूर्वक केलेस त्याबद्दल तुझे खुप कौतुक.तू थीम पण फारच छान म्हणजे त्याला जरा हटकेच म्हणू या निवडलीस आणि त्याला योग्य तो न्याय दिलास. खुपच सुंदर आणि मनाला भावणारे लिहितेस प्रिया.आम्हाला खुप आनंद दिलास.

    1. Nisha , Thank you 🙂
      हो , ती थीम जरा हटके .
      वर्षातून दोन दिवस लिहिता येते .. मग आपण थीम घेऊन लिहिले की चॉईस जरा सोपा होतो नाहीतर हरवतो ग गाण्यात.

  9. नेहमीप्रमाणेच गाण्यांची निवडही सुरेख आणि त्याचं विश्लेषण तर अप्रतिमच !!

  10. गाण्यांची निवड अतिशय सुरेख आणि लेख तर नेहमीप्रमाणेच अप्रतिम

    1. Nayana , Thank you ,
      गाणी शोधणे म्हणजे अर्ध काम
      रफी , किशोर च्या बाबतीत ,..लता आशा ..अटळ

  11. Prashant Deshpande

    अप्रतिम लेख, सर्वांग पुरुष ओळखलेली लेखीका
    गाणी आणि त्यावरील शब्दांकन संग्रही ठेवले आहे
    कमाल अफाट सुंदर लेख आहे

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *