Skip to content

विवाहाचा खरा अर्थ उलगडून दाखवणारा “अनुभव”

केव्हा कधी केले प्रेम, खेळ स्वप्नांचा मांडला
खेळ मांडता मांडता, जीव दोघांचा रंगला

प्रेमाच्या वाटेवरचे हे पहिले पाऊल. एकमेकांच्या संगतीत रमण्याचे, जोडीने स्वप्ने पाहण्याचे हे दिवस.

माझ्या चांदण्या संसारी जोड पाउले टाकिली
दिनरात त्याच्यासाठी दोन्ही मिळून कष्टली
आपुलालें व्यापताप घरी, बाहेर वाढले
आला संसार जंजाळ, पाय गुंतत चालले

लग्न होते. सुरुवातीचे फुलपाखरी दिवस उडून जातात. दोघे त्यांच्या व्यापात रमतात. त्यांची क्षितिजे वेगळी झाली की मार्ग वेगळे होऊ लागतात. स्त्री घरातील आणि घराबाहेरील जबाबदारी सांभाळता सांभाळता स्वतःलाही हरवून बसते. घरकाम, मुले, नोकरी या चक्रात गुरफटली की तिच्यातली आई जगते, पत्नी तग  धरून राहते, प्रेयसी मात्र संपतेच.
प्रेमामधील रोमान्स हरवतो आणि राहतो तो फक्त सहवास. मायेचा, जिव्हाळ्याचा, गरजेचा आणि त्यामुळे तडजोडीचा. या अगोड संसारात केवळ तिचीच नाही तर पुरुषाचीही घुसमट होते.
त्याचे बाह्य जग विस्तारित  होत असते, त्याच्या जबाबदाऱ्या, व्यावसायिक जगातले ताण आणि चार्म गेलेल्या संसाराचं वाढणारे ओझे पडल्याने  येणारा थकवा, होणारी चिडचिड , त्यातून  येणारी अपराधीपणाची भावना आणि ती जाण्यासाठी टाळलेला संवाद यामुळे बघता बघता, संसार पुढे चालू रहावा का नको अशा अवघड वळणावर येऊन ठेपतो.

उत्सुक ना डोळाभेट, बोलणेही ना अप्रूप
चहा, जेवण, विश्रांती–आले गणिताचे रूप
इंदिरा संत यांची “स्वप्ने उडाली दिगंती” कविता या स्थितीचे समर्पक वर्णन करताना म्हणते,

मांडलेल्या खेळातील स्वप्ने उडाली दिगंती
उजाडशा उन्हाळ्यात पाय पोळीशी राहाती.

आपले सिनेमे प्रेम या शब्दाने सुरु होतात आणि तिथेच संपतात. “क्षण एक पुरे प्रेमाचा” याचा अर्थ “पुढे त्याचे बहुधा मरण असावे “असा असावा.
तीन तासाच्या मनोरंजनात पुढची रिअल स्टोरी कोणाला आवडते पहायला! पण ज्या बिंदूवर सर्व  सिनेमा मान टाकतात त्या बिंदू पासून बासू भट्टाचार्यांचा “अनुभव”सुरु होतो.
लग्न होऊन सहा वर्षे झालेल्या मीता आणि अमरची ही गोष्ट.


अमर हा कामात डुबलेला संपादक. कामाचे प्रेशर, वेळेचा ताण यात घर, पत्नी सगळ्याचाच विसर पडलेला “न वरा “
कथा घडते ती मुंबईत. हे महानगर तुम्हाला पैसा,कीर्ती, काम देते पण त्याच्या वेगाशी जुळवून घेताना तुमची दमछाक सुद्धा होते. मीता एक गृहिणी आहे. तिचे जग म्हणजे तिचे घर, घरकाम करणारे नोकर, कधीही घरात न असणारा आणि घरी दमून आल्यानंतर तिची दखल घेण्याचीही ताकद आणि त्याही पेक्षा इच्छा नसणारा नवरा याभोवती फिरते. या जोडप्याला मूल  नाही. मूल होण्यासाठी आवश्यक असलेली जवळीक, शारीरिक आणि मानसिक ही त्यांच्यात उरलेली नाही. एका बिछान्यावर दोन बाजूला निद्रेची आराधना करणारी ती दोघे मोडकळीला आलेल्या संसाराचे प्रतीक आहे. चेहेरे नसलेली माणसे , तुकड्या तुकड्यानी होणारे निरर्थक संभाषण आणि भरून राहिलेला एकटेपणा.

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे

हा प्रश्न मीताला सतावतो कारण तिचे अमरवर प्रेम आहे. त्याच्या मुलाची आई होण्याची तिची स्त्री सुलभ इच्छा आहे. जेव्हा रात्रीचा एकांतही दोघांना जवळ यायला मदत करत नाही तेव्हा मात्र ती जागी होते. घर स्वतःच्या हातात घेते. फार उशीर होण्याआधी विझू लागलेल्या भावनांना परत एकदा हवा देते.

पत्नी ही केवळ शरीराची आणि तोंडाची भूक भागवणारी मादी नसते. तिला हृदय असते त्याहीपेक्षा मेंदू असतो. कायद्याने आणि संस्कृतीने ती त्याच्या आयुष्याची भागीदार आणि त्याच्या घराची “मालकीण” असते. घरात वस्तूचा अभाव असेल तरीही चालेल पण माणसांत लगाव असावा हे जेव्हा लक्षात येते तेव्हा, मीता घराचा तिच्या संसाराचा आणि पर्यायाने तिच्या नवऱ्याचा, अमरचा ताबा स्वतःच्या हातात घेते. नेहेमीसारखी नवऱ्याचे ऐकणारी, स्वतःचे मतच नसणारी, मनाविरुद्ध घडले की असहाय्य होऊन रडणारी ही गृहिणी नाही. नवऱ्याला न विचारता ती घरातील नोकरांना काढून टाकते. जेव्हा नवरा तक्रार करतो तेव्हा ती विचारते,” जब वो सब होते है और मै नही, क्या तुम मेरी कमी महसूस करते हो?”

स्वतःवर कुणीतरी जीवापाड प्रेम करावी ही प्रत्येकाची गरज असते. तीची गरज अमरला भासावी असे मीताला वाटणे हे नैसर्गीक आहे.
जगात तो बॉस असेलही, घरात मात्र तिचेच राज्य आहे. मनात आले तर वेळ मिळू शकतो. त्या वेळात एकांत निर्माण होऊ शकतो. एका टेबल वर बसून एकत्र जेवण घेणे सुद्धा अनेकदा पडलेले अंतर कमी करते. मने मोकळी होऊ लागतात. गाठी सुटू लागतात आणि नंतर ती रात्र येते. एकमेकांच्यात सामावून जाणारी रात्र. एकमेकांच्या कुशीत जागवलेली रात्र.

गीता दत्त चे एक अतिशय सुंदर गीत आहे या सिनेमात.
” मुझे जा न कहो मेरी जां “
मला आयुष्याची उपमा तू देऊ नकोस, कारण जीवनाला ही अंत आहे …

होंठ झुके जब होठोपर ,
सांस उलझी है सांसो में
दो जुडवा होठो की …बात कहो आखो से..
आता ओठातून शब्द कशाला यायला हवे! डोळेच बोलताहेत की. 
No one can describe intimacy quite the way Gulzar does ….
एका खिडकीच्या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित केले आहे.  पावसाच्या कोसळणाऱ्या धारा, त्याने चिंब झालेली पाने, भिजलेली तावदाने आणि रात्रीच्या तृप्तीची लाट अंगावर पांघरलेली ती दोघे.
On the background of drizzle outside, one can see the sparks flying between the couple. अशावेळी शब्दांची गरज भासत नाही. स्पर्श, शब्दाची जागा घेतो.
अनुभव या सिनेमात एक तिसरा कोन आहे. शशीचा , जो मीताच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष आहे.

हे संबंध शारीरिक नाहीत. त्याने तिला कधी स्पर्शही केला नाही. त्याच्या या दोघांच्या आयुष्यात झालेला प्रवेश सुद्धा मीताची भूमिका बदलवू शकत नाही. हे वादळ, कुणालाही न दुखावता पलटवण्याची तिची ताकद आहे. त्याच्या येण्याने पतीच्या मनात उठलेले संशयाचा किडाही ती संयमाने मारून टाकते. एक साधी स्त्री, आपल्या कमिटमेंट ने, आपल्या प्रेमाने आपले घर अभंग ठेवते. कुठेही मेलोड्रामा न करता नवऱ्याला आपल्या छोट्याश्या मुठीत आणि मिठीत कैद करते हे बघण्यासारखे आहे.
“ जिंदगी के हर संबंध में तरक्की होती है. बस एक पती पत्नी के संबंध है जिन्हें “टेकन फॉर ग्रांटेड” लिया जाता है. उन्हे ना तो बढने के लिये कोशिश होती है , ना तो तरक्की के लिये” हे वाक्य एवढे बोलके आहे.
खरेतर पती पत्नीचे नाते मांजर आणि तिच्या पिल्लासारखे असते.  मांजर आपल्या पिल्लाना नेताना तुम्ही पाहिलें आहे का!  दातात मानगूट पकडून नेते ती. तिचे दात लागत नाहीत पण मानगूट सुद्धा सुटत नाही.
ही भूमिका जर आलटून पालटून केली तर संसार मस्त एन्जॉय करता येतो हा संदेश “ अनुभव देतो “

संजीव कुमार आणि तनुजाची केमिस्ट्री येथे जमून आली आहे. त्यांचे एकमेकांशी संवाद साधणे किंवा संवाद हरवणे सहज वाटते. संजीव एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक आहे. हे व्यक्तिमत्व प्रगल्भ, बुद्धिमान असणे आवश्यक. त्याचे बोलणे, वावरणे , पार्टीत किंवा घरी, या भूमिकेला सुसंगत आहे. उच्चभ्रू वर्गातील गृहिणी म्हणून तनुजा शोभून दिसते. तलम साड्या, मोठे कुंकू, केशभुषा या पात्राला शोभेशी. तिचे वर्तन मृदू पण तिचा स्वतःवर विश्वास आहे, संयम आहे आणि त्याहीपेक्षा तिच्या विचारात ठामपणा आहे. शशी बद्दल नवऱ्याला संशय आहे हे तिला समजते. त्याचा राग तिच्यावर व्यक्त होत असताना सुद्धा , टिपिकल बायकांसारखे अश्रू न ढाळता, स्वतःची बाजू मांडण्याचे तिच्यात धैर्य आहे. 
सिनेमाचा शेवटचा सीन अतिशय सुंदर आहे.
शरीरसुख हे लग्न करण्याचे महत्वाचे कारण आहे हे आपल्याला मान्य आहे. खरेतर बायकांकडे संसार सावरण्याची एवढी शस्त्रे असतात की ज्याने नवरा प्रेमाने बांधला जाऊ शकतो. मोडकळीला येणार संसार हा कुणा तिसऱ्यामुळे मोडत नाही.
त्याला जागा देणारे तुम्हीच असतात. पुरुषाला जिंकण्याचा मार्ग केवळ पोटातून जातो हे म्हणणाऱ्या माणसाचा ऍनाटॉमीचा अभ्यास नसावा. एक माता, एक सखी, एक सहकारी या बरोबर ती एक रंभा ही आहे हे लक्षात ठेवणे संसारासाठी आवश्यक आहे. सौन्दर्याची शारीरिक शस्त्रे सर्वच बायकांकडे कमी जास्त असतात आणि तसेही त्यांच्या मोजमापावर नाही तर ती कशी वापरली जातात यावर  संसार टिकतो हे मीता दाखवून देते. 

१९७१ चा  असूनही “अनुभव” हा कालातीत सिनेमा आहे. कोणत्याही माणसाचा तुम्हाला  खटकणारा इतिहास असू शकतो; पण शेवटी संसार हा वर्तमानात असतो, त्याचा भविष्यकाळ तुमच्यातील सुसंवादावर अवलंबून असतो. अशावेळी दोन सुज्ञ, एकमेकांवर  प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी भूतकाळाला फार महत्व न देण्याचा संदेश अनुभव देतो. सिनेमाच्या शेवटी अमर मान्य करतो की तोच मिताच्या आयुष्यातील तिला हवा असणारा पुरुष आहे आणि त्याच्यासाठी ती एकमेव आहे.
“तुला मुलगा हवा की मुलगी ?” या प्रश्नावर सिनेमा संपतो. वादळ संपते. घराला घरपण येण्याची ती सुरुवात असते. 

मला अनुभव आवडला कारण मीता. तिचे आपल्या आयुष्यावर प्रेम आहे. स्वतःला  काय हवे या बाबतीत ती जागरूक आहे.  She has the guts to take ownership of her heart telling her.  नवऱ्यावर प्रेम आहे आणि तो गमावण्याची तीची तयारी नाही. नवरा कुठे चुकतो हे ती चुचकारून सांगते, त्याला आकर्षित करून सांगते,  प्रसंगी चिडूनही सांगते पण “ सांगते “
त्याची चूक त्याच्या पदरात घालण्याची तिची क्षमता आहे. 
मेरा पती मेरा है हे बंधन असेलही पण ते बंधन सुद्धा हवेहवेसे कसे होऊ शकते हे समजण्यासाठी तरी अनुभव मधील मीता प्रत्येक पत्नीने पाहणे आवश्यक आहे.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner



40 thoughts on “विवाहाचा खरा अर्थ उलगडून दाखवणारा “अनुभव””

  1. नेहेमी प्रमाणे अतिशय छान लेख.
    चित्रपट अनेक वेळा पाहिला असला तरी तू जे टिपते ते निसटून गेले होते पूर्वी असे वाटते. पुन्हा नव्याने चित्रपट पाहताना वेगळी अनुभूती मिळते👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼.

  2. फार छान लिहिलंय प्रिया. अप्रतिम 👌👌👌

  3. कालातीत सिनेमा हे यथार्थ वर्णन. सुंदर विश्लेषण सिनेमाचे

  4. तुमच्या नजरेतून सिनेमा बघावा आणि समजून घ्यावा. मीता खूप भावली. आणि त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं विवेचन. कमाल कमाल कमाल!! !! !!!! ❤

    1. Thank you so much Kamini 🙂
      सिनेमा बघा ..यु ट्यूब वर आहे . प्रिंट चांगली आहे

  5. प्राचीन काळापासून भारतात (इथे फक्त हिंदू समाज अभिप्रेत आहे) आठ प्रकारचे विवाह होत आले आहेत. पैकी फक्त ‘ब्रह्म विवाह’ हा प्रकार शास्त्रसंमत / विधिसंमत / समाजमान्य आहे. उरलेल्यांपैकी काही अंशी ‘देव विवाह’ वगळता इतर (आर्श, प्रजापत्य, गंधर्व, असूर, राक्षस, पैशाच्य) प्रकार अमान्य तरी प्रचलित आहेत. आधुनिक काळातील लोकप्रिय विवाह प्रकार प्रेम विवाह हा गंधर्व विवाहाशी मिळताजुळता. म्हणजे ‘विवाह’ ही संकल्पना आमुलाग्र बदलून आधुनिक जीवनमुल्यांच्या चौकटीत बसवली गेली आहे. त्यामुळे ‘अनुभव’ ही त्याच संदर्भ चौकटीतले. त्यातून आता आर्थिक निकष अंतिम ठरत असल्याने विवाह या संकल्पनेचा आणखी संकोच झाला आहे. सत्यवान-सावित्री, राम-सीता, आनंदी-गोपाळ पासून आता सैफिना, विरुष्का वगैरे पर्यंतच्या प्रवासात विवाहातला ‘विवाह’ बराचसा संपून त्यात ‘अटीशर्तींसहित स्त्री-पुरुष सहअस्तित्व’ असं काहीसं स्वरूप उरलं आहे. साधारण ‘अनुभव’ तोच असावा.

    विवाहसंस्थेचा तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ जाणण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त. बाकी मुल्ये, भावना, बांधिलकी, निष्ठा वगैरे गोष्टी ब-याच अंशी संदर्भहीन ठरल्याचंच दिसतं.

    1. Agree Hemant Deo.

      मला या सर्वापेक्षा आताच्या काळात लग्न काय , करिअर काय , प्रेम काय ..माणसाने स्वप्नाळू राहू नये असे वाटते .
      हा काळ आता फार मोठा आहे .. निदान वीस एक वर्षे , तेव्हा आपल्याला जे पाहिजे …अगदी पैसे का असेना … तो पारखून लग्न करावे ..नंतर मात्र ते टिकवावे .
      स्वतःचा दोर तुटलेला पतंग होऊ देऊ नये .
      बाकी मूल्ये म्हणजे तरी दुसरे काय !

  6. Anjali Boramanikar

    खूप सुंदर लिहिले आहे… 😍👌👌विवाहाचा अर्थ छान उलगडवून सांगितला… 👌👌😍

  7. इतकं सुंदर शब्दात मांडलय कि वाचतच रहावसं वाटतं संजीवकुमार आणि तनुजाचा अफलातून अभिनय आणि तुझे लिखाण सगळेच जीवंत अनुभव येतात गं

  8. विदुला

    खूप आवडलेला सिनेमा.
    तनुजा,संजीवकुमार दोघे ही आवडते.

    तुझी लेखणी याला चार चांद लावते.
    क्या बात है
    ❤️❤️❤️

    1. मलाहीVidula. .. तनुजा was a surprised package
      .संजीव चा रोल प्राण करणार होता ,,,ते झाले नाही प्रेक्षकांचे नशीब

  9. खूप सुंदर लिहिलं आहेस. चित्रपटातल्या सगळ्या खास जागा छान उलगडण्यात. चित्रपटासारखाच हा लेखही एक अप्रतिम ‘अनुभव’ आहे. अतिशय आवडणार्‍या चित्रपटांपैकी एक आहे हा!

    1. Absolutely Manik,
      काळाच्या फार पुढे असणारा चित्रपट .
      तो गाजला ते मला खरंच नवल वाटते , त्या काळात जे सिनेमा बनवत होते , फार मॉडर्न.

  10. शांत प्रगल्भ सिनेमा. ही मूल्यं किंवा मुद्दे आता फार प्रायमरी वाटतात.‌तू तितकंच प्रगल्भ परीक्षण करून पुन्हा एकदा अनुभव अनुभवायला दिलास.

    1. Exactly Shalmali ,
      म्हणून मला मीता संस्कारी पेक्षा हुशार , आणि पुढचा विचार करणारी वाटते.

  11. मी हा सिनेमा बघितला आहे आणि मला आवडला होता. का आवडला हे मला विचारले असते तर मी सांगू शकले नसते. आज हा लेख वाचल्यावर ते समजले. खूप सुंदर लिहिलय 👌👌👌

    1. Thank you Devika.
      अनेक प्रसंग आपल्याला relate होतात .
      आणि ते सुद्धा नकळत
      माझेही तसेच झालेले .

  12. My favourite movie…
    छोट्या छोट्या गोष्टी सुंदर विश्लेषण केल्या आहेत mam 🙏
    Matured marrige love story… अनुभव 😍
    Thank you so much mam🙏😍

  13. अतिशय सुंदर लेख 👍👌❤️
    सिनेमा लगेच बघितला. खूपच सुंदर.

Leave a Reply to Devika Atul Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *